Friday 11 August 2023

जबाबदार व्यक्तिमत्व घडवितांना !

 




                                      

















                                                                                                                                                         जबाबदार व्यक्तिमत्व घडवितांना !

 

डेटा म्हणजे माहिती नव्हे, माहिती म्हणजे ज्ञान नव्हे, ज्ञान म्हणजे समज नव्हे!, आणि समज म्हणजे शहाणपण नव्हे!; जीवनातली ती तथ्ये समजून घेणे म्हणजेच शिक्षण” ... क्लिफोर्ड स्टोल

क्लिफोर्ड पॉल क्लिफ स्टोल हे अमेरिकी अंतराळवीर, लेखक व शिक्षक आहेत. केवळ एक हाडाचा शिक्षकच वरील शब्दांचा अर्थ अतिशय स्पष्टपणे समजावून सांगू शकतो, जे पॉल निश्चितच आहेत! मी शिक्षक नाही, म्हणजे मला असे वाटते की पारंपारिक अर्थाने नाही. मी कधीही शिकवणे हे पूर्णवेळ काम म्हणून केले नाही (तशी इच्छा मात्र आहे). तरीही माझा शिक्षण क्षेत्राशी संबंध आहे व माझ्या उत्तर आयुष्यातील (म्हणजे माझ्या शिक्षणानंतरचा) अनुभवाचा विचार करता, विद्यार्थ्यांसोबत माझा जो काही संवाद होतो त्यावरून मी पॉलशी पूर्णपणे सहमत आहे. हे इंटरनेटचे युग आहे (म्हणजे गूगलचे) ज्यामध्ये कोठलीही माहिती केवळ एका स्क्रीकवर उपलब्ध होते, ज्यामुळे तुम्हाला असे वाटते की तुम्ही सर्वात ज्ञानी माणूस आहात. खरेतर तुम्ही केवळ माहितीचे निरीक्षक म्हणून व ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्टमनचे काम करत असता, हे कटू सत्य आहे; या सगळ्यामुळे शिक्षकाचे काम कठीण झाले आहे. या लेखाचा विषय म्हणजे मला आर्किटेक्चर व स्थापत्य अभियांत्रिकीच्या पदवीधर (खरेतर कुणासाठीही) विद्यार्थ्यांसाठी बांधकाम किंवा बांधकाम स्थळाचे व्यवस्थापन या विषयातील पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंडळामध्ये वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. पुण्यातील भानुबाई नानावटे आर्किटेक्चर महाविद्यालयाने त्यांच्या इंग्लडमधील जॉन मूर भागीदार विद्यापीठासह हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या बांधकाम क्षेत्रातील थोड्याफार अनुभवामुळे व पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांकडून एका कंपनीचा मालक म्हणून तसेच एक अर्धवेळ शिक्षक म्हणून बांधकाम स्थळी मला काय अपेक्षित आहे हे सांगण्यासाठी मला आमंत्रित करण्यात आले होते.

या मंडळामध्ये बांधकाम क्षेत्रातून तसेच रिअल इस्टेट व शिक्षण क्षेत्रातील अनेक ख्यातनाम व ज्येष्ठ मंडळींचा समावेश होतो व त्या सगळ्यांनी विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून दिली पाहिजे, तसेच उद्योगामध्ये एआयसारख्या (कृत्रिम प्रज्ञा) गोष्टींचाही वापर केला पाहिजे असे मत व्यक्त केले, जे जगभरात होत आहे. त्याचप्रमाणे बांधकाम स्थळ किंवा प्रत्यक्ष क्षेत्रातील कामाच्या अनुभवाविषयीही सूचना देण्यात आल्या, जे अत्यावश्यक आहे व त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मालकाला काय हवे आहे किंवा त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे समजेल, अर्थात बऱ्याच मालक बिल्डरांनाच त्यांना काय हवे आहे हे माहिती नसते (उपहास), यातील विनोदाचा भाग सोडला, तर संबंधित महाविद्यालयाच्या चमूने अभ्यासक्रमामध्ये कोणत्या घटकांचा समावेश असेल व या घटकांपैकी प्रत्येकाला किती गुण असतील याची यादी तयार केली होती. आम्ही ती यादी पाहणे, त्याविषयी चर्चा करणे व आपली मते व्यक्त करणे अपेक्षित होते. या घटकांमध्ये कोणते विषय बंधनकारक असतील तसेच कोणते निवडता येतील व आम्ही ते कसे शिकवू याचाही समावेश होता. अभ्यासक्रमाच्या या आघाडीवर काय-काय सुधारणा करता येतील याविषयीही विचार झाला. अर्थातच तुम्ही जेव्हा बांधकामाविषयी शिकवणार असता तेव्हा तुम्ही काही गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकत नाही व त्यापैकी एक म्हणजे बांधकाम स्थळाचा अनुभव. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये पूर्वी तसेच आजही संशोधन विकासाच्या प्रती कार्य अतिशय कमी झाले आहे, कारण यंत्रांपेक्षाही अतिशय स्वस्तात मनुष्यबळ उपलब्ध होते. उदाहरणार्थ भिंतींचे प्लास्टरिंग ऐंशी टक्के बांधकामांमध्ये अजूनही हातांनी केले जाते, त्यामुळे जर चारही खोल्यांमधील प्लास्टरिंगचे काम चार वेगवेगळ्या गवंड्यांनी केले असेल तर भिंतींच्या प्लास्टरचा दर्जा वेगवेगळा असतो. अशा परिस्थितीत तुम्ही दर्जाची खात्री कशी कराल व रंगकाम, फरशी बसवणे, नळ जोडणी अशा अनेक कामांच्या बाबतीत ही परिस्थिती आहे. त्याचवेळी वर नमूद केलेल्या अनेक कामांसाठी केंद्राद्वारे प्रमाणित झालेले अभ्यासक्रम नाहीत याला केवळ इलेक्ट्रिशियन किंवा वेल्डरचा अपवाद आहे. बांधकाम स्थळी, कंत्राटदाराकडे (ठेकेदाराकडे) येणाऱ्या ज्या व्यक्तीच्या हातात थापी असते (प्लास्टरिंगचे साधन) तो गवंडी, ज्या व्यक्तीच्या हातात करवत असते तो सुतार, ज्या व्यक्तीच्या हातात पाना (नट बोल्ट बसविण्याचे साधन) असतो तो प्लंबर आहे, असा दावा करू शकतो, त्यासाठी इतर काहीही शैक्षणिक पात्रता विचारली जात नाही किंवा आवश्यक नसते. बांधकाम स्थळावरील अभियंता किंवा पर्यवेक्षक म्हणून, तुम्हाला या सगळ्यांना सांभाळावे लागते.

एलअँडटी किंवा शापूरजी पालनजी (बांधकाम कंपन्या) यासारख्या मोठ्या कंपन्यांकडे या कामांसाठी त्यांची स्वतःची प्रशिक्षित माणसे असू शकतात. परंतु आपण संपूर्ण देशाच्या बांधकाम उद्योगाविषयी व त्यातील नोकऱ्यांविषयी बोलत आहोत, केवळ काही निवडक कंपन्यांविषयी नाही, म्हणूनच मला या कोर्सच्या शिक्षकांना वास्तवाची जाणीव करून द्यावीशी वाटली, जी मी करून दिली.

चांगले प्लास्टर, चांगले रंगकाम, चांगले प्लंबिंग, चांगले वॉटर प्रूफिंग किंवा चांगले टायलिंग ठरवताना एखाद्या यंत्राने त्याचे मोजमाप करता येत नाही. तर चांगले म्हणजे काय हे ठरविण्यासाठी त्याने किंवा तिने स्वतः तसा दृष्टिकोन विकसित करावा लागतो, ज्याचा तरूण पिढीत अभाव असल्याचे जाणवते. याचे कारण म्हणजे अभियांत्रिकी नाही तर ज्याप्रकारे अभियांत्रिकी किंवा कोणतेही ज्ञान त्यांना शिकवले जाते ते आहे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला गूगलवर चांगल्या दर्जाची उदाहरणे पाहता येऊ शकतात पण चांगला दर्जा म्हणजे काय हे तुम्हाला गूगल शिकवू शकत नाही. त्यासाठी अभियंत्याने जास्तीत जास्त कामे करून ही जाण विकसित करावी लागते, तो हे करू शकतो व त्यासाठी एका गोष्टीची गरज असते जी कोणत्याही शाळेत तुम्हाला शिकवली जात नाही, ती म्हणजे संयम.  इथे मला झेन तत्त्वज्ञानातील एक गोष्ट आठवली (मी झेनचा केवळ चाहताच नाही तर अनुयायी आहे), जी अशा इतर कथांप्रमाणेच एका गुरू व त्याच्या शिष्याची गोष्ट आहे. एक मुलगा त्याच्या गुरुंकडे जातो जे तलवारबाजी शिकवण्यात अतिशय निपुण मानले जात व त्यांना विचारतो की तो किती दिवसात सर्वोत्कृष्ट तलवारबाज होऊ शकेल? गुरू उत्तर देतात की सर्वोत्कृष्ट तलवारबाज होण्यासाठी त्याला दहा वर्षे लागतील. हे ऐकून तो मुलगा म्हणतो हा तर फारच वेळ खाऊ प्रकार आहे व तो शिकण्यासाठी एवढा वेळ घालवू शकत नाही व त्याला त्याच्या पालकांना कळवावे लागेल, म्हणजे त्याला दुसऱ्या दिवशी परत येईल असे सांगतो. दुसऱ्या दिवशी तो मुलगा पुन्हा गुरुंकडे येतो व सांगतो की त्याने त्याच्या पालकांना कळवले आहे व तो त्याचे घर सोडण्यासाठी व गुरुंसोबत राहण्यासाठी तयार आहे व तो केवळ तलवारबाजीच्या प्रशिक्षणावरच लक्ष केंद्रित करेल, आता त्याला एक सर्वोत्कृष्ट तलवारबाज होण्यासाठी किती काळ लागेल? यावर त्याचे गुरू उत्तर देतात, कदाचित वीस वर्षे! तो मुलगा गोंधळून जातो कारण त्याने सामान्यपणे शिकण्यासाठी किती काळ लागेल असे विचारल्यानंतर, तो दहा वर्षात सर्वोत्तम होऊ शकत असेल, तर जेव्हा तो सगळे काही सोडायला व केवळ तलवारबाजीवर लक्ष केंद्रित करायला तयार आहे, तेव्हा त्यासाठी दुप्पट वेळ लागेल असे गुरुंचे म्हणणे आहे, असे कसे होऊ शकते? गुरुंचे म्हणणे अगदी बरोबर होते कारण त्या मुलाकडे तलवारबाजीचे कौशल्य किंवा शिकण्याची इच्छा कमी नव्हती, तर त्याच्याकडे संयम नव्हता व म्हणूनच दुसऱ्यांदा जेव्हा मुलगा परत येतो तेव्हा गुरु त्याच्या प्रशिक्षणाचा कालावधी वाढवतात.

ही झेनची गोष्ट आजही तितकीच लागू होते व आज जर मला कुणी विचारले की माझ्या चमूमध्ये ज्यांना काम करायचे आहे अशा नवीन प्रशिक्षणार्थीकडून किंवा बांधकाम स्थळावरील एखाद्या नवख्या अभियंत्याकडून माझी काय अपेक्षा असेल, तर ती म्हणजे संयम. कारण एखादी व्यक्ती ज्ञानाच्या बाबतीत किंवा त्याचा वापर करण्याच्या बाबतीत चांगली किंवा वाईट असू शकते. परंतु एखाद्या व्यक्तीकडे जे नाही ते मिळविण्याचा संयम नसेल तर त्याने (किंवा तिने) कोणत्याही संस्थेतून कोणतीही पदवी घेतली असली तरी निरुपयोगी आहे असे माझे मत आहे. सर्वप्रथम व्यक्तीमध्ये समर्पणाची भावना असली पाहिजे व शिकण्याची इच्छा असली पाहिजे परंतु तुमच्याकडे संयम नसेल तर तुम्ही कितीही समर्पित असलात तरीही त्याचा काही उपयोग होणार नाही. एखाद्या उमेदवाराच्या चारित्र्याचा पुढचा पैलू म्हणजे आपली कमजोरी स्वीकारणे. नवीन पिढीची (अनेक मोठ्या माणसांचीही) सर्वात मोठी समस्या म्हणजे, “मला सगळे काही माहिती आहेहा दृष्टिकोन, यामुळे तुम्ही केवळ मूर्खच बनत नाही तर तुमच्यातली सुधारणाही थांबते. तुमच्यामध्ये जेव्हा हा दृष्टिकोन ठासून भरलेला असतो तेव्हा तुमच्या साहेबाने किंवा सहकाऱ्यांनी तुम्हाला काहीही शिकवण्याचा प्रयत्न केला तरीही तुमचा अपमान केला जातो असाच तुमचा दृष्टिकोन असतो. मी असे अनेक तरुण पाहिले आहेत किंवा त्यांच्यासोबत काम केले आहे ज्यांनी अतिशय उत्तम गुणांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे माझे बांधकाम स्थळी आपणच साहेब आहोत व आपल्याला कुणाच्याही मार्गदर्शनाची गरज नाही याच थाटात ते वावरत असतात. खरेतर बांधकामाच्या ठिकाणी दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळते अगदी फिटर किंवा गवंडीही तुमचा शिक्षक होऊ शकतो, जो अनेक दशकांपासून बांधकामावर काम करतोय, जेव्हा तुम्ही एखाद्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशही घेतला नव्हता व त्यांच्याकडून शिकण्यात लाज वाटण्यासारखे काहीही नाही. मी माझी ही मते मांडली कारण या गोष्टी मलाही कधी शिकविण्यात आल्या नव्हत्या व मला त्यांचे महत्त्व समजण्यासाठी अनेक वर्षे जावी लागली.

मी मांडलेला पुढचा मुद्दा म्हणजे योग्य संवादाचा व निरीक्षणाचा. जीवनाचा हा पैलू तर विद्यार्थ्यांना कधी शिकवलाच जात नाही किंवा शिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर त्याला महत्त्व दिले जात नाही, विशेषतः तांत्रिक विद्याशाखांमध्ये, असे माझे निरीक्षण आहे. परिणामी, तांत्रिक विद्याशाखांमधील बहुतेक उमेदवारांचे संवाद कौशल्य यथातथाच असते व जेथे कामांमध्ये अनेक संस्थांचा सहभाग असतो तेथे संवादाअभावी गोंधळ उडतो. बांधकाम स्थळावरील किंवा प्रकल्प अभियंत्याने संबंधित सर्व संस्थांशी समन्वय साधणेही अपेक्षित असते व संवादाची एक सुयोग्य यंत्रणा असणे अत्यावश्यक आहे. सुदैवाने, या पिढीला वॉट्स, ईमेल, एसएमएस, मोबाईल यासारखी संवादाची अनेक माध्यमे उपलब्ध आहेत, परंतु दुर्दैवाने ते त्याचा योग्य प्रकारे वापर करू शकत नाहीत. त्याचशिवाय त्यांचा मला असे वाटलेअसे म्हणण्याकडे कल असतो. ही अतिशय तापदायक गोष्ट असते, किंबहुना मला असे वाटलेहा तरुणाईला लागलेला सर्वात मोठा शाप आहे असे मला वाटते. कारण कोणतेही काम करताना तुमचे निर्णय हे तथ्ये व आकडेवारीवर आधारित असले पाहिजेत व तुमच्या स्वतःच्या गृहितकांवर नव्हे (ती सुद्धा एककल्ली), तरुण पिढीला कामाच्या बाबतीत ही मूलभूत गोष्ट शिकवण्याची वेळ आता आली आहे. संबंधित व्यक्तींना भेटीची वेळ कळविण्यापासून, ते झालेल्या कामाचे पर्यवेक्षण करण्यापर्यंत, बहुतेक चुका या दुसरे कुणीतरी हे काम करेल असे किंवा त्यांना काय करायचे आहे हे आधीच माहिती असेल असे कुणीतरी गृहित धरल्याने होतात. परंतु असे नसते व त्यामुळे परिणामी गृहित धरल्यामुळे एकापाठोपाठ एक चुका होत जातात. ही समस्या केवळ काही गोष्टी गृहित धरून त्यावर अवलंबून राहण्याची नाही, कारण अनुभवामुळे तुम्ही काही गोष्टी गृहित धरू शकता, समस्या अशी आहे की आजची पिढी त्यांच्या सोयीनुसार सगळे काही गृहित धरते. कोणत्याही शहाण्या मालकासाठी हि वृत्ती हाताळणे ही एक समस्या आहे, हे अभ्यासक्रमाची रचना करताना कृपया लक्षात ठेवा असे मी सांगितले.

त्याचशिवाय कोणते विषय एच्छिक म्हणून निवडता येतील यासंदर्भात बोलताना, मी मानसशास्त्र हा एक विषय सुचवला. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या बांधकाम स्थळाचे व्यवस्थापन करता तेव्हा ते लोकांचे व्यवस्थापन करण्यासारखेच असते, त्यामुळे तुम्हाला माणसाच्या मानशास्त्राचे ज्ञान असले पाहिजे, हा माझा त्यामागचा तर्क होता. निवडता येईल असा दुसरा विषय मी सुचवला, ज्याविषयी अनेकांच्या कपाळाला आठ्या पडतील किंवा तो माझ्या जिव्हाळ्याचा (म्हणजे मला त्याचे वेड आहे) विषय आहे म्हणून तो निवडक विषयांसाठी मी सुचवला असे म्हणतील, तो विषय म्हणजे वन्यजीवन. परंतु मी खरोखरच सांगतो, वन्यजीवन तुम्हाला अतिशय व्यवहार्यपणे व रोचकपणे संयम शिकवते, उदाहरणार्थ जंगलात वाघाची एक झलक दिसण्यासाठी तुम्ही अजिबात आवाज न करता तासतास वाट पाहता, तुम्ही संयम असाच शिकू शकता. याशिवाय  वन्यजीवनामध्ये काहीही उगीच किंवा योगायोगाने घडत नाही, प्रत्येक गोष्टीचा काही उद्देश असतो कारण कुठलाही वन्य प्राणी स्वतःच्या गृहितकांवर जगू शकत नाही. जंगलामध्ये, हरिण आजूबाजूला वाघ नसेल असे गृहित धरून उघड्यावर फिरू शकत नाही, तसेच एक वाघही एखादे हरिण एकटे आहे त्यामुळे तो त्याचे भक्ष्य सहज पकडू शकेल असे गृहित धरू शकत नाही. या सगळ्याचे निरीक्षण करून विद्यार्थी स्वतःच्या आयुष्याविषयी कितीतरी गोष्टी शिकू शकतील, मला स्वतःला याचा फायदा झाला आहे. या बरोबरीने वन्यजीवन म्हणजे निसर्गाचे सर्वोत्तम रूप, त्यातूनच आपल्याला सौंदर्यदृष्टी मिळू शकते, कारण निसर्गामध्ये काहीही अप्रमाणबद्ध किंवा कुरूप नसते व सौंदर्यदृष्टी हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे, बरोबर?

सरतेशेवटी, मी सर्व शिक्षकांना आवाहन केले की या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही या अभ्यासक्रमामध्ये सहभागी करून घ्या. अधूनमधून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना कॉल केला पाहिजे किंवा त्यांच्या जडणघडणीबद्दल त्यांच्याशी बोलले पाहिजे कारण कोणताही विद्यार्थी कॉलेजपेक्षाही घरी अधिक वेळ घालवतो, त्यामुळे तो घरी कसा वागतो, हे अतिशय महत्त्वाचे आहे. एक मालक म्हणून, बांधकाम स्थळावरील माझा अभियंता मला आधी एक चांगला माणूस असला पाहिजे, तो चांगला अभियंता आहे किंवा नाही ही नंतरची बाब आहे, म्हणूनच, विद्यार्थ्यांमधून चांगली माणसे घडविण्यावर जास्त लक्ष केंद्रित करूयात; एवढे बोलून मला आमंत्रित करून बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी भानुबाई नानावटे अर्किटेक्चर कॉलेज आणि आयोजकांचे व जॉन मूर इंग्लंड यांचे आभार मानले, ज्यामुळे मला आत्मपरीक्षणही करता आले.


sales@sanjeevanideve.com

तुम्ही खाली दिलेल्या दुव्यावर या गोष्टीचे तपशील प्रत्यक्ष पाहू शकता…

https://www.flickr.com/photos/sanjeevani_developers/albums/72177720309891298/with/53057155319/

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

ईमेल आयडी


smd156812@gmail.com

 

No comments:

Post a Comment