Monday 17 June 2024

"इच्छा पूर्तीचे झाड ताडोबा, भाग 2 आणि वन्यजीव पर्यटनाचे भविष्य!

                         



       




  




  




  


"इच्छा पूर्तीचे झाड ताडोबा, भाग 2 आणि वन्यजीव पर्यटनाचे भविष्य! "

 

जंगलामध्ये कामाचे दिवस किंवा सुट्टीचे दिवस अशी विभागणी नसते, इथे प्रत्येक दिवस ही नवीन सुरुवात असते”… मी.


माझ्या आधीच्या जंगलातील  इच्छापूर्तीविषयीच्या लेखाचाच हा पुढचा भाग. मी वरील शब्दांमध्ये आणखी थोडी भर घालेन (मी त्याला अवतरण म्हणणार नाही, कारण तो मान सुप्रिद्ध व्यक्तींचा आहे व मी त्यापैकी एक नाही), की जंगलामध्ये, प्रत्येक नवीन दिवस हा वन्यजीवन चाहत्यांसाठी एक नवीन इच्छा व्यक्त करण्याची व ती पूर्ण होईल अशी आशा करण्याची एक संधी असते. मी आधीच नमूद केले आहे की ताडोबामध्ये माझ्या जंगलाविषयीचा बहुतेक इच्छा पूर्ण झाल्या आहेत व त्यापेक्षाही जास्त म्हणजे या इच्छापूर्तीचा संपूर्ण अनुभव अतिशय भारावून टाकणारा होता. याचे कारण म्हणजे वाघ किंवा अस्वल किंवा असा कोणताही प्राणी दिसणे हे आनंददायकच असते परंतु जेव्हा तुम्हाला तो प्राणी एखाद्याला अॅक्शन मध्ये दिसतो तेव्हा तो अनुभव तुमची इच्छा (म्हणजे अनेक इच्छा) पूर्ण होण्यासोबतच अधिक संस्मरणीय ठरतो व ताडोबाच्या सफारीतही हेच झाले. माझ्या इच्छांच्या यादीतील पाच इच्छा पूर्ण झाल्यामुळे मी समाधानी होतो व उरलेल्या सफारींमध्ये

आपण फक्त जंगल एन्जॉय करायच आहे असा विचार केला होता, परंतु तरीही गोष्टी घडतच असतात. ज्या इच्छा पूर्ण झाल्या त्यांचा क्रम लेखामध्ये कदाचित वेगळा असू शकतो परंतु मी ती भावना कशी होती याचे वर्णन करत आहे. उन्हाळयातील अनेक पर्यटक दुपारच्या सफारी करणे टाळतात जेव्हा त्यांचे संपूर्ण लक्ष वाघ दिसण्यावर असते (दुसरे काय). मी त्यांना दोष देणार नाही कारण ही ताडोबामध्ये मे महिन्याची अखेर होती. तुम्ही कोलसा रेंजमध्ये जाता तेव्हा तिथे जंगल घनदाट नाही तर खुले आहे व डोक्यावर अजिबात सावली नाही, उन्हाचा पारा ४५ अंशांचा वर गेला असताना माझ्यासारख्या निस्सीम वन्यजीवन प्रेमीलाही खोलीमध्ये एसी लावून २० अंश सेल्सियस तापमानात बसण्याचा व आराम करण्याचा मोह होईल. परंतु जंगलात असताना जास्तीत जास्त वेळ कारणी लागावा यासाठी मी सफारीवर जायचे ठरवले. तडोबाने माझी चिकाटी, संयम व उन्हात काळवंडणे पाहून माझ्यावर आणखी नशीबाची बरसात करायचे ठरवले, हास्य! तर अशाच काही इच्छापूर्तीच्या गोष्टी देत आहे....

इच्छापूर्ती ६. सरतेशेवटी, स्वप्नवत वाटणारे दृश्य कॅमेऱ्यात उतरविले !

मला नाटकीकरण करायचे नाही परंतु आपल्याला फॅशनेबल ब्रँडेड अॅक्सेसरीजनी नटलेल्या तारे-तारकांच्या फॅशन/चित्रपट मासिकांमधील छायाचित्रांबद्दल आसूया का वाटते. तर ते अशा वस्तू खरेदी करू शकतात म्हणून नव्हे तर ते या छायाचित्रांमध्ये ज्याप्रकारे क्षण दिसतात त्यामुळे आपल्याला सुप्तपणे त्यांच्याविषयी आसूया वाटत असते. कारण आता जवळपास साठीला पोहोचलेला आमीर किंवा शाहरुख त्याच वयोगटातील आपल्यापेक्षा (म्हणजे मी माझ्या वयाचा संदर्भ दिला तर पन्नाशीच्या मध्यावर असलेल्या) कितीतरी तरूण व अधिक तंदुरुस्त वाटतात. त्याचप्रमाणे आपल्यापैकी अनेक वन्यजीवप्रेमी (म्हणजे प्रामुख्याने छायाचित्रकार) जेव्हा ते समाज माध्यमांवर वन्यजीवनाची काही उत्तम छायाचित्रे पाहतात तेव्हा त्यांच्या मनात मला असे छायाचित्र कधी काढता येईल किंवा मला असे छायाचित्र का काढता येत नाही असा विचार येतो व तुमच्या इच्छांच्या यादीमध्ये त्याची आणखी एक भर पडते. मी देखील या एलएसएमईएस म्हणजेच “लॉ ऑफ सोशल मीडिया एन्व्ही सिंड्रोमला” म्हणजेच समाज माध्यमांवर दिसणारी छायाचित्रे पाहून त्याविषयी आसूया वाटण्याच्या नियमाला अपवाद नाही. अशाच छायाचित्रांपैकी एक म्हणजे जंगलातील रस्त्यावरील वाघ, तो कॅमेऱ्यात बघत असताना त्याची पूर्ण फ्रेम दिसतेय व वाघाच्या पलिकडील रस्ता विस्तीर्ण जंगलाशी एकरूप होऊन जात आहे. यातली मेख म्हणजे, छायाचित्रातील सर्व घटक स्पष्ट असले पाहिजेत, कारण तुम्ही वाघावर फोकस केला तर जंगल व रस्ता धूसर होतात व जंगल व रस्त्यावर फोकस केल्यावर वाघाची प्रतिमा धूसर होते. मी वाघाला रस्ता ओलांडताना अनेकदा पाहिले आहे, परंतु एकतर तो माझ्याकडे (म्हणजे कॅमेऱ्याकडे) पाहात नव्हता किंवा पार्श्वभूमी रिकामी नव्हती म्हणजे दुसऱ्या बाजूला वाहने होती किंवा रस्ता वळण घेत होता. ही छायाचित्रे क्षणार्धात काढावी लागतात कारण वाघ अथवा कोणताही प्राणी निवांतपणे रस्ता ओलांडत नाही याला केवळ गवा व हत्तीचा अपवाद असतो. त्याचशिवाय सुस्पष्ट फ्रेम मिळण्यासाठी तुमचे वाहन समोर असले पाहिजे व  तुमच्या या सर्व गोष्टी जुळून आल्या तरीही तुम्हाला योग्यप्रकारे  त्या  वेळेत छायाचित्र घेता आले पाहिजे (हे विशेषतः माझ्यासाठी आहे)!

ताडोबाच्या कोलसा रेंजच्या बफर क्षेत्रात वाहने कमी आहेत. मला तिथे ही संधी मिळाली. आम्ही तीन बछडे असलेल्या एका वाघीणीच्या मागावर होतो व ही आई तिच्या बछड्यांना शिकारीकडे (माफ करा, अन्नाकडे) घेऊन चालली होती, जी तिने तिच्या बछड्यांसाठी केली होती. यावेळी वाघीणीच्या मार्गाचा अंदाज लावणे शक्य असते कारण तिचा वेग थोडा संथ असतो कारण ती सोबत बछड्यांना घेऊन चाललेली असते. परंतु यावेळी वाघीण अतिशय सावधही असते व विशेषतः ही (के मार्क नावाची) या वाघीणीची ही पहिलीच बछडी होती, म्हणजे ही पहिल्यांदाच आई झालेली होती, त्यामुळे ती अतिशय खबरदारी घेत होती. तरीही आम्ही तिला झुडुपांमधून पुढे जाताना पाहिले, ती ज्या दिशेने जात होती त्यामध्ये ती मुख्य रस्ता ओलांडून खडसंगी नावाच्या जवळच्या गावाच्या दिशेने जाणे अपेक्षित होते. आता परिस्थिती अशी होती की, इतरही काही वाहने होती व वाघीण कोणताही ठिकाणाहून रस्ता ओलांडून जाऊ शकत होती, जे झुडुपांच्या दाटीतून ती कुठून बाहेर येते यावर अवलंबून होते. इथे एका मोराने दिलेल्या इशाऱ्यामुळे आम्हाला योग्य जागी वाट पाहता आली व आम्हाला वाघीण तिच्या बछड्यांसोबत आमच्या जिप्सीपासून काही मीटर अंतरावर जंगलातून बाहेर पडताना दिसली. तोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होईल का याची मला खात्री नव्हती कारण कारण बछडे वाघीणीपासून फार लांब नसावेत व ती आमच्याकडे पाहणार नव्हती. तरीही वाघांचा एक समूह रस्ता ओलांडतानाचे दृश्य पाहायला मिळाले असते, इथेच ताडोबा देवाचा कृपाहस्त मला लाभला व आम्हाला विरुद्ध दिशेहून एक दुचाकी येताना दिसली. ज्यांना राज्याच्या या भागाविषयी विशेष माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो, ताडोबाच्या जंगलाभोवती जवळपास २०० खेडी आहेत व त्यामध्ये दोन लाख लोक राहतात व या भागामध्ये जवळपास ३०० वाघ आहेत. वाघ रस्ता ओलांडताना किंवा रस्त्यावरून चालतानाचे दृश्य गावकऱ्यांसाठी नवीन नाही, तरीही व्यवस्थित खबरदारी घेणे आवश्यक असते, ज्याकडे गावकरी दुर्लक्ष करतात, ही कटू वस्तुस्थिती आहे. म्हणूनच, आम्ही त्या दुचाकी-स्वारांच्या दिशेने हात हलवून जवळपास वाघ असल्याची खूण केली व ते जिथे आहेत तिथेच थांबावे असे सांगितले. तरीही ते दुचाकीस्वार पुढे आले, हे कदाचित निष्काळजीपणा किंवा उत्सुकतेपोटी झाले असावे व थेट वाघीण जिथे रस्ता ओलांडणार होती तिथे आले व रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाघ आहे का हे पाहू लागले. वर नमूद केल्याप्रमाणे ही वाघीण नवीन आई होती व तिला हा हस्तक्षेप रुचला नाही व तिने बाईकस्वारांना गुरकावून व हाडे गोठवणारी डरकाळी फोडून इशारा दिला. मी खरोखरच सांगतो जंगलामध्ये वाघाची डरकाळी ऐकणे हा काही तुमच्यासाठी सुखद अनुभव असणार नाही. तुम्ही स्थानिक असलात तरीही व तुम्हाला वाघांच्या इशारा देणाऱ्या डरकाळ्या ऐकायची सवय असली तरीही दोन्ही दुचाकीस्वारांची भितीने गाळण उडाली व त्यांनी बाईक रस्त्यावरच लावली व ते आमच्या मागे असलेल्या असलेल्या जिप्सीच्या दिशेने धावले व तिच्यामध्ये आसरा घेतला. वाघीणीला रस्त्यावर लावलेली बाईक आवडली नाही कारण पर्यटन क्षेत्रातील बहुतेक वाघांना जिप्सींची सवय असते व त्या निर्धोक असतात असे त्यांना वाटते, परंतु दुचाकी म्हणजे त्यांना दुसरा प्राणी असल्यासारखे वाटते व त्यावरील माणसांच्या ते वास घेऊ शकतात. म्हणून ते एकतर बाईकपासून लांब राहतात किंवा माणसांनी बाईकवरून पळून जावे यासाठी त्यांचा पाठलाग करतात, जे या प्रकरणात झाले. परंतु त्या बाईकस्वारांनी बाईक रस्त्याच्या मधोमध लावू ठेवली होती व त्या वाघीणीला बाईक संदर्भात कोणताही धोका पत्करायचा नव्हता कारण तिच्यासोबत तिची बछडीही होती. म्हणून, ती बछड्यांना झुडुपांमध्ये ठेवून रस्त्यावर एकटी चालत आली व बाईकभोवती एक फेरी मारून तिच्यामुळे धोका नसल्याची खात्री करून घेतली व त्यानंतर बछड्यांना रस्ता ओलांडण्यासाठी बोलावले. यादरम्यान माझी एक इच्छा पूर्ण झाली, कारण तिने आमच्यापुढे लावलेल्या बाईकपासून सुरक्षित अंतर ठेवले होते व मला ती बाईककडे म्हणजे आमच्या दिशेने पाहात असताना तिची छायाचित्रे काढता आली व तिच्या मागे जंगलात जाणारा रस्ता होता. मी बाईकस्वारांवरच चरफडलो कारण मला केवळ वाघीणीची छायाचित्रे घेता यावी म्हणून छायाचित्रातून बाईक एडिट करावी लागली असते. परंतु नंतर जेव्हा मी दोन्ही छायाचित्रे पाहिली तेव्हा त्या बाईकने छायाचित्रात जास्तच रंगत आल्याचे मला वाटले. कारण वाघीण तुमच्यासमोर लावलेल्या बाईककडे पाहतेय व पाठीमागे जंगल आहे असे छायाचित्र कुणाला मिळते. सुदैवाने, मला फोकसही नियंत्रणात ठेवता आला व त्यामुळे अनेक दिवसांपासूनची इच्छा पूर्ण झाली.

आमच्या जिप्सीतील गाईड व चालकांनी गावकऱ्यांच्या नावाने बोटे मोडली कारण आम्ही त्यांना इशारा देऊनही ते रस्ता ओलांडायला जात होते. कारण एकतर  त्यामुळे वाघीण परत गेली असती व आम्हाला ती दिसू शकली नसती किंवा तिने बाईकस्वारांवर हल्ला केला असता व त्यांच्यापैकी कुणाला जखमी केले असते तर खरी अडचण झाली असती. ही केवळ एक गंभीर दुर्घटनाच झाली नसती तर जंगलाचा तो भाग पर्यटकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला असता. याचाच अर्थ असा होतो की अनेक कुटुंबांचा व्यवसाय बुडाला असता. याचे कारण म्हणजे तुम्ही जंगलाचे स्थानिक रहिवासी असूनही सुरक्षित अंतर पाळण्यासारख्या जंगलातील नियमांचे (सहजीवनाच्या) पालन न करणे. या घटनेमुळे मला सहजीवन व वन्यजीवन पर्यटनाविषयी काही सांगावेसे वाटते. अलिकडेच ताडोबा एका बातमीमुळे चर्चेत आले होते (पुन्हा एकदा) ती म्हणजे रोमा नावाच्या वाघीणीला जिप्सींनी वेढले होते व त्या छायाचित्राला वन्यजीवन पर्यटन की दहशतवाद असा मथळा देण्यात आला होता. दुर्दैवाने या चित्राचा संपूर्ण जंगलाच्या व्यवस्थापनावर अतिशय नकारात्मक परिणाम झाला. यामध्ये सहभागी असलेल्या अनेक जिप्सी चालकांना व गाईडना एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आले जे अतिशय मोठे नुकसान आहे. मी पर्यटनादरम्यान कोणत्याही वन्यप्राण्याच्या जीवनात काहीही अडथळा येण्यास पाठिंबा देत नाही व कधीच देणार नाही. तरीही अधिकाऱ्यांनी (व सर्व माध्यमांनीही) अशा घटना घडल्यानंतर परिस्थिती समजून घेणे व त्यानंतर प्रतिक्रिया देणे आवश्यक आहे. जंगलामध्ये बहुतेक रस्ते अरुंद असतात, ज्यावरून एक किंवा दोनच वाहने जाऊ शकतात व प्रत्येकालाच वाघ पाहायचा असतो, कारण लोकांनी त्यासाठी भरमसाठ पैसे मोजलेले असतात. याच पैशातून केवळ स्थानिक व वन विभागाच वाघांचे संरक्षण व संवर्धन करू शकतात ही वस्तुस्थिती आहे. तरीही, याचा अर्थ असा होत नाही की पैसे दिल्यामुळे तुम्हाला वाघाचा रस्ता अडवण्याचा हक्क मिळतो. परंतु मी तीसपेक्षाही अधिक वर्षांपासून जंगलात जातो आहे व मला तुम्हाला असे सांगावेसे वाटते की कुणीही वाघाचा किंवा कोणत्याही वन्य प्राण्याचा रस्ता अडवू शकत नाही, ते त्यातून आपला मार्ग काढतातच, हे नक्की. सर्वप्रथम मला असे वाटते की अभयारण्यातील वाघ जिप्सी कार पाहातच मोठे होतात व त्यांना अतिशय व्यवस्थित माहिती असते की त्यांना त्यापासून काहीही अपाय होणार नाही किंवा धोका नाही जोपर्यंत तुम्ही जिप्सी वाघाच्या शरीराला स्पर्श होईल इतक्या जवळ नेत नाही, जे करण्याएवढे मूर्ख कुणीही नसते. अनेकदा तुम्ही रस्त्याच्या एका बाजूला उभे असलात तरीही वाघ हळूच तुमच्या जिप्सीपाशी येतो, तो तुमच्या वाहनापासून अगदी काही पावलांच्या अंतरावर असतो. अशावेळी वाहन सुरू करून त्या प्राण्याला अडथळा आणण्याऐवजी शांत राहणेच उत्तम असते ज्यासाठी त्या गाईडना प्रशिक्षण दिलेले असते. वर नमूद केलेल्या वाघीण पाहण्याच्या अनुभवातून माझा तर्क सिद्ध होतो. तिथे पाच वाहने (जिप्सी) होती परंतु वाघीणीने जोपर्यंत दुचाकी पाहिली नाही तोपर्यंत ती शांत व आरामात होती, ज्याक्षणी तिने बाईक पाहिली ती चिडली, त्यामुळेच जिप्सीतून केलेल्या वन्यजीव पर्यटनामुळे वाघांना अडथळा निर्माण होत नाही व वन विभागाने तसेच माध्यमांनी वाघांचा मार्ग अडवण्याविषयी केलेले आरोग्य योग्य नाहीत!

दुर्दैवाने, या घटनेनंतर (वृत्त माध्यमे) कनिष्ट श्रेणीतील अधिकारी जे प्रत्यक्ष जंगलात असतात त्यांनी गाईड व चालकांवर सक्ती करायला व विचित्र नियम घालायला (स्वतः तयार केलेले) सुरुवात केली उदाहरणार्थ लोकांना एका जागी दहा मिनिटांहून अधिक काळ थांबू न देणे (हास्यास्पद आहे), अनेक मार्ग बंद करणे व काही रस्ते केवळ एकमार्गी करणे. परिणामी गाईडना शिस्तभंगाच्या कारवाईची धास्ती वाटतेच व पर्यटकांना वन्यजीवन दाखवण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, ते कामावरून  निलंबित न होण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतात व सफारी भराभर पूर्ण करतात किंवा केवळ शांत बसतात. मी पुन्हा एकदा सांगतो, की कुणीही वन्यजीव प्रेमी वन्यप्राण्याविरुद्ध झालेल्या गैरप्रकाराचे समर्थन करणार नाही. परंतु आपण एखाद्या गोष्टीवर चुकीचा शिक्का मारण्याआधी त्याचे योग्यप्रकारे विश्लेषण करणे आवश्यक आहे, असे माझे म्हणणे आहे.

खरे सांगायचे, तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने वन्यजीवन पर्यटनासाठी जंगलच केवळ २०% भागच खुला ठेवण्याची परवानगी देऊन वन्यजीवनासाठी मोठी अडचण करून ठेवली आहे (माननीय सर्वोच्च न्यायालयाविषयी पूर्णपणे आदर आहे). कारण आपण फक्त संरक्षित जंगलालाच भेट देऊ शकतो व येथे क्षेत्र मर्यादित आहे परंतु वाघ संरक्षित क्षेत्राच्या बाहेर सर्वत्र आहेत व माणसांची संख्या सतत वाढतेय व सर्व जंगले खुली करून वाघ, गावकरी व पर्यटकांना सौहार्दाने राहू देणे हाच एकमेव मार्ग आहे. परंतु तोपर्यंत, आपण ही रोमा वाघीणीची घटना योग्य गोष्टी शिकवण्यासाठी तसेच वन्यजीवनाशी संबंधित सगळ्यांना त्याविषयी अचूक तथ्ये समजून घेण्यासाठी वापरू असे मला वाटते व त्यामध्ये अगदी माध्यमांचाही समावेश होतो. माध्यमे व वन विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की, कृपया अशा चुकीच्या घटनांकडे खुल्या मनाने पाहा व पर्यटक, वन विभाग, गाईड, चालक व वन्य प्राण्यांमध्ये साहचर्य असू दे. कारण ते सगळेच वन्यजीव पर्यटनाचा भाग आहेत, यामध्ये आपल्या वन्यजीवनाचे भवितव्य आहे, असा इशारा देऊन निरोप घेतो!

तुम्ही डोळ्याने इच्छापूर्तीचे क्षण अनुभवू शकता जे खालील दुव्यामध्ये दिलेले आहेत.



 
https://www.flickr.com/photos/65629150@N06/albums/72177720317550777

 

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स

 

कृपया पुण्यात हक्काचे घर/ऑफिस शोधण्याबाबतचे माझे शेअरिंग खालील YouTube लिंकवर पहा आणि आवडल्यास शेअर करा..

 

https://youtu.be/27j3I3rwGPQ?si=-ODYBxVI2Dl_C345



No comments:

Post a Comment