Wednesday 26 June 2024

सुरक्षित शहर, रिअल इस्टेट आणि पुणे !!

                                  












































सुरक्षित शहर, रिअल इस्टेट आणि पुणे!!


प्रत्येकालाच एक सुरक्षित ठिकाण हवे असते,असे ठिकाणच प्रत्येकाचे घर असते डेबी रो


दुबई हे सुरक्षित ठिकाण आहे, व मला तिथे कधीही काहीही घाबरण्यासारखे वाटत नाहीमो फराह


घर म्हणजे कुटुंब. कुटुंबाला जेथे सुरक्षित वाटते व तेथेच ते त्यांचे सुरक्षित ठिकाण शोधतात, त्यालाच आपण घर म्हणतो ...नोमाड्यूमेझवेनी


ही तीन वेगवेगळ्या लोकांची तीन वेगवेगळी अवतरणे आहेत, डेबी महान एमजेची (मायकेल जॅक्सनची) पत्नी म्हणून ओळखली जाते, मो फराह हा जगज्जेता ब्रिटिश अॅथलीट आहे व नोमा ही आफ्रो-ब्रिटीश अभिनेत्री आहे तरीही जेव्हा ते समाज व शहराविषयी बोलतात, तेव्हा त्यांनी सर्वात पहिली गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे सुरक्षिततेची भावना. मला खात्री आहे की हे सर्वजण जगाच्या वेगवेगळ्या भागातील असू शकतात व वेगवेगळ्या वर्गाचे प्रतिनिधीत्व करू शकतात तरीही आपल्यापैकी बहुतेकजण त्याच्याशी सहमत असतील, कारण आपण जेथे नेहमी आसरा घेतो तिथेच आपल्याला सुरक्षित वाटत नसेल तर काय अर्थ आहे. मला माहिती आहे की बहुतेक वाचकांना आत्तापर्यंत हा लेख कोणत्या दिशेने जातोय ते उमगले असेल व तुम्हाला त्यात रस नसेल तर तुम्ही वाचन थांबवू शकता. परंतु त्यामुळे तुम्ही ज्या वास्तवात राहात आहात त्यापासून लांब जाऊ शकत नाही. मला माहितीय की यावर तुमचे उत्तर, त्याचा काय उपयोग, काहीही बदलणार नाही असे असेल, हे खरे असले तरीही तुमचे डोळे मिटल्याने किंवा तुमचे तोंड बद केल्याने किंवा तुमचे कान झाकल्याने नक्कीच काहीही बदलणार नाही! ठीक आहे, तर ही तात्विक चर्चा बाजूला ठेवू व थेट विषयाला हात घालू व मला खात्री आहे की तुम्हालाही आश्चर्य वाटेल कारण तुम्ही सुरक्षिततेविषयी, गुन्हेगारी व ढासळलेल्या नागरी कायदा व सुव्यवस्थेविषयी विचार करत आहात. पण मी बांधकाम व्यवसायविषयी पण बोलत आहे! तुमचीही चूक नाही कारण या दोन्ही गोष्टी एकमेकांशी थेट निगडीत आहेत, परंतु ते न स्वीकारण्याइतपत आपण मूर्ख आहोत!


डेबीने म्हटल्याप्रमाणे, आपल्या सर्वांना एक सुरक्षित ठिकाण हवे असते जे आपले घर असले पाहिजे, मो फराह त्याला दुबई शहर सुरक्षित वाटते असे म्हणतो, तर नोमा म्हणते घर म्हणजे कुटुंब व त्याची सुरक्षित जागा शोधणे, तर आता तुम्ही रिअल इस्टेट, सुरक्षितता व शहराचा (आपल्या परिस्थितीत पुणे) संबंध कसा लावाल, बरोबर? शहराशी संबंधित सुरक्षितता किंवा समाज यादरम्यान थेट प्रत्यक्ष संबंध असतो, व ती कायदे-अंमलबजावणीद्वारे प्रस्थापित केली जाते, कारण त्यानंतरच केवळ सुरक्षित शहरांचीभरभराट होते व अशी शहरेच काळाच्या कसोटीवर टिकतात असे आपल्याला इतिहास सांगतो. परंतु इतिहासाची समस्या म्हणजे, इतिहास आपणहून वर्तमानकाळ बदलण्यासाठी काहीही करू शकत नाही, आपण माणसे इतिहास वाचू शकतो त्यामुळे ते आपल्यालाच करावे लागते. त्या आघाडीवर आपण आपल्या शहराचा सुरक्षित भूतकाळ तपासला, तर परिस्थिती झपाट्याने बदलते आहे, कारण माझ्या तरुणपणी (म्हणजे केवळ वीस वर्षांपूर्वी) माझ्या ग्राहकांसाठी (मी एक सिव्हील इंजिनिअर व बांधकाम व्यावसायिकही आहे) पुणे म्हणजे असे शहर जेथे एकटी महिला चित्रपटाचा शेवटचा खेळ (Show) पाहिल्यानंतर दुचाकी किंवा रिक्षाने मध्यरात्रीनंतर घरी येऊ शकते. हा शहराच्या संस्कृतीचा पाठीचा कणा आहे व मी खरोखरच सांगतो तो होता (अजूनही आहे) व हा पुण्याच्या रिअल इस्टेटचा (म्हणजे विक्रीच्या घरांच्या) महत्त्वाचा सेलिंग पॉइंट आहे, कारण आपल्या देशामध्ये या आकाराच्या इतर बहुतेक शहरांच्या तुलनेत नागरिकांना दिवसाच्या कोणत्याही वेळी इथे रस्त्यावर सुरक्षित वाटत असे आणि असते, पण!

हा पणच माझ्या लेखाचे कारण आहे कारण तुम्ही गेल्या एक किंवा दोन वर्षात वर्तमानपत्रातील बातम्यांचे मथळे पाहिले, तर या शहरातील नागरिकांना रस्त्यावर केवळ रात्रीच नव्हे तर दिवसाच्या कोणत्याही वेळी मृत्यू व भीतीला सर्वाधिक सामोरे जावे लागते असे लक्षात येईल. तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नसेल तर अलिकडचाच कुप्रसिद्ध पोर्शे कार अपघात पाहा (माहिती नसल्यास कृपया गूगल करा) ज्यामध्ये दोन होतकरू तरुणांचा अपरात्री झालेल्या अपघातात मृत्यू झाला. हे तरुण रात्री उशीरा रस्त्यावर का होते याविषयी काही टीकाकार भुवया उंचावत असतील, तर दोन दिवसांपूर्वी एक निवृत्तीवेतनधारक (शहराचे सन्माननीय नागरिक) जे सकाळच्या फेरफटक्यासाठी निघाले होते त्यांना एका गुंडांच्या टोळीने अडवून दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. जेव्हा त्यांनी नकार दिला तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आली व त्यामध्ये झालेल्या जखमांमुळे त्यांचा जीव गेला. याच टोळीने नंतर जवळपासच्या आणखी दोन रहिवाशांवर हल्ला केला ज्यांनी पोलीसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर तुम्ही वर्तमानपत्र उघडता तेव्हा दर एक दिवसाआड रस्त्यावर लावलेल्या वाहनांची कोयते व रामपुरी मिरवणाऱ्या (सुदैवाने अजून बंदुकींपर्यंत मजल गेलेली नाही) स्थानिक भाईंनी नासधूस केल्याच्या, त्या भागावर त्यांचेच वर्चस्व असल्याचा दावा केल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. एवढे कमी झाले म्हणून की काय दररोज रस्त्यावर वाहन ओव्हरटेक केले किंवा दुसऱ्याच्या वाहनाने ओरखडा उमटला वगैरेसारख्या किरकोळ कारणांसाठी चिडून मारामारी झाल्याच्या व कुणालातरी अतिशय वाईट प्रकारे मारण्यात आल्याच्या बातम्या असतात. त्याचशिवाय अपघातांमध्ये पादचाऱ्यांचे, दुचाकीस्वारांचे मृत्यू झाल्याच्या बातम्या असतात, जे बहुतेकवेळा बेकायदेशीरपणे म्हणजेच वाहतुकीच्या मूलभूत नियमांचे पालन न केल्यामुळे असतात उदाहरणार्थ वाहनाचा वेग अतिशय जास्त असणे, लाल सिग्नल तोडणे, रस्त्यावर चुकीच्या दिशेने वाहन चालवणे व हो, हेल्मेट न घातल्यामुळेही होतात. पुण्यामध्ये केवळ माणसांची कृतीच मृत्यू व भीतीसाठी कारणीभूत ठरते असे नाही तर आजकाल निसर्गदेवताही नागरिकांवर तशी वेळ आणते ज्यामुळे पावसाळ्यात पूर येतो व झाडे पडतात (जाहिरातीचे फलक), यामुळेही रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना त्यांच्या जीवाची भीती वाटते. शेवटचा मात्र महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, रस्त्यावर जाणे टाळून तुम्ही सुरक्षित राहास असा विचार तुम्ही करत असाल तर तुमचे चुकते आहे. सर्वात घातक शत्रू अदृश्य असतो, सध्या सायबर गुन्ह्यांची संख्या वाढली आहे, तुमचा स्वतःचा सेल फोन व ईमेल खाती वापरून तुमचा खिसा (म्हणजेच खाती) रिकामा केला जात आहे. त्याशिवाय इंटरनेट वरून लैंगिक शोषण किंवा भूलथापांच्या जाळ्यात ओढले जाण्याची भीतीही आहे (म्हणजेच फसविण्याच्या), अशा प्रकरणांची स्वाभाविक कारणांसाठी नोंदच होत नाही.

या शहरामध्ये भीती किंवा मृत्यू तुमच्यापर्यंत कसा पोहोचतो ही समस्या नाही येत, कारण कोणत्याही समृद्ध शहराला एक काळी बाजू असतेच व जी कोणत्याही समृद्धतेसोबतच येते; खरी समस्या या काळ्या अथवा अंधाऱ्या बाजूविरुद्ध आपण कसा लढा देतो किंवा उभे राहतो व तिला लांब ठेवतो ही आहे, जे अलिकडच्या काळात पुण्यामध्ये होताना दिसून आलेले नाही किंवा घडत नाही. त्याशिवाय या सगळ्या घटनांकडे पाठ फिरवून आपण सुरक्षित राहू असे आपल्याला वाटत असेल तर आपण इतर कुणालाही नाही तर स्वतःलाच मूर्ख बनवतोय. यंत्रणेकडे (म्हणजेच सरकारकडे) रस्त्यावरील मृत्यू किंवा भीतीच्या घटनांमध्ये अशा सर्व घटनांसाठी त्यांची स्वतःची कारणमीमांसा असते. रस्त्यावर घडणाऱ्या गुन्ह्यांच्या प्रसंगांमध्ये, पोलीस म्हणतात, त्यांच्याकडे कमी मनुष्यबळ आहे, सायबर-गुन्ह्यांविषयी बोलायचे झाले तर पोलिसांकडे वाढती लोकसंख्या व शहराचा विस्तार हाताळण्यासाठी असलेल्या पायाभूत सुविधा (तंत्रद्यान) अपुऱ्या असतात. पुणे महानगरपालिका/पिंपरी चिंचवड महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था त्यांची राजकीय. सत्ता हाताळण्यातच गुंग आहे व तेथील नोकरशहांसाठी ते चांगलेआहे. मग तो अनपेक्षित मुसळधार पावसामुळे रस्त्यावर आलेला पूर असो किंवा झाड पडले असो, समाजाच्या सर्व वर्गात भीती पसरत जाते. हे सर्व पुरेसे नाही म्हणून की काय केवळ रहिवासीच नव्हे तर येथील बांधकाम व्यावसायिकांनाही जमीन बळकावली जाण्यापासून ते माथांडींच्या (कंत्राटी कामकार संघटना) जाचापर्यंत अनेक समस्यांना तोड द्यावे लागते. अशावेळी पोलीसांकडे तक्रार करण्याऐवजी लोक पैसे देण्याचाच पर्याय निवडतात जे एकप्रकारे खंडणी देण्यासारखेच असते, कारण त्यांना माहिती असते (किंवा त्यांचा विश्वास असतो) की तक्रारीमुळे काहीही होणार नाही तर व्यवसायामध्ये अडथळाच निर्माण होईल. त्याचेवेळी तथाकथित नेत्यांसह प्रत्येक जण (म्हणजे विशेषतः नेते) सर्व रस्त्यांवर किंवा शहरामध्ये धोकादायकपणे लटकणाऱ्या फलकांकडे व स्वत:च्या प्रतिमांकडे काणाडोळा करतात, ज्यामुळे पदपथ अडवले जातात व केवळ संबंधित कार्यक्रम संपल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था हे फलक हटवण्याचा दिखावा करतात, जे नागरिकांसाठी धोका तसेच अडथळा असतात.

तुम्हाला असे वाटत असेल की, केवळ असलेच गुन्हे घडतात किंवा सामान्य नागरिकांना याचाच त्रास होतो तर एखादा लहान सण किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्ती किंवा जयंती किंवा पुण्यतिथीची वाट पाहा. स्पीकरच्या मोठ-मोठ्या भिंती उभारल्या जातात ज्याशिवाय कोणताही सोहळा अपूर्ण असतो व डीजे व लेजर बीमचे झोत वाहतुकीमध्ये अडथळा आणत असतात (जी आधीच संथपणे सुरू असते) व कानठळ्या बसवणारा आवाज असतो. हे सगळे तुम्ही किंवा मी केले तर तो गुन्हा ठरतो परंतु कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा सामाजिक पक्षाने हे केल्यास संपूर्ण यंत्रणा अशा गुन्ह्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याऐवजी कान झाकून घेते व काणाडोळा करते. मला असे वाटते हे सगळे वाचल्यानंतर तुम्ही विचार कराल की यात काय नवीन आहे, आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे व आपण दररोज हे अनुभवतो. परंतु माझा प्रश्न असा आहे, तुम्ही यासंदर्भात काय करणार आहात कारण यावरूनच तुमचे भविष्य ठरेल जे थेट या शहराच्या भविष्याशी निगडीत आहे, हे सांगण्याचा माझ्या लेखाचा उद्देश आहे. विशेषतः रिअल इस्टेट व्यावसायिकांनो (म्हणजेच बांधकाम व्यावसायिकांनो), तुम्ही येथे नेहमी घरे बांधत राहाल आणि फायदा कमावले असा विचार करू नका व तुमच्या भोवती धगधगत असलेला समाज त्याच्या ज्वाळांमध्ये कालांतराने आपल्या उद्योगालाही गिळंकृत करून टाकेल. कोणीही व्यावसायिक म्हणेल की मी त्यासंदर्भात काय करू शकतो व माझ्या नियंत्रणात नसलेल्या किंवा माझी जबाबदारी नसलेल्या या समस्यांचा विचार करण्याऐवजी मी माझ्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करणार नाही का, हे मान्य आहे. त्यावर माझे असे उत्तर आहे की, तुम्ही या शहरामध्ये व्यवसाय करता व तुम्ही या शहराचे नागरिक आहात व किमान तुम्ही एक व्यक्ती म्हणून तसेच व्यावसायिकांचा गट म्हणून या गुन्ह्यांविरुद्ध व त्यामागच्या दृष्टिकोनाविषयी आवाज उठवू शकता, तसेच आपण ज्याला सरकार म्हणतो त्या यंत्रणेला ज्याप्रकारे शक्य आहे त्याप्रकारे मदत करू शकता. एखाद्याला नावे ठेवणे किंवा अपशब्द बोलणे किंवा टिका करणे सोपे आहे, परंतु त्या कुणाबरोबर तरी उभे राहणे व त्यांच्यासोबत चुकीच्या गोष्टींविरुद्ध लढा देणे अवघड आहे. या शहराचा फायदा होत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे लागू होते कारण आता तुमचे ऋण फेडण्याची वेळ आली आहे. बॉलिवुडचा एक प्रसिद्ध संवाद लक्षात ठेवा, "जुर्म करनेवालेसे, जुर्म सहनेवाला ज्यादा गुनहगार होता है", म्हणजे जी व्यक्ती तिच्याविरुद्ध होणारा गुन्हा मूकपणे सहन करते ती तो गुन्हा करण्याचे धाडस करणाऱ्या व्यक्तीपेक्षाही अधिक दोषी असते!

त्याचवेळी एक लक्षात ठेवा, एखादी यंत्रणा (म्हणजे सरकार) एखाद्या गुन्ह्याकडे व गुन्हेगारांकडे काणाडोळा करू शकते, पण ते सर्व कोण आहेत तर याच शहराचे नागरिक आहेत, बरोबर? लाल सिग्नल तोडणे असो किंवा एखादे झाड कापणे असतो किंवा अवैध फलक उभारणे असो, आपल्यापैकीच कुणीतरी कायद्याचे उल्लंघन करून इतरांचे आयुष्य धोक्यामध्ये आणण्यासाठी जबाबदार असतो, गुन्ह्याचा हा पैलू विसरू नका. कोणे एके काळी, हे शहर निवृत्तीवेतनधारकांचे नंदनवन, पूर्वेकडील ऑक्सफर्ड मानले जायचे व इथला संस्कृतपणा आपला कणा मानला जात असे व आहे. आपण या शहराला कोठे घेऊन जात आहोत ते पाहा, जेथे निवृत्तीवेतनधारक रस्त्यावर तसे त्यांच्या घरांमध्ये सुद्धा सुरक्षित नाहीत, त्याचशिवाय शहराची संस्कृती जतन करण्यासाठी आपण कोणतेही प्रयत्न करत नाही. गुन्हे कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे आपण तरुणांच्या मनामध्ये ज्ञान, बुद्धिमत्ता व कलेविषयी आदर रुजवला पाहिजे, ही पण संस्कृती आहे व असे झाल्यास आपोआपच ते आपल्या वर्तनामध्ये दिसून येईल. त्याचवेळी, सामाजिक व आर्थिक विषमता हेदेखील गुन्ह्यांच्या मागचे मुख्य कारण आहे म्हणून आपण या तरुणांना सुशिक्षित करण्यासाठी व त्यांच्याकरता रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे ते योग्य मार्गावरून भटकणार नाहीत. हे काही केवळ एखाद्या विभागाचे किंवा स्वयंसेवी संस्थेचे काम नाही, तर ते तुमचे व माझेही काम आहे. आपण यासाठी सहकार्य करू व हे शहर अधिक चांगले व सुरक्षित ठिकाण होण्यासाठी कुणातरी पुढे येईल व पुढाकार घेईल अशी वाट पाहात बसू नका. तुम्ही आत्ता जेथे उभे आहात तेथूनच आपल्या स्पर्धेची सुरुवात होते व ती सुरू करण्यासाठी बंदुकीचा बारही तुम्हालाच करायचा आहे, नाहीतर लोकहो भविष्यामध्ये आपल्यासाठी काहीही शिल्लक राहणार नाही, हा इशारा देऊन निरोप घेतो!


संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

ई-मेल आयडी: smd156812@gmail.com





No comments:

Post a Comment