“मी ईतकी वर्ष जगणार आहे हे मला माहिती असते तर, मी स्वतःची जास्त चांगली काळजी घेतली असती”… रिचर्ड वेन व्हॅन डाईक
रिचर्ड वेन व्हॅन डाईक हे अमेरिकी अभिनेते व विनोदवीर आहेत. त्यांनी असंख्य चित्रपट व नाटकांमध्ये काम केले आहे, व त्यांना गोल्डन ग्लोब अवॉर्ड, टोनी अवॉर्ड व सहा एमी अवॉर्ड मिळाले आहेत. त्यांना सर्वजण डिक डाईक म्हणून ओळखतात, त्यांनी गेल्या आठवड्यात ग्रॅमी पुरस्कार जिंकून इतिहास रचला कारण हा पुरस्कार जिंकणारे ते सर्वात वृद्ध अभिनेते म्हणजे ९८ वर्षांचे आहेत व म्हणूनच स्वत:ची योग्य काळजी घेण्याविषयी त्यांचे वरील शब्द या लेखासाठी वापरण्याचा मी विचार केला. आता तुम्ही विचार करत असाल की मी कुणाच्या काळजीविषयी बोलतोय कारण बांधकाम व्यावसायिकांना केवळ एकाच गोष्टीची काळजी असते व ती म्हणजे त्यांची वैयक्तिक संपत्ती (ज्याची खरेतर सगळ्यांनाच काळजी असते). मी बांधकाम व्यावसायिकासोबतच एक अभियंताही आहे व गेल्या काही वर्षात या शहरातील पावसामुळे (म्हणजे मॉन्सूनमुळे) इतकी दाणादाण उडते की केवळ आम्ही बांधलेल्याच नव्हे तर एकूणच इमारतींचा ताबा मिळण्यापूर्वी व मिळाल्यानंतर त्यांची व्यवस्थित काळजी कशी घ्यावी याविषयी सांगावे असे मला वाटले. बहुतेक वेळा, मला असे आढळले आहे की लोक त्यांच्या उंची अंतर्गत गृह सजावटीवर तसेच गाड्यांवर लक्षवधी रुपये खर्च करतात. परंतु या घराची किंवा गाड्यांची योग्य देखभाल करायची जेव्हा वेळ येते तेव्हा आपण अतिशय निष्काळजी असतो व एकतर सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला काहीही होणार नाही असा विचार करतो. परंतु निसर्ग कधीही चूक माफ करत नाही व तुम्ही किंवा तुमच्या बांधकाम व्यावसायिकाने किंवा तुमच्या गृहनिर्माण संस्थेने (कॉम्प्लेक्स/इमारती) निसर्गाचे काहीही वाकडे केले नसले तरीही चुकीची शिक्षा संपूर्ण मानवजातीला (म्हणजे आपल्या बाबतीत शहराला) मिळते व इतर कुणीतरी केलेल्या चुकांची भरपाई आपल्याला सुद्धा करावी लागते ही वस्तुस्थिती आहे.
या लिखाणामुळे तुम्हाला असे वाटत असेल की मी स्वत:ला तत्वज्ञ समजतो आहे, तर त्यावर माझे उत्तर असेल की मी कोण आहे यामुळे काहीच फरक पडत नाही, परंतु त्याने माझ्या लेखाविषयीची तथ्ये बदलणार नाहीत. साधारण पाच वर्षांपूर्वी पाऊसमुळे अंबील ओढा (पुण्याच्या दक्षिण भागात वाहणारा पाण्याचा नैसर्गिक ओढा) दुथडी भरून वाहू लागला. या ओढ्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतींच्या कुंपणाच्या भिंतीची पुराच्या पाण्याने पडझड झाली. अशीच एक उच्चभ्रू वस्ती असलेल्या सोसायटीच्या तळघरात पुराचे पाणी शिरून, जवळपास ४०० हून अधिक कार बुडाल्या व त्यांचे दुरुस्त होऊ शकणार नाही एवढे नुकसान झाले. माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याही कार मालकाला विम्याचे पैसे देण्यात आले नाहीत, कारण या घटनेला “अॅक्ट ऑफ गॉड” म्हणजेच नैसर्गिक आपत्ती मानण्यात आले व गेल्या आठवड्यात म्हणजे २०२४ च्या पहिल्या पावसातही अशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली. यावेळी केवळ कारच नव्हे तर इमारतींमध्ये तळमजल्यावरील अनेक घरे व दुकानांमध्येही पाणी शिरल्यामुळे ती पाण्याखाली बुडाली व हे एखाद्या ओढ्याचेच पाणी नव्हते तर मुख्य रस्त्यांवरून वाहत आलेले पावसाचे पाणी होते. यामुळे केवळ कार व लाकडी सामानच खराब झाले असे नाही तर, पावसाचे पाणी लिफ्टचे शाफ्ट, भूजल पाण्याच्या टाक्या, इलेक्ट्रिसिटी मीटर बोर्ड, जनरेट्स व तत्सम सेवांमध्येही शिरले त्यामुळे या इमारतींमधील रहिवाशांना फारच त्रास सहन करावा लागला, कारण सेवांचे नुकसान झाल्यामुळे वीज तसेच पाणी पुरवठा खंडित झाला. आर्थिक नुकसान तसेच मूलभूत जीवनावश्यक सोयी उपलब्ध नसल्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागलाच व त्याचसोबत पुढील पावसामुळे आत्ता अजून काय होईल ही भीती मनात बसली, जी घालवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, म्हणूनच मी हा लेख लिहीत आहे !
सर्वप्रथम दर पाच वर्षांनी इमारतींच्या संरक्षक भिंतींच्या (कंपाऊंड वॉल) रचनात्मक स्थैर्याची तपासणी करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. याचे अनेक पैलू असू शकतात उदाहरणार्थ शेजारच्या भूखंडामध्ये विकासकाम सुरू असेल किंवा पृष्ठभागावरील, तसेच संकुलाबाहेरील भिंतीलगतच्या मातीची धूप झाली. आपल्या संकुलाभोवतालचा कोणताही नैसर्गिक जलस्रोत (उदाहरणार्थ एखादा नाला किंवा लहान तलाव) व त्या प्रवाहाचा उगमस्रोत विकासकामांमुळे बदललेला असू शकतो व यामुळे पावसाळ्यादरम्यान पुराच्या पाण्यामुळे आपल्या इमारतींच्या भिंतींना अपाय होऊ शकतो. मी जिथे राहतो त्या माझ्या सोसायटीमध्ये मी हे अनुभवले आहे, कारण आमच्या इमारतीच्या मागे एक ओढा होता व आमच्या संरक्षक (रिटेनिंग) भिंतीची रचना त्या ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहानुसार करण्यात आली होती तसेच भिंतीची उंचीही योग्य होती. परंतु आम्हाला घराचा ताबा मिळाल्यानंतर, या ओढ्याच्या प्रवाहामध्ये पुढे काही विकासकाम करण्यात आले व तेवढ्या भागात त्याची खोली कमी झाली ज्यामुळे एका पावसाळ्यादरम्यान आलेल्या पुरात आमच्या इमारतीच्या मागील या ओढ्यातील पाण्याची पातळी वाढली. या पाण्याला एवढी ओढ होती की त्यापुढे आमची भिंत टिकू शकली नाही. सुदैवाने आमच्या इमारतीला तळघर नाही व आम्ही कार आमच्या इमारती बाहेरील रस्त्यावर काढून ठेवल्या होत्या, परंतु आमच्या लिफ्ट व इलेक्ट्रिक मीटर बोर्डाचे जे काही नुकसान झाले त्यामुळे जवळपास आठवडाभर आम्हाला डोकेदुखी झाली. त्याचप्रमाणे आत्ता नवीन म्हणजे अचानक आलेल्या पुरामुळे रस्त्यावरील पावसाचे पाणी गृहसंकुलात शिरल्यामुळे बऱ्याच इमारतीचा कुंपणाच्या भिंतींसाठी तसेच इमारतींच्या देखभालीसाठी नवीन धोका निर्माण झाला आहे. बहुतेक वेळा कुंपणाच्या भिंतींची रचना बाजूने पडणारा भार पेलण्यासाठी करण्यात आलेली नसते, ते धारक भिंतींचे काम असते. आम्ही आमच्या भूखंडाच्या सीमेला लागून एखादा जलस्रोत असल्यास किंवा आमचा भूखंड व शेजारचा भूखंड यांच्या पातळीदरम्यान अंतर असल्यासच धारक भिंत बांधतो. अनेक प्रकरणांमध्ये इमारतींपर्यंत येण्या-जाण्याच्या रस्त्याची पातळी सुरुवातीची काही वर्ष खाली होती परंतु रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळे ती इमारतीच्या आवाराच्या पातळीपेक्षा वर गेली आहे. (धारणभिंत म्हणजे आजूबाजूचा भार पेलण्यासाठी योग्य त्या जाडीची आर. सि. सि. भिंत, रिटेनिंग वॉल)
यामुळे अशा रस्त्यांवर वाहणारे पावसाचे सर्व पाणी सोसायट्यांमध्ये शिरते व यामुळे कुंपणाच्या भिंतींचे तसेच ते पार्किंग, लिफ्टचे शाफ्ट, त्याशिवाय मीटर बोर्ड, जनित्रे यासारख्या तळमजल्यावरील इतर सेवांचेही नुकसान होते. अशा परिस्थितींमध्ये, योग्य सल्लागारांची मदत घेऊन रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून संकुलाच्या आवारात शिरू नये यासाठी सोसायट्या ते पाणी रोखण्यासाठी किंवा ते अडवण्यासाठी उपाययोजना करू शकतात.
मुसळधार पावसामुळे पाणी भिंतींमधून झिरपू शकते व गच्चीतून गळूही शकते विशेषतः वरच्या मजल्यावरील ज्या सदनिका बंद आहेत किंवा वापरात नाहीत त्यांच्या बाल्कनी वा टेरेसस व पावसाच्या पाण्याच्या संवर्धनासाठी जेथे सामाईक व्यवस्था नाही तेथे छतावरती गच्चीवर पाणी साचल्यामुळे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. प्रत्येक पावसाळ्यापूर्वी टेरेसेसची तपासणी करणे व पाणी तुंबल्यामुळे कुठेही गळू नये यासाठी पाण्याचा निचरा करणारे पाईपस स्वच्छ करणे आवश्यक आहे. दुसरा पैलू म्हणजे, विजेच्या तारा तसेच मीटर बोर्डाची तारांची जोडणी तपासणी आवश्यक आहे. कारण काही काळाने विजेच्या तारांवरचे आवरण खराब होऊ शकते. जेव्हा जमीनीखालील या तारांभोवती तसेच मीटर बोर्डापाशी पुराचे पाणी साचते तेव्हा शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचा धोका असतो. त्याचप्रमाणे वाहने लावण्यासाठी सोसायटीमध्ये तळघर असेल, तर तेथील पाणी बाहेर काढण्यासाठी योग्य ती यंत्रणा असणे व तिची देखभाल अतिशय महत्त्वाची आहे ज्याकडे अनेक सोसायट्या कधीच लक्ष देत नाहीत. पावसाळ्यामध्ये कुणीही वॉचमन किंवा मजूर रात्री झोपण्यासाठी तळघराचा वापर करणार नाही याची खात्री करा व पूर आल्यास इशारा देणारा गजर वाजेल अशी यंत्रणा बसवून घ्या, म्हणजे अचानक वाहने बाहेर काढणे गरजेचे असेल तर रहिवाशांना लगेच कळवता येईल/इशारा देता येईल. आजकाल अनेक प्रकल्पांमध्ये इंटरकॉम यंत्रणा असते व ती नसेल तर सोसायटीने ती बसवून घेतली पाहिजे. मॉन्सूनमध्ये होणारा आणखी एक त्रास म्हणजे झाडे पडणे, यामुळे आजूबाजूच्या वाहनांचे नुकसान होते, तसेच प्रसंगी जीवितहानीही होते. म्हणूनच सोसायटीतील झाडांची स्थिती तपासली पाहिजे व पुणे महानगरपालिका किंवा संबंधित विभागाने आवश्यक ती कारवाई केली पाहिजे. सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे चांगल्या सुरक्षा सेवांसाठीच्या खर्चाला कात्री लावू नका व अचानक पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्या परिस्थितीत कशी प्रतिक्रिया दिली पाहिजे याचे व्यवस्थित प्रशिक्षण वाचमन्सना द्या व त्यासाठी प्रशिक्षण सराव आयोजित करा. तुम्ही याकरता स्थानिक अग्निशमन विभागाची मदत घेऊ शकता !
आता तुम्ही विचाराल की सोसायटीने एवढा सगळा खटाटोप कशासाठी करायचा, हे बांधकाम व्यावसायिकाने का करू नये, व अभियंता म्हणून माझे त्यावरील उत्तर (बांधकाम व्यावसायिक म्हणून नव्हे) असे आहे की, बांधकाम व्यावसायिक तुम्हाला इमारत बांधून व तत्कालीन प्रस्थापित नियमांनुसार पूर्ण करून देऊ शकतो, परंतु बांधकाम व्यावसायिक त्या घरांमध्ये राहणार नसतो, तर तुम्ही राहणार असता. पावसाचा पूर हे घर कुणाचे आहे किंवा त्याची जबाबदारी कुणाची आहे असा विचार करत नाही, बरोबर? वस्तुस्थिती अशी आहे की, मॉन्सूनचे बदललेले स्वरूप व शहरात सगळी होणारी विकासकामे (म्हणजे चुकीचा विकास) हा कुणा एका व्यक्ती अथवा संस्थेचा नव्हे तर संपूर्ण यंत्रणेचा दोष आहे. म्हणूनच योग्य ती खबरदारी घेण्यातच शहाणपण आहे, जसे आपण वाहन चालवताना योग्य ती सर्व खबदारी घेतल्यानंतरही हेल्मेट घालणे आवश्यक असते अगदी त्याचप्रमाणे, हा सल्ला देऊन निरोप घेतो, सुरक्षित राहा व पावसाचा आनंद घ्या!
या विषयावर कोणतीही मदत हवी असल्यास कृपया निःसंकोचपणे मागा, टीम संजीवनीला आपल्याला मदत करण्यास आनंदच वाटेल, आपण आम्हाला ईमेल करू शकता…
reception@sanjeevanideve.com / sales@sanjeevanideve.com
–
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
Tuesday, 2 July 2024
पाऊस व स्वतःच्या घराची काळजी !

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment