Saturday 20 July 2024

"हम साथ साथ है" अंबानी प्रॉडक्शन्स !

































    




"हम साथ साथ है" अंबानी प्रॉडक्शन्स !

इक  शहंशाह ने बनवा के हसीं ताज-महल. सारी दुनिया को मोहब्बत की निशानी दी है”…  शकील बदायूनी

इक शहंशाह ने दौलत का सहारा ले कर हम ग़रीबों की मोहब्बत का उड़ाया है मज़ाक़”... साहिर लुधियानवी

मी पहिल्यांदाच (किमान मला जे काही आठवते आहे त्यानुसार) माझ्या लेखासाठी हिंदी अवतरण वापरत आहे व त्याचे कारण म्हणजे विषपूर्णपणे देशी आहे. दुसरे कारण म्हणजे लेखाचा जो विषय आहे त्यासंदर्भात माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी दुसरे इतके चपखल शब्द मला सापडले नाहीत. किंबहुना त्या ओळी इतक्या समर्पक आहेत की संपूर्ण लेखाचे सारच त्या ओळींमध्ये सामावलेले आहे आणि मला जे शेअर करायचे आहे त्यांचे वर्णन करण्यासाठी त्या ओळीच पुरेशा आहेत. परंतु अनेकदा जेव्हा आपण आपल्या तब्येतीच्या तक्रारींसाठी डॉक्टरांकडे जातो तेव्हा आपल्याला कोणतीही औषधे न देणारे व फक्त निरोगी जीवनशैलीचे पालन करायला सांगणारे डॉक्टर आवडत नाहीत, बरोबर? त्याचप्रमाणे लोकांना केवळ काही ओळींमध्ये विषय समजून सांगितला तर आवडत नाही, त्यांना तो सविस्तरपणे सांगितलेला हवा असतो. वरील ओळींमध्ये ज्याप्रकारे नाण्याच्या दोन बाजू मांडलेल्या आहेत अगदी त्याचप्रकारे हा विषय आहे. त्या ओळी म्हणजे केवळ दोन दिग्गज कवींनी लिहीलेली शायरी नसून आपल्या बॉलिवुडचा सुवर्णकाळच त्यात सामावला आहे, त्या ओळी आहेत शकील बदायूनी व साहीर लुधायानवी यांच्या, जय हो! तर, लेखाचा विषय आहेलग्न” (आता कुणाचे लग्न हे मी सांगण्याची अजूनही गरज आहे का?), अर्थातच अंबानींच्या घरचे लग्न व आत्तापर्यंत याविषयी कितीतरी लिहीले गेले आहे (पाहिले गेले आहे असे म्हणजे अधिक योग्य होईल, अर्थातच इन्स्टाग्राम व फेसबुकची कृपा), त्यामुळे बरेच जण पुढे न वाचण्याचा विचार करतील, पण परत तुमच्या स्क्रीनवर लग्नाच्या आणखी छायाचित्रांचा पूर आलेला असेल त्यामुळे तुम्ही हे वाचलेलेच बरे !

आधीच सांगतो, या ब्लॉग वरील सर्व नावे व छायाचित्रे खरी आहेत, तुम्हाला त्यांचे इतर कुणाशीही काहीही साम्य आढळणार नाही. कारण हा एकमेवाद्वितीय सोहळा होता कारण तसा करणे किंवा त्याच्यासारखे काही करणे कुणालाही परवडणारे नाही. विनोदाचा भाग सोडला, तर अंबानी परिवाराविषयी पूर्णपणे आदर राखत समाजाचा या लग्नाविषयीचा दृष्टिकोन काय असू शकतो याविषयी हा लेख आहे. हा सोहळा अंबानी परिवाराने स्वतःच समाज माध्यमांवर सार्वजनिकपणे दाखवला आहे, त्यात त्यांना नावे ठेवण्याचा किंवा बदनाम करण्याचा हेतू नाही कारण त्यांच्या घरातला सोहळा त्यांना हवा तसा साजरा करण्याचा त्यांना पूर्णपणे हक्क आहे. किंबहुना ते करण्याएवढी धमक त्यांच्यात आहे याचे कौतुक वाटते. कारण अलिकडेच तथाकथिच प्रसिद्ध व्यक्तिंचे काही सोहळे (म्हणजे लग्न सोहळे) विदेशातील एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी झाले. त्यानंतर त्या सोहळ्याची छायाचित्रे त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा माध्यमांना विकली. अंबानींनी असे काहीच केले नाही, यासाठी त्यांचे कौतुक. या लग्नामध्ये दिखावा करण्यासाठी जो काही खर्च करण्यात आला व त्याविषयी माध्यमांचे काय मत आहे (म्हणजे लोकांचे) यासंदर्भात हा लेख आहे. या लग्नाला हजर असलेल्या लोकांनी (म्हणजे प्रसिद्ध व्यक्तींनी) शक्य त्या सर्व समान माध्यमांवर डिझायनर कपडे व दागदागिने घातलेली त्यांची छायाचित्रे कौतुकाने टाकली आहेत. त्याचवेळी अशा अनेक व्यक्ती आहे (म्हणजे ज्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते) ते या पैशांच्या दिखाव्याबद्दल नापसंती दर्शवताहेत व आपल्या देशातील गरीब लोक अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत असताना, एक कुटुंब असे आहे की जे त्यांच्या मौजमजेसाठी अब्जावधी रुपये खर्च करत आहे, वगैरे टिप्पणी केली जात आहे. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे, अंबानींनी हा कायदेशीर कमवलेला पैसा आहे, त्यामुळे ते त्यांना हवा तसा व हवा त्याप्रकारे खर्च करू शकतात ही वस्तुस्थिती तर कुणी नाकारू शकत नाही किंवा त्यास आव्हान देऊ शकत नाही. मुद्दा असा आहे की संपत्तीचा अशाप्रकारे दिखावा करणे योग्य आहे का (मी चांगले किंवा वाईट असे म्हणत नाही)? दुसरा मुद्दा म्हणजे, या योग्य वा अयोग्य प्रश्नाचे उत्तर ठरविण्यासाठी किंवा देण्यासाठी मी कुणी अधिकारी व्यक्ती नाही, परंतु मला या विषयाच्या दोन्ही बाजूंचे विश्लेषण करावेसे स्वत:साठी वाटले, म्हणूनच हा लेखप्रपंच. आणखी एका मुद्द्यावर मला स्वतःपुरते विचारमंथन करावेसे वाटते कारण मी मुकेश अंबानींसारख्या व्यक्तीचा व्यावसायिक म्हणून (याबाबतही मतभेद असू शकतात) आदर करतो. कारण त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी जे साम्राज्य मागे ठेवले होते त्याचा त्यांनी प्रचंड विस्तार केला. अर्थात याचा अर्थ त्यांच्या व्यावसायिक तत्वज्ञानाशी मी सहमत आहे असा होत नाही.

ज्या दिवसापासून म्हणजे साधारण सहा महिन्यांपूर्वी या लग्न-पूर्व सोहळ्याची सुरुवात झाली तेव्हापासून समाज माध्यमे तसेच छापील वृत्त माध्यमे कुणाला आमंत्रित करण्यात आले आहे, कोण कलाकार कार्यक्रम सादर करणार आहे (व त्यासाठी त्यांना किती पैसे मोजण्यात आले आहेत), पार्टीसाठीची ठिकाणे कशी ठरविण्यात आली आहेत, नवरा-नवरीचे तसेच श्री. व श्रीमती अंबानींचे डिझायनर कपडे व त्याच्या किंमती व सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंबानींनी या सोहळ्यासाठी (माफ करा लग्नासाठी) एकूण किती खर्च केला याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. एखाद्या परे व्यक्तीच्या वैयक्तिक खर्चाचा विषय असतो तेव्हा आपणा भारतीयांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते व जेव्हा कार्यक्रम एवढा मोठा व आंतरराष्ट्रीय असतो तेव्हा उत्सुकताही तितकीच जास्त असते. एका सायंदैनिकाच्या मते हा खर्च साधारण ३००० कोटी व त्याहूनही अधिक होता. इन्स्टाग्रामवरच्या एका पोस्टमध्ये वरातीमध्ये काही सुपर स्टार्स नाचताना त्यांची डिझायनर स्विस ऑडमास पिजेट कंपनीची घड्याळे दाखवत होते ज्यांची किंमत प्रत्येकी २ कोटी रुपये आहे व अशी २०० घड्याळे वरातीमध्ये सहभागी झालेल्या शाहरुख, धोनी, रणवीर सिंग वगैरे निवडक मंडळींना भेट म्हणून देण्यात आली. यावरून तुम्ही लग्नाचा एकूण खर्च किती असेल याची कल्पना करू शकता. त्याचप्रमाणे आपल्या देशाचे पंतप्रधान, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रमुख, क्रीडापटू, तसेच जगभरातील चित्रपट तारे-तारकांना आमंत्रित करण्यात आले होते. व्यवसाय व राजकारण क्षेत्रातील मंडळी मी समजू शकतो की स्वखर्चाने आली असतील. परंतु मनोरंजन व क्रीडा क्षेत्रातील सुप्रसिद्ध मंडळींनी आणि फिरंगी लोकांनी (म्हणजेच हॉलिवुडमधील) हजेरी लावण्यासाठी नक्कीच पैसे घेतले असणार.

मी म्हटल्याप्रमाणे घरातील लग्नाला कुणाला आमंत्रण द्यायचे हा पूर्णपणे कौटुंबिक प्रश्न आहे (म्हणजे श्री. मुकेश यांचा) तरीही या भव्य सोहळ्याविषयी उत्सुकतेपोटी माझ्या मनात काही प्रश्न आहेत ते असे . कौटुंबिक सोहळ्याचा एवढा मोठा कार्यक्रम का करावा व ते देखील केवळ याच मुलाच्या लग्नाचा एवढा मोठा सोहळा का, याआधीही इतर भावंडांची लग्ने झाली आहेत, तेव्हा असा सोहळा का करण्यात आला नाही?  .किम कर्डाशीन्ससारख्या लोकांना आमंत्रित करण्यामागचे कारण काय, त्यातून तुम्हाला काय दाखवायचे होते?  . संपूर्ण सोहळ्याचे आयोजन एखाद्या रिअॅलिटी शोसारखे का करण्यात आले होते, कारण एरवी श्री. मुकेश अंबानी फारसे प्रकाशझोतात कधीच नसतात?  . हा प्रश्न तारे-तारकांसाठी आहे जे अगदी त्यांच्या घरातले लग्न असल्यासारखे नाचत होते, तुम्ही हे चाळे कशासाठी केलेत, तुम्ही हे फक्त पैशांसाठी केले का? शेवटच्या प्रश्नाचे उत्तर मी समजू शकतो की पैशांसाठी हेच आहे. साधारण दहाएक वर्षांपूर्वी शाहरुख खानने एका मुलाखतीत स्वतः मान्य केले होते की त्याचा चेहरा हा विकण्यासाठीच आहे व कुणी त्याला एक कोटी रुपये देणार असेल (ही दशकभरापूर्वीची गोष्ट झाली) तर तो कुणाच्याही लग्नात नाचेल. मला आनंद आहे, तो अजूनही त्याच्या शब्दाला जागून आहे, त्याची किंमत आता काही कोटींनी वाढली असेल. मात्र धोनी व इतर काही व्यक्तींनी सन्मानपूर्वक दुसऱ्याच्या लग्न सोहळ्यामध्ये सहभागी होणे ही एक गोष्ट आहे व तुमचे विचित्र नृत्य कौशल्य दाखवणे ही दुसरी गोष्ट आहे, हा माझा मुद्दा आहे.

एवढे पैसे खर्च करून जगभरातील सुप्रसिद्ध व्यक्तींना आमंत्रित करण्यामागे एकच तर्क असू शकतो, पैसा काय करू शकतो हे अंबानीना जगाला दाखवू द्यायचे होते, एवढाच अर्थ मी काढू शकतो आणि बिजनेस मित्र परिवार वाढवणे ! पण हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण मग हे आत्ताच का. अगदी नम्र व सुजाण व यशस्वी व्यक्तींनाही ते काय करू शकतात (अगदी मूर्खपणाही) हे किमान एकदा दाखवावेसे वाटते व अंबानींसाठी ही ती वेळ होती, हा पण त्यामागचा तर्क असू शकतो. खर्च व त्यासंदर्भातील वादाचा विचार करता, मला स्पष्टपणे असे वाटते की अंबानीचा पैसा आहे त्यामुळे तो कसा खर्च करायचा हा त्यांचा प्रश्न आहे. अंबानी निश्चितपणे अनेक समाजसेवी कामे करतात, तरीही हे काही हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी वापरता आले असते नाही का?  जे देशाच्या कानाकोपऱ्यात मरणासन्न अवस्थेमध्ये आहेत किंवा उपचाराची वाट पाहात असलेल्या अनेक गरीब रुग्णांना थेट मदत होऊ शकली असती (अलीकडेच नागपूरमध्ये एका तीन जणांच्या कुटुंबाने त्यांच्या कर्करोगाने पीडित मुलीवर उपचार करता येत नाहीत व तिची वेदना बघवत नाही म्हणून आत्महत्या केली) अशी बातमी वाचण्यात आली व इतरही अनेक गोष्टी करता आल्या असते जेथे अब्जावधी लोकांना रोज धड खायलाही मिळत नाही. मी हा लेख लिहीत असताना मी राहत असलेल्या इमारतीचा वॉचमन बाहेर माझ्या ऑफिस मध्ये त्याच्या घरासाठी २०,००० रुपयांचे कर्ज मिळावे म्हणून वाट पाहतोय कारण ते पावसामुळे गळते आहे व त्याच्याकडे छत दुरुस्त करण्यासाठी पैसे नाहीत. हा काही माझा दोष नाही किंवा त्या वॉचमनला मदत करणे हे काही माझे एकट्याचे कर्तव्य नाही. परंतु मला त्याची परिस्थिती माहिती असताना, मी माझ्या मित्राला काही लाख रुपयांचे रॅडो घड्याळ, त्या मित्राकडे अशाप्रकारची किमान दहा घड्याळे आधीपासून असताना केवळ माझ्याकडे पैसे आहेत व ते खर्च करण्याचा मला हक्क आहे म्हणून भेट देणे योग्य आहे का, हा प्रश्न अशावेळी मी स्वतःला विचारतो, अंबानींना नव्हे. अनेक लोकांची अशी भूमिका आहे की अंबानींना या सोहळ्यासाठी एवढा खर्च केल्यामुळे तो पैसा अर्थव्यवस्थेमध्ये आला व त्यामुळे तिला थोडा हातभार लागला. परंतु माझा प्रश्न असा आहे की, २ कोटी रुपयांचे घड्याळ भेट देताना तो पैसा स्विस कंपनीला गेला व ती घड्याळे अशा व्यक्तींच्या हाती गेली ज्यांच्याकडे आधीपासूनच अशी अनेक घड्याळे आहेत, अशावेळी आपण कोणत्या अर्थव्यवस्थेविषयी बोलतोय. म्हणून मग  बरोबर व चूक हा मुद्दा पुढे येतो, मीसुद्धा थोडा दानधर्म करतो, मग तो कितीही मोठा असेल किंवा लहान, पण म्हणून त्यामुळे मला ज्यांच्याकडे आधीच बक्कळ आहे त्यांच्यावर खर्च करण्याचा अधिकार मिळतो का असा प्रश्न मला केवळ अंबानींनाच नव्हे तर महागड्या भेटवस्तू व मोठाले धनादेश स्वीकारून या सोहळ्याला हजर राहिलेल्या व्यक्तींना विचारावासा वाटतो. या पार्श्वभूमीवर आपल्यापुढे राहुल द्रविडचे उदाहरण आहे ज्याने बीसीसीआयने टी२० विश्वचषक जिंकण्यासाठी देऊ केलेला अतिरिक्त लाभांश तो सुद्धा पाच कोटी रुपयांचा नाकारला सर्व सहाय्यक कर्मचाऱ्यांमध्ये त्याची समान विभागणी व्हावी असे त्याने सुचवले. राहुल द्रविड आता निवृत्त आहे अशावेळी त्याच्यासाठी पाच कोटी रुपये ही काही लहान रक्कम नव्हती, मात्र जगण्याचा हाच योग्य मार्ग आहे असे मला सांगावेसे वाटते. तसेच इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्टमध्ये, एका पोस्टने माझे विशेष लक्ष वेधून घेतले, त्यामध्ये श्री. अनिल अंबानी (श्री. मुकेश यांचे धाकटे बंधू) लग्नाच्या ठिकाणी प्रवेश करताना दिसत आहेत, त्यांच्यासोबत कोणताही लवाजमा नाही किंवा त्यांचे स्वागत करण्यासाठी प्रवेशद्वारावर कुणीही नाही, अपयशी झाल्यावर तुमच्या वाट्याला हेच येते. कारण यशाच्या मागे सर्वजण जातात, परंतु अपयशाच्या मागे कुणीही जात नाही, हे कटू सत्य या लग्नाच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा पाहता आले. हा अंबानी कुटुंबावर टीका करण्याचा उद्देश नाही, त्यांना जे योग्य वाटले ते त्यांनी केले. ज्याप्रमाणे एका शहनशहाने त्याच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून एक स्मारक बांधले, जे एका कवीला प्रेमाचे मंदिर वाटते, तर दुसऱ्या कवीला तो सर्व प्रेमीजनांचा अपमान वाटतो कारण त्यांना त्यांच्या प्रेमासाठी असे स्मारक बांधणे परवडू शकत नाही; असो देव नव-परिणीत दांपत्याचे कल्याण करो व आपल्या समाजेचेही !

  

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

ईमेल आयडी -  smd156812@gmail.com 


No comments:

Post a Comment