Thursday 11 July 2024

T20 वर्ल्ड कप, भारतीय संघ आणि खूप काही !

 



































T20 वर्ल्ड कप, भारतीय संघ आणि खूप काही !

 “मी अतिशय कणखर व अनुभव खेळांडूना सुद्धा तणावाखाली खचताना पाहिले आहे व ते नैसर्गिकआहे; परंतु ताणावामद्धे सुद्धा जे नैसगीक खेळ करू शकतात, तेच विजेते होतात!”… विन्स लोम्बार्ड.

भारताने जेव्हा २९ जूनला मध्यरात्री (भारतीय वेळेनुसार) टी२० विश्वविजेतेपदाचा चषक उंचावला तेव्हा माझ्या मनात या महान अमेरिकी फुटबॉल प्रशिक्षकाचे वरील शब्द चमकून गेले. मला खात्री आहे की भारताच्या क्रीडा इतिहासातील तीन घटना पहता देशातील सर्व नागरिकांनी देव पाण्यात टाकून पाहिल्या असतील; पहिली मी टीव्हीवर पण पाहिली किंवा रेडिओवर ऐकले नाही, ती म्हणजे १९८३ साली विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विव्ह रिचर्ड्स यांनी मदनलाल यांच्या गोलंदाजीवर मिडविकेटच्या बाजूने मारलेला फटका. दुसरी म्हणजे २००७ साली, टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मिसबा उल हकने जोगिंदर शर्माचा चेंडू असाच उंचावून मारला होता. मी  तो सामना बघत असल्यामुळे तो क्षण मला अनुभवता आला व आता १७ वर्षांनंतर पुन्हा डेव्हिड मिलरने २०२४ च्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत हार्दिक पंड्यांच्या चेंडूवर जोरदार फटका आकाशात मारला. तिन्ही वेळा हा झेल घेण्यात आला व करोडो लोकानी सुटकेचा निःश्वास सोडला. नुकत्याच झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मिलरने फटका मारलेला चेंडू सीमापार होणारच पण, तेवढ्या सूर्यकुमार यादव नावाच्या जादुगाराने तो झेलला व भारतीयांचे देव पाण्यातून बाहेर आले. तुम्हाला असे वाटत असेल की हे अतिशय नाट्यमय वर्णन आहे, तर माफ करा परंतु त्यादिवशी आपण जे काही अनुभवले (अर्थातच क्रिकेट प्रेमींनी) त्याचे या शब्दांमध्ये जेमतेम दहा टक्के  सुद्धा वर्णन होऊ शकणार नाही, कुणालाही विचारा !

तर हा लेख क्रिकेटविषयी नक्कीच आहे परंतु हा खेळ किती महान आहे व या देशामध्ये किती लोकप्रिय आहे हे सांगणे त्याचा उद्देश नाही. कारण या देशामध्ये क्रिकेटचा तिटकारा असणारेही असंख्य लोक आहेत, म्हणूनच त्यांचाही आदर राखत हा लेख भारत व दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या टी20 विश्वचषकाच्या विजया सोबत काय जिंकले या विषयी आहे. हा लेख खेळाविषयी व त्या सामान्यामध्ये मी जी विजिगीषु वृत्ती अथवा जिंकण्याची जिद्द अनुभवली त्याविषयी आहे. त्यामुळे क्रिकेटचा तिटकारा असलेलेही तो पुढे वाचू शकता कारण हे कोणत्याही खेळाला लागू होते, अगदी आयुष्याच्या खेळालाही ! मी अंतिम सामन्यापूर्वीचे कोणतेही तपशील नमूद करत नाहीत, कारण आपण सगळे जाणतो, भारत त्या स्पर्धेमध्ये एकाही सामान्यामध्ये पराभूत झाला नाही, परंतु दक्षिण आफ्रिकेनेही एकही सामना गमावला नव्हता. त्यामुळे ती तुल्यबळ लढत होती. क्रिकेट हा खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय खेळ नसल्याचे जे टीकाकार म्हणतात, मी त्यांना काहीही प्रत्त्युत्तर देणार नाही केवळ काही तथ्ये मांडणार आहे. या विश्वचषकामध्ये, सोळा संघांचा समावेश होता, ज्यात यूएसए, नेदरलँड्स, स्कॉटलंड, अफगाणिस्तानचाही समावेश होतो आणि यात अनेक प्रमुख संघांना पराभवाचा धक्का बसला. पाकिस्तान, न्यूझिलंड व वेस्ट इंडिजसारखे संघ अंतिम आठमध्ये स्थान मिळवू शकले नाहीत. यातून इतर संघांनी या मुख्य सात-आठ संघांपेक्षा खेळाचा दर्जा कसा वाढवला होता हे दिसून येते व कोणत्याही खेळासाठी हे अतिशय चांगले लक्षण आहे. त्याचवेळी अंतिम सामन्यापर्यंत पोहोचेपर्यंत, भारताने प्रामुख्याने क्रिकेट खेळल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया व गतविजेत्या इंग्लंडसारख्या इतर महत्त्वाच्या देशांनाही पराभूत केले होते. कोणताही खेळ हा शेवटी खेळअसतो, विशेषतः जेव्हा तुम्ही जागतिक पातळीवरचे अंतिम सामने खेळता, त्यावेळी ताण हाताळणे अत्यंत महत्त्वाचे असते. तुम्ही जेव्हा १५० कोटी लोकसंख्येच्या देशाचे प्रतिनिधित्व करत असता तेव्हा अपेक्षांचे ओझे तुमच्या कल्पनेपेक्षाही अधिक असते. तुम्ही व मी मैदानावरच्या त्या अकरा खेळाडूंकडून ताण कसा हाताळायचा या प्रक्रियेतून शिकू शकता, हा माझ्या लेखाचा विषय आहे!

मी अंतिम सामन्यापूर्वी बोलण्यापूर्वी दोन्ही स्पर्धक संघांच्या भूतकाळाविषयी थोडेसे बोलू, यातही तपशील सांगून तुम्हाला बोअर करणार नाही. परंतु दोन्ही संघांची मानसिक स्थिती कशी होती किंवा त्यांच्यावर किती ताण होता हे तुम्हाला समजून सांगणार आहे कारण ताणामुळे  थेट तुमच्या कामगिरीवरपरिणाम होतो. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा उल्लेख नेहमी कचखाऊ असा केला जात असे कारण क्रिकेटच्या जागतिक पातळीवरील कोणत्याही स्पर्धेत ते उपांत्य फेरीच्या पुढे जाऊ शकले नव्हते. तसेच भारतीय संघावरही अलिकडे अंतिम सामान्यात कच खाणारा संघ असा शिक्का बसला होता. कारण गेल्या जवळपास तेरा वर्षात विविध स्वरूपाच्या (कसोटी, एक-दिवसीय व टी-२०) स्पर्धांच्या पाच अंतिम सामान्यांमध्ये भारतीय संघाने स्थान मिळवले होते व ते सर्व सामने आपण हरलो. त्यापैकी दोन पराभव तर गेल्या वर्षभरातीलच होते, म्हणूनच या अंतिम सामन्यात पोहोचल्यानंतर दोन्ही संघ विजयासाठी उत्सुक तसेच अस्वस्थही होते !

आणि इथेच खरे आव्हान सुरू झाले

तुम्ही अशा अंतिम सामन्यात खेळताना ताणाखाली असता कारण पुन्हा एकदा अंतिम फेरीतील पराभवाचा अदृश्य राक्षस तुम्हाला घाबरवत असतो व त्याचवेळी प्रतिस्पर्धी संघ जिंकण्यासाठी उत्सुक असतो कारण त्यांनी आधीच उपांत्य सामना जिंकून त्यांच्यातील हा मानसीक राक्षस दफन करून टाकलेला असतो, यामुळे ते अत्यंत धोकादायक प्रतिस्पर्धी असल्याचे दक्षिण आफ्रिकेने सिद्ध केले. त्याचशिवाय अलिकडेच झालेल्या आयपीएलमध्ये (आता हे काय आहे असे विचारू नका) आपल्या कप्तानाचा तसेच उप कप्तानाचा खेळ विशेष चांगला झाला नव्हता. त्यामुळेच त्यांचा संघ या लिगमध्ये पदतालिकेमध्ये अखेरच्या स्थानी होता, यामुळे त्यांची राष्ट्रीय संघात निवड योग्य आहे हे जगाला दाखवून देण्याचा अतिशय मोठा ताण त्यांच्यावर होता आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी संघाचे नेतृत्व करणे अपेक्षित होते ! त्याचशिवाय अंतिम सामना अशा एका संघाविरुद्ध होता, ज्यांचे महत्त्वाचे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होते व त्यांना इतर कोणत्याही संघापेक्षा प्रत्येक भारतीय खेळाडूचा खेळ अतिशय चांगल्याप्रकारे माहिती होता, त्यामुळे आपल्या खेळाडूंपैकी कुणाच्याही खेळामुळे त्यांना चकीत वाटणार नव्हते, जो आपला आणखी एक कमकुवत पैलू होता. त्याचप्रमाणे आपल्या संघाचा कणा असलेल्या विराट कोहलीचा खेळ अंतिम सामन्यापूर्वीच्या सगळ्या सामन्यांमध्ये त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब होता व त्यामध्ये सर्वात कमी धावसंख्या झाली व त्याला अंतिम सामन्यात सहभागी केले जाऊ नये अशीही मागणी जोर धरत होती. संघाची मनस्थिती कशी होती हे तुम्हाला माहिती असावे यासाठी मी हे सागत आहे, आपण याचाच अभ्यास केला पाहिजे व यातून शिकले पाहिजे. भारतामध्ये एखादा सुप्रिसिद्ध क्रिकेटपटू असो किंवा एखाद्या चित्रपटातील अभिनेता, तुमच्या यशासाठी तुमच्यावर देवापेक्षाही अधिक प्रेम केले जाते, परंतु तुम्ही अपयशी ठरलात तर एखाद्या राक्षसासारखा तुमचा तिरस्कार केला जातो, हा ताणही प्रत्येक खेळाडूच्या खांद्यावर असतो.

त्यादिवशी संध्याकाळी रस्त्यावर कशी परिस्थिती परिस्थिती होती हे मी तुम्हाला सांगतो, केवळ काही महिन्यांपूर्वी जेव्हा भारत एक दिवसीय क्रिकेटचा अंतिम सामना खेळत होता तेव्हा शहरातील (म्हणजे देशातील) प्रत्येक उपाहारगृहामध्ये आमच्यासोबत विश्वचषक साजरा करा वगैरे आशयाच्या जाहिराती लिहीलेल्या होत्या. जेव्हा आपण तो सामना हरलो तेव्हा लाखो पार्ट्यांचा क्षणात विरस झाला. त्यामुळे यावेळी भारत अंतिम सामन्यात पोहोचूनही काहीही उत्साह नव्हता किंवा उपाहारगृहांनी अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण वगैरे आयोजित केलेले नव्हते कारण लोकांना गेल्या अनेक अंतिम सामन्यांमध्ये काय झाले होते याची कल्पना होती व कुणालाही त्यांचा मूड बिघडवयाचा नव्हता !  यातूनच संपूर्ण देशाची या सामन्याविषयी मनस्थिती कशी होते हे दिसून येते. संघ केवळ अंतिम सामन्यात पोहोचल्याबद्दल त्यांना समाधान किंवा आनंद नव्हता तर त्याने तो अंतिम सामना जिंकावा अशी त्यांची इच्छा होती. अर्थातच त्यामुळे अपेक्षांचे ओझेही मोठे होते. या सामन्यावर आमच्या बॅडमिंटनच्या गटामध्ये पैज लावण्यात आली होती (अर्थातच जिंकल्यास पार्टी द्यायची मैत्रीपूर्ण पैज), मी दक्षिण आफ्रिका विजयी होईल अशी पैज लावणारा एकमेव होतो कारण माझा विचार तर्कशुद्ध होता, अंतिम सामन्यात जिंकण्याची(लढाऊ) वृत्तीच सर्वात महत्त्वाची ठरणार होती. मी काही कुणी क्रीडा तज्ज्ञ किंवा समुपदेश नाही परंतु विजिगीषु वृत्ती म्हणजे तुम्ही तणावाखालीही एखादी परिस्थिती शांतपणे कशी हाताळता. आपला संघ अंतिम सामन्यांचा ताण हाताळू शकत नाही.  हे पूर्वीच्या सामन्यांमधून दिसून आले आहे असे माझे मत होते, म्हणून मी दक्षिण आफ्रिका संघावर पैज लावली होती. आश्चर्याची (सुखद आश्चर्य) बाब म्हणजे मी पैज हरलो कारण भारतीय संघाने वैयक्तिकपणे व संघ म्हणून विजिगीषु वृत्तीचे अतिशय उत्तम उदाहरण घालून दिले !

मला तुम्हाला आकडेवारी किंवा गुणसंख्या अथवा त्या क्षणांविषयी सांगत बसणार नाही कारण आपणा सर्वांनी ते अनुभवले आहे. म्हणूनच केवळ विश्वचषक जिंकणे नव्हे तर ही लढाई कशाप्रकारे लढली गेली (स्वतःतील भीतीविरुद्धची लढाई) व आपण त्यातून काय घेतले पाहिजे याविषयी हा लेख आहे. मी गेल्या पाच दिवसात जवळपास वीस वेळा हा सामना ( OTT वर रिपले ) पाहिला आहे, आपण जेव्हा पहिल्या तीन विकेट लवकर गमावल्या तेव्हापासून आपण मधली काही षटके कशी हाताळली व दक्षिण आफ्रिकेची शेवटच्या सहा षटकातील फलंदाजीपर्यंत. तसेच आयुष्यात सुद्धा आपण एका आवर्तनातून जातो ज्यामध्ये एका क्षणी आपण यशाच्या अत्युच्च पातळीवर असतो परंतु अचानक सगळे काही इतके बिघडायला सुरुवात होते की आपण प्रयत्न करणेच सोडून देतो किंवा काहीतरी मूर्खसारखी कृती करतो, परंतु भारतीय संघाने तसे काही केले नाही हा माझ्या लेखाचा विषय आहे. आपण पहिले तीन गडी झटपट गमावल्यानंतर विराट कोहली खंबीरपणे उभा राहिला, आपण बाद व्हायचेनाही हा निर्धार त्याच्या मनामध्ये होता. विराटने एक बाजू भक्कमपणे सांभाळण्याचे काय महत्त्व आहे हे माहिती असल्याने अक्षर पटेल व शिवम दुबे यांनी गोलंदाजांचा दुसऱ्या बाजूने चांगला समाचार घेतला, यालाच सांघिक कामगिरी म्हणतात, जी शिकण्यासारखी होती. संघातील प्रत्येकाला खेळातील त्याची भूमिका माहिती होती व त्याने ती चोख पार पाडण्याचा प्रयत्न केला व मला तुम्हाला सांगावेसे वाटते की हे या आधीच्या प्रत्येक सामन्यात सुद्धा झाले आहे, परंतु कोणत्याही जहाजाची खरी चाचणी वादळामध्येच होते, वाऱ्याच्या झुळूकेमध्ये नाही, म्हणूनहा अंतिम सामना विशेष होता, कारण तो एखाद्या वादळासारखा होता. त्यानंतर सी-सॉ प्रमाणे, दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरू झाल्यानंतर त्यांचेही काही गडी लवकर बाद झाले व पहिल्या काही षटकांमध्ये धाव संख्येचा दर कमी होता. परंतु दक्षिण आफ्रिकेने खेळाचे पारडे पुन्हा एकदा आपल्या असे काही बाजूने झुकवले, की शेवटच्या टप्प्यात विजय केवळ औपचारिकताच उरली होती!

आमच्या बॅडमिंटनच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर, संजय अभिनंदन असा संदेश झळकला, म्हणजे तू पैज जिंकलास, कारण प्रत्येकालाच भारतीय संघ हरणार आहे असे वाटत होते. परंतु तिथेच पैज हरण्याच्या माझ्या आनंदाला सुरुवात झाली कारण या भारतीय संघाने मला चूक ठरवले व अलिकडे बराच काळ त्यांना स्वतःला जे करणे शक्य झाले नव्हते, ते त्यांना गवसले होते व ते त्यांच्यात ठासून भरलेले होते. संघातल्या प्रत्येकाने पराभव स्वीकारण्यास नकार दिला होता, कप्तानाची देहबोली ज्याला समोर पराभव दिसतोय अशी नव्हती तर जो पराभवाच्या पलिकडचे पाहू शकतोय अशी होती, पराभवालाही आपण मात देऊ शकतो हे त्याला माहिती होते. त्यांना हरण्याची भीती वाटत नव्हती, कारण ते फक्त सामना जिंकण्याचा विचार करत होते ही माझ्यादृष्टीने भारताने टी२० विश्वचषक जिंकला यातून शिकण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. मला ते प्रत्येक खेळाडूच्या प्रत्येक कृतीतून दिसून आले, मग ती गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण, चेंडूफेक, संघातील इतर सदस्यांचे मनोधैर्य उंचावणे, कुणीही खेळाडू माघार घेण्यास तयार नव्हता, यालाच लढाऊपणा म्हणतात व या विजयातून मला हेच शिकायला मिळाले. मी सामन्याची ती शेवटची चार षटके किमान वीस वेळा तरी पाहिली आहेत ज्याप्रमाणे मी एम-३ वाचत असे (अभियांत्रिकीच्या कुणाही विद्यार्थ्यांना याचा अर्थ विचारा), प्रत्येक वेळी मी जे काही पाहात होतो त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करत होतो व ते पाहिल्यानंतर एक माणूस म्हणून नव्याने घडत होतो. ते चिकाटी, समर्पण, संघ भावना व आपल्या उद्दिष्टावरून म्हणजेच विश्वचषकावरून लक्ष विचलित होऊ न देणे, या सगळ्या गुणांचे  उत्तम प्रदर्शन होते. मी वरील यादीमध्ये कौशल्य हा शब्द जाणीवपूर्वक वापरलेला नाही कारण कुणीही कधीही खेळाडूंच्या कौशल्याविषयी शंका घेतलेली नव्हती कारण कौशल्य असल्याशिवाय अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या संघात तुम्हाला स्थान मिळालेच नसते. त्यामुळे कौशल्याचा प्रश्नच नव्हता, तर सर्वाधिक आवश्यकता असताना आपल्यातील कौशल्याचा योग्य वापर करणे महत्त्वाचे होते, जे भारतीय संघाने केले. मग एखाद्या क्षेत्र रक्षकाने घेतलेला झेल असो, जो एखाद्या विज्ञान कथेतील चित्रपटामध्ये चपखल बसला असता, ते गोलंदाजांची गोलंदाजी असतो, जेव्हा खरतर तणावामुळे तुमच्या हालचाली मंदावतात, जणू तुम्ही गुडघाभर बर्फातून चालत आहात किंवा एखाद्या कप्तानाचे डोके पराभवाच्या नकारात्मक विचारांनी सुन्न झाले असते, जो चहूबाजूंनी दिसत होता. अशा परिस्थितीतही कप्तान अचूक निर्णय घेऊन प्रत्येक खेळाडूला त्याच्या स्थानाची व जबाबदारीची जाणीव करून देत होता. मित्रांनो, आज या ओळी लिहीतानाही माझे डोळे भावनांनी पाणावताहेत, त्या दिवशीही ती शेवटची चार षटके पाहताना मैदानावर किती प्रचंड ताण असेल याच्या जाणीवेने असेच होत होते. तो ताण एवढा प्रचंड होता की मोबाईलचा स्क्रीन पार करून तो माझ्यापर्यंत पोहोचत होता, जणू तुम्ही एखादा 5 -डी चित्रपट अनुभवत असावा. हा सामना म्हणजे तर 6-डी नाट्य अनुभवण्यासारखे होते, जे तुमच्या मनालाही स्पर्श करून जात होते, विचार करा त्यातील अभिनेत्यांचे (म्हणजेच खेळाडूंचे) काय होत असेल, हा माझ्या लेखाचा विषय आहे. इथे, अनेक लोक सूर्यकुमारने घेतलेला झेल तसेच इतर काही खेळींची अशाच इतर आधीच्या घटनांशी तुलना करतील परंतु त्यांची तुलनाच करता येणार नाही असे मला वाटते, कारण प्रत्येक सामना वेगळा व विशेष असतो. अर्थात काही अधिक विशेष असतात, तर हा सामनाही भूतकाळाच्या ताणामुळे असाच होता, असे तुम्ही म्हणू शकता.

लोकहो, आपण टी २० विश्वचषक जिंकलो परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपण (म्ङणजे भारतीय संघाने) आपल्या इतिहासावर मात केली, या विश्वचषकाची ही सर्वात मोठी मिळकत होती असे मला वाटते. आपल्याही आयुष्यात अनेक चढ-उतार येतील, परंतु आयुष्यात उतार आला किंवा चढ असेल तरी आपल्या उद्दिष्टावरून लक्ष विचलित होऊ देऊ नका. उतारासाठी सज्ज राहा व त्यावर मात करा. त्याचवेळी आपण आपल्या मनावर ताबा मिळवला तर आपल्याला समजेल की भीती वाटली, ताण जाणवला तरी हरकत नाही, तुम्ही त्यावर काय करता हे महत्त्वाचे आहे, कारण त्यातूनच तुम्ही खरोखर कोण आहात हे ठरेल ! मी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचेही आभार मानले, कारण त्यांनी आपल्याला आपल्यातील स्वत:ला सामोरे जाण्याची संधी दिली व एका उत्तम प्रतिस्पर्ध्याप्रमाणे आपल्या क्षमतेची कसोटी घेतली. त्यांच्यासाठी बॉलिवुडचा एक प्रसिद्ध संवाद म्हणावासा वाटतो, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त”; कारण अजून बऱ्याच अशा फायनल्स भविष्यात येतीलच, त्यासाठी शुभेछा !  तसेच दोन्ही संघांचे मनःपूर्वक आभार, कारण हा अंतिम सामना अनुभवल्याने मला स्वत:ला एक अधिक चांगला, संघ-सदस्य होण्यास मदत झाली आहे !


संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

ईमेल आयडी -  smd156812@gmail.com
















No comments:

Post a Comment