Friday 14 June 2024

ताडोबा नावाचे इच्छापूर्तीचे झाड, भाग १ !!






























ताडोबा नावाचे इच्छापूर्तीचे झाड, भाग १ !!

जंगल हे असे ठिकाण आहे जे तुम्हाला दररोज, नवीन प्रकारे आश्चर्यचकित करतेमी.


भारतीय पुरणांमध्ये अनेक विस्मकारक व अद्भुतरम्य गोष्टी आहेत, ज्यामध्ये अनेक रोचक प्राणी किंवा गोष्टींचा समावेश होतो. त्यापैकी एक म्हणजे, “कल्पवृक्ष, तुम्ही ह्या वृक्षाच्या छायेत बसल्यास तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. मला अशा गोष्टी फार आवडतात एक म्हणजे आपल्या पूर्वजांच्या अनुभवातून त्या येतात जे आपले विज्ञान कदाचित मान्य करणार नाही किंवा आपल्या तथाकथित तर्कशुद्ध विचार करणारे मन ते स्वीकारणार नाही. तरीही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या विज्ञानाला अजून समजलेल्या नाहीत व तुम्ही या चमत्काराला किंवा वस्तुला काहीही नाव देऊ शकता, परंतु तुम्हाला हे गूढ अनुभवायला मिळेल. आता तुम्ही बुचकळ्यात पडला असाल की ही शब्दांची रेलगाडी कोणत्या दिशेने जात आहे. तर ती ताडोबाविषयी आहे, ज्यामुळे मला जणू कालची जादू अनुभवता आली..!! असे पाहिले तर मी प्रत्येक वेळी जंगलात जाताना काहीतरी इच्छा सोबत घेऊन जातो व बहुतेकवेळा जंगल माझी ती इच्छा पूर्ण करते. मी खरोखरच सांगतो, की मी हावरट नाही कारण जंगलात अनेकदा जाऊन आल्यामुळे मी संयम शिकलो आहे, तरीही एकाच सफारीमध्ये तुम्ही तुमच्या इच्छांच्या यादीतून कशाची पूर्तता झाली यावर खूण करायला सुरुवात करता. प्रत्येक सफारीच्या वेळी, माणसाच्या मनात हाव निर्माण होते व आश्चर्य म्हणजे माझ्या यावेळच्या भेटीमध्ये जंगलाने माझी हाव सुद्धा पूर्ण केली व माझ्या यादीतील इतरही बऱ्याच इच्छा पूर्ण करता आल्या, त्यामुळे काही काळ तरी माझी कोणतीही इच्छा शिल्लक राहिली नव्हती, म्हणून माझ्या कोण-कोणत्या इच्छा पूर्ण झाल्या याच्या गोष्टी येथे सांगत आहे...


इच्छापूर्ती १. खेळाच्या पहिल्या मिनिटातच गोल.

मी जंगलात अनेकदा वाघ पाहिले आहेत. तरीही जेव्हा तुम्हाला वाघ आजूबाजूला असल्याचे जाणवते तेव्हा तो थरारक अनुभव असतो. मी जेव्हा प्रवेशद्वारापाशी वाघाविषयी गोष्टी ऐकल्या, तेव्हा मलाही असे वाटत होते की जंगलाच्या प्रवेशद्वारापाशीच कधीतरी मला वाघ दिसावा. यावेळी ताडोबाच्या अलिझांझा बफर क्षेत्रामध्ये, अर्थात मला प्रवेशद्वारापाशी काही वाघ दिसला नाही. परंतु आमच्या चालकाने जवळीलच पाणवठ्यावर तपासायचे ठरवले जे प्रवेशद्वारापासून जेमतेम शंभऱ मीटरवर होते, तिथे काही हालचाल दिसते आहे का हे पाहायचे होते. आमच्या जिप्सीने ज्याक्षणी वळसा घेतला व पाणवठा दृष्टीपथात आला तेव्हा एक वयात येऊ घातलेला एक वाघ तेथे बसून आमच्याकडे पाहात होता. जणूकाही तो आम्हाला विचारत असावा, ३ वाजले का?” (दुपारच्या सफारीमध्ये प्रवेशाची वेळ). मला जंगलामध्ये एवढ्या लवकर वाघ दिसण्याची ती पहिलीच वेळ होती, म्हणजे प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर एक मिनिटात तो दिसला होता. हे म्हणजे एखादा फुटबॉलचा सामना सुरू झाल्यानंतर पहिल्याच मिनिटाला लगेच गोल पाहायला मिळण्यासारखे होते व माझी एक इच्छा पूर्ण झालेली होती!


इच्छापूर्ती २. पाण्यात ही कोण आहे, जी माझ्याकडे बघतेय?


माझी ही बऱ्याच काळापासूनची इच्छा होती, कारण प्रत्येक वेळी मला जेव्हा कधीही वाघ (किंवा बिबट्या) पाणी पिताना किंवा त्याचे प्रतिबिंब असलेले पोस्ट दिसे तेव्हा, दिसे, मला असे वाटायचे मला या दृश्याचे छायाचित्र काढायला मिळाले नाही तरी ते किमान पाहायला मिळेल का. कारण तुम्ही जेव्हा प्रतिबिंबाचा उल्लेख करता तेव्हा पाणी अगदी स्वच्छ व स्थिर असले पाहिजे, त्याचप्रमाणे प्रकाशाचीही त्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते. वाघ पाण्यामध्ये शिरून पाणी पिण्यापूर्वीच हे शक्य असते कारण त्यानंतर पाण्यावर उठणाऱ्या तरंगांमुळे प्रतिबिंब हलते. जंगलामध्ये जिथे वाघच नशीबाने दिसतो तिथे वर नमूद केलेल्या सर्व बाबींची पूर्तता होणे किती अवघड आहे याची कल्पना तुम्ही करू शकता. परंतु या सफारीमध्ये जवळपास अशक्य गोष्ट झाली. ती देखील त्याच सफारीमध्ये ज्यामध्ये माझी पहिली इच्छा पूर्ण झाली होती. आम्ही पाणवठ्यापाशी वाट पाहात होतो, जेथे आम्हाला वयात येऊ घातलेला एक बछडा पाहिला व त्याचा भाऊही आजूबाजूला असावा तो तिथे त्याच्यासोबत पाणवठ्यावर येईल असे वाटल्याने आम्ही ही संधी घ्यायचे ठरवले. अचानक काही दूर अंतरावर, हरिणांचे इशारा देणारे चित्कार ऐकू येत आले ज्यामुळे बछड्यांची आई तिथे असावी असे आम्हाला वाटले व आम्ही त्या इशाऱ्यांचा माग घ्यायचे ठरवले. त्या इशाऱ्यांमुळे आम्ही काही किलोमीटर अंतरावर एका पाणवठ्यापाशी येऊन ठेपलो, जेथे पाणी अतिशय स्थिर होते व बऱ्याच पक्ष्यांची लगबग सुरू होती. तिथे एक सांबर व माकडांचा कळप पाणवठ्यापाशी वाट पाहात होता परंतु त्यामध्ये प्रवेश करत नव्हता, याचाच अर्थ जवळपास वाघ होता. म्हणूनच आम्ही थांबायचे ठरवले, मधल्या काळात सांर हरिणाने इशारा देणारा चित्कार केला, म्हणजे त्याला वाघ दिसला होता, जे आमच्या शहरी डोळ्यांना टिपता आले नव्हते. पुन्हा एकदा आम्ही अवतभोवती पाहिले, तर बांधाच्या मागे झुडपामद्धे एक वाघीण गाढ झोपलेली होती असे आमच्या गाईडने सांगितले व अतिशय प्रयत्नपूर्वक मलाही ती दिसली. त्या पाणवठ्यावरील बछड्यांची आई मागे राहिलेली नव्हती तर ही झरनी नावाची दुसरी वाघीण होती व ती अतिशय लाजाळू होती. त्यामुळे त्याने आम्हाला सज्ज राहायला सांगितेले कारण ती पाणवठ्यावर आल्यानंतर फोटो काढायला केवळ काही मिनिटांचाच काळ मिळणार होता व आम्ही थांबायचे ठरवले. तासभऱ होऊन गेला, आम्ही अतिशय संयमाने सांर व माकडांसोबत वाट पाहात होतो व अचानक बांधाच्या कडेला असलेल्या झुडुपांमधून शांतपणे एक चेहरा दिसला वाघीण थेट बांधावर आली, तिला पाण्याकडे पाहिले व काही घोट पाणी प्यायली, त्यानंतर बांधावरून चालत जाऊन ती काही मिनिटे पाण्यात बसली व त्यानंतर दाट झुडुपांमध्ये दिसेनासी  झाली !

ती पाच मिनिटे मला माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी पुरेशी होती, तरीही त्यामध्ये एक लहानशी अडचण होती. माझ्या जागेपासून वाघीणीच्या चेहऱ्याच्या प्रतिबिंबाच्या सरळ रेषेमध्ये गवताचा एक लहानचा पट्टा येत होतात, तरीही एकूण चांगला परिणाम साधला गेला. मी ते प्रतिबिंब दिसणारा एक व्हीडिओही काढला. आशारीतीने एकाच सफारीमध्ये दुसरी इच्छा पूर्ण झाली होती व अशाचवेळी थोडीफार माहिती व संयम कामी येतो. कारण आम्ही प्राण्यांचे इशारा देणारे आवाज ऐकले नसते व सांर हरिणाच्या इशाऱ्याचा आदर केला नसता व संयम राखला नसता; तर हे शक्य झाले नसते व अर्थातच थोडी नशीबाचीही साथ होती!


इच्छापूर्ती . प्रत्यक्ष शिकारीचा साक्षीदार!


खरेतर, जेव्हा कुणीही वाघाने हरिणाला किंवा रानडुकराची शिकार केली असे म्हणते किंवा वाघाच्या अन्नाचा उल्लेख शिकार असा करून, चला वाघ्यांनी केलेल्या शिकारीवर जाऊयात असे म्हणते तेव्हा मला अतिशय विचित्र वाटते. आपण एखाद्याच्या अन्नाला शिकार कसे म्हणू शकतो, विचार करा आपण केएफसीला गेलो किंवा एखाद्या मांसाहारी भोजनालयात गेलो तर आपण त्या शिकारच्या ठिकाणी जाऊयात असे म्हणायला सुरुवात केली तर किती विचित्र वाटेल, नाही का? वाघाला त्याच्या अन्नासाठी एखाद्या जिवंत प्राण्याला मारावे लागते, कारण त्याच्यासाठी त्या प्राण्याची शिकार दुसऱ्या कुणीतरी करण्याची व ते शिजवून त्याला खाऊ घालण्याची सोय त्याला नाही. तरीही आपण वाघाच्या शिकारीचा उल्लेख करताना काही वेगळा शब्द वापरू शकतो असे मला वाटते. प्राण्यांचे जीवन जे वाघाचे भक्ष्य बनते त्याविषयी पूर्णपणे आदर राखत मला वाघ कसा शिकार करतो हे पाहायचे होते. मी वाघांना त्यांची शिकार खाताना पाहिले आहे, परंतु प्रत्यक्ष शिकार करताना व शिकारीनंतर काय होते हे मी पाहिलेले नव्हते. सफारीमध्ये अशाच एक परतीच्या प्रवासात प्रवेशद्वाराकडे माघारी जाताना आम्ही एक मोठे रानडुक्कर पाहिले, ते रस्त्याच्या बाजूला असलेल्या गवताच्या पट्ट्याच्या कडेला उभे होते. आमच्या ड्रायव्हरने विचारले, ‘सर अतिशय जवळ आहे, फोटो घ्यायचा का?” परंतु उशीर होत असल्यामुळे, मी थांबायची गरज नाही, आपण पुढे जाऊ या असे सांगितले, त्यामुळे आम्ही रानडुकराच्या पुढे गेलो. जेमतेम काही पावले पुढे गेलो असू, तेवढ्यात आम्हाला मागून एक कर्कश्श किंकाळी ऐकू आली. ती नक्कीच त्या रानडुकराची होती, तो वेदनेने विव्हळत होता. म्हणजेच रानडुकावर बहुतेक वाघानेच हल्ला केला असावा. मी जिप्सीमध्ये मागे वळलो, आश्चर्य म्हणजे एका वाघीणीने रानडुकरावर झडप घातली होती व त्याचा गळा पकडला होता. आम्ही तात्काळ जिप्सी मागे वळवली, कारण वेळ अतिशय कमी होता व प्रकाश हळूहळू कमी होत चालला होता. तरीही गवतामध्ये आम्ही पाहिले की वाघिणीने त्या रानडुकराला गळयापाशी  घट्ट धरून ठेवले होते व तो जीव वाचवण्यासाठी शेवटची धडपड करत होता. हे सर्व काही सेकंदांमध्ये घडले व मी जंगलातील जीवनाची अनिश्चितता अनुभवली. आम्ही त्या रानडुकराला मागे टाकून पुढे जात असतात ती वाघीण तिच्या जवळच असलेल्या गवताच्या पट्ट्यामध्ये नक्कीच दबा धरून बसली असली पाहिजे व आम्ही रानडुकराची छायाचित्रे काढण्यासाठी थांबलो असतो तर मला प्रत्यक्ष वाघीण त्याच्यावर हल्ला करतानाची छायाचित्रे काढता आली असती किंवा कदाचित तिने वाट पाहिली असती व त्या रानडुकराचा जीव वाचला असता. पण या सगळ्या जर-तरच्या गोष्टी होत्या, तात्पर्य म्हणजे वाघ शिकार कसा करतो हे मला पाहयला मिळाले होते. आम्ही सकाळी परत यायचे ठरवले कारण ते रानडुक्कर अतिशय मोठे होते व वाघीण नक्कीच त्याच्या अवती-भोवती असली असती किंवा शिकार ओढत एखाद्या सुरक्षित ठिकाणी नेली असती. यामुळे मला माझ्या यादीतील चौथी इच्छा त्याच ठिकाणी पूर्ण करता आली.

इच्छापूर्ती ४. शिकारीनंतरची धडपड !


मी नमूद केल्याप्रमाणे आदल्यादिवशी संध्याकाळी त्या वाघीणीने मोठ्या रानडुकराची शिकार केली होती व ती शिकारीच्या जवळपासच असण्याची शक्यता होती, त्यामुळे ती अन्न (माफ करा, शिकार) कसे हाताळते हे मला पाहायची इच्छा होती. आम्ही सकाळी त्या जागी परत गेलो (दरम्यानच्या काळात माझी पाचवी इच्छा पूर्ण झाली होती, त्याची गोष्ट मी पुढे सांगेनच). आम्हाला काही वाहने रस्त्यावर वाट पाहताना दिसेली, इथे रस्ता अरुंद होता व एका बाजूला केवळ जिप्सी लावणे शक्य होते. परंतु आमचा चालक व गाईड अतिशय अनुभवी होते व त्यांनी गवताळ पट्ट्याच्या विरुद्ध बाजूला वाट पाहायचे ठरवले जेथे काल संध्याकाळी आम्ही शिकार पाहिली होती.
ते म्हणाले, ती जागा व आम्ही जेथे उभे होतो त्याच्या मधोमध पाणवठा होता व वाघीण रानडुकराचे धड पाण्याजवळ ओढत नेण्याचा प्रयत्न करेल कारण त्यामुळे त्याचे मांस थोडे नरम होईल. नेमके तसेच घडले, वाघीणीने त्या रानडुकराचे धड गवतातून ओढत बाहेर काढले व जवळच असलेल्या पाण्याच्या डबक्यात टाकले. त्यानंतर आमचा चालकाने सांगितले, ती आता परत जाईल, थोडा वेळ विश्रांती घेईल कारण वाघीणीला या कामामुळे श्रम झाले होते. त्यामुळे तिला विश्रांतीची तसेच मांस नरम होण्यासाठी वेळ हवा होता म्हणून आता आपण परत त्या ठिकाणी जाऊ. तोपर्यंत दुसरी वाहने तिथून निघाली होती व आम्ही आमची जिप्सी बाजूला लावली व वाट पाहिली. काही वेळाने वाघीणी ताजी-तवानी होऊन बाहेर आली व पाण्यामध्ये टाकलेल्या तिच्या शिकारीकडे गेली व पुन्हा ती बाहेर काढली व पाणवठ्या पलीकडे असलेल्या गवताच्या दुसऱ्या पट्ट्याकडे ती ओढत नेली. मला ही संपूर्ण प्रक्रिया तपशीलाने पाहता आली (व छायाचित्रे काढता आली), उदाहरणार्थ जेव्हा वाघ शिकार घेऊन जात असताना, ओढत असताना, किंवा शिकारीचे धड उचलत असताना वाघाची शेवटी कशाप्रकारे आधार म्हणून काम करते व त्यामुळे शिकार ओढत नेल्याचा माग काढता येत नाही, त्यामुळे मेलेल्या प्राण्यांवर जगणारी श्वापदे अथवा पक्षी त्यांच्या मागे जाऊ शकत नाहीत, असे चोख काम करण्यात आले होते व ते पाहण्याची आणखी एक इच्छा पूर्ण झाली होती!

इच्छापूर्ती ५. मी इतका नशीबवान कसा झालो !

बऱ्याच दिवसांपासून आणखी एक इच्छा होती ती म्हणजे, एक नर वाघ त्याच्या अधिवासाच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळावा व डोळ्यांच्या पातळीवर त्याचे संपूर्ण रूप न्याहाळता यावे (छायाचित्रे घेता यावीत). ही देखील, महत्वाकांक्षी इच्छा होती, कारण नर वाघाचे कार्यक्षेत्र वाघिणीपेक्षा पाचपट व्यापक असते व तो जंगलामध्ये कुठेही असू शकतो. तरीही जंगल तुम्हाला काही वेळा आश्चर्यचकित करते व तुम्ही आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन ही म्हण अनुभवता. ताडोबामध्ये आम्ही आमच्यासमोर कॉलरवाली रानडुकराची शिकार करताना पाहिले होते (ही दुसरी गोष्ट आहे) परंतु तेव्हा संध्याकाळी उशीर झाला होता व आम्हाला पुन्हा प्रवेशद्वारापाशी पोहोचणे आवश्यक होते, त्यामुळे आम्ही तिथून निघालो. सकाळी सर्वप्रथम त्या ठिकाणी जाणार होतो कारण आमच्याकडे त्याच झोनचे आरक्षण होते.
आम्ही मोहर्ली येथील एमटीडीसी रिसॉर्टच्या मागे असलेल्या जुनोना गवताळ प्रदेशात पोहोचलो, आम्ही एक वाघ शिकारीपासून लांब चालत जाताना पाहिले. आम्हाला वाटले की वाघीणीने जवळपास आसरा घेतला असावा. परंतु चालत जाणाऱ्या वाघाचा आकार आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी पाहिलेल्या वाघापेक्षा बराच मोठा होता. तरीही आम्ही वाहन मागे वळवण्याचे ठरवले व आम्ही कुरण पार करून अगदी वेळेत त्याच्या जवळ पोहोचलो तेव्हा वाघ आमच्या समांतर चालत होता. आश्चर्य म्हणजे तो एक मोठा नर वाघ होता, त्याचे नाव होते छोटा दढियाल, त्याने ती शिकार ओढत आणली असावी कारण कारण हा त्याचा प्रदेश होता व त्याचा कॉलरवाली वाघीणीशी समागम सुरू होता. त्याचे ते महाकाय शरीर पाहणे हा अवर्णनीय अनुभव होता. जिप्सी गाडी पळत असल्यामुळे व वाघही त्याच्या वेगाने चालत असल्यामुळे (व माझ्या यथा-तथा छायाचित्रण कौशल्यामुळे) सुस्पष्ट छायाचित्र मिळणे नेहमी अवघड असते, तरीही त्याला पाहणे हा एक अतिशय आनंददायक अनुभव होता. आम्ही त्याला शोधतही नसताना आम्हाला तो दिसला हा सर्वात मोठा आश्चर्याचा भाग होता, परंतु ताडोबा हे असेच आहे, आश्चर्यांनी भरलेले!


त्याशिवाय, अजूनही काही जंगलातील माझ्या इच्छा पूर्ण झाल्या, परंतु त्याविषयी दुसऱ्या लेखात लिहीन, नाहीतर माझ्या लेखाचे वाचन थांबवण्याची इच्छा तुम्हाला होईल. प्रत्येकाची इच्छा पूर्ण होत असताना मी हे शिकलो की, जंगलामध्ये तुम्ही अगदी लहानशा तपशीलाचा आदर केला पाहिजे व हे घटनाक्रम लक्षात ठेवून सफारीचे नियोजन केले पाहिजे, तसेच चालक व गाईडच्या अनुभवाता आदर केला पाहिजे. कारण दूरवरून येणाऱ्या इशारे देणाऱ्या आवाजांकडे आम्ही लक्ष दिले नसते, कर आम्ही झरणी वाघीण जिथे झोपली होती तिथे पोहचलो नसतो, त्याच वेळी तुमचा गाईड काय सांगतो ते ऐकणेही महत्त्वाचे असते, कारण या लोकांना प्राण्यांच्या हालचाली माहिती असतात. विशेषतः वाघ हा सवयींनी बांधलेला प्राणी आहे व सामान्यपणे ठरलेल्या मार्गानेच जातो. त्याशिवाय नशीबाचा भागही असतो, परंतु त्या नशीबाची चाचणी घएण्यासाठी तुम्ही जंगलाला भेट देणे आवश्यक आहे, बरोबर? माझे नशीब पुन्हा लवकरच आजमवण्याचे आश्वासन देऊन व इच्छांची नवीन यादी तयार करण्यासाठी स्वतःला थोडा वेळ द्यायचे ठरवून मी अतिशय समाधानाने व असंख्य आठवणी घेऊन ताडोबातून बाहेर पडलो!


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स

कृपया पुण्यात हक्काचे घर/ऑफिस शोधण्याबाबतचे माझे शेअरिंग खालील YouTube लिंकवर पहा आणि आवडल्यास शेअर करा..

https://youtu.be/27j3I3rwGPQ?si=-ODYBxVI2Dl_C345





No comments:

Post a Comment