Wednesday 21 August 2024

ईमारतीचा मेन्टेनन्स आणि व्यवसायाची संधी !











 



































ईमारतीचा मेन्टेनन्स आणि व्यवसायाची संधी !

सेवा उद्योगाच्या बाबतीत हीच गोष्ट उल्लेखनीय आहे, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत कमीत कमी संसाधनांमध्ये उत्तम सेवा कशी द्यायची व आतिथ्य कसे करायचे याचे प्रशिक्षण घेऊ शकता व आयुष्यभर तुम्हाला ती अतिशय चांगल्याप्रकारे कामी येते. येथे सगळे काही तुमच्या कामगिरीवर अवलंबून असते हे एकदा तुम्हाला समजले व तुम्ही ते मनापासून स्वीकारले, त्यानुसार बदल करण्यास शिकलात, तर अवकाशयानातून बाहेर पडून अवकाशात तरंगणाऱ्या एखाद्या अंतराळवीराप्रमाणे तुमची स्थिती असते.”…  मेरिट टायर्स

मेरिट टायर्स या अमेरिकी लघुकथा लेखिका, कक्षा संपादक, निबंध लेखिका, कार्यकर्त्या, व कादंबरीकार आहेत. त्या आयोवा विद्यापीठातही अध्यापन करत असत व सध्या त्या लॉस अँजेलिसमध्ये राहात असून, कथालेखिका म्हणून कार्यरत आहेत. त्या कथालेखिका असतील, परंतु त्यांनी हॉलिवुडसारख्या ठिकाणी त्यांचे करिअर घडवले आहे यावरून सेवा उद्योगाविषयी टिप्पणी करण्याचा त्यांना अधिकार आहे हे दिसून येते, जो माझ्या लेखाचा विषय आहे. अगदी अलिकडच्या काळापर्यंत बांधकाम उद्योग (म्हणजे रिअल इस्टेट) व सेवा हे दोन वेगवेगळे ध्रुव असल्यासारखी परिस्थिती होती. परंतु आता काळ बदलत आहे व रिअल इस्टेटमध्येही बदल होत आहेत. अलिकडेच माझ्या मुलाने (वैयक्तिक संदर्भ वापरल्याबद्दल मला माफ करा जो मी शक्यतो टाळतो परंतु या विषयाकडे त्यानेच लक्ष वेधल्यामुळे, त्याचा उल्लेख करणे अपरिहार्य होते) त्याच्या एमबीएच्या प्रकल्पासंबंधी मला एक प्रश्नावली ईमेल केली जी इमारतींच्या मेन्टेनन्स सेवेसंदर्भातील व्यवसायाच्या स्टार्टअपविषयी होती. आता मी कुणी व्यवस्थापन तज्ज्ञ किंवा विपणन क्षेत्रातील व्यक्ती किंवा व्यवसाय गुरू वगैरे नाही परंतु एक हाडाचा स्थापत्य अभियंता आहे. आणि मी माझ्या करिअरच्या सुरुवातीला मेन्टेनन्स ईजिनिअर होतो. एका रिअल इस्टेट कंपनीचा तांत्रिक प्रमुख झाल्यानंतरही मी तो विभाग स्वकःकडे ठेवला होता, कारण बांधकाम उद्योगाच्या या सर्वात दुर्लक्षित पैलूचे महत्त्व मला समजले आहे. तुम्ही कुणाही स्थापत्य अभियंत्याला विचारा व तो एखाद्या बांधकामस्थळी निम्म्या पगारामध्ये काम करायला तयार होईल परंतु मेन्टेनन्स ईजिनिअर होणार नाही. त्याचप्रमाणे कुणीही स्थापत्य अभियंता चांगला मेन्टेनन्स अभियंता होऊ शकेल असे नाही, हे देखील तितकेच खरे आहे. याचे कारण म्हणजे या कामाला प्रसिद्धीचे वलय नाही व अभियांत्रिकी व सेवा या दोन्ही क्षेत्रांमध्ये विशेष सख्य नसते असा आणखी एक गैरसमज असतो. केवळ मेन्टेनन्स अभियंताच नव्हे तर तुम्हाला आजकाल कोठल्याच मेन्टेनन्ससाठी लोक किंवा कुशल मनुष्यबळही मिळत नाही हीदेखील बांधकाम उद्योगातील एक समस्या आहे ज्यामुळे यासाठीचा व्यवसाय किंवा स्टार्ट-अप अतिशय फायदेशीर ठरेल. म्हणूनच मी त्याच्या प्रश्नावलीला केवळ उत्तरेच दिली नाहीत तर या पैलूविषयी थोडे सविस्तरपणे लिहायचा विचारही केला!

माझे विचार मांडण्यापूर्वी मी तुम्हाला इमारत बांधकाम सेवा क्षेत्रातील परिस्थितीची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. माझ्या माहितीप्रमाणे या उद्योगामध्ये अर्बन क्लॅप नावाच्या कंपनीचा अपवाद वगळता प्लंबर, इलेक्ट्रिशियन यासारख्या सर्व सेवा आपल्या अॅपद्वारे उपलब्ध करून देणारी दुसरी कोणतीही कंपनी संघटित क्षेत्रात कार्यरत नाही. त्याचवेळी पंचशील, मगरपट्टा व गेरा यासारखे काही बांधकाम व्यावसायिक (यांच्याविषयी मला माहिती आहे) त्यांच्या ग्राहकांना मेन्टेनन्स सेवा कंत्राट उपलब्ध करून देतात. इतर कुणीही बांधकाम व्यावसायिक त्यांच्या ग्राहकांना अशाप्रकारे व्यावसायिक सेवा उपलब्ध करून देत नाही. किंबहुना अनेकांना ही प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे अशा सेवा उपलब्ध करून देण्यामध्ये रस नसतो. अनेक बांधकाम प्रकल्पांमध्ये घराचा ताबा दिल्यानंतरची परिस्थिती एवढी दयनीय असते की लोक सोसायटीचे अध्यक्ष किंवा सचिवासारखी पदे स्वीकारायला तयार नसतात कारण सोसायटीतील बांधकामाच्या मेन्टेनन्ससाठी त्यांना या सेवा पुरवठारांकडे पाठपुरवठा घ्यावा लागतो. जेव्हा एखादा वैयक्तिक सदनिकाधारक गळणारा नळ किंवा तुंबलेले बाथरूम किंवा एखादी तुटलेली टाईल बसवणे किंवा शॉर्ट-सर्किट झालेले स्विच दुरुस्त करणे यासारख्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा विश्वसनीय प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियन मिळवणे, त्याच्याशी दराबाबत घासाघीस करणे व हे काम करून घेण्यासाठी अनेक वेळा  ऑफिसला दांडी मारावी लागणे, असा सगळा हा त्रासदायक प्रवास असतो. त्याप्रमाणे तुमचे घर एखाद्या अनोळखी व्यक्तीला दाखवण्याचाही अतिरिक्त धोका नेहमी असतो, जो अनेक लोक घेण्यास तयार नसतात. पुणे प्रदेशामध्ये हजारो नवीन प्रकल्प येत आहेत तसेच त्यातील रहिवाशांना वेळेची कमतरता आहे, अशावेळी या मेन्टेनन्स उद्योगामध्ये किती क्षमता याची कल्पना तुम्ही करू शकता. जी व्यक्ती खरोखरच खडतर परिश्रम करण्यास तयार आहे व जिला सेवा उद्योगाची जाण आहे तिच्यासाठी बांधकाम मेन्टेनन्स सेवा स्टार्टअप सुरू करणे हे एकप्रकारे वरदानच आहे.

यासंदर्भातील काही मुद्दे मी खाली दिले आहेत कारण मी एका उद्योजकाच्या किंवा व्यावसायिकाच्या भूमिकेवर टिप्पणी करणे अपेक्षित होते जो इमारतीच्या देखभालीचा स्टार्टअप म्हणून किंवा नवीन व्यवसाय म्हणून विचार करेल

. नवीन व्यवसायामध्ये प्रवेश करणे

.. मी जेव्हा कोणत्याही नवीन व्यवसायामध्ये प्रवेश करतो तेव्हा माझा ग्राहकवर्ग कसा आहे व त्यांना कशाप्रकारच्या सेवा हव्या आहेत हे मी पाहतो; सध्या जगभरात सगळीकडे शहरीकरण सुरू आहे व याचाच अर्थ अधिक इमारती, त्या सदनिका, बंगले अशा सर्व स्वरूपातील घरे, आयटी पार्क, मॉल, सार्वजनिक इमारती व अशा इतरही अनेक इमारती असू शकतात. या सर्व इमारतींना मेन्टेनन्सची गरज असते, म्हणून मी नवीन व्यवसाय म्हणून देखभाल सेवेची निवड केली कारण यामध्ये आधीपासूनच भरपूर संधी आहेत !

. नाविन्यपूर्ण सेवा

सेवा उद्योगामध्ये सातत्याने नाविन्यपूर्ण बदल करणे कारण इमारतीच्या मेन्टेनन्सचा संबंध लोकांशी असतो व या उद्योगामध्ये घरी बसून काम केले जाऊ शकतच नाही, तर तुम्हाला प्रत्यक्ष हातांनी काम करावे लागते. इथे दोन गोष्टींमध्ये नाविन्यपूर्ण दृष्टिकोन असावा लागतो, एक म्हणजे आजकालच्या जगात वेळ म्हणजेच पैसा व त्यापेक्षाही अधिक म्हणजे, वेळ वाया गेल्यामुळे ताणही निर्माण होतो. इथेच नाविन्यपूर्ण दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. सेवेसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी आपण नाविन्यपूर्ण कल्पना राबवल्या पाहिजेत तसेच योग्यप्रकारे संवाद साधणेही आवश्यक आहे बरेचदा वेळेचा अपव्यय होण्याचेही हेच कारण असते, ज्यामुळे ताण येतो. याच ठिकाणी इमारतीच्या मेन्टेनन्सच्या पारंपरिक कामासाठी माणसांना लागणाऱ्या तासांचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना आवश्यक आहेत.

. डिजिटल परिवर्तन

येथे, मुख्य अडचण म्हणजे या व्यवसायातील ग्राहकांचा डिजिटल जगाशी चांगला परिचय असतो तर प्रत्यक्ष काम करणारी टीम तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्यास फारसा सरावलेला नसतो किंबहुना बऱ्याच प्रकरणांमध्ये तो निरक्षर असतो, उदाहरणार्थ प्लंबर, टायलर, सुतार वगैरे, ज्यांचे बरेचदा प्राथमिक शालेय शिक्षणही झालेले नसते. ही तफावत भरून काढणे हेच मुख्य आव्हान आहे जो एक स्वतंत्र व्यवसायच होऊ शकतो. परंतु डिजिटलीकरणामुळे इमारत मेन्टेनन्स व्यवसायाला अतिशय मोठी मदत होईल कारण त्यामध्ये डेटा महत्त्वाचा असतो. तक्रारी व त्यांचे प्रकार, ग्राहकांच्या नोंदी, मनुष्यबळासंदर्भातील डेटा अशा कितीतरी आघाड्यांवर डिजिटलीकरण हे एक वरदान होऊ शकते ज्याचा सध्या प्रभावीपणे वापर केला जात नाही.

. तंत्रज्ञानाचा स्वीकार

कोणताही उद्योग किंवा व्यवसायातील मूलभूत तथ्य म्हणजे लोक बदलाला घाबरतात व या भीतीपोटी ते कोणताही बदल करण्यास, किंवा तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यास उत्सुक नसतात. आपण ही मानसिकता समजून घेणे आवश्यक आहे व त्यानंतरच कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, विशेषतः जेव्हा इमारतीच्या मेन्टेनन्ससारखा व्यवसाय असतो. परंतु जर हा विषय योग्यप्रकारे मांडण्यात आला तर तुमच्या टीमला जाणीव होईल तंत्रज्ञान हे त्यांच्या सुरक्षितेसाठी तसेच पैसे कमावण्यासाठी चांगले आहे, त्यानंतर ते तुमच्यापेक्षाही अधिक वेगाने त्याचा स्वीकार करतात, वॉट्सअॅपचा वापर व पैसे देण्यासाठी फोनचा वाढता वापर आणि स्मार्टफोनची वाढती विक्री ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. तळागाळामध्ये काम करणारा कामगार वर्ग, उच्च वर्गापेक्षा तंत्रज्ञानाचा अधिक सफाईन  वापर करतो, जेव्हा त्यांचे फायदे त्यांना उमजतात. हे तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे उत्तम उदाहरण आहे. सर्व कामगार किंवा इमारत मेन्टेनन्स व्यवसायात काम करणारे सहकारी हे त्यांच्या व्यवहार ज्ञानावर टिकून असतात. हे लोक अशिक्षित असले तरीही ते मूर्ख नसतात ही बाब प्रत्येक व्यावसायिकाने लक्षात ठेवली पाहिजे.

. ग्राहकाचे वर्तन

बांधकाम उद्योगामध्ये या घटकाविषयी फारसे बोलण्यात आलेले नाही व घराचा ताबा दिल्यानंतर जेव्हा देखभालीची वेळ येते तेव्हा बांधकाम व्यवसायिक हा ईमारती मधून निघून गेले असतो व ग्राहक आपणहून मेन्टेनन्सची कामे हाताळताना मेटाकुटीला आलेला असतो. इथेही पुन्हा एक योग्य व स्पष्ट संवाद त्याचसोबत ठराविक वेळी मेन्टेनन्स करणे अतिशय महत्त्वाचे असते. तुम्ही ते करू शकलात तर ग्राहक अतिशय आनंदी होतो व त्याचवेळी एखादी चूक झाली तर त्याच्या रागाचा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळेच इमारतीची मेन्टनन्स ही नेहमीच तारेवरची कसरत असते. मेन्टेनन्ससंदर्भातील कोणत्याही तक्रारीबाबत ग्राहकाला काय हवे असते, तर त्याचा किंवा तिचा गळणारा नळ किंवा तुंबलेले कमोड किंवा भिंतीचा उडालेला रंग किंवा दरवाज्याची कडी खराब झाली असेल किंवा इमारतीची काहीही  समस्या असेल तर ती समजून घेणारा व त्याबाबत सहानुभूती असलेला कुणीतरी व्यक्ती कायम उपलब्ध असावी. इमारतीच्या रहिवाशांसाठी या समस्या आधीपासूनच एखाद्या भयाण स्वप्नासारख्या असतात ज्यामुळे ज्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो, विशेषतः घरातील गृहिणीवर व यामुळे संपूर्ण घराचे वातावरण खालावते, हे सेवा पुरवठादाराने समजून घेतले पाहिजे व त्यानंतर संबंधित ग्राहकाशी व्यवहार केला पाहिजे... हे तुमचे घर किंवा कार्यालय आहे असा विचार केला पाहिजे व त्यानंतर ग्राहकाच्या वागणुकीचे स्वरूप समजून घेणे सोपे असते ज्यामुळे अप्रत्यक्षपणे तुमचा भविष्यातील ताण कमी होतो तसेच व्यावसायिक नाती सशक्त होतात!

. महत्त्वाचा मुद्दा आहे संवाद.

सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे, तुमच्या ग्राहकांशी योग्य संवाद साधण्यावर भर द्या व तुम्ही ज्यावेळी उपलब्ध असाल असे त्याला किंवा तिला आश्वासन दिले आहे ती वेळ पाळा, इमारतीच्या मेन्टेनन्सचाच नव्हे तर कोणत्याही सेवा क्षेत्राचा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, सरते शेवटी सर्वोत्तम सेवा कोणती हे सेवा पुरवठादार ठरवत नाही तर ग्राहक ठरवतो.

इमारतीच्या मेन्टेनन्सच्या सेवा उद्योगाचा आणखी एक पैलू आहे ज्याविषयी कुणीही विचार केलेला नाही तो म्हणजे या उद्योगामध्ये अतिशय कमी कुशल महिला आहेत. तुम्ही कधी एखादी महिला प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियन किंवा टायलर किंवा एखादी महिला सुतार पाहिली आहे का, तर यावर बहुतेक व्यक्तींचे उत्तर नाही असे असेल, बरोबर? याचे कारण म्हणजे ही शारीरिक कामे आहेत जी बांधकाम स्थळी खडतर परिस्थितीमध्ये करावी लागतात व म्हणूनच कधीही त्यांचा विचार महिलांचे काम असा करण्यात आला नाही जे योग्य नाही कारण यापैकी बहुतेक पुरुषांच्या मदतनीस महिलाअसतात ज्या त्यांना त्यांची साधनसामग्री घेऊन जायला मदत करतात किंवा त्यांना साहित्य पुरवतात, परंतु महिलांना ही कामे त्यांच्या कडून करायची परवानगी कधीही दिली जात नाही. इमारतीच्या बांधकामाच्या कामामध्ये एखाद्या प्लंबरचे किंवा वॉटर-प्रूफिंगचे किंवा टायलरचे काम करणाऱ्या महिलेला खरेतर राहत्या घरात काम करणे अधिक सुरक्षित वाटू शकते कारण कामाचे ठिकाण एखाद्या कुटुंबाचे घर किंवा संघटनेचे कार्यालय असू शकते. त्याचप्रमाणे एखादी महिला प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियन देखभालीसाठी घरात येत असेल तर त्या कुटुंबांना अधिक सुरक्षित वाटेल, बरोबर? त्याचशिवाय यातून लाखो महिलांसाठी विशेषतः देशाच्या ग्रामीण भागातील मुलींसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. जंगल बेल्ससारख्या वन्यजीवन संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था या महिला व व्यवसाय यासाठीचा दुवा होऊ शकतात. जंगलांच्या जवळपास असलेल्या गावांमधील मुलींसाठी कौशल्य विकासाचे कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात व इमारत देखभाल सेवा उद्योगासाठी हा कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणारा एक महत्त्वाचा स्रोत ठरू शकतो. त्याचवेळी हा उद्योग मेहनत करण्याची तयारी आहे (अर्थात हा गुण दुर्मिळ आहे) अशा अनेक तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो, कारण केवळ कुशल कर्मचारीच नव्हे तर बॅक-ऑफिसचे कर्मचारी, विपणन कर्मचारी व डेटा हाताळणारे कर्मचारी यांच्यासाठी कामांच्या प्रचंड संधी निर्माण होणार आहेत. सध्या स्थितीत जेव्हा बहुतेक तरुण त्यांची उमेदीची वर्षे सरकारी परीक्षा देण्यात घालवत आहेत अशा काळामध्ये रोजगाराच्या अशा संधींचा का विचार केला जात नाही ही खरच खंत वाटणारी बाब आहे, याचे कारण एकच आहे यामध्ये अतिशय खडतर परिश्रम घ्यावे लागतात व म्हणूनच सरकारी नोकऱ्यांकरता आरक्षणासाठी आंदोलने केली जातात. पण व्यवसाय सुरू करायच धाडस आपण करू इच्छित नाही. शहरीकरण झपाट्याने वाढत असल्यामुळे भविष्यात इमारत देखभाल सेवा क्षेत्रात अनेक स्टार्टअप सुरू होतील, यामध्ये केवळ एकच समस्या आहे ती म्हणजे हे घरून काम हे ईतर कुणाच्या तरी घरी त्यांचे घर सुरळीतपणे चालावे यासाठी आहे (माझ्या फालतू विनोदासाठी मला माफ करा). तरुण स्थापत्य अभियंत्यांनी त्यांचा तथाकथित अहंकार व प्रतिष्ठेचे खोटे मापदंड बाजूला ठेवून देखभालीचा व्यवसाय निकृष्ट समजणाच्या मानसिकतेतून बाहेर आले पाहिजे. या क्षेत्रामध्ये अलिबाबाच्या गुहेसारख्या अमर्याद संधी आहेत केवळ कुणीतरी ती उघडण्यासाठी सिम सिम हे परवलीचे शब्द म्हटले पाहिजेत.

सरतेशेवटी, रिअल इस्टेटमधील सहकाऱ्यांनो, तुम्हीही याचा विचार करा, कारण कोणत्याही उत्पादनाला त्याचा दर्जामुळे आदर व ओळख मिळते, परंतु उत्पादनाच्या विक्रीनंतरची सेवा हादेखील या दर्जाचाच एक भाग आहे व यातच उत्पादनाचे भवितव्य आहे व तुमची इमारतही या या सेवेच्या नियमाला अपवाद नाही, हे लक्षात ठेवा!

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

ईमेल आयडी -  smd156812@gmail.com 
















Wednesday 14 August 2024

बजेट २४, बाकी सब फर्स्ट क्लास है, कसम से !

 
































बजेट २४, बाकी सब फर्स्ट क्लास है, कसम से !

ज्या लोकांकडे पुरेसे पैसे नसतात केवळ त्यांच्यासाठी अर्थसंकल्प तयार केला जात नाही. तर ज्यांना आपले असलेले पैसे पुरेशे असावे याचा विश्वास द्यायचा आहे, अशा प्रत्येकासाठी असतो.” …  रोसेट मुगीडे वामामबे


रोसेट या दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग, ग्वाटेंग या शहरातील आहेत व आफ्रिकन डेव्हलपेंट बँकेच्या नैतिकता अधिकारी पदावर कार्य करतात. त्या नेतृत्व व उत्पादकता प्रशिक्षक आहेत व तसेच जॉन मॅक्सवेल संघासोबत प्रमाणित डीआयएससी प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. त्या आफ्रिका महिला नेतृत्व परिषदेच्या सहसंस्थापिका आहेत. खरेतर केंद्रीय अर्थसंकल्प ही देशातील दरवर्षी होणारी सर्वात मोठी आर्थिक घटना असते. परंतु त्यात काय मोठेसे असे म्हणत अनेकांच्या कपाळाला आठ्या पडतील, कारण अर्थसंकल्प तर दरवर्षीसादर केला जातो, मग तशी तर दिवाळीही दरवर्षी असते तरीही आपण ती तितक्याच उत्साहाने साजरी करतो, बरोबर? कारण १५० कोटीहून अधिक भारतीयांसाठी केंद्रीय अर्थसंकल्प ही केवळ नुसती आकडेवारी नाही, तर त्यांची अनेक स्वप्ने साध्य करण्याची आशा तो जिवंत ठेवतो. आणि या लोकांच्याआशेवर (म्हणजे सामान्य माणसाच्या) अनेक व्यावसायिक पुरुष व महिलांचे त्यांचे करिअर मोठे करण्याचे स्वप्न अवलंबून असते, म्हणूनच केंद्रीय अर्थसंकल्प दरवर्षी सादर केला जात असला तरीही देशासाठी व भविष्यातील वाटचालीसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. त्यातच या पार्श्वभूमीवर नवीसरकार सत्तेत आले आहे व देशाच्या राजकारणामध्ये अतिशय विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पाची संपूर्ण देश आतूरतेने वाट पाहात होते कारण अर्थसंकल्प देशाच्या भविष्यातील राजाकारणाची दिशाही निश्चित करतो.

माझ्या एका पत्रकार मित्राने एका दिवसापूर्वी मला अर्थसंकल्पावर रिअल इस्टेटच्या अनुषंगाने लेख लिहीण्यास सांगितले, असे भाग्य माझ्या वाट्याला कमी येते कारण मी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देण्यासाठी कुणी अर्थ तज्ज्ञ नाही. परंतु एखादा व्यवसाय केल्यानंतर (तेसुद्धा रिअल इस्टेटसारखा) मी आकडेवारीसंदर्भात थोडाफार तर्कसंगत विचार करू शकतो. म्हणून मी त्याला उत्तर दिले की मी प्रयत्न करेन व सांगेन, जे त्याने मान्य केले. मी नंतर असा विचार केला की अर्थसंकल्पातून मला जे काही समजले आहे व त्याचशिवाय त्यामध्ये आणखी काय असायला हवे होते किंवा अपेक्षा होत्या ते सविस्तर का लिहू नये? कारण याचा वापर इतर कुणीही करू शकते व तुम्ही जोपर्यंत तुम्हाला समजलेले इतरांना सांगत नाही तोपर्यंत तुम्ही  स्वता:मध्ये सुधारणा कशी कराल, बरोबर? पहिला वैधानिक ईशारा म्हणजे कृपया हे वाचताना हा सामान्य व्यावसायिकाचा अर्थसंकल्पाविषयीचा दृष्टिकोन आहे (सामान्य माणसासारखे सामान्य व्यावसायिकही असतात) हे विचारात घेऊन वाचा व दूसरा वैधानिक ईशारा म्हणजे तुम्हाला माझ्या काही सूचना अगदी मूर्खपणाच्या वाटल्या तर तुम्ही त्यावर मनमोकळेपणे हसू शकता!

अर्थसंकल्प व रिअल इस्टेटविषयी बोलायचे झाले तर गृहबांधणी (उद्योग), व त्यातरही एक व्यवस्थित (कायदेशीर) घर ही प्रत्येक माणसाची मूलभूत गरज आहे तसेच हा सर्वात महाग घटक असतो व म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या इच्छांच्या यादीमध्ये त्याचा क्रमांक सर्वात शेवटचा असतो. कारण बहुतेक लोक त्यांच्या संपूर्ण आयुष्यात केवळ एकदाच घर खरेदी करतात (जर ते खरेदी करू शकलेच तर), या पैलूकडे सरकार (म्हणजे अर्थ मंत्रालय) नेहमी दुर्लक्ष करते असे या अर्थसंकल्पाचे तपशील वाचताना मला वाटले. त्याचवेळी, रिअल इस्टेट हा अतिशय स्थानिक उद्योग आहे व अर्थसंकल्पामध्ये हे विचारात घेतले पाहिजे कारण तुम्ही १५० कोटी लोकसंख्या असलेल्या व जवळपास ३३ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या, वैविध्यपूर्ण गरजा तसेच उत्पन्न असलेल्या देशामध्ये गृहबांधणीशी संबंधित धोरणांना एक सामायिक पातळीवर आणूच  शकत नाही.

या देशामध्ये एखादी सदनिका (म्हणजे घर) १०० कोटी रुपयांपासून (मी त्यामध्ये अंबानीच्या अँटिलियाचा समावेश केलेला नाही) ते २०,००० रुपयांपर्यंत पत्र्याची खोली असू शकते, एवढा त्यांचे बांधकाम, दर व ग्राहकांच्या खरेदी करण्याच्या क्षमतेमध्ये फरक असतो. इतर कोणत्याही कोणत्याही ग्राहकोपयोगी वस्तूच्या किमतीची तुलना केली तर एवढी मोठी श्रेणी नसते. यातील सर्वोत्तम भाग म्हणजे त्याची किंमत काहीशे कोटी असो किंवा काही हजार रुपये मात्र त्या घराकडून ग्राहकांना  तेवढ्याच अपेक्षा असतात. घर सुरक्षित असले पाहिजे, कायदेशीर असले पाहिजे व त्यामध्ये राहण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा असल्या पाहिजेत व काहीही चूक घडली तर कायद्यानुसार (रेरा) त्या चुकीसाठी केवळ बांधकाम व्यावसायिकच जबाबदार असतो व तरीही ते सगळ्या जनतेला परवडेल असे असावे लागते. हा परवडणाऱ्या घरांचा मुद्दा अर्थसंकल्पामध्ये शेकडो वेळा नमूद करण्यात आला आहे, परंतु परवडणाऱ्या घराची व्याख्या व त्या व्याख्येची अंमलबजावणी करण्याचा मार्ग या मुद्द्यांना अर्थसंकल्पामध्ये स्पर्शही करण्यात आलेला नाही, ही माझी पहिली प्रतिक्रिया आहे. आपण आता परवडणारी घरे म्हणजे काय याची व्याख्या केली पाहिजे व त्यासाठीचे निकष तसेच या निकषांची पूर्तता करण्यासाठी गृहबांधणीशी संबंधित प्रत्येक घटकाच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या पाहिजेत. याचे कारण म्हणजे एकीकडे सरकारला परवडणारी घरे बांधायची असतात परंतु आपल्या वाट्यामध्ये काहीही कपात करायची नसते (म्हणजे प्रत्येक व सर्व प्रकारचा कर) तसेच साहित्यावरील (जर मजुरीतील करायचे नसले तर) किंवा कच्च्या मालावरील म्हणजेच जमीनीसाठीच्या खर्चातून तर तसे दिसत नाही. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकाला सर्व भार उचलावा लागतो व तरीही घरे परवडणारी ठेवावी लागतात, याविषयी अर्थसंकल्पामध्ये विचार झाला पाहिजे. याच कारणामुळे लाखो लोक बेघर आहेत किंवा घर खरेदी करण्याचा विचारही करू शकत नाहीत.

गृहबांधणी हा एक उद्योग झाला पाहिजे व तो नियंत्रित करणारी एकच संस्था असली पाहिजे व या क्षेत्रासाठी कर आकारणीकरताना केवळ दोन वर्गवाऱ्या असल्या पाहिजेत, एक म्हणजे परवडणारी घरे व ज्यांचे मूल्यांकन कितीही असू शकते (फ्री प्रायसिंग) अशी घरे, असा केवळ विचार करून पाहा.

२०२४ च्या अर्थसंकल्पामध्ये रोजगार, नागरी विकास तसेच पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला ही रिअल इस्टेट उद्योगासाठी चांगली बाब आहे कारण रोजगार निर्मितीमुळे घरांची विक्री होते. तरीही, प्रत्यक्षात मला असे वाटते तुम्ही जोपर्यंत तुमच्या घोषणा धोरणांमध्ये रुपांतरित होत नाही व त्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत रिअल इस्टेटमध्ये काहीही बदलणार नाही. रिअल इस्टेटमध्ये बांधकाम ईमानदारीन करणाऱ्या व्यावसायिकांना तीन बाबतीत मोठा फटका बसतो एक म्हणजे व्यवसाय सुलभता, स्वस्त वित्त पुरवठ्याची उपलब्धता व करप्रणाली विशेषतः जीएसटी व मिळकत कर वैगरे बाबी. दुर्दैवाने जीएसटीच्या मागणीसंदर्भात काहीही करण्यात आलेले नाही जे विचित्र आहे म्हणजे पूर्ण झालेल्या प्रकल्पांवर काहीही जीएसटी आकारला जात नाही ज्यामुळे विकासकांसाठी परवडणारी घरे बांधणे अशक्य झाले आहे. अशा धोरणांमुळे अधिकाधिक लोक तयार सदनिका खरेदी करण्याचा निर्णय घेत आहेत व जमीनीच्या दरांवर सरकारचे काहीही नियंत्रण नसते तसेच सरकार तुम्हाला प्रत्येक चौरस फूट बांधकामासाठी शुल्क आकारते यामुळे प्रकल्प पूर्ण करण्याचा सगळा ताण बांधकाम व्यावसायिकांच्या खिशावरच पडत असतो (बहुतेक प्रकरणांमध्ये). सूचीकरण (म्हणजेच माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही ज्या दराने तुमची मालमत्ता खरेदी केली आहे त्यावर दरवर्षी काही सवलत देणे) वगळणे तसेच अल्पकालीन व दीर्घकालीन कर या दोन्ही श्रेणींवर मिळकत कर आकारल्यामुळे गुंतवणूकदारांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. परंतु नवीन प्रकल्पांमध्ये फेरगुंतवणूक करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे तसेच ज्यांच्याकडे वडिलोपार्जित मालमत्ता आहेत त्यांना मोठा फटका बसला आहे. मिळकत कराच्या नव्या धोरणामुळे आणकी लोक घरामध्ये फेरगुंतवणूक करतील. परंतु कृपया घर खरेदी करण्याकडे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पाहू नका, यामुळे खऱ्या ग्राहकासाठी घरे आणखी महाग होतील, असे सामान्य व्यावासायिक म्हणून मला वाटते. मला माहिती आहे की माझे विधान किंवा तर्कामुळे अनेक बांधकाम व्यावसायिकांना आनंद होणार नाही परंतु कृपया मला माफ करा कारण एखादा चित्रपट प्रेक्षकांनी पाहिल्यामुळेच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो, त्याची तिकीटे काळ्या बाजारात विकली गेल्यामुळे नव्हे, एवढेच मी म्हणू शकेन.

परवडणारी घरे/नागरी विकासासाठी १० लाख कोटींची तरतूद हे चांगले पाऊल आहे, प्रश्न असा आहे की ती खर्च कशी केली जाईल, कारण सरकारकडे परवडणारी घरे बांधण्यासाठीची साधने नाही, तसेच ते सरकारचे कामही नाही. मला असे वाटते की ही रक्कम घरांकरता पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी उपलब्ध करून दिली जावी व त्यानंतर अशा जमीनींवरील घरांच्या विक्री मूल्यावर मर्यादा घालावी किंवा बांधकाम व्यावसायिकांना वित्त पुरवठ्याच्या स्वरूपात हा निधी उपलब्ध करून द्या तसेच तो अशी घरे बांधण्यासाठी वापरला जात असल्याची व केवळ गरजू व्यक्तींनाच दिली जात असल्याची खात्री करा, नाहीतर केवळ कागदावरच मोठी आकडेवारी दिसेल. प्रधानमंत्री आवास योजना ही परवडणाऱ्या घरांसाठीची योजना पुनरुज्जीवित करण्यात आली आहे व हे मध्यमवर्गीय व कनिष्ट मध्यमवर्गीय यासारख्या प्रकारच्या घरांसाठी चांगली गोष्ट आहे. पायाभूत सुविधांसाठी भरभक्कम तरतूद करणे सर्वात महत्त्वाचे आहे कारण रिअल इस्टेटसाठी कच्चा माल म्हणजे विकसित जमीन जी रस्ते, वीज व पाणी यासारख्या मूलभूत सोयीसुविधांनी सज्ज असेल. समस्या अशी आहे की आजपर्यंत ही तरतूद फक्त कागदावरच आहे व प्रत्यक्षात बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम स्थळी अपुऱ्या पायाभूत सुविधांच्या समस्येला तोंड द्यावे लागते. याचे अगदी अलिकडचे उदाहरण पाहू, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील पाण्याचा वाद पाहता, एकीकडे सरकार घरांच्या बांधकामाना चालना देत आहे, तर दुसरीकडे नवीन प्रकल्पांना पाणी पुरवठा करण्यासारख्या मूलभूत गोष्टींची जबाबदारी घ्यायला नकार देत आहे. त्यानंतर घरातील महिलेच्या नावावर घर खरेदी केल्यास अधिक आर्थिक सवलती दिल्या जातील अशाही तरतूदी आहेत, परंतु अशा घोषणा निवडणुका जिंकण्यासाठी चांगल्या असतात. माझ्या मते सरकारला जर गृहबांधणी क्षेत्राला जर खरोखरच मदत करायची असेल तर या क्षेत्राला जाचणाऱ्या सर्व गोष्टी दूर केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ महागड्या व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क कमी करण्याची फक्त सूचना देण्याऐवजी तसे स्पष्ट आदेश द्या. किंबहुना विचार करा की एका व्यवहारावर जवळपास ७% मुद्रांक शुल्क आकारले जाते व काही वेळा हा आकडा आम्ही त्या प्रकल्पासाठी जो आयकर भरतो त्यापेक्षाही जास्त असतो. अशी धोरणे (यंत्रणा, कर आकारणी, तरतूदी, तुम्ही त्यास काहीही म्हणा) तयार करा ज्यामुळे आणखी लोक कायदेशीर व योग्य घरे बांधतील, जेणेकरून सगळ्या ग्राहकांना आयुष्यभर धास्ती न बाळगता सहजपणे ही घरे खरेदी करता येतील. यामुळे जनतेला खऱ्या अर्थाने फायदा होईल व सरकारलाही मोठा महसूल मिळेल, असा माझा साधा तर्क आहे.

आणखी एक शेवटचा मुद्दा, सध्या घरांसाठी केवळ माणसा-माणसांमध्येच नव्हे तर इतर सर्व प्रजातींमध्येही लढाई सुरू आहे (म्हणजे वन्यजीवन), म्हणूनच कृपया वन्य प्राण्यांसाठीच्या घराचाही विचार करा व त्यासाठी तरतूदी करा कारण तुम्ही माणसांच्या घरासाठी तरतूदी केल्या नाही तरी आपण स्वतः काही बांधण्यासाठी सक्षम आहोत व जगू शकू. परंतु एखादा वाघ किंवा हत्ती आपणहून घराच्या बाबतीत काही करू शकत नाही जर आपण त्यासाठी तरतुदी केल्या नाहीत, हे लक्षात ठेवा. सरतेशेवटी मी एवढेच म्हणेन, की माननीय अर्थ मंत्री गृहबांधणी क्षेत्राशी संबंधित अर्थसंकल्पाचे यश तुम्ही ज्या काही तरतुदी केल्या आहेत त्याच्या अंमलबजावणीवर अवलंबून आहे, कारण सरतेशेवटी सामान्य माणसासाठी सरकारची काय इच्छा आहे यापेक्षाही, सरकार काय करून दाखवते हे अधिक महत्त्वाचे असते, बाकी सारे आलबेल आहे, एवढे सांगून निरोप घेतो!!

 

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

ईमेल आयडी -  smd156812@gmail.com