Friday 9 August 2024

ऑलिम्पिक मधील 100 ग्रॅमचा धडा !

  

















ऑलिम्पिक मधील 100 ग्रॅमचा धडा !

मित्रहो, आत्तापर्यंत संपूर्ण देशाला १०० ग्रॅमची गोष्ट माहिती झाली असेल ज्यांना माहिती नाही त्यांना हा विषय माझ्या लेख वाचल्यानंतर समजेल या मधून. विनेश फोगाट किंवा तिच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांवर किंवा आपल्या सरकारवर टीका करणे हा हेतू नाही खरेतर कोणालाही दोष व सहानभूती दर्शविण्यासाठी पण नाही तर हा लेख माझ्यासाठी व माझ्या ऑफिस मधील टीमसाठी आहे, की अशा घटनांमधून आपण काय शिकू शकतो. खरेतर मी हा लेख माझ्या स्टाफ पुरताच मर्यादित ठेवणार होतो, परंतु नंतर विचार केला की ज्यांना यातून काही शिकायचे आहे ते शिकू शकतात किंवा मी यातून जो धडा घेतला आहे त्यातून त्यांच्यामध्ये आणखी काही सुधारणा होऊ शकते किंवा अनेकजण व्हॉटसअपवाला आणखी एक लेख म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतील, माझी त्याला काहीही हरकत नाही. कारण आपण जे काही वाचतो त्या शब्दातून आपण काही शिकलो तरच त्या शब्दांना धडा असे म्हणता येईल, नाहीतर ती फक्त आणखी एक गोष्ट ठरते, तर असो ! आपली कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्यासोबत पॅरिस ऑलिम्पिक २४ मध्ये जे काही झाले ते समजून घेतल्यानंतर मी माझ्या कंपनी मधील टीम करीता काहीतरी लिहीले आहे ते येथे देत आहे ….

“कोणतेही यश किंवा अपयश कधीच अपघाताने मिळत नाही, तर तो तुम्ही करत असलेल्या कुठल्याही कामाबद्दलच्या तुमच्या दृष्टिकोनाचा परिणाम असतो”...

प्रिय टीम संजीवनी!

तुम्हाला जर अजूनही माहिती नसेल, तर आपली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिने पॅरिस ऑलिम्पिक २४ मध्ये अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान पटकावला व रौप्य पदक निश्चित केले, तिला सुवर्णही मिळाले असते. परंतु ती ज्या वजन गटामध्ये खेळत होती त्यापेक्षा तिचे वजन जास्त असल्यामुळे तिला स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आले. तुम्हाला माहितीय, तिचे वजन किती जास्त होते, केवळ १०० ग्रॅम म्हणजे ०.१० किग्रॅ, सोन्याच्या वजनानुसार बोलायचे झाले तर १० तोळे; अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर आपल्या देशामध्ये महिला ज्या वजनाचा गळ्यातला हार किंवा बांगड्या घालतात तेवढे पण नाही !! याचाच अर्थ असा झाला की ती केवळ अंतिम सामन्यात खेळू शकणार नाही तर तिला स्पर्धेतूनच अपात्र ठरवण्यात आले व खेळाडू म्हणून तिच्यासाठी ही खरोखरच अतिशय वेदनादायक घटना आहे, त्याचप्रमाणे आपल्या देशासाठी अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. या अपात्रतेचे खरे कारण काही असो पण त्यातून आपला सर्वोच्च क्रीडा स्पर्धांमधील अपरिपक्व (म्हणजेच बेफिकिरीचा) दृष्टिकोन दिसून येतो. अशा गोष्टी कुणी जाणीवपूर्वक करत नाही हे मी मान्य करतो तरीही त्या जास्तीच्या १०० ग्रॅमची फोगाट व आपल्या देशाला किती किंमत मोजावी लागली ते पाहा!

तर प्रिय टीम आता तुम्हाला समजेल की मी कामामध्ये लहान-सहान गोष्टींवर का जोर देतो किंवा त्याकरता का त्रागा करतो, उदाहरणार्थ तुम्ही माझी स्वाक्षरी घेण्यासाठी आणलेल्या दस्तऐवजावर तारीख किंवा पान क्रमांक घालणे किंवा एखाद्या देयकाच्या किंवा ताबा देण्यासाठीच्या तपास यादीच्या सर्व चौकटी भरल्या नाहीत म्हणून तुम्हाला रागवतो किंवा एखाद्या ईमेलला वेळेत उत्तर देण्यास किंवा ग्रूपवर कामाविषयी ताजी माहिती देण्यास विसरलात म्हणून चिडतो, कारण अशा लहान गोष्टींमुळेच मोठा फरक पडतो. यामुळे केवळ तुम्हालाच नाही तर संपूर्ण कंपनीला मोठी किंमत मोजावी लागते. तुम्ही कदाचित असा विचार करत असाल की तुमचे साहेब फोगाटचे पदक हुकले याचा संबंध आपल्या कामाशी जोडून असंबद्ध वा अतार्किक विचार करत आहेत, परंतु तुम्ही जो विचार करताय किंवा तुम्हाला जे वाटतेय तसे नाहीये. कारण अगदी लहान चुकीने सुद्धा फरक पडतोच त्याहीपेक्षा तुम्ही स्वतःला किती अचूकपणे प्रशिक्षित करता व वास्तविक आयुष्यात त्याचा कसा अवलंब करता हे एक व्यक्ती म्हणून तुमच्यासाठी व एक संघ म्हणून तुमच्या कंपनीसाठी महत्त्वाचे असते व महत्त्वाचे राहील, कोठेही काम केले तरी !

तुम्हाला पगारवाढ देताना मी हेच पाहीन (आणि तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये काम केले तरीही माझ्यासारखा कुणीही वरिष्ठ हेच करेल) कारण तुमच्या कामाविषयीचा दृष्टिकोनच तुम्ही व्यक्ती म्हणून काय आहात हे ठरवतो व तुम्ही जोपर्यंत प्रत्येक लहान गोष्ट गांभिर्याने घेत नाही व त्याकडे लक्ष देत नाही व ती अचूकपणे करण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुम्हाला किंवा तुमच्या संघाला यश मिळणार नाही आणि यश मिळाले तरी तो एकअपघात असेल, हे जीवनाचे वास्तव समजून घ्या. 

याच ऑलिम्पिकमध्ये आणखी एक अशीच घटना पुरुषांच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत घडली, ही स्पर्धा सर्व मैदानी खेळांमध्ये सर्वोच्च मानली जाते. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुवर्ण पदक विजेत्या व रौप्य पदक विजेत्या धावपटूंमध्ये सेकंदाच्या १/१००० भाग इतका अत्यल्प फरक होता व रौप्य पदक विजेत्या धावपटूचे पाऊल पहिले अंतिम रेषेपलिकडे पडले होते तरीही स्पर्धेच्या नियमानुसार तुमच्या शरीराचा वरच्या भागाने आधी अंतिम रेषा ओलांडली पाहिजे, त्यामुळे ज्या धावपटूच्या छातीचा अंतिम रेषेला आधी स्पर्श झाला त्याला सुवर्ण पदक देण्यात आले, मला असे वाटते जे लोक फोगाटच्या 100 ग्रामच्या जादा वजन वाढीच्या नियमांबाबत ओरड करत आहेत त्यांच्यासाठी ही 100 मिटर स्पर्धेची घटना डोळे उघडणारी असेल! ऑलिम्पिकमधील फोगाटचा प्रवास अतिशय दुःखद प्रकारे संपल्याबद्दल समाजाच्या सर्व थरातून (अगदी राजकारणीही) आरडा-ओरडा केला जात आहे व नेहमीप्रमाणे आरोप-प्रत्यारोपही केले जातील. परंतु यातील कशामुळेही झालेले नुकसान भरून निघणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. 

आता थोडासा हलका-फुलका भाग, सोने ही सर्वात मौल्यवान वस्तू आहे व सध्या बाजारात सोन्याचा दर प्रत्येक दहा ग्रॅमसाठी (एक तोळा) ७२,००० रुपये आहे, म्हणजे १०० ग्रॅमचा दर ७,२०,००० रुपये असेल. विनेश अंतिम सामन्यात पराभूत झाली असती व तिला रौप्य पदक मिळाले असते तरीही तिला हरियाणा सरकारकडून पारितोषिकाचे ३ कोटी रुपये मिळाले असते. तिला व तिच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांना रोख व अशा प्रकारची संभाव्य सर्व पारितोषिके मिळून १५ कोटी रुपये मिळाले असते (हा माझा अंदाज आहे). याचाच अर्थ विनेशच्या १०० ग्रॅम वजनाची किंमत १५ कोटी रुपये होती म्हणजेच प्रत्येक १० ग्रॅमला जो (एक तोळा) १.५ कोटी रुपये होती, म्हणजे सोन्यापेक्षा दोनशे पट जास्त महाग. त्याचशिवाय पदकामुळे प्रतिष्ठा व सन्मान मिळाला असता, त्याचे मोल कोठल्याही ही पैशामध्ये करता येणार नाही, तो वेगळाच तोटा झाला !

म्हणूनच, प्रिय टीम संजीवनी, हे जग केवळ जगाच्या नियमांनुसारच चालते हे लक्षात ठेवा व तुमच्या प्रामाणिक हेतूमुळे सुद्धा या नियमांमध्ये अपवाद केला जाणार नाही, तर तुम्ही काय कृती करता यावरूनच  तुमचे भवितव्य ठरेल; विनेश फोगाट हा धडा अतिशय मोठी किंमत देऊन शिकली, मात्र तुम्हाला हे ज्ञान शिकण्यासाठी एवढी मोठी किंमत चुकवावी लागू नये अशी आशा करतो!


विनेश फोगाट, तुला भविष्यासाठी अनेक शुभेच्छा...


संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

ईमेल आयडी -  smd156812@gmail.com



No comments:

Post a Comment