वाघ,पर्यटक,वनविभाग आणि न्यायसंस्था 🐾
“बंदिस्त वर्गात बसून व तुमचे लॅपटॉप उघडून तुम्हाला जंगल समजत नाही, ती अशी एक शाळा आहे जिथे केवळ हजर राहूनही तुम्हाला खुप काही शिकता येते” … मी.
उमरेड कऱ्हांडला;
माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश महोदय,
तीन दिवसांपूर्वी माझ्या एका व्हॉट्सअपग्रुपवर एक व्हीडिओ क्लिप आली त्यामध्ये एका ग्रूपने "ताडोबा जंगलामध्ये एक वाघ त्याच्या पाच बछड्यांसोबत दिसल्याचे दुर्मिळ दृश्य" असे नमूद केले होते. मी ते जंगल पाहिले व ताडोबातील ताज्या घडामोडी थोड्याफार माहिती असल्यामुळे हे ताडोबा नसून टिपेश्वर किंवा उमरेड कऱ्हांडला अभयारण्य असावे असे सांगितले. त्यानंतर अनेक लोकांनी तसेच विविध टॅग केलेल्या ग्रूपकडून ती क्लिप मला पाठवण्यात आली व समाजमाध्यमांवर ती अनेकजणांनी पाहिली. गम्मत म्हणजे, या क्लिपवरून नंतर भरपूर गदारोळ झाला ज्यामुळे संबंधित गाईड, चालक तसेच अगदी पर्यटकांवरही कारवाई करण्यात आली. आज तर हद्द झाली, मी एक बातमी वाचली ज्यामध्ये उच्च न्यायालयाने आपणहून या घटनेची दखल घेत राज्याच्या मुख्य वन संरक्षकांना यात लक्ष घालण्यास व घटनेविषयी एक अहवाल देण्यास सांगितले आहे,असे कळते !
माननीय न्यायाधीश महोदय, मी पूर्णपणे आदर राखत असे सांगतो की मी चुकीच्या वन्य पर्यटनाला पाठिंबा देत नाही. परंतु कृपया वाघाचा रस्ता अडवण्याविषयी किंवा संपूर्ण वन्य पर्यटनाविषयी केवळ एका ध्वनीचित्रफितीवरून निष्कर्ष काढू नका अशी माझी विनंती आहे. वन्य पर्यटनाविषयीचे मत समाज माध्यमांवरील काही अहवाल, छायाचित्रे, ध्वनीचित्रफिती यावरून तयार करता येत नाही. त्यासाठी तुम्हाला विविध जंगलांमध्ये बरेच फिरावे लागते, तेथल वस्तुस्थिती व अडचणी, रहिवासी , प्राणी,वनस्पतिविषयी समजून घ्यावे लागते व त्यानंतरच तुम्ही निर्णय घ्या, एवढीच माझी विनंती आहे. वस्तुस्थिती तर अशी आहे की हे सगळे प्रकार माननीय सर्वोच्च न्यायालयाच्याच एका (न्यायालयाविषयी आदर राखत हे मत व्यक्त करत आहे) निकालामुळे सुरू झाले! या निर्णयामुळे अभयारण्य किंवा व्याघ्र प्रकल्पांचे वन्य पर्यटन क्षेत्र ८०% नी कमी झाले व केवळ २०% क्षेत्र पर्यटनासाठी खुले ठेवण्यात आले, त्यात भर म्हणजे आपल्या सरकारच्या पर्यटन विभागाचे पर्यटनाचे मार्केटिंगहे विपणनही व्याघ्र केंद्रित असते (एमटीडीसीच्या ताडोबाविषयीच्या जाहिराती पाहा). परिणामी, जंगलांना भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाघच पाहायचा असतो व तुमच्या स्वतःच्या निर्णयामुळे सर्व पर्यटकांची जंगलाच्या मर्यादित भागामध्ये गर्दी झाली आहे, त्यामुळे याविषयी विचार करा. याचा अर्थ सगळे काही बरोबर व अचूक आहे असा होत नाही कारण आपण वन्य पर्यटनाच्या बाबतीत अनेक आघाड्यांवर सुधारणा करू शकतो, जसे की वनविभागाला आवश्यक त्या पायाभूत सुविधा तसेच संबंधित व्यक्तींना योग्य प्रशिक्षण व इतरही अनेक गोष्टी करु शकतो. याविषयी माझे तपशीलवार मत लिहीनच, मात्र तुम्हाला वन्यजीवनाविषयी खरोखरच काळजी असेल तर एक अति महत्त्वाची व्यक्ती म्हणून नव्हे तर एक सामान्य पर्यटक म्हणून जंगलाला भेट द्या व त्यानंतर निर्णय कुठलेही घ्या कारण जंगलाचे भविष्य आता तुमच्याच हातात आहे, (अजूनही बऱ्याच गोष्टी व्हायच्या आहेत) ...! धन्यवाघ !!🙏🏻
मी वॉट्सॲप ग्रूपपैकी काहींवर वरील संदेश पोस्ट केला, जी मी जेव्हा आजचे वर्तमानपत्र उघडले (०७-०१-२५) व वरील घटनेविषयी बातमी वाचली, तेव्हा माझी तात्काळ प्रतिक्रिया होती (म्हणजेच प्रस्टेशन होती).
जे लोक अजूनही अशा गोष्टींविषयी अनभिज्ञ आहेत अशा सुखी जीवांसाठी म्हणून सांगतो, की आपल्या राज्यात विदर्भातील उमरेड कऱ्हांडला अभयारण्यामध्ये पाच बछडे असलेल्या एका वाघीणीचा मार्ग सफारीसाठी वापरल्या जाणाऱ्या जिप्सींनी अडवला (?.) , असा आरोप असलेल्या या घटनेची दृश्ये/ध्वनीचित्रफित समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. बहुतेक लोकांना हे ठिकाण उमरेड कऱ्हांडला अभयारण्य आहे हे माहितीही नव्हते किंवा त्याचाशी काही घेणेदेणे नव्हत !कारण तो संदेश ताडोबाच्या नावानी फिरत होता. याचे कारण म्हणजे #ताडोबा हे #उमरेड कऱ्हांडलापेक्षा जास्त जण पाहतात, जेथे ही घटना घडली, फक्त #tadoba टाका पोस्ट करा, ती लगेच ट्रेंड होते. ध्वनीचित्रफित व्हायरल होण्याचा मुद्दा नाही तर त्याला मिळणाऱ्या लाइकचा मुद्दा आहे ज्या केवळ समाज माध्यमांकडूनच (नेटकऱ्यांकडून) नव्हे तर सगळ्या यंत्रणेकडून दिली जाते. नेहमीप्रमाणे त्याचा फटका निर्दोष लोकांना बसला, मी असे म्हणणार नाही की ते अगदी बरोबरच होते पण हे लोक नक्कीच एकमेव दोषी नव्हते, हा माझ्या लेखाचा विषय आहे (म्हणजे उद्विग्नतेचा). त्याचवेळी माननीय उच्च न्यायालयाच्या कुणा न्यायाधीशांनी आपणहून दखल घेतली आणि याची याचिका दखल करून घेतली . व त्यावरून त्यांनी वन संरक्षकांना या प्रकरणाची चौकशी करून, दोन दिवसात स्पष्टीकरण देण्यास सांगितले (बातमीनुसार).
आता न्यायालयाविषयी पूर्णपणे आदर राखून असे विचारावेसे वाटते की दोन दिवसात न्यायालयाला काय स्पष्टीकरण अपेक्षित आहे, की वन्यजीव पर्यटन चुकीचे आहे व वाघीणीचा तिच्या बछड्यांसोबत मार्ग अडवण्यात आला किंवा त्यांचा छळ झाला व आणखी काही? केवळ एक ध्वनीचित्रफित व्हायरल काय होते, तुम्ही अख्ख्या वन्यजीव संरक्षण यंत्रणेला धारेवर धरता, यामुळे वनविभाग व एकूण वन्य संवर्धनाच्या आघाडीवर सगळीकडे सावळा गोंधळ आहे.असा संदेश समाजात जातो ! हा आपल्या संपूर्ण यंत्रणेचा दृष्टिकोनच (माध्यमांचाही) यासाठी जबाबदार आहे किंवा वन्य संवर्धनातील अडथळा आहे असा माझा आरोप आहे जो मी माझी विवेकबुद्धी जागृत ठेवून करतोय! आणि थोडेफार जंगलामध्ये मी सुद्धा फिरलो आहे, त्या क्लिप मध्ये ती वाघीण चिडली आहे किंवा बावचळून गेलीय असे काहीही दिसत नाही! जंगलातील अरुंद रस्त्यांवर कॅमेराचा कोन आणि वाघिणीचा चालण्याचा स्पिड, गाड्यांचे अंतर, अशा अनेक गोष्टी ठरवितात की खरच प्राण्यांना त्रास झाला का नाही! हे सगळे तपासुन मगच मत व्यक्त करावे ही अपेक्षा!
जेव्हा संपूर्ण जगात वाघांची संख्या कमी होत होती व ही प्रजाती केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगातच नामशेष होण्याच्या मार्गावर होती तेव्हा आपल्याच वनविभागामुळे व वन्य पर्यटनामुळे वाघांची संख्या वाढणे शक्य झाले. ताडोबाच्या जंगलांभोवती असलेल्या गावांमध्ये, जेथे वाघांच्या संख्येची घनता (प्रति चौरस किलोमीटर वाघांची संख्या) सर्वाधिक आहे, जी जागतिक सरासरीपेक्षा कितीतरी पट जास्त आहे, तिथे माननीय न्यायलयाने विचार केला आहे का की तेथे तिथे राहणारे लोक वाघांचा तिरस्कार न करता स्वतःच्या तसेच त्यांच्या गुराढोरांच्या जिवावर उदार होऊन वाघांचे रक्षण करतात, हे केवळ योग्य वन्य पर्यटनामुळे शक्य होते. त्यांना माहिती आहे की वाघ वाचले तरच त्यांना पैसे मिळतील व त्यांचे आयुष्य सुधारेल. यात त्यांचा काय दोष आहे, कारण गावातील संपूर्ण कुटुंबच वाघावर अवलंबून आहे,घरातील मुलगा जवळपासच्या रिसॉर्टमध्ये काम करतो, आई एखाद्या ढाब्यावर किंवा हॉटेलात स्वयंपाकाचे काम करते, कुटुंबातील पुरुष एकतर गाईड आहेत किंवा वन-मजूर आहेत किंवा जिप्सीचे चालक किंवा एखाद्या रिसॉर्टमध्ये मदतनीस आहेत. एखाद्या कुटुंबाचे प्रवेशद्वारापाशी किंवा गावातील रस्त्यावर छोटेसे सुव्हेनिअर वस्तूंचे विक्रीचे दुकान आहे. व्याघ्र प्रकल्पांच्या भोवती राहणाऱ्या अशा हजारो लोकांची उपजीविका फक्त वाघांना पाहायला येणाऱ्या पर्यटकांमुळे चालते. माननीय न्यायालयाला मला असे सांगावेसे वाटते की, मला त्या संगळ्यांचे चूक वाटत नाही काही कारण जेव्हा तुम्ही हजारो रुपये वाघ पाहण्यासाठी खर्च करता तेव्हा त्याच पैशांवर वाघही जगत असतो ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही आता ही वस्तुस्थिती समजून घेण्याची वेळ झाली आहे कारण तुम्ही वन्य पर्यटनाचे हे गणित समजून घेतले व त्याचा आदर केला तरच समाज यंत्रणाही ते समजून घेईल व त्याचा आदर करेल, वाघांचे संरक्षण करण्याचा हा एकमेव मार्ग आहे, हे सांगणे हाच माझ्या लेखाचा उद्देश आहे.
मात्र वाघाचा किंवा कोणत्याही वन्य प्राण्याचा मार्ग अडवणे व त्याला त्रास होईल असे वर्तन योग्य नाही, पण मुळात हे का होत आहे यामागची कारणे व त्यावर मार्ग शोधणे आवश्यक आहे.न्यायाधीश महोदय, पुण्यासारख्या शहरातही जेथे तथाकथित सुशिक्षित व सुजाण लोक राहतात, पण साधे वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नाहीत व हेच लोक पर्यटक असतात जे वाघ पाहण्यासाठी उमरेड कऱ्हांडला किंवा ताडोबा किंवा मेळघाटात जातात. तुम्हाला काय वाटते त्या जिप्सीतील चालकांना व गाईडना ते कशासाठी आग्रह करत असतील तर नियम मोडा व त्यांना वाघ दाखवा यासाठी, हीच समस्या आहे. जंगलातील लोकांवर निर्बंध घालण्याऐवजी किंवा त्यांना शिक्षा करण्याऐवजी हे लोक जंगलांना का भेट देत आहेत व त्यांना जंगलात काय करू नये व त्यांनी जंगलातील लोकांना नियमभंग करण्यासाठी भरीस पाडले तर त्यांनाच कसा त्रास होई याची या पर्यटकांना जाणीव करून द्या. वन्य पर्यटनाची हीच खरी योग्य पद्धत आहे, व तुमच्याकडून हेच अपेक्षित आहे. त्याचवेळी एकट्या पुणे शहरात काही हजार वाहतूक पोलीस आहेत , ते वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या लोकांना आवरू शकत नाहीत अशावेळी केवळ काहीशे कर्मचारी असलेला वनविभाग हजारो चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या जंगलांचे व त्यातील लोकांचे कसे व्यवस्थापन करेल. म्हणूनच मायबाप सरकारला वन विभागामध्ये योग्य पायाभूत सुविधांसाठी निधी द्यायला सांगा, हा पण माझ्या लेखाचा विषय आहे.
जंगलाशी संबंधित व त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांनीही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही जर पर्यटकांच्या हव्यासाला किंवा दबावाला बळी पडलात तर तुमचेच भवितव्य धोक्यात येईल. कल्पना करा, तुम्ही शहरामध्ये एक ओला/उबर टॅक्सी चालकाला आहात व तुमचा ग्राहक कितीही घाईत असला तरीही, त्याच्या किंवा तिच्या दबावामुळे तुमचा जीव धोक्यात घालून तुम्ही रेल्वेचे फाटक किंवा लाल सिग्नल ओलांडून जाल का? याचे उत्तर नाही असे आहे, तर मग तुम्ही लोक जंगलामध्ये अशा गोष्टी का करता, हा प्रश्न मी तुम्हा सर्वांना विचारेन. त्याचप्रमाणे, तुम्ही जेव्हा सफारीमध्ये असता तेव्हा तुम्ही हे का करताय याची अगदी स्पष्ट कल्पना असू द्या, पैसे मिळवण्यासाठी हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु ते पैसे वन्य पर्यटनावरच निर्बंध आले तर नाहीसे होतील, बरोबर? किंबहुना सफारीमध्ये सेलफोनवर कमी बोला, पर्यटकांना वाघ व सर्व वन्य जीवन नैसर्गिकपणे जसे दिसेल तसे पाहू द्या. त्यातच खरी मजा आहे, वन्यजीवनाचा हा पैलू त्यांना समजून सांगा. माननीय न्यायालयाने, अशा गोष्टी घडण्यासाठी वन विभाग जंगलाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य प्रशिक्षण देत असल्याची खात्री करेल हे पाहावे. वन विभागामध्ये अनेक चांगले अधिकारी आहेत ज्यांनी त्यांचे आयुष्य, त्यांचा कौटुंबिक वेळ वन संवर्धनासाठी खर्ची घातला आहे. आपल्या यंत्रणेच्या अशा दृष्टिकोनामुळे त्या सर्वांचे खच्चीकरण होईल व वन्यजीवनाचा तो अतिशय मोठा तोटा असेल, हाच माझ्या लेखाचा विषय आहे असे मला पूर्णपणे आदर राखून म्हणावेसे वाटते.
कृपया वन्यजीवन समजून घ्या, एक सामान्य माणूस म्हणून जंगलांना भेट द्या, तिथल्या लोकांना भेटा व त्यांच्या समस्या समजून घ्या व त्यानंतर इथल्या वन्यजीवनाविषयी व पर्यटनाविषयी निर्णय द्या. आणि हो, जंगलाबाहेरील रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांमध्ये हजारो वन्यप्राणी मरण पावतात त्यासाठी काहीतरी करा, त्यासंदर्भात कुणीच काहीच करत नाही. किंबहुना मी म्हटल्याप्रमाणे देशातील सर्व जंगले योग्य पायाभूत सुविधा देऊन खुली करा व सगळ्यांना खऱ्या जंगलांचा आनंद घेऊ दे, आपल्या देशाला जो निसर्गाचा समृद्ध ठेवा लाभलेला आहे जो जपून ठेवण्याचा हा एकमेव मार्ग आहे व फार उशीर होण्याआधी न्यायपालिकेनेच हे करण्याची वेळ आता आली आहे. अन्यथा केवळ वाघच नाही तर अनेक सुंदर प्रजाती केवळ समाज माध्यमांवर, केवळ आभासी जगातच उरतील, असा इशारा देऊन निरोप घेतो!..🐾🐾
संजय देशपांडे
Sanjeevani developers
www.sanjeevanideve.com
www.junglebelles.com
No comments:
Post a Comment