मित्रांनो,
आम्ही अलिकडेच “वनजा” नावाचा एक उपक्रम सुरु केला. बानुबाई नानावटी आर्किटेक्चर कॉलेज म्हणजेच बीएनसीए या नावाने प्रसिद्ध असलेल्या मुलींच्या वास्तुविद्या महाविद्यालयात या निसर्ग मंडळाची (नेचर क्लब) स्थापना करण्यात आली. या मंडळाच्या उपक्रमांमध्ये महिन्यातून एकदा जंगलाविषयी तज्ञांचे व्याख्यान व वन्यजीवनाविषयी एखाद्या ध्वनीचित्रफितीचे सादरीकरण, तसेच पुण्याच्या आसपासच्या भागांमध्ये जैवविविधता असलेल्या विविध भागांना भेट यांचा समावेश असेल. वर्षातून एकदा कान्हा किंवा ताडोबासारख्या राष्ट्रीय अभयारण्यांची सहल आयोजित केली जाईल, ज्यामध्ये विद्यार्थिनींना प्रत्यक्ष जंगलात राहण्याचा अनुभव मिळेल. शिक्षण घेत असतानाच निसर्गाच्या संवर्धनाचे महत्व या मुलींच्या मनात रुजविण्याच्या विचाराने हा उपक्रम सुरु करण्यात आला. ज्यामुळे त्या व्यवसायिक पातळीवर काम करु लागल्यावर त्यांची प्रत्येक निर्मिती पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून होईल! प्राचार्य श्री. अनुराग कश्यप व प्राध्यापिका अस्मिता दिवेकर यांनी वनजाच्या निर्मितीमध्ये पुढाकार घेतला, नेचर वॉकचे अनुज खरे व रासा फाउंडेशनचे अश्विनी व योगेश हे त्यांना मदत करत आहेत.
अशी कोणतीही संकल्पना आधी विद्यार्थ्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे, ज्यामुळे
त्यांना या उपक्रमाचे महत्व समजेल व म्हणूनच मी त्याविषयीचे माझे विचार लिहीले व तेच
येथे मांडले आहेत व तेच तुमच्याशी
पण शेअर करतोय कारण वनजा ही कल्पना त्या प्रत्येकासाठी आहे जो शहरात राहुन निसर्ग संवर्धनाची
आपली जबाबदारी ओळखुन आहे !
निसर्गामध्ये खोलवर पाहा, त्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्ट अधिक चांगल्याप्रकारे
समजेल … अल्बर्ट
आईनस्टाईन
बीएनसीएच्या मुलींनो, काही दिवसांपूर्वी आपले प्रिय प्राचार्य कश्यप सर मला म्हणाले
की सगळे महान वास्तुविशारद थोर विचारवंतही
होते, कारण मी कधीही नगर नियोजन किंवा रचनेबाबत काही अवतरण शोधतो तेव्हा मला या वास्तुविद्येतील
महान लोकांची नावे दिसतात. या क्षेत्रात
इतर जाणकार नाहीत किंवा त्यांनी काही भरीव काम केलेले नाही असे म्हणता येणार नाही,
मात्र एखादी व्यक्ती खरोखर महान होण्यासाठी तिचा वैचारिक पैलू असावा लागतो. स्वतः अभियंता
असूनही मला वास्तुविद्येचा माझ्या स्वतःच्या क्षेत्रापेक्षाही अधिक अभिमान वाटतो, कारण पहिले वास्तुविशारद
कोणत्याही रचनेचा विचार करतो व नंतर ती कागदावर उतरते व आम्ही ती प्रत्यक्षात आणतो. कोणत्याही
ऑटोकॅड सॉफेटवेअर किंवा चित्रकलेच्या कागदापेक्षा, मनाचा फलक महत्वाचा असतो त्यावरच
सर्वप्रथम कोणतेही चित्र साकार होते. त्यासाठी
आपल्याला मनाचा चित्रफलक किती व्यापक आहे हे समजून घ्यायला हवे व हे आपोआप होत नाही.
तुम्ही वास्तुविद्येच्या अभ्यासक्रमामध्ये रेखा चितारण्यास शिकाल, मात्र या रेखांची काय ताकद आहे हे तुम्ही स्वतः समजून घेणे आवश्यक
आहे! हे समजून घेण्याची प्रक्रिया म्हणजेच स्वतःचा आत्मा
शोधणे व या शोधात निसर्गाहून अधिक चांगला शिक्षक कोण असू शकतो! आता या निसर्गरुपी
शिक्षकाला कसे भेटायचे? ते अगदी
सोपे आहे, रोजच्या एखाद्या दिवशी सुद्धा निसर्ग आपल्या अनेक स्वरुपांमध्ये भेटतो, मग तो आपल्या
खिडकीतून दिसणारा आकाशाचा तुकडा असेल, उगवता सूर्य असेल, वा-याची झुळूक असेल, क्षितीजावरील
लख्ख चंद्र असेल, ओढ्यातून खळाळणारे पाणी असेल, चिमणीचा चिवचिवाट असेल, झाडाची नवीन
पालवी असेल, तुमच्या बाल्कनीतल्या कुंडीतील रोपांवर
उमललेली फुले असतील, अशा अनेक बाबी आहेत! आपल्या आजूबाजूला
निसर्गाचे हजारो चमत्कार घडत असतात मात्र कितीवेळा आपण त्याकडे लक्ष देतो? आपले प्राध्यापक आपल्याला व्याख्यान देत असताना
आपण बहुधा त्याकडे दुर्लक्ष करतो व व्याख्यान संपते तेव्हा आपल्या ज्ञानात काहीच भर
पडलेली नसते. त्याचप्रकारे
निसर्गामध्ये वर नमूद केलेल्या घटना घडून जातात मात्र आपण त्यातून काहीच शिकत नाही,
कारण या आघाडीवर आपण आपल्या मनाचा दरवाजा बंद केलेला असतो. अलिकडे तुम्ही
अनेकदा निसर्गाचे संवर्धन ही संज्ञा ऐकली असेल तसेच कोणत्याही नवीन इमारतीचा आराखडा
तयार करताना निसर्गाने प्रेरित रचना ही संज्ञाही तुम्ही ऐकली असेल! ही संज्ञा
समजून घेण्यासाठी निसर्ग काय आहे हे तुम्ही सर्वप्रथम समजून घ्यायला पाहिजे, तुम्हाला
कशाचे संवर्धन करायचे आहे हे समजून घेतल्याशिवाय तुमच्या रचनांद्वारे तुम्हाला त्याचे
संवर्धन कसे करता येईल! एखाद्या
गुरुचा शोध घेण्यासाठीही गुरुची आवश्यकता असते, किंबहुना मी तर म्हणेन की योग्य अभ्यासक्रमासाठी
योग्य गुरूचे असणे अनिवार्य आहे!
या विचारातूनच वनजाची स्थापना करण्यात आली; या नावाचा
अर्थ होतो की वनदेवतेची कन्या! तुमच्यापैकी
ब-याच जणी विचार करतील की तुम्ही जो अभ्यास करत आहात त्याच्याशी याचा काय संबंध आहे
व तुमच्या जीवनात वेगवेगळ्या सबमिशन्सचा ताण असताना त्यातच आणखी एक अनावश्यक
उपक्रमाची भर! मात्र या
मंचावर तुम्हाला अशा लोकांना भेटता येईल जे आयुष्यभर निसर्गाच्या सान्निध्यात राहिले
आहेत, अनेकांनी त्यामध्येच आपली कारकीर्द घडविली आहे, एवढे त्यांचे
समर्पण आहे. निसर्ग म्हणजे
केवळ जंगल व वाघ नव्हे तर या शब्दाची व्याप्ती अमर्याद आहे, त्यामध्ये
अगदी आजूबाजूच्या लोकांचाही समावेश होतो.
निसर्गाला भेटण्यासाठी जंगल हे सर्वोत्तम ठिकाण आहे कारण येथे मानवी हस्तक्षेप
किमान असतो व ज्या गोष्टी जशा आहेत त्या स्वरुपात म्हणजेच नैसर्गिक स्वरुपात पाहू शकता. प्रत्येक झाड, प्रत्येक पान, वाहते पाणी, विविध
पक्षांचे व प्राण्याचे चित्कार, त्यांच्या हालचाली, त्यांचा
माग व पाउलखुणा, सूर्य, चंद्र व निरभ्र आकाशात पसरलेले तारे हे सर्व इथे निखळ स्वरुपात
पाहायला मिळतात. जंगलामध्ये
तुम्हाला अनुभवता येईल की जंगलामध्ये काहीही कारणाशिवाय होत नाही; एखादा वाघ
हरिणांच्या कळपातून त्यांच्याकडे अगदी ढुंकूनही न बघता पुढे जाऊ शकतो कारण तिथे सर्व काही गरजेवर
अधारित असते हव्यासावर नाही व हे तुम्ही सर्वप्रथम लक्षात घेणे आवश्यक आहे. एकप्रकारे जंगलाद्वारे, जैवविविधतेच्या अनेक दृश्यांमधून
आपल्याला निसर्गाचेच दर्शन घडते. कुरणांपासून
ते शुष्क जंगलांपर्यंत ते दलदलीच्या जागांपर्यंत तुम्हाला अनेक प्रकारचे जीवन दिसते. याठिकाणी
एकप्रकारे एक जीवनचक्रच असते ज्याला आपण वसतीस्थान म्हणतो. जंगलाचे सौंदर्य म्हणजे कोणत्याही
स्वरुपात ते काही ना काही कृतीने जिवंत असते; येथील जीवन
व निसर्गाच्या प्रत्येक प्रजातीची भूमिका तशीच असते. वरवर सगळे
शांत वाटत असले तरीही कुठेतरी वाळवी जमीनीखाली त्यांचे घर बांधत असते, मधमाशा जंगली
फुलांमधील मध गोळा करत असतात, मुंग्या
जमीनीवर पसरलेल्या पानांखालून त्यांचे अन्न शोधत असतात, कुठेतरी
साल वृक्षाच्या बुंध्यावर एखादा गरुड सावजाची वाट पाहात असतो व अशाप्रकारे इथल्या हालचालींची
यादी संपतच नाही; ती एक संपूर्ण
वसाहत असते ज्यामधील असंख्य रहिवासी स्तब्ध व शांत वाटतात मात्र प्रत्यक्षात तसे नसते,
किंबहुना जंगलांच्या रुपात निसर्गाने एक अत्यंत जिवंत वसतीस्थान तयार केले आहे! एक वास्तुविशारद म्हणून तुम्ही वसतीस्थान ही संज्ञा
समजून घेणे अतिशय आवश्यक आहे कारण आपण ज्या कशाची रचना करणार आहोत तो एखाद्या वसतीस्थानाचा
भाग असणार आहे व तुमच्यापैकी बहुतेक जण माणसांसाठी वसतीस्थानाची रचना करणार आहात ज्यांना
आपण लहान शहर किंवा वसाहत म्हणतो.
लक्षात ठेवा आपण इमारतीची रचना करणार असलो तरी कोणत्या
तरी नैसर्गिक वसतीस्थानावरील ते अतिक्रमण असणार
आहे, म्हणूनच तेथे सध्या कुणाचे वास्तव्य आहे किंवा तेथील जीवनचक्र कसे आहे याचा अभ्यास
करणे आवश्यक आहे, तरच आपण त्यामध्ये हस्तक्षेप न करता, त्याचा एक भाग असलेल्या इमारतीची
रचना करु शकू. सगळीकडे
आजकाल कुरणे, जंगल, जलाशय अशी नैसर्गिक वसतीस्थाने व मानवी गरज किंबहुना हव्यास यादरम्यान
एकप्रकारचे युद्धच सुरु आहे! यामध्ये
पराभव कुणाचा होणार आहे हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाही; माणूस वगळता कोणत्याही प्रजातीकडे वास्तुविशारद
व अभियंते नाहीत ज्यांच्याकडे आपल्या वसाहती उभारण्यासाठी सुसज्ज यंत्रणा आहे. सद्य स्थितीत दररोज एक किंवा अधिक प्राण्यांच्या प्रजाती लुप्तप्राय होत चालल्या आहेत,
याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे राहण्यासाठी किंवा त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी
जागाच उरलेली नाही. घरे, रस्ते,
उद्योग, आयटी पार्क, मनोरंजक उद्याने यासाठी आपला जागेचा हव्यास वाढतच चालला आहे व
या प्रक्रियेमध्ये आपण इतर सर्व प्रजातींना त्यांच्या वसतीस्थानातून बाहेर काढतोय. या वेगाने आपल्याला जीवन नष्ट करण्यासाठी कोणत्याही
जागतिक युद्धाची गरज नाही आपला रचनेविषयीचा दृष्टिकोनही ते करण्यास पुरेसा आहे, केवळ अणुबाँबपेक्षा
ही प्रक्रिया व्हायला वेळ लागेल एवढाच काय तो फरक आहे! आज वाघ किंवा
गिधाड नामशेष होण्याचा धोका आहे, उद्या इतर कुणाही जिवंत प्राण्याची नामशेष होण्याची पाळी येऊ शकते व एक दिवस या पृथ्वीवर आपण आपलेच शत्रू असू व रचना करण्यासारखे काहीच नसेल कारण मग येथे जीवनच उरले नसेल. तुम्ही सध्या
जी कला व विज्ञान म्हणजे वास्तुविद्या शिकत आहात तिचा तो सर्वात मोठा पराभव असेल! कारण तुम्ही
अशा एका जगाची निर्मिती कराल ज्यामध्ये निसर्गच नसेल!
मात्र लक्षात ठेवा जे मन जगाचा विनाश करु शकते तेच
जगाला वाचवूही शकते, सर्व काही आपल्या वाढीविषयीच्या दृष्टिकोनावर अवलंबून
असते कारण असे कुणीच म्हणणार नाही की भूतकाळात जाऊन आदिम जगात राहा. आपण आपल्या
गरजा संतुलित ठेवणे आवश्यक आहे मात्र इतरांच्याही
तशाच गरजा आहेत याचा विचार केला पाहिजे, त्या इतरांसाठी निसर्गच वास्तुविशारद आहे. म्हणून त्या महान शास्त्रज्ञाने म्हटल्याप्रमाणे
तुम्ही केवळ निसर्गामध्ये खोलवर पाहा व त्याचे सौंदर्य अनुभवा व निसर्ग नष्ट करण्याऐवजी
त्याला अधिक चांगले बनविण्याचे आव्हान स्वीकारा. एखादे झाड
किंवा हिरवळीचा तुकडा किंवा जलाशय अनेक प्रजातींचे जीवन आहेत असा विचार करा व ते तुमच्या
निर्मितीचा अविभाज्य भाग होऊ द्या. त्यासाठी
तुम्ही निसर्ग देवतेच्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहणे आवश्यक आहे, तरच तुम्ही खरे वास्तुविशारद
होऊ शकता!
चला तर मग वनजामध्ये निसर्गाची काळजी घेणारी चांगली
व्यक्ती होऊ, तुम्हाला जे व्हायचे आहे त्याचा हा प्रवास आहे! वास्तुविशारद होणे म्हणजे या शाखेची प्रथम श्रेणीने
पदवी घेणे किंवा तुमच्या कंपनीने विविध प्रकल्प मिळवणे नाही तर याचा अर्थ म्हणजे तुम्हाला जीवन
इतरांपेक्षा अधिक चांगल्याप्रकारे समजले आहे असा होतो हे लक्षात ठेवा !
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
No comments:
Post a Comment