Saturday, 5 April 2014

शहराचे आरसे!






















एक शहर म्हणजे निव्वळ समस्या आणि त्यावरील तोडगे याशिवाय आणखी काहीही नसते, शहर नव-नवीन समस्या तयार करत राहते ज्यासाठी अधिकाधिक तोडगे लागतात नील शस्टरमॅन.

पुरस्कार-प्राप्त लेखक नील शस्टरमॅन, न्यूयॉर्कमधील ब्रुकलीन येथे वाढले, त्यांनी तरुण वयातच लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून नील यांनी यशस्वी कादंबरीकार, पटकथालेखक व दूरचित्रवाणी लेखक म्हणून आपला ठसा उमटविला. आपण आपल्या पुण्यात आजूबाजूला नजर टाकली तर या लेखकाचे अवतरण आपण प्रत्यक्षात आणतोय हे जाणवेल याची मला खात्री वाटते! मी कुठेतरी वाचले आहे की शहर जाणून घेण्यासाठी तुम्हाला शहरातील रस्त्यांवर चालावे लागते व त्यांचा स्वतः प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो! मी पुण्यामध्ये २८ वर्षांपेक्षा अधिक काळापासून राहतोय व तरीही हे शहर अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी अजुनही मी चालतो. आपण चालताना आपल्या आजूबाजूला घडणा-या कितीतरी गोष्टी जवळून पाहू शकतो, ज्या आपल्याला कारच्या वातानुकूलित हवेत बसून, आवडते संगीत ऐकत, डोळे मोबाईल फोनवर ठेवून बाहेरील प्रदूषण, उकाडा व रहदारीच्या गोंगाटापासून सुरक्षित राहून अनुभवता येत नाहीत! आजूबाजूला चाललेल्या ब-याच गमतीजमतींना किंबहुना वेदनेला आपण मुकतो. दुचाकीवर जात असाल तर तुमचे सगळे लक्ष तुमची बाईक पीएमटीच्या बस, ऑटे रिक्षा व भरधाव येणा-या वाहनांपासून तसेच रस्त्यावरील भले मोठे खड्डे व वाहनांचे नुकसान करणा-या गतिरोधकांपासून वाचविण्याकडे असते, त्यामुळे तुमच्याकडे आजूबाजूला पाहण्यासाठी वेळच नसतो.
चालत जाताना तुम्ही आजूबाजूची दृश्ये पाहात असता व त्याविषयी विचार करता अर्थात पादपथावर आहात म्हणून तुम्ही सुरक्षित आहात असा अर्थ होत नाही! असेच एकदा पायी चालत असताना मी एक खाली पडलेला पथदर्शक फलक पाहिला, हा फलक चांगल्या स्थितीत होता व त्यावर जवळपासच्या ठिकाणांची नावे व पीएमसीचे प्रतीक चिन्ह होते. हा फलक माझ्या घराच्या जवळ असल्याने चार दिवसांपासून मी रोजच्या फेरफटक्यात तो धूळ खात पडलेला पाहात होतो. या फलकामुळेच मला नील शस्टरमॅनचे अवतरण आठवले, कारण अशी दृश्ये ही कुणाची जबाबदारी आहे. फलक अपघाताने पडू शकतो मात्र आपल्या महानगरपालिकेचे प्रतीक चिन्ह असलेला एक फलक असाच रस्त्यावर पडून राहतो ही आपल्या सर्वांसाठीच लाजीरवाणी बाब नाही का?
आपल्या दैनंदिन जीवनात आपण कितीतरी अशी दृश्ये आजूबाजूला पाहतो उदाहरणार्थ रस्त्यावर भरधाव वाहनाखाली मारला गेलेला रस्त्यावरील कुत्रा, त्याचा मृतदेह अनेक दिवस तो तसाच पडून राहतो, येणारा-जाणारा केवळ त्याला टाळून त्याकडे दुर्लक्ष करुन निघून जातो; मात्र कुणीही तो तिथून हटविण्यासाठी पुढे येत नाही. पीएमसीने आपल्या नदीवरील पुलावर कचरा किंवा निर्माल्य टाकू नये असा फलक लावलेला असतो व तिथूनच लोक नदीत निर्माल्यटाकत असतात! आपण एमएसईबीचे पदपथावरील जागा व्यापणारे विद्युत डीबी म्हणजे डिस्ट्रीब्युशन बॉक्सेस पाहतो, त्यावर विविध प्रकारच्या जाहिरातींचे स्टिकर्स लावून विद्रूप केलेला असतो. त्यानंतर नव्याने तयार केलेले रस्ते विविध कारणांसाठी खणले जातात व त्यानंतर अनेक दिवस ते पूर्ववत केले जात नाहीत, ज्यामुळे त्यावरुन जाणा-या प्रत्येक वाहनाला धक्के खावे लागतात व काही वेळा त्यामुळे अपघातही होतात; कुणीही रस्ते पूर्ववत करण्याची तसदी घेत नाही. रस्त्याच्या खणलेल्या भागावरुन धक्के खात जाताना हजारो वाहने प्रत्येक धक्क्यासोबत महापालिकेला दूषणे देतात व आपण केवळ त्या बिचा-या वाहन चालकांकडे पाहत राहतो. शहरभर फलक युद्ध सुरु असते, एखाद्या पक्षाचा प्रभाग प्रमुख होण्याची जी काही कामगिरी केली आहे त्यासाठी तथाकथित कार्यकर्ते त्यांचे अभिनंदन करण्यासाठी असे फलक लावतात, त्यावर कुठल्याही सोम्या-गोम्याचेही छायाचित्र असते!
आपण सार्वजनिक शौचालये व मुता-यांची परिस्थिती कशी असते हे जाणतो, अगदी रस्त्यावर राहणा-या भिका-यालाही ते वापरायला आवडत नाही अशी त्यांची परिस्थिती असते. नळ हरवलेले असतात, दुर्गंधी तर एवढी असते की त्यांच्या आजूबाजूनही जाताना अंतर राखावे लागते, ते वापरणे तर दूरच! मी जेव्हा शहराच्या सर्वात गजबजलेल्या भागातून म्हणजे जंगली महाराज रस्त्यावरुन चालत होतो, तो पुण्यासाठी अभिमानाची बाब असणे अपेक्षित आहे कारण सर्व महत्वाची दुकाने व कार्यालये तिथे आहेत व महापालिकेचे मुख्यालय तिथून अगदी हाकेच्या अंतरावर आहे; संभाजी बागेच्या प्रवेशद्वारापाशी नागरिक संवाद केंद्र आहे. आता त्याचा काय अर्थ होतो व तो कशासाठी उभारण्यात आला आहे हे विचारु नका, अर्थात हा लेख नागरिकांना जागरुक करण्यासाठी असल्याने ज्यांना जाणून घेण्यात रस आहे त्यांच्यासाठी सांगतो. संवाद केंद्र ही सिंगापूरसारख्या शहरांकडून घेतलेली संकल्पना आहे, या ठिकाणी नागरिक तसेच शहरास भेट देणा-या पर्यटकांना शहराविषयी व ते नागरिकांना कोणकोणत्या सेवा देते याविषयी सर्व माहिती मिळते. मात्र सर्व तथाकथित उपक्रमांप्रमाणे हा उपक्रमही सुरु झाला मात्र तो कधीच जोमाने चालला नाही! सध्याची परिस्थिती म्हणजे नागरिक माहिती केंद्राला कुलूप आहे व ते जीर्ण अवस्थेत आहे, भिकारी व फेरीवाल्यांनी त्याच्या प्रवेशदाराच्या जागेचा ताबा घेतलाय त्यामुळे ते कुणालाही दिसत नाही. पीएमसीचे प्रतीकचिन्ह असलेला फलक अजूनही तिथे आहे ही लाजीरवाणी बाब आहे. या संभाजी बागेतच शहराचे उद्यान प्रमुख बसतात ज्यांच्याकडे शहराच्या सौंदर्यीकरणाचा प्रभार असणे अपेक्षित आहे! या ठिकाणाहून कितीतरी अधिकारी ये-जा करत असतील मात्र कुणीही हे केंद्र सुधरविण्याचा तर सोडाच पण हटविण्याचा सुद्धा विचार करत नाही जे महापालिकेसाठीच नव्हे तर शहरासाठी पण एक कलंक झाले आहे.
या शहराच्या रस्त्यांवरुन दररोज जाताना आपण अशी अनेक दृश्ये पाहतो, मात्र आपण काय करतो किंबहुना आपण त्यांची दखल तरी घेतो का? आपल्यापैकी बहुतेक जणांना ही दृश्ये घरी सकाळी एक कप चहा घेतो त्याप्रमाणे आयुष्याचा एक अविभाज्य भाग असल्यासारखी वाटतात. ते केवळ विचारतील की त्यात काय मोठेसे व त्याच्याशी त्यांचे काय देणे घेणे! तर मग, कल्पना करा की सगळे पादपथ स्वच्छ आहेत, रस्त्यावर सगळीकडे व्यवस्थित मार्गफलक लावलेले आहेत, रस्त्यावर सगळीकडे झाडे बहरली आहेत व कुठेही खणलेले खड्डे किंवा खाच-खळगे नाहीत. कुठेही कचरा टाकलेला नाही व आपल्या शहराच्या मध्यभागातून वाहणा-या नदीतील पाणी नितळ व स्वच्छ आहे! चौकांमध्ये शेकडो फलक, भित्तीचित्रे लावलेली नाहीत, त्यातून तुमच्याकडे कोणतेही चेहरे बघत नाहीत, तुमची नजर क्षितीजापर्यंत पोहोचते आहे. नागरिक संवाद केंद्र सुस्थितीत आहे व त्यामध्ये आपल्याला सुहास्य वदनाने कर्मचारी सेवा देत आहेत, शहराविषयी सर्व माहिती लावण्यात आली आहे.  कल्पना करा एमएसईबीचे फीडर पिलर बॉक्स (प्रमार्ग स्तंभ पेट्या) व्यवस्थित रंगवलेले आहेत व सुरक्षित आहेत. कधी रस्त्यावरील सार्वजनिक मुता-या स्वच्छ व सुगंधी असतील, अशी कल्पना केली आहे आहे का कधी?
हे सगळे एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटते ना? खरे सांगायचे तर हे स्वप्न नाही तर प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे कारण आपण कर भरतो मात्र  आपली जबाबदारी तेवढ्यावरच संपते असे आपल्याला वाटते! महापालिका व सरकारच्या विविध विभागांनी त्यांचे काम केले पाहिजे हे मान्य आहे पण मग ते करत नसतील व त्यांच्यावर काही बंधने असली तर आपण तिथपर्यंत का पोहोचू शकत नाही व काही भार घेत नाही असा माझा प्रश्न आहे? आपण कामवाली आली नाही तर आपले घर किंवा आपली कॉलनी स्वच्छ करण्यासाठी कुणाची वाट पाहतो का? मी असे म्हणत नाही की पुढे होऊन एखाद्या स्वच्छता कर्मचा-याचे काम करु लागा, किमान प्रत्येक मंचावर तुमचा आवाज उठवा व एखाद्या समस्येकडे डोळेझाक करण्याऐवजी  अधिका-यांपर्यंत पोहोचा. जेव्हा तुम्हाला अशी दृश्ये दिसतात तेव्हा एकजूट व्हा व तुमच्या घराभोवती किंवा कामाच्या ठिकाणी असलेल्या समस्येवर काय तोडगा काढता येईल ते पाहा.
या शहरामध्ये शेकडो कॉर्पोरेट व व्यापारी संस्था आहेत, अनेक व्यवसायिक संघटना आहेत, त्या सार्वजनिक शौचालये व नागरिक संवाद केंद्रासारख्या सुविधा दत्तक का घेऊ शकत नाहीत? वर नमूद केलेली दृश्ये आपल्याला कोणत्याही वाढत्या शहरात दिसून येतील कारण आपल्या नगर नियोजनामध्ये विशेषतः सार्वजनिक ठिकाणांच्या बाबतीत दुर्दैवाने सौंदर्यशास्त्रावर कधीच भर देण्यात आला नाही! मात्र आता ते करण्याची वेळ आली आहे कारण या समस्या केवळ सौंदर्यशास्त्रापुरत्या मर्यादित नाहीत तर ती प्रत्येकाची स्वतःची समस्या बनली आहे आणि नागरिकांना तसेच पर्यटकांना सर्व त्या आवश्यक सेवा देणेही गरजेचे आहे. कोणत्याही महिलेला रस्त्यावरील सार्वजनिक शौचालयांसंबंधी विचारा, ती शहर आणि पायाभूत सुविधांवर आगपाखड करेल. मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे कोणतेही शहर चांगले किंवा वाईट हे त्यातील गगनचुंबी इमारती किंवा मॉल किंवा हॉटेलवरुन ठरत नसते तर ते नागरिकांना कशाप्रकारे सेवा देते यावरुन ठरत असते! विशेषतः रिअल इस्टेट विकासकांच्या संघटनेने यादृष्टिने विचार केला पाहिजे, कारण हे शहर इतर शहरांच्या तुलनेत राहण्यास अधिक योग्य वाटते म्हणून या शहरातील रिअल इस्टेटला मागणी आहे. या शहराची भरभराट व्हावी असे आपल्याला वाटत असेल तर आपल्या प्रकल्पाच्या चार भिंतींवर लक्ष केंद्रित करतानाच या प्रकल्पांच्या भिंतींबाहेर काय सुरु आहे हे देखील आपल्याला विसरुन चालणार नाही. लक्षात ठेवा आपण कितीही सुंदर इमारत बांधली तरीही नागरिकांना आतून काय पाहायला मिळते हे महत्वाचे आहे!
ताजमहालाचे उदाहरण घ्या, तो सुंदर दिसतो कारण तो यमुना नदीच्या काठावर बांधण्यात आला आहे; ताजमहाल धारावीसारख्या झोपडपट्टीच्या मध्यावर बांधला असता तर किती लोकांनी त्याला भेट दिली असती ते पाहा! शेवटी शहरातील सार्वजनिक ठिकाणे समाजाचा आरसा आहेत, ती आपण नागरिक म्हणून सामूहिकपणे कसे आहोत हे दाखवतात! संपूर्ण शहर एका मोठ्या झोपडपट्टीत रुपांतरित होण्यापूर्वी जागे व्हा नाहीतर ही अशी दृश्ये आपली स्वप्ने झाकोळून टाकतील व त्या अंधारातुन आपल्याला कधीच बाहेर पडता येणार नाही!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स


No comments:

Post a Comment