Tuesday, 1 July 2014

दिल हे छोटासा, छोटीसी आशा !

























शहर हे एखाद्या स्वप्नाप्रमाणे असते व त्यामध्ये अनेक इच्छा व थोडे भय पण असते.                           … इटॅलो कॅल्व्हिनो


इटॅलो कॅल्व्हिनो यांचा जन्म क्युबात झाला व ते इटलीत मोठे झाले. ते एक पत्रकार व लघुकथा लेखक व कादंबरीकार होते. ते शहरी जीवनाचे अतिशय बारकाईने निरीक्षण करत असत. ते पुण्याचा रहिवासी नसले तरीही त्यांचे शब्द आपल्या प्रिय पुण्यासाठीच लिहील्यासारखे वाटतात! आपल्यापैकी बहुतेक जण जेव्हा रोज सकाळी आपल्या ताज्या वृत्तपत्राची पाने चाळतात तेव्हा त्यामध्ये आपल्याला इटॅलोच्या अवतरणाचे प्रतिबिंब दिसून येते. बहुतेक पाने या शहरातील समस्या किंवा आपल्याला जाणवणारे सेवा सुविधांविषयीचे भय याविषयीच्या बातम्यांनी भरलेली असतात. शहराला जाणवणा-या या समस्या किंवा भय सर्व पातळ्यांवरील असते मग रस्त्यावरील रहदारी असो किंवा रस्त्यांची स्थिती किंवा सीसी टीव्ही/कॅमेरे किंवा सार्वजनिक शौचलय किंवा पाणी पुरवठा किंवा अगदी महापालिकेच्या शाळांमधील मुलांचा गणवेश सुद्धा जणु यंत्रणेच्या प्रत्येक आघाडीला एखाद्या विषाणुचा संसर्ग झाल्यासारख्या वाटतो आहे व ज्याप्रकारे सबंधित यंत्रणेने काम करणे अपेक्षित आहे त्याप्रकारे ती करत नाहीये. आपण शहराकडून अगदी साध्या अपेक्षा करतो मात्र त्याही कधी पूर्ण होत नाहीत. ज्या यंत्रणा आपले जीवन अधिक उत्कृष्ट नाही तर किमान चांगले बनविण्यासाठी आहेत त्याद्वारे शहरातील नागरिकांना काही चांगला अनुभव आला असे आपण क्वचितच वाचतो!

मला नेहमी आश्चर्य वाटते की आपला दृष्टिकोन नकारात्मक असल्यामुळे आपण क्वचितच चांगल्या कामचे कौतुक करतो किंवा सर्व नागरी पातळ्यांवर आपण इतके वाईट आहोत की नकारात्मकता हेच एकमेव तथ्य आहे व त्यालाच आपल्याला तोंड द्यावे लागणार आहे! सीसीटीव्हीसारखी लहानशी गोष्ट घ्या. कुणे एकेकाळी शहर केवळ गुन्ह्यांच्या बाबतीतच नाही तर सामाजिक वातावरणाच्या बाबतीत एखाद्या किल्ल्याइतके सुरक्षित मानले जायचे. मी पुण्याच्या रिअल इस्टेट उद्योगाचे मार्केटिंग करताना अगदी अलिकडेपर्यंत अनिवासी भारतीय वा पुण्याबाहेरील लोकांसमोर पुण्याचे कौतुक करताना सांगत असे, तुम्हाला उत्तम सामाजिक जीवन हवे असेल तर पुण्याकडे पाहा, इथे महिला सुरक्षित आहेत, फक्त येथेच चित्रपटाचा शेवटचा खेळ पाहून त्या रात्री एकट्या दुचाकीवर घरी जाऊ शकतात! सुरक्षेची याहून अधिक चांगली खूण दुसरी काय असू शकते? मात्र आता आपण हे म्हणू शकतो का व मी म्हणालो तरी लोक माझ्यावर विश्वास ठेवतील का? रस्त्यावर आजकाल दिवसाढवळ्या सर्रास महिलांच्या गळ्यातून सोन्याच्या साखळ्या खेचल्या जातात व यासाठी सुरक्षा द्यायची सोडून पोलीस महिलांनाच आवाहन करतात की रस्त्यावरुन जाताना दागिने घालू नका, याहून अधिक असुरक्षित जीवन काय असू शकते? असो या लेखाचा हा विषय नाही, मात्र जर्मन बेकरी बाँबस्फोटानंतर शहरामध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील असे प्रत्येक नेता म्हणाला होता व या स्फोटांना जवळपास तीन वर्ष झाल्यानंतर आपल्याला शहरात किती सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले दिसतात? ब-याच रहदारीच्या चौकांमध्ये ठिकठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत, सिग्नल तोडणा-या वाहनांची जवळपास दहा लाख छायाचित्रे त्यामध्ये टिपलेली असतील, मात्र या कॅमे-यांची देखभाल कोणते डिपार्टमेंट करणार हे निश्चित नसल्याने त्यातील डाटा वाया गेल्यासारखाच आहे! सीसीटीव्हीतून मिळालेल्या दृश्यांमुळे सिग्नल तोडणा-या एखाद्या व्यक्तिला शिक्षा झाल्याचे आपण ऐकले आहे का? ब-याच ठिकाणी गुन्हे घडत असतात व संबंधित सीसीटीव्हीतील दृश्ये पोलीसांनी ताब्यात घेतल्याचे आपण ऐकतो व त्यानंतर आपल्याला समजते की दर्जा खराब असल्याने त्या सीसीटीव्ही दृश्यांचा काही उपयोग नाही! त्याशिवाय सीसीटीव्हीच्या केबल्स टाकण्यासाठी नवीन/जुने डांबरीकरण झालेले रस्ते खणले जातात. सार्वजनिक पैशातून रस्ते बांधले जातात, आपल्याला जर माहिती आहे की सीसीटीव्हीच्या केबल्स टाकायच्या आहेत तर त्यासाठी हे रस्ते तयार करतानाच तरतूद करण्यास कुणाची मनाई आहे का? हे कॅमेरे बसविण्यात आलेच तर ते चांगल्या दर्जाचे असतील व त्यात घेतलेल्या प्रतिमांवर वेळीच प्रक्रिया केली जाईल व ज्या हेतूने ते बसविण्यात आले आहेत त्यासाठी वापरल्या जातील याची खात्री कोण देणार! मी जाणीवपूर्वक सीसीटीव्हीची समस्या घेतली कारण सकृतदर्शनी ती रिअल इस्टेटशी संबंधित नसेलही मात्र शहरासंबंधीच्या या अशा लहान मुद्यांविषयीच्या  आपल्या दृष्टिकोनातूनच पाणी व रहदारीसारख्या मोठ्या समस्यांबाबत काय होईल हे दिसून येते!
शहराविषयीच्या समस्यांबाबत चर्चा करताना सामान्यपणे रहदारी, सार्वजनिक वाहतूक, पाणी व वीज याविषयी चर्चा केली जाते मात्र आपण क्वचितच शौचालये, सार्वजनिक आरोग्य सुविधा, शिक्षण, क्रीडा सुविधा, बाजार, सार्वजनिक बागा तसेच तरणतलाव व अशा इनेक विषयांवर विचार करतो. वर्तमानपत्रे मध्यमवर्गाद्वारे वाचली जातात व वर उल्लेख केलेल्या सर्व सुविधा त्यांच्याद्वारे फारशा वापरल्या जात नाहीत त्यामुळे त्यासाठी ओरड केली जात नाही व नेमक्या याच परिस्थितीचा प्रशासकीय संस्था फायदा घेतात. आपण विसरत आहोत की शहर हे सार्वजनिक सुविधांवर चालते खाजगी नाही. ज्यांच्याकडे पुरेसा पैसा आहे व जे डिझायनर फ्लॅटमध्ये राहतात त्यांना बागा, सार्वजनिक शौचालये किंवा सार्वजनिक वाहतुकीची काळजी करायची गरज नाही. त्यांच्याकडे खाजगी तरणतलाव, जिम व त्यांच्या स्वतःच्या कार आहेत, त्यामुळे केवळ त्यांच्या कारसाठी रुंद रस्ते असावेत, त्यांच्या तरणतलावांना किंवा पाण्याच्या टाक्यांना पाणीपुरवठा व्हावा एवढीच त्यांची चिंता असते व ते कितीही पैसे खर्च करुन हे सर्व विकत घेऊ शकतात.

मात्र आपण जेव्हा परवडण्यासारखी घरे असे म्हणतो तेव्हा या पायाभूत सुविधा परवडण्यासारख्या असल्या पाहिजेत व त्या आघाडीवर आपण वारंवार अपयशी ठरलो आहोत व ही परिस्थिती बदलताना दिसत नाही. पुरेशी सार्वजनिक शौचालये असणे, विशेषतः महिलांसाठीची शौचालये व त्यांची देखभाल करणे हे आपल्याला शक्य झालेले नाही. स्थानिक प्रशासकीय संस्था किंवा राजकीय पक्ष याकामात खाजगी क्षेत्राने पुढाकार घ्यावा व पीएमसीला मदत करावी यासाठी प्रयत्नही करताना दिसत नाहीत. कॉर्पोरेट कंपन्यांना सार्वजनिक शौचालये दत्तक घेण्यास सांगण्यासारख्या साध्या गोष्टीही आपण करु शकत नाही, असे करायला कुणी तयार नाही असे नाही, तर यासाठी आवश्यक इच्छाशक्तिचा आपल्याकडे अभाव आहे. एकीकडे आपण शहराचे नाव जागतिक नकाशावर नेण्याचा प्रयत्न करत आहोत तर प्रत्यक्षात मात्र आपण या शहराला बदनाम करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत हे विसरतोय. आपण स्वच्छ सार्वजनिक शौचालयेही देऊ शकत नसू तर इथे येण्या-या पाहुण्यांसमोर आपण आपली चांगली प्रतिमा कशी निर्माण करणार आहोत ?

आपल्या स्थानिक बस सेवेच्या बस थांब्यांची स्थिती पाहा, स्टेनलेस स्टीलच्या चकाचक दिसणा-या बस थांब्यांवर एवढे पैसे खर्च केल्यानंतर ते ज्यासाठी बांधण्यात आले आहेत त्यासाठी त्यांचा उपयोगच होत नाही! कोणत्याही बस थांब्यावर बसचा मार्ग किंवा तिच्या वेळा यासारखी मूलभूत माहितीच दिलेली नसते व लोकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा अशी आपली अपेक्षा असते! बहुतेक वेळा बस थांबा थेट पादचारी पथावरच बांधलेला असतो त्यामुळे बसथांबाही वापरता येत नाही व पादचारी पथही वापरता येत नाही. त्याशिवाय बस या थांब्यावर कधीच थांबत नाही किमान त्याआधी किंवा पुढे शंभर फूट थांबतात हा तर आणखी एक विनोदच आहे.
महापालिकेच्या शाळांविषयी व रुग्णालयांविषयी कितीतरी वेळा इतके लिहून आले आहे की, आता ब-याच वृत्तपत्रांनी व पत्रकारांनी याविषयी लिहीणेच सोडून दिले आहे. मला नेहमी वाटते की सर्व नेत्यांना तसेच अधिका-यांना या सुविधा स्वतःसाठी किंवा त्यांच्या कुटुंबासाठी वर्षातून किमान एकदा तरी वापरण्याची सक्ती का करु नये, म्हणजे सामान्य माणसाला कशाप्रकारच्या सेवा मिळतात याची त्यांना जाणीव होईल असे. जे शहर भावी नागरिकांना चांगले शिक्षण देऊ शकत नाही किंवा चांगल्या आरोग्याची खात्री देऊ शकत नाही ते शहर रसातळाला जाईल हे कटू सत्य आहे.
आपण पाणी पुरवठ्याविषयी बोलते मात्र जलवाहिन्यांची लांबी, त्यांचा नकाशा यासारखी तांत्रिक माहिती तर सोडाच मात्र शहराला नेमका किती पाणीपुरवठा होतो, शहराची पाण्याची प्रत्यक्ष मागणी किती आहे अशी मूलभूत माहितीही आपण देऊ शकत नाही. एक नागरिक म्हणून आपल्याला पाणी पुरवठ्याविषयी अचूक माहितीही मिळत नसेल तर प्रत्यक्ष पाणी मिळण्याबाबत भविष्य कसे असेल हे सांगण्यासाठी कुणा महान व्यक्तिची गरज नाही! शहराच्या तथाकथित अधिका-यांकडून आपल्याला विविध प्रकारची मोघम उत्तर वाचायला किंवा ऐकायला मिळतात.

आपण जेवढा अधिक विचार करतो तेवढे अधिक नैराश्य येते, अर्थात सर्वकाही संपलेले नाही. नेहमीप्रमाणे अनेक जणांना प्रश्न पडला असेल की या सगळ्याचा रिअल इस्टेटशी काय संबंध आहे. शेवटी रिअल इस्टेट म्हणजे तरी काय, तर शहरच ना? लोकांना जिथे राहायला आवडते तेथे घरे विकली जातात व आपल्याकडे जशा पायाभूत सुविधा आहेत त्यातून एक दिवस असा येईल की इथे कुणीच राहायला येणार नाही. लोकांचे जीवन सोपे होईल अशी घरे बांधणे ही काळाची गरज आहे व हे केवळ चांगल्या पायाभूत सुविधांमुळेच शक्य आहे. शहराची वाढ कर्करोगाच्या पेशींप्रमाणे झपाट्याने होत आहे मात्र ही निरोगी वाढ नाही; कोणे एकेकाळी निरोगी मानल्या जाणा-या पुणे नावाच्या शरीराला ती हळूहळू विषाक्त करत आहे. आजूबाजूच्या पंधरा गावांच्या समावेशाने शहराचा विस्तार झालाच आहे आता लवकरच आपण आणखी पस्तीस गावेही गिळंकृत करणार आहोत! हे आवश्यक आहे हे मान्य असले तरीही आपल्याकडे जे आहे त्याचे आपण काय केले आहे याचे विश्लेषण करणेही तितकेच महत्वाचे आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला, केवळ रिअल इस्टेट क्षेत्रातीलच नाही तर प्रत्येक सामान्य माणसाला वस्तुस्थितीची जाणीव होत नाही व त्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची मागणी केली जात नाही तोपर्यंत शहराचे भविष्य ठरलेले आहे व ते निश्चितच चांगले नाही! आपल्यापैकी अनेकांना दिल है छोटासा, छोटीसी आशा हे गाणे आठवत असेल, त्याचप्रमाणे हे शहर टिकावे व समृद्ध व्हावे यासाठी त्याच्या आपल्या सर्वांकडून अतिशय लहान गरजा व अपेक्षा आहेत, मात्र आपल्याकडे शहराच्या गरजा जाणून घेण्याइतपत संवेदनशीलता आहे का? केवळ एकमेकांवर आरोप केल्याने शहर वाचणार नाही तर त्यासाठी एकजूट होऊन काम करणे ही काळचीच नाही तर शहराचीही गरज आहे व तसे केले तरच आपण स्वतःला अभिमानाने पुणेकर म्हणू शकू !


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स



No comments:

Post a Comment