Tuesday, 30 June 2020

चांगले घर हाच खरा फायदेशीर व्यवहार!



























चांगले घर हाच खरा फायदेशीर व्यवहार!

सकारात्मकता कधीच तथ्यांवर विसंबून राहात नाही,ती शक्यतांवर अवलंबून असते,नकारात्मकता म्हणजे वेळेचा अपव्यय.”...नॉर्मन कझिन्स.
तुमच्या योग्यतेनुसारच व्यवहार पूर्ण होतात...अमित कलंत्री.

नॉर्मन कझिन्स हे अमेरिकी राजकीय पत्रकार, लेखक, प्राध्यापक व जागतिक शांतीचे पुरस्कर्ते होते. अमित कलंत्री यांनी तीन पुस्तके लिहीली आहेत "आय लव्ह यू टू", "५ फीट ५ इंच रन मशीनसचिन तेंडुलकर" व "वन बकेट ऑफ टियर्स". अमित हे व्यावसायिक जादुगार व संम्मोहन तज्ञ आहेत. पृथ्वीच्या दोन वेगवेगळ्या उपखंडातील लोकांची ही विधाने एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखी आहेत. यातील अमित हे आपल्या पुण्याचेच आहेत व संपूर्ण देशात पुण्यातीलच जास्त लोक अमेरिकेमध्ये आहेत तर ही अवतरणे व्यवहाराविषयी आहेत. तुम्ही घराच्या शोधात असताना रिअल इस्टेटमध्ये तुम्ही फायदेशीर व्यवहार कशाला व का म्हणाल या विषयावर मी लेख लिहायला घेतला तेव्हा वरीलपैकी कोणते अवतरण वापरायचे याविषयी थोडा बुचकळ्यात पडलो होतो, म्हणून दोन्ही अवतरणे वापरायचे ठरवले. हा लेख लिहीण्याचे कारण म्हणजे, अलिकडेच माझ्या मित्राच्या एका मित्राला (भारतामध्ये ही नातीगोती कितीही दूरवर जाऊ शकतात) कोथरुडमध्ये राहण्यासाठी जे घर (सदनिका) खरेदी करण्यामध्ये रस होता त्याविषयी जाणून घ्यायचे होते. हे पुण्यातील पश्चिम उपगनर असून चांगले विकसित झालेले आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. त्याला जी माहिती हवी होती ती मी त्याला दिली, तो म्हणाला त्याने बांधकामाच्या ठिकाणी जाऊन, जागेची पाहणी केली होती व बांधकामही सुरू होते. जवळपास ७५% मजल्यांचे कामही पूर्ण झाले होते (उंचीनुसार), तर हा व्यवहार चांगला आहे का व येथे कोणत्या दराने सदनिका खरेदी करणे योग्य ठरेल? असे त्याने विचारले. मी त्याला म्हणालो मला एक दिवस दे, मी त्या प्रकल्पाविषयी व बांधकाम व्यावसायिकाविषयी चौकशी करतो व तुला सांगतो तसेच मला इतर काही पर्याय मिळाले तर तेही सांगतो असे सांगितले. त्याप्रमाणे मी त्या मित्राच्या मित्राला एका दिवसाने कॉल केला व तो बांधकाम व्यावसायिक फारसा विश्वासार्ह नाही, परंतु व्यावसायिकदृष्ट्या नाही तर मित्रत्वाच्या नात्याने हे सांगत असल्याचे त्याला म्हणालो. त्याला त्याच भागातील इतर काही प्रकल्पांचे तपशीलही दिले, म्हणजे तो इतर पर्यायांमधून निवडू शकेल. काही दिवसांनी मला आमचे संभाषण आठवले, म्हणून मी त्या मित्राच्या मित्राला काही मदत हवी आहे का असे विचारले. त्यावर तो म्हणाला त्याने माझ्याकडे ज्याची चौकशी केली होती त्या पहिल्याच बांधकाम व्यावसायिकाकडे सदनिका आरक्षित केली आहे. मी सुचवलेल्या इतर पर्यायांपैकी एखादा त्याला पटला नाही का, असे त्याला विचारल्यावर त्याने उत्तर दिले, इतर पर्याय काही लाख रुपयांनी त्याच्या बजेटबाहेरचे होते. त्यामुळे मी त्याला जो बांधकाम व्यावसायिक टाळायला सांगितला होता त्याच्यासोबतच व्यवहार करायचा निर्णय त्याने घेतला. मी त्याला विचारले की त्याने करार केला आहे का, तो माणूस म्हणाला की अजून तरी केलेला नाही पण लवकरच करणार आहोत.मी त्याला म्हणालो की, मला माफ कर मी व्यावसायिकदृष्ट्या असे करायला नको पण माझ्या मित्राने तुला माझ्याकडे पाठवले असल्याने, तुला सांगणे हे मी माझे कर्तव्य मानतो. ज्या बांधकाम व्यावसायिकाकडे तू सदनिका आरक्षित केली आहेस तो प्रकल्प अंतिम टप्प्यात असतानाही रखडवतो असा त्याचा लौकिक आहे, तसेच विक्रीनंतर चांगली सेवा देत नाही. मी त्या बांधकाम व्यावसायिकाच्या एका जुन्या ग्राहकाचा त्याला संदर्भ दिला. त्याच्याशी बोलून म्हणालो, तू हे घर राहण्यासाठी घेतोयस, त्यासाठी जवळपास एक कोटीहून अधिक रुपये मोजतोयस, अशावेळी केवळ काही लाख रुपये वाचवण्यासाठी हा प्रकल्प अजुन वर्षभर रखडला किंवा तुला किरकोळ कामे करून घेण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाच्या मागे लागावे लागले किंवा घराचा ताबा मिळाल्यानंतर तुला अजिबात काहीच सेवा मिळाली नाही व सर्व रक्कम वेळेत दिल्यानंतरही घराचा ताबा मिळायला उशीर झाला तर काय याचा विचार तू करत नाहीयेस. तू एखाद्या कार कंपनीची ख्याती केवळ स्वस्त आहे अशी असल्याने ती खरेदी केल्यानंतर तुला अतिशय निकृष्ट सेवा मिळाली किंवा पूर्ण पैसे भरल्यानंतरही उशीरा डिलेव्हरी मिळणार असेल तर खरेदी करशील का? तो म्हणाला, नाही, मी ती गाडी घेणार नाही. मग मी त्याला विचारले की घरासारखी आयुष्यभराची गोष्ट तुला केवळ किमतीच्या आधारावर तो सर्वोत्तम व्यवहार वाटतोय म्हणून का खरेदी करतोयस?

याच पार्श्वभूमीवर मला वरील दोन अवतरणे आठवली. लॉकडाउननंतर, प्रत्येकजण रिअल इस्टेटविषयी व त्याच्या भविष्याविषयी बोलत आहे. पण मला रिअल इस्टेटच्या भविष्याची काळजी कधीच वाटली नाही किंवा वाटत नाही, पण जे चुकीच्या पद्धतीने व्यवहार करत आहेत अशा काहीजणांची मात्र काळजी वाटतेय. पण अशी माणसे प्रत्येक क्षेत्रात असतात व त्यांच्या नशिबात जे काही व्हायचे असेल ते होते ही वस्तुस्थिती आहे, तर मग कशाला काळजी करायची? खरे तर जे बांधकाम व्यावसायिक तुम्हाला फायदेशीर व्यवहार करून देत नाहीत त्यांची मला काळजी वाटत नाही, मला घराच्या ग्राहकाची काळजी वाटते कारण त्याच्या चुकीच्या निर्णयामुळे त्याला फायदेशीर व्यवहार मिळत नाही, रिअल इस्टेटची हीच मुख्य समस्या आहे. नॉर्मन यांनी म्हटल्याप्रमाणे, सकारात्मक व नकारात्मक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत व आपल्या सगळ्यांमध्ये दोन्ही बाजू असतात, पण नाण्याची तिसरी बाजूही असते, ती म्हणजे नाण्याची कड. नाण्याच्या कडेवरही तुम्ही कोणत्या बाजूला उभे आहात हे सुद्धा महत्त्वाचे असते, पण रिअल इस्टेटमध्ये जी व्यक्ती संभाव्य शक्यता पाहू शकते तिलाच चांगला व्यवहार मिळतो ही वस्तुस्थिती आहे. सकारात्मक व्हा म्हणजे तथ्यांचा विचार करू नका असे मी म्हणत नाही, तर्कशुद्ध विचार करून ही तुम्ही सकारात्मक राहू शकता व तुमच्या घराची निवड करू शकता, असे मला म्हणावेसे वाटते. उदाहरणार्थ साधारण दहा वर्षांपूर्वी मी बाणेर व बालेवाडीमध्ये काही प्रकल्प बांधले व १८०० रू. प्रति चौ. फूट दराने विकले. या किमतीत आज बांधकाम खर्चही भरून निघणार नाही. त्यावेळी, ज्या लोकांनी शहरापासून ते फार लांब आहे असे कारण देत या प्रकल्पांमध्ये सदनिका घेतली नाही, ते अजूनही त्याच ठिकाणी घर शोधत आहेत जे आता त्यांच्या बजेट बाहेर आहे. मात्र ज्यांनी त्या वेळेस असे निर्णय घेऊन घर घेतले, त्यांना विचारा, निर्णय योग्य होता कि अयोग्य ?

पुन्हा, मी जाणीवपूर्वक माझे स्वतःचे उदाहरण दिले म्हणजे तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये किंवा तुमच्या स्वतःच्या घराचा व्यवहार करताना एक  फायदेशीर व्यवहार म्हणजे काय हे समजू शकेल. मी कौतुक म्हणून हे सांगत नाही, तुम्ही तुमचे घर घेताना फायदेशीर व्यवहार व्हावा यासाठी मला तुम्हाला एक लाखमोलाची गोष्ट सांगायचीय, ती म्हणजे तुम्ही आधी चांगले घर म्हणजे काय हे समजून घ्या.

लॉकडाउन नंतर अनेक गोष्टी बदलत आहेत व बदलतील, कारण अनेक लोक घरून काम करू लागतील, अनेक लोक पुण्यातून निघून गेले आहेत, अनेक लोक परत येतील, काही कदाचित कधीच परत येणार नाहीत, समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये अनेक नवीन स्थलांतरित असतील, जे देशाच्याच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून नव्या नोकरीच्या किंवा रोजगाराच्या शोधात येतील कारण पुण्यामध्ये पुष्कळ नोकऱ्या आहेत; पण हे सगळे स्थिरस्थावर होण्यासाठी थोडा काळ जावा लागेल. माध्यमांची कृपा तसेच सत्ताधाऱ्यांनी निर्माण केलेल्या गोंधळामुळे, काही भागातील बेकायदेशीर वसाहतींमुळे या शहराची बदनामी झाली आहे, देशातील महानगरांची परिस्थितीही अशीच आहे कारण कोणता ही साथीचा रोग  झोपडपट्ट्यांमध्ये झपाट्याने वाढतो व तो नियंत्रणात आणणे अवघड असते ही वस्तुस्थिती आहे, हे आपल्या शासनकर्त्यांना कळते पण वळत नाही. परंतु एकप्रकारे पुण्यातील अनेक बांधकाम व्यावसायिकांसाठी किंवा भागांसाठी हे वरदानच म्हटले पाहिजे कारण जो भाग नियंत्रण क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) नाही म्हणजेच जेथे कमीत कमी झोपडपट्ट्या किंवा अवैध बांधकामे आहेत तेथे घराचे व्यवहार जास्त  होतील, हा नवीन निकष झाला आहे. म्हणजे मी माझ्या सोसायटीमध्ये विलगीकरणात किंवा अलगीकरणात सुरक्षितपणे राहात असेन परंतु चतुर्थ श्रेणीतील सर्व कर्मचारी वोचमन ,ड्राइवर , घरकामवाल्या बाया  जे आपल्या समाजाचा कणा आहेत ते कदाचित माझ्या घरा शेजारी असलेल्या नियंत्रण क्षेत्रात राहात असू शकतात, ज्यामुळे माझ्या कुटुंबाला नेहमी धोका असू शकतो, असा विचार आधी घर घेताना कधीच करण्यात आला नव्हता.

त्यानंतर मुद्दा येतो जागेचा जिचा पायभूत सुविधांच्या दृष्टीकोनातून विचार करावा लागेल. खरे सांगायचे तर आपल्या देशात लोक एखाद्या ठिकाणी राहायला आधी सुरूवात करतात मग सुविधांचा विकास केला जातो हा नियम आहे. व्यावसायिक तसेच निवासी वसाहतींसाठी तो लागू होतो, पुणेही या नियमाला अपवाद नाही, जे नागरी नियोजनाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. पण हीच तर आपली खासियत आहे नाही का, म्हणूनच तुम्ही जेव्हा घराचा शोध घ्याल, तेव्हा तिथे आज काय आहे एवढाच विचार करू नका, तिथे पाच वर्षांपूर्वी काय होते याचा विचार करा व त्यानंतर पाच वर्षांनी काय असेल याचा अंदाज बांधा. जो भाग पूर्णपणे विकसित आहे, तिथे तुम्हाला चांगला व्यवहार म्हणजेच कधीच परवडणारी घरे मिळणार नाहीत. याचा अर्थ असा होत नाही की ज्या भागात रस्ते, पाणी, शाळा, दुकाने नाहीत अशा ठिकाणी जाऊन राहा, तर याचा अर्थ असा होतो की कधीतरी या गोष्टी तिथे येतील, पुणे/पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बहुतेक भागात असेच झालेले आहे. भोवतालच्या शाळा, दुकाने व रुग्णालयांसोबतच, या भागातील विकासाचे स्वरूपही तपासा. कारण तुम्ही जेव्हा सर्वोत्तम व्यवहार हवा असे म्हणता तेव्हा तुमच्या भागाभोवती अवैध किंवा अनियोजित वसाहती नाहीत, अरुंद रस्ते किंवा एखादा कारखाना इत्यादींसारखे प्रदूषण निर्मिती करणारे घटक नाहीत इत्यादी सर्व गोष्टी विचारात घेतल्या जाणार आहेत.

आता मला किमान अशी वाटते की लोक जेव्हा सुविधांचा विचार करतील तेव्हा ते डोळे ( म्हणजे जाणीवा ) उघडे ठेवतील, स्विमिन्ग पूल व जिम नसला तरी, एखादीच इमारत असेल तर तिच्याभोवती चालायला मोकळी जागा पाहिजे, नुसतेच पार्किंग व इतर सेवांचे जंजाळ नको. या लॉकडाउनच्या संपूर्ण काळात मी माझ्या इमारतीभोवतीच चालायला जातोय, माझी अशी इमारत आहे तिच्याभोवती भरपूर जागा व झाडे आहेत. सुदैवाने आमच्या सोसायटीतील लोकांनी पार्किंग किंवा इतर कारणाने झाडे कापलेली नाहीत व मी दररोज पक्षांचा किलबिलाट ऐकू शकतो (खरोखर) व झाडांची सावली अनुभवू शकतो. पुनर्विकासकांनो तुम्ही हे वाचताय का, त्यांच्यापैकी बहुतेकांनी जास्त जागा मिळवण्याच्या खटाटोपात झाडे गमावली, आता या इमारतींमध्ये राहायला येणाऱ्या नव्या सदनिकाधारकांसाठी इथे झाडेच नसतील हा खऱ्या अर्थाने फायदेशीर व्यवहार झाला असे म्हणता येईल का हे स्वतःलाच विचारा. (पुनर्विकासामध्ये झाडांसाठी जागा ठेवणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांविषयी पूर्णपणे आदर वाटतो, ते खरोखर जादुगारच असले पाहिजेत!). तुम्ही जेव्हा घर आरक्षित करता तेव्हा अशा तथाकथित बडेजावी सोयीसुविधांमुळे मासिक खर्च किती होईल, आपल्याला खरोखरच त्यांची गरज आहे का व असल्यास आपल्या मासिक खर्चात त्यासाठी तरतूद आहे का याचा विचार करा. अर्थात मोठ्या प्रकल्पांमध्ये असे खर्च विभागले जातात हेसुद्धा खरे आहे, त्यामुळे तुलना करण्यापूर्वी सोयीसुविधा व त्यांच्या देखभालीसाठी होणारा खर्च याचा थोडासा हिशेब करा.

या शिवाय सोसायटी मधील कार्यकारी समितीतील वेड्या (माफ करा मात्र ही वस्तुस्थिती आहे) सदस्यांनी अनेक निर्बंध लादल्यामुळे , भाड्याने राहणारी बहुतेक कुटुंब आता सोसायटी सदस्यांच्या भाडेकरूंकडून अशा अमानवी अपेक्षांना शरण जाण्यापेक्षा स्वतः घर घेण्याचा विचार करू लागली असतील. मी त्यांना दोष देत नाही, मी या काळात सोसायट्यांमधील अनेक भांडणे पाहिली आहेत, व्यवस्थापकीय समितीला असे वाटते की ते हुकूमशाह आहेत व सदनिका मालकांना असे वाटते की ते क्रांतिकारी आहेत, मात्र भाडेकरूंना काय वाटते याचा विचार कुणीच करत नाही. म्हणूनच भाडेकरू सध्या २ बीएचकेमध्ये राहात असतील तर त्यांनी आता तात्काळ घर खरेदी करण्याची वेळ झालीय, मग अगदी १ बीएचके का होईना भविष्याचा विचार करून घेतले पाहिजे; हा सुद्धा चांगल्या व्यवहाराचा एक पैलू असू शकतो. आता घरून काम करणे हासुद्धा एक पैलू आहे, मग उच्चभ्रू वसाहतीमध्ये १ बीएचके का थोडेसे लांब २ बीएचके घ्यायचे; हा पर्याय तुम्हीच निवडायचा आहे.

शेवटचे म्हणजे, व्यवहाराच्या बजेटविषयी; तर हा काळ कठीण आहे, नोकऱ्या कमी झाल्या आहेत, पगारात कपात होतेय पण आयुष्य मात्र सुरूच असणार आहे. मी म्हटल्याप्रमाणे, तुमच्या खिशाचा व तुमच्या गरजांचा केवळ आजचा नाही तर पुढील अनेक वर्षांचा विचार करा व केवळ त्यानंतरच तुम्ही जे काही खरेदी करत आहात त्याला फायदेशीर व्यवहार म्हणा (म्हणजेच चांगले घर). मी अनेक लोकांना त्यांच्या घरात आनंदाने राहताना पाहिले (भेटलो) आहे व त्यापैकी सर्वांना आपला व्यवहार किती फायदेशीर झाला (म्हणजे किती चांगले घर मिळाले) असा अभिमान वाटतो, पण कुणीही अशा फायदेशीर व्यवहारासाठी रिअल इस्टेटला (म्हणजेच बांधकाम व्यावसायिकांना) श्रेय देत नाही अशीही अनेक माणसे पाहिली आहेत ज्यांना घर खरेदी करून मनस्ताप झाला आहे व ते हा अतिशय वाईट व्यवहार आहे असे म्हणतात व रिअल इस्टेटला (म्हणजेच बांधकाम व्यावसायिकांना) दोष देत राहतात. तर आता हे वाचल्यानंतर तुमचे स्वतःचे घर खरेदी करताना फायदेशीर व्यवहाराविषयी तुम्हाला काय वाटते, त्यासाठी कोण जबाबदार आहे, तुम्ही की बांधकाम व्यावसायिक? 
अमित कलंत्रीने म्हटल्याप्रमाणे एका चांगल्या घरासाठी (म्हणजे फायदेशीर व्यवहार), जो खुल्या मनाने निवडतो, ज्याचा दृष्टीकोन सकारात्मक असतो व नजर भविष्यावर असते तोच लायक असतो. म्हणून घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांनो, आधी एक चांगले घर निवडा, त्याचा निश्चितपणे चांगला व्यवहार होईल!

संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
smd156812@gmail.com


No comments:

Post a Comment