“नेहमीप्रमाणे सकाळ झाल्यावर मला जाग आली मात्र आज काहीतरी विचित्र वाटत होते. माझा फ्लॅट सर्वात वरच्या मजल्यावर आहे त्यामुळे दररोज नवा दिवस सुरू करताना माझ्या बेडरूमची खिडकी माझ्यासाठी घड्याळाच्या गजराप्रमाणे काम करते. सकाळ होताच सूर्यकिरणे आणि मंद वाऱ्याची झुळूक खिडकीतून आत येते, कोकीळ, बुलबुल, भारद्वाज यासारख्या अनेक पक्षांचा किलबिलाट कानावर पडतो. आजही मी सवयीप्रमाणे बाहेर पाहिले, मात्र आज माझे नेहमीचे पाहुणे मला उठवायला आले नव्हते, मला बाहेर फक्त अंधार दिसत होता. माझ्या शरीराला सवय झाल्यामुळे सकाळी जाग आली. मी पलंगावरून उठलो, माझ्या बाल्कनीचा दरवाजा उघडला, बाहेर पडलो तर मला धक्काच बसला कारण बाहेर सगळीकडे धुके, अंधार आणि गुदमरायला लावणाऱ्या प्रदूषित हवेचे साम्राज्य पसरले होते. माझ्या इमारतीभोवती पूर्वी उंच झाडे होती, मात्र आता त्याजागी फक्त कार लावलेले दिसत होते. पक्ष्यांच्या किलबिलाटाऐवजी रुग्णवाहिकेचे कर्कश्श हॉर्न ऐकू येत होते व त्यांचे लाल-निळे दिवे चमकताना दिसत होते. असे म्हणतात की भीती हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे मात्र हाच सर्वात मोठा शत्रू तुम्हाला सर्वशक्तीनिशी लढायचे बळ देतो. मीसुद्धा माझ्या सर्व शक्तीनिशी घरात आलो आणि बाल्कनीचा दरवाजा धाडकन् लावून घेतला, मी पलंगावरून जवळपास खालीच पडलो होतो आणि तेवढ्यात मला जाग आली आणि वस्तुस्थितीची जाणीव झाली. धडधडत्या मनाने मी खिडकीबाहेर पाहिले, सूर्यप्रकाश, वाऱ्याची झुळूक, कोकीळ व मैनेचा किलबिलाट सगळे काही नेहमीसारखेच होते. मी पलंगावरून खाली उतरलो, मुख्य दरवाजा उघडला व वर्तमानपत्र हातात घेतले व त्यातील हसऱ्या चेहऱ्यासह मान्यवरांचे संदेश वाचल्यानंतर आठवले की आज जागतिक पर्यावरण दिन आहे! माझ्या सेलफोनवरही पर्यावरण दिनाच्या शुभेच्छांची बरसात होऊ लागली व मीसुद्धा खाली माझे नाव घालून ते फॉरवर्ड करण्यात व्यग्र झालो. प्रदूषणाने व्यापलेल्या व झाडे नसलेल्या जगाचे भीतीदायक स्वप्न पुन्हा एकदा कदाचित पुढील पर्यावरण दिनापर्यंत मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दूर लोटले गेले.
सामान्यपणे मी माझा लेख कुणा प्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या अवतरणाने सुरू करतो. मात्र आज आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी पाहिलेल्या स्वप्नाने सुरुवात करावी असा विचार केला. तुम्हाला असे वाटत असेल की हा फार जास्त टर्मिनेटरचे चित्रपट (जजमेंट डे) पाहण्याचा परिणाम आहे, तर विचार करा आपल्यापैकी कुणालाही असे वाटले होते का की तीन महिन्यांहून अधिक काळ आपल्याला घरात स्वतःला कोंडून घ्यावे लागेल व आपण वर्षभराहून अधिक काळ एका अदृश्य विषाणूच्या भीतीखाली जगू असा विचार कुणी केला होता का? सध्या, भोवताली जी परिस्थिती आहे त्याचे स्वप्नही कुणी पाहिले नव्हते, तर मग निसर्गाचा लवलेशही अस्तित्वात नाही अशा शक्यतेकडे तुम्ही दुर्लक्ष कसे करू शकता. आपण पुन्हा एकदा जीवनरक्षक साधनांच्या मदतीने कृत्रिम जगात बंदिस्त झालो आहोत व याचे कारण कुणी विषाणू नसून आपलेच कर्म आहे. असो, माझ्या जजमेंट डेसारख्या स्वप्नाविषयी चर्चा पुरे, आता आपण पर्यावरण दिनाविषयी बोलू”...
“आपल्याला पर्यावरणाचा दर्जा सुधारायचा असेल, तर सर्वांना सामावून घेणे हाच एकमेव मार्ग आहे”... रिचर्ड रॉजर्स
रिचर्ड जॉर्ज रॉजर्स, हा एक इटालियन-ब्रिटीश वास्तुविशारद आहे जो त्याच्या आधुनिक, व्यवहार्य, उच्च तंत्रज्ञानावर आधारित वास्तुरचनांसाठी प्रसिद्ध आहे व त्याच्या तत्वज्ञानाचे पालन करत, दरवर्षी ५ जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो व तो पर्यायावरणाचे संवर्धन करण्यासाठी जागरुकता व कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे एक महत्त्वाचे साधन आहे. हा दिवस पहिल्यांदा १९७४ साली साजरा करण्यात आला, तेव्हापासून सागरी प्रदूषण, मानवी लोकसंख्या विस्फोट, जागतिक तापमानात वाढ, संसाधनांचा शाश्वत वापर व वन्यजीवनाविरुद्ध होणारे गुन्हे यासारख्या पर्यावरणाशी संबंधित समस्यांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी ते एक व्यासपीठ झाले आहे. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी जनतेपर्यंत विविध मुद्दे पोहोचवण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ झाले आहे, ज्यामध्ये १४३ हून अधिक देश दरवर्षी सहभागी होतात. २०२१ची संकल्पना आहे “परिसंस्थेचे संवर्धन”. पर्यावरण दिनाचे दुर्दैव म्हणजे त्याचा हेतू अतिशय उदात्त आहे तरीही तो केवळ काही वर्गांपुरताच मर्यादित राहिला आहे.
एक म्हणजे, प्रामाणिकपणे काळजी घेणारे लोक (ज्यांना आपण पर्यावरणवादी) म्हणतो व काही स्वयंसेवी संस्था कारण हा वर्ग पर्यावरणासाठी खरोखरच काहीतरी भक्कम करण्याचा प्रयत्न करतो. दुसरी वर्गवारी म्हणजे आपले नेते (म्हणजेच राजकारणी व वरिष्ठ नोकरशहा) ज्यांना पर्यावरणासाठी त्यांचे प्रेम व जिव्हाळा दाखवावाच लागतो कारण त्यांना या दिवशी “सामान्य माणसाला” संदेश द्यायचा असतो. अलिकडे तयार झालेली तिसरी वर्गवारी म्हणजे समाजातील प्रसिद्ध व उच्चभ्रू वर्गातील व्यक्ती ज्यांना स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी पर्यावरण दिन हवा असतो, त्यांना प्रत्यक्षात पर्यावरणाच्या इतर कोणत्याही पैलूशी काही घेणेदेणे नसते. त्याचशिवाय लोकांची एक चौथी वर्गवारीही तयार झाली आहे जी “फॉरवर्ड करण्यात पटाईत” आहे म्हणजेच त्यांच्या चॅट बॉक्समध्ये जे काही येते ते ती फॉरवर्ड करते, त्यांच्यासाठी पर्यावरण दिन ही असे काही संदेश फॉरवर्ड करायची संधी आहे, एवढेच. उर्वरित अब्जावधी लोकांना पर्यावरण दिनाशी काहीही घेणेदेणे नसते व तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही स्वतःच अनुभव घ्या. उद्या सकाळी, तुम्ही ज्या दहा लोकांना सर्वप्रथम भेटाल, त्यांना यावर्षीच्या पर्यावरण दिनाची संकल्पना काय आहे हे विचारा व दहापैकी अगदी तिघांनीही बरोबर उत्तर दिले तर मी माझी पोस्ट डिलिट करून टाकेन, हाहाहा (मिशा काढून टाकेन वगैरेसारखी पैज)!
जेव्हा पर्यावरण दिनाची संकल्पना “निसर्गसाखळीचे संवर्धन” अशी असते तेव्हा सामान्य माणसाला पर्यावरण दिनाचे महत्त्व माहिती असेल अशी आपण जेवढी कमी अपेक्षा करू तेवढे चांगले. आपण पर्यावरणाशी संबंधित जागरुकता मोहिमा साध्या आणि सरळ का बनवू शकत नाही कारण जोपर्यंत तुम्हाला माहिती नसेल तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीची काळजी किंवा आदर कसा कराल हा साधा विचार बहुतेक सर्व माणसांना लागू होतो व पर्यावरण त्याला अपवाद नाही. पर्यावरणवाद्यांनी हे समजून घेणे व त्यानुसार कृती करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम किती लोकांना परिसंस्था म्हणजे काय हे माहिती आहे व त्यानंतर आपण त्याच्या संवर्धनाविषयी बोलू. कारण आपल्या देशात निम्म्याहून अधिक लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध होत नाही अशी परिस्थिती आहे. लोकहो, तुम्ही कुणाची चेष्टा करताय, पर्यावरण दिनाच्या अशा संकल्पना पाहिल्यानंतर पर्यावरणाचे भविष्य खरोखर काय असेल असा प्रश्न मला पडतो. मी केवळ करायची म्हणून टीका करत नाहीये मात्र आपण प्रत्येक माणसाला पर्यावरणाचे महत्त्व समजावूनच पर्यावरणाचे रक्षण करू शकतो व समजण्यासाठी एवढ्या अवघड संकल्पना असतील तर ते होणार नाही.
माणसाचा मेंदू सर्वात प्रगल्भ आहे अशी शेखी आपण मिरवत असलो तरीही माणूस (म्हणजे बहुतेक) मूर्खच आहे, कारण जेव्हा या मेंदूचा वापर करायची वेळ येते तेव्हा अतिशय कमी लोक सर्वात विकसित प्रजातीच्या व्याख्येमध्ये बसतात, हेदेखील इतिहासाने सिद्ध झालेले आहे, बरोबर? जेव्हा भविष्यासाठी काम करायची वेळ येते तेव्हा आपण बहुतेकवेळा आपले डोळे बंद करून घेतो व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण अतिशय लोभी प्रजातीही आहोत. कारण पृथ्वीवरील इतर कोणतीही प्रजाती जास्त खाद्य उपलब्ध असताना केवळ खायचे म्हणून खात नाहीत, आपण मात्र अनेकदा असे करतो. इतर कोणतीही प्रजाती त्यांच्याकडे एक घर असताना स्वतःसाठी आणखी तीन किंवा चार घरे बांधत नाहीत. इतर कोणतीही प्रजाती कपडे घालत नाही व त्यांनी घातले असते तरीही त्या एक-दोन जोडी कपडे तसेच मोजक्या साधनसामग्रीमध्ये समाधानी झाल्या असत्या. आपले मात्र तसे नाही, आपले कपाट कपडे तसेच आपल्या साधनसामग्रीमुळे ओसंडून वाहात असले तरीही “नव्या हंगामाचा सेल” जाहीर होताच रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते कारण आपल्याला वाहनांचाही तितकाच सोस असतो. इतर कोणतीही प्रजाती बाकीच्या प्रजातींना ते किती सधन व सक्षम आहेत हे दाखवत नाही. मी एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या तळमळीने बोलणाऱ्या कार्यकर्त्यासारखा वाटत असेन तर मला माफ करा, मात्र सत्य हे नेहमी कटू असते. मी केवळ उपदेश देण्यासाठी वरील गोष्टी सांगत नाही तर तथाकथित पर्यावरणवाद्यांना कोणत्या प्रजातीला तोंड द्यायचे आहे याची जाणीव व्हावी म्हणून हे बोलतोय, म्हणूनच तुमच्या जागरुकता मोहिमा त्यानुसार आखा.
पर्यावरण दिनासारख्या मोहिमा डिस्काउंट सेल सारख्या राबवता येणार नाहीत हे मान्य असले तरीही, विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ऑक्सिजनच्या मागणीत अलिकडे प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे कुठेतरी आपल्याला जाणीव झाली आहे (मला किमान आशा वाटते) की जजमेंट डेसारख्या गोष्टी इथे होऊ शकतात व आज जर लॉकडाउन आहे व एका विषाणूची दहशत आहे तर उद्या ताज्या हवेची कमतरता, दूषित पाणी, झाडे कमी होणे, एकाच प्रजातीची म्हणजे माणसांची संख्या वाढणे यासारख्या गोष्टी होऊ शकतात. या सगळ्या गोष्टीमुळे माणसाचे कायमस्वरुपी नुकसान यामुळेच होऊ शकेल. थोडक्यात माणूसच माणसाच्या मुळावर उठेल. म्हणूनच आपण पर्यावरणाची काळजी केली पाहिजे तरच सामान्य माणूस ते वाचवण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी तुम्हाला उंची कपडे घालणे किंवा उंची गाड्या खरेदी करणे, उत्तमोत्तम हॉटेलात खाणे यापैकी काहीही सोडून द्यावे लागणार नाही. तुम्ही तुमचे आयुष्य आरामदायक करताना फक्त इतर सर्व प्रजातींसाठी थोडी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. इतर प्रजाती केवळ त्यांच्या गरजा पूर्ण करतात तुम्हाला जशी असते तशी हाव त्यांना नसते.
मला असे वाटते आपल्यापैकी प्रत्येकाने, विशेषतः ज्यांना चांगल्या पर्यावरणाचे महत्त्व समजले आहे, त्यांनी इतरांना त्याची जाणीव करून दिली पाहिजे. आपल्याला ‘निसर्गसाखळीचे संवर्धन’ म्हणजे काय हे समजले आहे का हे महत्त्वाचे नाही, तर जेव्हा आपण “पर्यावरण वाचवा” असे म्हणतो तेव्हा आपल्याला काय व कशासाठी वाचवायचे आहे हे समजणे महत्त्वाचे आहे. एक मोठा वृक्ष म्हणजे निसर्गसाखळी, जो आपण रस्ते रुंदीकरणासाठी कापून टाकतो. शहरातून वाहणारी नदी म्हणजे निसर्गसाखळी जिच्यामध्ये कचारा टाकून व सांडपाणी सोडून आपण प्रदूषित करतो. एक मुंग्यांचे वारूळ म्हणजे निसर्गसाखळी ज्यामुळे जमीन सुपीक होते तसेच ते शेकडो कीटकांना आधार देते, मात्र आपल्या घरांसाठी आपण ते पाडून टाकतो. आपले समुद्र म्हणजे निसर्गसाखळी जे लाखो प्रजातींना सामावून घेतात, मात्र आपल्या जमीनीच्या हव्यासापोटी आपण त्यात भर घालून त्यांना सगळ्या बाजूंनी आत ढकलतो. एवढेच नाही तर आपण त्यामध्ये कचरा टाकून तो प्रदूषितही करतो. आपण जगातील सर्वोच्च पर्वताला म्हणजे एव्हरेस्टलाही सोडलेले नाही व आपण गिर्यारोहणासारख्या साहसी खेळांच्या नावाखाली तो प्रदूषित करत आहोत. आपल्या तथाकथित गरजांच्या नावाखाली दररोज एकेक निसर्गसाखळीचे नामशेष होत असतात. निसर्गसाखळी म्हणजे जीवन चक्र, ज्याप्रमाणे आपले पालक असतात, घर असते, अवतीभोवती शाळा असते ज्यामुळे आपण एक सुदृढ व्यक्ती म्हणून वाढतो व स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो. त्याचप्रमाणे, प्रत्येक प्रजातीचे स्वतःचे जीवनचक्र आहे ज्यामुळे त्या वाढू शकतात व स्वावलंबीपणे जगू शकतात. आपल्या अवतीभोवती अशा हजारो निसर्गसाखळी आनंदाने जगत होत्या ज्यांना आपण आपल्या गरजांच्या नावाखाली नष्ट केले आहे, ज्या खरेतर गरजा नव्हत्या तर आपला हव्यास होता. आपल्याला आता हे नुकसान कमी करायचे आहे, आपण आधीच जे खराब केले आहे ते पूर्वीसारखे करायचा प्रयत्न करायचा आहे. गंमत म्हणजे आपल्याकडे जुन्या इमारतींसाठी पुनर्विकास योजना व झोपडपट्ट्यांसाठी झोपडपट्टी पुनर्विकास योजना असते मात्र चिमण्या किंवा फुलपाखरांचे काय करायचे याची कुणालाही फिकीर नसते, जे खरेतर अतिशय सोपे काम आहे. चिमण्या किंवा फुलपाखरांना थोडी झाडे व हिरवळ हवी असते, मात्र जोपर्यंत आपण केवळ गगनचुंबी इमारतींसाठी आपली धोरणे तयार करत राहू तोपर्यंत फुले-झाडे बहरण्यासाठी काही जागाच उरणार नाही, हे लक्षात ठेवा. तोपर्यंत पर्यावरण दिनचे शुभेच्छा संदेश पाठवत राहा व स्वतःला अतिशय काळजी घेणारी, जबाबदार प्रजाती म्हणवून घ्या; कारण असेही आपण स्वतःला फसविण्यात पटाईत आहोत, नाही का??
http://visonoflife.blogspot.com/2021/06/environment-day-restoring-ecosystem.html
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
No comments:
Post a Comment