“काही गोष्टींना काळ पण नष्ट करू शकत नाही; यालाच कदाचित तुम्ही कालातीत म्हणता.”... माशोना धिलवायो
माशोना धिलवियो हे एक कॅनडातील तत्वज्ञ, उद्योजक व दि लिटिल बुक ऑफ इन्स्पिरेशन, क्रिएटीव्हीटी व इतरही अनेक पुस्तकांचे लेखक आहेत. एका तत्वज्ञाचे मन हे काळाच्या जगावरील आघातांविषयी नेहमीच उत्सुक असते, धिलवायो यांचे शब्दही तसेच आहेत. मी जेव्हा कडबनवाडी गवताळ प्रदेशाला भेट दिली (म्हणजे आणखी एकदा भेट दिली) तेव्हा कालातीत असण्याविषयी त्यांचे हे शब्द माझ्या मनात रुंजी घालत होते. मी पहिल्यांदा कडबनवाडीच्या गवताळ प्रदेशाला बरोबर दहा वर्षांपूर्वी भेट दिली होती व अगदी दहा वर्षांनंतरही इथल्या निसर्गसौंदर्याने माझे तसेच स्वागत केले. करड्या पठारावर व डोंगरावर पसरलेली पिवळ्या गवताची चादर, काटेरी झुडुपे, नैसर्गिक पाणवठे व या पार्श्वभूमीवर चिंकारा तसेच लांडगे विहार करताना सगळं
काही तसेच होते, खरोखर यालाच कालातीत असे म्हणतात. खरेतर काळ हा कडबनवाडीच्या गवताळ प्रदेशाचा शत्रू नाहीच, तर नेहमीप्रमाणेच या सुंदर अधिवासाचा शत्रूही माणूसच आहे.
मला माहितीय जे माझे लेख नियमितपणे वाचतात (मी तुमच्या संयमाला दाद देतो व त्यासाठी मी आभारी आहे) ते नक्कीच विचारात पडले असतील की या गवताळ भूप्रदेशावरून एवढा गहजब कशासाठी ज्याला आपण अधिवास म्हणतो, काहीवेळा गवताळप्रदेश म्हणतो (बहुतेकवेळा) किंवा साल वृक्षांचे वन किंवा बांबूचे वन किंवा एखाद्या पर्वतावरील झाडेझुडुपे किंवा एखाद्या ओढ्याच्या किंवा नदीच्या (खरेतर नाले) काठी असलेली वृक्षराजी किंवा इतरही काही नावाने संबोधतो, आपल्यासमोर लॉकडाउननंतर पूर्वपदावर येताना इतर एवढ्या गंभीर समस्या आ वासून समोर उभ्यास असताना या सगळ्यांमुळे खरोखरच काही फरक पडतो का असे त्यांना वाटत असेल? आपली नोकरी, आपला व्यवसाय किंवा आपल्या मुलांचा शाळेतील प्रवेश, त्यांचे महाविद्यालयाचे शुल्क किंवा आपल्या कर्जाचे वाढत चाललेले हप्ते या सगळ्या बाबी अधिक महत्त्वाच्या नाहीत का व एखादा गवताळप्रदेश धोक्यात आहे यापेक्षाही वरील सगळ्या बाबी आपल्या जीवन मरणाचा प्रश्न नाहीत का? या सगळ्या बाबी अर्थातच जीवन मरणाचा प्रश्न असल्या तरीही वर दिलेली यादी आपणच ठरवून मान्य केलेल्या गोष्टींची आहे, बरोबर? पण या अधिवासामध्ये असलेले सर्व प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, मासे, वृक्ष, वेली व अगदी गवताचे काय, आपण आपली निवड त्यांच्यावर लादत असल्यामुळे त्यांच्यावर नक्कीच ताण आला असेल, जो त्यांनी निवडलेला नाही. आपण त्यांना जीवन मरणाच्या प्रश्नांना तोंड द्यायला भाग पाडतो आहे ज्यावर त्यांच्याकडे काही तोडगा नाही, जसा आपल्याकडे आपल्या समस्यांवर असतो.
कडबनवाडी हा पुण्याच्या पूर्वेकडील भागात दख्खनच्या पठारावरील पर्जन्यछायेच्या प्रदेशातील साधारण ३० चौरस किलोमीटरचा पट्टा आहे जो सातारा रस्ता ते सोलापूर रस्त्यापर्यंत व पुढे नगर रस्त्यापर्यंत पसरलेला आहे म्हणजे पुणे शहराच्या बाह्य भागात दक्षिणेपासून ते उत्तरेपर्यंत अर्धवर्तुळाकृती पसरलेला आहे. कडबनवाडीसारखे इतरही अनेक प्रदेश किंवा बेटे कोणे एकेकाळी जोडलेली असतील व ज्यामुळे लांडगे, सर्प , गरुड, चिंकारा व इतरही अशा अनेक प्राण्यांसाठी व पक्ष्यांसाठी स्वच्छंद विहार करण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध झाली असेल. मात्र हळूहळू आपण (म्हणजे माणसांनी) आपल्या निवडी त्यांच्यावर लादायला सुरुवात केली व आपण त्यांचे सर्व मार्ग तोडून टाकले व त्यांना लहान लहान प्रदेशांमध्ये जगण्यासाठी भाग पाडले. कडबनवाडीही असाच एक भाग आहे व हा भागही हळूहळू आक्रसतोय. हाच पैलू मला ठळकपणे मांडायचा होता किंवा मला त्याविरुद्ध आवाज उठवायचा होता व मला वन्यजीवनाच्या या पैलूंविषयी अगदी शंभरवेळाही लिहावे लागले तरीही माझी हरकत नाही, कारण आपण आपल्या भविष्याचे जे काही नुकसान करत आहोत त्याविषयी माणसाला जाणीव करून देण्याचा हा एक मुख्य मार्ग आहे.
मी कडबनवाडीमध्ये दहा वर्षांमध्ये झालेला जो मोठा बदल पाहिला तो संरक्षित क्षेत्राविषयी नव्हता कारण प्रवेश करताच लांडग्यांचे एक कुटुंब आमच्या नजरेस पडले, ज्यामध्ये दोन पिल्लांचाही समावेश होता. मला तुम्हाला सांगावेसे वाटते, विशेषतः जे जंगलात जात नाहीत त्यांना, की लांडगा हा शब्द आपण आपल्या मातृभाषेत अनेकवेळा वापरत असलो तरीही, एखाद्या व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ दिसण्यापेक्षाही लांडगा दिसणे दसपट अवघड असते. याचे कारण म्हणजे लांडगा हा अतिशय लाजाळू निशाचर (बहुतेकवेळा रात्री भटकंती करणारा) प्राणी आहे, त्याच्या आयुष्यात मानवी हस्तक्षेपाचा सतत धोका असल्यामुळे तो आपले अस्तित्व दाखविण्याच्याबाबतीत अधिक लाजाळू झाला आहे व काळजी घेतो. आम्हाला लांडग्यांचा कळप पाहून अतिशय आनंद झाला, मात्र अंतरामुळे व कळप चालत होता त्यामुळे स्पष्ट छायाचित्रे घेणे शक्य नव्हते मात्र आम्हाला ते किमान दृष्टीस पडले व त्यांना पाहणे हा एक निखळ आनंददायक अनुभव होता. अजुनही या गवताळ प्रदेशातील जीवन चक्राचा एक महत्त्वाचा दुवा असेला हा अद्भूत प्राणी टिकून आहे व संख्येने वाढतोय. त्याचवेळी आम्ही जवळपास तासभर आकाशातील चित्तथरारक नाट्य पाहात होतो. आधी एका सर्प गरुडाने सापाची शिकार केली त्यानंतर हा गरूड व जंगली कावळ्यांमध्ये “फास्ट अँड फ्युरिअस”सारखा हवेतील पाठलाग झाला, ज्यामध्ये अखेरीस गरुडाने यशस्वीपणे कावळ्यांना बगल दिली व तो बाभळीच्या झाडावर येऊन बसला व सापाचे भक्षण केले. तो नंतर त्याच्या घरट्यात गेला व गिळलेला साप बाहेर काढून आपल्या पिल्लांना भरवला, जी अन्नासाठी भुकेली होती. या जमीनीच्या लहानशा तुकड्यावर कितीतरी पाहण्यासारखे, शिकण्यासारखे व आनंद मिळवण्यासारखे होते, म्हणूनच अशा भटकंतीसाठी प्रत्येकाने वेळ काढला पाहिजे. मात्र कडबनवाडीच्या सुरक्षित क्षेत्राबाहेर जे काही सुरू आहे ते अतिशय दुर्दैवी (किंवा धोकादायक) आहे म्हणजे, फार्म हाउससाठी भूखंड पाडणे, बंगले बांधणे, शेती, मुरुमासाठी (बांधकाम साहित्य) उत्खनन, या भूखंडातून जाणारा रस्ता, हे सगळे लांडग्यांसाठी व कडबनवाडीच्या सर्व रहिवाशांसाठी धोकादायक आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे संरक्षित क्षेत्रात वन विभाग करत असलेल्या प्रयत्नांविषयी पूर्णपणे आदर राखत मला असे म्हणावेसे वाटते की जंगलांना जास्त त्रास हा बाहेरून जास्त होतो. ज्याप्रमाणे ताडोबासारख्या व्याघ्र प्रकल्पामध्ये आणखी वाघ सामावून घेताना अडचण होते, त्याचप्रमाणे इथे लांडग्यांचे होत आहे ते या गवताळ प्रदेशाच्या जंगलाचे वाघ आहेत. म्हणूनच जर लांडग्यांसाठी पुरेशी जमीन नसेल, चिंकारा, वा इतर तृणभक्षी प्राणी यासारख्या त्यांच्या सावजासाठी पुरेशी जमीन नसेल तर परिणामी संपूर्ण जीवनचक्र नष्ट होते व हा निश्चितच या प्रजातींनी निवडलेला पर्याय नाही, बरोबर?
आम्हा वन्यप्रेमींच्या (सहा समविचारी मित्रांचा एक लहानसा गट) या भटकंतीसंदर्भात दोन घटना मला नमूद कराव्याशा वाटतात. या गटातील आमच्या एका मैत्रिणीने जिचा ही सहल आयोजित करण्यात मोठा वाटा होता, तिने ऐनवेळी येणे रद्द केले कारण त्या दिवशी तिचे काही नातेवाईक घरी येणार होते. बरेच जण म्हणतील त्यात काय मोठेसे, सगळ्या (म्हणजे बहुतेक) बायकांना त्यांच्या कुटुंबाला व त्याच्याशी संबंधित कर्तव्यांनाच प्राधान्य द्यावेच लागते. हे बरोबर असले तरी तिच्याजागी कुणी पुरुष असता तर त्याला अशा कारणासाठी जंगलाची ही सहल रद्द करावी लागली असती का हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. तुम्हाला त्याचे जे काही उत्तर मिळेल त्यासाठी तुम्हाला जे करायचे असेल ते करा. माझी ही मैत्रीण जंगल बेल्स नावाची संस्था चालवते जी महिलांना वन्य जीवनाची ओळख करून देते तसेच त्यांच्या दैनंदिन जीवनातील ताण तणाव कमी करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जाते, असे असताना तिलाही सहलीला न येण्यासाठी भटकंतीसाठी इच्छुक तिच्या महिला गणांच्या अशा कारणांना तोंड द्यावे लागते. दुसरे म्हणजे या सहलीनंतर लगेच जंगल बेल्सने एक वेब परिसंवाद आयोजित केला होता, ज्यामध्ये गुजरातचे प्रधान मुख्य वन संरक्षक श्री. अशीम श्रीवास्तव, यांनी गुजरातच्या वन्यजीवनाविषयी माहिती दिली. या वेब परिसंवादामध्ये सहभागी झालेल्या एका तरुण मुलीने गवताळ प्रदेशातील फ्लोमिंगोच्या छायाचित्रे पाहिल्यानंतर त्यांना प्रश्न विचारला की या पक्ष्याचा उपयोग काय?
अशीम सर हा प्रश्न ऐकून थोडे गोंधळात पडले व त्यांनी या पक्ष्याचा काय उपयोग आहे यातून तिला नेमके काय म्हणायचे आहे असे विचारले? त्या मुलीने उत्तर दिले की ज्याप्रमाणे कोंबडी आपल्याला अंडी देते, तसा हा पक्षी आपल्याला काय देतो? अशीम सरांनी तिला अतिशय संयमाने समजावून सांगितले की केवळ फ्लोमिंगोच नाही तर प्रत्येक प्रजातीची निसर्गामध्ये एक विशिष्ट भूमिका असते व म्हणूनच प्रत्येक पक्षी आपापल्यापरीने उपयोगी असतो. त्या मुलीचे उत्तराने समाधान झाले. मात्र “पक्ष्याचा उपयोग काय” हा प्रश्न माझ्या मनात घोळत राहिला कारण या प्रश्नातून आपल्यासारख्या प्रौढ व्यक्ती केवळ वन्यजीवनच नाही तर इतर सर्व प्रजातींविषयी कसा विचार करतात हे दिसून येते. आपण केवळ इतर प्रजातीच्या उपयोगितेचाच विचार करतो व निसर्गाविषयी अशा लोभी विचारसरणीतून आपण पुढच्या पिढीची मानसिकताही एकप्रकारे भ्रष्ट करत आहोत यात शंका नाही. ही मानसिकताच कडबनवाडीसारख्या कालातीत सौंदर्य असलेल्या अनेक ठिकाणांसाठी धोका आहे.
गंमत म्हणजे आपल्याला समस्या माहिती आहे व उपायही माहिती आहे तरीही या उपाययोजनेची अंमलबजावणी करायची असते तेव्हा तिची जबाबदारी कोण घेणार म्हणून सगळेजण एकमेकांकडे पाहात असतात. बिचारे लांडगे मात्र उपायासाठी आपल्या सगळ्यांकडे आशेने पाहात आहेत. माझ्यामते उपाय हा महसूल विभाग व प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी व संबंधित विभागांचे मंत्री यांच्याच हातात आहे. या देशातील जमीनीच्या प्रत्येक इंचावर व त्याच्या वापरावर या दोन वर्गातील लोकांचेच नियंत्रण असते. जोपर्यंत लांडगे व चिंकारांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक जमीनीची गरज आहे असे हे लोक ठरवत नाहीत तोपर्यंत या प्रजातींना अगदी देवही जमीन देऊ शकत नाही! ते आधी जनतेचे सेवक आहेत हे मान्य असले तरीही, या जनतेमध्ये केवळ माणसांचाच नाही तर लांडगे व चिंकारांचाही समावेश करण्याची वेळ आलीय याची जाणीव त्यांना झाली पाहिजे. हे प्राणी केवळ मतदान करू शकत नाहीत, मात्र तो त्यांनी नाही तर आपण निवडलेला पर्याय आहे. शेवटी फक्त एकच विचार मांडावासा वाटतो (म्हणजे “वैधानिक इशारा” द्यावासा वाटतो), आपण निवडलेल्या पर्यायामुळे जर कडबनवाडीसारख्या काळाच्या ओघातही तग धरून राहिलेल्या गवताळप्रदेशाचा नाश झाला किंवा ते नष्ट झाले तर एक दिवस आपण निवडलेल्या पर्यायामुळे आपला सुद्धा विनाश होईल हे लक्षात ठेवा, तो दिवस फार लांब नाही!
You can read in English version:
http://visonoflife.blogspot.com/2021/06/kadbanwadi-grassland-timeless-beauty.html
संजय देशपांडे
A
Team Sanjeevani & Jungle Belles, Wildlife Awareness Initiative.
No comments:
Post a Comment