Monday, 5 July 2021

चांगले बाबा, वाईट बाबा व फादर्स डे!

 










माझे बाबा माझ्यासोबत माझ्या बहिणीसोबत अंगणात खेळत असत. माझी आई बाहेर येऊन ओरडत असे, अरे तुम्ही माझी बाग पायदळी तुडवताय. त्यावर माझे वडील उत्तर देत आपण मुलांना वाढतोय, बागेला नाही”... हार्मन किलेब्रू

हार्मन क्लेटन किलेब्रू ज्य., ज्यांचे टोपणनाव होते किलर, हे अमेरिकी व्यावसायिक बेसबॉलपटू होते ते प्रथम बेसमॅन म्हणून खेळत. त्यांचा खेळ तडाखेबाज होता, त्यांच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत ते मिनेसोटा ट्विन्स संघासोबत सर्व महत्त्वाच्या बेसबॉल लीगमध्ये खेळले. मी हार्मन यांच्या वडिलांना ओळखत नाही, मात्र त्यांचे वडील असे होते म्हणूनच कदाचित ते तडाखेबाज बेसबॉलपटू झाले. अगदी अलिकडे माझ्या एका मित्राने मला मी वडिलांविषयी काहीतरी लिहू शकतो का असे विचारले. कारण कौटुंबिक पातळीवर जेव्हा कौतुक होते तेव्हा आईविषयी बरेच काही लिहीले जाते सामान्यपणे वडील हा घटक नेहमीच दुर्लक्षित असतो. खरोखरच वडिलांचे फारसे कोडकौतुक होत नाही त्यांच्याविषयी फारसे लिहीलेही जात नाही. मात्र आपला समाज हा पुरुष प्रधान असल्यामुळे असे होणे स्वाभाविक आहे. मात्र जेव्हा आईचा (एकूणच महिलांचा) खरा गौरव करायची वेळ येते तेव्हा ते आपण अतिशय उथळपणे वा दुटप्पीपणे करतो, असो हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे, ज्याविषयी पुन्हा कधीतरी लिहीन. 

दरवर्षी २० जूनला (किंवा जूनच्या ३ऱ्या रविवारी) जगभरात फादर्स डे साजरा केला जातो, जो आता येऊ घातलाय. माझ्या पिढीसाठी (म्हणजे जे आता चाळीशीत किंवा पन्नाशीत आहेत) आम्ही ज्याप्रकारे मोठे झालो तेव्हा प्रत्येक दिवस हा निःसंशयपणे फादर्स डेच असे. म्हणूनच कदाचित वडिलांविषयी किंवा बाबांविषयी फारसे लिहीले गेले नाही, अर्थात वडील-मुलगा/मुलगी यांच्या नात्याविषयी हॉलिवूडमध्ये लायन किंग अलिकडे गुड डायनॉसॉर यासारख्या अतिशय सुंदर चित्रपटांची निर्मिती मात्र झाली (त्यातले बहुतेक डिस्नेचे होते हे सांगणे लागे). वडिलांसोबतच्या या नात्याने लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या मार्व्हलच्या सुपर हिरोनाही भुरळ घातली. या चित्रपटांमधील आयर्न मॅन आपल्या वडिलांसोबत काल प्रवासात थोडा वेळ घालवतो  तसेच ब्लॅक पँथर जेव्हा त्याच्या वडिलांच्या आत्म्याला भेटतो तेव्हा काही हृदयस्पर्शी संवाद ऐकायला मिळतात. वडिल-मुलाच्या नात्याचा हा भावनिक बंध यशाचे हमखास समीकरण झाले आहे. इन्फिनिटी वॉरमधील थॅनॉस या खलनायकाचे त्याची दत्तक मुलगी गॅमोरा हिच्याशी अतिशय विशेष नाते आहे तो तिच्यावर इतके प्रेम करतो की जेव्हा अनमोल रत्न मिळवण्यासाठी रत्नाचा रक्षक त्याला  त्याची सर्वात प्रिय  गोष्टींचा त्याग करायला सांगतो तेव्हा थॅनॉस मुलीलाच ठार करतो. आपल्या बॉलिवुडविषयी सांगायचे झाले तर वडील मुलाच्या नात्याविषयी बोलायचे असेल तेव्हा शक्ती चित्रपटातील ट्रॅजिडी किंग दिलीपकुमार विरुद्ध अँग्री यंग मॅन अमिताभची जुगलबंदी आपण कसे विसरू शकतो, ज्यामध्ये चुकीच्या मार्गाला लागलेल्या मुलाला त्याचे पोलीस  असलेले वडीलच ठार मारतात. अर्थात या भावनिक खेळामुळे तिकीटबारीवर चित्रपर यशस्वी ठरतात त्याच वावगे काहीच नाही कारण मनोरंजन उद्योगामध्ये  तुम्ही असेच पैसे कमवता. खऱ्या आयुष्यामध्ये मात्र मुले वडिलांना चार हात लांबच ठेवू पाहतात बऱ्याच वडिलांनाही तेच योग्य वाटते.

यासंदर्भात मला माझा एक वैयक्तिक अनुभव सांगावासा वाटतो. मी तेव्हा १२ वर्षांचा होतो रामसे बंधुंचा एक भयपट बघायला गेलो होतो (ते भयपटांची सुध्दा निर्मिती करायचे). मी जेव्हा चित्रपटगृहात पोहोचलो (टॉकीज) तेव्हा आधीचा ते चा खेळ संपत आला होता. मात्र माझ्या बाबांना खामगाव या लहानशा गावातील सगळेजण चांगले ओळखत असल्यामुळे, सुरक्षा रक्षकाने मला आत बसायची परवानगी दिली मी चित्रपटाचा शेवट आधी पाहिला. त्यामध्ये थडग्यातून मृतदेहाचा हात बाहेर येतोय वगैरेसारखी दृश्ये पाहून मी कमालीचा घाबरलो माझा खेळ सुरू होण्याआधीच घरी परतलो. घरी गेल्यावर मला धक्काच बसला कारण बाबा त्यादिवशी लवकर घरी आले होते मी चित्रपट का पाहिला नाही असे त्यांनी मला विचारले. मी तेव्हा अगदी निरागस आणि मूर्ख होतो (तो मी अजूनही आहे) मी त्यांना अगदी खरेखरे सांगितले की मी कसा चित्रपटाचा शेवट आधी पाहिला तो किती भीतीदायक होता त्यामुळे मी कसा घरी निघून आलो. माझ्या वडिलांनी मला परत पाठवले मी संपूर्ण चित्रपट पाहिला तरच मला घरात यायची परवानगी असेल अशी तंबी दिली. ते कधीही फुसक्या धमक्या देत नसत (मी त्यांच्याकडून ही आणखी एक गोष्ट शिकलो) म्हणून मी परत गेलो. आता चित्रपटाचा शेवटचा म्हणजे ते १२ चा खेळच बाकी होता. मी संपूर्ण चित्रपट डोळे बंद करून पाहिला एकटा घरी चालत आलो जे शहराच्या बाह्य भागात होते. माझे बाबा अंगणात बसून माझी वाट पाहात होते. ही घटना साधारण चाळीस वर्षांपूर्वी झाली, चित्रपटाचे नाव होते हॉटेल मला अजूनही त्या रात्री घरी येताना टाकलेले प्रत्येक पाऊल आठवतेय. माझ्या वडिलांना ही घटना आता कदाचित आठवतही नसेल कारण त्यांच्यासाठी तो फक्त आयुष्याच्या वर्गातला आणखी एक धडा होता मात्र माझ्यासाठी तो माझ्या भीतीवर मात करण्याचा पहिला धडा होता मला तो कायमचा लक्षात राहिला.

म्हणूनच मला हार्मनच्या वडिलांच्या भावना अगदी समजू शकतात कारण माझ्या अनुभवानंतर मी कशालाच घाबरत नाही असे म्हणणार नाही, मला अजूनही अनेक गोष्टींची भीती वाटते. मात्र त्या दिवसापासून मी माझ्या भीतीला पाठ दाखवून कधी पळ काढला नाही. नेमक्या असल्याच कारणांमुळे मुलाची किंवा मुलीची किंवा अगदी आईचीही वडिल नावाच्या व्यक्तीशी कधीच फारशी गट्टी नसते त्यांना आदरही मिळत नाही. पण म्हणूनच वडील विशेष असतात, कारण त्यांना माहिती असते त्याचे निकटवर्तीय त्याच्यावर नाराज होतील, त्याला नावे ठेवतील मात्र त्याला त्याच्या कुटुंबासाठी जे सर्वोत्तम वाटते तेच एक बाप कायम करत असतो. कदाचित याच कारणामुळे आई नेहमी प्रकाशझोतात असते कारण मुलांसाठी ती नेहमी मवाळ पोलीसाच्या भूमिकेत असते तर वडील (बहुतेक जण) कठोर पोलीसाच्या भूमिकेत असतात. त्यांनी आपल्या मुलांना वाढवताना ही कठोर पोलीसाची भूमिका मूकपणे स्वीकारलेली असते, म्हणूनच वडील विशेष असतात. आधुनिक मानसोपचार तज्ञांची विचारसरणी मुलांना हाताळण्याची वेगळी पद्धत आहेत्यामुळे आता जुन्या वळणाच्या वडिलांची जागा आधुनिक युगातील बाबाने घेतली आहे. मुले या नव्या युगातील वडिलांना बरेचदा बाप किंवा अगदी त्यांच्या पहिल्या नावानेही हाक मारतात (मी वयाच्या ५२व्या वर्षीही माझ्या वडिलांच्या बाबतीत हे धाडस करायचा विचार करू शकत नाही), हे नवे बाबा त्यांच्या मुलांचा ओरडा खाऊ शकतात चिडचिडही सहन करू शकतात प्रत्युत्तरादाखल हसू शकतात. ते त्यांच्या मुलांना दिवसभर आपल्यासोबत दिवसभर भटकंती करायला घेऊन जातात कुठे जायचे हे सुद्धा मुले ठरवतात, ते त्यांच्या मुलांना मारत नाहीत किंवा त्यांच्याशी बोलताना आवाजही वाढवत नाहीत. हे आधुनिक बाबा आपल्या कामाचा ताण घेऊन घरी जात नाहीत, हे फारच भारी आहे अशा बाबांना बघून मी थक्क होतो. पण बाबा जेव्हा असे असतात तेव्हा आईलालाच कठोर पोलीसाची भूमिका बजावावी लागते! मला अशा वडिलांविषयी बालमानसशास्त्राविषयी आदर वाटतो. मात्र कुठेतरी आमच्यात या नव्या सहस्त्रकातील मुलांमध्ये काहीतरी मोठा फरक आहे. अर्थात मवाळ पोलीसांची भूमिका बजावणाऱ्या वडिलांविषयीचे हे माझे मत झाले (पूर्णपणे वैयक्तिक). हसरा, आनंदी, नाचणारा सतत चांगलेच वागणारा बाबा असण्यात काहीच वाईट नाही, सर्व मुलांना असे बाबा आवडतील (मलाही आवडले असते) पण जेव्हा तुम्हाला एखादे उद्दिष्ट गाठायचे असते तेव्हा केवळ एवढेच पुरेसे नसते. त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचा मार्ग केवळ मखमली हिरवळीतून जात नाही तर भयाण जंगले आणि रखरखीत वाळवंटेही पार करावी लागतात   आधीच्या पिढीतील वडील आयुष्यातल्या या अडीअडचणींसाठी आम्हाला प्रशिक्षण देत असत, तयार करत असत कारण त्यांनी स्वतः आयुष्यात टक्केटोणपे खाल्लेले असत. म्हणून ते स्वतः आम्हाला अशा अडीअडचणींना तोंड द्यायला लावत, जे सध्या होताना दिसत नाहीपरिणामी, नव्या पिढीतील मुले आयुष्याच्या कोणत्याही आघाडीवर पराभवाला तोंड देऊ शकत नाहीत, तो पचवू शकत नाहीत किंवा त्रास सहन करू शकत नाहीत, त्यामुळे अशा परिस्थितीतून शिकणे नव्याने उभे राहणे तर लांबच राहिले, हे कटू सत्य आहे. म्हणूनच वडील कधीतरी कठोर पण  असणे महत्त्वाचे असते, कारण माझ्या बाबांनी मला का मारले ते शेवटी आपल्या हिताचे का होते याचा विचार करायला आपण प्रवृत्त होतो. माझ्या बाबतीतही आज तसेच झाले म्हणूनच हा लेख लिहीताना माझे डोळे पाणावले , हा खरेतर मी माझ्या वडिलांप्रती व्यक्त केलेला आदर आहे, ते जेव्हा हे वाचतील तेव्हा त्यांना तो जाणवेल! आणि हो मला माहितीय माझ्या वडिलांच्या डोळ्यातूनही दोन थेंब गालावर ओघळतील (फक्त दोन, जास्त नाही), मात्र ते मला हे कधीच सांगणार नाहीत. म्हणूनच माझे माझ्या बाबांवर अतिशय प्रेम आहे मला त्यांचा खूप अभिमान वाटतो कारण मी जो काही आहे तो त्यांच्यामुळे सुध्दा आहे. त्यांनी त्यांच्या मुलासाठी जे काही केले म्हणून मी त्यांच्यासारखे व्हायला पाहिजे असा अर्थ होत नाही. मी आता स्वतःही एक वडील असल्यामुळे मी त्यांच्यापेक्षाही चांगले होण्याचा प्रयत्न करेन, मला असे वाटते ते माझ्याकडून अशाच प्रकारच्या आदराची अपेक्षा करतील. कारण चांगले बाबा किंवा वाईट बाबा असे काहीच नसते मात्र चांगला मुलगा किंवा वाईट मुलगा मात्र नक्कीच असतो. तुम्ही तुमच्या वडिलांकडून काय घेता यावर ते अवलंबून असते, असा माझा ठाम विश्वास आहे

 

You can read in English version:

http://visonoflife.blogspot.com/2021/06/good-dad-bad-dad-fathers-day.html 


संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स 

smd156812@gmail.com

 

 

 











No comments:

Post a Comment