“टेकड्या,जंगले व तलाव यासारख्या शांततेच्या जागा नष्ट होत चालल्यात. या शांततेमध्येच आपण आपल्या आतील आवाज स्पष्टपणे ऐकू शकतो, जो आपल्याला खऱ्या अर्थाने शांतता देतो.” … जेम्स रोझॉफ
“मी जादुविषयी पुस्तके लिहीतो. पण या जादूमध्ये जादुची छडी व मंत्र पुटपुटण्याचा समावेश होत नाही, तर ही जादू आहे जगण्याची. जादू म्हणजे बाह्य जगाने आपल्यावर लादलेल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली न दबता जीवन पाहण्याच्या क्षमता. पलायनवादी कला म्हणजे आपल्याला जखडून ठेवणाऱ्या कृत्रिम बंधनातून मुक्त होण्याची क्षमता. आपण अगदी अलगदपणे मतमतांतरांमध्ये गुरफटून जातो, ज्यामुळे आपल्याकडे असलेल्या संधी मर्यादित होतात व आयुष्य किती जादुई असू होऊ शकते याची दृष्टी सहजगत्या हरवते. असे होऊ देऊ नका.” “सेव्हन स्टोन्स” नावाच्या अतिशय सुंदर पुस्तकाच्या या लेखकाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. म्हणूनच त्याच्या अवतरणासोबतच मी त्याने स्वतःविषयी जे लिहीले आहे तेच शब्द वापरलेत! मी पुण्याभोवतालच्या गवताळ प्रदेशाविषयी
लिहीण्याची वर्षभरातील ही तिसरी वेळ आहे व अनेकजण म्हणतील की मला गवताळ पट्ट्यांचे अतिशय आकर्षण आहे व त्यांचे बरोबरच आहे. मला गवताळ प्रदेशांचे
आकर्षण असण्याची दोन कारणे आहेत, एक म्हणजे लॉकडाउनच्या संपूर्ण दीड वर्षांच्या कालावधीत आपल्यापैकी पुण्यातील बहुतेकजण जेव्हा घनदाट जंगलात जाऊ शकत नव्हते, तेव्हा याच जंगलांनी वन्यजीवनाशी असलेले आपणां
सगळ्यांचे नाते टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला आधार दिला (किमान मला तरी). दुसरे म्हणजे या पट्ट्यांना वारंवार भेट देऊन मला या गवताळ प्रदेशांमध्ये वसणाऱ्या जैवविविधतेचे सौंदर्य व ते नामशेष होण्याचा किती धोका आहे हे जाणवत आहे आणि
सगळ्या लोकांसमोर हा मुद्दा ठामपणे मांडला पाहिजे, नाहीतर लवकरच गवताळ प्रदेश कायमचे नष्ट होतील हे सांगण्यासाठी
हा माझा एक प्रयत्न आहे.
हे गवताळ प्रदेश व जमिनीचे अनेक तुकडे एकप्रकारे जंगलांचे ब्रँड अँबॅसेडरच असतात. ते टेकड्या, दलदल, ताज्या पाण्याचे स्रोत व छोटे-छोटे हिरवे पट्टे अशा माध्यमातून आपल्याभोवती सगळीकडे असतात, मात्र शहरीकरणाच्या कर्करोगामुळे ते शेवटच्या घटका मोजत आहेत. हे “माणसाच्या जीवनाला प्राधान्य” यासारख्या नावाखाली आपण निसर्गावर एक प्रकारे केलेले अतिक्रमणच आहे! खरे सांगायचे, तर आपल्याला शहरीकरण ही संकल्पना नेमकी समजली आहे का असा प्रश्न मला पडतो. शहरीकरण म्हणजे आधुनिक किंवा तांत्रिक सुखसोयींनी युक्त असे मानवी जीवन, मात्र याचा अर्थ असा होत नाही की त्यामध्ये इतर प्रजातींसाठी ”जागाच नसावी”, जे आपण सध्या करत आहोत. याच कारणामुळे मला गवताळ पट्ट्यांविषयी पुन्हा-पुन्हा लिहावेसे वाटते, कारण पुणे शहराच्या अवती-भोवती अनेक गवताळ पट्टे आहेत. मी दरवेळी जेव्हा या वन्यजीवनाने समृद्ध प्रदेशांना भेट देतो तेव्हा मला त्यांना असलेला धोका प्रकर्षाने जाणवतो. त्याचप्रमाणे लोकांना या गवताळ प्रदेशांविषयी तसेच आपल्याभोवती असलेल्या जंगलाच्या इतर पट्ट्यांविषयी त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे हा त्यांच्या संवर्धनाचा एक मार्ग आहे (जे मी करत आहे). आम्हाला यावेळी यासाठी श्री सतीश मगर व मगरपट्टा सिटी डेव्हलपमेंट (एक नावाजलेली रिअल इस्टेट कंपनी) यांच्यामुळे एक उत्तम संधी मिळाली. त्यांच्यामुळे आम्हाला “वाईल्ड, वाईल्ड पुणे” (जंगल बेल्स, नेचर वॉक चमू व विनोद बारटक्के) हा माहितीपट तयार करता आला, ज्यामध्ये पुण्याभोवतालच्या समृद्ध वन्यजीवनाचे चित्रण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. माझ्यामते अशाप्रकारचा माहितीपट बनविण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच करण्यात आला असावा, कारण लांडगा किंवा चिंकारांचे चित्रण करणारे असे अनेक सुंदर माहितीपट तयार करण्यात आले आहेत (मात्र ते फारसे लोकप्रिय झाले नाहीत कारण त्यांची फारशी प्रसिद्धी झालेली नाही). मात्र पुण्याच्या आजूबाजूचे संपूर्ण वन्यजीवन व त्यांची वसतिस्थाने याविषयी एखादा माहितीपट तयार करण्यात आल्याचे किमान माझ्यातरी ऐकिवात नाही. या माहितीपटासाठी मी पुण्याभोवतालच्या जंगलांना (किंवा जंगलांच्या भागांना) अनेकदा भेट दिली. एकीकडे या प्रदेशांमधील समृद्ध वन्यजीवन पाहून थक्क व्हायला होत होते, तर दुसरीकडे ही जंगले झपाट्याने आक्रसत चालल्याने धोक्याची घंटाही वाजू लागली आहे. आपल्याला कदाचित माहितीही नसेल (आपल्यापैकी बहुतेकांना) मात्र फुलपाखरापासून ते पाकोळीपर्यंत, बेडकापासून ते पक्ष्यांपर्यंत ते सस्तन प्राण्यांपर्यंत, पुणे शहराला तसेच प्रदेशाला शेकडो वेगवेगळ्या प्रजातींचे वरदान लाभले आहे. तसेच इथे काही मंत्रमुग्ध करणारे स्थलांतरित पक्षीही येतात. पुण्यामध्ये या सर्व प्रजातींना आसरा देण्यासाठी योग्य निवासस्थान आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या सर्व पक्ष्यांना, कीटकांना व प्राण्यांना इथे आरामदायक वाटते व आपल्याला जसे आपल्या घरात आरामात राहायचे असते तसेच त्यांनाही इथे आरामात राहता यावे ही आपली जबाबदारी आहे.
पुणे व भोवतालच्या भागातील वन्यजीवनाविषयीचा हा माहितीपट अनेक अर्थाने विशेष आहे कारण यामध्ये पुण्यातील वनस्पती व प्राण्यांचे अतिशय सुरेख चित्रण तर आहेच, मात्र यामध्ये वन्यजीवनाविषयीच्या आपल्या जबाबदाऱ्यांविषयी बदलेल्या दृष्टिकोनाचे (किंवा जागरुकतेचे) प्रतिबिंबच एकप्रकारे दिसून येते. शहरी भागातील जंगलांचे संवर्धन करण्यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे अशाप्रकारच्या
वन्य
प्राण्यांच्या वसतिस्थानांविषयी लोकांचे अज्ञान किंवा जागरुकता नसणे. वन विभागही (म्हणजे संपूर्ण सरकार) दुर्देवाने संवर्धनाच्या या पैलूसंदर्भात विशेष प्रयत्न करत नाही. मी वनखात्याचा उल्लेख केला कारण वन्यजीवनाच्या प्रत्येक पैलूचे संवर्धन करणे ही त्यांची जबाबदारी असणे अपेक्षित आहे, मात्र जर सरकार नावाची संपूर्ण यंत्रणा त्यांच्या पाठीशी उभी राहिली नाही तर ते एकटे हे काम करू शकत नाहीत. वन विभागाला पायाभूत सुविधांसाठी पुरेसा निधी (मनुष्यबळ व यंत्रसामग्रासाठी) तसेच इतरही अनेक गोष्टी दिल्या पाहिजेत, जे होताना दिसत नाही (व वेगाने होत नाही)! सरकार तसेच स्वतःला वन्यजीवन क्षेत्राचे हितरक्षक म्हणवून घेणाऱ्या तथाकथित स्वयंसेवी व पर्यावरणवादी संस्था (कृपया हा मुद्दा सकारात्मकपणे घ्या) फक्त वाघांवर किंवा व्याघ्र प्रकल्पांवर लक्षं केंद्रित करतात. यामुळेच जनतेलाही जंगल किंवा वन्यजीवन म्हणजे फक्त वाघ असे वाटले तर नवल नाही. गवताळ पट्टे, दलदल, वनराजी असलेली जमीन, टेकड्या, झुडुपे किंवा अगदी ओसाड जमीनही जंगलच असते व वाघांचे वास्तव्य असलेल्या जंगलांप्रमाणेच या सर्व प्रकारच्या जमिनीसुद्धा निसर्गामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात. मात्र अशा हजारो हेक्टर जमीनीविषयी कुणालाच फिकीर नसते. म्हणूनच मी या गवताळ प्रदेशांविषयी वारंवार लिहीतो, कारण केवळ पुणे व आजूबाजूच्या परिसरातील वन्यजीवांची ही वसतिस्थाने वाचवायचा मुद्दा नाही तर राज्यातील प्रत्येक मोठे गाव किंवा शहरामध्ये आणि त्यांच्या आजूबाजूला, संपूर्ण देशामध्ये अशीच परिस्थिती आहे.
खरेतर
आत्तापर्यंत लहान गावे किंवा खेडी व त्यातील रहिवासी पूर्वापार त्यांच्याभोवती असलेल्या या वन्यजीवन वसतिस्थानांचे संरक्षण करत मात्र आता तीच या वसतिस्थानांच्या विनाशाला कारणीभूत ठरत आहेत व याचे कारण म्हणजे वाढती लोकसंख्या, समाजातील आर्थिक विषमता व जगण्यासाठीचा संघर्ष. नेमकी याच ठिकाणी सरकार नावाच्या यंत्रणेची व संपूर्ण समाजाची (जे सुप्रस्थापित आहेत) भूमिका महत्त्वाची ठरते. कारण सरकारने वेगाने पावले उचलायला व या वसतिस्थानांमधील व आजूबाजूच्या परिसरातील लोकांना स्वयंपूर्ण जीवन जगता यावे यासाठी धोरणे करायला हवी असतील तर समाजाने त्यांच्याकडे काणाडोळा करून चालणार नाही. तर त्यांनी या वसतिस्थानांचे संरक्षण करण्याच्या सरकारच्या (व वन विभागाच्या) प्रयत्नांना सहकार्य केले पाहिजे. अशा जागांना भेट देऊन व आठवड्याच्या अखेरीस किंवा सुट्टीच्या दिवशी केवळ मॉलमध्ये खरेदीवर पैसे खर्च न करता अशा वसतिस्थानी राहणाऱ्या लोकांवर पैसे खर्च करून आपण हे करू शकतो. आपल्या देशवासियांनी स्थानिक वस्तू खरेदी कराव्यात जेणेकरून आपल्या लोकांना उत्पन्न मिळेल यासाठी माननीय पंतप्रधान आग्रही आहेत; त्याचप्रमाणे माननीय पंतप्रधान महोदय, कृपया नागरिकांना आधी त्यांच्या सुट्ट्या स्थानिक ठिकाणी, विशेषतः वन्यजीवन असलेल्या वसतिस्थानी घालवण्याचे आवाहन करा, म्हणजे अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांची उपजीविका चालू शकेल व ही सर्व वसतिस्थाने वाचविण्याचा तो एक महत्त्वाचा मार्ग आहे. स्थानिक लोक जगण्यासाठी अशा गवताळ प्रदेशांच्या व वन्यजीवनाच्या वसतिस्थानांच्या आजूबाजूला राहतात व शेतीसाठी, राहण्यासाठी किंवा औद्योगिक हेतूने व काहीच कारण नसल्यास सर्व प्रकारचा कचरा टाकण्यासाठी डंपिग ग्राउंड म्हणून त्यावर अतिक्रमण करतात यामुळे अशा जागांचे नुकसान होते.
ज्याप्रमाणे हिटलरने ज्यूंचा जातिसंहार (जातिसंहार या शब्दासाठी माफ करा, यामागे कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता) केला त्याचप्रमाणे शहरीकरणाच्या नावाखाली आपण मानव सोडून इतर प्रत्येक प्रजातींचे करत आहोत. फरक केवळ इतकाच आहे की आपण थेट इतर प्रजातींची गोळ्या झाडून हत्या करत नाही किंवा त्यांच्यासाठी गॅस चेंबर बांधत नाही, मात्र आपण शहरीकरणामुळे जे काही करत आहोत त्याचा परिणाम फुलपाखरे, पक्षी, मासे व सस्तन प्राण्यांवर तसाच होतो आहे! एक लक्षात ठेवा, हिटलरने ज्यूंचा नायनाट करण्याचा व त्यांची सत्ता नष्ट करण्याचा सर्वप्रकारे प्रयत्न केला. मात्र सरतेशेवटी हिटलरचाच पराभव झाला व तोच नष्ट झाला, ज्यू समाज नव्हे; माणसांनो मी गवताळ प्रदेश व आपल्या शहरीकरणासंदर्भात हे उदाहरण देण्याव्यतिरिक्त आणखी स्पष्ट इशारा देण्याची गरज आहे का!
You can read in English version:
http://visonoflife.blogspot.com/2021/11/wil-wild-pune-wildlife-conservation.html
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
No comments:
Post a Comment