"मित्रांनो, मला असे वाटते तुम्ही माझा लेख शेवटच्या प्रश्नापर्यंत वाचला असेल, तर तुम्ही कुणीही असा म्हणजे एक खाजगी कर्मचारी, एक सरकारी कर्मचारी किंवा एखादी गृहिणी; तुम्ही जे काही वाचले आहे ते एकतर विसरून तरी जा व तुम्ही स्वतः किंवा तुमचे प्रियजन एखाद्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडेपर्यंत वाट पाहा किंवा जागरुक व्हा व मी तुमच्या भूमिकेविषयी जे लिहीले आहे त्याबाबत विचार करा व कृती करा कारण त्यामुळे कुठेतरी, कुणाचेतरी आयुष्य वाचेल, आता निर्णय सर्वस्वी तुमचा आहे!"...
मित्रांनो आग दुर्घटना, त्यात होणारी जीवितहानी व आपला दृष्टिकोन याविषयी थोडे लिहीले आहे; तुम्ही ते खाली दिलेल्या दुव्यावरही वाचू शकता व इतरांना जागरुक करण्यासाठी कृपया शेअर करा...
“जगातील सर्व प्रकारची साधने, तंत्रे व तंत्रज्ञान यांना समजुतदारपणे, सहानुभूतीने व जागरुकपणे वापरणारे डोके, हृदय व हात असल्याशिवाय ते निरुपयोगी ठरते” … रशीद ओगुनलारू
रशीद ओगुनलारू हे एक अतिशय नावजलेले जीवन, व्यवसाय व कॉर्पोरेट मार्गदर्शक आहेत, त्यांच्या “तुम्ही जे आहात ते व्हा” या साध्या सरळ तत्वज्ञानामुळे त्यांनी असंख्य व्यवसाय मालकांना स्वतःशी, त्यांच्या व्यवसायांशी व त्यांच्या ग्राहकांशी संवाद साधण्यास मदत केली आहे. त्यांनी २० हून अधिक वर्षे मार्गदर्शन, प्रशिक्षण, माध्यम, जनसंपर्क व कार्यक्षमता वाढविणे या क्षेत्रात कार्य केले आहे. मी त्यांचे जे वरील अवतरण वापरले आहे ते यंत्रणेविषयी असले तरीही माझ्या लेखासाठी अतिशय चपखल आहे यात काही आश्चर्य नाही. हा लेख अलिकडेच झालेल्या एका दुर्घटनेविषयी (म्हणजे अनेक दुर्घटनांपैकी एक) व त्या दुर्घटनेनंतर जो “तमाशा” (नेहमीप्रमाणे) झाला त्याविषयी आहे. मात्र आपण ज्याला सरकार म्हणतो त्या यंत्रणेला दुर्घटना टाळता याव्यात यासाठी वारंवार अपयश नेमके कशामुळे येते यावर रशीद अगदी अचूक बोट ठेवतात. असो, तर मी नेमका कोणत्या दुर्घटनेविषयी बोलत आहे असा विचार तुम्ही करत असाल, तर अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील आग दुर्घटनेविषयी (पुन्हा एकदा) मी बोलत आहे. अहमदनगर हा मध्य महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. या दुर्घटनेमध्ये अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत असलेल्या अकरा जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर नेहमीप्रमाणे निष्कर्ष काढण्यात आले, आरोप व प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, निलंबन झाले (काही दुर्दैवी अधिकाऱ्यांचे), निलंबनाविरुद्ध मोर्चे काढण्यात आले, चौकशी समिती बसविण्यात आली, अग्नि सुरक्षेचे लेखापरीक्षण करण्यात आले. एक गोष्ट मात्र नक्की आता लोकांना (सामान्य माणसाला) ही सगळी नंतरची कारवाई म्हणजे झालेल्या गोंधळाची सारवासारव आहे व या दुर्घटनेसाठी बळीचा बकरा शोधणे हाच तिचा उद्देश आहे हे समजले आहे. खरेतर आता जनताही, आगीच्या दुर्घटनेनंतर होणारी कवायत गांभीर्याने घेत नाही. याला केवळ वृत्तपत्रं माध्यमांचा अपवाद असतो ज्यांना पाने भरण्यासाठी सतत काहीतरी खाद्य हवे असते.
तुम्हाला आता या लेखाचा सारांश आधीच समजला असेल तर मी तुम्हाला दोष देणार नाही, पण ती समस्या नाही, कधीही आगीच्या संदर्भात अशी दुर्घटना किंवा अपघात झाल्यावर किंवा आपत्ती आल्यावर (अर्थात यापैकी कोणताही शब्द येथे लागू होतो असे मी म्हणणार नाही) आपण एकतर वाचत नाही किंवा केवळ मनोरंजन म्हणून वाचतो किंवा आपल्याकडे वाचण्यासारखे काही नसते व आपण त्याविषयी विसरून जातो. अर्थात मी या वर्गवारीतल्या लोकांना दोष देत नाही कारण आपले शासनकर्तेच अशा पद्धतीने वागतात तर मग मतदारांचा दृष्टिकोन असा अडाणीपणाचा असेल तर कशाला दोष द्यायचा. केवळ ज्यांनी आपले प्रियजन अशा दुर्घटनांमध्ये गमावले आहेत त्यांचाच याला अपवाद असतो. सर्वप्रथम मला एक गोष्ट सांगाविशी वाटते, ती म्हणजे अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीमध्ये अकरा जण मरण पावल्याची घटना ही केवळ एक अपघात अथवा आपत्ती नव्हती, ती दुर्घटना निश्चितच होती कारण त्यामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला, जे खरोखरच अतिशय मोठे नुकसान आहे. मी अतिशय फटकळपणे किंवा कडवटपणे बोलत असेन तर मला माफ करा (मी बोलतोय), मात्र अशा आगीच्या दुर्घटना या सामूहिक हत्याच आहेत. केवळ काही पुरुष किंवा महिलाच नाही (ज्यांची नोकरी आत्तापर्यंत गेलेली असेल), तर आपल्यापैकी प्रत्येकजण या सामूहिक हत्येसाठी जबाबदार आहोत. तुम्हाला हे पटत नसेल किंवा मी अतिशय टोकाचा विचार करतोय असे तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठीच हा लेख लिहीत आहे. त्याचवेळी आज ही घटना जिल्ह्याच्या ठिकाणी एका सरकारी (सार्वजनिक) रुग्णालयात झाली आहे, काल ती एका खाजगी रुग्णालयात झाली होती व उद्या ती तुमच्या कार्यालयात किंवा अपार्टमेंटमध्येही होऊ शकते जी सर्वकाही भस्मसात करणाऱ्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडू शकते. तुम्ही हा लेख पुढे वाचला तर तुम्ही ते टाळू शकता, आता निर्णय तुमचा आहे!
हो, त्याच आठवड्यात वर्तमानपत्राचे मुख्य पृष्ठ व मधली पाने विविध मंत्र्यांच्या व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवेदनांनी (म्हणजेच विनोदांनी) भरलेली होती, यामध्ये १९९७ साली दिल्लीतील एका चित्रपटगृहाला लागलेल्या आगीविषयीही बातमी होती. त्या आगीमध्ये ५९ जणांचे जीव गेले होते व २४ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर सदर चित्रपटगृहाच्या मालकांना (दुर्दैवाने ते बांधकाम व्यावसायिकही आहेत) सुशील व गोपाल अन्सल यांना चित्रपटगृह बांधतांना निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल तसेच अग्नि सुरक्षा नियमांचे पालन करण्यातील त्रुटींसाठी दोषी ठरवण्यात आले व दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना १५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. या लढाईला असलेली एक रुपेरी किनार म्हणजे विशेषतः आगीच्या दुर्घटनांमध्ये गुन्हेगारांवर आरोप ठेवणे व ते सिद्ध करणे अतिशय अवघड असते व इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही एक खाजगी इमारत होती, त्यामुळेच संपूर्ण यंत्रणा (म्हणजे सरकार) एकजूट झाली व अन्सल यांना शिक्षा घडवून आणली. अर्थात मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की जर बांधकाम व्यावसायिकाला/चित्रपटगृहाच्या मालकाला सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींसाठी दोषी ठरविण्यात आले असेल तर अग्नि सुरक्षा विभाग व अशा इतर विभागांचे काय ज्यांनी या सुरक्षा नियमांची ठराविक काळाने तपासणी करणे अपेक्षित होते व आहे. अर्थात हा स्वतंत्र मुद्दा आहे व त्याविषयी पुन्हा कधीतरी बोलू. नुकत्याच झालेल्या घटनेमध्ये जिथे आग लागली ती सरकारी संस्थाच आहे, म्हणजेच ते रुग्णालय मायबाप सरकारच्याच मालकीचे आहे, त्यामुळेच आता अडचण अशी आहे की यंत्रणेने कुणाला दोषी ठरवायचे, अतिशय अवघड व गुंतागुंतीचा मुद्दा आहे नाही का? ज्या यंत्रणेने इथली सुरक्षा राखणे आवश्यक होते ती या यंत्रणेचाच भाग आहे, ज्या यंत्रणेने उलटतपासणी करणे किंवा यंत्रणा व्यवस्थित खबरदारी घेत आहे यावर देखरेख करणे आवश्यक आहे ती देखील यंत्रणेचाच भाग आहे, जी यंत्रणा आरोप निश्चित करेल व दोषी कोण हे ठरवेल ती देखील यंत्रणेचाच भाग आहे व जी यंत्रणा युक्तीवाद ऐकेल व निर्णय देईल ती देखील यंत्रणेचाच भाग आहे! गोंधळलात? रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेशी संबंधित पक्ष हे सरकारचाच भाग आहेत ज्यांनी नागरिकांना सुरक्षित ठेवणे अपेक्षित असते. म्हणूनच आता प्रश्न असा आहे की कोणत्या विभागाला दोष द्यावा व कुणाला बळीचा बकरा बनवावे ही सरकारमधील उच्च पदस्थांसाठी अडचण आहे.
नेहमीप्रमाणे आग सार्वजनिक (म्हणजेच सरकारी) रुग्णालयाला लागली, शहराच्या अग्निशमन विभागाने निवेदन दिले की सदर रुग्णालयाचे गेल्या तीन वर्षात (म्हणजे कधीच नाही) अग्नि सुरक्षा लेखा परीक्षण झाले नव्हते. त्यांनी आग लागल्यास करायच्या सुरक्षा उपायोजनांमधील त्रुटी दाखवून दिल्या ज्याकडे संबंधित विभागाचे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष झाले होते. तसेच त्यांनी असा दावा केला की आगीचे कारण विजेच्या तारांची सदोष जोडणी तसेच त्यांची देखभाल हे होते. संबंधित विभागाने म्हणजे या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने (आपल्या मंत्र्यांच्यामार्फत) निवेदन दिले की अग्नि सुरक्षा उपाययोजनांसाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी करण्यात आली होती, मात्र त्या फाईलला खुद्द माननीय मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली नव्हती. पोलीसांनी आयसीयूच्या सीसीटीव्हीची दृश्ये तपासली व त्यांना काही कनिष्ठ डॉक्टर व परिचारिका दोषी असल्याचे आढळले, त्यांनी रुग्णांऐवजी आधी स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असे ते म्हणाले. सार्वजनिक बांधकाम विभागाने आपली जबाबदारी झटकली ज्याने वीज तारांची जोडणी व तत्सम बाबींची देखभाल करणे अपेक्षित असते. त्यांनी असा दावा केला की आयसीयूमधील फॉल्स सिलिंगमुळे हे झाले जिथे हवा कोंडली जात होती व त्यामुळे उष्णता निर्माण होत होती, यामुळेच शॉर्ट सर्किट झाले व आरोप प्रत्यारोप अजूनही सुरू आहेत. काही कनिष्ठ डॉक्टर व परिचारिकांना निलंबित करण्यात आले आहे, काहींना अटकही करण्यात आली आहे. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीनही मंजूर झाला आहे, त्यामुळे त्यांना अटकेविरुद्ध संरक्षण मिळाले आहे व हा खेळ सुरू आहे.
याचा जो काही परिणाम होईल त्यामुळे मृतांचे जीव परत मिळणार नाहीत तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी जाणूनबुजून हे केले असे कुणीही म्हणत नाही, मात्र मुख्य प्रश्न उरतोच, आपण अशाप्रकारच्या कोणत्याही आगीच्या घटनांमधून (म्हणजे दुर्घटनांमधून) कधीच काही धडा घेणार नाही का? मी म्हटल्याप्रमाणे, खाजगी असो किंवा सरकारी, कोणतेही सार्वजनिक ठिकाण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, यामध्ये अगदी लोकांचाही (म्हणजे नागरिकांचा) समावेश होतो जे असेही या ठिकाणांचा भाग असतात. पुढे नमूद केलेल्या सुरक्षा उपाययोजनांमध्ये आपल्या सगळ्यांची एक भूमिका आहे. तसेच आग लागल्यावर काय करायचे किंवा कसे वाहायचे याविषयी प्रशिक्षणही आवश्यक आहे, कारण आपण आपल्या स्वतःच्याच जिवाबाबत निष्काळजी व अडाणी असतो ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला असे वाटत असेल की हे अतिशय बोचरे विधान आहे तर माझ्या खालील काही प्रश्नांची उत्तरे द्या, ही चाचणी सामान्य माणसासाठी (तुमच्या व माझ्यासाठी) व संबंधित सरकारी अधिकारी किंवा विभागासाठी आहे …
१. प्रिय सामान्य माणसा; रुग्णालय किंवा चित्रपटगृह यासारख्या कोणत्याही सार्वजनिक स्थानाचा वापरकर्ता (नागरिक) म्हणून आग लागण्यासारखी काही दुर्घटना झाल्यास तू सुरक्षा पायाभूत सुविधा तपासल्या आहेस का व तू जर तपासल्या असतील तर तुला सुरक्षा उपाययोजनांमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत का. तू त्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांकडे कधी तक्रार केली आहे का?
२. प्रिय सामान्य माणसा; तू अशा जागांना भेट देतोस तेव्हा आग लागल्यावर (किंवा भूकंप झाल्यावर किंवा पूर आल्यावर) काय करायचे हे तुला माहिती आहे का, पीडित म्हणून अशा घटना कशा हाताळायच्या याचे तू काही प्रशिक्षण घेतले आहे का व घेतले नसेल तर अशा प्रशिक्षण सत्रांविषयी स्वतःहून माहिती घेण्याचा तू काही प्रयत्न केला आहेस का?
३. प्रिय सामान्य माणसा; चित्रपट गृह किंवा रुग्णालयाचे सोड, तू तुझ्या कामाच्या ठिकाणी किंवा निवासाच्या जागी (तू ज्या सोसायटी/अपार्टमेंटमध्ये राहतोस) अग्नि सुरक्षा उपाययोजना तपासल्या आहेत का व तुझ्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेल्या या दोन जागी अग्नि सुरक्षेचे लेखापरीक्षण वेळोवेळी केले जाते का?
४. अग्नि सुरक्षा विभागासाठी (केवळ नगर शहराच्याच नाही); तुमच्या शहरातील चित्रपटगृहे व सार्वजनिक रुग्णालय यासारख्या संवेदनशील सार्वजनिक जागी तुम्हाला स्वतःहून अग्नि सुरक्षेच्या उपाययोजना तपासण्यास कुणी मनाई केली आहे? तुम्हाला त्रुटी आढळल्यास, एखादी दुर्घटना घडण्याची वाट पाहात बसण्यापेक्षा जेथे अग्नि सुरक्षेबाबत गंभीर त्रुटी आढळतील अशा जागा आपणहून सील का करत नाही?
५. अग्नि सुरक्षा विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी; तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सार्वजनिक जागी किती वेळा अग्नि सुरक्षा नियमांचे पालन होते आहे का याची अचानक तपासणी केली व अशा तपासण्यांच्या परिणामांविषयी माहिती प्रकाशित केली? तुम्ही अशा जागी किती वेळा आपणहून अग्नि सुरक्षेसाठी सराव संचलन आयोजित केले? आग लागल्यास कसे वागावे याविषयी खाजगी, सार्वजनिक संस्था किंवा सामान्य माणसाला प्रशिक्षण देण्यासाठी तुमच्या काही योजना आहेत का व असतील तर तुम्ही ही माहिती लोकांना जागरुक करण्यासाठी समाज माध्यमांवर प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला आहे का.
६. सार्वजनिक आरोग्य विभागाचे कर्मचारी व माननीय मंत्र्यांना, तुम्ही अग्नि सुरक्षा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीच्या प्रलंबित मुद्द्याचा माननीय मुख्यमंत्र्यांकडे किंवा त्यांच्या कार्यालयाकडे पाठपुरावा घेतला का. घेतला असल्यास, सुरक्षा पायाभूत सुविधांसाठी मुख्यमंत्री कार्यालय आवश्यक तो निधी देऊ न शकल्याबद्दल तुम्ही माध्यमांकडे का गेला नाहीत?
७. सार्वजनिक आरोग्य विभाग; अशी अजून किती रुग्णालये आहेत जेथे कोणत्याही अग्नि सुरक्षा पायाभूत सुविधा नाहीत व जोपर्यंत अग्नि सुरक्षा नियमांची पूर्तता होत नाही तोपर्यंत तुम्ही अजूनही तिथे रुग्णांना भरती करण्याची परवानगी का देत आहात? त्याचप्रमाणे, जेथे आग लागली तेथे सदर रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात आले आहे का व नसल्यास तुम्ही त्यांना इतरांचे जीव न वाचवण्यासाठी जबाबदार का धरत आहात?
९. सार्वजनिक बांधकाम विभाग; तुमच्या कार्यक्षेत्रातील सर्व संस्थांच्या अग्नि सुरक्षा पायाभूत सुविधेच्या देखभालीसाठी कोण जबाबदार आहे व तुम्ही ते स्वतःहून करण्यापासून तुम्हाला कुणी रोखले आहे व मूलभूत सुरक्षा नियमांचे पालनही होत नसेल तर तुम्ही अशा जागा सुरू करायची किंवा वापरायची परवानगी कशी देता?
१०. आणि हो, वृत्त माध्यमे; एखादी दुर्घटना घडल्यावर तुम्ही सगळे अगदी हल्लाबोल करता, मात्र पत्रकारितेमध्ये जागल्याचे (व्हिसल ब्लोअर) कामही करावे लागते, तुम्ही स्वतःहून यंत्रणेतील त्रुटी का शोधून काढू शकत नाही व फक्त एखाद्या सरकारी विभागाच्याच नाही तर समाजाच्या अशा निष्काळजीपणाबद्दल व अडाणीपणाबद्दल जागल्याची भूमिका का पार पाडू शकत नाही?
सर्वात शेवटी माननीय मुख्यमंत्री साहेब; कोणतीही दुर्घटना झाल्यावर व निष्पाप (अडाणीही) लोकांचा जीव गेल्यावर सुरू होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांच्या खेळात आपण आणखी किती जिवांची तिलांजली देणार आहोत? हा आरोपप्रत्यारोपांचा खेळ या बातम्यांचा टीआरपी कमी झाल्यावर बंद होतो व पुढील दुर्घटनेची वाट पाहिली जाते, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे कारण आपण ज्याला सरकार म्हणतो त्या यंत्रणेचे तुम्ही हृदय, मेंदू व आत्मा आहात, बरोबर?
मित्रांनो, मला असे वाटते तुम्ही माझा लेख शेवटच्या प्रश्नापर्यंत वाचला असेल, तर तुम्ही कुणीही असा म्हणजे एक खाजगी कर्मचारी, एक सरकारी कर्मचारी किंवा एखादी गृहिणी; तुम्ही जे काही वाचले आहे ते एकतर विसरून तरी जा व तुम्ही स्वतः किंवा तुमचे प्रियजन एखाद्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडेपर्यंत वाट पाहा किंवा जागरुक व्हा व मी तुमच्या भूमिकेविषयी जे लिहीले आहे त्याबाबत विचार करा व कृती करा कारण त्यामुळे कुठेतरी, कुणाचेतरी आयुष्य वाचेल, आता निर्णय सर्वस्वी तुमचा आहे!...
You can read in English version:
http://visonoflife.blogspot.com/2021/11/fire-government-people.html
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
No comments:
Post a Comment