Monday, 20 December 2021

वैशाली , जगन्नाथ शेट्टी आणि पुणे !

 



























मी विश्वास ठेवला होता एका स्वप्नावर, एक अशी जागा जिथे सगळा परिवार एकत्र येऊन आनंद लुटू शकेल, आणि डिस्ने  लँड घडले....वॉल्ट डिस्ने. 


जगन्नाथ शेट्टी हे नाव कदाचित बऱ्याच जणांना माहित नसेल पण वैशाली आणि रुपाली माहीत नसलेला माणूस पुण्यात तरी नक्कीच सापडणार नाही आणि म्हणूनच १९ डिसेंबर २०२१ च्या सकाळी जेव्हा व्हाट्स अँप ग्रुप वर जगन्नाथ शेट्टी वारले असा मेसेज आला तेव्हा जगन्नाथ काकांना माझ्या शेअरिंग  मधून श्रद्धांजली वाहताना वॉल्ट डिस्ने यांचे वरील शब्द माझ्या मनात आले सुरुवात करण्यासाठी ... कारण वैशाली (नजीकच्या काळात जगन्नाथ काकांनी रुपालीची मालकी दुसऱ्याला दिली होती असे कळाले ) म्हणजे काही फक्त डोसा, इडली खाण्याचा अजून एक उडपी जॉईन नव्हता तर तीन ते चार पिढयांना एकत्र आणणारा टाइम मशीन आहे वैशाली म्हणजे . आणि म्हणूनच मला त्याची तुलना डिस्नेलँडशी करावीशी वाटते कारण इथे फॅमिलीस, मित्र, सगळे एकत्र येतात आणि भुतकाळात रमणारे सिनिअर सिटिझन्स येतात, वर्तमानात जगणारे आमच्यासारखे मध्यमवयीन लोक पण येतात आणि वर्तमानात राहून भविष्यकाळाची स्वप्न रंगविणारे तरुण तरुणी पण येतात !


नेहमी असे म्हणतात की एखादे शहर त्यातील माणसांनी व तिथल्या ठिकाणांनी ओळखले जाते! स्वाभाविकपणे आपण एखाद्या शहराचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात पहिल्यांदा विचार येतो तो तिथल्या माणसांचा व तिथल्या प्रसिद्ध ठिकाणांचा! कारण कोणत्याही शहराची प्रतिमा किंबहुना चेहरा ही माणसे किंवा ठिकाणे ठरवत असतात. उदाहरण द्यायचे झाले तर लंडनची माणसे बाहेरील कुणाशीही खडूसपणे वागतात, तिथल्या एखाद्या ठिकाणाचा विचार करायचा झाला तर आपण हाईड पार्कचा विचार करतो. आपण जेव्हा न्यूयॉर्कचा विचार करतो तेव्हा इतरांकडे दुर्लक्ष करण्याचा अमेरिकी गर्विष्टपणा आठवतो, टाईम स्क्वेअर आणि तिथली मौजमजा आठवते. पॅरिसचा विचार केल्यावर फ्रेंच लोकांचा निवांतपणा व आयफेल टॉवर आठवतो. आपल्या महान देशाबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीचा विचार केल्यावर तर रस्त्यावरची मुजोर भाषा, पालिका बजार किंवा जामा मस्जिद आठवते. चेन्नई असेल तर रजनीकांत, लुंगी, इडली सांबार आठवतो, कोलकाता असेल तर बंगाली मिठाई आणि हावडा ब्रिज आठवतो! आता वर उल्लेख केलेल्या शहरांऐवढे पुणे मोठे नाही, मात्र पुणेकर जगभरात पोहोचले आहेत. तसेच आयटी उद्योग असो, ऑटोमोबाईल उद्योग असो किंवा शैक्षणिक सुविधा असोत या सर्व क्षेत्रांमध्ये पुण्याने जागतिक नकाशावर आपले स्थान निर्माण केले आहे. तर मग आपण पुण्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला काय आठवते? सगळ्यात आधी आठवतो तो पुणेरी बाणा जो ब्रिटीशांपेक्षा तसूभरही कमी नाही, अमेरिकी लोकांप्रमाणे “आम्ही सर्व जाणतो” ही गुर्मी आणि त्यावर विनोदाची पखरण, चितळे बंधूंनी ग्राहकाचा कसा अपमान केला याचे किस्से, ऐतिहासिक शनिवारवाडा आणि वैशाली-रुपाली आवर्जुन आठवतात!

 

पुणेकर असण्यासाठी हा शेवटचा निकष मला बुचकळ्यात पाडतो, कारण शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तू आहे, चितळे बंधू मिठाईवाल्यांचा स्वभाव पुणेरी माणसाचा स्वभाव दर्शवतो, पण मग वैशाली-रुपालीमध्ये असे काय आहे की तो पुण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे? जगन्नाथ शेट्टी हे दाक्षिणात्य नाव पुण्याचा वारसा कसे झाले? पुण्याच्या या वारशाबद्दल अनेक विनोद व किस्से प्रसिद्ध आहेत. ज्या मूठभर लोकांना वैशाली-रुपाली काय आहे हे माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो, ही काही जुळ्या बहिणींची नावे नाहीत, तर पुण्याच्या मध्यवर्ती भागातील फर्ग्युसन रस्त्यावरील दाक्षिणात्य पदार्थांची उपहारगृहे आहेत. मात्र अस्सल पुणेकरांसाठी ही स्मारके आहेत व त्यांच्या शहराच्या वारशाचा अविभाज्य भाग आहेत, या दोन्ही उपहारगृहांचे त्यांच्या जीवनातील महत्व अनन्यसाधारण आहे! असे म्हणतात की पुणेकर केवळ दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे वैशाली-रुपालीत जाणारे व दुसरे म्हणजे तेथे न जाणारे ! पुण्याच्या एकूणच प्रतिमेत वैशाली-रुपाली, जगन्नाथ शेट्टी व त्यांच्या चमूचे महत्व किंवा त्यांची लोकप्रियता किती आहे हे समजावून सांगण्यासाठी हा किस्सा पुरेसा आहे.

 

साधारणतः १९५० साली उघडण्यात आलेली ही उपहारगृहे आज तेव्हा किशोरवयीन असलेल्यांच्या तिस-या पिढीला सेवा देत आहेत, ही पिढी आज आजोबा-आजी झाली आहे व आजही आपल्या नातवंडांसोबत इथल्या चवीचा आणि वातावरणाचा आनंद घेते! असे म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात मात्र या दोन्ही उपहारगृहांनी विशेषतः वैशालीने अनेकांसाठी त्यातल्या स्वर्गाची भूमिका बजावली आहे व आजही हा परिपाठ सुरु आहे! कॉलेजमध्ये जाणा-या अनेक तरुण-तरुणींनी आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पहिला चहा किंवा कॉफी वैशालीतच प्यायली आहे व इथल्या वेटरनी कित्येकांच्या जोड्या जुळविण्यास मदत केली आहे. आपल्या खास मित्राला किंवा मैत्रिणीला लाजत-बुजत पहिल्यांदा घेऊन येणा-यांचे व त्यानंतर तेच लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर आल्यावर इथल्या वेटरनी त्यांचे वर्षानुवर्षे स्वागत केले आहे! पुण्यातले बरेचसे प्रसिद्ध नागरिक सांगतात की ते जेव्हा काही कामाच्या निमित्ताने किंवा सुटीसाठी बाहेरगावी जातात, तेव्हा परत आल्यानंतर आपल्या घरी जाण्याआधी पहिले काम म्हणजे वैशालीला भेट देणे आणि एक कप चहा पिणे! मी स्वतःदेखील माझ्या कॉलेजच्या दिवसांपासून म्हणजे २५ वर्षांपासून वैशालीचा करिश्मा अनुभवलाय; इथेही वैशाली आणि रुपालीचे चाहते असे दोन गट आहेत, आणि अशाप्रकारे विभागले जाण्यासाठी त्यांची आपापली कारणे आहेत. काहीजणांना रुपालीचा सांबार आणि कॉफी जास्त आवडते तर काही जणांना वैशालीचा चहा आणि तिथले वातावरण अधिक भावते. माझ्याविषयी बोलायचे झाले तर मी वैशालीकर आहे, मात्र दोन्ही जागांना असलेले वलय मला आवडते व एखाद्या निवांत रविवारी रुपालीच्या सांबाराच्या चवीचाही आस्वाद घेतो! मी कॉलेजमध्ये असताना घरुन मोजकेच पैसे मिळायचे, त्यामुळे वैशालीत जाणे ही चैन होती, जी मला काही महिन्यांतून एखादेवेळीच परवडायची. मात्र तेव्हा या दोन्ही ठिकाणी जाण्यात जी मजा होती ती आजही कायम आहे, आज मी तिथे रोज जाऊ शकत असलो तरीही.

 

ज्या शहराला त्याची संस्कृती व समाजजीवनाचा अभिमान वाटतो त्यात अशी ठिकाणे असणे आवश्यक आहे, किंबहुना ती आपल्या समाजाचा कणा आहेत. कारण अशी ठिकाणे नसतील तर लोक कुठे एकत्र येतील? इथल्या टेबलांवर एक नजर टाकली आणि जमलेल्या टोळक्यांच्या चर्चा ऐकल्या तर पुणे सांस्कृतिक राजधानी का आहे हे समजेल, हा उत्साहाने सळसळत्या वातावरणाचा एक भाग आहे! इथे एकीकडे जोडप्यांच्या प्रेमळ गुजगोष्टी सुरु असतात, तर दुसरीकडे जागतिक अर्थकारणावर चर्चा झडत असतात, इथे कोणत्याही विषयाला मनाई नाही, तुम्हाला इथे विविध क्षेत्रातली ख्यातनाम, उच्चपदस्थ मंडळी अशा चर्चांमध्ये आपली बाजू मांडताना दिसतील! मग त्यामध्ये कल्याणी, भोसले, पवार, बजाज आणि अगदी ठाकरेही असू शकतात! शहरातील उच्च पदस्थ अधिकारी, व्यावसायिक, राजकीय तसेच सामाजिक नेते, स्वयंसेवी संस्थांचे चालक सर्वजण वैशाली-रुपालीचा एक भाग आहेत व आपल्या उपस्थितीने या ठिकाणाच्या प्रसिद्धीचे वलय आणखी दैदिप्यमान करतात! अनेक गट दिवसाची सुरुवात वैशालीने करतात व त्यांची ठरलेल्या वेळी टेबल ठरलेली असतात. केवळ भेटीगाठींसाठीच नाही तर व्यावसायिक बैठकींसाठीही हे ब-याच जणांचे आवडते ठिकाण आहे. आता एखाद्याला प्रश्न पडेल की एवढी वर्दळ असताना व्यावसायिक बोलणी कशी करता येईल, मात्र ती होते हे खरे आहे.

 

एखाद्याला वाटेल की त्यात काय एवढेसे, भारतात प्रत्येकालाच प्रत्येक गोष्टीविषयी आपले मत व्यक्त करायला आवडते, त्यामुळे त्यांच्यासाठी अशा जागा सगळीकडेच असतात, तर वैशाली-रुपालीचे वैशिष्ट्य काय? ब-याच जणांना हा प्रश्न पडत असेल, मात्र मला वाटते की कोणत्याही जागेचा लौकिक एका दिवसात तयार होत नाही. जवळपास सहा दशके ही उपहारगृहे केवळ दाक्षिणात्य पदार्थच देत नाहीत तर लोकांना एकत्र येण्यासाठी व गप्पागोष्टी करण्यासाठी एक जागाही देतात. या ठिकाणच्या प्रत्येक गोष्टीत सातत्य आहे, तेच याचे वैशिष्ट्यही आहे! याचे सगळे श्रेय जाते जे त्यांचे कर्तेधर्ते जगन्नाथ शेट्टी यांना. त्यांनी काही हॉवर्ड विद्यापीठातून पदवी घेतलेली नाही किंवा जगभरात आपल्या उपहारगृहांची साखळी तयार करण्याची त्यांची महत्वाकांक्षा नाही. केवळ या दोनच उपहारगृहांवर ते खुश व समाधानी आहेत, पूर्ण समर्पणाने त्यांचे व्यवस्थापन करतात. या समर्पणातूनच सेवेत सातत्य राखता येते व तेच वैशाली-रुपालीच्या यशाचे गमक आहे! इथे जे पदार्थ मिळतात ते देणारी व इथल्यापेक्षाही चांगला दर्जा असलेली उपहारगृहे या शहरात असतीलही कदाचित. मात्र इथे केवळ तुम्हाला इडली, डोसा, सांबार मिळत नाही तर इथे तुम्ही एका संस्कृतीचा भाग बनता, व इथे भेट देणा-या प्रत्येक व्यक्तिला हे जाणवते. स्वच्छता, तत्पर सेवा, पदार्थांची चव कायम राखणे, इथे सर्व काही चोख आहे, जगन्नाथ शेट्टी यांनी जातीने लक्ष घालून केवळ उपहारगृहे उभारलेली नाहीत तर एक यंत्रणा विकसित केली आहे, इथले कर्मचारी त्याचा एक भाग आहेत. इथले स्वैपाकी असोत किंवा सफाई कामगार, प्रत्येक जण आपापल्या कामात मग्न असल्याचे तुम्हाला दिसून येईल. कोणत्याही माध्यमात एकही जाहिरात न देता वैशाली-रुपाली यशस्वी करण्यामागचे रहस्य जाणून घेण्यासाठी शेट्टींना अनेक संस्थांनी आमंत्रित केले. माझे त्यांच्याशी घरोब्याचे संबंध आहेत हे माझे भाग्य आहे. असेच एकदा निवांतपणे बोलताना त्यांनी सांगितले होते की, त्यांना कुणीतरी प्रश्न विचारला की वैशालीमध्ये एकही कामगार संघटना कशी नाही? त्यांनी उत्तर दिले, कोण म्हणते आमच्याकडे कामगार संघटना नाही? संघटना आहे व मीच त्या संघटनेचा नेता आहे! पट्टीचा व्यवस्थापन गुरुही असे उत्तर देऊ शकला नसता, कारण हे केवळ विद्वत्तापूर्ण उत्तर नाही तर सत्य आहे! ते त्यांच्या कामगारांची कुटुंबाप्रमाणे काळजी घेतात, मग मुलांचे शिक्षण असो किंवा त्यांचे औषधपाणी, सर्वकाही आधीच पूर्ण झाल्याने त्यांना मागण्या कराव्याच लागत नाहीत! त्यांनी मला एकदा सांगितले होते की कप बश्या इत्यादी साधनांचे नुकसान झाले तरीही ते व्यवस्थापक किंवा वेटरचे पैसे कापत नाहीत, व त्यांनी सर्व कर्मचा-यांना सांगितले आहे की ग्राहकांशी कधीही हुज्जत घालू नका, ते जे सांगतील ते हसून मान्य करा! तुम्ही वैशालीमध्ये याचा अनुभव घेऊ शकता, याची छोटीशी परीक्षा पाहायची असेल तर मसाला डोसा मागवा व तो आल्यानंतर मी साधा डोसा मागवला होता असे वेटरला सांगा! दुस-या कोणत्याही हॉटेलमध्ये तो मसाला डोसा परत घ्यायला नकार देईल, मात्र वैशालीत नाही; वेटर तुमच्याकडे पाहून नम्रपणे हसेल, मसाला डोसा घेऊन जाईल व साधा डोसा आणून देईल! वैशाली-रुपालीचा हा पैलू मी आवर्जुन इथे नमूद केला आहे कारण, आपण एखाद्या यंत्रणेचे यश पाहतो, मात्र त्या यशाच्या कारणांचे क्वचितच विश्लेषण करतो व मान्य करतो, त्यामुळे त्यातून काही शिकणे किंवा स्वीकारणे हे तर दूरच!


मला आठवतय दहा वर्षांपूर्वी जगन्नाथ शेट्टी यांना ऐंशी वर्षे पूर्ण झाली म्हणून वैशालीत एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व शहरातील सगळी दिग्गज मंडळी त्याला हजर होती. अनेकांच्या या ठिकाणाविषयीच्या आठवणी वृत्तपत्रात छापून आल्या होत्या. एखादे ठिकाण शहराला यापेक्षा अधिक काय देऊ शकते? मी नेहमी विचार करतो की एखाद्या ठिकाणाचे यश नेमके कशात असते. पैसे कमावण्यात, किंवा दुस-या लोकांनी त्याची नक्कल करण्यात किंवा तिथे किती माणसे येतात यामध्ये असते? एखादे ठिकाण काय मिळवू शकते? मला असे वाटते की वैशाली-रुपालीचे जे सध्या स्थान आहे त्यातच याचे उत्तर आहे. ही दोन्ही ठिकाणे एखाद्या जिवंत पात्राप्रमाणे आहेत, लोक त्यांना एक जिवंत व्यक्तिमत्व म्हणून ओळखतात, त्यांच्या यशाची याशिवाय दुसरी व्याख्या काय होऊ शकते!


सध्याच्या मॅकडोनल्ड व केएफसीच्या जमान्यात, जगभरातल्या चवी, उत्तम वातावरण असलेल्या उपहारगृहांशी स्पर्धा असताना, वैशाली-रुपाली दिमाखात उभ्या आहेत व त्यांनी स्वतःची ओळख (ब्रँड) तयार केलीय! पुणेकरांसाठी वैशाली, रुपाली केवळ उपहारगृहे नाहीत जिथे ते जेवू शकतात व लोकांना भेटू शकतात, तर या दोन्ही ठिकाणांना भेट देणे म्हणजे एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला भेटण्यासारखे आहे, ज्यांच्यासोबत ते काही जिव्हाळ्याचे क्षण निवांतपणे घालवू शकतात! आपल्याकडे अशी ठिकाणे आहेत हे आपले भाग्य आहे, त्यांचे जतन करणे व त्यांना अजरामर करणे ही समाजाची जबाबदारी आहे, तरच अशी ठिकाणे आपल्याजवळ असण्यासाठी आपण लायक होऊ!


खरंच जगन्नाथ काकांनी इडली, वडा,डोसे विकणं सूद्धा किती मोठा आणि टाइमलेस होऊ शकत हेच जणू दाखवून दिलंय जगाला, वैशाली नावाचे जग उभारून. पुणे शहराने सगळ्यांना खूप काही दिलंय पण फार कमी लोकांनी पुणे शहराला काहीतरी दिलंय आणि त्यात जगन्नाथ शेट्टी यांचे नाव फार वरच्या क्रमांकावर असेल कायमच. जगन्नाथ काकांना मी एकदा विचारलं होतं, काका, वैशालीच्या शाखा  किंवा फ्रँचाइसी का नाही काढल्या कधी , खरा पुणेकर आहेस तू, "आमची कोठेही शाखा नाही" सांगणारा ! काकांनी उत्तर दिलं होतं , संजू, वैशाली माझ्यासाठी फक्त हॉटेल किंवा पैसे कमावण्याचा उद्योग नाहीये तर ती एक व्यक्ती आहे , आणि कुणाही व्यक्तीची जशीच्या तशी कॉपी कशी होऊ शकेल , आणि भ्रष्ट नक्कल मला नसती आवडली , म्हणून मी कधीच वैशालीची कुठेच शाखा काढली नाही खूप ऑफर्स येऊन सुद्धा ! आज मी जगन्नाथ काकांना सांगू इच्छितो कि, तुम्ही वैशाली ची शाखा कुठेच काढली नाही असं कस म्हणता, खरंतर वैशालीच्या हजारो, लाखो शाखा आहेत , पुणेकरांच्या हृदयात आणि त्या कायम वाढतच राहतील ..

रेस्ट इन पिस जगन्नाथ काका! 




--

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com

No comments:

Post a Comment