Friday 1 July 2022

डायरी जंगलाची, बांधवगडचे दिवस !





























डायरी जंगलाची, बांधवगडचे दिवस  !

तुमची परिस्थिती कितीही वाईट असली तरीही जेव्हा, तुम्ही जंगलामध्ये व नदीच्या काठावर तीन-चार तास चालता त्यानंतर तुम्ही जिथुन सुरुवात केली त्यासारखी तुमची परिस्थिती अजिबात नसते” … जिम हॅरिसन.

जेम्स हॅरिसन हे अमेरिकी कवी, कादंबरीकार व निबंधकार होते. त्यांनी विपुल व वैविध्यपूर्ण केले असून त्यांची कविता, कादंबरी, ललित, बालसाहित्य व आठवणी अशा विविध प्रकारची तीन डझन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यामुळे बालसाहित्य लेखकाचे मन असलेले जिम जंगलांमध्ये असलेल्या जादूचे वर्णन इतक्या सोप्या शब्दात करू शकतात यात काही आश्चर्य नाही. जंगले आपल्याला नेमके हाच तर अनुभव देतात, म्हणजेच आपल्याला ताजेतवाने करतात, खरतर हा अतिशय अपुरा शब्द ठरेल, तुम्ही जंगलातून परत आल्यानंतर पुनरुज्जीवित होऊन येता असे म्हणणे अधिक समर्पक ठरेल. जवळपास दोन वर्षांच्या अंतरानंतर मी राज्याबाहेर प्रवास करत होतो, आणि भारतीय अभयारण्यांचे दोन मुकुटमणी कान्हा व बांधवगढ या ठिकाणी जाण्यापेक्षा अधिक चांगले काय असू शकते. कान्हाविषयी नंतर लिहीनच, पण मी बांधवगढमध्ये जाण्यासाठी अतिशय उत्सुक होतो कारण एक म्हणजे तिथे वाघांचे अनेक बछडे आहेत हि माहिती मिळाली होती व दुसरे म्हणजे या ठिकाणाला मी शेवटची भेट देऊन जवळपास पाच वर्षे होऊन गेली होती. याचे मुख्य कारण म्हणजे त्याचे भौगोलिक ठिकाण, पुण्याहून जबलपूरला जाण्यासाठी थेट विमान नाही (नव्हते) व कान्हा, पेंच, ताडोबा किंवा यूकेडब्ल्यूही सगळी अभयारण्ये पुण्याहून नागपुरला थेट विमानाने जोडलेली असल्याने प्रवासाचा वेळ वाचला. त्यामुळे बांधवगढचा बेत नेहमी लांबणीवर पडायचा कारण दोन दिवस प्रवासातच जात असत. मात्र जबलपूर ते पुणे थेट विमान सुरू झाल्यानंतर, मी त्या ठिकाणी जायला सज्ज झालो.

या सफारीमध्ये साध्य झालेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एकाच दिवसात जवळपास २१ वाघ पाहायला मिळाले, जे मी आधीच्या लेखामध्ये लिहीले आहे. मात्र बांधवगढ म्हणजे फक्त वाघ नाहीत, तर हे जंगल सर्व प्रकारच्या भूप्रदेशांचे बनलेले आहे, त्यामुळे तुम्हाला इथे प्रचंड जैवविविधता पाहायला मिळते. अनेक प्रकारची झाडे, झुडुपे (तण), जलाशय, डोंगर व कुरणे असल्याने शाकाहारी प्राण्यांसाठी हे अतिशय उत्तम ठिकाण आहे कारण त्यांना वर्षभर खाद्य उपलब्ध असते. जे एकप्रकारे वाघ, बिबटे, रानकुत्री यासारख्या व इतरही मांसाहारी प्राण्यांसाठी वरदानच असते. त्याचशिवाय काही जंगली हत्ती आहेत जे छत्तिसगढ व ओडिसा येथून दोन-एक वर्षांपूर्वी येथे स्थलांतरित झाले आहेत. या सगळ्यामुळे बांधवगढ हे सर्वार्थाने एक परिपूर्ण जंगल आहे. अर्थातच, वाघ हे या सफारीचा अविभाज्य भाग होते कारण या प्राण्याचा करिश्माच तसा आहे (आणि नशीब आम्हाला साथ देत होते) त्यामुळे मी बांधवगढमधील ३ दिवसांदरम्यान काढलेली जवळपास ८०% छायाचित्रे ही वाघांची आहेत. मला माहिती आहे की बांधवगढमध्ये विपुल जैवविविधता आहे मात्र येनकेनप्रकारेण आम्हाला सतत वाघच दिसत राहिले. आणि जेव्हा ते काळे व पिवळ पट्टे अगदी तुमच्या समोर असतात तेव्हा त्यांच्यावरच कॅमेरा रोखला जाणे स्वाभाविक होते. तरीही आम्हाला जेव्हा वाघ दिसले नाहीत तेव्हा इतर प्रजाती तसेच अधिवासांमध्ये मला अतिशय उत्तम असा काही वेळ घालवता आला.एकाच दिवस २१ वाघ दिसण्यासोबत वाघांसोबतच्या काही रोचक आठवणीही आहेत. त्याचप्रमाणे अभयारण्याच्या व्यवस्थापनामध्ये व संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये मला काही चांगल्या पद्धती बघायला मिळाल्या, ज्या महत्त्वाच्या आहेत वत्यासांगणे व त्यानुसार सुधारणा करणे महत्त्वाचे आहे.

सर्वप्रथम व सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वन्य संवर्धन, बांधवगढ व्याघ्र अभयारण्य तीन कोअर विभागांमध्ये पसरलेले आहे व त्याला तीन स्वतंत्र प्रवेशद्वारे असून तीन ते चार प्रवेशद्वारे बफर क्षेत्रामध्ये आहेत. यातील सर्वोत्तम भाग म्हणजे कोअर क्षेत्राच्या आजूबाजूला अतिशय घनदाट जंगल आहे जे वाघांची संख्या व इतर प्रजातींची संख्या वाढण्यासाठी वरदान आहे कारण त्यांना सर्वत्र फिरण्यासाठी जागा मिळते. मात्र वनविभागासाठी हे अतिशय अवघड काम आहे कारण बफर क्षेत्रामध्ये गावे असतात व माणूस व प्राण्यांमधील संघर्ष ही मोठी समस्या असते. मात्र एक चांगली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या उलट, बांधवगढच्या आसपास कोणतेही उद्योगधंदे किंवा मोठे शहर नाही. त्यामुळे कोअर क्षेत्र व आजूबाजूच्या भागातील गावे व त्यातील लोकसंख्या तुलनेने कमी आहे. कान्हा पासून ते बांधवगढपर्यंत व पुढे जबलपूरपर्यंत जंगलाखाली असलेली सर्व जमीन (बहुतेक) पाहून डोळे सुखावले कारण हि सगळी जोडलेली जंगले म्हणजे वन्य प्राण्यांचे राजमार्ग आहेत. व ते टिकवलेच पाहिजेत. मला आढळलेला दुसरा मुद्दा म्हणजे बहुतेक रस्ते हे जंगलातूनच जात असले तरीही रस्त्यावरील अपघातात प्राण्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण अगदी कमी आहे व याचे मुख्य कारण म्हणजे या रस्त्यांवर कमी रहदारी आहे. हे असेच राहावे एवढीच माझी अपेक्षा आहे. कोअर क्षेत्रात प्रवेश करताना मला शेती व कोअर क्षेत्राच्या कुंपणापर्यंत चरत असलेली जनावरे दिसली. या अशा सीमा प्रदेशामध्ये तुम्हाला बिबटे किंवा अस्वले दिसण्याची शक्यता अधिक असते. कारण त्यांना गावातील गुरे-ढोरे व मेंढ्या व बकऱ्यांची शिकार करायची असते. आमच्या सकाळच्या पहिल्या फेरफटक्यातच गवतामध्ये ऊन खात पहुडलेला बिबट्या दिसला, मात्र दुर्दैवाने त्याने आमची जिप्सी येताना पाहिली व तो झटकन उठून पळून गेला. बिबटे हे प्राणी लाजाळू असतात व जेव्हा ते वाघांनी भरलेल्या जंगलात फिरत असतात, तेव्हा ते अतिशय सतर्क असतात व कधीच गाफिल राहात नाहीत. कारण वाघ बिबट्यांचा द्वेष करतात व दिसताच क्षणी त्यांना ठार करतात. याचे कारण म्हणजे, वाघ शिकार करत असताना बिबट्या त्याचे सावज दुसरीकडे वळवतो किंवा ते पळवतो. तसेच तो वाघाच्या लहान बछड्यांचाही शत्रू असतो. ही सर्व कारणे वाघाने त्याच्या हद्दीतील बिबट्याला मारण्यासाठी पुरेशी असतात. बिबट्याकडे वाघाएवढी ताकद नसली तरीही वेग व झाडांवर चढण्याची क्षमता त्याचे रक्षण करते.

मला आढळलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, अभयारण्याच्या भोवती असलेल्या सर्व भूभागातील पाण्याच्या उघड्या विहिरी, म्हणजे अगदी कोअर क्षेत्रातल्याही जाळीच्या कुंपणांनी व्यवस्थित सुरक्षित केलेल्या होत्या, ज्यामुळे वन्य प्राणी या विहीरींमध्ये पडत नाहीत. वन्य प्राण्यांच्या मृत्यूंचे विशेषतः उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या शोधात असतांना ते अशा विहिरींमध्ये पडतात हे एक मुख्य कारण आहे. आपल्यालाही आपल्या राज्यामध्ये तसेच सर्व अधिवासांमध्ये याचे अनुकरण करता येईल कारण जंगलातील भूभागातील पाण्याच्या उघड्या विहिरी सुरक्षित ठेवण्याचा तो अतिशय परिणामकारक, स्वस्त व सहज मार्ग आहे. आणखी एक दृश्य पाहून मला आश्चर्य वाटले की या अभयारण्याच्या अवतीभोवती लोक (माणसे) झोपड्यांमध्ये राहात होते, त्यांची मुले उघड्यावर खेळत होती व तेथून जेमतेम १०० मीटरच्या अंतरावर एखादा वाघ झुडुपांमध्ये झोपला असेल किंवा एखादा बिबट्या झाडावर विश्रांती घेत असेल किंवा एखादे अस्वल त्याचे अन्न म्हणजेच वाळवी शोधत असेल. आजूबाजूला वन्यप्राणी असूनही हे लोक अजिबात न धास्तावता आपापली दैनंदिन कामे करत होते. बरेच जण म्हणतील, त्यात काय मोठेसे, त्यांचे आयुष्यच तसे आहे. मात्र मी खरोखरच सांगतो ती देखील आपल्यासारखीच माणसे आहेत. त्यांनाही भीती व चिंता यासारख्या भावना आहेत. विचार करा तुमचा मुलगा घराबाहेर मैदानात खेळतोय व तुम्हाला माहितीय की एक वाघ कदाचित तुमच्या मुलाकडे पाहतोय, आपल्यापैकी कितीजण ही वस्तुस्थिती सामान्यपणे झेलू शकतात? मी कोअर क्षेत्राच्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या धाडसाचे पुन्हा एकदा कौतुक केले व आपण सगळ्यांना हे ध्यानात घेतले पाहिजे की इथल्या व्यवस्थेचा भाग असलेले हे लोकच खऱ्या अर्थाने वन्यजीवनाची देखभाल करतात. आपण सगळे त्यांचे काहीना काही देणे लागतो, ही समजुदारपणाची जाणीव हीच जंगलांसाठी खरी भेट आहे!

अशाच एका फेरफटक्यात आम्हाला दोन मोर आपला फुललेला पिसारा एकमेकांभोवती गोलाकार धरून, दोन योद्धे किंवा बॅले नर्तकांप्रमाणे, रस्त्याच्या मधोमध एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते. ते त्यांच्या या प्रदर्शनामध्ये एवढे गुंग झालेले होते की आम्हाला आमची कार थांबवणे भाग होतो व ते छायाचित्रे निसर्गाची सुंदर जुगलबंदीच (द्वंद्व) होती. हे पक्षी ज्या नजाकतीने एकमेकांभोवती फिरत होते, त्याचे वर्णन करण्यासाठी शब्दही अपुरे आहेत. त्याचशिवाय यावेळी वाघीण बाहेर येताना वाट पाहताना मला लाल रानकोंबडीची छायाचित्रेही टिपता आली, ती एक अतिशय रंगीबेरंगी व सुंदर पक्षी आहे व कॅमेऱ्यासमोर तितकीच लाजते. त्या सामान्यपणे सकाळी किंवा संध्याकाळी उशीरा ये-जा करतात व या दोन्ही वेळी प्रकाश व्यवस्थित नसल्यामुळे छायाचित्रे काढण्यासाठी अनुकूल नसतात. मात्र यावेळी आम्ही एका ठिकाणी थांबलेले होतो व रान कोंबड्यांचा जथ्था चारा टिपण्यासाठी उघड्यावर आला व मला या पक्षाची खरोखरच काही अतिशय सुंदर छायाचित्रे टिपता आली. या सर्व प्रजाती शिकारीमुळे बाह्य जगातून नामशेष होत चालल्या आहेत व त्यांचा अधिवासह नष्ट होत चालला आहे व केवळ अशा जंगलांमध्येच त्यांना शेवटचा आसरा आहे.

मी माझ्या मागील लेखामध्ये रा नावाची वाघीण, एक नर वाघ व त्यांचे बछडे निवांतपणे बसलेले होते व एक रानगवा मध्येच घुसल्याने आम्हाला या वाघांचे दर्शन झाल्याचा उल्लेख केला होता. एका मोठ्या कुत्राच्या आकाराच्या वाघाच्या बछड्याने रानगव्यावर चाल करण्याची ती घटना आता सविस्तर सांगतो. हे वाघांचे कुटुंब निवांतपणे बसलेले असताना रानगवा मध्येच घुसला, तेव्हा वाघ व वाघीण तसेच त्यांच्या दोन बछड्यांनी बाजूला व्हायचे ठरवले व ते पुन्हा सावलीत निघून गेले. मात्र त्यांच्यातील एका बछड्याने त्यांना त्रास दिल्याबद्दल रानगव्याला अद्दल घडविण्याचे ठरवले. तो गवा चरत चरत लांब गेला तसा तो बछडा गवतातून सावकाश येत रानगव्यावर चाल करून गेला, हे पाहूनही रानगवा मात्र स्थिर होता. एक जेमतेम सहा महिन्यांचा बछडा त्याच्याहून आकाराने दहापट मोठ्या नर रानगव्यावर चाल करून जातो हे दृश्य पाहाणेही अतिशय मजेशीर होते, यालाच वाघाची हिम्मत असे म्हणतात. कदाचित आम्हाला काळजी वाटत होती की अति आत्मविश्वासामुळे बछड्याने खरोखरच त्या रानगव्यावर हल्ला केला व त्यामध्ये रानगव्याने त्याला ठार केले तर. मात्र रानगवा व बछड्यामधील अंतर सुमारे १० फूट असताना रानगवा जोरात फुस्कारत, त्यामुळे वाघाचा बछडा घाबरला व पळून गेला. त्यामुळे आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला, कारण त्या दिवशी बछड्याचा जीव वाचला होता. बछड्याला त्यादिवशी बहुतेक शिकारीविषयी हल्ला मिळाला असावा तो म्हणजे सावज कधीही तुमच्यापेक्षा कोणत्याही प्रकारे बलवान असेल तर त्याला समोरासमोर भिडू नका. पुढे कधीतरी बछडा मोठा होईल व पुन्हा गव्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल, मात्र तो आजचा धडा विसरणार नाही असा विचार माझ्या मनात आला.

अशा सगळ्या घटना पाहात असताना तीन दिवस उलटून गेले व शेवटच्या सफारीची वेळ आली तेव्हा या खेपेस एवढे पुरे झाले असा विचार करत असतानाच, एक अंतिम नाट्य आमची वाट पाहात होते. बांधवगढमध्ये जंगली हत्ती आहेत व त्यांनी वन विभागाच्या दोन पाळीव हत्तींचे अपहरण (या शब्दासाठी माफ करा) केले आहे अशी बातमी आम्हाला समजली. हे खरोखरच अतिशय मजेशीर आहे मात्र अशा गोष्टी घडतात, जंगली हत्तींचा कळप या पाळीव हत्तींना भुलवून कदाचित घेऊन गेला असावा व वन विभाग त्यांच्या हत्तींना शोधण्यात गुंग होता. इतर सर्व जिप्सी एका पाणवठ्याकडे निघाल्या होत्या जिथे वाघीण विश्रांती घेत होती, त्यावेळी आम्ही दुसऱ्या एका पाणवठ्यावर वाट पाहण्याचे ठरवले जेथे मध्यम-वयात आलेल्या नर वाघांची ये-जा होती व त्यांचे कुटुंब आधी तेथे दिसले होते. इथे आम्हाला दोन हत्ती दिसले, एक मोठे हस्तीदंत असलेला होता व दुसरा लहान हस्तीदंत असलेला होता. ते पाहून आमचा गाईड व ड्रायव्हर म्हणालासर, “ये जंगली हाथी है, फॉरेस्टवाले हाथी को ले जा रहें हैंम्हणजेच, साहेब, हे जंगली हत्ती आहेत व वनविभागाच्या हत्तींना घेऊन जात आहेत”. अशावेळी हत्ती खरोखरच अतिशय धुडगूस घालू शकतात. जेव्हा या जंगली हत्तींना आमच्या जिप्सीची जाणीव झाली ते आमच्या दिशेने येऊ लागले त्यामुळे आम्ही व आणखी एक जिप्सी वेगाने तिथून निघून गेलो. असे दोन वेळा झाले, आम्हाला वाटले की हत्ती निघून गेले आहेत व ते पाणवठ्याच्या दिशेने निघाले, पुन्हा जंगली हत्ती घनदाट झाडीतून बाहेर आले व त्यांनी आम्हाला हुसकावून लावले व शेवटी तेच निघून गेले. मी खरोखरच सांगतो, जंगली हत्तींचे चित्कारणे व तुमच्या दिशेने पळत येणे याहून अधिक भीतीदायक काहीही नसते, कारण ती मैत्रीपूर्ण भेट नाही हे तुम्हाला माहिती असते, हाहाहा!

ही सर्वउत्सुकता (किंवा थरार हा योग्य शब्द होईल) सार्थ ठरली, कारण दोन वयात आलेले नर वाघ पहुडले होते व त्यांनी एकमेकांकडे पाहिल्यावर गाईड म्हणाला ते सावत्र भाऊ आहेत व आता पाण्यामध्ये खेळतील. मात्र ते ज्याप्रकारे एकमेकांकडे पाहात होते, मला खात्री आहे की ते खेळकर मनस्थितीमध्ये नव्हते तर त्यांच्या नजरेत प्रतिस्पर्ध्याचे भाव होते. हळूहळू दोन्ही नर वाघांनी एकमेकांच्या दिशेने यायला सुरुवात केली व क्षणार्धात ते गुरगुरत, डरकाळ्या फोडत, पंजे मारत एकमेकांवर तुटून पडले. त्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे खरोखरच शब्द नाहीत. कारण ही लढाई एका मिनिटात संपली जो कमजोर होता त्याने खाली बसून आपली हार मान्य केली व हळूहळू ते दोघे चालत जंगलात नाहीसे झाले! मी खरोखरच सुदैवी आहे की मला हा दुर्मिळ अनुभव पाहायला मिळाला जे वन्यजीवनाचे कटू सत्य आहे; की ते भाऊ असले तरीही जंगलामध्ये केवळ एकच वाघ असू शकतो व तुमचे रक्तही तुमचा शत्रू ठरते.

मला असे वाटते, अनेक प्रकारे, जंगल आपल्या शहरी जीवनातील घटनांचेच प्रतिबिंब आहे व आपला सर्वोत्तम गुरू आहे. तुम्हाला कधी, कुठे, कुठला धक्का बसेल हे तुम्हाला सांगता येणार नाही. यामध्ये टिकून राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नेहमी जमीनीवर पाय घट्ट रोवून उभे राहणे व सतर्क राहणे. ही शिकवण मनात रुजवूनच मी बांधवगढमधून बाहेर पडलो, पुढच्या वर्गासाठी लवकरच परत येण्याचे आश्वासन देऊनच!

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलोपर्स

ईमेल आयडी - smd156812@gmail.com










No comments:

Post a Comment