दुबई आणि स्वप्न पाहण्याची हिंमत!
“जे स्वप्न पाहण्याचे धाडस करतात व ज्यांच्यामध्ये त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याची धमक आहे त्यांनाच भविष्य आहे” … महामहीम शेख मुहम्मद बिन रशीद अल् मख्तुम.
दुबईचे पंतप्रधान व यूएईचे उपाध्यक्ष श्री. बिन रशीद, यांच्या या
अवतरणाद्वारे भविष्यातील दुबईच्या दृष्टिकोनाविषयीची आभासी सहल संपते व तुम्ही
दुबईमध्ये वास्तविक जगात येता, आपल्या देशामध्ये हे वास्तविक सुद्धा साकार
होण्यासाठी खूप काळ आहे असे वाटते (माफ करा लोकहो, कुणालाही
दुखविण्याचा इथे हेतू नाही तसेच याचा देशभक्तीशीही काही संबंध नाही, हा पूर्णपणे
वास्तववादी दृष्टिकोन आहे)! आपल्या देशाच्या विकासाबाबत मी अन्याय करतोय असे
तुम्हाला वाटत असेल तर मी दुबईविषयी माझे काही अनुभव सांगतो (अलिकडचे). तुम्ही
त्यांची तुलना करू शकता आणि मगच माझ्या मताविषयी किंवा सुरुवाती दिलेल्या
वरीलविधानामागील कारणाविषयी निर्णय घेऊ शकता.
दृश्य पहिले: मी दुबईमध्ये
पहिल्या दिवशी संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी निघालो होतो व रस्त्याच्या कडेला
काही खोदकाम सुरू होते. ज्या ठिकाणी रस्त्याचे खोदकाम सुरू होते त्याच्या जवळपास
५०० मीटर अंतरापासून खोदकाम सुरू असल्याचे फलक लावलेले होते. पदपथाचा
जेमतेम ३० मीटर (१०० फूट) लांब पट्टा खोदण्यात आला होता मात्र त्यासाठी त्यांनी
पर्यायी मार्ग तयार केला होता तसेच पादचाऱ्यांना सहजपणे चालता यावे याकरता त्यावर
गालिचा अंथरलेला होता (स्वस्त असला तरीही तो गालिचाच होता),“गैरसोयीसाठी क्षमस्व” असा फलक लावलेला होता हे सांगायची गरज
नाही.
दृश्य दुसरे: तेथे
विमानतळाबाहेर ने-आण करण्याची सोय होती, टॅक्सी, खाजगी कार व बससाठी जागा आखून दिलेल्या होत्या व या
संपूर्ण भागाचे सीसीटीव्हीद्वारे निरीक्षण केले जात होते, तसेच केवळ दोन कर्मचारी (पोलीस/सुरक्षा रक्षक) बाईकवर गस्त घालत होते. वीस
मिनिटांच्या काळामध्ये येथे जवळपास हजार वाहनांची ये-जा झाली मात्र एकाही वाहनाने हॉर्न
वाजवल्याचे किंवा वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसले नाही.
दृश्य तिसरे: मी माझ्या
बहिणीसोबत गोल्ड सुक ( सराफ बाजार) भागात गेलो
होतो, काही वर्षांपूर्वी हा संपूर्ण परिसर वाहतूक, इमारती व
अतिक्रमणासंदर्भात आपल्या रविवार पेठेपेक्षाही (पुण्यातील जुने शहर)भयंकर होता.
मात्र मी आज पाहिले तेव्हा मुख्य गोल्ड सौक लेनमध्ये पदपथांची निर्मिती करण्यात
आली होती, जुन्या मोडकळीला आलेल्या इमारतींचा पुनर्विकास
करण्यात आला होता, कारसाठी सार्वजनिक वाहनतळांची निर्मिती करण्यात आली होती, तसेच वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी खाजगी वाहतूक
कर्मचारीही तैनात करण्यात आले होते व या सगळ्या गोष्टी केवळ चार वर्षांच्या
कालावधीमध्ये झाल्या आहेत. अर्थात, हा “दुबई व्हील”सारखा
दुबईचा सर्वोत्तम भाग नाही किंवा मरिना बे नाही तरीही त्यांनी जुन्या शहराचा कायापालट केला आहे व ते येणाऱ्या पर्यटकांसाठी
तसेच स्थानिकांसाठी अधिक आरामदायक केले आहे.
दृश्य चौथे: दुबई फ्यूचर
म्यूझियमची इमारत, एका कडेवर उभ्या असलेल्या लंबुळक्या डोनटसारखी दिसते व दुबई
भविष्यात कशी असेल याची गोष्ट ती आपल्याला सांगते. या इमारतीची
केवळ वास्तुरचनाच थक्क करणारी नाही तर ती या शहराचा भविष्याविषयी दृष्टिकोन काय
आहे याविषयी पर्यटकांना एक संदेश देते व तोच अतिशय आवश्यक आहे. आपल्या शहरामध्ये
अशा किती इमारती किंवा स्मारके आहेत तसेच सार्वजनिक ठिकाणे आहेत जेथे लोक
प्रत्यक्ष भेट देऊ शकतात व निवांत वेळ घालवू शकतात हे स्वतःला विचारा?
दृश्य पाच: दोन खाड्यांना
जोडून शहरातून जाणारी एक नदी तयार करण्यात आली आहे. तो खरेतर खाऱ्या पाण्याचा
कालवा आहे मात्र तो प्रत्यक्षात दोन मुख्य हेतूंनी वापरला जातो, एक म्हणजे
मनोरंजन व विरंगुळा व दुसरे म्हणजे सार्वजनिक जल वाहतुकीसाठी त्याचा वापर केला जात
आहे. हा संपूर्ण प्रकल्प पाच वर्षांमध्ये पूर्ण करण्यात
आला आहे.
दृश्य सहा: दुबई विमानतळावर केवळ आठ महिन्यांपूर्वीच स्वतः चेक-इन करण्यासाठी किऑस्क बसविण्यात आले. एक लक्षात ठेवा अमिरातीचा टर्मिनल जगातील सर्वात वर्दळीच्या विमानतळांपैकी एक आहे, जेथे हजारो प्रवासी चेक-इन काउंटरवर त्यांचे सामान घेऊन उभे असतात (त्यात दुबई शॉपिंग फेस्टिव्हलच्या कृपेने या सामानामध्ये भरच पडते). यासाठी कित्येक तास लागत असत मात्र आता स्वतः-चेक-इन करता येत असल्यामुळे पासपोर्ट स्कॅन करण्यापासून ते सामानाला टॅग लावण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रिया फेसलेस मॉनिटरद्वारे केली जाते व तुम्ही या सगळ्यातून पंधरा मिनिटात बाहेर पडता. या प्रक्रियेत तुम्हाला मदत करण्यासाठी मदतनीस असतात हे वेगळे सांगायची गरज नाही, तुम्हाला या प्रक्रियेमध्ये मदत करण्यासाठी ते हजर असतात व त्याचशिवाय इमिग्रेशनसाठीची तपासणीही स्मार्ट गेटद्वारे केली जाते, यामुळे सर्व आंतरराष्ट्रीय विमानांसाठी तपासण्याच्या औपचारिकता कुणाशी एकही शब्द न बोलता पार पडतात!
दृश्य सात: विमानतळाच्या
काउंटरवर आम्ही कर परताव्याविषयी (जो काहीशे दिऱ्हाम असतो, मात्र ती
आपल्यासाठी मोठी रक्कम असते)चौकशी करत होतो जो अनिवासी व्यक्तीला दुबईमध्ये
केलेल्या खरेदीवर तिथून बाहेर पडताना मिळतो. आश्चर्य
म्हणजे तिथेही एक फेस-लेस किऑक्स होता जेथे मदत करण्यासाठी एक महिला होती. आम्हाला
हव्या असलेल्या चलनामध्ये पंधरा मिनिटात रोख पैसे परत मिळाले. आपल्या देशामध्ये
सरकारी विभागाकडून कोणत्याही स्वरूपात पैसे परत मिळवताना काय होते याचा विचार करा, म्हणजे तुम्हाला काहीशे दिऱ्हाम परत मिळवणे हा इतका
सुखद अनुभव का होता हे कळेल.
मी अशा प्रकारच्या दृश्यांची ही यादी कितीही वाढवू
शकतो व दुबई किती पुढारलेली आहे व आपला देश किती मागासलेला (किती कमी विकसित) आहे
हे दाखवण्याचा हा प्रयत्न नाही. केवळ सरकारने व संपूर्ण समाजाने ठरवले तरच कुठल्याही
देशासाठी खरी वाढ किंवा विकास शक्य आहे याची आपल्याला जाणीव व्हावी यासाठी हे सांमत आहे. इथेच दुबईकडून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे
आहे, बरेच जण
म्हणतील की त्यांच्याकडे पैसे आहे व त्यांच्याकडे शेखचे राज्य आहे व आपल्याकडे लोकशाही ज्यामुळे निर्णय
अडकतात. मला मान्य आहे की शेखचे राज्य असले तरी त्याचे काही तोटेही आहेत तसेच केवळ
पैसा हाच एक घटक असता तर अनेक गरीब शहरांच्या तुलनेत अर्थसंकल्पामध्ये मुंबई आणि
पुण्यासाठी भरभक्कम आर्थिक तरतूद केली जाते, मात्र तेथे पैसे खर्च करूनही किती प्रकल्प पूर्णत्वास
गेले आहेत? काहींचे नाव सांगायचे झाले तर, आपण जवळपास
६०० कोटी रुपये (कदाचित त्याहूनही अधिक) बीआरटीएसवर (बस रॅपिड ट्रान्सपोर्ट
सिस्टम) खर्च केले व आज बीआरटीएसची परिस्थिती काय आहे, बीआरटीएसने
रस्त्यांवरील रहदारी कमी व्हायला मदत झाली आहे का, तर याचे उत्तर
स्पष्टपणे नाही असेच द्यावे लागेल. या शहराला मध्यवर्ती भागामध्ये जवळपास ३२
किलोमीटरहून अधिक लांबीचा नदी किनारा लाभलेला आहे, गेल्या दहा
वर्षांपासून आपण नदीच्या सुशोभीकरण प्रकल्पाविषयी ऐकत आहोत, मात्र आपल्या नदी किनाऱ्यांवरील
चित्र काय आहे हे स्वतःलाच विचारा. दुबईकडून आपण हेच शिकले पाहिजे. ते कोणत्याही
प्रकल्पाचा सखोल अभ्यास करून तो हातात घेतात व त्यावर नेटाने काम करून तो
पूर्णत्वास नेतात जो आपल्या तथाकथित
पायाभूत सुविधा विकास प्रकल्पातील आपला सगळ्यात कच्चा दुवा आहे.
दुबईच्या या भेटीदरम्यान मला आढळलेला सर्वात महत्त्वाचा
पैलू म्हणजे, सार्वजनिक ठिकाणे तयार करण्यावरील त्यांचा भर. दुबई
शहरात व अवतीभोवती अशी अनेक ठिकाणे तयार करण्यात आली आहेत, यामुळे हे संपूर्ण शहरच एखाद्या मोठ्या मेळाव्याच्या
ठिकाणासारखे झाले आहे. मला असे मनापासून वाटते की, अशी सार्वजनिक ठिकाणे तयार करणे शहरासाठी अतिशय
महत्त्वाचे आहे, याउलट आपल्या
स्मार्ट शहरात (म्हणजेच पुण्यामध्ये) पाहा व केवळ सार्वजनिक बागाच नव्हे तर अशा
दहा सार्वजनिक जागांविषयी सांगा जेथे तुम्ही तुमचे कुटुंब किंवा बाहेरगावहून
आलेल्या पाहुण्यांसह, दिवसाच्या कोणत्याही वेळी दर्जेदार, निवांत वेळ घालवू शकाल.आपल्या उद्यान विभागाच्या
प्रयत्नांविषयी पूर्णपणे आदर राखत असे म्हणावेसे वाटते की काही उद्यानांचा अपवाद
वगळता, इतर उद्याने कुटुंबाने जाण्यासारखी नाहीत, यासाठी
त्यांची देखभाल तसेच इतरही अनेक घटक जबाबदार आहेत. मी स्मारके किंवा दुबई फ्रेमसारखी
महाकाय बांधकामे करण्याविषयी बोलत नाहीये, अशा बांधकामांभोवती जागा निर्माण करणे तसेच शहराच्या
मध्यवर्ती भागामध्ये वॉकिंग प्लाझा बांधण्याविषयी मी बोलतोय
अशा सार्वजनिक जागी लोक एकत्र येतील, थोडा चांगला वेळ घालवतील व ताजेतवाने होतील. आपल्या
शहरामध्ये, आपण केवळ
मोकळ्या वेळेत एखाद्या
मॉलमध्ये जाऊ शकतो व पिझ्झासाठी फूड कोर्टच्या रांगेत
उभे राहू शकतो, भराभरा तो
खाऊन, पार्किंगच्या
अडचणीमुळे वैतागून परत येऊ शकतो.
दुबईमध्ये अनेक मॉल आहेत, तरीही दुबई
म्हणजे आता केवळ खरेदी व आकर्षक सवलती एवढेच नाही, तर तिथे
नागरिकांचे तसेच पर्यटकांचे आयुष्य आनंदी करण्याचा प्रयत्न केला जातो. हा आनंदाचा
घटकच, दुबईला इतर ठिकाणांपेक्षा वेगळे बनवतो आहे. दुबई फ्यूचर म्यूझियममध्ये, दुबईचे शेख व पंतप्रधान श्री. बिन रशीद यांचे, “हॅपिनेस अँड पॉझिटीव्हीटी” हे पुस्तक माझ्या पाहण्यात आले, व ते पुस्तक वाचल्यानंतर, मला दुबईचा जीवनाविषयीचा दृष्टिकोन समजला आहे. मी क्वचितच असे नेते (खरेतर शासनकर्ते)पाहिले आहेत जे त्यांचे तसेच
त्यांच्या नागरिकांचे आयुष्य आनंदी व सकारात्मक व्हावे असा प्रयत्न करतात, कारण तुम्ही ते करण्यात यशस्वी झालात तर मग तुम्ही
विकसित आहात किंवा विकसनशील त्यामुळे काही फरक पडत नाही, बरोबर? जर एखाद्या
विकासाचे वापरकर्ते किंवा लाभार्थी आनंदीच नसतील तर त्या विकासाचा काय उपयोग?मी ज्याप्रकारे वारंवार जंगलात जातो, लोक मला
नेहमी विचारतात की मला इतके वारंवार जंगलात जाऊन काय मिळते, मला कंटाळा येत नाही का व माझे त्यावरील उत्तर असते, मला जंगलामुळे आयुष्य अधिक चांगल्याप्रकारे समजून
घेता येते व माझा दृष्टिकोन अधिक व्यापक होतो. मी जसे
जंगलात जातो तेवढा वारंवार
दुबईला जाऊ शकत नाही, मात्र माझे मित्र मला विचारतात की दुबईला च का जाता कशासाठी कारण दुबईमध्ये जे निर्माण
करण्यात आले आहे ते आपण इथे करू शकणार नाही. तुमच्याकडे जेव्हा श्री. बिन रशीद यांच्यासारखे शासनकर्ते असतात, तसेच तुमच्या दूरदृष्टीला कृतीची जोड असते तेव्हा लोक (नागरिक) प्रतिसाद
देतात, ज्यातून दुबईतील बहुतेक लोकांचा दृष्टिकोन दिसून
येतो. दुबईतील सार्वजनिक ठिकाणी हे पाहता येते जी नेहमी स्वच्छ, नेटकी व सुंदर दिसतात, आपल्या शहरात ही दुर्मिळ (म्हणजेच अशक्य) बाब म्हणावी
लागेल. म्हणूनच मी दुबईतील इमारती किंवा वास्तुरचनेची नक्कल करायला किंवा खरेदी
करायला जात नाही, मी दुबईचा जीवनाविषयीचा जो दृष्टिकोन आहे त्याची नक्कल
करतो. मी दुबईहून परत येताना तो दृष्टिकोन नक्कीच घेऊन येतो व तिथे वारंवार
जाण्यासाठी हे सर्वोत्तम कारण आहे असे मला वाटते.
खाली माझ्या फ्लिकर लिंकवर दुबईची चित्ररूप सहल पाहता
येईल, जर तुम्हाला शब्दांमुळे कंटाळा आला नसेल तर थोडा वेळ
ती पाहा…
लोकांना
तुमच्यावर विश्वास ठेवायला लावण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, तुम्ही ज्याची निर्मिती करू करणार नाही
असे तुम्हाला वाटते त्याची निर्मिती करणे...
मला असे वाटते दुबई हाच दृष्टिकोन घेऊन
जगते. मी प्रत्येक वेळी या शहराला भेट तो तेव्हा ते मला थक्क करून सोडते व मी जे
काही करत आहे त्यात सर्वोत्तम करून दाखवण्याची प्रेरणा देते. तुम्ही जेव्हा दुबईचे अंतरंग पाहता
तेव्हा तुम्हाला त्याच्या जीवनाविषयीच्या दृष्टिकोनाची जाणीव होते, तो म्हणजे केवळ उंच इमारती किंवा
मोठमोठे मॉल बांधणे किंवा सवलती देणे हा नव्हे तर तिथे एक अनुभव निर्माण करण्यात
आला आहे. ते
कदाचित सगळ्यांना समाधानी करू शकणार नाहीत, मात्र ते नक्कीच तसा सर्वतोपरी प्रयत्न
करतात. दुबईची ही सर्वतोपरी प्रयत्न करण्याची जिद्दच, मला नेहमी जाणवतेl..!!
इथे दुबईचे वेगवेगळे चेहरे दाखवणारी
काही छायाचित्रे आहेत, अजूनही
टाकेन...
तुम्ही खालील दुव्यावर ती पाहू शकता..
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
ईमेल आयडी - smd156812@gmail.com
No comments:
Post a Comment