मा. सर न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय व भारतातील वन्यजीवनाचे भवितव्य
प्रति,
श्री. धनंजय चंद्रचूड, भारताचे माननीय सरन्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाचे सर्व माननीय
न्यायमूर्ती,
आदरणीय महोदय,
माझे हे पत्र तुमच्यापर्यंत पोहोचेल किंवा नाही हे मला माहिती नाही, मात्र म्हणतात ना तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्नच केला नाही तर ती नक्कीच होणार नाही. म्हणूनच प्रयत्न करत राहिले पाहिजे, यासाठीच मीसुद्धा तुम्हाला पत्र लिहीतोय. वन्यजीवन पर्यटन हा वन्यजीवन
संवर्धनाचा एक अविभाज्य भाग आहे किंबहुना वन्यजीवन संवर्धनाचा एकमेव शाश्वत मार्ग आहे. एक बांधकाम व्यावसायिक/विकासक/स्थापत्य अभियंता याविषयी लिहीतोय हे पाहून
तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, मात्र मी तुम्हाला आधीच सांगतो की मी शिक्षणाने
स्थापत्य अभियंता आहे व घरे बांधण्याच्या व्यवसायात आहे (बांधकाम व्यावसायिक), आणि त्यामुळे मला वन्यजीवनाविषयी अधिक शिकायला
मिळाले. कारण माणसांच्या व वन्यप्राण्यांच्या मूलभूत गरजा सारख्याच असतात व त्यातील प्रमुख गरज ,म्हणजे त्यांचे स्वतःचे घर. दुर्दैवाने, अलिकडे वन्यजीवन पर्यटन व त्या संदर्भातील धोरणे समाज माध्यमांवरील
पोस्टवरून ठरवली जातात व यामुळे आपली दिशाभूल होते आहे, कारण वन्यजीवनाचे संवर्धन हेच पर्यटनाच्या केंद्रस्थानी असले पाहिजे. खरेतर, वन्यजीवन पर्यटन हा वन्यजीवन संवर्धनाचा सर्वोत्तम व हमखास मार्ग आहे. कारण
अधिकाधिक लोकांनी (म्हणजे सामान्य लोक) कोणत्याही स्वरुपाच्या जंगलाला भेट दिली
तरच, त्यांना त्यांच्या पुढील पिढीसाठी काय वाचवायचे आहे हे समजेल. जंगलात
गेल्यानंतरच तुम्हाला वन्यजीवनाची भाषा शिकता येते व त्यानंतरच निसर्गाशी संवाद
सुरू होतो. आदरणीय सरन्यायाधीश महोदय व अन्य न्यायमूर्तींनो, याच एकमेव कारणामुळे मी तुम्हाला आज वन्यजीवनाविषयी लिहीण्याचे धाडस करतोय, कारण दिवसेंदिवस जंगले सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर होत चालली आहेत व
त्याचे परिणाम भयंकर होत आहेत. उच्च न्यायालयाचे व सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्यायमूर्ती नियमितपणे जंगलांना भेट देतात, मात्र ते अति महत्त्वाचे पाहुणे म्हणून जातात, सामान्य पर्यटक म्हणून जात नाहीत व तिथे
संपूर्ण वनविभाग त्यांच्या दिमतीला असतो, म्हणूनच हा लेख लिहीत आहे. माझा लेख थोडासा लांबलचक आहे मात्र तुम्हा
लोकांना हजारो पानांच्या याचिका वाचण्याची सवय असल्याने त्यामुळे काही अडचण येणार
नाही, अशी आशा करतो
“आपण लोकांना वन्यजीवनाविषयी काही शिकवू शकलो, तर त्यांना ते अतिशय भावेल. माझ्या वन्यजीवनाविषयी मला सांगा. कारण माणसांना ज्या गोष्टी आवडतात
त्या त्यांना वाचवायला आवडते.”….. ....... स्टीव्ह आयर्विन
स्टीफन रॉबर्ट आयर्विन, ज्यांना "क्रोकोडाईल हंटर" म्हणून ओळखले जात असे, एक ऑस्ट्रेलियन प्राणीसंग्रहालयाचे व्यवस्थापक, वन्यजीवनसंवर्धक, टीव्ही सादरकर्ते, वन्यजीवन प्रशिक्षक व पर्यावरणवादी होते. आयर्विन मगरी व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या सोबतच वाढले. त्यांचे वडील
बॉब यांनी त्यांना याविषयी शिकवले. परंतु जीवन हे खरोखरच अतिशय क्रूर असते.
जो माणूस वन्यजीवनाचा एक भाग होता त्याच्या जीवनाचा अंत इतर लोकांना वन्यजीवनाविषयी जागरुक करतानाच झाला. ते स्टिंगरे माश्याविषयी एका माहितीपटाचे चित्रकरण करत असताना, अशाच एका माशाच्या दंशामुळे त्यांचा मृत्यू झाला. परंतु त्यांनी वन्यजीवनासाठी जे योगदान दिले आहे ते त्यांचे माहितीपट व नमूद केलेल्या शब्दांसारख्या गोष्टींमध्ये कायम राहील. दुर्दैवाने आपली माध्यमे (वृत्त माध्यमे) किंवा आपले सरकार अशा शब्दांमधून काहीच शिकत नाही ही वस्तुस्थिती आहे.याचे कारण म्हणजे पुणे टाईम्समध्ये अलिकडेच मुखपृष्ठावर वन्यजीवन पर्यटनाविषयी एक पूर्णपानी बातमी छापण्यात आली होती. त्यामध्ये काझिरंगा अभयारण्याचे छायाचित्र होते ज्यामध्ये एक गेंडा एका वाहनाचा पाठलाग करत होता. यामध्ये इतर काही घटनाही नमूद करण्यात आल्या होत्या व लोक वन्यजीवन पर्यटनाच्या नियमांचे कसे उल्लंघन करतात व ते पर्यटकांसाठी, तसेच वन्य प्राण्यांसाठी किती धोकादायक आहे वगैरे, वगैरे. कुणाही शहाण्या माणसाला (अशा लोकांची संख्या अर्थातच अतिशय कमी आहे) हे अतिशय चुकीचे आहे असेच वाटेल व तो वन्यजीवन पर्यटनाला आळा घालण्यासाठी (म्हणजे त्याला प्रतिबंध करण्यासाठी) पावले उचला म्हणेल म्हणजे वन्य प्राण्यांना माणसांपासून थोडा निवांतपणा किंवा खाजगीपणा मिळेल. हा नक्कीच चांगला विचार आहे, परंतु या घटनेमागील वस्तुस्थिती काय आहे हे तपासून पाहू. माझ्या माहितीप्रमाणे ही चित्रफित मानस राष्ट्रीय उद्यानाची होती, काझिरंगाची नव्हती.
असो, यावर तुम्ही म्हणाल याने काय फरक पडतो, मान्य आहे मात्र या चित्रफितीमध्ये एक तरुण वयात येणारा गेंडा होता ज्याला प्रत्येक गोष्टीबाबत उत्सुकता असते.ते वाहन पर्यटकांचे नव्हते तर वन विभागाचे होते (मी ती ध्वनीचित्रफित पाहिली आहे) व ते मालवाहू वाहनासारखे एखादे वाहन होते हे स्पष्ट दिसत होते व त्यांना अनेकदा प्राण्यांशी होणाऱ्या अशा चकमकींना तोंड द्यावे लागते कारण ते त्यांचे कामच आहे. त्या चित्रफितीमधील रस्ता जेमतेम १० फूट रुंद होता व रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोल भाग होता त्यामुळे गेंडा रस्त्यावरून बाजूला जाऊ शकत नव्हता. शहरांमध्येही भटकी कुत्री कारचा पाठलाग करतात, मात्र त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांना राग आला आहे. परंतु या संपूर्ण घटनेनंतर असे चित्र रंगवण्यात आले की पर्यटकांच्या वाहनाने गेंड्याचा मार्ग अडवल्यामुळे तो रागवला होता व वाहनाचा पाठलाग करत होता. त्यानंतर या बातमीमध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील एका घटनेचाही उल्लेख करण्यात आला होताज्यामध्ये सफारीदरम्यान एक पर्यटक जिप्सीतून खाली पडला (?) त्याचवेळी तिथे माया नावाची वाघीण आसपास होती. तसेच इतरही घटनांचा उल्लेख करण्यात आला होता ज्यामध्ये मध्य भारतातील कुठल्याशा जंगलामध्ये वाघीणीने जिप्सीचा पाठलाग केला. ही बातमी वन्यजीवन पर्यटनाविषयीच्या मार्गदर्शक तत्वांविषयी होती, त्यामध्ये काझिरंगा अभयारण्यातील जंगलातील गाईडच्या संघटनेचे कर्मचारी तसेच आरएफओ (रेंज फॉरेस्ट ऑफिसर) यांच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या, त्या दोघांनीही पर्यटकांच्या वर्तनाला व जंगलातील पर्यटकांच्या संख्येलाच दोष दिला. त्याचप्रमाणे, इन्स्टाग्राम व फेसबुकवर नेहमी वाघ चालतोय व अनेक जिप्सींनी त्यांचा मार्ग अडवला आहे अशा आशयाच्या पोस्ट टाकलेल्या असतात व अशा पोस्टचे शीर्षक सामान्यपणे, आपण पर्यटनामुळे वन्यजीवनाचे नुकसान करतोय अशा प्रकारचे तर आता वन्य जीवनाविषयीची वस्तुस्थिती व अशा माध्यम पंडितांच्या (अगदी वृत्त माध्यमांच्याही) मते वन्यजीवनाचे काय नुकसान होत आहे हे समजून घेऊ.
त्यानंतर तुम्ही आणखी प्रश्न विचारू शकता.सहा वर्षांपूर्वी भारतातील सर्व राष्ट्रीय अभयारण्ये पूर्ण क्षमतेने सुरू होती व मध्यप्रदेशाच्या जबलपूरमधील कुणा वकिलाने (या व्यवसायाविषयी पूर्णपणे आदर राखून सांगावेसे वाटते) वर नमूद केल्याप्रमाणे माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे व्याघ्र प्रकल्पांमधील वन्यजीवन पर्यटनावर पूर्णपणे बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली. त्यानंतर माननीय न्यायालयाने सहा महिन्यांसाठी वन्यजीवन पर्यटनावर बंदी घातली व कालांतराने व्याघ्र प्रकल्पांमध्ये २०% क्षमतेने वन्य पर्यटनाला परवानगी देण्यात आली, पर्यटकांना जंगलामध्ये जाता येऊ शकेल असा भाग कमी केला, तसेच वाहनांची संख्याही कमी केली. तुलना करायची झाली तर ताडोबाच्या जंगलात पूर्ण पर्यटन कोअर क्षेत्र ६०० चौ. किमी असेल तर त्यापैकी केवळ १५० चौ. किमी क्षेत्रच पर्यटनासाठी खुले असेल. ताडोबाच्या कोअर क्षेत्रात पूर्वी १०० जिप्सींना परवानगी असेल तर आता माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केवळ २० जिप्सींनाच परवानगी दिली जाते. यामुळे थेट वन विभागाच्या महसूलावर परिणाम झाला आहे. तसेच जे लोक जिप्सी, गाईड, निवास व्यवस्था, तसेच जेवण यासारख्या सेवांवर अवलंबून होते त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे, कारण या अभयारण्यांमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या थेट ८०% कमी झाली आहे. परंतु मी हे महसूल बुडत आहे म्हणून लिहीत नाही कारण या देशामध्ये महसूल बुडाला या आधारावर आपण खटले जिंकू शकत नाही, त्यामुळे असो !
मुद्दा असा आहे की, पर्यटकांना जंगलाचा जो भाग पाहता येईल तो ८०% कमी करण्यात आला आहे व त्याचशिवाय वन विभागाकडे संपूर्ण देशभर वन्य जीवनाचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या पायाभूत सुविधा अतिशय अपुऱ्या आहेत असे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. अशावेळी या सर्व भागांमध्ये पर्यटकांची वर्दळ ही वनविभागासाठी कान व डोळ्यांचे काम करते ज्यामुळे या भागातील अवैध शिकारी, व लाकुडतोडे यांच्यावर वचक राहू शकतो, ही बाब कुणीही लक्षात घेत नाही. त्याचशिवाय महसूल उत्पन्न कायम राहावा यासाठी, जंगलातील प्रवेश शुल्क एवढे वाढविण्यात आले आहे की आता वन्यजीव पर्यटन किंवा व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ पाहाणे केवळ अति श्रीमंतांनाच शक्य आहे ,मध्यवर्गीयांना क्वचित कधीतरी ते शक्य होते व कनिष्ट मध्यमवर्गीय किंवा अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींना ते अशक्य आहे ! आज ताडोबातील एका सफारीसाठी जवळपास १२,०००/- रुपये खर्च येतो. यामध्ये तुमच्या शहरापासून ते ताडोबापर्यंतचा प्रवासखर्च, जेवणाचा व निवासाचा खर्च समाविष्ट नाही. म्हणजेच वाघ पाहण्यासाठी पुण्याहून ताडोबाला आलेल्या चौघाजणांच्या एका कुटुंबाला चार सफारींसाठी ५०,००० रुपये खर्च करावे लागतील, केवळ जंगलात वाघ पाहण्यासाठी किती कुटुंब एवढा खर्च करू शकतील?
यावर, बरेचजण म्हणतील की वेगळ्या जिप्सीसाठी एवढा त्रास कशाला घ्यायचा, त्याऐवजी कँटरचा परवडणारा पर्याय आहे ज्यामध्ये बसून जवळपास ३० लोक जंगलात जाऊ शकतात.मात्र त्यामुळे खरेतर जंगलात गर्दी होती व त्यावर बंदी घातली पाहिजे किंवा मग माननीय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायमूर्तींनी त्यांच्या जंगलातील सफारींसाठी जिप्सी ऐवजी कँटरचा वापर करावा व त्यानंतर मला दोन्हीतील फरक सांगावा, अशी माझी सूचना आहे. यामुळे देशातील जवळपास ९५% लोकसंख्येचा जंगलांना भेट देण्याचा मूलभूत हक्क हिरावला जात आहे व ते वन्यजीवनापासून लांब जात आहेत. कारण त्यांनी जंगल पाहिलेच नाही किंवा अनुभवलेच नाही, तर ते निसर्गाच्या या पैलूवर प्रेम कशाप्रकारे करू शकतील, बरोबर? या साठी मी तुम्हांला पत्र लिहितोय !
वन्यजीवन पर्यटनाची धोरणे किंवा मार्गदर्शक तत्वांविषयी सांगायचे, तर मी गेली वीस वर्षे देशातील बहुतेक व्याघ्र प्रकल्पांना भेट देत आहे व
गाईड व कनिष्ट श्रेणीतील वन कर्मचाऱ्यांसोबतही काम केले आहे. मी खरोखरच सांगतो की, सामान्य पर्यटक क्वचितच वन्य पर्यटनाची कोणतीही मार्गदर्शक तत्वे किंवा
नियमांचे उल्लंघन करण्याचे धाडस करतात. बहुतेक वेळा हे उल्लंघन अति महत्त्वाच्या
व्यक्तींच्या वाहनांकडूनच होते, तुम्ही तुमच्या स्रोतांकडून माझे निवेदन तपासू शकता. त्यानंतर जिप्सीतून पर्यटक पडण्यासारख्या घटनांविषयी सांगायचे, तर जंगलांमध्ये रस्त्यांची परिस्थिती कशी असते तसेच वाघाची एक झलक
पाहण्यासाठी पर्यटक किती उतावीळ असतात हे तुम्ही जाणता. अर्थात ते समजण्यासारखे
आहे कारण पर्यटकाने वाघ पाहण्यासाठी
अक्षरशः आपले दात कोरून पैसे दिलेले असतात. तसेच जिप्सीतून खाली पडण्याची शक्यता असूच असते, कारण हा काही आरामात केला जाणारा प्रवास नसतो, तो एक साहसी प्रवास असतो. जंगलामध्ये अशी हजारो वाहने प्रवास करत असताना
अशा घटना घडू शकतात, याचा अर्थ असा होत नाही की संपूर्ण वन्यजीवन पर्यटन हे वन्यजीवन किंवा
माणसांच्या सुरक्षिततेसाठी धोका आहे. न्यायमूर्ती सर आपल्या द्रुतगती
महामार्गावर अपघातात हजारो लोकांचा जीव गेला आहे, परंतु आपण द्रुतगती महामार्ग बंद करण्याचा विचार करतो का, नाही. तर मग एक किंवा दोन पर्यटक जंगलामध्ये जिप्सीतून खाली पडल्यावर, सगळेच वन्यजीवन पर्यटन वाईट आहे असे आपण का म्हणतो, हा माझा मुद्दा आहे. त्याऐवजी वन्यजीवन पर्यटन सर्वांना सहजपणे उपलब्ध होईल
असा प्रयत्न करा. म्हणजे सगळे जंगलामध्ये शांतपणे व व्यवस्थित खबरदारी घेऊन प्रवेश
करतील, वन्यजीवन संवर्धनाचे यशही यातच आहे, हा माझा मुद्दा आहे. यामध्ये तुम्हीच हस्तक्षेप करू शकता व हे घडवू शकता! अशा जंगलांभोवती राहणाऱ्या लोकांचे उपजीविकेचे एकमेव साधन असते ते म्हणजे
पर्यटन व हेच लोक वन्यजीवनाचे भवितव्य ठरवणार आहेत व ते वाघ, बिबटे, हरिण व अशाच इतर प्रजातींसोबत शेकडो वर्षांपासून जगत आहेत, त्यांना मार्गदर्शन करा, त्यांना रोजीरोटीद्या, आणखी वन्यजीवन पर्यटनाद्वारे उपजीविकेचे साधन द्या. त्यानंतर पाहा हे लोक
प्राणपणाने वन्यजीवनाचे संरक्षण करतील.
शेवटचा मुद्दा, अशा संरक्षित व्याघ्र प्रकल्पांबाहेर राहणारे शेकडो वाघ तसेच वन्य प्राण्यांचे काय, त्यांचे संवर्धन व त्यासंदर्भातील नियमांचे काय, कारण भोपाळ, नागपूर, जबलपूर यासारख्या मोठ्या शहरांभोवती वाघ दिसून आले आहेत, तसेच पुण्याच्या आसपासच्या अनेक गावांमध्ये बिबटे सहजपणे दिसून येतात. अशावेळी या शहरांमधून जाणारे सर्व रस्ते आपण बंद करणार आहोत का किंवा या ठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांची संख्या कमी करणार आहोत का किंवा कसे? रस्त्यांवरील अपघातात वन्यप्राणी मारले जाण्याचे सर्वाधिक प्रमाण व्याघ्र प्रकल्पांसारख्या सुरक्षित जंगलांमध्ये होत नाही, तर सुरक्षित जंगलांच्या बाहेर असलेल्या गावांच्या व शहरांच्या भोवताली असते. याचे एकमेव कारण म्हणजे शहरातील नागरिकांना वन्यजीवनाविषयी जाणीवच नसते कारण ते त्यांनी कधीच पाहिले नसते किंवा अनुभवले नसते. त्याचशिवाय ताडोबातील तारा व माया या वाघीणी, पेंच व्याघ्र प्रकल्पातील कॉलरवाली ही वाघीण यांचे उदाहरण घ्या, त्यांनी अनेक वाघाच्या बछड्यांना जन्म दिला आहे व त्यांची निकोप वाढ केली आहे. त्यांना अवतीभोवती जिप्सी असण्याची, त्यांची छायाचित्रे काढली जाण्याची सवय आहे; पर्यटनामुळे त्यांना त्रास झाला असता, तर खुल्या क्षेत्रातील वाघांची संख्या वाढलीच नसती, बरोबर? माननीय सरन्यायाधीश महोदय, आपल्या समाजाने वन्यजीवन संवर्धनाचा खरा अर्थ जाणून घेण्याची वेळ आली आहे व मला असे वाटते. जर समाज त्यासाठी सक्षम नसेल किंवा कमकुवत असेल किंवा त्यांची दिशाभूल केली जात असेल (कोणत्याही कारणाने) तर समाजाला योग्य मार्गावर आणणे हे न्यायपालिकेचे काम आहे, तुम्हाला पत्र लिहीण्यामागे हाच एकमेव उद्देश होता. प्रिय सरन्यायाधीश महोदय, कृपया देशातील सर्व जंगले पूर्ण क्षमतेने खुली करा, म्हणजे प्रत्येक व्यक्ती जंगलाला भेट देऊ शकेल व वाघ निवांतपणे जंगलातचालत असल्याचे पाहू शकेल.
आपल्याकडे अनेक चांगले वनाधिकारी, पूर्णपणे झोकून काम करणाऱ्यास्वयंसेवी संस्था व वन्यजीवन तज्ज्ञ आहेत, त्यांना एकत्र करा व एक धोरण तयार करा ज्यामुळे सामान्य लोक वन्यजीवन अनुभवू शकतील. असे झाले तरच ते वन्यजीवनावर प्रेम व
त्याचा आदर करू शकतील. हे संवर्धन, जागरुकता व पर्यटनाच्या मार्गाने साध्य होईल. कृपया वेगाने
पावले उचला एवढीच विनंती आहे, कारण आपले वन्यजीवनावरील सातत्याने वाढते अतिक्रमण पाहता, जंगलाकडे वेळ कमी आहे व त्यावेळी कुठलाही
कायदा वन्यजीवन वाचवू शकणार नाही व त्यासोबतच माणसाचे भविष्यही संपुष्टात आलेले
असेल ही काळ्या दगडावरची रेघ आहे, म्हणूनच मी तुम्हाला हे पत्र लिहीले आहे!
तुम्हाला थोडा मोकळा वेळ मिळाल्यास कृपया खाली दिलेल्या यूट्यूबच्या
दुव्यावर ताडोबाच्या यशोगाथेविषयीचे सादरीकरण पाहा..
-संजय देशपांडे, हेमांगी वर्तक, अनुज खरे, आरती कर्वे.
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलोपर्स
ईमेल आयडी - smd156812@gmail.com
09822037109
No comments:
Post a Comment