एका मृत झाडाची गोष्ट !
“आपण
आपल्या आजूबाजूच्या झाडांच्या बाबतीत जे काही
करत आहोत ते आपण स्वतःच्या व इतरांच्या बाबतीत काय करतोय याचेच प्रतिबिंब आहे.” क्रिस
मेसर
क्रिस मेसर हे लेखक, आंतरराष्ट्रीय व्याख्याते, सल्लागार असून सामाजिक-पर्यावरणाशी संबंधित चिरस्थायित्वासाठी सुविधा प्रदाते आहेत. त्यांनी नैसर्गिक इतिहास व पर्यावरणशास्त्र या विषयात संशोधन वैज्ञानिक म्हणून २० वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. ते सध्या कॉरव्हॅलिस, ऑरिगॉन, यूएसए येथे राहतात. निसर्गाशी एवढी जवळीक असल्यामुळे ते माणसांच्या वर्तनाचा संबंध झाडांशी लावू शकतात (म्हणजे एकूणच निसर्गाशी ) व त्याचा परिणाम आपल्याला आपल्याभोवती सगळीकडे पाहायला मिळतो आहे. आपल्यामुळे आपल्या निसर्गाचा कसा ऱ्हास होतो आहे व त्याचे संवर्धन याविषयी रडगाणे गाणारा हा आणखी एक लेख आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अगदी बरोबर आहात व ज्यांना त्याचा कंटाळा आला असेल ते वाचन थांबवू शकतात व इन्स्टाग्रामवर रिल्स पाहू शकतात (कुजकटपणा). परंतु ज्यांना निसर्गाच्या संवर्धनामध्ये थोडाफार रस आहे व त्यासंदर्भात त्यांची काही जबाबदारी आहे असे वाटत असेल ते पुढे वाचू शकतात (त्यांनी वाचला पाहिजे).मी आज जे काही सांगणार आहे ते वृक्षतोड किंवा झाडांची संख्या कमी होत असल्याबद्दलचे (शीर्षकावरून ते काय आहे याचा अंदाज तुम्ही लावला असेल) अजुन एक बोधामृत नाही, तर आपल्या भोवती घडणाऱ्या घडामोडी व आपल्याला त्यासंदर्भात काय करता येईल व त्यापेक्षाही एखादे झाड वाचवून किंवा अगदी वठलेल्या का होईना एखाद्या झाडाच्या अस्तित्वामुळे आपल्या कंटाळवाण्या आयुष्यात कसे सौंदर्य निर्माण करता येईल याविषयी हा लेख आहे !
शीर्षकामध्ये म्हटल्याप्रमाणे हा लेख एका वठलेल्या झाडाच्या गोष्टीविषयी आहे व ते देखील सुबाभळीचे झाड जे या देशात कुठेही उगवते. माझ्या माहितीप्रमाणे ते देशी झाड नाही तरीही ते आपल्या भोवताली सगळीकडे दिसते,अर्थात आपण ज्याला आपले शहर म्हणतो त्या काँक्रिटच्या जंगलात झाडेच फारशी दिसत नाहीत, असो. तर त्या वठलेल्या सुबाभूळच्या झाडावर तांबट पक्ष्यांची एक जोडीही बसत असे त्याविषयी हे आहे. मी एरंडवणे या उपनगरातल्या पटवर्धन बाग या परिसरात राहतो. हा पुण्याचा मध्यवर्ती भाग मानता येईल व सुदैवाने इमारतीच्या समोरून मुठा नदीच्या समांतर रस्ता आहे व तेथे अजूनही बरीच झाडे शिल्लक आहेत. माझ्या इमारतीच्या कुंपणाच्या भिंतीला लागून असलेल्या अशोक, अमलताश, कडुनिंब यासारख्या हिरव्यागार झाडांच्या सोबतीला एक सुबाभळीचे वठलेले झाड होते. आत्तापर्यंत या काळ्या व करड्या रंगाच्या वठलेल्या झाडाकडे माझे कधीही लक्ष गेले नव्हते परंतु एके दिवशी सकाळी मी हॉलमध्ये असताना मला अचानक कुक कुक कुक असा एक ओळखीचा आवाज ऐकू आला. हा नक्की कुठला आवाज आहे याविषयी कुतुहल वाटून मी हॉलला लागून असलेल्या गच्चीमध्ये गेलो व हा आवाज कुठून येत आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागलो. आश्चर्य म्हणजे मला वठलेल्या सुबाभळीच्या करड्या फांदीवर रंगीबेरंगी पक्ष्यांची एक जोडी दिसली. या झाडाकडे आत्तापर्यंत माझे कधीच लक्ष गेले नव्हते, परंतु याच झाडाच्या शेंड्यावर बसून तांबट पक्ष्यांची एक जोडी एकत्रितपणे गात होती. मी माझा कॅमेरा घेण्यासाठी पटकन आत गेलो व तांबट पक्ष्याच्या जोडीची काही सुंदर छायाचित्रे मला घेता आली जी मला अगदी जंगलातही मिळाली नसती. याचे कारण म्हणजे ते झाड वठलेले होते व तांबट पक्षी सामान्यपणे अशा झाडाच्या शेंड्यावर बसतात व माझी सदनिका नवव्या मजल्यावर असल्याने मला तांबट पक्ष्यांची जोडी अगदी वरून आणि जवळून पाहता आली, जे जंगलामध्ये शक्य झाले नसते व त्यामुळे मी अतिशय आनंदित झालो होतो.
त्या दिवशीच्या सकाळनंतर रोज पहाटे वेळी ते कुक कुक संगीत ऐकणे व सकाळच्या सूर्यप्रकाशात न्हाणारी व शहराचा दिवस सुरू होत असताना भोवताली काय चालले आहे हे निरखून पाहणारी व हिरव्या झाडांच्या सावलीत उडून जाणारी तांबट पक्ष्यांची जोडी न्याहाळणे हा नित्यनियमच झाला.अगदी दुपारच्या वेळीही तांबट पक्षी या वठलेल्या झाडावर येऊन बसत असत व ते दुपारच्या कडकडीत उन्हात असे उघड्यावर येऊन काय करतात याचे मला कुतुहल होते. मी जेव्हा माझ्या कॅमेऱ्याच्या टेलीलेन्सनी जवळून पाहिले तेव्हा समजले की तांबट पक्षी वठलेल्या झाडाच्या फांद्यांमध्ये कीटकांच्या स्वरूपातील अन्नाचा शोध घेत होता, म्हणजे ते वठलेले झाडही त्या तांबट पक्ष्यांना केवळ सूर्यप्रकाशात न्हाण्यासाठी जागाच देत नव्हते तर अन्नही देत होते. त्यानंतर एकेदिवशी सकाळी तांबट पक्ष्यांच्या कुक कुक गाण्यामध्ये आणखी एक मोठा किलबिलाटीचा सूर मिसळला व मला पाहून आनंदाचा धक्का बसला कारण त्या वठलेल्या झाडावर तांबट पक्ष्यांच्या जोडीसोबत धनेश पक्ष्यांची एक जोडी बसली होती. ते अतिशय सुंदर दृश्य होते कारण त्या झाडावर एकही हिरवे पान नव्हते त्यामुळे ते तांबट पक्षी त्या झाडावरील पालवीसारखे भासत होते व काळसर करड्या रंगाचे धनेश पक्षी त्या वठलेल्या झाडाच्या पसरलेल्या फांद्यांप्रमाणे वाटत होते. ते धनेश पक्षी तेथे अन्नाच्या शोधात आले होते परंतु त्यांना त्या वठलेल्या झाडाच्या फांद्या अतिशय सुरक्षित वाटल्या व या अधिवासाच्या भोवतालचा भाग न्याहाळण्यासाठी बसण्यासाठी खुली जागाही मिळाली, त्या सकाळनंतर ती धनेश जोडी सुद्धा तिथे नियमितपणे येणारे पाहुणे झाले व तांबट पक्ष्यांचा त्याला काहीही आक्षेप दिसला नाही.
आश्चर्य म्हणजे करड्या रंगाची शहरी कबुतरे ज्यांनी आजकाल शहरांमध्ये उच्छाद मांडला आहे व घारी या झाडावर येऊन अजिबात बसले नाहीत, ही खरेतर चांगली गोष्ट आहे, कारण त्यांनी नक्कीच तांबट पक्ष्यांना हुसकावून लावले असते. परंतु त्यांच्याशिवायही तांबट पक्ष्यांच्या या नेहमीच्या झाडावर बुलबुल, राघू (ज्यांना शहरातील बहुतेक लोक चुकून पोपटच समजतात) व मैना यासारखे पाहुणेही येतात. लॉकडाऊन नंतर, मला भोवताली राघूंच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे, याचे कारण काहीही असो परंतु ही वस्तुस्थिती आहे व त्यामुळे तांबट, चिमण्या यासारख्या इतर लहान पक्ष्यांच्या समतोल बिघडू नये एवढीच माझी चिंता आहे. जेव्हा सूर्य मावळतो, तेव्हा या वठलेल्या झाडावर घुबड व वटवाघुळासारखे काही निशाचर पक्षीही येऊन बसतात असे माझ्या निदर्शनास आले, सुदैवाने माझ्या भागात हे पक्षी अजूनही शिल्लक आहेत. त्याचशिवाय पिंगळा तसेच पांढरे घुबड हे निशाचर पक्षी व वटवाघुळेही दिसून आली आहेत, ओमकारेश्वराच्या मंदिराजवळ कर्वे रस्त्यावर झालेली वृक्षतोड हे त्याचे कारण आहे. तेथे वटवाघुळांची मोठी वसाहत होती, तेथे गृहनिर्माण संकुलांसाठी (दुसरे काय) झाडे तोडल्यामुळे ती नाहीशी झाली, या सगळ्या झाडांवरील वटवाघुळांनी आमच्या इमारतीच्या रस्त्याला लागून असलेल्या झाडांवर आसरा घेतला आहे.माझे कॅमेरा कौशल्य फार उत्तम नसल्यामुळे, मला अजूनही त्या वठलेल्या झाडावर निशाचर पक्ष्यांची रात्रीच्या वेळेस छायाचित्रे घेता आलेली नाहीत, परंतु मी त्यांना पाहू शकलो व त्यापेक्षा मला रात्री झाडावर त्यांचे अस्तित्व अतिशय ठळकपणे जाणवले.
जवळपास तीन वर्षे (लॉकडाऊनच्या कृपेने) त्या सुबाभळीच्या वठलेल्या झाडावर येणारे तांबट व इतर पक्षी पाहणे हा माझा सर्वोत्तम काळ वेळ असायचा (केवळ विरंगुळा नव्हे), परंतु एकेदिवशी ते कुक कुक संगीत थांबले.आता आयुष्य पुन्हा नव्याने, सामान्यपणे सुरू झाले होते व मी सुद्धा माझ्या काँक्रिटच्या जंगलामध्ये दैनंदिन जीवनात पुरता बुडून गेलो होतो. तरीही मला सकाळचे कुक कुक हे संगीत ऐकू येत नसल्याचे जाणवल्याने मी बाहेर जाऊन खाली पाहिले व आश्चर्य म्हणजे (खरेतर धक्का बसला) ते वठलेले झाड तेथे नव्हते, ते नाहीसे झाले होते. मला खाली चालताना याची जाणीव झाली नाही परंतु मला वरून अगदी स्पष्टपणे दिसले की त्याच्या करड्या काळ्या वाळलेल्या फांद्या आता नाहीत ज्यावर तांबट पक्षी बसत असत व म्हणूनच कुक कुक संगीत थांबले. त्या दिवशी मी ऑफिसला जाताना माझ्या इमारतीच्या वॉचमनला विचारले, त्या वठलेल्या झाडाचे काय झाले, ते पावसात पडले का, त्यावर तो म्हणाला, “नाही साहेब, महापालिकेचे लोक आले होते, ते झाड धोकादायक झाले होते म्हणून तोडून टाकले” (पुणे महानगरपालिकेच्या लोकांनी ते झाड तोडून टाकले).ते झाड वठलेले होते व त्याच्या फांद्या त्याच्या खाली पदपथावरून चालणाऱ्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरू शकतात असे काही माणसांना वाटले असावे.हा धोका हाताळण्यासाठी एकमेव तर्कसंगत मार्ग म्हणजे ते तोडून टाकणे, कारण असेही ते सुबाभळीसारख्या निरुपयोगी प्रजातीचे वठलेले झाड आहे, नाही का? दुखःद भाग म्हणजे, माणसांच्या या जगात, जेव्हा काही माणसांना असे वाटते की काहीतरी माणसांसाठी धोकादायक आहे, तेव्हा त्यावर तोडगा काढताना केवळ माणसांचाच विचार केला जातो (असे आम्हाला वाटते).परंतु ते झाड तांबट किंवा धनेश किंवा वटवाघुळांसाठी काय होते हे विचारण्याची तसदी कोण घेईल, हेच माझ्या या लेखाचे कारण आहे. आपल्याला ते“धोकादायक झाड” बुंध्यापासून तोडणे टाळता आले असते,जो बऱ्यापैकी मजबूत वाटत होता,त्याचा एकमेव धोका म्हणजे त्याच्या फांद्या पडल्या असत्या, म्हणनूच ज्या फांद्या तुटण्यासारख्या आहेत त्या तोडून टाका. तसेच अशा झाडाखालून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांसाठी झाडावर एखादी जाळी लावा.मला माहितीय दररोज सकाळी तांबट पक्ष्यांची जोडी तसेच त्यांचे बुलबुल,राघू यांच्यासारखे मित्र दुसऱ्या एखाद्या झाडाच्या शेंड्यावर विश्रांती घेत असतील,कारण सुदैवाने अवतीभोवती अनेक झाडे आहेत. परंतु माझ्यासाठी माझ्या भोवतालचा परिसर व सकाळ ते वठलेले झाड व त्यावर बसलेली तांबट पक्ष्यांची जोडी पाहिल्याशिवाय आता कधीही परत तशी होऊ शकणार नाही.
आता लेखाच्या मूळ मुद्याकडे येऊ,आपण बेसुमार वृक्षतोड चालवली आहे जी केवळ शहरे किंवा गावांपुरतीच मर्यादित नाही तर उत्तरांखंडमधील नेहमी हिरवेगार वाटणारे डोंगरही माणसाच्या तावडीतून सुटलेले नाहीत.अलिकडेच एक वन्यजीवप्रेमी श्री. बिट्टू सेहगल यांनी सिमला येथील (हिमालयातील एक गाव) व तेथील वृक्षतोडीचे एक छायाचित्र शेअर केले होते. त्यांचे असे म्हणणे होते की, “मी इथे जन्मलो व पहा आता त्यांनी माझ्या शहराचे काय केले आहे”! मला मान्य आहे, आपल्याला (म्हणजे माणसांना) जागा हवी आहे व त्यासाठी झाडे तोडणे आवश्यक आहे परंतु यामध्ये दोन गोष्टी आहेत,आपण जी प्रत्येक इमारत बांधतो तिची रचना करताना आहे त्या झाडांसकट का करू शकत नाही व दुसरे म्हणजे आपण बांधतो त्या प्रत्येक इमारतीमध्ये मोठी झाडे का लावू शकत नाही. कारण ज्याप्रमाणे आपल्याला जागा हवी असते त्याचप्रमाणे तांबट पक्ष्यांच्या जोडीलाही जागा हवी असते, बरोबर? आणि मग तांबट पक्ष्यांसाठी धोकादायक असलेल्या इमारती कोण हटवणार आहे,ते केवळ लहान पक्षी आहेत व ते प्रतिकार करू शकत नाहीत म्हणून आपण त्यांच्या विश्रांतीच्या जागेला धोकादायक ठरवून,ती तोडून टाकत आहोत,आपल्याला हा हक्क कुणी दिला? मला माहितीय, नेहमीप्रमाणे माझ्यावर कट्टर आणि वेडा निसर्गप्रेमी असा शिक्का मारला जाईल, पण मला केवळ एकच गोष्ट माहितीय, आपण प्रत्येक झाडाचा विचार केला पाहिजे जे अनेक प्रजातींसाठी जीवन आहे व आपण ते केले नाही तर आपल्याला सर्वात बुद्धिमान प्रजाती म्हणवून घेण्याचा काहीही हक्क नाही, किंबहुना ती वर बसलेली अज्ञात शक्ती आपल्याला सर्वात मूर्ख प्रजाती ठरवेल, जी आपल्या तोडण्याच्या क्षमतेपेक्षा कितीतर श्रेष्ठ आहे !
मित्रहो,दररोज सकाळी मला अनेक पक्षी तारांवर बसलेले दिसतात, आपल्या शहराच्या आकाशात एका इमारतीपासून दुसऱ्या इमारतीपर्यंत जाणाऱ्या अशा अनेक तारा तुम्हाला दिसतील व तरीही हे पक्ष आनंदात असतात की त्यांना बसण्यासाठी काहीतरी आहे. परंतु तुम्ही हा प्रश्न स्वतःलाच विचारा, तुम्हाला पक्षी कुठे बसलेले पाहायला आवडेल,एखाद्या झाडाच्या फांदीवर (मग ते वठलेले का असेना) किंवा एखाद्या विजेच्या किंवा 4 जीच्या तारांवर ; कारण या प्रश्नाच्या उत्तरामध्ये केवळ पक्ष्यांचेच नव्हे तर पुढच्या पिढीचे भवितव्यही सामावलेले आहे. त्यानंतरच आपण वठलेल्या झाडांचाही आदर (व काळजी) करू,तोपर्यंत देव (केवळ तोच करू शकतो) आपल्या शहरातील तांबट व धनेश पक्ष्यांचे भले करो,एवढीच प्रार्थना मी करेन !
संजय
देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
smd156812@gmail.com
कृपया पुण्यात
हक्काचे घर/ऑफिस शोधण्याबाबतचे माझे शेअरिंग खालील YouTube लिंकवर पहा आणि आवडल्यास शेअर करा..
No comments:
Post a Comment