Saturday, 4 November 2023

! श्री !

रिस्पॉन्सिबिलिटीवाली दिवाळी !














! श्री !

रिस्पॉन्सिबिलिटीवाली दिवाळी !

"एकोप्याचा प्रकाश हा हजारो दिव्यांहूनही जास्त तेजस्वी असतो"…

     मित्रहो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांची दिवाळी अतिशय आनंदी व आरोग्यदायी होवो अशा मनःपूर्वक शुभेच्छा ! गेला बराच काळ म्हणजे जवळपास तीन वर्षे आपण विषाणूरूपी अंधारात काढली. त्यानंतर जग आत्ताच कुठे थोडेफार सावरत होते तर आता जगात अनेक ठिकाणी आपल्या जुन्या-पुराण्या शत्रूने म्हणजेच युद्धाने डोके वर काढले आहे, जो धर्म, जात व दारिद्र्य यांच्या नावाखाली केला जाणारा दहशतवाद व द्वेषाचा परिणाम आहे. आपण कुठल्या जातीचे आहोत, आपण कुठल्या देवाला पूजतो हे विसरून आपण एकजुटीने विषाणूविरुद्ध लढलो म्हणूनच त्यावर मात करू शकलो, पण हे दहशतवाद व द्वेषाविरुद्धचे युद्धही त्याच शस्त्राने जिंकता येऊ शकते ते म्हणजे एकजूट किंवा एकोपा!! विषाणूविरुद्धच्या युद्धात जर लस हे आपले कवच होते तर द्वेषाविरुद्धच्या लढाईत आपल्याला गरज आहे जबाबदारी नावाच्या लसीची !

   आपण सगळे आपले कुटुंब, मित्र, सहकारी यांच्याप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्या जाणतो परंतु समाजाप्रती तसेच आपण ज्या लोकांना ओळखत नाही त्यांच्याप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्या समजून घेण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा माफ करा पण आपण अतिशय स्वार्थीपणे वागतो किंवा आपला दृष्टिकोन अतिशय संकुचित असतो. आपल्याला जर द्वेष नावाच्या शत्रूला हरवायचे असेल तर आपण यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. आपल्या कुटुंबियांना किंवा मित्रांना आपल्याकडून कोणत्या भेटवस्तू हव्या आहेत याचा विचार आपण करतो. त्यांच्यापैकी कुणी काही चूक केली तर आपली प्रतिक्रिया कशी असेल हे त्यांना माहिती असते, अपेक्षित असते व आपण त्यांना हवे तसेच वागण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आपण मित्रांबाबत जबाबदारीने वागतो, बरोबर? परंतु एखाद्याने वॉट्सॲपवर जात किंवा धर्माविषयी काही चुकीचा मेसेज पाठवला असेल किंवा वाहतुकीचा लाल सिग्नल तोडण्यासारख्या सामाजिक नियमांचे उल्लंघन केले असेल किंवा रस्त्यावर एखाद्या जखमी प्राण्याकडे (किंवा अगदी माणसांकडेही) दुर्लक्ष करून निघून गेला असेल तेव्हा आपली प्रतिक्रिया कशी असते असा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे; अशावेळी आपण जबाबदारीने प्रतिक्रिया देतो का? मला याचे उत्तर माहिती आहे व याचे कारण म्हणजे आपण असा विचार करतो की आपल्या कुणा जवळच्या व्यक्तीचा त्यामध्ये समावेश नाही तर मग आपण त्याची जबाबदारी कशाला घ्यायची, बरोबर? या दिवाळीमध्ये आपण आनंदासोबत आणखी एका गोष्टीचा समावेश केला पाहिजे, ती म्हणजे जबाबदारी, एकदा आपण समाजाच्या सर्व आघाड्यांवर जबाबदारीने वागू लागलो की हा द्वेष नावाचा शत्रू आपल्याला चुकीचे वागण्यास प्रवृत्त करणार नाही. या शत्रूला पराभूत करण्याचा हाच हमखास मार्ग आहे! याची सुरुवात आपण लहान-लहान गोष्टींनी करू शकतो, उदाहरणार्थ फटाके न उडवणे, झाडे लावणे व ती जगवणे, जात/धर्माचा द्वेष करणारे संदेश न फॉरवर्ड करणे, तुमच्या अवती-भोवती असलेल्या गरीब कुटुंबाला शक्य त्या प्रकाराने मदत करणे, रस्त्यावर काळजीपूर्वक वाहने चालवणे, जबाबदारीने वागण्यासाठी अशा कितीतरी गोष्टी करता येतील !

   चला तर मग, एका नव्या युगाची, एकजुटीच्या युगाची सुरुवात करूया, आपल्याभोवती घडणाऱ्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला एक जबाबदार माणूस म्हणून सामोरे जाऊ. निसर्गाच्या संवर्धनाला हातभार लावू तसेच तुमच्या थोड्याशा मदतीची गरज आहे अशा लोकांसाठी मदतीचा हात पुढे करू व जबाबदारीने वागून ही दिवाळी रिस्पॉन्सिबिलिटीवाली साजरी करू !

 


 संजय देशपांडे, रोहित , रोहन आणि  टीम संजीवनी

smd156812@gmail.com





















No comments:

Post a Comment