मृत बजरंग, बेपत्ता माया आणि आपली जबाबदारी !
मृत बजरंग, बेपत्ता माया आणि आपली जबाबदारी !
"जेव्हा दोन वाघांची लढाई
होते तेव्हा एक वाघ जखमी होणे, व एकाचा मृत्यू होणे निश्चित असते."… मास्टर फुनाकोशी
" कोल्हा म्हणून शंभर वर्षे जगण्यापेक्षा
वाघ म्हणून एकच वर्ष जगणे कितीतरी पटींनी अधिक चांगले असते."…- बेनिटो
मुसोलिनी.
मास्टर फुनाकोशी हे जपानचे आहेत व मुसोलिनी इटलीचा, आश्चर्य म्हणजे या दोघांच्याही देशात वाघ नसतात, त्यामुळे त्यांनी जंगलामध्ये प्रत्यक्षात एखादा वाघ कधी पाहिला असेल का अशी मला शंका आहे. तरीही त्यांच्या अवतरणांमध्ये या पट्टेरी प्रजातीचे चपखल वर्णन आहे. वाघांना आपल्या देशाच्या वन्यजीवनामध्ये तसेच वन्यजीवन पर्यटनामध्येही सर्वोच्च स्थान आहे व तसेच समाज माध्यमांवरही त्याला सर्वाधिक स्थान असते. आत्तापर्यंत माझे नियमित वाचक (असे काही वाचक आहेत) विचार करू लागले असतील की मी वाघांच्या विशेषतः ताडोबातील वाघांच्या विचारांनी झपाटलोय. मी झपाटलेला नाही परंतु वन्यजीवनाविषयी बोलायचे झाले तर तुम्ही वाघ व ताडोबा या दोन गोष्टी विसरू शकत नाही. ज्याप्रमाणे डॉक्टर एखाद्या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी विशिष्ट प्रकरणाचा वापर करतात जे भविष्यातील अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये उपयोगी असते. ताडोबा एकीकडे वाघांच्या संवर्धनासाठी सर्वात यशस्वी प्रकरण अभ्यास ठरलेला असतानाच दुसरीकडे त्यातून आपल्याला संवर्धनाच्या प्रक्रियेतील अडथळेही दिसून येतात, जी अजूनही पूर्ण झालेली नाही. खरे सांगायचे तर या लेखाला केवळ ताडोबाची पार्श्वभूमी आहे, त्यातील अनुभव हे कुठलेही असू शकतात. माझे ताडोबाशी अतिशय घनिष्ट संबंध आहेत, ज्याप्रमाणे प्रसिंधी माध्यमाचे छायाचित्रकार केवळ लोकप्रिय लोकांचा (तुमचा किंवा माझा नव्हे) सतत पाठलाग करत असतात त्याप्रमाणे व ताडोबा हे वन्यजीवनाच्या बॉलिवुडप्रमाणे असल्याने व इथे वाघ लोकप्रिय असल्यामुळे, हा लेख सुद्धा ताडोबातील वाघांविषयी आहे एवढी साधी तुलना मी करू शकतो. बजरंग आणि माया ही अनुक्रमे ताडोबा जंगलातील वाघ व वाघीणींचे नावे आहेत.
अलिडेच ताडोबाच्या जंगलाभोवती बजरंग व छोटा मटका नावाच्या दोन वाघांची लढाई झाली, ज्यामध्ये शेवटी एकाचा नंतर मृत्यू झाला. त्याचप्रमाणे माया नावाची एक वाघीणही गेल्या तीन महिन्यांपासून गायब होती, जी ताडोबाचे मुख्य आकर्षण होती, तिचा रस्त्यावर मुक्त संचार असल्यामुळे पर्यटकांना अतिशय आनंद होत असे, परंतु शेवटी वनविभागाने तिचा (मृत्यू झाला असावा असा अंदाज ) व्यक्त केला जात आहे. वाघांना नावांऐवजी क्रमांकाने ओळखण्याच्या वन विभागाच्या पद्धतीविषयी पूर्णपणे आदर आहे, यापैकी बहुतेक नावे स्थानिकांनी दिलेली आहेत. परंतु तरीही मी वाघाचे नाव वापरण्यालाच अधिक प्राधान्य देतो कारण त्यामुळे मी या प्रजातीशी अधिक जोडला जातो! पहिली घटना ताडोबाच्या बफर क्षेत्रात एका गावाजवळ झाली व अनेक गावकऱ्यांनी तर या दोन वाघांची लढाई पाहिलीसुद्धा. यामध्ये बजरंग हा वाघ छोटा मटकाकडून मारला गेला, या लढाईत त्यालाही इजा झाली परंतु तो वाचला. हरवलेल्या मायाचा शोध महिनाभरापेक्षा अधिक काळ सुरू होता व वन विभागाला वाघाच्या शरीराचे अवशेष सापडले, ते मायाचेच असल्याची खात्री करण्यासाठी डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. समाज माध्यमांमध्ये या दोन्ही बातम्यांवर बरीच टीका टिप्पणी करण्यात आली, त्या शेअर करण्यात आल्या व वादविवादही झाले (नेहमीप्रमाणे). तुम्ही म्हणाल त्यात काय मोठेसे, वाघ लढतात, भटकी कुत्रीही लढतात व एक वाघीण हरवली व तिचा मृत्यू झाला असेलही पण, हा निसर्ग आहे व बहुतेकांच्या या मताशी मी असहमत नाही व अनेक लोक असेही होते ज्यांनी या दोन्ही बातम्यांची दखलही घेतली नाही, त्यामुळे असो! माझा लेख ज्यांचे वन्यजीवनावर प्रेम आहे, केवळ त्याची छायाचित्रे काढण्यावर नाही, त्यांच्यासाठी तर आहेच. ज्यांना वन्यजीवनीविषयी व त्यासंदर्भातील त्यांच्या जबाबदारीविषयी फारशी माहिती नाही त्यांच्याविषयी जास्त आहे. छोटा मटकाशी लढाईमध्ये झालेला बजरंगचा मृत्यू, त्याचप्रमाणे जर मायाचा मृत्यू नैसर्गिक नसेल तर तो एकूणच वन्यजीवनाविषीच्या आपल्या अज्ञानाशी संबंधित आहे, याची आपल्याला जाणीव करून देण्यासाठी माझा हा लेख आहे. मी आधीच मान्य करतो की अशा घटनांविषयी माझी मते किंवा लेख वन्यजीवनाशी आलेला माझा संपर्क, माझे निरीक्षण, वन्यजीवनाशी संबंधित लोकांकडून मिळालेली माहिती व अभियंता म्हणून माझा तर्कसंगत विचार यामधून तयार झाला आहे. मी कदाचित चूक असेन व लोकांचे माझ्यापेक्षा वेगळे मत असू शकते, परंतु कुणालातरी दोष देणे नव्हे तर जागरुकता निर्माण करणे हा या लेखाचा उद्देश आहे. इथे माया व बजरंग यांच्याविषयी फेसबुकवर जे काही लिहीण्यात आले होते त्यांची नावे जाहीर न करता ते देत आहे, या लेखनातून त्यांच्याविषयी कशाप्रकारची मते मांडण्यात आली होती याची कल्पना यावी यासाठी ते देत आहे…
XXXX एकाच वाघीणीचे उदात्तीकरण ही समस्या नाही. वाघांचे
व्यवस्थित निरीक्षण केले जात नाही ही समस्या आहे. ती बऱ्याच
काळापासून दिसत नव्हती, परंतु पर्यटकांनी माया कुठेही दिसत नसल्याची ओरड सुरू केल्यानंतर शोध मोहीम राबविण्यात आली. वन विभागाला पर्यटकांनी हे सांगायची गरज का पडते?
YYYY ताडोबा
अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात १०० हून अधिक वाघ आहेत. संवर्धन म्हणजे
प्रत्येक वाघाचे रोज निरीक्षण केले जाते असे नाही.
संवर्धन
परिणामकारक होण्यासाठी, या परिसरातील वाघांची संख्या नेहमी चांगली राहिली पाहिजे किंवा अगदी
वाढलीही पाहिजे.
पर्यटकांना
कुणा टी ५३ ची फारशी काळजी का नसते? कारण तो विशिष्ट वाघ कदाचित बेधडकपणे रस्त्यावर चालत जात
नसेल किंवा कदाचित चांगली छायाचित्रे काढण्याच्या संधीही देत नसेल.
संवर्धन एक
विज्ञान आहे हे आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे व परिस्थितीकीमधील वाघांची भूमिका
इतर मित्रांना समजून सांगितली पहिजे ज्यांचा कधीही वन्यजीवनाशी संबंध आलेला नाही
परंतु त्याविषयी जिव्हाळा वाटतो. नाहीतर वन्यजीवनाला धोका निर्माण होईल व लवकरच केवळ छायाचित्र
काढण्यासारखे वाघ व वाघीणीच नव्हते तर त्यातील रहिवाशांसह विकासाला बळी पडेल.
वरील संभाषण ही केवळ एक झलक आहे, अजूनही बऱ्याच गोष्टी होत आहेत.
बजरंगच्या मृत्यूविषयी, बरेचजण म्हणतील की दोन नर वाघांमध्ये प्रदेशावरून होणारी लढाई व त्यात कुणाचातरी मृत्यू होणे व कुणीतरी जखमी (मास्टर फुनाकोशी) होणे नैसर्गिकच आहे; तरीही मी असे म्हणेन की अजून एक तिसरा मार्गही आहे, ज्यामध्ये एक वाघ माघार घेतो व त्याचा अधिवार म्हणून जंगलातील दुसरा भाग शोधतो. ज्यांना हा वाघाचा अधिवार म्हणजे काय हे माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो, आपण ज्याप्रमाणे आपले शेत आखून घेतो त्याप्रमाणे प्रत्येक वाघाचा प्रदेश ठरलेला असतो व तो इतर वाघांना त्या भागामध्ये येऊ देत नाही, ज्याप्रमाणे आपण आपल्या शेतामध्ये नांगरायला किंवा पेरणी करायला दुसऱ्या व्यक्तींना किंवा कुटुंबांना येऊ देत नाही. जर एखादा वाघ दुसऱ्या वाघाच्या प्रदेशात चुकून शिरला तर गुरकावून किंवा खोटा-खोटा हल्ला करून इशारा दिला जातो. परंतु वाघाला त्या प्रदेशावर सत्ता गाजवायची असेल किंवा दुसऱ्या वाघाच्या प्रदेशावर आक्रमण करायचे असेल तर मरेपर्यंत लढाई होते. याचे कारण म्हणजे माणसांच्या समाजामध्ये न्याय व्यवस्था असते तसेच कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणाही आहे, वाघांच्या बाबतीत मात्र तशी परिस्थिती नाही, त्यामुळे त्यांना स्वतःच न्याय करावा लागतो. आता हा निसर्ग असेल, जो शेकडो, हजारो वर्षांपासून आहे तर काही हरकत नाही परंतु गेल्या काहीशे वर्षांपासून माणूस नावाच्या प्रजातीने निसर्गामध्ये घुसखोरी करायला सुरुवात केली आहे, मग ती गरज, वाढ, विकास काहीही असेल व तुम्ही त्याला काहीही नाव द्या. हे कदाचित दोन नर वाघांच्या लढाईशी संबंधित नसेल परंतु आपण त्यांची जागा (म्हणजे जंगल) कमी केली आहे जी वाघांची संख्या संतुलित ठेवण्यासाठी आवश्यक आहे व आता तीच नसल्यामुळे त्यांच्या लढाया वाढल्या आहेत. कारण एकीकडे आपण व्याघ्र प्रकल्प तयार करतो जेथे वाघ माणसांपासून सुरक्षित असतात, परंतु या वाघांच्या वाढलेल्या संख्येचे काय, त्यांच्यासाठी जागा कुठे आहे, म्हणूनच सध्याचे व्याघ्र प्रकल्प प्रत्यक्षात एखाद्या खुल्या प्राणी संग्रहालयासारखे झाले आहेत (अधिकाऱ्यांविषयी पूर्णपणे आदर राखून हे विधान करत आहे). दुर्दैवाने, व्याघ्र प्रकल्प व प्राणीसंग्रहालयातील एकमेव फरक म्हणजे, जर प्राणी संग्रहालयामध्ये वाघीणीने बछड्यांना जन्म दिला तर ते बछडेही तिथेच राहतात. परंतु व्याघ्र प्रकल्पामध्ये मात्र बछड्यांना मोठे झाल्यानंतर तिथे असलेल्या वाघांशी जागेसाठी लढावे लागते किंवा माघार घ्यावी लागते व माणसांच्या जंगलात म्हणजेच व्याघ्र प्रकल्पाच्याभोवती असलेल्या नागरी वसाहतींमध्ये जावे लागते व जगण्याचा प्रयत्न करावा लागतो. दोन्ही परिस्थितीत वाघासाठी त्याचा परिणाम मृत्यूच होतो, हा माझ्या लेखाचा मुद्दा आहे!
बजरंग व छोटा मटका यांच्यादरम्यानच्या लढाईच्या तपशीलांवर एक नजर टाका, वय किंवा शिकार करता न येणे यासारख्या नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू होण्यासारखे त्यांचे वय नव्हते, त्यामुळे दुसऱ्या वाघाच्या प्रदेशात गेल्यामुळे झालेला मृत्यू नैसर्गिक नाही. स्थानिक तसेच वन विभागाच्या गाईडच्या मते तसेच पर्यटकांनी दिलेल्या माहितीनुसार बजरंग साधारण आठ वर्षांचा होता व त्याच्या स्वतःच्या क्षेत्रात स्थायिक होण्याचा प्रयत्न करत होता. परंतु प्रत्येक क्षेत्रातून त्याला दुसऱ्या अधिक बलशाली वाघाने हुसकावून लावले. शेवटच्या लढाईपूर्वी छोटा मटकाचे जेथे वर्चस्व होते तेथे तो एका गाईची शिकार करण्याच्या प्रयत्नामध्ये होता. दोन्ही वाघ गुराची शिकार करत होते कारण दोघांनाही तरूण वाघांनी मुख्य जंगलातून हिसकावून लावले होते व जगण्यासाठी गुरांची शिकार करणे त्यांना सोपे वाटत होते. त्यामुळे तेथे दुसरा कुणी वाघ आल्यानंतर लढाई होणे स्वाभाविक होते कारण हा निसर्ग आहे व म्हणूनच जगण्यासाठी व माणसांनी पाळलेल्या गुरावरून लढाई झाली, याला आपण अजूनही निसर्ग म्हणणार का? मायाच्या मृत्यूविषयी बोलायचे तर (जर तो खरोखरच झाला असेल), तर तिचाही नैसर्गिक मृत्यू होण्यासाठी तिचे वय कमी होते व तिची समस्या अशी होती तिच्या आजूबाजूला चार नर वाघ फिरत होते व ती गरोदर राहिली व तिला बछडे झाले तर तिला चारही बछड्यांना सुरक्षित ठेवणे आवश्यक होते. कारण सामान्यपणे नर वाघ इतर नर वाघापासून झालेली बछडी मारून टाकतो, हा निसर्ग आहे. मायाची याआधीची दोन बछडी तिच्या क्षेत्रातील कुणा ना कुणा नर वाघांनी ठार केली होती व म्हणूनच गरोदरपणाच्या वेळी ती सुरक्षित ठिकाणी गेली असावी व यादरम्यान त्या भागातील इतर वाघीणींकरून मारली गेली असावी किंवा नर वाघापासून बछड्यांना वाचविताना तिला जीव गमवावा लागला असावा, जर तो नैसर्गिक मृत्यू नक्कीच मानता येणार नाही. या सगळ्या ‘जर-तर’च्या गोष्टी आहेत परंतु माया कोअर क्षेत्रात राहात होती जे संरक्षित जंगल आहे, आपण केवळ असा अंदाज बांधू शकतो की तिने इतकी वर्षे टिकवून ठेवलेल्या प्रदेशातून ती दुसरीकडे का गेली हे एक गूढच राहील व हा नक्कीच निसर्ग नाही. कारण केवळ निसर्गाला दोष देण्याऐवजी एका वाघीणीच्या प्रदेशामध्ये चार नर वाघांनी गर्दी करण्याचे काय कारण आहे याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे, बरोबर? याचाच अर्थ असा होतो की आपण ताडोबा अभयारण्यातील वाघांची संख्या वाढविण्यात यशस्वी ठरलो आहोत ही चांगली बातमी आहे, परंतु त्यांना जगण्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून देण्यात आपण अपयशी ठरत आहोत हा माझ्या लेखाचा मुद्दा आहे व त्यासाठी आपण केवळ वन विभागाला जबाबदार धरू शकत नाही. वन विभाग त्यांना जे करणे शक्य आहे ते सर्व काही करत आहे व त्यांनी ताडोबामध्ये केलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसांना वाघांसोबत जगायला लावले आहे. म्हणूनच बजरंग व मटका त्यांच्या सावजासाठी ते माणसाच्या मालकीचे असूनही एकमेकांशी लढू शकले. म्हणुनच त्यांच्यापैकी किमान एक तरी जगला, कारण जर त्यांची लढाई जर माणसांशी झाली असती तर दोघांचाही मृत्यू झाला असता. काही वाघांचा मृत्यू नैसर्गिकपणे झाला असे म्हणून आपल्याला वन्यजीवनाबाबत असलेली आपली जबाबदारी झटकता येणार नाही, कारण आपण दररोज वाघांच्या मालकीची जागा शक्य त्या सर्व प्रकारांनी कमी करत आहोत हे कटू सत्य आहे. लोकहो विचार करा, जर एखाद्या माणसाचे कुटुंब २ बीएचके सदनिकेमध्ये राहात असेल व त्यांना एक मूल असेल व कुटुंबात आणखी एका सदस्याचा जन्म झाला, तर नव्या सदस्यासाठी जागा व्हावी म्हणून ३ बीएचके घेता आला नाही तर आपण दोन्ही भावंडांना एकच खोली वाटून घ्यायला लावतो व आपण त्यांना तसे जगायला शिकवतो. याचे कारण म्हणजे आपण माणसे आहोत व तो आपला स्वभाव आहे. परंतु वाघाचे कुटुंब आपण ज्याप्रकारे जगतो त्याप्रकारे निसर्गामध्ये राहू शकत नाही व परिणामी आपल्याला वाघांच्या लढाया वाढल्याचे पाहायला मिळते. वाघांना आपल्या कुटुंबाचाच एक सदस्य बनवून घेण्याची व त्यांनी आपली संस्कृती किंवा जगण्याच्या पद्धती शिकाव्यात अशी अपेक्षा करण्याऐवजी त्यांना त्यांच्या स्वभावानुसार जगता यावे यासाठी प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी एकत्रितपणे एक प्रतिज्ञा घेऊ, “ आता एकाही बजरंगचा मृत्यू होणार नाही किंवा कोठल्याही मायाला लपुन बसायची गरज पडणार नाही, ” एवढे सांगून लेख संपवितो!
संजय देशपांडे
संजीवनी
डेव्हलपर्स
No comments:
Post a Comment