Friday 8 December 2023





घर घेतांनायोग्य प्लॅनींगचे महत्व !












घर घेतांना, योग्य प्लॅनींगचे महत्व !


मी सहमत आहे मान्य करतो की विचार करणे नियोजन (प्लॅनींग) मोफत आहे. त्यामुळेच कदाचित बहुतेकांना या दोन गोष्टींचे मोल वाटत नाही!” ...  इस्रायलमोअर एइव्हर.

    विचार व नियोजन यावर भर देणाऱ्या सर्वात सुंदर अवतरणांपैकी हे एक आहे व म्हणूनच इस्रायलमोअर हे तरुणांमध्ये नेतृत्वगुण निर्माण करणारे प्रशिक्षक, आघाडीचे उद्योजक, लेखक व वक्ता आहेत. ते तरुण नेत्यांना व उद्योजकांमधून स्वयंपूर्ण नेतृत्व, जागतिक सहकार्य करणारे नेते व शाश्वत परिणाम करणारे नेते घडविण्यासाठी अतिशय तळमळीने प्रेरित करतात, प्रशिक्षण देतात व मार्गदर्शन करतात. रिअल इस्टेटसारख्या उद्योगामध्ये बहुतेक गोष्टी देवाच्या कृपेने (उपहास, म्हणजे नशीबाने) होत असतात, म्हणुनच वरील दोन्ही शब्दांचा येथे टेबलाच्या दोन्ही बाजूंकडून म्हणजेच बांधकाम व्यावसायिकांकडून व ग्राहकांकडून क्वचितच आदर केला जातो, व तुम्ही ज्याचा आदर करत नाही त्याचे तुम्ही पालन करत नाही हा निसर्गनियम आहे, पुण्याच्या वाहतुकीच्या कोंडीचेच उदाहरण घ्या (हा हा हा,पुन्हा उपहास)! शालजोडीतला मारण्यासाठी असलेला माझा उसना पुणेरीपणा जरा बाजूला ठेवूया, माझ्या उद्योगाविषयी पूर्णपणे आदर राखत,एक व्यक्ती म्हणून तसेच बांधकाम व्यावसायिक म्हणून सर्वाधिक महत्त्व (म्हणजे आदरनियोजनाला असते विचार केल्याशिवाय तुम्ही नियोजन करू शकत नाही,त्यामुळे विचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे,किंबहुना रिअल इस्टेटच्या अंतिम उत्पादनाचा म्हणजे घरांचा तोच आत्मा आहे असे मला वाटते (पुन्हा विचार करतोय जाणवतेही!

     आत्तापर्यंत, आपण रिअल इस्टेटशी संबंधित बहुतेक योग्य घटकांविषयी बोललोय. मला मान्य आहे शेवटी तुम्हाला तुमच्या खिशाप्रमाणे तसेच तुमच्या घराबाबतच्या योग्य त्या निकषांप्रमाणे निर्णय घ्यावा लागतो उदाहरणार्थ योग्य जागा, योग्य वेळ व अशा इतरही अनेक गोष्टी असतात. परंतु एका योग्य गोष्टीकडे बांधकाम व्यावसायिकांचे तसेच ग्राहकांचे दुर्लक्ष होते किंवा त्याकडे काणाडोळा केला जातो ते म्हणजे घराचे योग्य नियोजन. बांधकाम व्यावसायिक नियोजनाच्या पैलूकडे दुर्लक्ष करतात कारण एकतर बांधकाम व्यावसायिक स्वतःच योग्य नियोजनाबाबत जागरुक नसतो किंवा नियोजनाच्या मुद्द्याची तो फारशी फिकीर करत नाही कारण बहुतेक ग्राहकच नियोजनाच्या मुद्द्याविषयी अज्ञानी असतात हे त्याला माहिती असते. तुम्हाला एक साधे उदाहरण द्यायचे झाले, तर जगामध्ये आज प्रत्येक उत्पादनाविषयी कितीतरी माहिती उपलब्ध आहे, तरीही दहा ग्राहकांपैकी केवळ एक ग्राहक मला (किंवा माझ्या चमूला) त्यांच्या घराविषयी चौकशी करताना सदनिकेच्या नियोजनाविषयी प्रश्न विचारतात. बहुतेक प्रश्न हे सुविधा, गुणवत्ता (ती देखील वरवरची), कोणते टाईल्स वा फिटिंग वापरले यांच्याविषयी असतात व दरासाठी घासाघीस केली जाते, बस्स. मी व माझ्या चमूने या प्रकल्पाचे नियोजन कसे केले आहे, घरातील खोल्यांचे नियोजन एक विशिष्ट प्रकारे का करण्यात आले आहे, हवा खेळती राहण्याचे काय, खोल्या आतून एकमेकांना कशा जोडलेल्या आहेत, प्रसाधनगृहाचा आकार किंवा खिडक्यांची रचना, सदनिकेमध्ये नैसर्गिक प्रकाश येण्यासाठी करण्यात आलेला विचार व इतरही अनेक गोष्टी असतात. हे झाले सदनिकेच्या आतील बाजूच्या नियोजनाविषयी, सदनिकेच्या बाहेरील बाजूच्या नियोजनाविषयी बोलायचे तर इमारतीच्या दिशेविषयी करण्यात आलेला विचार, तसेच प्रत्येक मजल्याचा आराखडा, तुमच्या सदनिकेचा खाजगीपणा, तसेच आतून दिसणारे बाहेरील दृश्य, इमारतीच्या भोवती असणाऱ्या खुल्या जागा व सामाईक जागा, उदाहरणार्थ इमारतीच्या वरती असलेली गच्ची, बाजूला सोडलेल्या जागा किंवा लॉबी, अशाच व आणखी अनेक बाबी ,कारण जेव्हा तुम्ही त्या इमारतीमध्ये अनेक दशके राहणार असता व जेथे तुमच्या काही पिढ्या लहानाच्या मोठ्या होणार असतात तेव्हा प्रत्येक लहान गोष्ट महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे, सर्व दृश्य व अदृश्य सेवांच्या नियोजनाविषयी विचार करणेही तुमच्या दैनंदिन जीवनातील आरामासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. सकृतदर्शनी घर म्हणजे फक्त भिंती, रंग, टाईल्स, सॅनिटरी वेअर, फर्निचर असू शकते, परंतु याशिवाय घरात अशा अनेक गोष्टी असतात ज्या दृष्टीस पडत नाहीत. यामध्ये भिंतीतील विजेच्या वाहिन्या, त्याचशिवाय नळजोडणीसाठीच्या वाहिन्या, गॅसच्या वाहिन्या, मुख्य वीज वाहिन्या, जनरेटर बॅकअप, सांडपाण्याच्या वाहिन्या, पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या, पाण्याच्या वाहिन्या, या सगळ्या गोष्टी तुमच्या नजरेआड असतात परंतु तुम्हाला घरात आरामशीरपणे राहता यावे यासाठी तितक्याच महत्त्वाच्या असतात. त्याचशिवाय वाय-फाय, लिफ्ट, अग्निशमन यंत्रणा, वातानुकूलन यंत्रणा, सौर उर्जेवर चालणारी पाण्याची तसेच विजेची उपकरणे यासारख्या सर्व अत्याधुनिक सेवा-सुविधांसाठी नियोजनाची गरज असते. त्याचप्रमाणे एखादे घर किमान पन्नास वर्षे तरी उभे राहावे व या पन्नास वर्षांच्या काळात सेवांमध्ये जे बदल होतील त्यांचा समावेश त्याला करून घेता येईल अशाप्रकारचे त्याचे नियोजन असावे. उदाहरणार्थ, तीस वर्षांपूर्वी कुणीही आपल्या पार्किंगच्या गरजेचा विचार करत नसे, केवळ तीन बीएचके सदनिकांसाठी पार्किंगची सोय असायची, आजकाल १ बीएचके सदनिकेसाठीही कार पार्किंग हवे असतेत्याचप्रमाणे जेमतेम दहा वर्षांपूर्वी कुणीही बॅटरीवर चालणारी वाहने चार्ज करण्यासाठी नियोजन करावे लागेल अशी कल्पना केली नव्हती आज जवळपास तीस टक्के वाहने किंवा ईव्हींसाठी चार्जिंगचे पॉईंट तसेच पार्किंगसाठी जागा आवश्यक असते जी आपण उपलब्ध करून देऊ शकत नाही कारण आपण भविष्यासाठी,भूतकाळात नियोजन करण्यात अपयशी ठरलो आहोत.

      अनेकदा मला प्रश्न विचारला जातो की घराचे नियोजन वास्तुशास्त्राप्रमाणे आहे का? मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, माझा वास्तुशास्त्रावर विश्वास नाही परंतु माझा नियोजनावर विश्वास आहे. तसेच मला वास्तुशास्त्राविषयी जे काही थोडेफार माहिती आहे त्यानुसार यामध्ये तुमच्या नियोजनामध्ये निसर्गाचा समावेश करून घेतला जातो. यासंदर्भातील बाकी सर्व गोष्टी मिथके आहेत व प्रत्येकाच्या वैयक्तिक विश्वासाचा किंवा श्रद्धेचा भाग आहेत, ज्याला मला अजिबात आव्हान द्यायचे नाही. इमारतीच्या अग्नेय कोपऱ्यामध्ये केवळ एखादी मूर्ती ठेवल्यामुळे किंवा वायव्य कोपऱ्यामध्ये जल (पाणी) ठेवल्यामुळे कुणाला काही अडचण येत नाही केवळ तुमचा तसा विश्वास असेल तर तुम्ही जरूर विश्वास ठेवा ! खरे सांगायचे, तर घराचा दरवाजा दक्षिणेला असल्यामुळे त्या घरातल्या रहिवाशांवर काहीही वाईट परिणाम होत नाही, तसेच उत्तरेकडे दरवाजा असल्यामुळे त्यांची भरभराट होईल याची काही शाश्वती नसते. अर्थात तुमचा नशीबावर विश्वास असेल किंबहुना मी म्हणेन की तुम्ही नशीबावर विसंबून असाल तर गोष्ट वेगळी. असे असेल तर मग या जगात चूक किंवा बरोबर काही नसते, तुमच्या नशीबाला तुमचे भविष्य ठरवू दे, असे माझे मत आहे, जे तुम्ही फेटाळू शकता व माझी त्याला काही हरकत नाही कारण हे तुमच्या घरासाठी आहे, माझ्या नव्हे. परंतु तुम्हाला निसर्गाची खरोखरच काळजी असेल ज्याचा संबंध सर्वार्थाने तुमच्या जीवनशैलीशी असतो व तुम्ही तुमच्या नियोजनामध्ये त्याचा विचार केला नाही तर मी त्याला कधीही अचूक नियोजन म्हणणार  नाही. निसर्ग म्हणजे झाडे, तसेच चिमण्या, राघू, फुलपाखरे आणि हो सूर्यप्रकाशही. मला माहितीय तुमच्यापैकी बरेचजण हसतील व मला वेडा म्हणतील कारण अशा गोष्टींचा घर खरेदी करताना कोण विचार करतो. परंतु लक्षात ठेवा निसर्गाचा समावेश करून केलेल्या योग्य नियोजनामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळू शकते व त्यामुळे तुमचे अनेक शारीरिक व्याधींपासूनही रक्षण होऊ शकते. कारण एकीकडे आपण आपल्या आरोग्यासाठी प्रथिने व जीवनसत्वे घेतो, परंतु योग्य नियोजनामुळे आपल्या खोल्यांमध्येच थोडा सूर्यप्रकाश येणार असेल तर आपल्याला ती घेण्याची गरज पडणार नाही. आणि योग्य नियोजन केलेले घर व ईमारतीत तुम्ही रहात असाल तर नक्कीच मनःशांती सुद्धा त्या घराचा भाग बनते आणि जेथे मनःशांती आहे तेथे सुख नक्कीच आहे ना, घराकडुन यापेक्षा काय चांगली आपल्याला अपेक्षा असु शकते! विकासक (अभियंता म्हणूनही) म्हणून योग्य नियोजनाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझ्या सदनिकाधारकांना (म्हणजे घराच्या ग्राहकांनात्यांनी खर्च केलेल्या पैशाचा पुरेपूर मोबदला देणे.पुण्यातील भोवतालच्या घरांचे दर पाहता,प्रत्येक चौरस फुटासाठी तुम्हाला रुपयांमध्ये किमान चार आकडी रक्कम तरी मोजावी लागत असेल.त्यामुळे आपण त्या चौरस फुटाचा वापर योग्यप्रकारे केला पाहिजे कारण कुणीतरी तरी कष्टाने कमावलेला पैसा त्यासाठी लावला आहे आपण चुकीच्या नियोजनामुळे तो वाया घालवू नये असे माझे मत आहे.

     मित्रांनो, तुम्ही कधीही तांत्रिक तपशील किंवा वैशिष्ट्ये, तसेच तुम्हाला मिळणाऱ्या सेवा (म्हणजेच सुविधा) जाणून घेतल्याशिवाय सेल फोन खरेदी केला आहे का किंवा एखादी कार तिचे इंजिन कसे चालते किंवा तिच्यामध्ये सुरक्षिततेसाठी कोणत्या खबरदाऱ्या घेण्यात आल्या आहेत याचा विचार न करता केवळ तुमच्या खिशाला परवडते म्हणून किंवा केवळ तिच्या बाह्य रूपावरून तुम्ही खरेदी केली आहे का, मला खात्री आहे की याचे उत्तर नाही असेच असेल. किंवा तुम्ही तुमची पत्रिका तुमच्या आय-फोनच्या मॉडेलशी किंवा कारच्या बांधणीशी जुळते का हे पडताळून पाहिले आहे का (कारचा क्रमांक मी एकवेळ समजून घेऊ शकतो) किंवा तुम्ही तुमच्या कोणत्या खिशामध्ये सेल फोन ठेवता किंवा तुम्ही तुमच्या गॅरेजमध्ये कोणत्या दिशेला तुमची कार पार्क करता हे तपासता का, या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यात काहीही फऱक पडतो का, मला खात्री आहे की त्यांचे उत्तरही नाही असेच असेल. असे असेल तर मग घर खरेदी करताना, तुम्ही नियोजनाविषयी प्रश्न न विचारून कसे चालेल जो कुठल्याही इमारतीचा आत्मा असतो, घराच्या योग्य नियोजनाविषयी मला तुम्हाला हा प्रश्न विचारावासा वाटतो. अचूक नियोजनाविषयी तुमच्या विकासकांच्या कल्पना जुळणार नाहीत हे मान्य आहे,परंतु त्यासाठी तुम्हाला तुमची अचूक नियोजनाची व्याख्या काय आहे हे आधी समजून घेतले पाहिजे,बरोबर? एवढे बोलून निरोप घेतो,तुमच्या योग्य घरासाठी तुम्हाला शुभेच्छा!


संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com



















 

No comments:

Post a Comment