Wednesday 27 December 2023

वय वाढतांना , 55 पूर्ण  !














वय वाढतांना , 55 पूर्ण  !


प्रत्येक वर्षागणिक सगळेच लोक वयाने वाढतात परंतु त्यातले मोजकेच लोक मोठे होतात व आपल्याला जी वर्षे मिळाली त्यांच्यासाठी कृतज्ञ असणे हे निश्चितच मोठे होण्याचे एक लक्षण आहे”… मी.

प्रिय दादा व छोटा,

     सर्वप्रथम मी तुम्हा दोघांविषयी कृतज्ञता (थँक यु) व्यक्त करतो कारण तुम्हा दोघांमुळे मला माझ्या वाढदिवशी लिहीण्याची व माझ्या वाढत्या वयाचे किंवा मोठे होण्याच्या प्रक्रियेचे विश्लेषण करण्याची आणखी एक संधी मिळाली. हा वाढदिवस माझ्यासाठी अधिक विशेष आहे कारण मी पंचावन्न ओलांडेन व आता मी स्वतःच्या नजरेत किंवा भोवतालच्या समाजाच्यादृष्टिने तरुण म्हणुन नक्कीच गणला जाणार नाही. त्यातच या डिसेंबरमध्ये दादाचे लग्न झाल्यावर मी सासरा होईन त्यामुळे समाज मला ज्येष्ठ व्यक्ती हे बिरूद देईल. काही वर्षांपूर्वी या गोष्टींची मला भीती वाटली असती (वरवर दाखवले नाही तरी आतून नक्कीच वाटली असती) व आता मी जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या मनात जरा विचलीतच भावना असते. कारण मी मागे वळून पाहतो तेव्हा मला तुम्ही रांगत असलेली दोन लहान मुले किंवा गणवेश घालून शाळेच्या बसमध्ये बसणारी लहान मुले दिसतात, आता तुम्ही मोठे झाला आहात व तुमच्यापैकी एक तर आता गृह्स्थाश्रमात प्रवेश करून स्वतःचे आयुष्य सुरू करतोय. मी एका विवाहित पुरुषाचा बाबा आहे, व्वा ! मी आरशात पाहतो तेव्हा मला वाढत्या वयाची अचानक जाणीव होते, विरळ झालेले करडे केस, पाठीला आलेला थोडासा बाक, दिवसातील पहिले पाऊल टाकताना घोट्यामध्ये होणारी वेदना, दुखरा गुडघा सगळे काही जाणवू लागते व अचानक माझ्याकडे रोखून पाहणारा आरशातील चेहरा अनोळखी वाटू लागतो. हा मी नव्हेच असे वाटू लागते व वाढदिवसाची मजा, धमाल कमी होते. परंतु काळजी करू नका, मी जे काही लिहीले आहे ते जे दर वाढदिवसाला केवळ वयाने वाढतात त्यांच्या बाबतीत होते. माझे बरेचसे मित्र त्याच्या मुलाच वा मुलीच लग्न ठरले आहे म्हणून एकीकडे आनंदी असतात, परंतु आतमध्ये खोलवर कुठेतरी ते अतिशय दुःखी असतात किंवा त्यांना वाईट वाटत असते की त्यांचे आता वय झाले आहे व आता त्यांना कुणीही तरूण किंवा हॅपनिंग मानणार नाही व मी त्यांना दोष देणार नाही कारण मोठे होणे म्हणजे नेमके काय हे जेव्हा तुम्ही समजून घेत नाही तेव्हा असे होते.

    म्हणूनच मी असे म्हटले की मी तुम्हा दोघांचा (व तुमच्या पिढीचा) आभारी आहे कारण माझ्या वाढदिवशी तुमच्यासाठी काहीतरी लिहीण्याची ही परंपरा जपत असताना मला मोठे होण्याचा अर्थ समजला, कारण ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे व मुक्कामाचे ठिकाण अजून आलेले नाही. परंतु, या वर्षांमध्ये मला कितीतरी गोष्टी समजू लागल्या किंवा आपण म्हणू शकतो की या गोष्टींकडे मी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात केली कारण एकीकडे या वर्षांमध्ये मला वयाने दिलेल्या जखमांचे व्रण, वेदना, त्रास, अपमान, भीती जाणवली असली तरीही या सर्व वर्षांमध्ये कितीतरी उत्तम गोष्टीही झाल्या आहेत, माझ्या आयुष्यात तुम्ही दोघे आलात, माझ्या प्रियजनांसोबतचे सुंदर क्षण आहेत (या नावाची यादी लहान असली तरीही क्षण असंख्य आहेत), मी कितीतरी पुस्तके वाचली, अनेक ठिकाणी प्रवास केला, अनेक तरुणांशी संवाद साधला, काही बुद्धिमान लोकांना भेटता आले व सर्वात महत्त्वाचे म्हणजे या वर्षातील प्रत्येक दिवसाने मला काहीतरी नवीन शिकवले आहे व मी जे काही शिकलो त्याचा वापर करण्यासाठी मला संधी दिल्या. दादा व छोटा, या वर्षांमध्ये मला जाणीव झाली की मी किती भाग्यवान आहे कारण माझे पालकच शिक्षक होते व त्यामुळे मला नेहमी विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहता आले व योग्य-अयोग्य काय हे समजून आयुष्याचे मोल जाणून घेता आले व त्यानुसार जगता आले. त्याचप्रमाणे तुमची भूमिकाही तितकीच महत्त्वाची होती कारण आजी व अब्बूंसोबत राहात असल्यामुळे मी काही चूक केली तर माझे पालक माझ्याविषयी काय विचार करतील असा विचार मनात येत असे. आता तुम्ही सोबत असल्यामुळे मी योग्य मार्गाने वाटचाल करत राहतो, कारण मी माझ्या आई-वडिलांकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतो व ते जे काही आहेत त्यासाठी त्यांचा आदर करतो, त्याचप्रमाणे तुम्हीही एक दिवस माझ्याकडे पाहाल व तुम्हाला मी ज्याप्रकारे आयुष्याची निवड केली त्याविषयी तुम्हाला लाज वाटणार नाही, मी हे पैलू किमान लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो.

     दादा आता तुला हा वारसा पुढे चालवायचा आहे कारण तुझी आव्हाने माझ्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहेत. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा झालो, जो एका अर्थाने आयुष्यात काहीतरी मोठे करून दाखविण्यामध्ये मोठा अडथळा होता तर दुसरीकडे ते एक वरदान होते किंवा योग्य मार्गावर चालण्याचे व मला जे काही साध्य करणे शक्य झाले आहे त्यातच आनंद मानण्याचे पाठबळ त्यातून मिळत होते! तुमचा बाबा आर्थिकदृष्ट्या व सुखसोयींच्या बाबतीत कदाचित मध्यमवर्गीय नसेल परंतु तुम्ही तुमच्या आयुष्याच्या पुढील वाटचालीत, मी जगताना कोणती मूल्ल्ये जपली आहेत हे कधीही विसरू नका, किंबहुना माझ्या व तुमच्या आजी-आजोबांच्या सर्वोत्तम गोष्टींचा जास्तीत जास्त चांगला वापर करून घ्या. मी आता वैयक्तिक दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला आदेश देणे किंवा हे करा किंवा ते करू नका असे सांगणे थांबवले आहे कारण तुम्ही आता मोठे होऊन त्याच्या पलिकडे गेला आहात, व त्या आघाडीवर मी माझे कर्तव्य पूर्ण केले आहे परंतु वडिलांची जबाबदारी किंवा पालकत्व खरेतर कधीही संपत नसते; फक्त तुम्ही ते ज्याप्रकारे निभावता त्यामध्ये फरक पडतो हे मी शिकलो आहे. मला सांगावेसे वाटते की आत्तापर्यंतच्या प्रवासासाठी मी समाधानी आहे ज्याचे श्रेय तुम्हा दोघांना व त्या सर्व लोकांना जाते ज्यांनी आयुष्याच्या अनेक आघाड्यांवर नशीबवान ठरवले आहे, किंबहुना समाजातील लाखो लोकांपेक्षा बराच नशीबवान आहे व मी त्यासाठी कृतज्ञ आहे. दादा व छोटा, हा माझा मोठे होण्याचा प्रवास आहे कारण आयुष्य आपल्याला अनेक गोष्टी देते तर अनेक गोष्टी काढूनही घेते परंतु बहुतेकवेळा आपला तोटा आहे असेच आपल्याला वाटते कारण आपले आयुष्यात जे काही नुकसान झाले आहे त्याकडेच आपण पाहतो; कृतज्ञ राहिल्यामुळे आपल्या बरेचदा जमेच्या बाबी पाहण्यास मदत होते व समाधानी राहण्याचा हाच मार्ग आहे, मी जाणीवपूर्वक आनंदी हा शब्द वापरलेला नाही कारण कधीतरी तुम्हाला स्वतःलाच या दोन शब्दांमधील फरक समजेल!

मला असे वाटते वर्षभरासाठी एवढे बोधामृत पुरेसे आहे व यावर्षातून काय शिकायला मिळाले हे मी आता सांगतो (सरतेशेवटी), तर

. एखादी व्यक्ती धडपडली असेल तर तिला सावरण्यासाठी मदत करण्यास तुम्ही कधीही कचरू नका

. तुमच्यापेक्षा एखादी व्यक्ती भुकेली असेल तर तुमच्या थाळीत जे काही आहे ते त्या व्यक्तीला देण्यास मागे-पुढे      पाहू नका

एखाद्याला कौतुकाची गरज असेल तर त्यांचे कौतुक करण्यापासून स्वतःला कधीही रोखू नका

एखादी व्यक्ती जे योग्य आहे त्यासाठी झटत असताना त्यांच्यासोबत उभे राहण्यापासून स्वतःला थांबवू नका

. तुम्हाला रडावेसे वाटत असेल तुमचे अश्रू कधीही रोखू नका

. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात तुम्हाला मदत करणाऱ्या ज्ञात-अज्ञात व्यक्तीचे आभार मानण्यापासून स्वतःला        रोखू नका

. तुम्ही चूक आहात असे जग म्हणत असले तरीही तुम्हाला जे योग्य वाटते त्यावर विश्वास ठेवण्यापासून स्वतःला 

    रोखू नका … (परंतु त्यासाठी आधी तुमचे योग्य व अयोग्य काय आहे ते ठरवा व त्याच्या व्याख्या तयार करा)

. तुम्हाला जेथे बुद्धिमत्ता वा शहाणपणा जाणवते तेथे नतमस्तक होण्यापासून कधीही स्वतःला रोखू नका

. एखादी कला कितीही निरुपयोगी वाटली तरीही ती शिकण्यापासून स्वतःला रोखू नका… आणि

१०. एखादी व्यक्ती तुमच्याएवढी सुदैवी नसेल तर कधीही त्यांच्या सोबत आपले नशीब सुद्धा वाढुन घेण्यापासुन 

     स्वतःला रोखू नका

    दादा व छोटा, या नंतर मी आरशात पाहात असताना जेव्हा मला ही जाणीव होते, तेव्हा माझ्याकडे निरखून पाहणारा चेहरा ओळखीचा वाटू लागतो, तो तजेलदार चेहरा माझ्याकडे पाहून स्मितहास्य करतो, माझ्यासोबत चाळीस-पन्नास वर्षे राहात असताना मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी तो कृतज्ञ आहे असे मला सांगतो; तुम्हा दोघांसह निखिल, केतकी, रोहित एम, श्रुती, सिया, तनिषा व तुम्हा सर्व तरुण मंडळीचे, तसेच डिज्ने, मार्व्हल, डिस्कव्हरी चॅनलचे सुद्धा (डीसी) माझ्या मोठे होण्यातील सहभागासाठी आभार!



संजय देशपांडे

smd156812@gmail.com





















 

No comments:

Post a Comment