Saturday 16 December 2023

 









बांधकाम स्थळीचे अपघात टाळतांना, भाग  1


“सुरक्षितता नशिबाने साध्य होत नाही याची मला जाणीव झाली आहे. दैनंदिन कामकाजामध्ये सुरक्षिततेचा समावेश असलाच पाहिजे,विशेषतः आपल्यापैकी ज्यांना कामाच्या ठिकाणी अधिक अडचणींना तोंड द्यावे लागते त्यांच्यासाठी” … जेना वॉर्थाम

     जेना वॉर्थाम या एक अमेरिकी पत्रकार आहेत. त्या द न्यूयॉर्क टाईम मासिकासाठी सांस्कृतिक लेखिका आहेत व द न्यूयॉर्क टाइम्स पॉडकास्टचे सूत्रसंचलन करतात. एक पत्रकार म्हणून जेना यांनी त्यांच्या कारकि‍र्दीमध्ये अनेक अपघात पाहिले असतील, म्हणूनच अपघाताविषयी व सुरक्षिततेविषयी त्यांची मते इतकी नेमकी व अचूक आहेत. मी बऱ्याच दिवसांनी अपघातांविषयी लिहीतोय ( ते देखील बांधकामस्थळी झालेल्या अपघाताविषयी ) हे एका अर्थाने चांगले लक्षण आहे, कारण  जेव्हा अपघात होणार नाहीत अशी तुम्हाला खात्री असते तेव्हाच अपघात होतात, असे म्हणतात. अलिकडेच पुण्यामध्ये ( दुसरीकडे कुठे! ) एक दुर्दैवी अपघात झाला, ज्यामध्ये एक शाळकरी मुलगा अपघातग्रस्त होता, त्याच्या आईसोबत तो एक प्रकल्पाला लागून असलेल्या पदपथावरून जात असताना त्याच्या डोक्यामध्ये एक लोखंडी तुकडा पडला (ज्याचा वापर प्लंब-बॉब लेव्हल मोजायचे एक उपकरण म्हणून केला जातो). मी याच्या तपशीलात जाण्याआधी, तुम्हाला अगदी स्पष्टपणे व प्रामाणिकपणे सांगतो की या अपघातासाठी एखाद्या संस्थेला दोष देण्यासाठी किंवा कोण दोषी आहे असा निष्कर्ष काढण्यासाठी हा लेख नाही (हे काम तपास संस्थेचे आहे, ज्या पुरेशा सक्षम आहेत). तर हे केवळ अभियंता व एक सामान्य माणूस म्हणून ( व एक बांधकाम व्यावसायिक म्हणून ) केलेले विश्लेषण आहे, जे अतिशय महत्त्वाचे आहे केवळ रिअल इस्टेट विकासकांसाठीच नव्हे तर त्याच्याशी संबंधित प्रत्येक घटकासाठी, कारण अपघात सूचना देऊन होत नाहीत अर्थात धोक्याचे इशारे नेहमी मिळत असतात व आपण या विशिष्ट घटनेकडे अशाप्रकारे पाहिले पाहिजे. 

     त्यानंतर या अपघाताविषयीची तथ्ये शोधण्यासाठी स्थानिक प्राधिकरणाने स्थापित केलेल्या समितीचा मी सदस्य होतो, याआधीही मी अशा समितीमध्ये काम केले आहे व अपघातांच्या सर्व पैलूंचा मला थोडासा अनुभव आहे. हा अनुभव आपण इतरांपर्यंतही पोहोचवला पाहिजे असे मला वाटले, कारण जागरुकता निर्माण करणे हा अपघात रोखण्याचा एक मुख्य मार्ग आहे. बांधकाम स्थळी काम करताना गेल्या तीस वर्षात मला बऱ्याच अपघातांना बघता आले आहेत व आत्तापर्यंत ( सुदैवाने ) या अपघातांमुळे अपघात टाळण्यासाठी माझ्या कामाच्या ठिकाणी एक धोरण तयार करण्यास मला मदत झाली आहे.

      मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगतो की, तुम्ही कितीही काळजी घेतली असली तरीही कोणत्याही ठिकाणी किंवा कुठल्याही प्रकल्पामध्ये अपघात होऊ शकतात व म्हणूनच त्यांना अपघात असे म्हणतात; निष्काळजीपणा किंवा अपघात टाळण्यासाठी काहीही प्रयत्न न करणे किंवा कोणतीही यंत्रणा नसणे ही खरी समस्या आहे. माझ्या लेखाचा हाच मुद्दा आहे व कोणतीही तपास संस्था जेव्हा एखाद्या अपघाताविषयी तपास करते तेव्हा तिला यामध्येच रस असतो. वाहन चालवताना होणाऱ्या अपघाताचे उदाहरण घ्या, तुम्ही जर रस्त्यावर सामान्य वेगाने चालवत असाल व अचानक कुणीतरी तुमच्या कारसमोर आले व त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर तो अपघात असला तरीही एका व्यक्तीचा जीव गेल्यामुळे पोलीस ( तपास संस्था) एफआयआर दाखल करतात व तुम्ही वेगाने गाडी चालवत होता का किंवा गाडी चालवताना दारू प्यायला होता का किंवा तुम्ही लाल सिग्नल तोडला का किंवा चुकीच्या मार्गिकेमध्ये वाहन चालवत होता का किंवा वाहन चालवताना इन्स्टाग्रामवरची रील पाहण्यात गुंग होता का हे तपासतील, कारण तुम्ही तसे करत असाल तर तो केवळ अपघात न राहता निष्काळजीपणा ठरतो ज्यामुळे एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला. प्रत्येक संबंधित तपास किंवा नियामक अधिकारी या दृष्टीकोनातूनच प्रत्येक अपघाताकडे पाहील ज्यामुळे तुमच्या (आमच्या) बांधकामस्थळावर कुणाचातरी जीव गेला व या पैलूलाच सुरक्षितता असे म्हणतात. तुम्ही अपघात टाळण्यासाठी बांधकाम स्थळी सुरक्षिततेसाठी पुरेशा खबरदाऱ्या घेतल्या आहेत का हे अतिशय महत्त्वाचे आहे व त्यासाठी तुमच्याकडे एक यंत्रणा आहे का हे कोणत्याही अपघाताच्या तपासाच्यावेळी अतिशय महत्त्वाचे असते व दुर्दैवाने रिअल इस्टेटमध्ये एका सुनियोजित  यंत्रणेचा अभाव असतो ही वस्तुस्थिती आहे. इथे मी विकासकांसाठी तसेच बांधकाम स्थळावरील अपघाताशी संबंधित प्रत्येक व्यक्तीसाठी (उदाहरणार्थ आर्किटेक्ट, आरसीसी सल्लागार इत्यादी) तिहेरी यंत्रणा सुचवेन ज्या अपघात  टाळण्यासाठी आहेत  आणि अपघातानंतर  ज्यांनी विकासकाला व त्या अपघातामध्ये सहभागी असलेल्या निष्पाप लोकांना वाचविण्यास मदत केली आहे!

     सर्वप्रथम व सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक बांधकामाविषयक कामाच्या जबाबदाऱ्यांची कागदोपत्री अतिशय स्पष्ट व तपशीलवार नोंद करून ठेवा, ज्यामध्ये त्या कामाच्या सुरक्षिततेच्या पैलूचाही समावेश होतो. उदाहरणार्थ, तुम्हाला इमारतीच्या दर्शनी भागाला काचेची तावदाने लावायचे काम द्यायचे असेल, तर ती तावदाने लावण्यासाठी आवश्यक असलेले जोडकाम करणे, त्या जोडकामासाठी तरापे उभारणे, त्या जोडकामाची रचना कशी असेल ते ठरवणे, अशी प्रत्येक पायरी व त्या प्रक्रियेमध्ये केली जाणारी प्रत्येक कृती, तसेच आवश्यक असलेल्या सुरक्षा उपाययोजना, तसेच ते कोण करेल हे नमूद करा. उदाहरणार्थ, जर इमारतीच्याभोवती असलेली सुरक्षा जाळी काचेची तावदाने लावण्यासाठी उभारलेले मचाण (मजुरांना काम करता यावे यासाठी उभारलेला तात्पुरता सांगाडा/मंच ) उभारण्यासाठी काढायची असेल, तर सुरक्षिततेसाठी कोणती पर्यायी सोय करण्यात आली आहे व ते कोण करणार आहे हे काचेची तावदाने लावण्याचे काम ज्या एजन्सीला दिले आहे तिच्या वर्क ऑर्डरमध्ये तुम्ही स्पष्टपणे नमूद केले पाहिजे. तुमच्या बांधकामाच्या ठिकाणी इमारतीमध्ये प्रत्येक टप्प्यावर करायच्या प्रत्येक कामासाठी किंवा दिल्या जाणाऱ्या प्रत्येक सेवेसाठी हे लागू होते. आर्किटेक्ट किंवा स्ट्रक्चरल डिझायनर यासारख्या सल्लागारांचे तपशीलही संभाव्य अपघाताचे तपशील व सुरक्षा उपाययोजना नमूद करताना त्यामध्ये दिले पाहिजेत. आपण कुणालातरी बळीचा बकरा बनवण्यासाठी हे करत नसून, बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसंदर्भातील आपापले कर्तव्य पार पाडताना प्रत्येकाला जबाबदार बनविण्यासाठी हे आहे. सुरक्षा उपाययोजनांची जबाबदारी निश्चित करण्याच्या या पैलूकडे, बहुतेक विकासकांचे दुर्लक्ष होते किंवा ते त्याकडे काणाडोळा करतात व त्यानंतर त्यांना तपास संस्थेच्या ताशेऱ्यांना सामोरे जावे लागते कारण अपघाताच्या प्रकरणांमध्ये जर कुणाचीच जबाबदारी निश्चित करण्यात आली नसेल तर व्यवसायाचे मालक म्हणून ही तुमची जबाबदारी आहे हे लक्षात ठेवा.

     त्यानंतर येते कारागिरीची प्रक्रिया व बांधकाम स्थळावरील कामाच्या सर्व प्रक्रियांमध्ये सुरक्षा उपाययोजनांचा समावेश करून घेणे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला बांधकामाच्या ठिकाणी काम करायची परवानगी देता तेव्हा प्रत्येक व्यक्तीचे शारीरिक आरोग्य तपासण्यापासून (म्हणजे मजुरांपैकी कुणाही व्यक्ती दारू प्यायलेली आहे की किंवा तिला काही आजार आहे का), तसेच सुरू असलेल्या कामांवर सतत देखरेख करण्यापर्यंत प्रत्येक लहान गोष्ट महत्त्वाची असते. लहान किंवा एकच इमारत असलेल्या बांधकाम स्थळांवर सुरक्षा अधिकारी ठेवणे परवडत नाही हे मान्य आहे,परंतु तुम्ही तुमच्या पर्यवेक्षकालाच सुरक्षा उपाययोजनांविषयी प्रशिक्षण देऊ शकता व मालक म्हणून या दृष्टिकोनातूनही तुम्ही बांधकामस्थळाला भेट दिली पाहिजे. सुरक्षा पट्ट्याशिवाय उंचीवर काम करणारा मजूर,कामाच्या ठिकाणी खेळणारे मजुराचे लहान मूल किंवा उंच मजल्यावरील स्लॅबला कोणत्याही सुरक्षेशिवाय ठेवलेले कट-आउट, तुमचे डोळे व ज्ञानेंद्रिये अशा त्रुटी शोधण्यासाठी प्रशिक्षित असली पाहिजेत व ती प्रशिक्षित होईपर्यंत कोणत्या गोष्टी तपासायच्या आहेत याची एक यादी तयार करा व बांधकामाच्या ठिकाणी दररोज तिच्यावर बरोबरची खूण करण्याची सवय ठेवा.त्याचप्रमाणे बांधकाम स्थळावरील शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न करा, कारण सुरक्षितता हा एक दृष्टिकोन आहे व ज्या मजुरांच्याबाबतीत थेट अपघात होऊ शकतो, ते जोपर्यंत स्वतःच्या सुरक्षिततेविषयी विचार करत नाहीत तोपर्यंत अपघात कमी होणार नाहीत. त्याचप्रमाणे आमची समिती ज्या विशिष्ट घटनेचा तपास करत होती, त्यातील पीडित बांधकामावरी कर्मचारीवर्गाचा भागही नव्हता तर शेजारून येणारा-जाणारा सामान्य नागरिक होता व शहरी केंद्रामध्ये काम करताना हा पैलूही ध्यानात ठेवला पाहिजे. बांधकामाचे स्थळ त्याचशिवाय शेजारील मालमत्ता व भोवतालच्या लोकांना सुरक्षित ठेवणे या दोन्ही गोष्टीही तितक्यात महत्त्वाच्या आहेत. तिसरा  पैलू  आहे दस्तऐवजीकरणाचा तसेच बांधकाम स्थळी लिखित व दृश्य नोंदी ठेवण्याचा, जो रिअल इस्टेटचा आणखी एक कच्चा दुवा (कमजोर कडी) आहे; कारण या विशिष्ट अपघातामध्ये पदपथ व इमारती दरम्यान पत्र्याचा अडथळा होता, परंतु पदपथावर फरशी बसविण्याचे काम सुरू असल्यामुळे स्थानिक संस्थेच्या अधिकाऱ्यांनी विकासकाला ते पत्रे हटविण्यास सांगितले, असे विकासकाचे म्हणणे आहे व अशा कोणत्याही सूचना दिल्या नसल्याचे संबंधीत अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अशावेळी लिखित संज्ञापन महत्त्वाचे असते, कुणावरही आरोप करण्याऐवजी किंवा एखाद्या संस्थेला दोष देण्याऐवजी संबंधितांची जबाबदारीची निश्चित करणे व काहीतरी कृती करणे आवश्यक असल्याची जाणीव करून देणे महत्त्वाचे असते. विकासकांनी हे समजून घेतले पाहिजे की बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या कोणत्याही अपघातासाठी त्यांचीच मानगुट पकडली जाणार असते,म्हणूनच प्रत्येक संस्थेशी प्रत्येक संज्ञापन हे लिखित स्वरूपात झाले पाहिजे व त्याच्या नोंदी ठेवल्याच पाहिजेत व हे वेळच्यावेळी झाले पाहिजे,कारण तुमच्या सुरक्षाविषयक दृष्टिकोनाचा पुरावा म्हणून त्याची कधी गरज पडेल हे तुम्ही सांगू शकत नाही.विशेषतः सरकारी संस्थांसोबत तसेच शेजारील इमारती किंवा आस्थापनांसोबत, सुरक्षिततेच्या समस्यांविषयी संवाद साधणे महत्त्वाचे असते. आमच्या प्रकल्पांपैकी एकामध्ये माझ्या निदर्शनास आले की माझ्या भूखंडाला लागून असलेल्या सोसायट्यांपैकी एकीची कुंपणाची भिंत थोडीशी वाकलेली होती. मी तात्काळ तिची छायाचित्रे काढली व त्या सोसायटीला एक पत्र लिहीले व त्या पत्राची एक प्रत स्थानिक पोलीसांना व सार्वजनिक संस्थांना पाठवली, त्यांच्या भिंतीच्या स्थितीविषयी इशारा दिला व भविष्यात ती भिंत कोसळल्यास कोणत्याही नुकसानासाठी आम्ही जबाबदार असणार नाही असे नमूद केले. त्यांच्यापैकी कुणीही दखल घेतली नाही परंतु माझ्याकडे त्याची लेखी नोंद आहे, यालाच कागदपत्रांच्या बाबतीत चोख असणे असे म्हणतात !

     त्याचप्रमाणे आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला पाहिजे व तुमच्या इमारतीच्या चारही बाजूंवर चोवीस तास सीसीटीव्हीने देखरेख करणे यासारख्या गोष्टी आपल्या बांधकाम स्थळावरील प्रत्येक घडामोडी टिपण्यासाठी अत्यावश्यक आहेत, ज्यामुळे आपल्याला कोण त्याचे किंवा तिचे सुरक्षिततेबाबतचे कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरले हे समजले आहे. त्याचप्रमाणे काम पूर्ण होईपर्यंत सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग जपून ठेवा, अशा यंत्रणांसाठी खर्च करा कारण ते विम्यावर खर्च करण्यासारखे आहे, तो पैशाचा अपव्यय नाही. बांधकाम स्थळावर आणीबाणीच्या वेळी संपर्क करण्यासाठी असलेली नावे व क्रमांक ठेवा व अशा सर्व व्यक्तींचा एक व्हाट्सॲप ग्रूप तयार करा, म्हणजे एक मेसेज पाठवताच सर्व व्यक्तींना इशारा दिला जाईल. अपघाताच्या परिस्थितीत काय करायचे यासाठी तुम्ही सहा महिन्यातून एकदा सराव कवायत केली पाहिजे म्हणजे सुरक्षिततेविषयी त्याची किंवा तिची जबाबदारी कुणाला समजली आहे हे तुम्हाला समजेल. तसेच बांधकाम स्थळ जर मोठे असेल तर दर महिन्याला सुरक्षिततेचे लेखा परीक्षण करून घ्या. तसेच सर्व बांधकाम स्थळावरील लिफ्ट, काँक्रीट मिक्सर व पंप यासारख्या यंत्रसामग्रीची व्यवस्थित देखभाल करणेही अतिशय महत्त्वाचे आहे व त्यामुळे अपघात टाळण्यास मदत होऊ शक शकते. 

    इथे, सार्वजनिक संस्थेची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे कारण रिअल इस्टेट हे असंघटीत क्षेत्र आहे व बहुतेक कामे ही हाताने होतात व त्यात काम करणाऱ्या लोकांना तांत्रिक प्रशिक्षण मिळालेले नसते. काही मोठ्या संस्था वगळता बहुतेक ठिकाणी कारागीर हे केवळ सरावाने एखादे काम करत असतात व त्यासाठी त्यांना सुरक्षिततेचे कोणतेही व्यवस्थित प्रशिक्षण दिले जात नाही, जे अत्यावश्यक आहे. पुणे महानगरपालिका, अग्निशमन विभाग क्रेडाई एकत्रितपणे बांधकाम स्थळावरील मजुरांसाठी मूलभूत सुरक्षितता नियमांविषयी व बांधकाम स्थळावरील प्रक्रियांविषयी संक्षिप्त अभ्यासक्रम सुरू करू शकतात व बांधकाम स्थळावर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी तो बंधनकारक असला पाहिजे.

बांधकाम स्थळावरील सुरक्षिततेविषयी खालील दहा मुद्दे मी अनुभवातुन शिकलो आहे, ते शेअर करीत आहे …

. सुरक्षितता या शब्दाचा अर्थ समजून घ्या.

२. बांधकाम स्थळावरील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण द्या.

३. बांधकाम स्थळावरील बालके व लहान मुलांची काळजी घ्या.

४. सर्व यंत्रसामगी व्यवस्थित कार्यरत स्थितीत ठेवा. त्यांच्या देखभालीची एक व्यवस्था पाळा !

५. बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्हीने देखरेखीसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करा.

६. ज्या सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत त्यांची दस्तऐवजामध्ये व्यवस्थित नोंद ठेवा.

७. बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या घटकांविषयी प्रत्येक संबंधित व्यक्तीच्या जबाबदाऱ्या निश्चित करा.

८. सुरक्षिततेविषयी जागरुकता निर्माण करण्याविषयी सातत्याने प्रयत्न करा उदा.भित्तीपत्रके लावा, व्हाट्सॲपद्वारे 

    संदेश,व्हिडिओ इत्यादी पाठवा.

९. बांधकाम स्थळावरील सुरक्षिततेच्या समस्यांविषयी संबंधीत सरकारी यंत्रणांशी योग्यप्रकारे व वेळेत संवाद साधा.

१०. विकासक म्हणून,तुम्ही जोपर्यंत सुरक्षिततेचे पालन करणार नाही तोपर्यंत दुसरा कोणी येऊन नक्कीच करणार        नाही !

मित्रांनो,अपघात कुणालाच नको असतात कारण त्यामुळे केवळ जीवित हानीच होत नाही तर अपघाताशी संबंधित सर्वांना मोठा आर्थिक फटकाही बसतो, यामुळे व्यवसाय करण्याचा हेतूच साध्य होत नाही व अपघाताला सामोरे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तो टाळणे,जे केवळ आपल्यावरच अवलंबून आहे हे लक्षात ठेवा; एवढे बोलून निरोप घेतो! 


संजय देशपांडे 

smd156812@gmail.com
















No comments:

Post a Comment