Wednesday 13 December 2023



7/11/23, अशक्य ते शक्य, आणि ग्लेन मॅक्सवेल !









7/11/23, अशक्य ते शक्य, आणि ग्लेन मॅक्सवेल !


“तुमचा स्वतःवर संपुर्ण विश्वास असल्याशिवाय तुम्ही अशक्य गोष्टी शक्य करून दाखवू शकत नाही”…

    हे काही कुणा मोठ्या व्यक्तीचे अवतरण नाही,मी 7/11/23 रोजी पुरुषांच्या आयसीसी मर्यादीत षटकांच्या विश्वचषकातील अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलला खेळताना पाहिल्यावर मला हे जाणवले. साखळी सामन्यांमध्ये भारतीय संघातील खेळाडूंच्या दृष्टिकोनाविषयी मी माझ्या लेखाची सुरुवात करणार तेवढ्यात ग्लेनच्या खेळामुळे,भारतीय संघाविषयीचा लेख मागे पडला व मी त्याच्याविषयी लिहायला सुरुवात केली, इतकी त्याची खेळी जबरदस्त होती. मला खात्री आहे की त्याचा खेळ पाहण्यासाठी संपूर्ण ऑस्ट्रेलिया देश त्या डावामध्ये साधारण दोन तास पूर्णपणे थांबला असावा. क्रिकेटप्रेमी नसलेल्या सर्वांसाठी (असे अनेक आहेत),सध्या भारतामध्ये पुरुषांची आयसीसी (ज्याप्रमाणे ऑलिम्पिकसाठी आयओसी किंवा फुटबॉलसाठी फिफा आहे, त्याचप्रमाणे क्रिकेटच्या प्रशासनासाठी ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे) विश्वचषक स्पर्धा सुरू आहे व सध्या आपला संघ गुणतालिकेमध्ये सर्वोच्च स्थानी आहे व ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे, या दोन्ही संघांचे उपांत्यफेरीतील स्थान निश्चित आहे. सर्वप्रथम, मला सर्व वाचकांना सांगावेसे वाटते ( विशेषतः ज्यांना क्रिकेट आवडत नाही व या खेळाचा उदो उदो केलेलाही ज्यांना आवडत नाही) की मला क्रिकेट आवडते परंतु त्याहीपेक्षा मला प्रत्येक मैदानी खेळ आवडतो किंवा खेळामध्ये होणारा शारीरिक व्यायाम आवडतो (बुद्धिबळाविषयी पूर्णपणे आदर आहे). मॅक्सवेलच्या खेळाविषयीचा हा लेख केवळ क्रिकेटचे चाहते किंवा क्रिकेट प्रेमींसाठी नाही तर प्रत्येक क्रिडाप्रेमीसाठी आहे व प्रत्येकाने एखादा खेळ का खेळला पाहिजे याविषयी आहे. त्यामुळे या खेळातून आपल्याला  जो काही धडा मिळाला आहे किंवा आपण धडा घेतला आहे यावरून त्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी खुल्या मनाने वाचा. आत्तापर्यंत माध्यमांनी मॅक्सवेलचे व त्याच्या विक्रमी खेळीचे भरभरून कौतुक केले आहे. परंतु एक व्यक्ती म्हणून मला त्यातून काय मिळाले आहे हे मला इथे सांगायचे आहे.

    मला असे वाटते की क्रिकेटप्रेमी नसलेल्यांनाही हा खेळ समजतो कारण तो एवढा अवघड नाही व आपल्यापैकी बहुतेकजण (भारतीय) आयुष्यात कधी ना कधी क्रिकेट खेळले असतात. त्यामुळे मी खेळाचे नियम किंवा तपशील समजून सांगण्यात वेळ वाया घालवणार नाही. परंतु अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर धावांचे माफक उद्दिष्ट ठेवले होते. जवळपास दोन तृतीयांश ऑस्ट्रेलियन संघ एक तृतीयांश धावांमध्येच गारद झाला होता. म्हणजे जेमतेम ९० धावांवर ७ गडी बाद अशी अवस्था होती, म्हणजे जिंकण्यासाठी अजून २०१ धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियन संघाच्या कट्टर समर्थकांनाही जिंकण्याची कोणतीही आशा वाटत नव्हती व अशा परिस्थितीतही ऑस्ट्रेलियन संघ हा सामना तीन गडी राखून जिंकला. अशा वेळी मॅक्सवेलने केवळ १२८ चेंडूंमध्ये २०१ धावा केल्या (दुहेरी शतक) व लक्ष्य साध्य केले. हे आकडे सांख्यिकी तज्ञांना त्यांच्या नोंदी ठेवण्यासाठी कदाचित पुरेसे असतील, परंतु हे कसे साध्य झाले यातून प्रत्येक खेळाडूला तसेच माणसाने शिकण्यासारखे आहे. मॅक्सवेल जेव्हा खेळण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा आधीच त्याच्या संघाने तीन किंवा चार गडी गमावले होते, आवश्यक असलेली धाव संख्या वाढत चालली होती व मोठे उद्दिष्ट गाठायचे होते. त्यानंतरही दोन गडी बाद झाले व मॅक्सवेलच्या जोडीला केवळ गोलंदाज उरले होते. हा सामना मुंबईमध्ये होता, त्यामुळे हवामान अत्यंत दमट होते व हवेतील प्रदूषणाची पातळीही अतिशय जास्त होती. मॅक्सवेलला त्याच्या देशामध्ये ज्या वातावरणाची सवय आहे त्यापेक्षा निश्चितच या दोन्ही गोष्टीही त्याच्या विरोधात जाणाऱ्या होत्या. प्रतिस्पर्धी संघाला मात्र या हवामानाची सवय होती, किंबहुना अफगाणिस्तानमध्ये यापेक्षाही खराब हवामान असते, त्यामुळे हवामानाच्या बाबतीतही त्यांचे पारडे जड होते. 

आता, त्यावेळी परिस्थिती कशी होती हे मी तुम्हाला समजून सांगितले आहे, मॅक्सवेलच्या खेळीतून मी जे काही शिकलो ते येथे देत आहे …

१. मॅक्सवेलला  झेल सुटल्यामुळे दोन किंवा तीन वेळा जीवदान मिळाले व त्याच्या डावाच्या सुरुवातीलाच एक एलबीडब्ल्यूचे अपील करण्यात आले होते ते देखील फेटाळले गेले. परंतु त्यानंतर त्याचे लक्ष खेळावर अधिक केंद्रित झाले कारण शेवटचा झेल सुटल्यानंतर, त्याने अफगाणिस्तान संघाला एकही संधी दिली नाही. आपल्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत तर आपण सगळे नशीबाला दोष देतो, परंतु नशीब तुमचे वा माझे असे काही नसते ते दोन्ही बाजूंवर कृपा करते परंतु जे सक्षम असतात व मिळालेल्या संधीचे सोने करायची ज्यांची तयारी असते तेच शेवटी विजेते होतात, जसा मॅक्सवेल झाला. नशीबाने अफगाणिस्तान संघालाही संधी दिली होती, कारण मॅक्सवेलने चुकीचे फटके लगावले परंतु अफगाणिस्तानने झेल सोडून त्या संधी गमावल्या, तर मॅक्सवेलने त्या संधींचे सोने केले आपण त्याच्याकडून हेच शिकले पाहिजे. आपल्या सगळ्यांनाच संधी मिळते परंतु काही वेळा आपण ती पाहू शकतो व काही वेळा आपण ती पाहू शकत नाही, परंतु त्यामध्ये संधीचा दोष नसतो, तर दोष आपला असतो कारण आपण ती संधी पाहू किंवा अनुभवू शकत नाही. मॅक्सवेलच्या खेळीमुळे मला संधींचे महत्त्व, त्या संधी घेण्याची व त्यांचे सोने करण्याची माझी तयारी याविषयी शिकवले.

 २. मॅक्सवेलच्या पुर्ण शरिरात उष्म्याने  पेटके येत असल्यामुळे वेदना होत होत्या, शरीरातली पाण्याची पातळी कमी झाली होती व तो दमला होता, इतर कोणत्याही वेळी त्याने या वेदनांमुळे सामन्यातून माघार घेण्याचा व त्याची शक्ती पुढील खेळासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला असता. परंतु तो बाद झाल्यास संघामध्ये आणखी चांगला खेळाडू नाही, त्यामुळे त्याला पुढाकार घेऊन, टिकून राहणे आवश्यक आहे हे त्याला माहिती होते, जे त्याने करून दाखवले. आयुष्यातही तुम्हाला जिंकायचे असेल तर तुम्हाला इतर कुणातरी तुमच्यासाठी करेल अशी वाट न पाहता, आपणहून पुढाकार व जबाबदारी घ्यावी लागते, विजेते व इतरांमध्ये नेमका हाच फरक असतो !

३. तुमच्या वेदनेला आणि दमछाकीलापण  तुमची ताकद बनवा, त्यासाठी रडत बसू नका. मॅक्सवेलला वेदना होत होत्या व त्याने खेळताना त्याला त्रास होतोय हे लपवले नाही, तर त्याने त्याचा वापर साधन म्हणून केला. त्या माध्यमातून त्याने त्याची ताकद दाखवून दिली. त्याने तो जे फटके मारू शकतो त्यावर लक्ष केंद्रित केले, इजेमुळे किंवा वेदनेमुळे जे फटके तो खेळू शकत नाही त्याची काळजी तो करत बसला नाही. त्याचवेळी, आपण धावू शकत नाही याची जाणीव झाल्यावर त्याने, एका किंवा दोन धावा घेण्याऐवजी मोक्याच्या चेंडूंवर जोरदार फटके मारून त्याची शक्ती वाचवली. आपण सगळ्यांनी हेच शिकले पाहिजे, आपण नेहमी आपल्यातील कमतरतेला दोष देत बसतो व ते झाकण्याचा प्रयत्न करतो. या प्रक्रियेमध्ये, आपण आपल्या बलस्थानांकडे दुर्लक्ष करतो व अडचणीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांचा जास्तीत जास्त चांगल्याप्रकारे वापर करून घेत नाही, मग ते शरीर असो किंवा मन, नेहमी आपल्या बलस्थानांवर लक्ष केंद्रित करा. मॅक्सवेलला वेदना होत असताना व दमलेले असतानाही खेळताना पाहून मी हाच धडा शिकलो.

४. आपल्या प्रतिस्पर्ध्याचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आपल्या कमजोरीचा वापर करा. मॅक्सवेलने त्याला झालेल्या इजेमुळे होणारा त्रास दाखवल्यामुळे गोलंदाजांनी त्यांची रणनीती बदलली ज्याचा त्यांनी विचार केला नव्हता, त्यांनी चेंडूचा वेग व टप्पा बदलला. यामुळे उलट मॅक्सवेलला त्याच्या बलस्थानांचा वापर करता येईल अशीच गोलंदाजी त्यांच्याकडून झाली.

    मी जॅकी चेनच्या कराटे किड या चित्रपटामध्ये हे पाहिले आहे, जॅकीचा एक वयाने लहान विद्यार्थी मार्शल-आर्टच्या विजेतेपदासाठी लढत असतो व आधीच्या फेऱ्यांमध्ये डाव्या पायाला इजा झाल्यामुळे त्याला अतिशय वेदना होत असते. परंतु जॅकी त्याच्या विद्यार्थ्याला ती वेदना लपवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पायाला झालेल्या इजेमुळे होणारा त्रास प्रतिस्पर्ध्याला दाखवायला सांगतो,ज्यामुळे प्रतिस्पर्धी त्याच्या सर्व हालचाली त्या इजा झालेल्या पायावर केंद्रित करतो व या प्रक्रियेमध्ये त्या विद्यार्थ्याचा जो पाय व्यवस्थित असतो त्याने केल्या जाणाऱ्या हल्ल्याकडे तो पूर्णपणे दुर्लक्ष करतो. सरते-शेवटी केवळ एका ठिक असलेल्या पायाचा वापर करून जॅकीचा विद्यार्थी तो सामना जिंकतो. मॅक्सवेलनेही नेमके तेच केले, परंतु अफगाण गोलंदाजांनी, ज्या गोलंदाजीमुळे आधी गडी बाद होत होते तीच पुढे सुरू ठेवण्याऐवजी, मॅक्सवेलला त्याच्या इजेमुळे जी गोलंदाजी खेळणे अवघड जाईल असे त्यांना वाटले ती करत राहिले व इथेच त्यांची मोठी चूक झाली.

५. निर्धार व सामन्यातील शेवटचा चेंडू खेळला जाईपर्यंत हार न मानण्याचा दृष्टिकोन. मॅक्सवेलला जेवढ्या वेदना होत होत्या तेवढे त्याचे लक्ष अधिक केंद्रित व त्याचा निर्धार अधिक दृढ होत होता. आयुष्यात तुम्हाला जो काही त्रास होत आहे त्यामुळे रडत बसण्यापेक्षा तुम्ही असेच असले पाहिजे. यामुळे दोन गोष्टी होतील, तुमचे मन वेदनेवर केंद्रित राहणार नाही व तुम्ही फक्त तुम्हाला कोणते अंतिम उद्दिष्ट गाठायचे आहे याचा विचार कराल.

६. शेवटचा, परंतु तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, तुम्ही स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन, इतक्या निर्धाराने लढत असताना दुसऱ्या बाजूने तुम्हाला मिळणारा पाठिंबा, कारण तुमच्या संघातील इतर खेळाडूंसाठी त्यांचा खेळ अधिक चांगला व्हावा यासाठी ती सगळ्यात मोठी प्रेरणा असते. मॅक्सवेलने दिलेल्या लढ्यामुळे त्यांचा कप्तान, पॅट कमिन्स जो दुसऱ्या बाजूला खेळत होता त्यालाही आपला बळी जाऊ न देता टिकून राहणे भाग पडले. संघातील एका खेळाडूचा निर्धार ठाम असेल आणि तो स्वतः झोकुन  देऊन  खेळत  असेल तर संघातील इतरांवरसुद्धा त्या खेळीचा असा चांगला परिणाम होतो !

७. सरतेशेवटी जेव्हा लक्ष्य साध्य झाले तेव्हा त्याचा आनंद सगळीकडे उड्या मारून व शारीरिक हावभावांनी प्रतिस्पर्ध्यांना चिडवून साजरा करण्यात आला नाही तर अत्यंत संयमी व शांत हास्य देऊन व प्रेक्षकांच्या दिशेने हात उंचावून करण्यात आला ; एक व्यावसायिक विजयी खेळाडू अतिशय कष्टाने मिळलेले यश असेच साजरे करतो. अनेक तरुणांनी यातून धडा घ्यावा जे थोड्याशा यशाने वाहावत जातात व मी इथे एखाद्या विशिष्ट खेळातील एखाद्या विजयाविषयी बोलत नाही तर आयुष्याच्या अनेक आघाड्यांविषयी बोलतोय !

      क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने स्वतः मॅक्सवेलची खेळी त्याने एक दिवसीय खेळामध्ये आत्तापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम खेळांपैकी एक होती अशी प्रतिक्रिया दिली आहे व ही प्रतिक्रिया खुद्द सचिनकडून आलेली असल्यामुळे,मॅक्सवेल कसा खेळला याची कल्पना आपण करू शकतो ! अफगाणिस्तानच्या संघानेही अटीतटीची लढत दिली व मॅक्सवेलला त्याचा संघ वाचवण्यासाठी काहीतरी चमत्कार करणेच भाग होते, दोन्ही संघांमधील भौगोलिक, व्यावसायिक तसेच अनुभवाच्या बाबतीत असलेली प्रचंड तफावत विचारात घेता हे देखील अफगाणिस्तान संघाचे यशच म्हणावे लागेल. तेही यातून खेळामध्ये आलेल्या संधीचा वापर कसा करायचा याविषयी धडा शिकले असतील व या सामन्यामुळे त्यांना एक अधिक चांगला संघ होण्यासाठी मदत होईल, एखाद्या खेळाडूची अशी खेळी (तो प्रतिस्पर्धी असला तरीही) तुम्ही हरलात तरीही तुम्हाला अशाप्रकारे शिकवून जाते.

    क्रिकेट नावाच्या खेळामध्ये जबरदस्त जिद्दीचे प्रदर्शन केल्याबद्दल ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स व अफगाण क्रिकेट संघाचे आभार, यामुळे मला जीवनाच्या विषयी माझ्या दृष्टिकोनाचा परत एकदा  आढावा घ्यावसा वाटला . यातून मला आयुष्याने किती संधी दिल्या आहेत व आयुष्याने मला जे दिले नाही त्याबाबत आसवे गाळण्याऐवजी त्या संधींचे सोने केले पाहिजे याची जाणीव झाली, या कृतज्ञतेच्या जाणीवेवरच या लेखाचा समारोप करतो ! 


संजय देशपांडे

smd156812@gmail.com














 







No comments:

Post a Comment