Tuesday, 28 November 2023


क्रिकेट वर्ल्ड कप 23, भारतीय टिम आणि जिवनातील धडा !













क्रिकेट वर्ल्ड कप 23, भारतीय टिम आणि जिवनातील धडा !


तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, एक म्हणजे आपण गोलंदाजी करत असू किंवा फलंदाजी आपण प्रत्येक चेंडूसाठी झुंज देणार आहोत. दुसरे म्हणजे, खेळावर लक्ष केंद्रित करा व १००% प्रयत्न करा. तिसरे म्हणजे, हसत राहा व खेळाचा आनंद घ्या, ते कोणत्याही विजयापेक्षा किंवा पराभवापेक्षा महत्त्वाचे आहे”... सामन्यापूर्वी राशीद खानने त्याच्या अफगाण क्रिकेट संघातील खेळाडूंना दिलेला सल्ला.

सामन्यापूर्वी दिखावा करणे हा तुम्ही स्वतःवर केलेला एक वाईट विनोदच म्हणावा लागेल. त्यात अडकू नका. तुमची बलस्थाने ओळखा, तुमच्या कमकुवत बाबी सुधारण्यासाठी मेहनत घ्या. खरी कामगिरी म्हणजे, तुम्ही दररोज सकाळी आरशामध्ये जे पाहता ते आवडणे”... विराट कोहली त्याच्या ३५व्या वाढदिवशी.


एका सामन्यात जरी खराब खेळ झाला तर मी सर्वात वाईट कप्तान ठरेन”… रोहित शर्मा विश्व चषकातील भारतीय संघाच्या विजयांच्या मालिकेविषयी.


“ विजेते नशीबावर विसंबून राहात नाहीत; ते नशीबाला त्यांच्यावर विसंबून राहायला लावतात “ मी.


   तुम्ही जोपर्यंत हा लेख वाचत असाल, तोपर्यंत चारपैकी एक गोष्ट घडली असेल, भारत अंतिम फेरीपर्यंत पोहोचला असेल, किंवा न्यूझिलंडविरुद्ध पराभूत होऊन उपांत्यफेरीत सामन्यातून बाहेर पडला असेल किंवा अंतिम सामना जिंकून विश्वविजेताही झाले असते किंवा अंतिम सामन्यात पराभुत झाला असेल! (दुर्दैवानी चवथी शक्यताच खरी ठरली)  मी आयसीसीच्या पुरुषांच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेविषयी बोलतोय जो सध्या आपल्या देशात सुरू आहे व ही स्पर्धा सध्या अंतिम टप्प्यात आहे. मी आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे या देशात क्रिकेटचा द्वेष करणाऱ्या व्यक्तीही असल्या तरीही या देशात लोकांना दोन गोष्टी सर्वाधिक आवडतात त्या म्हणजे सिनेमा व क्रिकेट, ही वस्तुस्थिती अगदी क्रिकेटचा द्वेष करणारेही नाकारू शकणार नाहीत, त्यामुळे असो. माझ्याविषयी बोलायचे झाले, तर मला माझा खेळ आवडतो व मी स्वतः क्रिकेटचा निस्सीम चाहता होतो, परंतु आता नाही कदाचित क्रिकेटचा अतिरेक झाला असावा किंवा कदाचित माझे वय झाले असावे. म्हणुन मी पहिले ईतर 9 क्रिकेटचे सामने मिव टाकून बघत नाही. परंतु हा एक सांघिक खेळ आहे व तो पाहताना मला त्यातून जे काही शिकायला मिळते त्यासाठी मी तो पाहतो. उद्या भारतासाठी कसोटीचा दिवस असणार आहे, कारण गेल्या दशकात जेव्हा दोन किंवा तीन देशांमधील क्रिकेटच्या स्पर्धा असतात तेव्हा त्यावर आपले वर्चस्व राहिले आहे. परंतु क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ असलेले देश जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात तेव्हा आपले आव्हान साखळी सामन्यांमध्ये किंवा पात्रता सामन्यांमध्येच संपुष्टात येते असा अलिकडचा इतिहास राहिलेला आहे. भारतीय संघ ज्या मानसिकतेने या क्रिकेट विश्वचषकाला सामोरा गेला आहे ते सांगणे हेच माझ्या लेखाचे उद्दिष्ट आहे, ही स्पर्धा म्हणजे एकप्रकारे मर्यादित देशांच्या ऑलिम्पिकसारखीच असते. आपण सर्व साखळी सामने जिंकले आहेत, विश्वचषक स्पर्धेमध्ये अशी कामगिरी करणारा आपण एकमेव संघ आहोत. इतर 9 संघांना कुठल्या ना कुठल्या संघाकडून पराभूत व्हावे लागले आहे. अनेकदा त्यांच्यापेक्षा क्रमवारीत खालच्या स्थानी असलेल्या व अनुभवाने कमी असलेल्या संघाकडूनही पराभव स्वीकारावा लागला आहे. आपण हे या स्पर्धेतून शिकू शकतो व या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने सर्व सामने जिंकणे विशेष होते. आत्तापर्यंत केवळ ऑस्ट्रेलियन संघाने हे साध्य केले आहे व त्यांनी हे दोनदा केले आहे व आपला संघ साखळी सामन्यात अपराजित राहिला तर तोही या यादीत पोहोचेल व हेच विजेत्यांचे लक्षण आहे.

     खरे तर क्रिकेट हा खेळ अधिकृतपणे केवळ पंधरा देश खेळतात व त्यापैकी केवळ दहा देश विश्वचषकासाठी पात्र झाले आहेत. या फेऱ्यांमध्ये प्रत्येक संघाला प्रत्येकी नऊ सामने खेळावे लागतील व सर्वोच्च चार संघ उपांत्यफेरीमध्ये पोहोचतील. विनोद म्हणजे जागतीक पहिल्या क्रमांकावर असलेला पाकिस्तानसारखा अग्रमानांकित संघ साखळी सामान्यात बाहेर झाला आहे, तसेच इंग्लंडही बाहेर झाला आहे, जो गतविजेता होता. ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेचे संघही त्यांच्यापेक्षा जे संघ कमजोर मानले जात होते उदाहरणार्थ बांग्लादेश, नेदरलँड्स व अफगाणिस्तान यांच्याकडून पराभूत झाले, म्हणूनच क्रिकेट पाहणे अतिशय रोचक असते तुम्हाला खेळाचा आनंद उपभोगताना आयुष्याचे धडेही मिळतात. या संघांना एकमेकांशी खेळताना पाहणे हे एखाद्या वर्गामध्ये बसून प्रयत्न, कौशल्य, चिकाटी, रणनीती, अडचणी, निर्धार यांचे शिक्षण घेण्यासारखे आहे व नशीबाचा फायदा घेण्यासारखे किंवा नशीब गमावण्यासारखे आहे, तुम्हाला हा खेळ कितीतरी गोष्टी शिकवतो. उदाहरणार्थ, नेदरलँड्ससारखा संघ दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हरवतो, हे म्हणजे एखाद्या कमजोर संघाने कितीतरी पटीने अधिक चांगल्या संघाचा धुव्वा उडवण्यासारखे होते. नेदरलँड्सच्या संघामध्ये अनेक खेळाडू हा खेळ अर्ध वेळ खेळतात. यात कुणी शिक्षक आहे, कुणी प्लंबर आहे, कुणी ऑनलाईन डिलेव्हरी बॉय आहे व अशा खेळाडूंनी तयार झालेल्या नेदरलँड्सच्या संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हरवले ज्यांच्याकडे केवळ अनुभवच नाही तर कौशल्य व खेळाविषयी व्यावसायिक दृष्टिकोनही आहे. या स्पर्धेमध्ये इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया यांच्या अशा इतिहासाची पुनरावृत्ती झाली परंतु भारतीय संघाच्या बाबतीत असे घडले नाही.

    राशीद खान याचे शब्द वाचा, जो अफगाणिस्तानच्या इतर खेळाडूंना संबोधित करणाऱ्या दोन खेळाडूंपैकी एक होता, ज्यांच्यापैकी बहुतेकांना इंग्रजी बोलता येत नाही. त्याने त्यांना खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा, शंभर टक्के प्रयत्न करण्याचा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे हसत राहण्याचा म्हणजेच केवळ जिंकण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी खेळाचा आनंद घेण्याचा विचार करा असा सल्ला दिला, जगभरातील व्यवस्थापन गुरू आपल्याला नेहमी हेच तत्वज्ञान शिकवत असतात असे तुम्हाला वाटत नाही का. या दृष्टिकोनामुळे खेळाच्या बाबतीत काय घडू शकते याचे हे जिवंत उदाहरण आहे, अशा एका देशातील खेळाडूंचा संघ जेथे धड सरकारही अस्तित्वात नाही तसेच डोक्यावर युद्ध व दहशतवादाची सतत टांगती तलवार असते, पात्रता फेरीच्या लढतीत शेवटपर्यंत झुंज देत होता त्याने क्रमवारी, अनुभव व संसाधनांमध्ये त्यांच्यापेक्षा वरचढ असलेल्या संघांची अक्षरशः कोंडी केली. या परिस्थितीतून तुम्ही काय शिकण्यासारखे आहे, माझ्याकडे जे नाही त्यासाठी रडत बसण्याऐवजी, मी माझ्याकडे जे काय आहे त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे व आपले काम सर्वोत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अफगाणिस्तान संघाने मला हा दृष्टिकोन शिकवला. खेळामध्ये (आणि जिवनामध्ये सुद्धा) नेहमी शक्ती किंवा अनुभव किंवा ताकद किंवा क्रमवारी महत्त्वाची नसते, त्या दिवशी ज्यांचा खेळ सर्वोत्तम होईल व जे खेळाचा आनंद घेतील ते देखील जिंकू शकतात. यातून मी शिकलो की, इतिहास महत्त्वाचा असतो परंतु तो कधीच कायमस्वरूपी नसतो व तुम्ही दररोज जेव्हा मैदानावर उतरता तेव्हा तो नव्याने लिहीला जाऊ शकतो. अफगाणिस्तान व नेदरलँड्ससारख्या संघांनी मला शिकवले की आपला प्रतिस्पर्धी कितीही शक्तीशाली असला तरीही आपण आपल्या कौशल्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला तर आपण त्यांना हरवू शकतो. त्याचवेळी पहिले दोन सामने हरल्यानंतर ऑस्ट्रिलिया व दक्षिण आफ्रिका खडबडून जागे झाले व त्यांनी त्यांच्या उरलेल्या सर्व सामन्यांमध्ये पुन्हा मुसंडी मारली व अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. परंतु इतर संघांची मात्र घसरण झाली व त्यातून ते कधीच सावरले नाहीत. यातून आपल्या प्रतिस्पर्ध्याला कधीही कमी लेखू नये हे मला समजले (आयुष्यात, त्याच्या परिस्थितींमध्ये) व खेळाला कधीही गृहित धरू नये. तसेच पराभवामुळे माझ्यामते दोन गोष्टी घडू शकतात, एकतर त्यामुळे मी हताश होऊन लवकरच माझा पुन्हा पराभव होईल किंवा त्यामुळे मला माझ्या चुकांची जाणीव होईल व त्या सुधारून पुढचा सामना जिंकता येईल, आता यापैकी काय करायचे आहे हा निर्णय माझा आहे.

     भारतीय संघाविषयी बोलायचे झाले, तर आपण काही जबरदस्त विजय पाहिले व आत्तापर्यंत प्रत्येक खेळाडूने त्यामध्ये योगदान दिले आहे व विजेता संघ असाच असला पाहिजे. तुम्ही प्रत्येक वेळी काही नावांवरच अवलंबून राहू शकत नाही, ते अगदी तुमच्यासाठी देवासमान असले तरीही. तुम्ही जेव्हा काही व्यक्तींच्या समूहाला संघ म्हणता तेव्हा प्रत्येक सदस्याला त्याची (किंवा तिची) भूमिका समजली पाहिजे व त्या भूमिकेला न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला पाहिजे, त्यानंतरच तुम्ही विजयी होता, जे भारतीय संघाच्या बाबतीत घडत आहे. म्हणूनच कुणी महान खेळाडूच म्हणजे एखादा फलंदाजच धावा करत नाही किंवा एखादा प्रसिद्ध गोलंदाजच बळी घेत नाही, तर प्रत्येकजण योगदान देत आहे. तुम्ही सध्या बहुतेकवेळा अशाचप्रकारे जिंकता. वर्षानुवर्षे भारतीय संघ नेहमीच प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मानसिकदृष्ट्या एका किंवा दोन नावांवर अवलंबून राहिला आहे. जर त्या खेळाडूचा खेळ अपेक्षेप्रमाणे झाला नाही तर संपूर्ण संघच पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळत असे, आता मात्र तशी परिस्थिती नाही. तुम्ही काळजीपूर्वक लक्ष दिल्यास, आपण 1983 व 2011 या दोन्ही वर्षी क्रिकेट विश्वचषक जिंकला तेव्हा सगळ्या खेळाडूंनी त्यांची जी काही भूमिका होती त्यामध्ये योगदान दिले, तसेच आत्ताही होताना दिसत आहे. जेव्हा प्रत्येक सदस्य योगदान देतो तेव्हा प्रत्येक खेळाडू आरामात, मोकळेपणाने त्याचा नैसर्गिक खेळ खेळू शकतो जे त्यांच्या यशाचे गमक आहे. हे आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या दैनंदिन कामासाठीही लागू होते. जेव्हा प्रत्येक सदस्य त्याचे काम चांगल्याप्रकारे करत असतो, पूर्णपणे समर्पित होऊन करत असतो, तेव्हा कामाचा भार जाणवत नाही. आपल्या पौराणिक कथांमध्ये भगवान श्रीकृष्णांनीही गोवर्धन पर्वत अशाचप्रकारे उचलला, ज्यासाठी प्रत्येक गावकऱ्याने हातभार लावला व भगवान श्रीकृष्णांच्या नेतृत्वाखाली ते खरोखरच पर्वत उचलू शकले!

    तुम्ही जेव्हा सगळ्या गोष्टी योग्य प्रकारे करता, तेव्हा नशीब नावाचीही गोष्ट असते व तुमचे त्यावर काहीही नियंत्रण नसते हे मान्य असले तरीही नशीबाची मेहेरनजर कुणावरही होऊ शकते, ते कधीही भेदभाव करत नाही. किंबहुना नशीब हे कुंपणावर बसून असते व दोन्हींबाजूंना सारखेच महत्त्व देत असते, जी बाजू त्यांचा वाटा घेण्यासाठी सज्ज असते सामान्यपणे तिचा विजय होतो, मला असे वाटते भारतीय संघही त्यांचे नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाला पाहिजे. माझ्यापुरते बोलायचे झाले, तर भारत विश्वचषक जिंको किंवा न जिंको मला भारतीय म्हणून काहीही फरक पडत नाही. कारण मला तुम्हाला सांगावेसे वाटते की आपला संघ आत्तापर्यंत जसा खेळला आहे त्याबद्दल मी अतिशय आनंदी आहे व मला आपल्या संघाचा अतिशय अभिमान आहे. मला असे वाटते की हाच सर्वोत्तम निकाल आहे.

    मी हा लेख लिहीपर्यंत भारत उपांत्य फेरीमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याच्या मार्गावर होता, विराटने एक दिवसीय सामन्यामध्ये ५०वे शतक केले होते. तो अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडु आहे, त्यामुळे प्रार्थना करत राहा व भारतीय संघ आपल्या खेळाचा आनंद लुटत असताना त्यांना पाहण्याचा आनंद उपभोगा, एवढेच मी सांगेन!



संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com











 

No comments:

Post a Comment