Friday 10 November 2023

नविन सिझन, नवे ताडोबा, नव्या गोष्टी !











नविन सिझन, नवे ताडोबा, नव्या गोष्टी !



“सगळे धुळीने माखलेले,खडबडीत रस्ते ताणतणाव वाढवत नाहीत तर, अशाच काही रस्त्यांवर तुम्हाला सुद्धा मनःशांती मिळते”…
           
   ताडोबाच्या अलिझांझा बफर क्षेत्रामध्ये रस्त्यावरून (दगड-धोंड्यांनी भरलेल्या, तीव्र उतार असलेल्या रस्त्याला तुम्ही रस्ता म्हणून शकत असाल तर ) जिप्सीने जाताना मला हेच वाटले. इथे तुमचे लक्ष खडबडीत रस्त्यांकडे जात नाही, नाहीतर एरवी अशा रस्त्यांवर तुमची मान व पाठ दुखायला लागली असती, तसेच वाहनांच्या वर्दळीमुळे हवेमध्ये उडणारा लाल मातीचा धुरळाही जाणवत नाही, नाहीतर तुम्ही त्या धुळीला दोष दिला असता. कारण तुमचे मन त्या पिवळ्या व काळ्या पट्ट्यांच्या शोधात व जंगलातील विवीध सुगंधात रममाण झालेले असते. म्हणूनच तुम्हाला निखळ शांतता अनुभवायला मिळते. पाण्याने माशाला वेढून टाकावे तसे जंगलाने तुम्हाला पुरते वेढून टाकलेले असते,ताडोबाचा तुमच्यावर असा परिणाम होतो! अन्नाच्या शोधात झाडावर चढणारे एखादे मुंगूस, तुमची वाट अडवणाऱ्या अस्वलांपासून,ते आपल्याच धुंदीत सगळीकडे भटकंती करणाऱ्या वाघांपर्यंत, वास्तव्य असणाऱ्या जंगलामुळे तुम्हाला शांतता मिळते, परंतु त्यासाठी आधी तुम्ही तिथे जावे लागते व जंगलांच्या नियमांनुसार जगायला शिकावे लागते. भारतामध्ये अभयारण्यांमध्ये,म्हणजेच व्याघ्र प्रकल्पांच्या कोअर क्षेत्रांमध्ये ऑक्टोबरपासून नवीन हंगामाची सुरुवात होते, व माझ्यासाठी त्याची सुरुवात करण्यासाठी ताडोबाव्यतिरिक्त दुसरी चांगली जागा कुठली असू शकली असती.ज्यांना वन्यजीवन पर्यटनाची फारशी माहिती नाही त्यांना सांगतो, व्याघ्र प्रकल्प (म्हणजे आपल्या शहरातील उद्यानांसारखी उद्याने नव्हेत )म्हणजे वाघांचे व वन्य संवर्धन करण्यासाठी आरक्षित जंगले असतात. मॉन्सूनच्या काळात ती बंद असतात कारण पावसामुळे येथील रस्त्यांची परिस्थिती अतिशय वाईट होऊ शकते व ही सगळी अभयारण्ये मॉन्सूननंतरच म्हणजे ऑक्टोबरमध्ये पर्यटनासाठी उघडतात. मॉन्सूनदरम्यान या आरक्षित जंगलांची बफर क्षेत्रे खुली असतात व मी मॉन्सूनमध्ये सुद्धा ताडोबाच्या बफर क्षेत्रांना भेट दिलेली आहे. तुम्हाला असे वाटत असेल की एवढ्यात मी ताडोबाविषयी अनेक लेखमालिका लिहील्या आहेत त्यामुळे ताडोबाने मला झपाटून टाकले आहे. तर माझे उत्तर आहे होय,मला ताडोबाच्या जंगलाने झपाटून टाकले आहे व हे लेख पुनर्प्रकाशनासारखे वाटत असतील परंतु ते तसे नाहीत, कारण जंगलात दररोज नाविन्य असते व इथे तर आपण नव्या हंगामाविषयी बोलत आहोत, त्यामुळे तुम्ही वन्यजीवन प्रेमी असाल ( तुम्ही नसलात परंतु तुम्हाला वन्यजीवनाविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल तरीही ),तर आवर्जून पुढे वाचा !
     जंगलाला वर्षाच्या या काळात भेट देण्यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, प्राण्यांच्या रंगाचे स्वरूप बदलते तसेच त्वचा तजेलदार होते, ही येणाऱ्या हिवाळ्याची चाहूल असते. मी उन्हाळ्यामध्ये अस्वलाची छायाचित्रे घेतली आहेत (उकाड्यामध्ये तुमचे केस जेवढे जास्त तेवढे तुम्ही अधिक अव्यवस्थित दिसता ),हिवाळ्यात अस्वल आईने एखाद्या लहान मुलाच्या केसांना तेल चोपडून केस विंचरावेत तसे दिसतात ! ताडोबामध्ये माझे नशीबही जोरदार असावे ,कारण मला या वेळेस देखील अस्वलाची अगदी स्पष्ट छायाचित्रे घेता आली, हे देखील माझ्या लेखाचे व मी ताडोबाला भेट देण्याचे कारण आहे. ही सगळी दृश्ये व वाघांपेक्षाही (ते मुख्य कारण आहेच) मी ताडोबाच्या जंगलाकडे खेचला जाण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वाघ (म्हणजे वन्यजीवन) व येथील लोकांमधील नाते जे वन्यजीवनाच्या प्रत्येक हंगामासोबत दृढ होतानाच दिसते (दृष्ट ना लागो). जवळपास २२ हून अधिक प्रवेशद्वारांमधून तुम्हाला या जंगलाना भेट देता येते आणि ही जणु जंगल रुपी पृथ्वीवरील स्वर्गाची २२ प्रवेशद्वारे आहेत. तुम्ही जेव्हा त्यामध्ये प्रवेश करता तेव्हा तुमच्याभोवती अद्भूतरम्य दृश्यांचा नजारा उलगडत जातो. निसर्गाशी एकरूप होत, तिथली निरव शांतता तुम्ही अनुभवत असताना, जंगल तुम्हाला कितीतरी नवीन गोष्टी शिकवते. तुम्ही एखादा विषय जेव्हा दरवर्षी वरच्या इयत्तेमध्ये शिकता तेव्हा तो  विषय अधिक खोलवर जाणून घेता येतो,जंगलाचेही तसेच असते. प्रत्येक नव्या दिवशी,ताडाबोच्या नव्या हंगामामध्ये तुम्ही वन्यजीवन नव्या दृष्टिकोनातून पाहता येते,जंगलांची नवीन भाषा ऐकता येते, निसर्गाचा नवा सुगंध श्वासात भरून घेता येतो,तुम्ही केवळ जंगलांना वारंवार व खुल्या मनाने भेट दिली,तसेच त्याच्याकडून काही शिकण्याची इच्छा असेल तरच हे शक्य होते.या सफारींमुळे तुम्हाला केवळ वन्यजीवनाविषयीच नव्हे तर माणूस व प्राण्यांच्या नातेसंबंधांबद्दल समजून घेता येते किंवा या बंधाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहता येते जे आपल्या शहरी जीवनामध्ये वेगाने हरवत चालले आहे, अगदी माणसा-माणसांमधले नातेही !
     इथे जंगलांमध्ये, तुम्ही लोकांना भेटता ज्यांना तुम्ही ओळखत होता व तुम्ही नव्या लोकांनाही भेटता व त्या सगळ्यांकडे काहीतरी सांगण्यासारखी गोष्ट असते, ज्यामुळे तुम्ही जंगल अधिक चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकता. उदाहरणार्थ,मला ज्ञानेश्वरी नावाची तरूण महिला गाईड भेटली,ती बफर क्षेत्रातील बेलारा गावात राहते व ती गाईड म्हणून काम करतानाचे (म्हणजे महिला गाईड म्हणून) अनुभव सांगत होती. हे तरुण जेव्हा गाईड म्हणून काम करताना त्यांना येणारे वेगवेगळे अनुभव सांगत असतात तेव्हा त्यांचे अनुभव ऐकणे अतिशय रोचक असते व कारण एक स्थानिक म्हणून अवतीभोवती वन्यजीवन (म्हणजे वाघ) पाहातच ते मोठे होत असतात . ते जेव्हा जंगलांविषयीच्या गोष्टी सांगत असतात तेव्हा त्यांच्या बोलण्यातून व त्यापेक्षाही अधिक त्यांच्या हावभावांमधून वन्यजीवनाविषयीचे त्यांचे प्रेम/जिव्हाळा स्पष्टपणे दिसून येतो. ती तरुण गाईड विरा,जुनाबाई या वाघिणींविषयी बोलताना त्या जणू तिच्या बहिणी असाव्यात व त्यांना पाहिल्यावर तिला कसा आनंद होतो हे सांगत होती. एक गावकरी म्हणून त्यांचा वाघांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हेदेखील ती सांगत होती कारण वाघांसाठी माणसांनी आखलेल्या सीमारेषा बंधनकारक नसतात व ते त्या तथाकथित अभयारण्याच्या बाहेरही दिसू शकतात. तरुण पिढी वन्यजीवन क्षेत्रात आपले करिअर घडविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहे हे पाहणे अतिशय आशादायक आहे, विशेषतः एका महिलेसाठी हे काम अतिशय खडतर असते. पहाटेस संपूर्ण घर गाढ झोपलेले असताना तुम्हाला सकाळच्या सफारीसाठी घरातून बाहेर पडावे लागते,परंतु म्हणून स्वयंपाक,रात्रीच्या जेवणाची भांडी धुणे यासारख्या घरगुती कामातून सुटका नसते.त्याचप्रमाणे,जंगलामध्ये नियामित अंतराने प्रसाधनगृहे बांधण्याची वेळ आली आहे,कारण हिवाळ्यामध्ये सकाळच्या वेळी नैसर्गिक विधींसाठी जास्त वेळा जावे लागणे स्वाभाविक असते.अशावेळी यासंदर्भात काहीच पावले न उचलण्याइतपत आपली यंत्रणा इतकी असंवेदनशील कशी असू शकते असा प्रश्न मला पडतो.जवळपास कुठेतरी वाघ दिसला असेल व अशावेळी एखाद्या महिलेला किंवा वृद्ध व्यक्तीला बाथरूमसाठी प्रसाधनगृहात जायचे असेल तर त्यासाठी संपूर्ण जिप्सी दहा किलोमीटर मागे प्रवेशद्वारापाशी नेऊ शकत नाही. लोकांना वाघ पाहण्यासाठी एका सफारीसाठी भरपूर पैसे मोजावे लागतात (त्यात काहीच चूक नाही) आणि तुम्ही नैसर्गिक विधी रोखू शकत नाही,अशावेळी तुम्ही जंगलांमध्ये योग्य जागी प्रसाधनगृहे उपलब्ध करून देऊ शकत नाही म्हणून तुमची वाघ पाहण्याची संधी हुकता कामा नये. सर्व पर्यटकांनी वन्यजीवन पर्यटनाच्या या पैलूसंदर्भात माननीय पंतप्रधान, माननीय राष्ट्रीय किंवा माननीय सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहीण्याची वेळ आली आहे.आता अनेक महिला गाईड म्हणून काम करत असताना तरी आपण त्यांच्या सोयीचा विचार केला पाहिजे. परंतु जी यंत्रणा (म्हणजे सरकार) पुण्यासारख्या शहरामध्ये महिलांना स्वच्छ प्रसाधनगृह उपलब्ध करून देऊ शकत नाही तिथे ताडोबाच्या जंगलांसारख्या दुर्गम ठिकाणी आपण काय अपेक्षा करणार हेदेखील खरे आहे,तरीही योग्य गोष्टींसाठी लढत राहणे एवढेच आपल्या हातात आहे,नाही का? आपल्या जंगलांभोवतालच्या गावांमध्ये सार्वजनिक प्रसाधनगृहांची समस्या अतिशय गंभीर आहे,ज्याविषयी वारंवार आवाज उठवतो.सर्व गावांच्या प्रवेशद्वारापाशीच “हागणदारीमुक्त गाव” अशा पाट्या लावलेल्या असतात.म्हणजेच या गावांमध्ये कुणीही नैसर्गिक विधींसाठी उघड्यावर जात नाही, असे मानले जाते 
    प्रत्यक्षात मात्र भल्या पहाटे अभयारण्याच्या प्रवेशद्वारापर्यंत तुम्हाला कारच्या हेडलाईटपासून निसर्गविधीसाठी लपतछपत जाणाऱ्या अनेक महिला दिसतात.लोकहो आपण २०२३ या वर्षात आहोत व आपण चंद्रावर यान पाठवले आहे,परंतु आपण आपल्या देशातील महिलांसाठी स्वछतागृहे बांधू शकत नाही आणि बांधलेली नीट वापरु शकत नाही, आपल्यासाठी ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे. त्याचवेळी माणूस-प्राण्यांमधील संघर्षाचे ते एक मुख्य कारण आहे.पहाटेची ही वेळ वाघ व बिबट्यासारख्या प्राण्यांसाठी शिकारीची असते व या महिला अशा वन्य प्राण्यांच्या हल्ल्याला बळी  पडू शकतात!
      या  शिवाय, महिलांविषयी व वन्यजीवनामध्ये करिअर घडविण्यासाठी धोका पत्करायची त्यांची तयारी असते त्याविषयी बोलायचे तर ; आम्ही एका पाणवठ्यापाशी वाट पाहात होतो,तिथे केवळ आमचीच जिप्सी होती व जवळपास झुडुपांमध्ये एक वाघीण झोपली असल्याची आम्हाला जाणीव होती. तेवढ्यातच ती वाघीण झोपेतून उठली व बाहेर झुडुपामधून बाहेर पडण्यासाठी सज्ज झाली होती. त्याचवेळी वन विभागाचे एक वाहन पाणवठ्यावर आले व त्यातून एक महिला शास्त्रज्ञ तेथील कॅमेऱ्याचे ट्रॅप मेमरी कार्ड बदलण्यासाठी खाली उतरली, त्या ठिकाणाहून काही पावलांवर वाघीण असल्याची तिला जाणीव नव्हती. आम्ही तिला तिथे वाघीण असल्याचा इशारा दिला, ती घाईने जाऊन कारमध्ये बसली. लोकहो, तुम्ही तुमच्या घरांमध्ये आरामात (व सुरक्षितपणे) बसून हे वाचताय, अशावेळी किती तणावपूर्ण स्थिती असते याची तुम्हाला कल्पना येणार नाही.म्हणूनच आपल्या वन्यजीवनाचा आनंद उपभोगता यावा यासाठी त्याचे किंवा तिचे आयुष्य धोक्यात घालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्यापरीने मदत करण्याचा प्रयत्न करा.
     वाघ दिसण्याविषयी बोलायचे तर (आपण हा पैलू कसा विसरू शकतो ), ताडोबामध्ये मी नेहमीच नशीबवान ठरलो आहे व हा दौराही त्याला अपवाद नव्हता, अगदी वाघापासून ते अस्वलापर्यंत तसेच झाडावरील मुंगूस, अशी अनेक अद्भूत दृश्ये पाहायला मिळाली,ती प्रत्यक्षात अनुभवलीच पाहिजेत, कारण कोणतेही छायाचित्र तुम्हाला संपूर्ण गोष्ट सांगू शकत नाही, तरीही मी काही छायाचित्रे काढली. एक विशेष छायाचित्र म्हणजे इतर प्राण्यांच्या वाघाच्या  अस्तित्वाची इशारे देणाऱ्या चित्कारांची वाट पाहताना, आमच्या गाईडला जवळपासच्या झाडावर काही हालचाल जाणवली व आश्चर्य म्हणजे एक करड्या रंगाचे मुंगूस झाडावर चढत होते, ते अतिशय विशेष छायाचित्र होते. मुंगूस पक्ष्यांची अंडी चोरण्यात पटाईत असतात व ते झाडांवर चढू शकतात हे मला माहिती होते परंतु आत्तापर्यंत हे दृश्य प्रत्यक्ष पाहण्याचा योग कधीही आला नव्हता, जो यावेळी आला. मला या मुंगसाची काही चांगली छायाचित्रेही काढता आली, आमचा चालक मात्र जेथून प्राण्यांचे इशारा देणारे चित्कार ऐकू येत होते त्या दिशेने जाण्याची घाई करत होता. मित्रांनो, आपल्या  सगळ्यांना वाघ पाहायला अतिशय आवडतो, परंतु जंगल अनेक अद्भूत गोष्टींनी भरलेले आहे, तुम्ही वाघाच्या शोधात असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका !

 कोलारा-मदनापूरची राणी  बद्दल थोडे ! 
   तिच्या जवळपास असलेल्या वाघिणींच्या तुलनेत तिची अंगयष्टी धिप्पाड नाही तसेच ती दिसायलाही आकर्षक नाही, त्यामुळे तिला माया, तारा किंवा सोनम या तिच्या शेजारणींच्या एवढी लोकप्रियता (जी खरेतर तिला मिळायला हवी) मिळाली नाही, तरीही गेल्या  सहा वर्षांपासून मदनापूर-कोलारा बफर क्षेत्रात तिचा दबदबा कायम आहे व तिच्यामुळे शेकडो कुटुंबांना इथे उपजीविका मिळाली आहे, ती आहे जुनाबाई. नावाची काही तिचा वावरच अतिशय सुंदर आणि देखणा आहे, जुनाबाई व अशाच इतर वाघांमुळे ताडोबाचे बफर क्षेत्र केवळ वन्यजीवप्रेमींमध्येच नव्हे तर पर्यटकांमध्येही प्रसिद्ध आहे; यामुळेच इथले रहिवासी वाघांवर प्रेम करतात व गावकऱ्यांच्या कुटुंबाचाच भाग असल्याप्रमाणे  त्यांची काळजी घेतात. ताडोबातील वाघ व आजूबाजूच्या परिसरात राहणारी माणसे यांच्यामध्ये एक अतिशय सुंदर नाते आहे, म्हणूनच ताडोबा हे जणु वाघांचा स्वर्ग आहे व आपण हा स्वर्ग जिवंतपणा अनुभवु  शकतो म्हणूनच आपण अतिशय नशीबवान आहोत !

माझ्या अलिकडच्या ताडोबा सफारीचे काही जादुई क्षण खालील लिंकवर पाहू शकता
 
https://www.flickr.com/photos/65629150@N06/albums/72177720312327429


संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स  

smd156812@gmail.com












 

No comments:

Post a Comment