Tuesday 16 January 2024


हवा प्रदुषण, मृत वाघ आणि 2024  सालाचे स्वागत !














हवा प्रदुषण, मृत वाघ आणि 2024  सालाचे स्वागत !


“मला हे कळलं आहे की, तुम्ही जे काही बोललात ते लोक विसरतील, तुम्ही जे वागलात ते सुद्धा लोक विसरतात, परंतु तुमच्या वागण्यामुळे त्यांना कसे वाटले हे ते कधीही विसरत नाहीत”… माया ॲग्नेलु

    माया म्हणजे अमेरिकेने जगाला भेट दिलेले अजुन एक हरहुन्नरी व्यक्तीमत्व, त्या एक लेखिका, अभिनेत्री, समानता जागरुकता निर्माण करणाऱ्या वक्त्या व आणखी बरेच काही होत्या, परंतु त्याहीपेक्षा त्या एक विचारवंत आणि उत्तम व्यक्ती होत्या. माझ्या २०२४ या नवीन वर्षाच्या पहिल्या लेखाची सुरुवात करण्यासाठी, त्यांच्या वरील शब्दांचा उत्तम आधार मिळाला. अर्थात या लेखाच्या शीर्षकाद्वारे तुम्हाला हवी तशी उत्साही आशादायक सुरुवात होत नसली तरीही, २०२३ मध्ये आपल्याला हेच मिळाले आहे व तुम्ही भूतकाळ (किंवा इतिहास) बदलू शकत नाही, तुम्ही एकतर त्यातून शिकू शकता किंवा तो अडगळीत टाकुन देऊ शकता ज्यामुळे तुमचे भविष्य हमखास नष्ट होईल हे मी शिकलो आहे व मायादेखील हे जाणून होत्या. परंतु दुर्दैवानेआपण, म्हणजे जनतेने” (मी जाणीवपूर्वक सरकार किंवा तत्सम शब्द वापरलेला नाही) आपल्या भूतकाळातून धडा घेतलेला नाही ही वस्तुस्थिती आहे)गंमत म्हणजे बहुतेक पुरुषांमध्ये (म्हणझे पुरुष व महिलांमध्ये) मी पाहिले आहे की, जेव्हा एखादा पुरुष यशस्वी होतो तेव्हा त्याच्या यशाचे श्रेय तो त्याची मेहनत, ज्ञान, बुद्धिमत्ता, स्वतःचा दृष्टिकोन इत्यादी गोष्टींना देतो, परंतु जेव्हा एखादा पुरुष जेव्हा अपयशी होतो तेव्हा तो त्याचा दोष शक्य त्या सर्व व्यक्तींना किंवा आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला देतो व कुणालाही दोष देणे शक्य नसेल तर मग ते त्याचे कम नशीब असते. २०२३ या वर्षाच्या बाबतीतही असेच झाले आहे, आता तुम्ही गोंधळून गेला असाल तर मी तुम्हाला समजावून सांगतो, गेल्यावर्षी वाघांची संख्या जवळपास ३५०० हून अधिक झाली व जगभरातील वाघांच्या एकूण संख्येपैकी जवळपास ७५% वाघ भारतातच आहेत. त्यानंतर आपण आपल्या सरकारने (व सगळ्यांनी) पर्यावरणाच्या आघाडीवर घेतलेले अनेक पुढाकार व आपणही त्यासाठी किती प्रयत्न करत आहोत हे दाखवून दिले; आपली लोकसंख्या १५० कोटींच्या पुढे गेली आहे व लवकरच आपण त्या बाबतीतही चीनला मागे टाकू.

      वाघांची वाढती संख्या ही अतिशय उत्तम गोष्ट आहे कारण जंगलामध्ये वाघ जिवंत ठेवण्यासाठी संपूर्ण यंत्रणेला प्रयत्न करावे लागतात व ते सुदृढ वन्यजीवनाचे लक्षण आहे. त्याचवेळी, आपल्या देशाने जागतिक पातळीवर पर्यावरणाच्या (म्हणजे निसर्गाच्या) संवर्धनासाठी उचललेली अनेक पावले अतिशय अभिमानास्पद आहेत, कारण त्यातून एकूणच पर्यावरणाच्या संवर्धनाविषयी आपला चांगला हेतू व काळजी घेण्याचा दृष्टिकोन दिसून येतो. त्याचप्रमाणे आपली वाढती लोकसंख्या ज्याविषयी आपले माननीय नेते (सगळेच) नेहमी अभिमानाने बोलतात की यामध्ये पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत तरूण लोकसंख्येची टक्केवारी अधिक आहे, तसेच जगण्याचे (दीर्घकाळ जगण्याचे) सरासरी वय जवळपास सत्तर वर्षांपर्यंत पोहोचले आहे, हे निरोगी भारताचे चांगले लक्षण आहे. आपण या सगळ्या गोष्टी साजऱ्या केल्या पाहिजेत व २०२३ सालची कामगिरी म्हणून त्याविषयी आनंद व्यक्त केला पाहिजे. अजूनही अशा बऱ्याच बाबी आहेत, पण हा पणच माझ्या लेखाचा गाभा आहे (नेहमीप्रमाणे) कारण तुम्ही आपल्या कामगिरीविषयी आनंदात असाल तर या तथ्यांवरही एक नजर टाका. २०२३ या वर्षामध्ये देशभरात वाघांचे सर्वाधिक म्हणजे दोनशेहून अधिक (पाच मृत्यू २०२३च्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झाले आहेत) मृत्यू झाले व ही वाघांच्या मृत्यूची नोंदविण्यात आलेली संख्या आहे, हरवलेल्या (जसे की ताडोबातील माया वाघीण) वाघांना यामध्ये मोजण्यात आलेले नाही. त्यानंतर पर्यावरणाच्या आघाडीवर, जगातील सर्वात प्रदूषित हवा असलेल्या पहिल्या दहा शहरांच्या यादीमध्ये आपल्या देशातील जवळपास पाच शहरांचा समावेश होता, यामध्ये आपल्या देशाच्या राजधानी दिल्लीचा सर्वात वरती क्रमांक लागतो. विकसनशील देशांमध्ये आपल्या नद्या सर्वाधिक प्रदूषित आहेत व त्यानंतर आपल्या पुणे शहराला चांगल्या हवामानाचा अभिमान वाटायचा परंतु आता पुण्याच्या मध्यवर्ती भागांमध्ये शहरातील रस्त्यांवरून फिरताना नागरिकांना मास्क वापरावा लागतो, असा इथल्या हवेचा दर्जा झाला आहे. पुण्यामध्ये ४७ लाखांहून अधिक खाजगी वाहने आहेत व जवळपास १० लाख अशी वाहने आहेत की जी शहरामध्ये आहेत परंतु त्यांची नोंदणी शहराबाहेर झालेली आहे. म्हणजे केवळ पुण्यातल्याच (पुणे महानगरपालिका फक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रदेशातल्याही नाही) खाजगी वाहनांची एकूण संख्या पन्नास लाखांच्या वर आहे. ही वाहने दररोज किती सीओ (कार्बन मोनॉक्साडचे) उत्सर्जित करत असतील याचा विचार करा. त्यानंतर लोकसंख्येविषयी बोलताना, तथाकथित तरूण वर्ग बेरोजगार आहे व नोकऱ्यांविषयी प्रत्येक वर्गात उद्विग्नता दिसून येते व म्हणूनच सगळ्या वर्गांमधुन सरकारी शिक्षण संस्था किंवा नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी केली जाण्याचे हेच मुख्य कारण आहे.

     मी तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात नकारात्मक गोष्टीने केली असेल तर माफ करा, परंतु मी असे का केले, कारण वस्तुस्थिती कितीही कटू असली तरीही तुम्ही जोपर्यंत तथ्य स्वीकारत नाही, तोपर्यंत तुम्हाला ती बदलता येऊ शकत नाही, बरोबर? जर आपण व्याघ्र प्रकल्पाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत असू तर आपण पुढे काय असा विचार केला पाहिजे कारण वाघांची संख्या वाढणे ही एक गोष्ट आहे व त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे ही दुसरी गोष्ट आहे, याच कारणामुळे वाघांची संख्या वाढली तरीही मरण पावलेल्या वाघांची संख्याही वाढली आहे. आपल्या सातत्याने वाढत्या मानवी लोकसंख्येमुळे केवळ वाघांच्या संख्येवरच परिणाम होत नसून एकूणच पर्यावरणालाच धोका निर्माण झाला आहे. या नवीन वर्षात आपण त्याकडे लक्ष दिले पाहिजे व या पैलूसंदर्भात काहीतरी केले पाहिजे ज्याविषयी सर्वजण मौन बाळगून आहेत, हा माझ्या लेखाचा मुद्दा आहे. वाघांची संख्या (व त्यांचे मृत्यू) हा प्रत्यक्षात वन्यजीवनाचा निर्देशांक असतो व माणसांमुळे दररोज केवळ वाघांनाच नव्हे तर बिबटे, हरिण, गेंडे व हत्ती व अशा सर्व प्रजातींना प्रचंड धोका निर्माण झाला आहे. कारण आपण अक्षरशः त्यांच्या वाट्याचे अन्न खात आहोत, त्यांचे पाणी पीत आहोत व आपल्या गरजांसाठी (म्हणजे हव्यासासाठी) त्यांची घरे नष्ट करत आहोत. केवळ वन्यजीवनच नाही, आपल्या १५० कोटींहून अधिक जनतेसाठी जगण्यासाठी जागा हवी आहे, म्हणून आपण आपल्या नद्या, तलाव, टेकड्या, समुद्राचा विनाश करत आहोत. आपण एका मोठ्या तथ्याकडे दुर्लक्ष करत आहोत ते म्हणजे, आपण धान्य उत्पादनासाठी आवश्यक असलेली शेतजमीनही कमी करत आहोत. २०२३ या वर्षात सर्वाधिक नैसर्गिक आपत्ती झाल्याचे दिसून आले, यामध्ये भूस्खलन, पूर, अतिवृष्टी, किंवा अनावृष्टी व यामुळे संपूर्ण जीवन चक्र प्रभावित झाले आहे, हे केवळ नैसर्गिक नाही, याचा स्वीकार करा. आपल्या सातत्याने वाढत्या लोकसंख्येमुळे, ज्याप्रमाणे वाघांचे हद्दीरून वाद होतात त्याचप्रमाणे माणसांमध्येही हद्दींवरून भांडणे सुरू झाली आहेत जो धोक्याचा इशारा आहे जो २०२३ या वर्षाने आम्हाला दिला होता कारण नोकऱ्या किंवा शिक्षणासाठी जातीच्या आधारे आरक्षणावरून जे काही वाद सुरू आहेत ते माणसांमध्ये वाघा प्रमाणेच हद्दीवरून होणाऱ्या वादांसारखेच आहेत, नाही काएकीकडे आपण गोंगाट व वायू प्रदूषणासाठी मास्क वापरतो तर दुसरीकडे आपण नवीन वर्षाचे स्वागत ध्वनीक्षेपक, लेझरचे लाईटचे कार्यक्रम व फटाके उडवून म्हणजेत  प्रदुषणात भर टाकुन करतो, आपण कशाप्रकारचा समाज आहोत, असा प्रश्न मला नेहमी पडतो !

     अर्थात सर्व काही एवढे वाईट नाही, वर्ष संपताना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दोन बातम्यांनी माझे लक्ष वेधून घेतले, त्या आशेच्या किरणासारख्या होत्या, पहिली बातमी डीआरडीओविषयी (आपल्या संरक्षण मंत्रालयाचा संशोधन विभाग) होती, ज्यामध्ये त्यांनी रिडले जातीच्या कासवांच्या वार्षिक प्रजनन काळामध्ये (अंडी घालण्याच्या काळामध्ये) ओरिसा राज्यातील समुद्र किनाऱ्याजवळ क्षेपणास्त्रांची चाचणी थांबवली असे नमूद करण्यात आले होते. दुसऱ्या बातमीमध्ये, ताम्हणी घाटामध्ये (पुण्याजवळ) एका अपघातामध्ये, एका वळणावर एक जंगली ससा अचानक कारसमोर आल्याने त्याला वाचवताना ती उलटून अपघात झाला. दोन्ही बातम्यांमध्ये आपला उद्देश व आपण निवडलेला मार्ग दिसून येतो, तसेच एक देश म्हणून तसेच एक व्यक्ती म्हणून निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी आपण काय करू शकतो हे दिसून येते, जे आपल्या भविष्यासारखे आहे. मला अपघातातील कार चालकाविषयी पूर्णपणे सहानुभूती आहे ज्याला सुदैवाने काहीही इजा झाली नाही, तरीही जंगलातून तुम्हाला इतक्या भरधाव वेगाने गाडी चालवण्याची काय गरज आहे हा मुद्दा माझ्या दृष्टीने पुढचा विचार म्हणुन येतो, मात्र आधी त्याने किमान सश्यासारख्या लहान प्राण्याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न तरी केला, ते देखील माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. आपल्याला २०२४ हे वर्ष केवळ काही सुदैवी व्यक्तींसाठीच नव्हे तर सर्वांसाठी चांगले असावे असे वाटत असल तर आपण अशाच प्रकारचा दृष्टिकोन दाखवला पाहिजे.

    मित्रांनो, लक्षात ठेवा, नवीन वर्षामुळे केवळ कॅलेंडरवरची तारीख वगळता आपल्या आयुष्यात काहीही बदल होत नाही, आपण आपल्या बाजूने त्या बदलाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला तर आपणच तो बदल घडवून आणू शकतो. त्यासाठी, प्रत्येक व्यक्तीने उचललेले एक छोटेसे पाऊल पुरेसे असते, उदाहरणार्थ वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे, यावर्षी किमान एक तरी झाड लावणे व ते जगवणे, आपला कचरा उघड्यावर किंवा नदीमध्ये न टाकणे, व सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या भोवती घडणाऱ्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीविरुद्ध शक्य त्या सर्व मार्गांनी तुमचा आवाज उठवणे, मला असे वाटते या उद्देशाने एक प्रतिज्ञा केली तर नवीन वर्ष खऱ्या अर्थाने साजरे होईल व ते समाजासाठी अधिक चांगले होईल, एवढे बोलून निरोप घेतो!



संजय देशपांडे

smd156812@gmail.com



















 

No comments:

Post a Comment