Tuesday 16 January 2024


नाजुक नात्याची जबाबदारी स्वीकारतांना !













नाजुक नात्याची जबाबदारी स्वीकारतांना !


२५ डिसें २३

एका स्त्रीशी विवाह करणे ही सर्वात मोठी जबाबदारी आहे जी एक पुरुष स्वेच्छेने स्वीकारतो मी.

 प्रिय दादा,

    माझा मुलगा म्हणून आज मी तुला शेवटचे लिहीतो आहे कारण उद्यापासून तू फक्त माझा मुलगा राहाणार नाहीस, अर्थात माझ्यासाठी मुलगा, दादा वगैरे राहशीलच पण आता केवळ एक मुलगा असणार नाहीस, म्हणूनच हा दिवस विशेष आहे व माझे आजचे शब्दही. मला असे वाटते लग्न ही सर्वात मोठी जबाबदारी आहे कारण प्रत्येक पुरुष एखाद्या महिलेचा मुलगा असतो, अनेक पुरुष कोणा कोठल्या तरी स्त्रीचे भाऊ, दीर, मेव्हणे, सख्खे, चुलत, आत्ते, मामे भाऊ असतात. परंतु पुरुषाला ही सर्व नाती जन्मतःच मिळतात, तो ही नाती नाकारू शकत नाही किंवा फेटाळू शकत नाही. खरे तर प्रत्येक नाते ही एक जबाबदारीच असते, केवळ तुम्ही नाते या शब्दाचा अर्थ समजून घेतला तर. परंतु एका स्त्रीशी लग्न करणे हा पूर्णपणे त्या पुरुषाचा स्वतःचा निर्णय असतो. म्हणूनच ही जबाबदारी तो आपणहून स्वीकारतो असे मी म्हटले. ही जबाबदारी तुम्ही स्वतःसाठी स्वीकारलेली असते व पुरुष म्हणून तुम्हाला ही जबाबदारी नेहमी पार पाडावी लागेल असेही मला तुला सांगावेसे वाटते. दादा, रक्ताची नातीही तुटतात किंवा लोक दुरावतात किंवा त्यांच्या नात्यातील जबाबदारीकडे पाठ करतात कारण ती आपणहून स्वीकारलेली नसते, एखादा पुरुष (म्हणजे भित्रा) हे अतिशय सोपे कारण देऊ शकतो, परंतु लग्नाच्या बाबतीत असे करता येत नाही. इथे तुम्ही अशा एका स्त्रीचा हात हातात घेता जिचा जन्म तुमच्या कुटुंबामध्ये झालेला नसतो, तुमची ओळखही अगदी नवीन असते व ती केवळ तुम्ही तिचा हात घट्ट धरून ठेवला आहे या भरवशावर तिचे घर, कुटुंब, मायेची माणसे सोडून आलेली असते. म्हणूनच तुम्ही नेहमी तिच्यासोबत असाल असा विश्वास तिला देणे ही एका पुरुषासाठी सर्वात मोठी जबाबदारी असते.

     मला माहिती आहे की, नव्या पिढीतल्या (आजच्या युगातील) मुलांना हे कदाचित वायफळ किंवा मूर्खपणाचे वाटेल परंतु एक लक्षात ठेव, जुने विचार व त्यामागचे तत्वज्ञान नेहमी टिकून राहते व हे सिद्ध झालेले आहे. मी इथे लिंगभेद करत नाही व महिलांच्या क्षमतेचा पूर्णपणे आदर करतो तरीही किती पुरुष त्यांचे घर सोडून लग्नानंतर बायकोच्या घरी राहायला जातात. किंवा त्यांच्यापैकी कितीजण त्यांचे अडनाव बदलतात व त्यांच्या डनावाऐवजी बायकोचे माहेरचे अडनाव वापरतात, लग्नानंतर नाव बदलले म्हणून किती पुरुषांना नवीन पारपत्र, पॅनकार्ड, चालक परवान्यासाठी अर्ज करायला आवडेल किंवा किती पुरुषांमध्ये लग्नानंतर त्यांचे घर बदलले म्हणून त्यांची नोकरी सोडण्याची किंवा नोकरीमध्ये बदलीसाठी विनंती करण्याची हिंमत आहे, ही यादी अतिशय मोठी आहे. या यादीमधील बाबींपेक्षाही महिलांना आपल्या नवऱ्याचा हात धरण्यासाठी अतिशय मोठा त्याग करावा लागतो व मी खरोखरच सांगतो की फारसे पुरुष हे करू शकणार नाहीत व तुम्ही त्या त्यागाचा आदर केला पाहिजे. दादा, आज कुटुंब चालवताना तुला सल्ला देण्यासाठी तुझी आई सोबत नाही व तो देण्यासाठी मीदेखील काही आदर्श नाही, परंतु मी भोवताली व आपल्या घरी, तसेच माझ्या आई-वडिलांसोबत जे काही पाहिले आहे, त्याचप्रमाणे सुदैवाने मला मित्रांकडूनही थोडे शहाणपण मिळाले आहे. म्हणूनच मी लग्न, कुटुंब (म्हणजे संसार) व तुला ज्या जबाबदाऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे त्याविषयी माझी मते व्यक्त करत आहे. व्यवस्थापन, व्यवसाय, यश व सारख्या विषयांवर बरीच पुस्तके आहेत, परंतु एक यशस्वी गृहस्थ कसे व्हायचे याविषयी कोणतही पुस्तके नाहीत, कारण यातील यशाचे मोजमाप कोणत्याही पट्टीने करता येत नाही, हेच अनेक लोक समजून घेण्यास विसरतात. त्याऐवजी, मनाने स्वस्थ होण्याचा प्रयत्न करणे हाच यशस्वी गृहस्थ होण्याचा राजमार्ग आहे व तुम्ही जेव्हा तुमच्या पत्नीचा इतर कशाहीपेक्षा, सर्वाधिक आदर करता तेव्हाच हे शक्य होते. मी म्हणेन की तुम्ही स्वतःपेक्षाही पत्नीचा जास्त आदर करा, कारण हा तिचा हक्क आहे, तुम्ही तिचा आदर करून तिच्यावर उपकार करत नसता या वस्तुस्थितीचा आधी स्वीकार करा. केवळ एखादा पुरुष एखाद्या स्त्रीचा ती जी काही आहे त्यासाठी आदर करत असेल तरच तो स्वतःला पुरुष म्हणवण्यासाठी पात्र आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. मी हे शिकलोय की एखादी स्त्री अख्ख्या जगाकडून दुखावले जाणे, अपमान सहन करू शकते परंतु दोन पुरुषांकडून अपमान कधीच स्विकारु शकत नाही; एक म्हणजे तिचा नवरा व दुसरा म्हणजे तिला मुलगा, माझे हे शब्द कधीही विसरू नकोस. मी तुझ्या आईसाठी अगदी आदर्श नवरा नव्हतो परंतु मी प्रयत्न केला हे मी सांगू शकतो व मी तुझ्याकडूनही हीच अपेक्षा करतो. ही जबाबदारी समाधानाने निभावण्याचा हाच एक खात्रीशीर मार्ग आहे, कारण तू अपयशी झालास तरीही तू शंभर टक्के प्रयत्न केलेस हे समाधान असेल, हा देखील याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. आता जबाबदाऱ्या कशा हाताळायच्या हे शिकताना, एक लक्षात ठेव कोणतेही नाते महागड्या भेटवस्तू किंवा सर्व सुखसोयींनीयुक्त सुट्ट्यांमुळे जिवंत राहात नाही (अर्थात तुमच्या पिढीसाठी तेदेखील आवश्यक आहे !), तर लहान-सहान गोष्टींमुळे राहाते, त्यासाठी तुला तुझ्या जोडीदाराच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागेल. तिने तुझ्यापर्यंत पोहोचावे अशी कधीही अपेक्षा करू नकोस, त्यासाठी तुला काही पायऱ्या खाली उतराव्या लागल्या तरीही त्यात लाज वाटण्यासारखे काहीही नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुला जे काही वाटते ते मनमोकळेपणाने व योग्य प्रकारे बोल, हेच महत्त्वाचे आहे.

    दादा, अनेक वर्षांपूर्वी तुम्ही लहान होता, तेव्हा आम्ही आमच्या मित्रांना जेवायला घरी बोलायचो, आमच्या जनसंपर्काचा भाग म्हणूनही काही मंडळी घरी जेवायला असायची. तेव्हा तुझी आईच स्वयंपाक करायची. तेव्हा आपल्याला कामासाठी पूर्णवेळ बाई ठेवणे परवडण्यासारखे नव्हते. पाहुण्यांची जेवणे होऊन, ते निघेपर्यंत बरेचदा आईला उशीरापर्यंत जागे राहावे लागत असे. एका रात्री, पेयपानानंतर, एक मित्र म्हणाला (अतिशय ज्येष्ठ अधिकारी) त्याचे स्नॅक्सनीच  पोट भरले असल्याने तो जेवू शकणार नाही. हे ऐकून दुसरा एक मित्र जोदेखील पदाने तसेच वयानेही ज्येष्ठ अधिकारी होता त्याला रागावला व म्हणाला की तुला जेवावेच लागेल, कारण घरातल्या गृहिणीने आपल्याकरता रांधण्यासाठी इतके कष्ट घेतले आहेत व आता न जेवणे म्हणजे तिचा अपमान केल्यासारखे होईल. ते शब्द मी अजूनही लक्षात ठेवले आहेत, त्यादिवसापासून मी नेहमी एक नियम केला आहे की मी दुपारी किंवा रात्री घरी जेवायला नसलो तर घरी वेळेत कळवायचे. तसेच मी जेव्हा घरी असतो तेव्हा माझ्यासाठी जो काही स्वयंपाक करून ठेवला असेल ते मी खाण्यास मी शिकलो आहे, आधी तो तुझ्या आईने बनवलेला असायचा, आता माझ्या आईने बनवलेला असतो. ही अतिशय लहान गोष्ट आहे पण यामुळे घरातल्या गृहिणीला अतिशय आनंद होतो, तुझा माझ्यावर विश्वास नसेल तुझ्या आजीला विचार.

    अन्नाविषयी आणखी एक गोष्ट म्हणजे, मी माझ्या आईने जेवणाच्या चवीकरता घरी माझ्या बाबांचे टोमणे खातांना अनुभवले आहे (मी अनेक महिलांना त्यांच्या घरांमध्ये त्यांच्या स्वयंपाकाच्या कौशल्यावरून त्यांचा अपमान होताना पाहिले आहे) व मी एक गोष्ट स्वतःसाठीतरी ठरवली आहे ती म्हणजे, तुमच्या ताटात वाढलेल्या अन्नाला कधीही नावे ठेवू का, मग ते तुमच्या घरात असो किंवा इतरत्र कुठेही. एकदा दुपारी आपल्या घरी जेवताना आमटी अळणी होती, मी तुझ्या आईला त्याविषयी काहीही न बोलता जेवलो. नंतर ती जेवायला बसली तेव्हा तिच्या हे लक्षाते आले व तिने मला आमटी अळणी असल्याचे माझ्या लक्षात आले नाही का असे विचारले. त्यावर मी उत्तर दिले, मी सुद्धा कामाच्या ठिकाणी अनेक गोष्टी विसरतो व विसरण्यासाठी बोलणीही खातो, तेव्हा किती वाईट वाटते हे मला माहिती आहे, त्यामुळे मी तक्रार केली नाही. अर्थात म्हणून मी सर्वोत्तम किंवा सर्वात यशस्वी पती होतो असा अर्थ होत नाही, परंतु तू नेहमी या सूचनावरून अधिक चांगले होण्याचा प्रयत्न करू शकतोस, एवढेच मी म्हणेन. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे खोटी स्तुती करू नकोस, परंतु तू बायकोचे प्रयत्न जाणतोस व त्याचा आदर करतोस याची तिला जाणीव करून दे, एखाद्या नात्याचा हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे.

सरतेशेवटी, पाच मुद्दे, जरा जास्त होतील परंतु तुझ्या आगामी जबाबदारीसंदर्भात माझी मतं म्हणुन सांगतोय …

. तुझ्या अहंकारापेक्षाही तुझ्या बायकोचा जास्त आदर कर, कधीही म्हणजे अगदी तुझ्या जिवलग मित्राकडेही        अथवा विनोदाच्या ओघातही तिच्याविषयी टीका करू नकोस.

. तू तुझ्या बायकोच्या बाबतीत किंवा घरात एखादी चूक केली हे तुला माहिती असताना कधीही माफी मागण्यास     लाजू नकोस.

. पत्नीच्या अडचणी किंवा गरजा येऊन तुला सांगेल अशी वाट पाहात बसू नकोस, तू पुढाकार घे आणि तिच्या         गरजा काय आहेत हे जाणून घे.

. पत्नीच्या कामगिरीसाठी तिला प्रोत्साहन दे, तिचा प्रशिक्षक होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तिचा सहाय्यक हो.

. तू जेव्हा दमलेला - भागलेला किंवा निराश असशील, तेव्हा तुला पुन्हा उभारी मिळावी यासाठी तिची मदत           मागायला संकोच करू नकोस, ती नेहमी तुझ्यासोबत असेल. 

मी म्हटल्याप्रमाणे, पत्नीची जबाबदारी घेणे म्हणजे काय याविषयी मला हे समजले आहे, माझ्या हे कदाचित उशीरा लक्षात आले परंतु तुझ्यापुढे संपूर्ण आयुष्य उरलेले आहे, म्हणून तू या अनुभवातून शिकून अधिक चांगल्याप्रकारे वापर करू शकतो तुझे वैवाहिक आयुष्य समाधानी व जबाबदार असावे याच शुभेच्छा व तुझ्या आईनेही अशाच शुभेच्छा दिल्या असत्या!

 

बाबा (व आई जेथे असेल तेथून)


 

संजय देशपांडे

smd156812@gmail.com
























No comments:

Post a Comment