Wednesday 3 January 2024


बांधकाम स्थळीचे अपघात टाळतांना, भाग 2












बांधकाम स्थळीचे अपघात टाळतांना, भाग 2


तुम्ही जेव्हा बांधकामस्थळी होणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेच्या सर्व संभाव्य शक्यतांचा विचार करता व त्यानुसार त्या टाळण्यासाठी तरतूद करता व त्यानंतरही दुर्घटना घडते व कुणाचा तरी जीव जातो, तेव्हा त्याला मी अपघात असे म्हणतो”… मी.

     मित्रांनोवरील अवतरण हे प्रत्यक्ष एक अवतरण नाही तर तुम्हाला एक विचार प्रक्रिया सांगतोय कारण हा लेख बांधकाम स्थळावरील अपघातांविषयी व ते कसे टाळायचे व त्यातून काय शिकायचे याविषयी आहे याचा तुम्ही सहज अंदाज लावू शकता. पुण्यामध्ये एका बांधकामस्थळी नुकत्याच झालेल्या अपघाताच्या कारणांचे विश्लेषण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तथ्य-शोधन समितीच्या चर्चा सत्रामध्ये माझ्या डोक्यात हे शब्द आले. या लेखाचे जे सार आहे त्याचे पालन करण्याचा प्रयत्न करून, नुकतीच जी घटना घडून गेली तिचा अभ्यास करून एक व्यवहार्य यंत्रणा तयार करू ज्यामुळे बांधकामस्थळी अपघात कमी होण्यासाठी (मी थांबवण्यासाठी असे म्हणत नाही) मदत होईल.

   सर्वप्रथम व सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या देशामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी मधील बरीचशी कामे अजूनही प्रामुख्याने माणसांद्वारे केल्या जातात कारण या देशामध्ये मजूर स्वस्त आहेत (दुर्दैवाने,आयुष्यही स्वस्त आहे) व त्याचवेळी त्यांच्यापैकी बरेचजण या प्रकारच्या व्यवसायामध्ये (गवंडी, प्लंबर आणि ईतर) आहेत कारण त्यांना करण्यासारखे दुसरे काहीच नाही व उपजीविका चालविण्यासाठी त्यांना ते सोपे वाटते व ती काही त्यांची मनाःपासुनची निवड नाही. यामुळेच या लोकांना प्रशिक्षित करणे हे एक मोठे आव्हान आहे कारण काही संस्था सोडल्या तर अशाप्रकारच्या कामांचे व्यावसायिकरित्या प्रशिक्षण देणाऱ्या फारशा शाळा किंवा संस्था नाहीत उदाहरणार्थ टाईल्स बसविणे, गवंडीकाम, नळजोडणी, सुतारकाम, किंवा पोलादी तुळया बसविणे व इतरही अनेक बाबींचा यामध्ये समावेश होतो. यामुळे या मजुरांना सुरक्षिततेच्या आघाडीवर प्रशिक्षित करणे अधिक अवघड होते कारण त्यांच्यापैकी बहुतेक निरक्षर असतात व त्यांना त्यांच्या पारंपरिक पद्धतीने काम करण्याची सवय असते ज्यामध्ये सुरक्षितताविषयक प्रशिक्षणाचा समावेश केला जात नाही. त्यानंतर येतो तांत्रीक देखरेखीचा भाग, मी स्वतः स्थापत्य अभियंता असल्यामुळे, खात्रीशीरपणे सांगू शकतो की अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ते तुम्हाला सुरक्षितता हा विषय सखोल शिकवत नाहीत (अगदी वरवरही शिकवत नाहीत) व त्यामुळे बांधकाम उद्योगामध्ये (केवळ रिअल इस्टेट उद्योगामध्ये नव्हे) एक चांगला स्थापत्य अभियंता बांधकामाचे ठिकाण सुरक्षित ठेवण्यात चांगला असेलच असे नाही. बांधकाम स्थळावरील बहुतेक अपघातांच्यामागचे मुख्य कारण म्हणजे, स्थापत्य अभियांत्रिकी शिकवण्यापासून ते कोणतीही इमारत बांधताना कधीही सुरक्षितता हा दर्जासाठी महत्त्वाचा घटक आहे असे मानले गेले नाही. बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षितता साध्य करण्यासाठी आपण हा पैलू लक्षात घेतला पाहिजे.

  कंत्राटदारांसाठी म्हणजे ठेकेदार (मी बांधकामाच्या सगळ्या कामांबाबत बोलतोय) कंत्राट मिळवताना जर तुम्ही खर्चामध्ये सुरक्षिततेसाठीच्या खर्चाचा विचार केला नाही तर तुम्ही मोठी चूक करत आहात कारण केवळ एका अपघातामुळे, त्या कामातून मिळणारा तुमचा नफा तर बुडू शकतो, तसेच तुमचे सर्व आयुष्यही बुडू शकते, त्यामुळे कोणत्याही कंत्राटासाठी निविदा भरताना कृपया ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे तुमच्या उप कंत्राटदारांसोबतचे अटींचे पत्रक किंवा निविदा किंवा कार्यादेश सुरक्षितेतेच्या कलमांनुसार तपासून घ्या व त्यांचे पालन करा.

   सर्वात शेवटचे मालक किंवा बांधकाम व्यावसायिकांसाठी (मी रिअल इस्टेटपुरतेच बोलत आहे),कोणताही अपघात होतो तेव्हा तुमचे मानगुट आधी पकडले जाते व त्यामुळेच मला बांधकामाच्या स्थळी विकासकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाविषयी काहीही वेगळी टिप्पणी करायची गरज भासत नाही!

आता पुन्हा मुळ विषयाकडे वळू,आधी बांधकाम स्थळावरील संभाव्य टप्प्यांची यादी करू जेव्हा अपघात होऊ शकतात व त्यानंतरच आपण ते टाळण्याची सोय करू शकू, बरोबर?

.तुम्ही भूखंड खरेदी करताना

आपल्याला असे वाटते की एका त्या मोकळ्या भूखंडामुळे कसा अपघात होईल, परंतु ते भौगोलिक स्थिती, प्रदेश रचना व भूरचनेवर अवलंबून असते. भूखंडाच्या या सर्व पैलूंचा काळजीपूर्वक अभ्यास करा, तुम्ही भूखंड खरेदी करत असताना कुंपणाची भिंत बांधण्याआधी भूखंडाची स्थिती कशी आहे, तसेच त्याच्या आजूबाजूला कशाप्रकारची कामे सुरू आहेत याची कागदोपत्री नोंद करा, कारण या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. उदाहरणार्थ तुमच्या भूखंडातील किंवा जवळच्या नैसर्गिक जलस्रोताचा मार्ग, भूस्खलन होऊ शकतील असे उतार किंवा पाणी तुंबणारे भाग किंवा खोल भाग, कारण या सर्व बाबी भूखंड रिकामा असतानाही व तुम्ही जेव्हा येथे मजुरांसाठी वस्ती उभारता तेव्हा त्या अपघाताचे कारण होऊ शकतात.

. मजुरांच्या बांधकामावरी वस्तीगृहे !

हा सर्वाधिक दुर्लक्षित व अपघात होण्याचा सर्वात जास्त धोका असलेला भाग असतो, त्याचे ठिकाण, त्याची रचना तसेच त्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य सगळे काही महत्त्वाचे असते. त्यामुळेच या मजुरांसाठी तात्पुरती घरे उभारतांना सर्व प्रकारची काळजी घेऊनच त्या बांधणे आवश्यक आहे आणि नियमीत देखभाल सुद्धा! 

. बांधकामाच्या कुंपणाच्या भिंती

भूखंडाचा आकार तसेच मातीचे थर यानुसार कुंपणाची भिंत घालणे खार्चिक असू शकते, परंतु तुम्ही कुंपणाची भिंत बांधताना पैसे वाचविण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे पुढे तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो, त्यामुळे रचना सल्लागाराच्या सल्ल्यानुसारच ते करा ती केवळ दिसायलाच आकर्षक नव्हे तर मजबूतही असली पाहिजे!

. पाया किंवा तळघरासाठी खोदकाम

बहुतेक अपघात या टप्प्यात होतात व जेव्हा आपल्याला तीस/चाळीस मजली इमारती बांधायच्या असतात तेव्हा आपल्याला जमिनीमध्येही तेवढेच खोल खणावे लागते व तिथेच नेमकी अडचणीची सुरुवात होते. तुम्ही तुमच्या भूखंडामध्ये खोलवर खोदकाम करता तेव्हा सुरक्षिततेची किंवा तेथे काम करणाऱ्या लोकांचीच नव्हे तर त्या भूखंडाला लागून असलेल्या मालमत्तांचीही अत्यंत काळजी घेणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे जर भूजल पातळी जास्त असेल तर ते पाणी काढूनही टाकावे लागते. पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतेक भागात जमीनीच्या सर्वात वरच्या थरात काळी माती असते व तिचे वर्तन अतिशय चकवणारे असते. जेव्हा ती पाण्याच्या संपर्कात येते तेव्हा आक्रसते व जेव्हा कोरडी होते तेव्हा प्रसरण पावते, यामुळे ती वाहून गेल्याने सर्वाधिक अपघात होतात. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा खणता तेव्हा पावसाळ्यामध्ये पूर येण्याचीही चिंता असते. पुनर्विकासाच्या प्रकल्पांमध्ये किंवा काही बंगल्यांचे काम करतेवेळीही आधीचे बांधकाम पाडायचे असते, कामाच्या या दोन्ही टप्प्यांमध्ये अपघात टाळण्यासाठी सर्वाधिक काळजी घेणे आवश्यक असते.

. आरसीसी/ गवंडीकाम/ प्लास्टर

इथे दोन बाबी तपासल्या पाहिजेत, एक म्हणजे स्लॅब टाकण्यासाठी शटरिंग करताना किंवा स्लॅबचे कास्टिंग करताना होणारे अपघात व गवंडी काम व बाहेरून प्लास्टर करण्यासाठी मचाण बांधताना होणारे अपघात. त्याचप्रमाणे बांधकाम केले जात असताना प्रत्येक स्लॅबवर विविध सेवांसाठीच्या वाहिन्या म्हणजे लिफ्टसाठीची वाहिनी, विजेच्या मुख्य तारांसाठीची वाहिनी व इतरही बऱ्याच धोकादायक जागा असतात.

 . इमारतीच्या दर्शनी भागाची वा ईतर बाह्य भागाची कामे

इमारतीचा बाह्य भाग आकर्षक करण्याकडे तसेच व्यावसायिक इमारतींच्या दर्शनी भागात काचेची तावदाने लावण्याकडे कल असल्यामुळे, आपल्याला बाहेरून संपूर्ण उंचीवर वेगळी प्रक्रिया करावी लागते व जेव्हा इमारत बहुमजली असते तेव्हा हे धोकादायक असते. बाहेरून रंगकाम करतानादेखील हे विचारात घेणे आवश्यक असते. मुंबईमध्ये काही वर्षांपूर्वी, बाहेरून रंगकाम करताना संपूर्ण मचाणच कोसळून त्यावर काम करत असलेल्या पंधराहून अधिक रंगाऱ्यांचा जीव गेलाची घटना ताजी आहे!

. काम पूर्ण होण्याच्या वेळच्या बाबी

या वेळेपर्यंत इमारतीची जवळपास सर्व कामे पूर्ण झालेली असली तरीही टाईल्स बसविणे, लॉबीचा आतला भाग तयार करणे अशी कामे करत असताना आग, विजेच्या तारांमुळे शॉर्ट-सर्किट होणे यासारख्या गोष्टी अपघातांचे मुख्य कारण असतात. त्याचशिवाय निसरड्या पृष्ठभागामुळेही घसरण्याची शक्यता असल्यामुळेही अंतिम टप्प्यात अपघात होऊ शकतात. त्याचप्रमाणे इमारतीच्या वर किंवा जमीनीखाली असलेल्या पाण्याच्या टाक्यांचे वॉटर प्रूफिंग हेदेखील धोकादायक काम असते.

. बांधकाम स्थळावरील साधने व सेवा

टॉवर क्रेन, वर्क-लिफ्ट यासारखी बांधकामाची साधने ही बांधकामाच्या टप्प्यातील अपघातांचे मुख्य कारण असतात व त्यांची चांगल्याप्रकारे व नियमित देखभाल केली पाहिजे. त्याचप्रमाणे अंतिम टप्प्यामध्ये अपघात टाळण्यासाठी इमारतीच्या लिफ्ट, एक्सलेटर, जनरेटर, ट्रान्स्फॉर्मर इत्यादी सेवांची काळजीपूर्वक देखभाल केली पाहिजे. त्याचप्रमाणे फोर्क-लिफ्ट किंवा डंपर किंवा वॉटर टँकर किंवा काँक्रिट मिक्सर यासारखी हलवता येणारी यंत्रसामग्री चालविण्याची परवानगी केवळ प्रशिक्षित व्यक्तींनाच द्यावी, जेणेकरून ती चुकीच्या पद्धतीने चालविल्यामुळे होणारे अपघात टाळता येतील.

. बांधकाम स्थळावरील मजुरांची लहान मुले

बहुतेक लहान मुले सवयीमुळ त्यांच्या पालकांसोबत कामाच्या जागीही जात असल्यामुळे त्यांना अपघात होण्याचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे  या मुलांवर देखरेख करणे आणि त्यांना बांधकाम चालु असलेल्या भागांपासुन दुर ठेवणे हे महत्वाचे आहे

१०बांधकामाचा शेजार-पाजार

बांधकाम ठिकाणांच्या शेजाऱ्यांना अधिक धोका असतो कारण त्यांचा बांधकाम स्थळाशी परिचय नसतो, आपण त्यांच्या सुरक्षिततेचा विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे, ग्राहक व बाहेरून बांधकामस्थळी भेट देणाऱ्यांचीही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काळजी घेतली पाहिजे.

आता आपण वरील सर्व टप्प्यांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काय करावे व काय करू नये याची यादी तयार करू शकतो, तरीही मी वर म्हटल्याप्रमाणे यापेक्षा पूर्णपणे वेगळे काहीतरी असू शकते व त्यामुळे अपघात होऊ शकतो. परंतु तो अपघात असेल व पुढील वेळी आपल्या सुरक्षिततेच्या उपाय योजनांमध्ये आपण ती शक्यताही विचारात घेतली पाहिजे, हेच अपघातातून शिकले पाहिजे!

   शेवटचा परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, प्रशासकीय सार्वजनिक संस्था तसेच पोलीसांसारख्या तपास संस्थांकडे बांधकाम स्थळावरील अपघात हाताळण्यासाठी एक व्यवस्थित यंत्रणा असली पाहिजे व एखादी घटना घडून गेल्यानंतर व माध्यमांच्या दबावाखाली प्रतिक्रिया देण्याऐवजी व बचावात्मक पवित्रा घेण्याऐवजी,वास्तववादी व व्यवहार्य भूमिका घेतली पाहिजे, तरच अपघात थांबवता जरी नाही आले तरी कमी नक्कीच करता येतील!

 

 संजय देशपांडे

smd156812@gmail.com















 

No comments:

Post a Comment