Monday 22 January 2024



नविन वर्षात घर आणि आपले भविष्य निवडतांना !


ते काही पहिल्या नजरेत जडलेले प्रेम नव्हते, तर ते त्याहूनही काहीतरी गहिरे होते. त्या जागेविषयी एक आपलेपणा जाणवला, ती अशी एक जागा होती जीचा मला कायम शोध होता. त्या घराच्या हृदयाची स्पंदने मला जाणवत होती.”... निक्की रो

   निक्की रो ह्या एक थेरेपीस्ट आहेत व हृदयाला उमगलेल्या जीवनाच्या सत्यानुसार त्या जगतात व जगाला एकत्र आणण्याचे उद्दिष्ट हीच त्यांची प्रेरणा आहे. जीवनाविषयी अशाप्रकारची समज असलेल्या निक्की घराचे इतक्या सुंदर शब्दात वर्णन करतात यात काहीच आश्चर्य नाही. खरेतर घराच्या हजारो व्याख्या करण्यात आल्या आहेत, परंतु त्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे इतर वस्तुंप्रमाणे घर ही काही निर्जिव गोष्ट नसते. ती एक सजीव वस्तूच आहे व तुम्ही त्याच्याशी संवाद साधू शकला तरच केवळ त्या चार भिंती घर होतात, म्हणूनच घराच्या हृदयाचीही स्पंदने असतात असे निक्की यांना वाटते.

  यामागचे तत्वज्ञान सोडा कारण बऱ्याचजणांना ते अती काव्यात्मक वाटते तरीही माणसाच्या आत्तापर्यंतच्या निर्मितींपैकी घर हे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन आहे व त्याचे मुख्य कारण म्हणजे, माकडापासून उत्क्रांती होऊन आजचा माणूस तयार होण्यापर्यंतच्या काळाच्या प्रवासामध्ये हे उत्पादनही विकसित होत गेले आहे. निसर्ग निर्मित दगडी गुहेला स्वतःचे घर बनविण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता अद्ययावत तंत्रज्ञानाने बांधलेल्या, सर्व अत्याधुनिक सुखसोयींनी युक्त व आरामदायक घरापर्यंत पोहोचला आहे, तरीही या उत्पादनाविषयीची भावना त्याच आहे. तुम्हाला शांतता मिळावी, तुमच्या कुटुंबासोबत भरभराट व्हावी यासाठी घर बांधले जाते, तुमचे घर शोधताना यावरच मुख्य भर असला पाहिजे, केवळ त्याचा आकार किंवा घराचा पत्ता किंवा सोयीसुविधांवर नव्हेत्याचा सर्वंकषपणे विचार केला पाहिजे जे रिअल इस्टेटच्या दोन्ही बाजूंना समजलेले दिसत नाही. म्हणजे, एकीकडे जर घराचे निर्माते (बांधकाम व्यावसायिक) त्याकडे पैसे कमवून देणारे उत्पादन म्हणून बघत असतील, तर त्या उत्पादनाचे ग्राहक (घराचे ग्राहक) त्याकडे त्याच्या किंवा तिच्या पदरी पडू शकेल असा फायद्यातील एक व्यवहार म्हणून पाहतात. चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे, कुठल्या तरी एका बाजूला तोटा सहन करावा लागेल व ती नमते घेईल एवढी प्रचंड घासाघीस केली जाते. परंतु या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेतरी घराचा आत्माच हरवल्यासारखा वाटतो, म्हणूनच मी हा लेख लिहीत आहे. आपण जेव्हा गुहेत राहायचो तेव्हा निसर्गाशी सोहार्दाचे नाते होते, आज आपण घरे बांधण्याच्या प्रक्रियेमध्ये निसर्गापासून दूर गेलो आहोत. मी जेव्हा घराच्या ग्राहकांशी बोलतो तेव्हा ही वस्तुस्थितीच अनेक जण मांडतात व अनेक बांधकाम व्यावसायिक, तसेच ज्या भूखंड मालकांच्या जमीनीवर घरे बांधली जातात ते सगळे असे म्हणतात की त्यांना निसर्गाची काळजी वाटते, परंतु घराचा व्यवहार करताना केवळ एकाच पैलूकडे लक्ष दिले जाते व तो म्हणजे ती व्यक्ती त्यातून किती पैसे कमवू शकेल, मग व्यवहारामध्ये त्याची भूमिका काहीही असो, म्हणूनच घरे शोधण्याविषयी माझे मत मांडण्यासाठी मी हा लेख लिहीत आहे.

   मी सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो की, मी काही कुणी राजा हरिश्चंद्र नाही व मीदेखील रिअल इस्टेटमध्ये घरे बांधून व ती विकून थोडे पैसे कमवण्यासाठीच आलो आहे. परंतु तुम्ही किती पैसे मिळवता व त्यासाठी काय मोल द्यावे लागते, हे दोन घटक माझ्या घर बांधण्याच्या पद्धती नियंत्रित करतात व याचे कारण म्हणजे मी त्या घराच्या मुळ उद्देशची काळजी करतो, ज्यामुळे त्या घराशी संबंधित सगळेजण शांतपणे जगू शकतील व त्यांची भरभराट होईल. आणि माझी “सगळ्यांची” व्याख्या, फक्त माझ्यापुरती व माझ्या कंपनीच्या ताळेबंदापुरती मर्यादित नाही, तर ज्या व्यक्तीने घर खरेदी केले आहे, ज्या कुटुंबाने मला जमीन दिली आहे व अगदी त्या जमीनीवरील झाडांवरील चिमण्या व खारी या सगळ्यांचा त्यामध्ये समावेश होतो, कारण मी तेथे घरे बांधण्यास सुरुवात करण्याआधीपासून त्या तिथे होत्या, त्या जमीनीवर त्यांचाही तितकाच मालकी हक्क आहे, मला त्यांच्या शांततेची तसेच भरभराटीचीही काळजी वाटते. हे ऐकून कदाचित विचित्र वाटेल व तुमच्या घराच्या शोधमोहिमेशी संबंधित नसल्यासारखे वाटेल पण ते तसे नाही. तुम्ही कुणाशीही बोला व त्यांना शहराविषयी (पुणे) व निसर्गाच्या किंवा हवामानाच्या ऱ्हासाविषयी काय म्हणायचे आहे ते ऐका, या सगळ्यामागचे कारण रिअल इस्टेटशी (घरांशी) संबंधित आपण सर्व व त्याबाबत आपण निवडलेले चुकीचे पर्याय (म्हणजे आपली हाव) हेच आहे. सध्या भरपूर चटईक्षेत्र उपलब्ध आहे, प्रकल्पांसाठी बरेच पर्यायही उपलब्ध आहेत व प्रत्येकासाठीच जमीन कमी होत चालली आहे व आपल्याला प्रत्येक चौरस इंच चटईक्षेत्र स्वतःसाठी (माणसांसाठी), आपल्या कारसाठी व आरामासाठी हवे आहे व असे करून आपण आपल्या आयुष्यातून (म्हणजे घरातून) निसर्गाला हद्दपार करत आहोत, हे माझ्या लेखामागचे कारण आहे.

   जेव्हा कधीही कुणी घराचा ग्राहक माझ्याकडे घर खरेदी करण्यासाठी येतो किंवा एखादा जमीनीचा मालक त्याची जमीन विकण्यासाठी येतो किंवा एखादी सोसायटी माझ्याकडे पुनर्विकासासाठी येते, ते निसर्ग, प्रदूषण, पक्षी, झाडे या सगळ्यांविषयी अतिशय काळजीने व चिंतेने बोलतात. परंतु जेव्हा अंतिम व्यवहार करायची वेळ येते तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करणारे घर असा निकष कधीच नसतो. तर ग्राहकांना केवळ कमीत कमी पैशामध्ये अधिक जागा हवी असते किंवा जमीन मालकाला मोबदला म्हणून अधिक पैसे हवे असतात किंवा सोसायटीला अधिक चौरस फूट जागा हवी असते, बस्स. घराचा निर्णय घेताना मग तो नवीन ग्राहक असेल किंवा पुनर्विकास होत असलेली सोसायटी असेल! याचे कारण म्हणजे, एखाद्या विकासकाने तुमच्यादृष्टीने अतिशय फायदेशीर व्यवहार केला (म्हणजे जास्तीत जास्त पैसे किंवा जागा मोबदला म्हणुन दिली) तर तो हे पैसे परत मिळवण्यासाठी ही संपूर्ण जमीन जास्तीत जास्त क्षमतेने वापरेल व यामुळे तुम्हीही या शहराच्या निसर्गाचा ऱ्हास होण्यामध्ये हातभार लावाल, घर शोधताना किंवा रिडेव्हलपमेन्ट करतांना हा विचार नक्की करा. हे अतिशय कटू वाटेल परंतु सत्य नेहमी असेच असते, तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर अवतीभोवती पाहा व घरांचे (रिअल इस्टेटचे) जे व्यवहार होत आहेत व त्यांचा आधार काय आहे हे तपासा. आपल्याला आरामशीरपणे जगता यावे या नादामध्ये, आपण घर नावाच्या उत्पादनाची मूळ संकल्पनाच विसरत आहोत जे तुम्हाला शांतता मिळावी व तुमची भरभराट व्हावी यासाठी बांधले जाते व तुम्ही जोपर्यंत तुमच्या कुटुंबाच्या व्याख्येमध्ये या संपूर्ण भोवतालाचा समावेश करत नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही, म्हणूनच मी घर शोधण्याविषयी हा लेख लिहीत आहे.

   याचा अर्थ असा अजिबात होत नाही की तुम्ही घराची किंमत, पत्ता, नियोजन किंवा सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करा, तर त्याचा अर्थ असा होतो की, या सगळ्या गोष्टींचा व निसर्गाचा समतोल साधणारे घर व सोसायटी निवडा. असे झाले तरच आपण या घरातील सगळ्यांना आरामात ठेवू शकू किंवा त्यांची भरभराट होऊ शकेल. म्हणूनच नेहमीप्रमाणे प्रति चौरस फूट पद्धतीने वाटाघाटी करण्याऐवजी किमान असे घर शोधण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे, कारण या पद्धतीमुळे घर बांधण्याचा व पर्यायाने आपल्या शहरांच्या निर्मितीचा हेतूच फोल ठरला आहे. इथे, बरेच जण विचारतील, की बांधकाम व्यावसायिक जी काही किंमत सांगेल त्याला आपण होकार द्यावा किंवा आपल्या घरासाठी मोक्याची जागा सोडून द्यावी, तर  नाही, अजिबात नाही, मला काय सांगायचे आहे याचे मी एक लहानसे उदाहरण देतो. तुम्ही मुंबईला ह्युंदेई सँट्रो (एक लहान कार) किंवा मारुती सिदानने किंवा टोयोना इन्होवाने किंवा सर्व सुखसोयींनी युक्त मर्सिडीसने जाऊ शकता, या सगळ्या गाड्यांनी जवळपास सारखाच वेळ म्हणजे चार तास लागतात, बरोबर? तरीही सँट्रो चार लाखात येते, सिदान साधारण दहा लाख रुपयात, एसयूव्ही पंचवीस लाखात व एखादी सुखसोयींनी युक्त उंची कार पन्नास लाख रुपयांपर्यंत येते, असे का? वरील सर्व कारविषयी आदर राखत, (मी स्वतःसुद्धा शहरात सँट्रो  चालवतो ), या प्रत्येक वाहनातून प्रवास करण्याचा अनुभव वेगळा असतो, तसेच अपघात झाल्यास सुरक्षिततेची वैशिष्ट्ये कारच्या दर्जाप्रमाणे अधिकाधिक चांगली असतात, त्यामुळे कारच्या किमतींमध्ये हा फरक असतो. त्याचप्रमाणे घरामध्ये राहणे हा अनुभवण्याचा विषय आहे व तुमचे भविष्य सुरक्षित असावे व तुमच्या निकटवर्तीयांसोबत तुमचीही भरभराट व्हावी यासाठी तुम्ही हुशारीने निवड करणे आवश्यक आहे तसेच अशाप्रकारच्या घरासाठी थोडे जास्त पैसे द्या, हा साधा तर्क आहे. आणखी एक पैलू म्हणजे, अनेक घरांमध्ये एखादा पाळीव प्राणी असतो (कुत्रा किंवा मांजर) व माझ्याकडेही घरी एक पग आहे, जो दररोज सकाळी साधारण ९ च्या सुमाराला माझ्या दिवाणखान्याला लागून असलेल्या गच्चीमध्ये उन्हात बसतो. जर एखाद्या दिवशी आम्ही गच्चीचे दार उघडे ठेवण्यास विसरलो तर तो दिवाणखान्यामध्ये खिडकीतून सकाळचे ऊन येईल असा कोपरा शोधून तिथे बसतो कारण त्याची त्वचा निरोगी राहण्यासाठी त्याला सूर्यप्रकाशाची गरज आहे हे इतर कुणी नव्हे तर निसर्गानेच त्याला शिकवले आहे. त्यामुळे घराकडून केवळ तुमची मुले व पालकांच्याच गरजा असतील असे नव्हे, तर तुमचे पाळीव कुत्रे किंवा तुमच्या घराच्या टेरेसच्या बागेतील रोपांच्यादेखील सूर्यप्रकाश व नैसर्गिकपणे खेळती हवा अशा गरजा असतील. या सगळ्या लहान-सहान गोष्टींमुळेच ते एक परिपूर्ण घर होते, हे तुम्ही घर शोधताना लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्याचवेळी, तुमच्या घराभोवती खुली जागा आहे का व तुमच्या घरामध्ये तुम्हाला खाजगीपणा मिळतो का या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत व म्हणून तुम्ही बाह्य जगाशी संपर्क तोडा असा होत नाही. याचा अर्थ तुमच्या खाजगी क्षणांमध्ये समतोल साधणे असा होतो व त्याचवेळी बाह्य जगाला सामावून घेईल एवढे पुरेसे खुले घर असले पाहिजे!  लोकहो, नवीन वर्षात तुम्हाला घराची निवड करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होतील व कोणत्याही बाजारासाठी ही चांगली गोष्ट आहे. त्याचवेळी पुण्यामध्ये शहर म्हणून तुमची व तुमच्या पुढील अनेक पिढ्यांची भरभराट होण्यासाठी प्रचंड क्षमता आहे. परंतु एक लक्षात ठेवा तुम्ही घर म्हणून कशा कशाची निवड करता यावरूनच तुमच्या कुटुंबाचे तसेच एकंदरच या शहराचे भवितव्य ठरेल; म्हणूनच चला तर मग, हुशारीने निवड करा व तुमच्या कुटुंबाला तसेच समाजाला भविष्यात शांतपणे जगता येईल व त्यांची भरभराट होईल खात्री बाळगा, तुमच्या घराचा शोध या विषयावर एवढे बोलून निरोप घेतो!


संजय देशपांडे

smd156812@gmail.com


 

No comments:

Post a Comment