Thursday, 26 December 2024
पुणे, 2025 मध्ये प्रवेश करताना !!
Friday, 20 December 2024
कृत्रिम बुद्धिमत्ता,शहाणपणा आणि रिअल इस्टेट
Saturday, 14 December 2024
ताडोबाच्या सुपर मॉम्स, एपिसोड 3; अलिझान्झा कुटुंब !
Monday, 9 December 2024
वाढदिवस, वाढते वय आणि जबाबदारीची ताकद !
वाढदिवस,
वाढते वय आणि जबाबदारीची ताकद!
“मी आता अशा वयापर्यंत पोहोचलो आहे की मला घाबरायची भीती वाढत नाही” …
प्रिय दादा, छोटा आणि यंगलिंग्ज (स्टार वॉर्समध्ये तरुणाईसाठी वापरण्यात आलेला शब्द),
आपण पुन्हा एकदा डिसेंबर महिन्याच्या मध्यावर आलोय आणि उपदेशाचे वार्षिक डोस पाजण्याची वेळ आली आहे! तुम्ही
आत्तापर्यंत समजून चुकला असाल की नव्या पॅकिंगमध्येही जुनाच माल दिला जातोय, पण
यालाच मार्केटिंग (तसेच वयाने मोठे होणे) म्हणतात, बरोबर? आणखी एका वर्षाने वय वाढले किंवा आयुष्य कमी झाले हे तुम्ही
त्याकडे कशाप्रकारे पाहता यावर अवलंबून असते व अलिकडे मी महत्प्रयासाने वय वाढत
चालले आहे हे स्वीकारायला शिकलो आहे व या क्षमतेसाठी मी जीवनाचा ऋणी आहे! कदाचित यालाच
मोठे होणे असे म्हणतात. मी तुम्हाला आधी सुरुवातीच्या अवतरणामागचा तर्क सांगतो जे
व्याकरणाच्या दृष्टीने सदोष आहे असे माझ्या मैत्रिणीचे मत आहे कारण ती अस्सल पुणेरी
मराठी शिकली आहे, परंतु मी आयुष्यातल्या अनेक गोष्टी कधीच योग्यप्रकारे केल्या
नाहीत विशेषतः स्वतःला व्यक्त करणे, त्यामुळे असो. मी हे शब्द का निवडले (मी
कधीही माझ्या शब्दांचा उल्लेख अवतरण म्हणून करत नाही कारण ते प्रसिद्ध व्यक्ती
किंवा शहाण्या लोकांसाठी असते व मी दोन्हीही नाही) याचे कारण म्हणजे तुमच्या
आयुष्यात वाढत जाणारे प्रत्येक वर्ष (म्हणजे असे पाहिले तर
प्रत्येक दिवस) तुम्हाला काहीतरी शिकवते ज्याप्रमाणे शाळा व
महाविद्यालयाने आपल्याला शिकवले. तर मुद्दा असा आहे की आपण या शिकवणीतून काय शिकलो
आहोत? तुम्हाला जे शिकवण्यात आले आहे किंवा तुम्ही
ज्याचा अभ्यास केला आहे त्याचा प्रत्यक्षात वापर करता तेव्हा त्याला शिकणे असे
म्हणतात, नाहीतर ते सर्व व्यर्थ असते. मराठीमध्ये यासाठी एक अतिशय योग्य म्हण आहे,
ती म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी म्हणजे एखादा घडा उलटा करून त्यावर पाणी ओतले तर
ते सगळे वाहून जाईल, काहीच साठवले जाणार नाही! मी आता हे शिकण्याच्या बाबतीत
आणखी एक पाऊल पुढे गेलो आहे. पाणी साठवून ठेवले तरीही तुम्ही जर ते योग्यवेळी
वापरू शकला तरच ते शिकणे ठरेल, नाहीतर तो केवळ मृत साठा किंवा खराब झालेला हार्ड
डिस्कचा ड्राईव्ह ठरेल. म्हणजेच डेटा आहे परंतु तुम्ही हवा तेव्हा
तो वापरू शकत नाही.
आता तुम्हाला वाटत असेल की उपदेशामृताची ही गाडी कोणत्या दिशेने चालली आहे किंवा बहुतेक रुळावरून घसरली आहे, तर याचा अर्थ असा होतो की माझे सर्व लेखन, सामायिक केलेले सर्व घटक, पोस्ट प्रत्येक व्यक्तीकडून मला जे शिकायला मिळाले व माझ्या दैनंदिन आयुष्याने मला जे काही शिकवले त्याचे एकप्रकारे सार आहे व दरवर्षीचा हा लेख जीवनरूपी शाळेच्या व गेल्या ३६५ दिवसांचा गोषवारा आहे. यावर्षी भीतीविषयी लिहीले आहे व लेखाच्या सुरुवातीचे अवतरण त्याचा सारांश आहे. आपल्या मनामध्ये खोलवर दडलेली कशाना कशाची भीती आपल्याला नेहमी सतावत असते हे सत्य आहे. आपल्या सगळ्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने व स्वरूपात भीती गाठते व त्यातील सर्वात वाईट भीती असते मी अपयशी ठरलो तर काय होईल. आपण जसे मोठे होत जातो आपल्या भीतीचे स्वरूप व नाव बदलते व प्रत्येक बदलानुसार तिचा आकार वाढत जातो. दादा व छोटा, मी खरोखरच सांगतो की मी बहुतेक मोठ्या लोकांना त्यांच्या मनामध्ये खोलवर दडलेल्या भीतींमुळे कोलमडताना पाहिले आहे, ज्याला आपण ताण, भार यासारखी नावे देतो परंतु प्रत्यक्षात ते भीती हाताळता न येणे असते जिला आपण घाबरत असतो. त्याचशिवाय तुम्ही पुरुष असाल तर तुम्हाला घाबरण्याची परवानगी नाही असा आपल्या समाजाचा विश्वास असतो (म्हणजे सामाजिक नियम). एखादी महिला रडू शकते, तिचा ताण व्यक्त करू शकते व सहानुभूती मिळवू शकते, अर्थात मला अशाही अनेक महिला माहिती आहे ज्या हेदेखील करत नाहीत. पुरुषाला मात्र त्रास सहन करावा लागतो, त्याला कोणतीही भीती असू शकत नाही व धाडस म्हणजे कोणतीही भीती नसणे. हे सर्वात मोठे असत्य किंवा मिथक आहे ही माझी यावर्षीची शिकवण आहे. मला आनंद वाटतो की मी आता मला ज्या गोष्टींची भीती वाटते त्याबद्दल मी मोकळेपणाने घाबरू शकतो किंवा असे म्हणता येईल की मी आता घाबरण्याला घाबरत नाही. मला स्वतःला अनेक गोष्टींची भीती वाटते, जशी तुम्हालाही तुमच्या भविष्याविषयी वाटत असेल. मला, सुरुवातीला एम3 (गूगल करा) ची भीती वाटत असे, नंतर माझा पहिला प्रकल्प सुरू करताना वाटली, त्यानंतर तिची जागा माझा रक्तदाब किंवा गुडघ्याच्या इजेने घेतली ज्यामुळे मला कधीही बॅडमिंटन खेळणे शक्य होणार नव्हते. त्यानंतर घाबरण्यासारखे काहीही नसेल, मनाला पुढे काय होईल याची भीती वाटत असते, म्हणजेच अज्ञाताची भीती. ही भीतींची यादी प्रत्येक वर्षी वाढत जाते. परंतु हरकत नाही, आता मी माझ्या भीतींना आपले मानतो, जसे तुम्ही दोघे आहात (दुसरा काही अर्थ घेऊ नका). म्हणजे मला भीती वाटते व त्यामुळे मी घाबरतो पण त्या भीतींविरुद्ध लढण्यासाठी माझ्यामध्ये क्षमताही आहे, कारण ज्या मनामध्ये भीती राहते तिथेच राहणाऱ्या माझ्या क्षमतांकडे मला दुर्लक्ष कसे करता येईल, ही माझी या वर्षीची शिकवण आहे.
दादा व छोटा, भीतींना तोंड देण्याच्या या संपूर्ण प्रवासात, मला अनेक गोष्टींची मदत झाली, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जीवनाच्या अनेक पैलूंना खुल्या मनाने (व नशीबाने) तोंड देणे कारण जीवनाचे अनेक पैलू आहेत. तुम्ही एकदा महाविद्यालयातून बाहेर पडलात, तर तुमचे औपचारिक शिक्षण संपते. त्यानंतर जीवनाच्या शाळेमध्ये तुम्ही ज्या लोकांना भेटता, जी पुस्तके वाचता, ज्या ठिकाणांना भेट देता, जे चित्रपट तुम्ही पाहता, जो रेडिओ तुम्ही ऐकता तसेच जंगल म्हणजेच निसर्ग हे सगळे तुमचे गुरूच असतात! ते सर्व तुम्हाला एक सामाईक गोष्ट शिकवतात ते म्हणजे टिकून राहणे व जगणे. मला अलिकडेच जे काही शिकायला मिळाले ते फिल्ड मार्शल माणेकशॉ यांच्याविषयी जे काही ऐकायला मिळाले त्यातून होते, त्यांच्या जीवनावरील चित्रपटातून नव्हे तर एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या मुलाखतीतून. त्यांनी सांगितले फिल्ड मार्शल नेहमी म्हणत, “फौजी के लिए सबसे बढ़कर होती है उसकी ड्युटी, कोई भी काम करने से पहले पूछ लो की ये काम मेरे ड्युटी के खिलाफ तो नही, और फिर वो काम करना!” किती उच्च विचार आहेत हे व त्यांचा अर्थ असा होतो की, “एका सैनिकासाठी सर्वात महत्त्वाचे असते त्याचे कर्तव्य, कोणतेही काम करण्यापूर्वी आधी स्वतःला विचारा की ते काम माझ्या कर्तव्याच्या आड तर येत नाही ना, त्यानंतरच ते काम करा”. माझा खाक्या अजिबात लष्करी नाही (शिस्त वगैरे काही बाबतीत, आहे), परंतु आधी कर्तव्य या तत्वावर मीदेखील नेहमी विश्वास ठेवला आहे. कोणत्याही लष्करी पुरुषासाठी किंवा स्त्रीसाठी, त्याचे सर्वात पहिले कर्तव्य हे देशाप्रती असते, जे आपल्यालाही लागू होते परंतु आपल्यावर इतरही जबाबदाऱ्या असतात. व्यावसायिक म्हणून माझे माझ्या उत्पादनाबाबत कर्तव्य आहे व त्यामध्ये ग्राहकांपासून ते संजीवनीच्या चमूपर्यंत सर्वांचा समावेश होतो. माझे माझ्या कुटुंबाप्रती तसेच मित्रांप्रती कर्तव्य आहे. माझे प्रत्येक व्यक्ती किंवा सजीवाप्रती कर्तव्य आहे जे कमकुवत आहेत व ज्यांना मदतीची गरज आहे. हे जरा फारच नाट्यमय किंवा समाजसेवी धाटणीचे वाटू शकते, परंतु दादा व छोटा तुम्ही कधी विचार केलाय की सैनिक मृत्यूच्या किंवा वेदनेने तडफडण्याच्या भीतीवर कशी मात करत असतील व तरीही युद्धभूमीवर आगेकूच करत असतील. याचे कारण म्हणजे आपल्या कर्तव्यावरील त्यांचा दृढ विश्वास, हा विश्वासच त्यांना त्यांच्या भीतीवर मात करण्यास मदत करतो. माझ्या ५६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी हेच शिकलोय (अब तक छपन्न). माझा माझ्या कर्तव्यावर किंवा कर्तव्यांवर पूर्णपणे विश्वास आहे व त्यामुळे मी घाबरण्याला न घाबरता माझ्या भीतींना सामोरे जाऊ शकतो. भीती वाटणे किंवा घाबरणे ही केवळ एक भावना आहे किंवा मनाची स्थिती आहे, ज्याप्रकारे मला आनंद वाटतो, दुःख वाटते, राग येतो, त्याचप्रमाणे मला भीतीही वाटू शकते. मी नेहमी त्याच मनस्थितीत राहीन किंवा माझ्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करेन हे पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे व इथे माझे कर्तव्य सर्वोच्च आहे, माझ्या भीतींच्याही वर आहे.
मी तुम्हाला हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे
हे माझे कर्तव्य आहे. माझ्या वडिलांनी मला कधी जीवनाविषयी किंवा त्याच्या
पैलूंविषयी मला समजून सांगितले नाही परंतु याचा अर्थ त्यांचे माझ्यावर प्रेम
नव्हते किंवा या सगळ्या गोष्टी शिकाव्यात अशी त्यांची इच्छा नव्हती असे नाही,
कदाचित त्यांचे मार्ग वेगळे होते. पण
म्हणून मी तुम्हाला शिकवणार नाही किंवा माझे विचार तुम्हाला सांगणार नाही असे होत
नाही. त्यानंतर तुमच्या बाबतीत, माझे कर्तव्य नेहमी तिहेरी असते ते म्हणजे बाबा,
आई व बॉस म्हणून. आता कदाचित त्यामध्ये मित्र म्हणून या भूमिकेचाही समावेश
करण्याची वेळ आली आहे जे बऱ्याच काळापासून होऊ शकलेले नाही, पण योग्य त्या गोष्टी
करण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. यावर्षीचे उपदेशामृत जरा लांबलचक आहे परंतु
माझ्या मनातील भीतीही तशाच होत्या, यामध्ये केवळ एका गोष्टीचा समावेश करेन,
कर्तव्याचा आदर करण्यासाठी तुम्ही राष्ट्रीय छात्र अकादमी किंवा एखाद्या लष्करी
अकादमीमध्ये जाण्याची गरज नाही, केवळ आयुष्यात काय योग्य आहे हे जाणून घ्या व त्या
योग्य गोष्टींसाठी भक्कमपणे उभे राहा, हे तुमचे कर्तव्य आहे. निरोप घेण्यापूर्वी
यावर्षीच्या टेन कमांडमेन्टसं देत आहे, त्या वाचून तुम्ही अखेर वाचन थांबवू शकता.
यामुळे तुम्हाला यश मिळेल याची खात्री नाही परंतु त्यामुळे तुम्ही यशस्वी होण्याची
शक्यता वाढेल व तुम्ही त्यांचा अवलंब केलात तर अर्थातच तुम्हाला शांतपणे जगता येईल...!
१. लवकर झोपा व लवकर उठा, हे तुमच्या विश्रांतीबाबत तुमचे कर्तव्य आहे.
२. समाज माध्यमांचा वापर करा, परंतु केवळ गरजेसाठी, हे तुमच्या वैयक्तिक ब्रँडसाठी तुमचे कर्तव्य आहे.
३. दररोज व्यायाम करा, अगदी चालतात तरीही हरकत नाही, हे तुमच्या शरीराबाबत तुमचे कर्तव्य आहे.
४. दररोज काहीतरी वाचा, हे तुमच्या मेंदूसाठी तुमचे कर्तव्य आहे.
५. नेहमी सभोवतालचे काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा, तुमच्यातील लहान मुलाप्रती तुमचे हे कर्तव्य आहे.
६. तुमच्या छंदासाठी थोडा वेळ काढा, स्व:तासाठी हे कर्तव्य आहे.
७. नेहमी सभोवतालचे बारकाईने निरीक्षण करा, हे तुमच्यातील विद्यार्थ्यासाठीचे तुमचे कर्तव्य आहे.
८. इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करा, ते तुमच्याशी कितीही वाईट वागले तरीही, हे समाजाप्रती तुमचे कर्तव्य आहे.
९. तुमच्याभोवती असलेल्या प्रत्येक ज्येष्ठाचा आदर करा, हे ज्ञानाप्रती तुमचे कर्तव्य आहे.
१०.
तुम्ही जेव्हा चूक असाल तेव्हा माफी मागण्यास लाजू नका
किंवा उशीर करू नका, हे तुमच्या न्याय्यपणासाठी तुमचे कर्तव्य आहे…
थोडक्यात, मोठे होणे म्हणजे जीवनाप्रती तुमचे
कर्तव्य समजून घेणे. मला
नेहमी योग्य मार्गावर राहण्यासाठी मदत करणाऱ्या तुम्हा दोघांचे व निखिल, केतकी,
श्रुतिका, रोहित एम, तनिषा, सिया व इतर समस्त तरुणाईचे मनापासून आभार!...
बाबा.
संजय देशपांडे
smd156812@gmail.com
संजीवनी डेव्हलपर्स
कृपया पुण्यात हक्काचे घर/ऑफिस शोधण्याबाबतचे माझे शेअरिंग खालील YouTube लिंकवर पहा आणि आवडल्यास शेअर करा..
https://youtu.be/27j3I3rwGPQ?si=-ODYBxVI2Dl_C345