Saturday, 14 December 2024

ताडोबाच्या सुपर मॉम्स, एपिसोड 3; अलिझान्झा कुटुंब !














 





















ताडोबाच्या सुपर मॉम्स, एपिसोड 3; अलिझान्झा कुटुंब !

“जब मा का दिल तडपता है ना, तो आसमान मे भी दरार पड जाती है”. – चित्रपट “करण अर्जुन”.

       खरोखर, जेव्हा भावनांचा प्रश्न असतो तेव्हा आपले हिंदी चित्रपट आणि त्यांचे संवाद यांच्यावर कोणीही मात करू शकत नाही, विशेषत: ९०च्या दशकातील चित्रपट, जे माझ्या पिढीच्या जवळच आहेत(म्हणजे आता ४५पेक्षा जास्त वयाचे असतील, आम्ही तरुण असताना, म्हणजे मला म्हणायचे आहे की खऱ्या अर्थाने, आभासी जगाने आम्हाला ग्रासलेले नव्हते आणि एआय हा शब्द आमच्या जीवनावर राज्य करत नव्हता, आमच्यापर्यंत भावना खरोखर सहजच पोहोचत असत! आजकालच्या चित्रपटांमध्ये असले भावनिक संवाद मला ऐकायला मिळत नाहीत पण तो या लेखाचा विषय नाही. त्यामुळे बॉलिवूडचा हा पैलू आपण पुढच्या वेळेसाठी बाजूला ठेवू आणि आता आपल्या (म्हणजे माझ्या) आवडत्या विषयाकडे येऊ, फक्त ताडोबाच नाही तर त्याच्या सुपर मॉम्स! सध्याच्या सीझनमधील (ओटीटीची भाषा) हा तिसरा आणि अखेरचा भाग आहे, कारण ताडोबा तर पुढेही असेलच आणि त्यामुळे सुपर मॉम्सने असतील, ज्यांच्याब्द्द्ल मला पुढे जाऊन अधिक माहिती घेण्याची आशा आहे पण सद्यस्थितीत आपण तीन माझ्याबद्दल, म्हणजे वाघिणींबद्दल बोलू ज्या एकच प्रकारे एक परिवार आहेत पण जगण्याचे त्यांचे स्वतंत्र मार्ग आहेत. हो, मी अलिझांझा झोन मधील वाघिणींचा उल्लेख करीत आहे ज्यांना स्थानिक पातळीवर भानुसखींडी वाघीण, बबली वाघीण आणि झरनी वाघीण म्हणून संबोधले जाते.

    बरे, जे पहिल्यांदाच या विषयाबद्दल वाचत आहेत त्यांच्यासाठी,ताडोबाच्या सुपरमॉम्स ही ताडोबा जंगलातील वाघिणी आणि वन्यजीवांमधील त्यांचे योगदान, त्यांच्यासमोरील आव्हाने आणि त्यांचा आतापर्यंतचा अद्भुत प्रवास याबद्दलची मालिका आहे, यापैकी काही भागाचे प्रत्यक्षदर्शी होण्याचे भाग्य मला लाभले आहे आणि त्या आयांचे स्मरण करून त्यापैकीच काही क्षणांची झलक मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आणि हे वाचून कुठेतरी, कोणीतरी या वाघिणी मॉम्स  चे आयुष्य अधिक सोपे करेल अशी आशा आहे! अनेकजण विचारतील की, या सुपरमॉम्सचे घर असलेल्या जंगलापासून हजारो मैल दूर,मग आपल्या आरामदायी घरांमध्ये (बरे, आपल्यापैकी बहुतेकांकडे असे आहे) बसून आपण त्यांचे जीवन अधिक चांगले कसे करू शकतो/ आणि अनेक जण असे विचारतील की, मुळात आपल्याला आपल्या लाडक्या बहिणी आणि आयांची काळजी घ्यायची असताना आपण या सुपरमॉम्स वाघिणींचा विचार का करावा! मी वाद घालणार नाही किंवा मला का या प्रश्नाचे उत्तरही देता येणार नाही पण कसे हो, या प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करू शकतो! पहिले उत्तर आपण ताडोबातील या सुपर मॉम्सचे कशी काळजी घेतली पाहिजे, तर तेथील लोकांपर्यंत पोहोचून आणि त्यांना शक्य त्या प्रत्येक मार्गाने मदत करून ज्यामुळे शेवटी या वाघीण मॉम्सनां मदत होईल आणि त्यासाठी प्रत्येकाला जंगलात जावे लागेल. का या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी (जे मला खरेतर द्यायची इच्छा नाही) माझ्या मनात येणारे एकच उत्तर असे आहे की, जर आपण या सुपर मॉम्ससाठी काही केले नाही तर कोण करेल, म्हणून का! माझ्या लेखाचा हा एकमेव उद्देश आहे आणि आपल्याला या सर्व सुपर मॉम्सबद्दल माहिती मिळण्यापूर्वी, एक निवेदन! मी कुणी संशोधक नाही किंवा मी वाघांचा तज्ज्ञही नाही मात्र पण मी सामान्य लोकांपेक्षा जास्त वाघ आणि जंगले पाहिली आहेत, आणि वाघिणींची नावे, राहण्याची ठिकाणे, वय, कुटुंबशाखा यापैकी काही गोष्टी परिपूर्ण नसू शकतील कारण हा एखादा रिसर्च पेपर नाही तर मी या वाघिणींचे त्यांच्या घरात निरीक्षण करून काय शिकलो आहे आणि मला काय जाणवले आहे याबद्दल माझे विचार आहेत, त्यामुळे अशा तपशीलांमध्ये कोणतीही विसंगती आल्यास मला माफ करा, किंबहुना तुमच्याकडे काही अचूक माहिती असेल तर ती मला पाठवा, मी माझ्या लेखात त्यानुसार दुरुस्ती करेन !

      आपल्या वैशिष्टपूर्ण अलिझांझा कुटुंबाकडे परत जाऊया, जे आपल्या मानवी समाजाला थोडे विचित्र वाटेल, म्हणजे मी उल्लेख केलेल्या तीन वाघिणी भानुसखींडी, बबली आणि झरणी, या एकाच नर वाघाबरोबर राहतात, त्यापैकी भानुसखींडी ही वयाने सर्वात मोठी असावी आणि ती एका दुखापतीमुळे अशक्तसुद्धा झाली आहे. खरं  तर वाघ चांगले गिर्यारोहक असतात, तरीही या वाघिणीने ज्या भूभागाला आपले घर मानले आहे, तेथे काही अवघड चढाच्या टेकड्या आहेत आणि पावसाळ्यात त्याचे दगडगोटे चांगलेच निसरडे होतात आणि अशाच एका ठिकाणी चालताना तिला इतकी दुखापत झाली होती की तिला शिकारही करता येत नव्हती. त्यातच तिला चार बछड्यांना खाऊ घालायचे होते. आणि अश्या स्थितीत तिच्या मनात काय चालले असेल याचा तुम्ही विचारही करू शकत नाही, कारण एक जखमी वाघीण आई म्हणजे तिच्या संपूर्ण कुटुंबाचा उपासमारीमुळे मृत्यू! असे म्हणतात की, (जंगलातील गोष्टी) की या बछड्यांचा पिता असलेला छोटा मटका हा विख्यात वाघ तेथील गाईची शिकार करून तिला खाऊ घालण्यास मदत करत होता , काही म्हणतात वनखात्याने ती जखमी असताना जिथे विश्रांती घेत होती त्याच्या जवळच गुरे बांधून ठेवली होती त्यांना मारुन खाऊन ही वाघीण जगली, आपल्या खरे काय ते कधीच कळणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, भानुसाखींडी वाघीण जगली, मात्र तिच्या चारपैकी एक बछडा तिने गमावला, आणि सध्या तिचा एक मादी बछडा आता ताडोबाची राणी होण्याच्या मार्गावर आहे, म्हणजे नयनतारा वाघीण! दुखापतीतून बरी झाल्यावर भानुसखींडी तिच्या बछड्यांबरोबर अनेकदा पाणवठ्याजवळ विश्रांती घेताना दिसली आहे आणि ती दुखापतीमुळे काहीशी घाबरट झाली असली तरी तिचे बछडे मोठे झाले आहेत आणि ते पर्यटकांना आवडतात आणि त्याचा परिणाम असा झाला की नयनतारा त्यांची सर्वात प्रिय आहे, ती सर्व जिप्सींमधून सहजपणे चालते, आणि याच दृश्यासाठी लोक ताडोबाला वारंवार भेट देतात! आपल्या जखमेशी लढा देण्याच्या आणि तीन बछड्यांना वाढवण्याच्या अवघड प्रक्रियेत भानुसखींडी वाघीण जरी नक्कीच अशक्त झाली असती तरी आता तिला निसर्गाच्या सर्वात वाईट आव्हानाचा सामना करायचा आहे, म्हणजे तिला भूप्रदेशासाठी स्वतःच्या लेकीबरोबरच लढायचे आहे! तर, अलिकडेच तिने एक पाऊल मागे घेतलेले दिसते आणि ती बिगर-पर्यटनाच्या जंगलाच्या भागात गेली आहे तरीही ताडोबा तिच्या योगदानासाठी तिच्याप्रति नेहमीच कृतज्ञ राहील! शेवटच्या वेळी मी जेव्हा त्या सर्वांना एकत्र पाहिले तेव्हा तिन्ही बछडे शांतपणे झोपले होते पण भानुसखींडी टक्क जागी होती आणि ती माझ्या कॅमेराकडे पाहत होती, तिचे डोळे मला सांगत होते, आवाज करू नकोस, माझी पिल्ले झोपली आहेत! भानुसखींडी आणि तिच्या बछड्यांनी ज्या भागात स्वतःचे घर केले आहे तिथे अगदी जंगलातच एका मंदिरामुळे माणसांचा बराच  वावरत आहे आणि त्यामुळे या कुटुंबाला माणसांची इतकी सवय झाली आहे की एकदा मंदिराजवळच्या पाणवठ्यामध्ये फेकलेली एक बिसलेरी पाण्याची बाटली नयनतारा घेऊन जाताना दिसली आणि माध्यमे व सामान्य लोकांना असे वाटले की पर्यटकांनीच मंदिराची जागा अस्वच्छ केली आहे, पण तसे नव्हते. ते स्थानिकांनीच केले होते आणि आपल्याला जंगलांशी संबंधित तथ्यांची अचूक माहिती असलीच पाहिजे, हे आपण केलेच पाहिजे. तसेच धर्माला वन्यजीवापासून दूर ठेवा कारण आपण आपल्या देवाचे मंदिर जंगलाबाहेर बांधू शकतो पण बिचारी भानुसखींडी तिच्या बछड्यांना वाढवण्यासाठी जंगलाबाहेर येऊ शकत नाही, त्यामुळे हि जाणीव करून देणे हेच या लेखाचे प्रयोजन आहे !

       चला आता झरणीला भेटूया, अलिझान्झाची रहस्यमयी लाजरी सुपर मॉम्स, ती अलिझान्झा बफर जंगलाच्या अगदी शेवटच्या भागात राहते, ज्याच्या पलिकडे मानवी वस्ती सुरू होते आणि ती पर्यटकांना दर्शन देण्यासाठी इतकी लाजाळू असण्याचे हेच कारण आहे! प्रत्येक बफर जंगलामध्ये दोन प्रांत असतात, एक जो जंगलाच्या कोअर भागाच्या बाजूला असतो आणि दुसरा जो बाह्य भागाच्या म्हणजे बिगर जंगल प्रदेशाच्या बाजूला असतो! बफर जंगलाचा हा बाह्य भाग मानवी वस्त्यांना लागून असतो आणि वाघांना आपल्या बफर, आतील, पर्यटन क्षेत्र किंवा बिगर-पर्यटन क्षेत्र अशा सीमांची व्याख्या कळत नसल्याने आई वाघिणीला कळणारी एकच गोष्ट असते ती म्हणजे तिच्या बछड्यांसाठी सुरक्षित जागा आणि काही अन्न शोधणे. खरेतर वाघांना माणसांची प्रचंड भीती वाटते आणि वाघांनी माणसांवर केलेले बहुसंख्य हल्ले हे अपघाताने किंवा भीतीने झालेले असतात आणि हे खुद्द महान जिम कार्बेट यांनी स्वतःच जवळपास शंभर वर्षांपूर्वी लिहून ठेवले आहे आणि हेच अजूनही सत्य आहे. झरणीभोवतीच्या खूप माणसांचा  वावर तिला मानवी डोळ्यांपासून दूर ठेवण्यास कारणीभूत आहेत आणि तिच्या बछड्यांची वाढही त्याच प्रकारे होत आहे यात काही आश्चर्य नाही. यामुळेच जंगलात खासगीपण लाभलेल्या धाडसी वाघिणींचे बछडे धाडसी होतात आणि सभोवती भरपूर संख्येने जिप्सी असल्या तरी रस्त्यावर मोकळेपणाने फिरतात, जे नयनतारा, भानुसाखींडीची मुलगी करते आणि झरणीचा मादी बछडा असलेली चांदनी तिच्या आईप्रमाणेच थोडी लाजाळू आहे! पण यामुळे झरणीचे सुपरआईपण हिरावून घेतले जाऊ शकत नाही कारण  तिचे काम अधिक कठीण आहे, एकीकडे तिला जंगलात तिच्या बछड्यांचे संकटांपासून संरक्षण करायचे असते तसेच माणसापासूनही बछडे सुरक्षित ठेवायचे असतात कारण अगदी दीड वर्षाचा अर्धवट मोठा पण शिकार न करू शकणारा बछडा अपघाताने जवळपासच्या गावामध्ये प्रवेश करू शकतो किंवा काही माणसांना मारू शकतो ज्यामुळे त्याचे प्राण धोक्यात येतात! हे घडले आहे, भानुसखींडीचा धाडसी बछडा तिच्यापासून हिरावला गेला कारण त्याने जंगलात शिरलेल्या दोन किंवा तीन गावकऱ्यांना ठार मारले असे म्हणतात पण त्याची किंमत मात्र पूर्ण वाघाच्या कुटुंबालाही द्यावी लागली! माझ्या अलिझान्झाच्या अनेक सहलींमध्ये मला एकदाच झरणीचा फोटो काढता आला आणि तोही एका गरम उन्हाळ्याच्या दुपारी जेव्हा ती पाणवठ्यावर आली होती, गाईडने मला “सर, तय्यार रहना, ये टायग्रेस जादा टाइम नही बाहर रुकती, बस एक या दोन मिनट मिलेंगे आपको फोटो खिचने”, असे म्हणत तयार राहायला सांगितले आणि तो खरोखरच तीन मिनिटांचा कार्यक्रम होता, ती विश्रांती घेत असलेल्या दाट झुडुपांमधून बाहेर आली, पाणी प्यायली आणि परत गेली पण त्या तीन मिनिटांमध्ये तिने मला माझ्या छायाचित्रणातील स्वप्नवत फोटो मिळवून दिला होता, हिरवेगार जंगलाच्या पार्श्वभूमीवर, स्थिर पाण्यात आपले प्रतिबिंब बघत असलेली एक सुंदर वाघीण, तीच आहे सुपर मॉम झरणी! 

      आणि आता, तिसरी आणि अलिझान्झाची सर्वात लोकप्रिय सुपरमॉम, बबली! तिच्या नावाप्रमाणेच ती सर्वत्र बागडत आनंदी असते आणि ती नवेगावच्या बाजूने ताडोबाच्या कोअरच्या बाजूजवळ राहते आणि छोटी ताराच्या (आतील भागातील आणखी एक सुपर मॉम) प्रदेशातही संचार करते, पण सुरक्षित अंतर ठेवून! तिच्या प्रदेशात ताडोबाचे विशाल आणि बहुधा एकमेव गवताळ मैदान आहे आणि ती बरेचदा उघड्यावर फिरताना दिसते यात काही आश्चर्य नाही कारण जंगलाच्या या भागात आणि जंगलाच्या आतील भागाजवळ झाडी थोडी कमी आहे आणि येथे मानवी हालचाल फारशी नाही. बबलीच्या राज्यात वाघांचा धोका नसला तरी तिला छोटा मटका वाघाच्या स्वरूपात संरक्षण मिळते, त्यामुळे बबलीची बहुसंख्य बछडे वाचले आहेत आणि ती इतकी धाडसी आहेत व तिच्या सर्वात मोठ्या बछड्याचे नाव कालुआ ठेवले आहे आणि तो सध्या पर्यटकांच्या आनंदाचे कारण आहे! तिच्या मोठ्या बछड्यापैकी बाली ही मादी अलिकडेच ओडिशातील व्याघ्र प्रकल्पात पाठवण्यात आली आहे! अशा गोष्टी घडतात तेव्हा आई वाघिणीला किती वाईट वाटते ते मला माहित नाही, पण आतापर्यंत बबलीला नवीन बछडे सुद्धा झाले आहेत, मात्र वन्यजीवन असेच असते, कधीकधी खूप क्रूर!

      अलिझान्झाच्या या तीन सुपरमॉम्ससाठी दोन समान घटक आहेत, एक म्हणजे त्यांचा विणीचा जोडीदार म्हणजे छोटा मटका नावाचा मोठा नर वाघ आणि दुसरे त्यांच्या बछड्यांना सुरक्षितपणे वाढवण्याचा कायम सुरु असलेला लढा! सभोवती एक समर्थ वाघ असण्याचा फायदा हा असतो की, इतर वाघ त्यांच्या भूप्रदेशात येत नाहीत आणि त्यांनी बछड्यांना मारण्याची शक्यता कमी असते. पण तोटा असतो की या वाघाबरोबरच पुढील वीण करण्यामुळे सध्याचे बछडे फार लवकर दूर जाऊ  लागतात, जे येथे पाहण्यात आले आहे. वाघाच्या बछड्यांनी त्यांच्या आईपासून दूर जाण्याचा आदर्श कालावधी अडीच वर्षांचा असतो पण विणीच्या दबावामुळे वरील वाघिणींचे जंगलात बछडे एक वर्ष आधीच स्वावलंबी झाले.  अर्धवट वेगळ्या झालेल्या वाघांसाठी गोष्टी कठीण होऊ शकतात कारण शिकारीच्या ज्ञानाचा अभाव आणि इतक्या लहान वयात स्वतःचा भूप्रदेश तयार करणे या बाबी त्यांच्या मृत्यूला कारणीभूत होऊ शकतात, आणि जंगलामध्ये तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकत नसाल तर मृत्यू हाच एक परिणाम असतो! येथेच आपण या सुपर मॉम्सचे आयुष्य सोपे करण्याचे आपले काम समोर येते कारण आपण या नवीन बछड्यांना सामावून घेण्यासाठी (सहअस्तित्त्व) सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो, ज्यामुळे या आयांच्या मनाला थोडी शांतता मिळू शकेल, मी इतकेच म्हणू शकतो! आणि माझ्या संरक्षित ऑफिस केबिनमध्ये बसून हे लिहिणे अधिक सोपे आहे पण तुमच्या आजूबाजूला वाघाचा संचार मान्य करणे हे फार अवघड आहे तरीही वनखाते आणि ताडोबाच्या अवतीभोवती असलेले गावकरी हे करत आहेत, त्यामुळे आपण त्यांच्या अशा प्रयत्नांना हातभार लावू शकतो, ताडोबा तसेच इतर जंगलातील या सर्व सुपरमॉम्ससाठी हाच नजराणा ठरेल! जंगल बेल्स या आमच्या कंपनी तर्फे आम्ही पुण्यातील शाळांमध्ये या सुपरमॉम्सबद्दल सादरीकरणांची मालिका आयोजित करणार आहोत, जेणेकरून शहरांतील मुलांना वाढण्यासाठी त्यांचे तसेच वाघीण आयांचे प्रयत्न समजून घेता येतील, हाच आमचा सर्व या सुपरमॉम्ससाठी नजराणा आहे, या भागात या टिपणीसह, ताडोबाच्या आणखी काही सुपर मॉम्सची ओळख करून देण्याचे वचन देऊन निरोप घेतो,  भेटू लवकर!



तुम्ही खालील लिंकवर आणखी काही जंगलांतील क्षण पाहू शकता...


https://www.flickr.com/photos/65629150@N06/albums/72177720317550777/


संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स  


www.sanjeevanideve.com  / www.junglebelles.in



No comments:

Post a Comment