Friday, 20 December 2024

कृत्रिम बुद्धिमत्ता,शहाणपणा आणि रिअल इस्टेट












































कृत्रिम बुद्धिमत्ता,शहाणपणा आणि रिअल इस्टेट

“बुद्धिमत्तेचे मोजमाप म्हणजे एखाद्या व्यक्तीची बदलाची क्षमता”… अल्बर्ट आईनस्टाईन
 
      बुद्धिमत्तेविषयी हजारो अवतरणे असू शकतात परंतु महान आईनस्टाईन यांच्यासारख्या सर्वात बुद्धिमान व्यक्तीशिवाय दुसरे कोण याची योग्य व्याख्या करू शकेल. त्यांनी बुद्धिमत्तेविषयी काय म्हटले आहे ते पाहू, याचा अर्थ तुम्हाला परीक्षेमध्ये किती गुण मिळाले आहेत, किती पदव्या मिळाल्या आहेत, अभियांत्रिकी किंवा वैदकीय शाखेचे शिक्षण, अथवा एखादे संशोधन नाही तर याचा अर्थ तुमची बदलाची क्षमता असा होतो. जेव्हा माझ्या मित्राने मला रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय याविषयी लिहायला सांगितले तेव्हा मी माझ्या मुलाला याविषयी त्याचे विचार लिहीण्यास सांगितले. कारण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी तुमच्याकडे जी बुद्धिमत्ता आहे त्याची चाचणी घेण्याचा हाच सर्वात उत्तम मार्ग आहे ! माझ्या मुलाने लिहीलेले काही मुददे मी खाली देत आहे, मी लेखाची सुरुवात करण्यासाठी त्याचा वापर करत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा संबंध तंत्रज्ञानाशी येतो व ही पिढी माझ्यापेक्षा तंत्रज्ञान अधिक सहजपणे हाताळते किंवा त्यावर अवलंबून असते, ही गूगल, अलेक्सा, चॅट जीपीटी व इतरही अनेक अशा गोष्टींची कृपा, तुम्ही एआयसंदर्भात माझ्यापेक्षाही अनभिज्ञ असाल तर कृपया त्याचा अर्थ तपासण्यासाठी गूगल करा.
 
रिअल इस्टेटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा वापर (रोहितचे मत)...
 
       "आधुनिक युगात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या कानावर एआय किंवा ज्याला “कृत्रिम बुद्धिमत्ता” असे म्हणतात हा शब्द सर्वाधिक पडतो. तुम्ही एखादी किशोरवयीन व्यक्ती असाल जिने समाज माध्यमांचा वापर नुकताच सुरू केला आहे किंवा तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये स्वतःचा व्यवसाय चालविणारी ५० वर्षांची व्यक्ती असाल, तुमची या शब्दाशी या ना त्या प्रकारे ओळख झालेली आहे.  मी व्यक्तीशः हे जे काही एआय आहे किंवा त्यामुळे समाजावर कशाप्रकारे परिणाम झाला आहे ते पाहता त्याचा फार मोठा चाहता नाही – याचे सर्वात पहिले कारण म्हणजे त्यामध्ये कृत्रिम हा शब्द आहे, ज्याचा शब्दशः अर्थ होतो जे “खरे-नाही” किंवा “खोटे” आहे. याचाच अर्थ अतिशय कमी किंवा अजिबात मानवी संवाद तिथे होत नाही, जी माझ्या मते कोणत्याही व्यवसायासाठी नकारात्मक बाब आहे. मी अनेक विकासक किंवा रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांचे अनेक लेख वाचले आहेत ज्यामध्ये ते त्यांच्या व्यवसायामध्ये ग्राहकाला अधिक चांगला अनुभव मिळावा यासाठी “एआय”चा वापर कसा करत आहेत याविषयी लिहीले होते. मी या विधानाशी सहमत नाही कारण जगाच्या कोणत्याही भागातील कोणत्याही व्यक्तीसाठी, विशेषतः आपल्या देशातील व्यक्तीसाठी घर खरेदी करणे हा एक मोठा निर्णय असतो. घरासोबत अनेक परंपरा, रिती-भाती, भावना जोडलेल्या असतात व मानवी संवादाशिवाय त्या पूर्ण होऊ शकत नाहीत असे मला वाटते. आजकाल घर खरेदी करण्याचा वयोगट बदलून ४०-५० वरून ३०-४० पर्यंत आला आहे. ग्राहकही आता पूर्वीपेक्षा जास्त जागरुक झाले आहेत, ते आता तुमच्या तसेच तुमच्या स्पर्धकांच्या उत्पादनांचा तुमच्यापेक्षाही अधिक चांगल्याप्रकारे अभ्यास करतात. त्यामुळे, मला असे वाटते की तुमच्या उत्पादनाचे विपणन करण्यासाठी ‘एआय’चा वापर करणे फारसा शहाणपणाचा निर्णय होणार नाही. कारण तुमच्या ग्राहकाच्या भावनांचा वेध कसा घ्यायचा हे ‘एआय’ला समजू शकणार नाही ज्याची एखादे घर खरेदी करण्यामध्ये मोठी भूमिका असते.

       तरीही कोणत्या नवीन बदलाचे फायदे व तोटे असतात, त्याचप्रमाणे ‘एआय’चा वापर ग्राहकांची माहिती/चौकशी/त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचे संदर्भ वगैरे डेटा सांभाळून ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो त्यामुळे ग्राहकांशी अधिक चांगल्याप्रकारे संपर्क साधता येऊ शकतो. चौकशी करणे व संकेतस्थळाचे कार्य अधिक चांगल्याप्रकारे करणे, बॅकऑफिसचे काम वाढवणे यासाठी ‘एआय’ची मदत घेता येईल. परंतु त्याशिवाय, बाजारातील बदलाचा अंदाज बांधणे, सदनिका दाखवण्यासाठी आभासी वास्तवाचा (व्हर्च्युअल रिॲलिटी) वापर करणे किंवा मालमत्तांचे मूल्यांकन करणे यासारख्या काही गोष्टी जुन्या पद्धतीच्या मानवी हस्तक्षेपाशिवाय व मानवी संवादाशिवाय होऊ शकत नाहीत किंवा होऊ नयेत …"
 
… मी रोहितचे याविषयावरील त्याचे विचार लिहीण्याबद्दल (म्हणजे टाईप केल्याबद्दल) अभिनंदन केले ज्यामुळे एकप्रकारे माझ्या विचारांना चालना मिळाली. खरे सांगायचे तर माझ्यासाठी एआय म्हणजे फक्त आणखी एक साधन आहे ज्याप्रमाणे आपण हाताने खोदकाम करण्याऐवजी जेसीबीचा स्वीकार केला, उंच इमारतींसाठी काँक्रीट ओतण्यासाठी काँक्रीट पंपचा वापर सुरू झाला अगदी तसेच. अलिकडेच माझ्या मित्राने मला एक प्रश्न विचारला की पहिले बांधकामावर सहजपणे दिसणारी सगळी गाढवे गेली कुठे कारण ९०च्या दशकात मोठ्या बांधकाम स्थळी पाठीवर साहित्य लादून नेणारे गाढवांचे कळप हे दृश्य अगदी सर्रास दिसत असे. त्यावर माझी पुणेरी (म्हणजे उपहासिकपणे) प्रतिक्रिया अशी होती की गाढवे तिथेच आहेत, फक्त आता ती दोन पायांची आहेत (माफ करा माझी टीम, हा फक्त एक विनोद होता). तर वस्तुस्थिती अशी आहे की या गाढवांची जागा टॉवर क्रेननी घेतली आहे, ज्या आता एका जागेवरून दुसऱ्या जागी अतिशय कमी वेळेत व खर्चात बांधकामाचे सर्व साहित्य एकीकडून दुसरीकडे नेतात, मग ते बांधकामाचे स्थळ कितीही मोठे असेल. रिअल इस्टेटमध्ये तंत्रज्ञानाने पारंपरिक पद्धतींची जागा घेतल्याची अशी अनेक उदाहरणे आहेत. परंतु एआय व इतर सर्व पारंपरिक तंत्रज्ञानातील फरक म्हणजे, आपण कोणत्याही कामाच्या पद्धतीचा मूळ पायाच बदलण्याविषयी बोलत आहोत, ते म्हणजे मानवी बुद्धिमत्ता व मला असे वाटते इथेच आपली गफलत होत आहे. आपण एखाद्या गोष्टीची मदत घेण्याऐवजी ती पूर्णपणे बदलू पाहात आहोत. म्हणजेच, एखादी गोष्ट बदलणे हा पूर्णपणे वेगळा पैलू आहे परंतु आपण एआयकडे केवळ मदत घेण्याच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, हीच खरी मेख आहे.

       रिअल इस्टेटची समस्या अशी आहे की, आधीच आपल्याकडे सर्वच आघाड्यांवर बुद्धिमत्ता कमी आहे व अनेक जणांना हे विधान गर्विष्ठपणाचे वाटेल किंवा अगदी तद्दन डाव्या विचारसरणीचे वाटेल (म्हणजे भोवताली असलेल्या प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा किंवा त्यावर टीका करायची). परंतु मी हे विधान पूर्णपणे आदरांती करत आहे व मी रिअल इस्टेटपासून कुणी वेगळा आहे असे मी मानत नाही. किंबहुना मी त्याचाच एक भाग आहे व या उद्योगातील पस्तीस वर्षांच्या अनुभवातून मी अशाप्रकारचे विधान करायला धजावतो आहे! उदाहरणार्थ रिअल इस्टेटचा आधार आहे स्थापत्य अभियांत्रिकी (मी अजूनही यावर विश्वास ठेवण्याइतका मूर्ख आहे). तुम्ही सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या कोणत्याही विद्यार्थ्यांना विचारा व त्याला किंवा तिला कशात करिअर करायचे आहे हे विचारा. त्यातील अगदी १०% मुलांनीही त्यांना रिअल इस्टेट कंपनीमध्ये नोकरी करायची आहे असे उत्तर दिल्यास मी माझे  शब्द  लेखातून डिलीट करीन. हेच सत्य इतर सर्व विभागांमधील नोकऱ्यांनाही मग तो कायदा असो, लेखाकर्म, विपणन, प्रशासन किंवा स्वागतिकेसारख्या नोकऱ्यांनाही हेच लागू होते. मी या विद्यार्थ्यांना दोष देत नाही, आपल्या देशातील तथाकथित बुद्धिमान लोक रिअल इस्टेट क्षेत्राकडे याच नजरेतून पाहतात (म्हणजे पाण्यात पाहतात). याचे कारण म्हणजे या उद्योगामध्ये एक मिथक आहे की तुम्हाला यशस्वी (म्हणजे पैसा कमवण्यासाठी) होण्यासाठी डोक्याची गरज नसते. इथे डोके नसले तरीही ताकद आणि पैशांचे बळ पुरेसे असते. याच कारणामुळे रिअल इस्टेटसाठी एआयचा वापर करणे हे एक आव्हान आहे कारण मूळ बुद्धिमत्ताच अस्तित्वात नाही, तर आपण एआय कसे हाताळू व ते कोण हाताळेल, हा माझा मुद्दा आहे. इथे बहुतेक कामे हाताने केली जाते कारण अजूनही तंत्रज्ञानापेक्षा मनुष्यबळ स्वस्त उपलब्ध आहे. यामध्ये आजकाल बदल होत असला तरीही टाईल लावण्यापासून ते प्लास्टरपर्यंत ते प्लंबिंगपर्यंत सगळ्या कामांसाठी मानवी हातच अधिक स्वस्त पडतात ही वस्तुस्थिती आहे. दुसरा मुद्दा म्हणजे, एआयवर विश्वास ठेवणे, कारण रिअल इस्टेटमधील बहुतेक व्यावसायिक तंत्रज्ञान स्नेही नाहीत. अशा व्यक्तींना तंत्रज्ञान विकणे हे कठीण काम असते, म्हणूनच तुम्ही जर बहुतेक बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये पाहिली तर टॅली किंवा ऑटोकॅड वगळता रिअल इस्टेट उद्योगासाठी अनुकूल फारशी कोणतीही सॉफ्टवेअर विकसित करण्यात आलेली नाहीत. सीआरएम किंवा विक्रीशी संबंधित ॲप व सॉफ्टवेअर आहेत, परंतु मी ९०% बांधकाम व्यावसायिकांविषयी बोलत आहे केवळ काही १०% कॉर्पोरेट स्वरूपाच्या बांधकाम व्यावसायिकांविषयी बोलत नाही.

      याचा अर्थ असा होत नाही की रिअल इस्टेट क्षेत्राला एआयची गरज नाही, कारण शेवटी तो मदतीचा कमी लेखतात हातच आहे, परंतु रिअल इस्टेटमध्ये एआयचा योग्य वापर करण्यासाठी डोक्यासह शहाणपणाची गरज आहे. एआय किंवा तत्सम तंत्रज्ञानाची सर्वाधिक गरज डेटासंदर्भात असते कारण मला एका क्लिकमध्ये अद्ययावत आय फोन व जगभरातील त्याच्या किंमतींविषयी माहिती मिळू शकते, परंतु मला माझ्या बांधकाम स्थळाजवळ उपलब्ध असलेल्या विशिष्ट ब्रँडच्या सिमेंटच्या गोणीचा दर माहिती नसतो, अशी रिअल इस्टेटमधील परिस्थिती आहे. माझ्या पर्चेस मॅनेजरला दहा विक्रेत्यांना कॉल करावा लागतो, गोणीचे दर काढावे लागतात, घासाघीस करावी लागते जी अतिशय वेळखाऊ प्रक्रिया आहे. हीच परिस्थिती बहुतेक साहित्याची व रिअल इस्टेटसाठी आवश्यक असलेल्या सेवांची आहे, याचसंदर्भात एआयची अतिशय मदत होऊ शकते. आणखी एका बाबतीत एआयची रिअल इस्टेटचा मदत होऊ शकते ती म्हणजे ग्राहकवर्ग व बाजाराच्या डेटाचे विश्लेषण करण्यासाठी म्हणजेच काय बांधण्याची गरज आहे व कुठे बांधण्याची गरज आहे हे समजून घेण्यासाठी. रिअल इस्टेट क्षेत्रातील सध्याच्या काळातील हा सर्वात कच्चा दुवा आहे कारण आपण पुण्यामध्ये व भोवताली सर्वत्र हजारो इमारती (प्रकल्प) बांधल्या जाताना पाहतो. परंतु या सगळ्या घरांना, कार्यालयांना मागणी आहे का या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नाही. आजकाल बांधकाम व्यावसायिक जमीन खरेदी करतो व त्यावर त्याला ज्या विक्री योग्य आहेत असे वाटते त्या २ बीएचके, ३ बीएचके, ४ बीएचके व इतर कोणत्याही आकाराच्या सदनिका बांधतो. परंतु हे उत्पादन तयार करण्यासाठी सर्वप्रथम कोणताही डेटाच नसतो किंवा अभ्यास केला जात नाही. इतर कोणत्याही उद्योगामध्ये इतक्या निष्काळजीपणे उत्पादन तयार केले जात नाही किंवा त्याची रचना केली जात नाही किंवा त्याचे उत्पादन केले जात नाही. मी रिअल इस्टेटमधील सर्व बड्या मंडळींविषयी आदर राखून हे विधान करत आहे. इतर कोणत्याही उद्योगामध्ये ते कोणतेही उत्पादन बाजारात आणण्याआधी बाजाराचे संशोधन करतात व अतिशय सखोल अभ्यास करतात. टोयोटा किंवा हिरोसारख्या मोठ्या व यशस्वी स्वयंचलित वाहने तयार करणाऱ्या कंपनीला विचारा, ते मागणीचा अभ्यास न करता अगदी एखादी लहान कार किंवा एखादी १००-सीसीची बाईक तरी बाजारात आणता का, उत्तर आहे नाही. मग तुम्हाला रिअल इस्टेट व इतर उद्योगांमधील फरक कळेल.  

        खरे तर घरांसाठी व कार्यालयांसाठी जागांची पुरवठ्यापेक्षा मागणी नेहमीच अधिक राहिली होती व आहे. परंतु अशी परिस्थिती कायमस्वरूपी राहणार नाही किंवा प्रत्येक ठिकाणानुसार मागणीची परिस्थिती बदलेल कारण प्रत्येक शहरामध्ये कधीना कधी वाढीचा शेवट येतो व या आघाडीवर एआयची अतिशय मदत होऊ शकते.
 मूलभूत प्रश्न असा आहे की, जो उद्योग कधीच तंत्रज्ञान स्नेही नव्हता त्याच्यासाठी एआय विकसित कोण करेल, यामध्ये कोण गुंतवणूक करेल. मी स्वतः एआयच्या बाबतीत साशंक आहे, कारण बुद्धिमत्ता नसलेल्या हातांमध्ये एआय पडल्यास, रिअल इस्टटेला ते अधिक कमकुवत बनवू शकते कारण लोक त्यावर अति अवलंबून राहतील. म्हणूनच मी स्वतः बुद्धिमत्तेपेक्षाही शहाणपणाला प्राधान्य देतो, जो आणखी एका लेखाचा विषय होऊ शकते, असो! सरतेशेवटी, कर्मचाऱ्यांचा माग ठेवणे, तसेच माहितीची देवाणघेवाण करणे या आणखी एका पैलूकडे रिअल इस्टेटने कधीही गांभिर्याने पाहिलेले नाही. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे कारण कोणत्याही कंपनीला सुधारणा करायची असेल तसेच विस्तार करायचा असेल तर दीर्घकाळ काम करणारे योग्य कर्मचारी असणे अतिशय महत्त्वाचे आहे, तेच तिचे बलस्थान असतात. यासाठी आपण अशा लोकांचे रेकॉर्ड आवश्यक आहे व हे एआयमुळे होणे शक्य झाले आहे. रिअल इस्टेटमध्ये, आपण निसर्गाचे मूलभूत तत्व विसरलो आहोत, मोठ्या ताकदीसोबत मोठी जबाबदारीही येते (स्पायडरमॅन) व कोणत्याही उद्योगामध्ये पैसा, संपत्ती, तुमच्या उत्पादनासाठी भरपूर मागणी ही एक ताकदच आहे. रिअल इस्टेटचे ग्राहक (म्हणजेच बांधकाम व्यावसायिक सोडता इतर प्रत्येक घटक) आत्तापर्यंत निमूटपणे ऐकणारे होते व बुद्धिमत्तेशिवायही रिअल इस्टेटचा कारभार सुरळीत सुरू होता. परंतु हा दृष्टिकोन यापुढे चालणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे जी एआयही तुम्हाला वाचून दाखवू शकत नाही, हे रिअल इस्टेटमधील व्यावसायिकांनी लक्षात ठेवावे, एवढे सांगून निरोप घेतो !

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स 

www.sanjeevanideve.com  / www.junglebelles.in






No comments:

Post a Comment