Thursday, 26 December 2024

पुणे, 2025 मध्ये प्रवेश करताना !!

 






























































पुणे, 2025 मध्ये प्रवेश करताना!!

“आपण नवीन शहरवाढीकडुन फार जास्त अपेक्षा करतो, व समाज म्हणुन स्वतःकडून फार कमी अपेक्षा ठेवतो.” …

“टीव्ही किंवा अमली पदार्थ नव्हे तर अमर्याद खाजगी वाहने अमेरिकी शहरांच्या विनाशास प्रामुख्याने कारणीभूत ठरली.” …

            ही दोन्ही अवतरणे नागरी नियोजनाची जणु देवता  मानल्या जाणाऱ्या जेन जेकब यांची आहेत व जेव्हा विषय रिअल इस्टेट असा असतो व त्यातही जेव्हा आपल्या प्रिय पुणे शहराविषयी लिहायचे असते तेव्हा वाईटपणा घेण्यासाठी म्हणजेच टीका करण्याचे काम करताना त्या नेहमी माझ्या मदतीस धावून येतात. आता आणखी एक वर्ष सरत आले आहे, हे वर्ष पुण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरले. या वर्षात कोव्हिडची केवळ प्रत्यक्षातच नव्हे तर लोकांच्या मनातूनही गच्छंती झाली. आपल्याकडे देशात (जुनेच सरकार पुन्हा नव्याने सत्तेत आले आहे) व राज्यात पुढील पाच वर्षांसाठी नवीन सरकार आले आहे प्रचंड बहुमताने, त्यामुळे नगर विकास आणि इतरही धोरणे तयार करण्याच्या बाबतीत सर्वकाही सुरळीत आहे. अर्थात कट्टर पुणेकर मात्र यावर कुत्सितपणे हसतील व कोणतेही सरकार सत्तेत आले तरीही त्यामुळे आमच्या समस्यांमध्ये काय फरक पडतो त्या दिवसेंदिवस वाढतच आहेत अशी त्यांची प्रतिक्रिया असेल व मी त्यांना दोष देत नाही. पुणेकरांची एक गोष्ट अतिशय चांगली आहे ती म्हणजे जेव्हा त्यांच्या शहराचे कौतुक करायचे असेल तेव्हा ते अगदी तोंडभरून स्तुती करतील, परंतु त्यांच्या शहरावर टीका करायची वेळ येते तेव्हा हे काम करण्यासाठी त्यांना इतर कुणाचीही गरज पडत नाही, याला म्हणतात खरे पुणेकर!
विशेष म्हणजे जेव्हा माझ्या पत्रकार मित्राने जेव्हा मला पुणे शहराचा २०२५ मधील प्रवास कसा असेल याविषयी लिहीण्यास सांगितले, त्याच दिवशी दोन गोष्टी घडल्या. सर्वप्रथम, मला माझा मित्र अमित करोडे भेटला तो पुणेकरच असला तरीही गेली पंचवीस वर्षे दुबईत राहात आहे (अर्थात मनाने अगदी अस्सल पुणेकर आहे). आम्ही दोन्ही शहरांमध्ये काय फरक आहे, तसेच दोन्ही शहरांमधील नागरिकांच्या दृष्टिकोनामध्ये काय फरक आहे याविषयी बोलत होतो. वाहतुकीच्या सिग्नलचे पालन न करणे किंवा नो पार्किंगच्या पाटीखाली पार्किंग करणे, स्वच्छता तसेच मेट्रोमध्ये चढणे व उतरणे यातील बेशिस्त ,हे सगळे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत ज्यामुळे आपल्या तसेच इतरांच्या आयुष्यात अनावश्यक तणाव निर्माण होतो असे माझ्या मित्राचे अलिकडच्या काळातील पुण्याविषयीचे निरीक्षण होते व त्याचे म्हणणे चूक नव्हते. तो म्हणाला तो त्याच्या दुबई किंवा युरोपातील त्याच्या मित्रांना पुण्याला येण्यास सांगण्याची हिंमत करू शकत नाही कारण इथे रस्त्यावर सगळीकडे जी परिस्थिती असते ती पाहून ते आपल्याविषयी काय विचार करतील, हे त्याचे म्हणणेही चुकीचे नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी आजचे वर्तमानपत्र उघडले, त्यात वाचले शहरातील रस्त्यावरील जीवघेण्या अपघातात अनेकांचा जीव गेला, त्याचप्रमाणे शहराची धूर-धुके-धुराने भरलेली छायाचित्रे दिसून आली, इंद्रायणी नदीमध्ये प्रदूषणामुळे मासे मरण पावल्याविषयी एक बातमी होती व भर डिसेंबरमध्ये पुण्याच्या उपनगरांना पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याचीपण बातमी होती.

        मला समजू शकते की तुम्ही जेव्हा एखाद्या शहराविषयी लिहीण्यास सुरुवात करता अशी सुरुवात करू नये, परंतु आपल्या सगळ्यांना आपल्यापुढे भविष्यात कुठल्या अडचणी वाढून ठेवल्या आहेत याची जाणीव असली पाहिजे नाहीतर पुढचा रस्ता कसा असेल याचा अभ्यास न करता आपण केवळ मूर्खासारखे मार्गक्रमण करत राहु, बरोबर? आता पुणे हे केवळ पेठांपासून सुरू होणारे (पुणे ३०) व कोथरुड, औंध, कॅम्प किंवा स्वारगेटपाशी संपणारे एक टुमदार शहर राहिलेले नाही. या शहरामध्ये आता दोन महानगरपालिका, छावणी क्षेत्र, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व नगर नियोजनाच्या भागाचा समावेश होतो ज्याची एकूण लोकसंख्या जवळपास एक कोटीच्या आसपास झाली आहे (अनधिकृतपणे). आपल्याला या एक कोटी लोकसंख्येचा भार आधीच जाणवू लागला आहे, वाहतुकीची कोंडी व शहराच्या अगदी मध्यवर्ती भागातही पाण्याचा तुटवडा ही त्याची सुरुवातीची लक्षणे आहेत. केवळ दोन दशकांपूर्वी आम्ही लोकांना अभिमानाने सांगत असू आम्ही जेमतेम तीस मिनिटात संपूर्ण पुणे शहर ओलांडू शकतो, इथे मुबलक प्रमाणात चांगले पाणी उपलब्ध आहे तसेच इथली सांस्कृतिक घडण हे या शहराचे बलस्थान आहे. अर्थात, आपण जेव्हा देशातील इतर शहरांशी तुलना करतो तेव्हा आपण अजूनही इतर शहरांच्या बरेच पुढे आहोत, परंतु आपल्याला सुधारणा करायची असेल तर आपण आपल्यापेक्षा जी शहरे पुढे आहेत त्यांच्याशी तुलना केली पाहिजे, आपल्यापेक्षा मागे असलेल्या शहरांशी नव्हे, हा माझ्या लेखातील मुख्य मुद्दा आहे. दुर्दैवाने, गेल्या दोन वर्षांपासून महानगरपालिका निवडणुकांवर (पुणे महानगरपालिका/पिंपरी चिंचवड महानगरपालिका) निर्बंध आहेत, त्यामुळे सर्व कारभार प्रशासकाच्या हातात आहे. एकीकडे हे वरदान असले तरीही दुसरीकडे ही समस्या आहे की ज्यांच्याकडे सगळ्या गोष्टींचे नियंत्रण आहे त्यांच्याच कारभाराविषयी तक्रार कुणाकडे करायची? या पार्श्वभूमीवर पुण्याची झपाट्याने वाढ होत आहे व एखाद्या अनाथा मुलाला कुणीही काहीही दिले तरी तो ते खात राहतो आणि वाढत असतो त्याप्रमाणेच पुण्याची वाढ होत आहे. मी अतिशयोक्ती करतोय असे तुम्हाला वाटत असेल तर पुढे वाचा. आपल्याकडे ससूनसारखे सार्वजनिक रुग्णालय आहे, जेथे अतिशय निष्णात डॉक्टर काम करतात, परंतु तेथील पायाभूत सुविधा अतिशय दयनीय आहेत, तरीही राज्यामध्ये उपलब्ध असलेल्या कोणत्याही वैद्यकीय सुविधेपेक्षा ती बरीच चांगली आहे. आपल्याकडे शंभर वर्षांहूनही अधिक जुने रेल्वे स्थानक आहे व तरीही ते लाखो प्रवासी हाताळते, परंतु आपल्याला इतर महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या आणखी रेल्वेगाड्या आवश्यक आहेत ही वस्तुस्थिती आहे, कारण तुम्हाला जवळपासच्या तारखांचे प्रवासाचे तिकीट हवे असेल तर तुम्हाला ते कधीच मिळत नाही. आपल्याकडे तीन नद्या, पाच धरणे आहे व तरीही आपल्याकडे पाणी कपात केली जाते आणि वर्षभर रस्त्यावर पाण्याचे टँकर फिरताना दिसतात. हे सार्वत्रिक दृश्य आहे कारण आपल्याला योग्य पाणी वितरण व्यवस्था आवश्यक आहे व त्यासाठी निधी गरजेचा आहे, खालावत चाललेली भूजल पातळी ही देखील धोक्याचा इशारा देत आहे. यावर्षी पावसाळ्यामध्ये पडलेल्या झाडांची संख्या गेल्या पाच वर्षातील सर्वात जास्त होती, आणि शहरामध्ये तसेच अवतीभोवती हरित क्षेत्र कमी झाले आहे ही चिंताजनक बाब आहे. शिक्षण हा पुण्याचा आधारस्तंभ आहे परंतु परवडणारे, दर्जेदार शिक्षण हा घटक नाहीसा होत चालला आहे, याचा परिणाम म्हणून थेट गुन्हेगारीच्या घटकांमध्ये तरुणांचा सहभाग वाढत आहे. पुण्याची रहदारी व पुण्याची वाहतूक, याविषयी मी काहीही टिप्पणी करायची गरज नाही, तुम्ही फक्त गूगल केला तर तुम्हाला एवढी माहिती मिळेल की त्यामुळे तुमचा पीसी हँग होईल. आपल्याकडे मेट्रो आहे परंतु बंगलोरसारख्या काही शहरांचा अपवाद वगळता देशात सर्वत्र ती तोट्यात चाललेली आहे व सुदैवाने पुण्यातही मेट्रोचा जास्तीत जास्त वापर केला जाईल. सर्वात शेवटी परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझी उपजीविका म्हणजेच रिअल इस्टेट (म्हणजेच घरे व कार्यालये). या आघाडीवर परिस्थिती मजेशीर आहे कारण दररोज अनेक प्रकल्पांची सुरुवात केली जातेय, तर त्याचवेळी तुम्हाला अनेक भागांमध्ये जमीनी मिळणे दुरापास्त झाले आहे (म्हणजे योग्य मालकी हक्क असलेल्या). ज्या जमीनी उपलब्ध आहेत त्यावर जणू रितू कुमारचा (त्यांच्याविषयी गूगल करा) किमतीचा टॅग लावलेला असतो तरीही काही दिवसांनी त्या जमीनी विकल्या गेल्याचे तुम्हाला समजते. उपनगरांमध्ये अशी परिस्थिती असेल तर पुनर्विकासाच्या बाबतीत याहूनही  गोंधळाची स्थिती आहे. साधारण दशकभरापूर्वी तुम्हाला विद्यमान रहिवाशांना केवळ १५ किंवा २०% जास्त जागा देऊन पुनर्विकासाचे प्रस्ताव मिळत असत जो भाव आता दुप्पट किंवा काही वेळा अगदी तिप्पटही झाला आहे, एवढी जागा रहिवाशांना द्यावी लागते. त्यामुळे जमीनीच्या उपलब्धतेवरून तुम्ही असे म्हणू शकता की शहरातील रिअल इस्टेटला मागणी आहे, परंतु मुद्दा असा आहे की आपल्याला किती नवीन घरांची व कार्यालयांच्या  जागेची आश्यकता आहे व या  सगळ्याना अंतिम उत्पादन (किम्मत) परवडू शकते का. त्याचवेळी संपूर्ण देशातून व राज्यातून, लोक नोकरीसाठी व शिक्षणासाठी पुण्याला येतात, त्यांना राहण्यासाठी घरांची गरज आहे, व ती गरज पूर्ण करण्यासाठी परवडणाऱ्या घरांचा पुरवठा यामध्ये संतुलन राखणे हाच मुख्य मुद्दा आहे. जर आपण ते केले नाही, तर आपल्याला शहरामध्ये व अवतीभोवती आधीपासूनच बेधडकपणे अवैध बांधकामे सुरू असल्याचे दिसत आहे, ज्यावर आपल्याकडे काहीही तोडगा नाही.

       ज्यांना एखादे घर किंवा कार्यालय खरेदी करायचे आहे, त्यांच्यासाठी मी सुचवेन (सल्ला देणार नाही) की तुमचे डोळे व ज्ञानेंद्रिये उघडी ठेवा तसेच थोडा संयम राखा. तुमच्या गरजा समजून घ्या, शहराच्या वाढीचे स्वरूप कसे आहे याचा अभ्यास करा व त्यानंतर एखादा निर्णय घ्या. त्याचवेळी तुम्ही पहिली कार  एकदम मर्सिडीज किंवा बीएमडब्ल्यू खरेदी करत नाही (अंबानी अदानी अपवाद) तर स्वतःला हुंडाइ किंवा मारुतीवरून त्या पातळीपर्यंत वर जाता, त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे घर किंवा कार्यालयाविषयीही विचार करू शकता. बहुतेक खरेदीदारांसाठी घर एकदाच खरेदी करण्याचे दिवस आता गेले, आता पुरवठाही मुबलक प्रमाणात होत आहे, पर्यायही अनेक आहेत, त्याचवेळी पुणे केवळ एखादी पेठ किंवा कोथरुडसारख्या उपनगरापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. स्विगी, झुमॅटो, इन्स्टामार्ट सारख्या ऑनलाईन सुविधांमुळे अगदी मध्यरात्रीही किराणा सामान तुमच्या घरापर्यंत पोहचू शकते, त्यामुळेच तुमच्या घराची जागा व प्रकार जबाबदारीने निवडा. 

       किंबहुना घर खरेदी करण्यासाठी ही चांगली वेळ आहे कारण बांधकाम व्यावसायिक थोडीफार घासाघीस करण्यास तयार आहेत (म्हणजेच त्यांना भाग पडते आहे), परंतु फक्त तुम्हाला किती सवलत मिळतेय याकडे पाहू नका, तर विविध निकषांवर घराचा दर्जा कसा आहे हे पाहा व त्यानंतर व्यवहाराला अंतिम स्वरूप द्या. अगदी ताबा घेण्यासाठी तयार असलेली सदनिका जर तुम्ही केवळ प्रति चौरस फूट दराच्या आधारावर नव्हे तर हुशारीने निवडली नाही तर तिची देखभाल, तिचे दिसणे, तिथपर्यंत ये-जा करणे, तुमच्या पाहुण्यांसाठी पार्किंग,कायदेशीर वैधता, शेजार पाजार, पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत बाबींसंदर्भात पुढे जाऊन डोकेदुखी ठरू शकते. त्याचवेळी, इथे घर घेऊन तुम्ही पुण्याच्या संस्कृतीचा एक भाग होता व तुम्ही जसे वागाल ती या शहराची संस्कृती असेल, हे मूलभूत तथ्य कधीही विसरू नका. शेवटचा परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, तुमचे घर निवडताना निसर्गाच्या संवर्धनाचा मुद्दाही लक्षात ठेवा, कारण अशाप्रकारेच तुम्ही तुमच्या पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करू शकाल व ज्या गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकास करून घ्यायचा आहे त्यांच्यासाठीही हे लागू होते. तुम्ही तुमचे गाव किंवा ठिकाण सोडून तुमच्या नवीन ठिकाणी स्थलांतरित का होता आहात हे स्वतःला विचारा व तुम्ही आज चुकीची निवड केल्यामुळे उद्या तुमच्या मुलांना तेच करावे लागू नये, यातच हुशारी आहे, एवढे बोलून (इशारा देऊन) निरोप घेतो, २०२५ मध्ये घर खरेदी करण्यासाठी शुभेच्छा!

संजय देशपांडे 

smd156812@gmail.com
 
संजीवनी ग्रुप




No comments:

Post a Comment