Tuesday 3 August 2021

शेरनी, अवनी व आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन !

 























"आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या निमित्ताने, बहुतेक वाहिन्यांनी शेरनी हा चित्रपट दाखवावा, नाहीतर किमान सर्व पालकांनी ओटीटी माध्यमांवर आपल्या मुलांना हा चित्रपट दाखवावा. या राजेशाही प्राण्याला ती सर्वोत्तम मानवंदना ठरेल. यापुढेही असे अनेक चित्रपट येवोत कारण सिनेमा हे लोकांना जागरुक करण्याचे खरोखरच अतिशय शक्तिशाली माध्यम आहे शेरनीने हा विश्वास पुन्हा एकदा अतिशय सार्थ ठरवला आहे!"...

 

मित्रांनो, शेरनी नावाच्या चित्रपटाविषयी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाविषयी थोडे लिहीले आहे, तुम्ही ते खाली दिलेल्या दुव्यावर वाचू शकता इतरांना वन्य जीवनाविषयी जागरुक करण्यासाठी शेअर करा...

https://visonoflife.blogspot.com/2021/07/sherani-avani-international-tiger-day.html


नरभक्षकाने केलेल्या तथाकथित हल्ल्याच्या शेकडो अफवा आमच्यापर्यंत यायच्या, यामुळे मैलोनमैल पायपीट करावी लागत असे, मात्र ज्या परिसरात सर्वत्र फिरणाऱ्या नरभक्षकाची दहशत होती तिथे हे अपेक्षितच होते, कारण प्रत्येक जण स्वतःच्या सावलीवरच संशय घेतो रात्री ऐकू येणारा प्रत्येक आवाज नरभक्षकाचाच वाटतो.”... जिम कॉर्बेट

जेव्हा विषय वाघांचा असतो जागतिक व्याघ्र दिनाचे एका नरभक्षक वाघिणीविषयीच्या चित्रपटाचे निमित्त असते, तेव्हा लेखाची सुरुवात करण्यासाठी जिम यांच्या अवतरणाशिवाय सर्वात योग्य दुसरे काय असू शकते? ज्या निष्पाप जिवांना (देव त्यांचे भले करो) ते कोण होते माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो की जिम कॉर्बेट हे एक ब्रिटीश भारतीय होते. ज्यांनी माणसांचे वाघांपासून (आणि वाघांचे माणसांपासून सुद्धा) रक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले यासाठी त्यांना काही वाघ ठर मारावे लागले ज्यांचे माणसांनी नरभक्षक असे नामकरण केले होते. दुर्दैवाने जिम कॉर्बेट यांचे नाव केवळ नरभक्षक वाघांना मारणारा म्हणूनच लक्षात ठेवले गेले. त्यांनी अर्थातच काही नरभक्षक वाघ बिबट्यांची फार धीराने शिकार केली होती, मात्र त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे ते अतिशय चांगला माणूस होते. हा माणूस इतर कुणापेक्षाही वाघ नावाच्या प्रजातीला अधिक चांगल्याप्रकारे समजू शकत होता कारण त्यांना जंगल खऱ्या अर्थाने उमगले होते.

तुम्हाला जिम कॉर्बेट यांच्याविषयी पुरेशी माहिती मिळाली आहे आता आपल्या विषयाकडे वळू. हा लेख शेरनी नावाच्या २०२१ मध्ये अलिकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाविषयी आहे, लॉकडाउनमुळे हा चित्रपट चित्रपटगृहांमार्फत जनतेपर्यंत पोहचण्यात मर्यादा आल्या तरीही समीक्षकांनी या चित्रपटाचे विशेष कौतुक केले (दुर्मिळ गोष्ट) समाज माध्यमांवरही अनेक जणांनी या चित्रपटाची समीक्षा लिहीली. महाराष्ट्राच्या पूर्वेकडील विदर्भात (तुम्ही त्यास मध्य भारतही म्हणू शकता) अवनी (वाघीणीचे खरे नाव) नावाची एक वाघीण नरभक्षक होऊन सर्वत्र फिरत होते या भागाची प्रभारी असलेल्या वन अधिकारी महिलेची ही गोष्ट आहे. अवनीला एका अथक शोध मोहिमेनंतर एका व्यावसायिक शिकाऱ्याने मारले (शिकार केली असेही तुम्ही म्हणू शकता), ही शोध मोहिम जवळपास वर्षभर साधारण ५००० चौरस किमी क्षेत्रात चालली. त्यामध्ये अनेक खेडी, गावे, शेते जंगलाच्या पट्ट्यांचा समावेश होता. या चित्रपटाविषयी सांगण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाविषयी थोडेसे सांगतो.

वाघांविषयी आजपर्यंत बरेच काही लिहीले, सांगितले बोलले गेले आहे, यामध्ये वाघांच्या संवर्धनाचा मुद्दा नेहमी आघाडीवर असतो. ज्यांनी जंगलातील वाघ पाहिलेला नाही त्यांना हा प्राणी कोणत्याही जंगलाच्या सौंदर्यात जादूत किती भर घालतो हे कधीही समजणार नाही. आपला देश जगातील / वाघांचे घर आहे हे आपल्यासाठी एक वरदानच आहे. मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते की फक्त तेरा देशांमध्ये ते देखील केवळ पूर्वेकडील अति पूर्वेकडील देशांमध्येच म्हणजेच रशिया, चीन, भारत, म्यानमार, लाओस, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, बांग्लादेश, नेपाळ भूतानमध्ये तुम्हाला वाघ आढळतील. आता तुम्ही म्हणाल की त्यात अशी मोठीशी गोष्ट काय आहे, जो प्राणी जवळपास एकशे ऐंशी देशांपैकी केवळ तेरा देशांमध्ये आढळतो त्याचे एवढे कौतुक करायची काय गरज आहे. तर तुम्हाला सांगतो की क्रिकेट हा खेळही केवळ तेरा देशांमध्ये खेळला जातो मात्र आपल्या देशामध्ये क्रिकेटची लोकप्रियता किती आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज आहे का? इथेही हाच तर्क लागू होतो केवळ विषय वाघांचा आहे जसे खेळाचे चाहते असतात तसेच वन्यजीवप्रेमीही वाघाचे चाहते असतात लोकांना एकूणच वन्यजीवनाच्या संवर्धनाविषयी जागरुक करणे महत्त्वाचे आहे. 

आत्तापर्यंत बहुतेक लोकांना (म्हणजे संवर्धक काही सरकारी अधिकाऱ्यांना) वन्यजीवनाच्या संवर्धनामध्ये वाघाची भूमिका समजली आहे. म्हणूनच वर नमूद केलेल्या १३ देशांमधील व्यक्ती वाघांचे संवर्धन करण्यासाठी दशकभरापूर्वी पहिल्यांदा रशियामध्ये भेटल्या. तो दिवस होता २९ जुलै २०१० म्हणूनच हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या देशासाठी मी माजी पंतप्रधान माननीय इंदिरा गांधीचे आभार मानले पाहिजेत ज्यांनी १९७७ साली काही जंगलांना व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले. तसेच आपले विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले पाहिजेत ज्यांचा चमू वाघाला जंगलात सुखाने राहता यावे यासाठी मनःपूर्वक प्रयत्न करत आहे. या सगळ्यांच्या या कामाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीच्या प्रयत्नामुळे केवळ आपल्या देशातच वाघांची लोकसंख्या वाढत आहे जी जंगलांसाठी अतिशय चांगली खूण आहे. मात्र चांगल्या बातम्या इथेच संपतात, आपल्या देशामध्ये दरवर्षी साठहून अधिक वाघ माणसांमुळे मारले जातात हे वाघांच्या तसेच जंगलांच्या संवर्धनाच्यादृष्टीने अतिशय धोकादायक लक्षण आहे.

म्हणूनच दरवर्षी २९ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. जागतिक पातळीवर वाघांच्या घटत्या संख्येविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी रशियामध्ये २०१० साली सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या व्याघ्र परिषदेमध्ये सहभागी झालेल्या सर्व देशांनी ज्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या त्याची आठवण करून देणे हा त्याचा उद्देश आहेआंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन २०२१ ची संकल्पना आहे त्यांचे अस्तित्व आपल्या हाती. वाघांच्या घटत्या लोकसंख्येविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक पातळीवर वाघांचे संवर्धन करण्याच्यादृष्टीने हा दिवस महत्त्वाचा आहे. जागतिक व्याघ्र दिनाचे आयोजनही अतिशय महत्त्वाचे आहे, वर्ल्ड वाईल्डलाईफ फंडाच्या (डब्ल्यूडब्ल्यूएफ) आकडेवारीनुसार जगभरात सध्या केवळ ४००० हून थोडे जास्त (किंवा कमी) वाघ आहेत. २०व्या शतकाच्या सुरुवातीपासून, ९५% वाघ शिकारीसारख्या विविध कृतींमुळे नष्ट झाले (हा डेटा अधिकृत संकेतस्थळावरून घेण्यात आला आहे). वर्ष १९७० पासून वाघांच्या संवर्धनाचे प्रयत्न होऊनही, वाघांच्या लोकसंख्येमध्ये झपाट्याने घट झाल्याचे दिसून आले. म्हणूनच वर्ष २०१० मध्ये, सेंट पीटर्सबर्ग येथे करण्यात आलेल्या घोषणेमध्ये वाघांच्या पट्ट्यातील देशांनी २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचा निर्धार केला आहे. मी आधी नमूद केल्याप्रमाणे वाघांना अंब्रेला स्पिशीज असे म्हणतात कारण त्यांच्या संवर्धनामुळे त्या वसतिस्थानी राहणाऱ्या इतर प्रजातींचेही संवर्धन होते.

या पार्श्वभूमीवर ज्या वाघिणीला नर-भक्षक जाहीर करण्यात होते तिच्यावर एक चित्रपट तयार करणे हे वन्यजीवनाविषयी जागरुकता निर्माण करण्याच्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. मी त्यासाठी शेरनी चित्रपटाच्या चमूचे मनःपूर्वक अभिनंद करतो, अमित मसूरकर या दिग्दर्शकाचे विशेष आभार कारण त्याने हा चित्रपट वास्तववादी ठेवला आहे. अशाप्रकारच्या वास्तविक जीवनावर आधारित कथांमध्ये एकतर एखाद्या पात्राचे फारच उद्दात्तीकरण करण्यात आले असते (याचे उत्तम उदाहरण म्हणजे अलिकडेच येऊन गेलेला संजू हा चित्रपट, ज्याने ३०० कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय केला) किंवा ते उपदेशाचे किंवा तत्वज्ञानाचे डोस पाजतात. याबाबतीत डिस्ने पिक्सरचे चित्रपट बॉलिवुडपेक्षा बाजी मारून जातात कारण ते कथेमध्ये मनोरंजन, वास्तव उपदेश याचा अचूक मिलाफ करून उत्तम सादरीकरण करतात. दुर्दैवाने शेरनीमध्ये हा शेवटचा घटक नाही, पण काही हरकत नाही. चित्रपटाच्या अगदी पहिल्या दृश्यापासून म्हणजे वनरक्षकांच्या चमूतील एक सदस्य जंगलामध्ये चालणाऱ्या वाघाची नक्कल करतो तिथपासून ते शेवटी प्रभारी महिला अधिकाऱ्याची बदली होते (ती भ्रष्ट नसते नैतिक मूल्ये जपणारी असते हे वेगळे सांगायला नको), या शेवटच्या दृश्यापर्यंत हा चित्रपट तुम्हाला खिळवून ठेवतो. जे जंगल समजून घेण्यासाठी (केवळ वाघाला पाहण्यासाठी नाही) तिकडे जाऊन आले आहेत त्यांना हे समजू शकते. त्यांना आजूबाजूला वाघ असताना माकडांचे चित्कार हरिणांच्या आवाजाचे तपशील ऐकूनही खरोखर कौतुक वाटेल. बॉलिवुडमधील आधीच्या तथाकथित प्राण्यांवर केंद्रित चित्रपटांमध्ये हेच नसायचे, एकतर प्राणी शत्रू म्हणून दाखवला जायचा किंवा नायक असायचा, यात मध्यममार्गाला वावच नसायचा. आपल्या चित्रपटांमध्ये प्राणी अशाप्रकारे का दाखवले जातात याचे मला नेहमी कुतुहल वाटत असेया चित्रपटामध्ये नरभक्षक वाघिणीचा नाट्यपूर्ण प्रवेश नाही (जॉज चित्रपट आठवतोय?), तिने माणसांवर केलेल्या हल्ल्यांसाठी कोणतेही स्पेशल इफेक्ट वापरण्यात आलेले नाहीत. कारण नरभक्षक वाघीण दिवसाढवळ्या सहजपणे फिरत असते, तिला माणसांची भीती वाटत नाही, मात्र गावकऱ्यांमध्ये तिच्यामुळे असलेल्या दहशतीचे भीतीचे अतिशय योग्य चित्रण करण्यात आले आहे, जसे जिम कॉर्बेट यांनी त्याचे वर्णन केले आहे!

प्रत्येक व्यक्तीच्या (म्हणजे पात्राच्या) दृष्टिकोनातून त्याचा किंवा तिचा स्वार्थ साधण्यासाठी नरभक्षक वाघिणीच्या अस्तित्वाचा काय अर्थ आहे हा या चित्रपटाचा मुख्य पैलू आहे. इथेच हा चित्रपट इतर बॉलिवुडपटांपेक्षा बाजी मारून जातो, असे मला वाटते. अगदी मुख्य भूमिकेतील महिला अधिकाऱ्यापासून तिने स्वतःच्या कारणासाठी वन विभागाची नोकरी का स्वीकारली ती केवळ माणसांच्या बाबतीतच नाही तर वन्यजीवनाविषयी तिचे कर्तव्य कसे प्रामाणिकपणे बजावतेय, तसेच स्थानिक राजकारणी जे वाघिणीचा मुद्दा मते मिळवण्यासाठी वापरत आहेत, ते माध्यमांपर्यंत जी प्रामुख्याने वस्तुस्थिती नाही तर त्यांचा वाचकवर्ग (किंवा प्रेक्षकवर्ग) वाढवण्यासाठी छापतात, यातील प्रत्येक गोष्ट आपल्या मनाला भिडते कारण आपल्या अवतीभोवतीही हेच घडत असते. त्याचशिवाय या चित्रपटामध्ये प्राध्यापक हसन नुरानी आहेत जे लोकांना वाघ त्यांच्या संवर्धनाविषयी जागरुक करण्याचे काम करतात जसे आपल्या जवळपास असलेले वन्यजीवप्रेमी झटत असतात. पहिल्यांदाच असा एक चित्रपट आलाय (म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे) ज्यामध्ये आयएएस किंवा आयपीएस (जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधिक्षक) किंवा आयआरएस सेवेतील अधिकारी नाही तर आयएफएस (भारतीय परराष्ट्र सेवेतील नाही) म्हणजेच भारतीय वनसेवेतील अधिकारी ते देखील एक महिला मुख्य भूमिकेत आहे. भारतातील वन्यजीवनाविषयी पूर्वी काही चित्रपट येऊन गेले मात्र त्यामध्ये मुख्य भूमिकेमधील अधिकारी बहुतेकवेळा नायकच असतो चित्रपटामध्ये त्याचे फक्त अचाट साहस दाखवले जाते. या चित्रपटांमधून लोकांना जंगले, त्यांचे संवर्धन वन अधिकाऱ्यांच्या जीवनाविषयी समजेल असे काहीही दाखवले जात नाही. मात्र मी चित्रपट निर्मात्यांना दोष देत नाही कारण ते पैसे कमावण्यासाठी चित्रपट बनवतात, प्रेक्षकांना वस्तुस्थिती दाखवण्यासाठी बनवत नाहीत, ते काम वृत्त माध्यमांचे आहे, नाही का? म्हणूनच शेरनी या चित्रपटाचे वन्यजीवप्रेमी तसेच निसर्गप्रेमींनी दिग्दर्शक अमित मसूरकर यांचे कौतुक केले पाहिजे. त्यांनी आपल्या देशातील वन्यजीवन संवर्धनाची वस्तुस्थिती काय आहे हे दाखवून दिले आहे. चित्रपटातील नायक किंवा नायिका पन्नास-साठ लोकांशी मारमारी करताना किंवा त्यांना धूळ चारताना दाखवला पाहिजे असे नाही किंवा वाघाशी चारहात करून त्याला जेरबंद करायची गरज नसते. शेरनी हा चित्रपट आपल्याला दाखवून देतो की मुख्य भूमिका ही नायिकेची असू शकते जी वनसेवेसारख्या चाकोरीबाहेरची नोकरी करत आहे. ती खाकी घालते मात्र त्यासोबत येणाऱ्या अधिकारांचा किंवा बंदुकीचा वापर करता तिला प्रत्येकाविरुद्ध लढा द्यावा लागतो. यामध्ये अगदी तिच्या स्वकीयांचा, तिच्या कुटुंबाचाही समावेश होतो क्वचितप्रसंगी तिचा स्वतःशीही झगडा सुरू असतो तरीही ती केवळ एका प्राण्याविषयीचे किंवा माणसाविषयीचे किंवा पदासाठीचे नाही तर एकूणच तिचे कर्तव्य चोख बजावण्याचा प्रयत्न करते. अर्थात हिंदी चित्रपट म्हटल्यावर काही गोष्टी सोयीने बदलण्यात आल्या आहेत. हिंदीमधील शेरनीचा अर्थ सिंहीण असा होतो, त्याऐवजी खरे तर बाघिन असा शब्द असायला हवा होता. मात्र चित्रपटाचे शीर्षक सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी अशा बदलांकडे काणाडोळा करता येईल.

त्याचप्रमाणे नरभक्षक वाघिणीविषयी लोकांना (सामान्य माणसांना) वाटणारी भीती, काळजी किंवा अडाणीपणा अतिशय अचूकपणे चित्रित करण्यात आला आहे. भारतीयांशिवाय असा अडाणीपणा दुसरे कोण दाखवू शकते मग ती मुक्तपणे फिरणारी नरभक्षक वाघीण असो किंवा एखादा विषाणू, काळजी घेणे, नियमांचे पालन करणे, शिस्तीचे पालन करणे या सगळ्या गोष्टी आपल्या कार्यक्रमात सर्वात शेवटी असतात. त्याचवेळी छायादिग्दर्शकानेही अतिशय उत्तम कामगिरी केली आहे, लोकांच्या चेहऱ्यावरील हावभावांपासून ते तांब्याच्या खाणी, महामार्ग यासारख्या आपल्या तथाकथित विकासकामांसाठी होत असलेला वनभूमीच्या विनाशापर्यंत वन्य जीवनाच्या सद्य परिस्थितीच्या प्रत्येक पैलूचे अतिशय योग्य चित्रण करण्यात आले आहे. हा चित्रपट केवळ यंत्रणा किंवा सरकार किंवा समाजातील केवळ एका विशिष्ट वर्गाचेच नाही तर जंगलाच्या संवर्धनाची जबाबदारी घेणे अपेक्षित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे डोळे उघडतो त्यामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाचा समावेश होतो.

शेरनीची एक उत्तम गोष्ट म्हणजे त्यामध्ये पारंपरिक स्वरूपाचा खलनायक नाही; प्रत्येक पात्रामध्ये खलनायकाच्या विविध छटा आहेत (याला अपवाद केवळ वाघीणीचा) कारण प्रत्येक जण वस्तुस्थितीप्रमाणे त्याच्या किंवा तिच्या सोयीनुसार जगताना दाखवलेला आहे. चित्रपटाच्या नायिकेला जेव्हा जाणीव होते की तिचा वरिष्ठ अधिकारी चूक आहे ज्या गोष्टी करायला नको त्या करत आहे, तेव्हा तीसुद्धा एक पाऊल मागे घेण्याचाच निर्णय घेते, कारण व्यवस्थेमध्ये असेच होते. वाघिणीला मारणे हे चूक किंवा बरोबर असा कोणताही निष्कर्ष चित्रपट काढत नाही कारण जंगलांपासून हजारो मैल लांब राहून एखादा स्तंभ लिहीणे किंवा एखाद्या नरभक्षक वाघिणीचे संवर्धन करण्याविषयी तुमचे मत व्यक्त करणे सोपे आहे. मात्र अशा ठिकाणी राहून त्या परिस्थितीचा भाग असल्यास कृती करताना आपल्यापैकी किती जणांना काय योग्य किंवा काय अयोग्य याविषयी कितीवेळा स्पष्ट कल्पना असेल ते योग्य गोष्टीचा आग्रह धरतील हे मला सांगता येणार नाही. मात्र शेरनी ज्यांना जंगलाची थोडीफार ओळख आहे त्यांनी वाघांचे संवर्धन करण्यासाठी चोखाळलेला मार्ग तपासून पाहायला लावते, जे कधीही जंगलात गेले नाहीत त्यांना जंगलाविषयी विचार करायला लावते हेच या चित्रपटाचे यश आहे असे मला वाटते. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या निमित्ताने, बहुतेक वाहिन्यांनी शेरनी हा चित्रपट दाखवावा, नाहीतर किमान सर्व पालकांनी ओटीटी माध्यमांवर आपल्या मुलांना हा चित्रपट दाखवावा. या राजेशाही प्राण्याला ती सर्वोत्तम मानवंदना ठरेल. यापुढेही असे अनेक चित्रपट येवोत कारण सिनेमा हे लोकांना जागरुक करण्याचे खरोखरच अतिशय शक्तिशाली माध्यम आहे शेरनीने हा विश्वास पुन्हा एकदा अतिशय सार्थ ठरवला आहे!

 

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स 

smd156812@gmail.com

 

 

 





No comments:

Post a Comment