Thursday, 29 September 2022

संवाद कौशल्य, बांधकाम व्यवसाय आणि बिल्डर्स !














संवाद कौशल्य, बांधकाम व्यवसाय आणि बिल्डर्स !

संवाद हे  असे कौशल्य आहे जे तुम्ही शिकू शकता. ते सायकल चालवणे किंवा टायपिंगप्रमाणे आहे. त्यासाठी मेहनत घेण्याची तुमची तयारी असेल, तर तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूचा दर्जा झपाट्याने सुधारू शकता” … ब्रायन ट्रेसी

ब्रायन ट्रेसी हे कॅनडियन-अमेरिकन प्रेरणादायी सार्वजनिक वक्ते आहेत, तसेच स्व-विकासाविषयी लेखन करतात. त्यांनी जवळपास ऐंशी पुस्तकांचे लेखन केले आहे जीडझनभर भाषांमध्ये अनुवादित करण्यात आली आहेत. त्यांच्या लोकप्रिय पुस्तकांमध्ये अर्न वॉट यू आर रिअली वर्थ, इट दॅट फ्रॉग, नो एक्सक्यूज अँड सच या पुस्तकांचा समावेश होतो. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही कारण मी अमेरिकेच्या विपणन कौशल्याविषयी नेहमी म्हणतो (म्हणजे मला अतिशय कौतुक वाटते) की केवळ उत्पादनामुळेच नाही तर संवादामुळे तुम्ही यशस्वी होता. उत्पादनाचा दर्जा अर्थातच महत्त्वाचा असतो, मात्र त्याला सेवांचीही जोड हवी व या सेवा योग्य संवादाने सुरू होतातएक लक्षात ठेवा, मी योग्य संवाद म्हणतोय, चांगला किंवा वाईट नाही कारण तुम्ही टेबलाच्या कोणत्या बाजूला आहात यानुसार या संज्ञा बदलत राहतात. मात्र तुम्ही टेबलाच्या कोणत्याही बाजूला असालात तरी योग्य किंवा अयोग्य कधीही बदलत नाही.  मला या शब्दाविषयी बोलण्याची गरज किंवा निकड भासण्याचे कारण म्हणजे केवळ रिअल इस्टेटमधलीच नाही तर संपूर्ण समाजातली सध्याची परिस्थिती. या पार्श्वभूमीवर रिअल इस्टेटची (म्हणजेच बांधकाम व्यावसायिक व त्यांच्याशी संबंधित सर्वजण) संवादाची बाजू बरीच कमकुवत आहे असे म्हणावे लागेल.

मला अगदी अलिकडची एक घटना आठवतेय, ज्यामध्ये दगड खाणीच्या मालकांनी खडी(म्हणजेच दगड) व रेतीचा पुरवठा करण्यासाठी दर वाढवून देण्याची मागणी केली होती. ही सगळी अशिक्षित मंडळी होती व त्यांचे एक प्रतिनिधीमंडळ आम्हाला रिअल इस्टेट विकासकांच्या संघटनेमध्ये क्रेडाईमध्ये भेटण्यासाठी आले होते. वाटाघाटीं दरम्यान एक बांधकाम व्यावसायिक त्यांना म्हणाला की दर वाढविण्यापेक्षा पैसे(बिल पेमेन्टचा) देण्याचा कालावधी ते कमी करू शकतात. त्यांचा हा युक्तिवाद ऐकून, एक पुरवठादार म्हणाला, “माफ करा शेठ, तुम्ही ओळखले नसेल मला पण, मी तुम्हाला सप्लाय करतो, पण पेमेंटसाठी शंभर चकरा मारायला लावतात तुमचे लोक व तास तास बसून ठेवतात तुमच्या ऑफिसात आणि तुम्ही तर भेटत पण नाही ना फोन उचलत, आणि तुम्ही पेमेंट टर्म कमी करायच्या गोष्टी करता राव!” म्हणजे त्याला असे म्हणायचे होतो, की तो त्या बांधकाम व्यावसायिकाला माल पुरवत होता व केवळ त्याच्या बिलाचे पैसे उशीराच मिळत नाहीत तर बांधकाम व्यावसायिकाचे कर्मचारी त्याला पैशांसाठी त्याच्या कार्यालयामध्ये शंभरशे खेपा मारायला लावतात व तासन् तास वाटही पाहायला लावतात. एवढे करूनही बांधकाम व्यावसायिक भेटतच नाही तसेच त्याचे कॉलही उचलत नाही. मला माफ करा बांधकाम व्यावसायिक सहकाऱ्यांनो, मात्र जेव्हा संवाद साधायचा असतो तेव्हा व्यावसायिकांच्या संपूर्ण समुदायामध्ये आपला अगदी खालचा क्रमांक लागतो. ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे जी त्या ब्रँडशी किंवा संपूर्ण बांधकाम व्यवसायाच्या प्रतिमेशी निगडित आहे. म्हणूनच मी आज संवाद हा माझ्या लेखाचा विषय म्हणून निवडला आहे.

मला तुम्हाला एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगावीशी वाटते की मी सुद्धा अगदी योग्य वेळेत संवाद साधतो असे नाही किंवा मी उपदेशाचे डोस पाजत नाहीये किंवा बांधकाम व्यावसायिकांना नावेही ठेवत नाहीये जे बहुतेक माध्यमांना व सामान्य जनतेला करायला आवडते. मात्र आपल्या उद्योगामध्ये लोक कशाप्रकारे संवाद साधतात हे मी अनुभवले आहे. म्हणूनच आपल्याला सुधारणा करायची असेल तर कुणीतरी वस्तुस्थिती सांगणे आवश्यक आहे, म्हणूनच हा लेख लिहीत आहे. आपल्या सगळ्यांकडे लँड-लाईन, मोबाईल, ईमेल अशा सुविधा आहेत व आपण कागदावर पत्रंही लिहू शकतो, प्रत्यक्ष भेटण्याव्यतिरिक्त संवाद साधण्याचे हे काही मूलभूत मार्ग आहेत, बरोबर? माझे काही राहून गेले असेल तर दुरुस्त करा. रिअल इस्टेटमधील लोकांशी व्यवहार करताना मी केवळ एकाच निष्कर्षाप्रत पोहोचलो, जेव्हा दुसऱ्या व्यक्तीचे हित गुंतलेले असते (म्हणजे पैसा) किंवा दुसऱ्या व्यक्तीसाठी तुमचे उपद्रवमूल्य अतिशय जास्त असेल तरच तुमचा फोन कॉल उचलला जातो, तुमच्या वॉट्सप संदेशांना उत्तर दिले जाते. नाहीतर तुम्हाला ईमेलने उत्तर दिले जाते ते देखील अतिशय उशीराने. तुमचा वरील दोनपैकी कोणत्याही वर्गवारीमध्ये समावेश होत नसेल, तर तुम्हाला मोबाईलवर शंभरवेळा कॉल करावा लागेल, स्वीय सहायकाकडे (बहुतेक बांधकाम व्यावसायिकांकडे तसेच व्यावसायिकांकडे असतो) किंवा कार्यालयामध्ये परत कॉल करा म्हणून निरोप द्यावा लागेल. तुमचा वॉट्सप संदेश वाचला गेल्याचे तुम्हाला दिसत असेल, मात्र तुम्हाला प्रतिसाद मिळणार नाही व ईमेलबदद्ल, मी जेवढे कमी बोलेन तेवढे चांगले अशी परिस्थिती आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने सहकारी बांधकाम व्यावसायिकाशी व्यवहार करताना हे अनुभवले आहे,हो मान्य करा, किमान स्वतःपुरते तरी मान्य करा!

विनोद म्हणजे, जर तुम्ही स्वतः बांधकाम व्यावसायिक असूनही दुसऱ्या सहकारी बांधकाम व्यावसायिकांशी व्यवहार करताना अशीच परिस्थिती असते तर कल्पना करा तुम्ही सदनिकाधारक किंवा बांधकाम व्यावसायिकाचे पुरवठादार, विक्रेते किंवा सेवा पुरवठादार आहात, अशावेळी तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला तो (किंवा ती) तुम्हाला परत संपर्क करेल अशा आशेवर प्रयत्न करत राहाता. मात्र बांधकाम व्यावसायिकाला तुमच्याकडे त्याच्या फायद्याचे काही काम असत नाही तोपर्यंत तो दिवस उजाडत नाही. त्यानंतर तो तुम्हाला संपर्क करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल व यातली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जेव्ही तो सार्वजनिक ठिकाणी भेटतो तेव्हा सर्वसाधारणपणे एक टिप्पणी करतो, काय राव कॉल पण उचलत नाही तुम्ही आमचे!” म्हणजे तुमच्याशी कधीच संपर्क होऊ शकत नाही, प्रत्यक्षात मात्र तो स्वतःही तसाच जगत असतो. जेव्हा एखादा बांधकाम व्यावसायिक इतरांना म्हणतो की तुमच्याशी कधीच संपर्क होत नाही तेव्हा त्याला असे म्हणायचे असते की तुम्ही त्याला हवे तेव्हा उपलब्ध असायला हवे. रिअल इस्टेटशी संबंधित प्रत्येकाच्या बाबतीत हा अगदी सर्रास येणारा अनुभव आहे व तो कोरोना विषाणूपेक्षाही अधिक वेगाने पसरतो. बांधकाम व्यावसायिक किंवा व्यावसायिकांचे कॉल न घेणे हा केवळ सरकारी अधिकाऱ्यांचाच नव्हे तर सत्तेत असलेल्या लोकांचा जन्मसिद्ध अधिकारच आहे, मात्र तुम्ही त्यांचा एकही कॉल चुकवला तर त्यांची प्रतिक्रिया काय असते हे पाहा. मी सरकारी अधिकाऱ्यांना माफ करू शकतो कारण त्यांच्या डोक्यावर त्यांचे साहेब म्हणजेच शासनकर्ते असतात (अर्थात सरकारी अधिकाऱ्यांकडेही योग्य कारणासाठी त्यांना भेटण्याचा आटापीटा करणाऱ्या व्यक्तीला उत्तर देण्यासाठी एखादी यंत्रणा असलीच पाहिजे, असे मला वाटते. मात्र बांधकाम व्यावसायिकांचे कर्मचारीही समर्था घरच्या श्वानासारखे का असतात (आता याचा अर्थ काय होतो ते विचारू नका) हे मला कळत नाही. थोडक्यात ते उत्तर देण्याच्या बाबतीत त्यांच्या साहेबांवरही मात करतात. म्हणजे जोपर्यंत त्यांचे साहेब एखाद्या विक्रेत्याला किंवा ग्राहकाला संपर्क करण्याचा आदेश देत नाहीत तोपर्यंत ते करत नाहीत. जेव्हा एखाद्या ग्राहकाकडून पैसे वसूल करायचे असतात किंवा विक्रेत्याकडून एखादा मालाचा पुरवठा शिल्लक असतो तेव्हा हा कॉल आपण होऊन केला जातो. बांधकाम व्यावसायिकाच्या कर्मचाऱ्याने एखाद्या विक्रेत्याला कॉल करून त्याच्या कोणत्या बिलांची थकबाकी आहे हे विचारल्याचे अजूनतरी ऐकीवात नाही, असे कोणी असेल तर त्यांची जाहिरातच करायला पाहिजे, खरंच! तसेच कोणीही कर्मचारी प्रकल्पाविषयी नविन माहिती सांगण्यासाठी घर बुक केलेल्या ग्राहकांना संपर्क करत नाही किंवा हाल कैसा है जनाब का?” वगैरेसारखे मोघम प्रश्न विचारत नाही. कारण असे करणे म्हणजे रिअल इस्टेटमध्ये वेळेचा अपव्यय मानला जातो, बरोबर? मी कॉलला उत्तर न देण्याचा मुद्दा फारच ताणतोय असे तुम्हाला वाटत असेल तर तो केवळ बांधकाम व्यावसायिकांपुरताच किंवा त्याचे कर्मचारी किंवा सरकारी अधिकाऱ्यांपुरताच मर्यादित नाही. अगदी तथाकथित यशस्वी सल्लागारांनीही(म्हणजे आर्किटेक्ट, सीए, वकील इत्यादी) बांधकाम व्यावसायिकाच्या संपर्कात न राहण्याची परंपरा कायम ठेवली आहे. आता माझ्या सहकारी बांधकाम व्यावसायिकांनो तुम्ही खाजगीत बोलताना तुमच्या सल्लागारांविषयी, ते परत कॉल करण्याच्या बाबतीत किती निष्काळजी आहेत अशी तक्रार केली आहे याचा विचार करा. तुम्ही स्वतःपाशीच हे मान्य करा, जेव्हा तुमचीच कडू गोळी दुसरे कुणीतरी तुमच्या गळी उतरवते तेव्हा त्याची चव कशी लागते हे तुम्हाला कळेल.

या उद्योगामध्ये, मला माझ्या कर्मचाऱ्यांना सांगावे लागते की तुम्ही एखाद्या व्यक्तीला कॉल करता तेव्हा, त्याला एसएमएस व वॉट्सप संदेशही पाठवा, तसेच एक ईमेलही पाठवून ठेवा की आम्ही तुम्हाला संपर्क करायचा प्रयत्न करत आहोत. तसेच तुमचा एसएमएस व वॉट्सपचा एक स्क्रीनशॉटही काढून ठेवा व तो सेव्ह करा, म्हणजे जेव्हा दुसरी व्यक्ती दावा करते की त्याला एकही कॉल आला नाही किंवा संदेश मिळाला नाही तेव्हा मला तो स्क्रीनशॉट त्याला पाठवता येईल (त्याने फार काही फरक पडेल असे नाही, पण तरीही), अशी रिअल इस्टेटमधील संवादाची स्थिती दयनीय आहे. यावर उत्तर असते, “माफ करा, मी तुमचा संदेश वाचला नाही! यावर, हो बरोबर आहे त्या संदेशामध्ये येऊन तुमचा चेक घेऊन जा असे लिहीले नव्हते असेच उपरोधिक उत्तर माझ्या मनात येते! रिअल इस्टेटशी संबंधित प्रत्येक व्यक्तीच्या अशाच भावना असतात व त्यानंतरही या व्यवसायाविषयी लोकांना आदर वाटावा अशी अपेक्षा असते, व्वा!इथे लोकांना तुम्ही मेल वाचले का म्हणून कॉल करावा लागतो, नाही नाही माफ करा, तुम्हाला ईमेल मिळाले का असे विचारावे लागते. मला बांधकाम व्यावसायिकांना शिव्या घालणारे अनेक लोक दररोज भेटतात व ते ज्याप्रकारे संवाद साधतात त्यामध्ये पैशासाठी केले जाणारे कॉल न उचलणे इतकेच नाही तर मालाची पोहोच न घेणे, कागपत्रांवर स्वाक्षरी न करणे व अशा प्रत्येक गोष्टीचा समावेश होतो जी बांधकाम व्यावसायिकाला त्याच्यासाठी महत्त्वाची वाटत नाही. लोकहो, तुम्ही कॉल उचललात व सांगितले की मी काही दिवस पैसे देऊ शकत नाही किंवा संदेशाला उत्तर दिले की तुम्ही भेटू शकत नाही किंवा तुम्ही परत कॉल कराल असे सांगितले व तुम्हाला जे काही उत्तर द्यायचे असेल त्याकरता पुन्हा कॉल केला तर आयुष्यातल्या बहुतेक समस्या हाताळण्याचा हा अगदी सोपा मार्ग नाही का? या कारणाने बाह्य जगात आपला बांधकाम व्यावसायिक म्हणून किंवा रिअल इस्टेट समुदाय म्हणून आदर केला जात नाही. हे जग तुम्हाला वाटते त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहे.येथे फक्त आपला दृष्टीकोन व कृतींमुळे आपला आदर केला जातो आपल्या बँकेमध्ये किती पैसे आहेत यावरून नाही (तो सुद्धा आता उरलेला नाही), रिअल इस्टेटने व्यवसायाचे हे मूलतत्व समजून घेण्याची वेळ आता आली आहे.हो, आणखी एक मुद्दा म्हणजे कोणतीही व्यक्तीशः भेट रद्द करणे, लांबणीवर टाकणे किंवा उशीरा पोहोचणे. ज्या व्यक्ती एखाद्या बैठकीसाठी कोणत्याही बांधकाम व्यावसायिकाला भेटण्याइतपत सुदैवी होत्या (किंवा दुर्दैवी) त्यांना त्याचा परिणाम चांगला माहिती आहे. ऐनवेळी बैठक रद्द करणे, अशावेळी बैठकीच्या नियोजित वेळेनंतरही रद्द झाल्याचा संदेश किंवा कॉल येऊ शकतो, तसेच बैठकीला अनेक तास उशीरा पोहोचणे व या काळात संपर्कात न राहाणे हे सुद्धा रिअल इस्टेटमधील लोकांचे वैशिष्ट्य आहे.

मी जे आरोप करतोय त्याविषयी तुम्ही असमाधानी किंवा असहमत असाल, तर तुम्ही एक छोटेसे सर्वेक्षण करा.

तुमच्या प्रकल्पामध्ये ज्यांनी सदनिका आरक्षित केली आहे व त्यामध्ये राहायला लागले आहेत, त्यांचे तुम्हाला बिल्डर म्हणून संपर्क करण्याविषयी काय मत आहे व सदनिकेचा ताबा मिळण्यापूर्वी व नंतर काय अनुभव आहे?

.तुमच्या दहा पुरवठादारांना मालक म्हणून ऑर्डर घेण्यासाठी व नंतर पैशांसाठी तुम्हाला कॉल करण्याचा त्यांचा काय अनुभव आहे?

तुम्हाला संपर्क करण्याविषयी तुमच्या मजूर कंत्राटदारांनाही असाच प्रश्न विचारून पाहा.

आता तुमचा सीए, आर्किटेक्ट तसेच व्यावसायिक सल्लागारांना तुम्हाला संपर्क करण्याविषयी विचारा. तसेच त्यांना संपर्क करण्याविषयी तुमचा काय अनुभव आहे हे देखील लिहून काढा.

.  आता, तुमच्या दहा कर्मचाऱ्यांना तुम्हाला परवानगीसाठी किंवा त्यांच्या कामांसाठी व्यक्तीशः तसेच गटाने संपर्क करण्याविषयी विचारा, यावर त्यांची काय प्रतिक्रिया असेल ते जाणून घ्या.

.  सगळ्यात शेवटचे म्हणजे दहा मित्रांना तुम्हाला संपर्क करण्याविषयी व तुमचा प्रतिसाद याविषयी तसेच तुम्ही त्यांना संपर्क करायचा प्रयत्न करता त्याविषयी विचारा?

.  तसेच, तुमच्या दहा सहकारी विकासकांना संपर्क करायचा प्रयत्न करा व तुमची काय प्रतिक्रिया आहे ते देखील लिहून काढा.

यावरील सर्वोत्तम उपाय म्हणजे प्रत्येक प्रकल्पासाठी वॉट्सपवर एक ग्रूप तयार करा व त्यामध्ये केवळ आवश्यक अशा व्यक्तींचाच समावेश करा कारण खुल्या संवादामुळे नेहमीच मदत होते. त्याचप्रमाणे दिवसाच्या सुरुवातीला व दिवस संपताना, कार्यालयातून निघताना सगळे कॉल, संदेश, ईमेलची दखल घेण्याची सवय लावून घ्या,संबंधित व्यक्तीला किमान प्रत्त्युत्तर द्या म्हणजे तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधण्याविषयी काळजी आहे याची त्यांना खात्री पटेल.

लोकहो, कृपया हे करून पाहा, हे अतिशय महत्त्वाचे आहे व हे वॉट्सप, कॉल व ईमेल या तिन्ही गोष्टींसाठी करात्यानंतर आपल्या समुदायातच काही अतिशय ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक संवाद साधण्याविषयी अतिशय काटेकोर आहेत (श्री. सतीश मगर, श्री सुहास मर्चंट, श्री. शांतीलाल कटारिया त्यापैकी एक आहेत), जे कितीही व्यग्र असले तरीही प्रत्येक संदेशाला किंवा कॉलला प्रत्त्युत्तर देतात किंवा किमान संबंधित काम केले जात आहे याविषयी त्यांच्या चमूमार्फत कॉल करणाऱ्याला किंवा संदेश पाठविणाऱ्याला आश्वस्त तरी करतात, लोकांनाही तेवढेच हवे असते, बरोबरया लोकांकडून शिका असा सल्ला मी केवळ तरुणांनाच नव्हे तर ज्येष्ठांनाही देईन, कारण मीसुद्धा अजूनही शिकतोय, माझ्याकडूनही प्रत्येक गोष्ट बिनचूक होते असे नाही. एक लक्षात घ्या, संवाद साधणे म्हणजे तुम्हाला फार काहीतरी वेगळे करावे लागते व तुमच्या व्यग्र दिनचर्येतून वेळ काढावा लागतो असे नाही; संवाद हा दुहेरी असला पाहिजे व जोपर्यंत दोन्ही पक्षांमध्ये संवाद होतोय तोपर्यंत कोणतेही माध्यम वापरले तरी हरकत नाही. त्यासाठी तुमच्या दिमतीला इतके वेगवेगळे मार्ग असताना तुम्हाला थोडा काटेकोरपणा दाखवायचा आहे, इतकेच. मला माहितीय सेल म्हणजे काही लँड लाईन नव्हे ज्याला सतत उत्तर देण्यासाठी एक स्वतंत्र व्यक्ती नेमलेली असते (म्हणजेच ऑपरेटर), पण तुमच्याकडे कॉल रेकॉर्ड असते व ते पाहून तुम्ही संबंधित व्यक्तीला पुन्हा कॉल करू शकता. ही संवादाची अतिशय मूलभूत बाब आहे व तुमच्या स्वतःच्या ब्रँडला, तुम्हाला एक व्यक्ती म्हणून तसेच कंपनीला त्यामुळे फायदा होईल. शेवटी, मी संवाद साधण्याविषयी एक लहानशी गोष्ट देत आहे

फेकून मारलेली विट !

एक तरुण आणि यशस्वी व्यावसायिक गावातल्याच एका रस्त्यावरून प्रवास करत होता, त्याची नवी कोरी जॅग्वार भरधाव वेगाने जात होती. पार्क केलेल्या गाड्यांच्यामधून कुणी लहान मुले वेगाने धावत तर येत नाहीत ना हे तो पाहात होता व त्याला काहीतरी दिसल्याने त्याने गाडीचा वेग कमी केला.

त्याची कार रस्त्यावरून जात असताना, त्याला कुणीही लहान मुले दिसली नाहीत. मात्र अचानर एक वीट येऊन जॅग्वारच्या कडेच्या दारावर आदळली. त्याने करकचून ब्रेक दाबले व जेथून वीट फेकण्यात आली होती त्या जागेपर्यंत जॅग्वार मागे घेऊन आला. रागवलेला चालक तावातावाने कारबाहेर आला, तेथे जवळच असलेल्या एका लहान मुलाला बखोटीला पकडून, पार्क केलेल्या कारवर ढकलत ओरडून विचारले, "असे का केलेस आणि तू कोण आहेसतू करतोयस तरी काय? ती नवीन गाडी आहे व तू जी वीट फेकलीस त्यामुळे आता गाडीसाठी भरपूर खर्च करावा लागणार आहे. तू असे का केलेस?"

तो लहान मुलगा काकुळतीने म्हणाला. "महाशय मला माफ करा….पण दुसरे काय करावे मला समजले नाही," तो गयावया करू लागला. "मी वीट फेकली कारण कुणीच थांबत नव्हते..." हे बोलताना त्याच्या त्याच्या डोळ्यांमधून गालांवर अश्रू वाहात होते, त्याने एका पार्क केलेल्या कारच्या बाजूला एका जागेकडे बोट दाखवले.

"तो माझा भाऊ आहे," तो म्हणाला. "तो चाकाच्या खुर्चीला अडसर लावलेला असूनही त्यावरून खाली पडला व आता मी त्याला उचलू शकत नाही."  हुंदके देत, त्या लहान मुलाने थक्क झालेल्या त्या अधिकाऱ्याला विचारले, "त्याला परत चाकाच्या खुर्चीवर बसविण्यासाठी तुम्ही मला मदत कराल का? त्याला लागले आहे आणि माझ्यासाठी तो खूप जड आहे."

आता त्याचालकाच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता, त्याने मोठ्या कष्टाने आवंढा गिळला. त्याने चटकन त्या अपंग मुलाला परत चाकाच्या खुर्चीवर बसवले, त्यानंतर खिशातून सुती रुमाल काढला व त्याला जिथे खरचटले होते, ओल्या जखमा होत्या त्या पुसून काढल्या. त्याने त्याच्याकडे निरखून पाहिल्यावर आता काळजी करण्यासारखे काही नाही याची त्याला खात्री पटली.

"मी तुमचा आभारी आहे, देव तुमचे भले करो," तो लहान मुलगा त्या अनोळखी माणसाला अतिशय कृतज्ञतेने म्हणाला.

 

त्या माणसाकडे बोलण्यासाठी शब्दच नव्हते, तो त्या मुलाला चाकाच्या खुर्चीवर बसलेल्या भावाला ढकलत रस्त्याच्या कडेने आपल्या घरी जाताना पाहात राहिला.

तो संथ पावलांनी, आपल्या जॅग्वारकडे परत आला. तिच्यावर पडलेला पोचा ठळकपणे दिसून येत होता, मात्र त्या चालकाने कारच्या बाजूच्या दरवाजाला पडलेला पोचा दुरुस्त करण्याची तसदी घेतली नाही. त्याने एका संदेशाची आठवण राहावी यासाठी तो कोचा तसाच ठेवलातो संदेश होता

"तुमच्या आयुष्यात इतक्या भरधाव वेगाने जाऊ नका की तुमचे लक्ष वेधून घेण्यासाठी कुणालातरी तुमच्यावर वीट फेकावी लागेल!"

 

लोकहो, काळ बदलतोय व तुम्हाला तुमचे ग्राहक तसेच तुमच्या चमूचा भाग असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात राहावे लागेल, हे तुमच्या स्वतःच्याच भल्यासाठी आहे. म्हणूनच योग्य संवादाची ताकद कमी लेखू नका.वरील गोष्ट वाचल्यानंतरही, बाह्य जगाशी संवाद साधण्याचे काय महत्त्व आहे हे मी आणखी समजून सांगणे आवश्यक आहे का, आपल्या चकचकीत गाडीला पडलेला पोचा दुरुस्त करता येईल पण आपल्याला चारित्र्यावर आणि व्यवसायावर जोपोचा पडलाय त्याचे काय करणार?

 

 

संजय देशपांडे      

संजीवनी डेव्हलोपर्स

ईमेल आयडी - smd156812@gmail.com

You can read our english version @link below.

https://visonoflife.blogspot.com/2022/09/communication-real-estate-builders.html

 




















 

No comments:

Post a Comment