“पिग्मी जमातीचे आदिवासी त्यांच्या उपजीविकेसाठी जंगलांवर अवलंबून असतात. रोपे शोधणे व वापरणे, प्राण्यांचे वर्तन व जंगलाचे संवर्धन याविषयी त्यांना सगळे काही माहिती असते. या
विशेष लोकांसोबत काम करणे अत्यंत मोलाची गोष्ट आहे” … कॉर्नेली इवांगू
कॉर्नेली ई.एन. इवांगू हे काँगोचे पर्यावरणवादी आहेत व १९९६ ते २००३ पर्यंत काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकामध्ये ओकापी फाउनल रिझर्व्हच्या वनस्पती संवर्धन कार्यक्रमासाठी जबाबदार होते. मला श्री कॉर्नेली यांच्या कामाविषयी फारसे माहिती नाही मात्र मी त्यांच्या शब्दांशी अगदी सहमत आहे. आपल्याकडे कदाचित पिग्मी
जमात नसेल मात्र आपल्याकडे जंगले आहेत व त्यामध्ये व त्याच्या अवतीभोवती राहणारी माणसे आहेत व ते सगळे या जंगलांची भाषा अतिशय उत्तम प्रकारे जाणतात. मी ती अजूनही शिकतोय, मला ती शिकण्याची संधी कशी मिळाली याविषयी थोडेसे लिहीले आहे…
दिमाखदार दर्शन !
ऑक्टोबर महिना होता पण थंडी नव्हती सुरु झाली, तो दिवस खूप थकवणारा होता व आम्ही बराच काळ वाघाच्या शोधात भटकंती करत होतो, खरेतर ताडोबामध्ये असे होणे ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. आम्ही जंगलाची काही रोचक छायाचित्रे काढली होती, तरीही वाघ दिसला नसल्यामुळे आम्ही त्याच्या शोधात होतो. आजकाल मध्य भारतातील जंगलांमध्ये दुपारी व दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी पडून जाणे नेहमीचे झाले आहे. यामुळे केवळ वाघ दिसण्यावरच परिणाम होतो असे नाही तर संपूर्ण सफारीचे वेळापत्रक विस्कळीत होते, कारण डोक्यावर हुड घालून कोणतीही छायाचित्रे काढणे अक्षरशः अशक्य असते.
रस्त्यातच आम्ही सांभार हरिणाचे इशारा देणारे जोरदार चित्कार ऐकले, जे वाघ जवळपासच असल्याचे सुचवत होते.
ते तरुण वाघीण रोमाचे क्षेत्र होते (मला स्वतःला वाघांना नंबर
पेक्षा टोपण नावानेच हाक मारायला आवडते कारण त्यामुळे त्यांच्याशी भावनीक
नाते जोडले जाते) व अलिकडे काही दिवसात ती वाघीण या परिसरात दिसली नव्हती. आम्ही वाट थोडावेळ
पाहिली व अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली व त्यानंतर सांभारांचे चित्कार थंडावले. आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला मात्र येताना जास्तवेळ
तिथे थांबायचे असे ठरले. परतीच्या मार्गावर
जणु रोमा
वाघीण आमच्या स्वागतासाठी आमची वाट पाहात होती, खरेतर ती तिच्या शिकारीची वाट पाहात होती मात्र आमची त्याला काही हरकत नव्हती ! खरोखरच पर्यटक म्हणून जंगलामध्ये वाघ दिसण्यासाठी तुमच्यामध्ये संयम, सातत्य, प्रसंगावधान आणि हो नशीबाचीही साथ आवश्यक असते. जे केवळ वाघ पाहण्याच्या उद्देशाने जंगलाला भेट देतात त्यांना हे समजण्यासाठी मी हा अनुभव सांगत आहे. आणि
वाघ बघण्याची
इच्छा बाळगण्यात काहीही गैर
नाही मात्र प्रत्येकाने अगदी ताडोबासारख्या विस्तीर्ण पसरलेल्या जंगलामध्ये वाघ दिसणे
अशक्य नसले तरी किती अवघड आहे, हे समजून घेतले पाहिजे.
तुम्हाला काही वेळा तासन् तास संयम दाखवावा लागतो, जंगल कसे जगते ते शिकावे लागते व तुम्ही जे काही शिकलात ते वाघ पाहताना वापरावे लागते त्याच्या जोडीला नशीबाचीही साथ लागते. वाघ हे हरिणासारखे सहजपणे दिसत असते तर आपल्याला त्यांना पाहण्याची एवढी तीव्र इच्छा झाली नसती, बरोबर?
पर्यटन व वाघ!
आम्ही छोटी मधू या वाघिणीचे ३ बछडे खुल्या जागेत येण्यासाठी एका जागी जवळपास २ तास वाट पाहात होतो, मात्र ते बाहेर आले नाहीत. परंतु आम्ही त्यांना दाट हिरव्यागार बांबूच्या वनात हालचाल करताना पाहू शकलो. आम्ही जंगलामध्ये कमी वर्दळ असलेला भाग तपासण्याचे ठरवले, बऱ्याच
जिप्सी तिथेच थांबल्या
होत्या. ते निरव जंगल होते व सामसूम रस्त्यांवर बरेच लांब जावे लागले. त्या विभागातील शर्मिली नावाची वाघीण अलिकडे दिसलीच नव्हती, तसेच तिचे बछडेही हंगाम सुरू झाल्यापासून दिसले नव्हते व ते कदाचित दुसऱ्या
वाघाकडून मारले गेले असावेत अशी गाईड तसेच वन विभागाच्या लोकांना (खाजगीमध्ये) काळजी
वाटत होती. सरळ जाणाऱ्या रस्त्यावर लांबवर मी व चालकाने काहीतरी समोरून येताना व पुन्हा रस्त्याच्या कडेने असलेल्या झुडुपांमध्ये जाताना पाहिले. सुरुवातीला आम्हाला तो जंगली कुत्रा असावा असे वाटते, त्यानंतर चालक उद्गारला, "सर, बहुतेक बिबट्या असावा", आम्ही ज्या जागी आम्हाला तो प्राणी दिसला असे वाटले तिथपर्यंत हळूच गेलो व रस्त्याच्या कडेने असलेल्या बांबू व झुडुपांमध्ये पाहायला सुरुवात केली. आम्हाला एक लहानशी आकृती
वाकलेली व बांबूच्या पात्यांमधून आमच्याकडे पाहात असल्याचे दिसले. आश्चर्य म्हणजे तो बिबट्या नव्हता तर वाघाचा बछडा होता. तोपर्यंत प्रकाश अतिशय क्षीण झाला होता व मी काही मंद प्रकाशातही छायाचित्रे काढायला निष्णात छायाचित्रकार नाही. तरीही मी शक्य होतील तशी छायाचित्रे काढली व पुन्हा आम्ही प्रवेशद्वारापाशी पोहोचलो तेव्हा ती छायाचित्रे पाहण्यासाठी सर्व गाईड उत्सुक होते कारण ती हरवलेली वाघाची बछडी बहुतेक जगली होती. पर्यटनामुळे वाघांच्या संवर्धनात, किंवा त्यांचा किमान माग ठेवण्यात अशाप्रकारे मदत होते. परतीच्या मार्गावर आम्ही ज्या तीन बछड्यांची वाट पाहात होतो ती रस्त्यावर आली मात्र तोपर्यंत मिट्ट काळोख पसरलेला होता, हा सध्याच्या ऋतुमानाचा परिणाम होता. मात्र आम्हाला काळोखात का होईना ते दिसले व नवीन काहीतरी पाहता आले म्हणून आम्ही आनंदी होतो. म्हणूनच मला इथे हे सांगायचे आहे की काही वेळा जंगलामध्ये डोळे झाकून केवळ वाट पाहात असलेल्या जिप्सींच्या मागे किंवा प्राण्यांचे चित्कार ऐकून जाण्यापेक्षा आडवाटांनी जाण्याचा प्रयन्त करून तर पाहा, कारण तुम्हाला काय दिसेल हे तुम्हाला सांगता येत नाही, म्हणूनच जंगल रोमांचक असते!
वाघांसोबतचे सहजीवन!
ताडोबाच्या जंगलामध्ये जेव्हा कुणी माणूस एखाद्या जागी वाघांकडून मारला जातो ते तिथे वाघाचा व माणसाचा पुतळा उभारतात, म्हणजे त्यांचा आत्मा इतरांना त्रास देत नाही, असे मानले जात असल्याचे मला स्थानिकांनी सांगितले. मी जेव्हा ही कशाची मंदिरे आहेत असे स्थानिकांना विचारले तेव्हा त्यांनी हे उत्तर दिले. ताडोबाच्या परिसरात तुम्हाला मुख्य जंगलाबाहेर फेरफटका मारताना, अगदी जवळपासच्या गावांमध्ये, शेतांमध्ये, तसेच मुख्य रस्त्यावरून जाताना त्याच्या कडेलाही तुम्हाला अशी अनेक मंदिरे दिसतील.तोपर्यंत याचा अर्थ काय होतो हे मला माहिती नव्हते, मला असे वाटायचे ते एखादे ग्रामदैवत असावे, मात्र या पुतळ्यांचा काय अर्थ होतो हे जाणून घेतल्यानंतर, सफारीनंतर पायी फेरफटका मारताना मी जेव्हा हे पुतळे पाहातो, तेव्हा माझ्या मनात अनेक भावना येतात. कारण मी ज्या रस्त्यावर पायी फेरफटका मारतोय त्याच जागी एका वाघाने एका माणसाला ठार केले होते, असा विचार मनात येऊन जातो. मात्र वाघांसोबतच्या सहजीवनाचा हाच खरा अर्थ आहे, तरीही ताडोबामध्ये वाघांची संख्या यशस्वीपणे वाढते आहे, कारण येथील रहिवासी वाघासोबत सहजीवन शिकले आहेत, यासाठी वनविभागाच्या तसेच जंगलाभोवती राहणाऱ्या रहिवाशांना सलाम, कारण त्यासाठी प्रचंड धाडस लागते, आपल्या शहरातल्या आरामदायक घरांमध्ये बसून आपल्याला कधीही त्याची कल्पनाही येणार नाही. जेथे वाघ मुक्तपणे फिरत असतात त्या जंगलांच्या आजूबाजूला राहाणे किती अवघड आहे हे तुम्हाला समजून सांगणे हा या लेखाचा उद्देश आहे, विशेषतः येथे जेंव्हा अंधार पडतो तेंव्हा वाघ तुम्हाला अंधारातही पाहू शकतो पण तुम्ही मात्र वाघाला
अंधारात पाहू शकत नाही. तुम्हाला अपाय करणे हा कदाचित त्याचा हेतू नसेल, परंतु तुम्ही त्याच्यासाठी फक्त एक मांस आणि रक्ताचे प्राणी असता व उतावीळ होऊन किंवा भूकेने किंवा चुकूनही तो तुमच्यावर हल्ला करू शकतो ज्याचा एकमेव परिणाम होतो. तरीही तुम्ही त्याचा द्वेष न करता जगत राहाता, लोकहो यासाठी धाडस लागते, हे लक्षात ठेवा. तसेच जंगलाविषयी केवळ सफारीतूनच जाणून घेता येते असे नाही, तुम्ही तुमच्या रिसॉर्टच्या भोवती छोटासा फेरफटका मारून, जंगलाच्या भोवती असलेल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या एखाद्या धाबेवाल्याशी गप्पा मारून, विविध गोष्टींविषयी प्रश्न विचारून, जंगलाची भाषा शिकून घेण्यात मदत होईल.
जंगलाच्या सफारीत काळजी घ्या, ती काही फक्त मौजमजेची सहल नाही!
ताडोबाच्या एका कोअर क्षेत्रातामध्ये एका जपानी मुलीचे लहानसे स्मारक आहे जी सफारीदरम्यान वाहनातून खाली पडली व डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. मी जंगलातील सफारीमध्ये चुकून झालेले काही अपघात पाहिले आहेत व ते बहुतेक पर्यटकांच्या दुर्लक्षामुळे झाले आहेत व काही जिप्सी चालकांच्या गलथानपणामुळे झाले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही काही मौजमजेची सहल किंवा संध्याकाळी गाडीने सहज मारलेला फेरफटका नाही. हे खरे खुरे जंगल आहे, इथे रस्ते ओबडधोबड असतात विशेषतः पावसाळ्यानंतरच्या हंगामामध्ये व वाहनांना सतत हादरे बसत असतात तसेच यात सीट बेल्ट नसतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचा कॅमेरा सोबत न्यायचा असतो, जो बहुतेक छायाचित्रकारांसाठी तुमच्या शरीराच्या अवयवासारखाच असतो. अशावेळी जेव्हा तुम्हाला (म्हणजे तुमचा चालक व गाईडसह) एखादा वाघ दिसतो तेव्हा सगळीकडेएक प्रकारचा जोश चढतो व , प्रत्येकजण ते काळे व पिवळे पट्टे जवळून पाहण्यासाठी चांगली जागा मिळावी म्हणून धडपडत असतो (अर्थात मी त्यांना दोष देऊ शकत नाही)! तुम्ही जंगलाच्या सर्व नियमांचे पालन करत असाल व प्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखून असाल, तरीही तुम्ही जिप्सीमध्ये बसलेले असताना किंवा उभे असताना अति उत्साहाच्याभरात खाली पडणार नाही याची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. याचे कारण म्हणजे चालकाचे लक्ष वाघावर केंद्रित असते व ते स्वाभाविक आहे. कॅमेरे खाली पडण्याच्या व खराब होण्याच्या व त्याचशिवाय कॅमेरा वाचवण्यासाठी पर्यटक स्वतः खाली पडल्याच्या घटना जंगल सफारीमध्ये घडल्या आहेत. तुम्ही सफारीमध्ये नीट सावरून बसला नसाल तर आसनावर किंवा कडेला आदळून हाताला व पावलांना इजा होण्याची शक्यता असते. लोकहो, तुमच्या हातातून कॅमेरा रस्त्यावर खाली पडला तर पडू दे, तुम्ही नवीन कॅमेरा खरेदी करू शकता. मात्र कॅमेरा वाचविताना हाड तुडले तर ते बदलता येत नाही, हे लक्षात ठेवा. जिप्सी चालक व गाईडनही काळजी घेतली पाहिजे व अशा घटनांविषयी व त्यांच्या परिणामांविषयी पर्यटकांना इशारा दिला पाहिजे हे देखल तितकेच खरे आहे.
वरील सर्व विचित्र घटना घडूनही, मी माणसासाठी जंगलामध्ये जाणे हा सर्वोत्तम अनुभव आहे असे म्हणेन. कारण वाघ असोत किंवा नसोत, तुम्ही या जंगलाशी एकरूप होण्याचा प्रयत्न केल्यास हे किती अद्भूत, सुंदर व जादुई जग आहे याची तुम्हाला जाणीव होईल. वन्यजीवन पर्यटनाची हीच सर्वोत्तम निष्पत्ति आहे, बरोबर? म्हणूनच, तुम्हाला जेव्हा थोडासा वेळ मिळेल तेव्हा तुमच्या काँक्रिटच्या जंगलातून बाहेर पडा व जंगलांशी एकरूप व्हा, एवढेच सांगावेसे वाटते!
you can find our english version @link below.
https://visonoflife.blogspot.com/2022/10/learning-language-of-wilds-tadoba.html
Team Sanjeevani &
Jungle Belles intitiative for wildlife awareness..🐾🐾
संजय देशपांडे
No comments:
Post a Comment