Thursday 3 November 2022

ताडोबाची वाघांबरोबरील सहजीवनाची कहाणी !

 















ताडोबाची वाघांबरोबरील सहजीवनाची कहाणी !


 "जेव्हा एखादा माणूस वाघाला मारतो, तेव्हा आपण त्याला शिकार म्हणतो; जेव्हा एखादा वाघ माणसाला मारतो, त्याला आपण नरभक्षक म्हणतो"… जॉर्ज बर्नाड शॉ

जॉर्ज बर्नाड शॉ यांचा जन्म अशा देशामध्ये किंवा उपखंडामध्ये झाला होता जेथे वाघ कधीच दिसले नाहीत, म्हणजे मला म्हणायचे आहे की त्यांच्या आयुष्यात कधीही नाही. ते आयर्लंडचे होते ज्याला आपण पूर्वी इंग्लंड वा यूरोप म्हणून ओळखत असू. आता तुम्ही बर्नाड शॉ कोण होते असे विचारले तर मला माफ करा, काही नावांची काहीही ओळख देण्याची गरज नसते. साहित्याच्या क्षेत्रात शॉ यांचे नावही असेच आहे, आणि हो त्यांना १९२५ साली साहित्यासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला. शॉ जिवंत असताना, भारत त्यांच्या देशाच्या म्हणजेच ब्रिटनच्या अधिपत्याखाली होता. म्हणजेच तांत्रिकदृष्ट्या ज्या देशात वाघ आहेत अशा देशात ते जगले, मात्र त्यांनी कधी वाघ पाहिला असेल का याविषयी मला शंका वाटते. तरीही त्यांनी माणूस-वाघ नात्याविषयी जे काही लिहीले आहे ते आजही खरे आहे कारण दररोज वाघ नाही तर कुणी ना कुणी हिंस्र श्वापद माणसाकडून झालेल्या अपघातामध्ये मारले जाते (सुदैवाने शिकारीवर आता तरी बंदी आली आहे) परंतु जेव्हा एखादा वाघ एखाद्या माणसाला मारतो तेव्हा त्याला नरभक्षक किंवा माणसाचा शत्रू म्हणून घोषित केले जाते. तुम्हाला आता हा लेख कोणत्या दिशेने चालला आहे असा प्रश्न पडला असेल, तर वाघांचे मृत्यू किंवा वन्य जीवनाच्या संदर्भात होणाऱ्या वाईट घटनांविषयी तो नाही (आपल्या सगळ्यांना आता त्या अतिशय चांगल्याप्रकारे माहिती आहेत). ही गोष्ट आहे माणसाच्या वाघाच्या सहजीवनाची जे सध्या आपल्या महाराष्ट्रात होताना दिसत आहे, होय मी ताडोबाविषयी म्हणजेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाविषयी बोलत आहे, हा चंद्रपूर जिल्ह्यातील व्याघ्र अभयारण्य प्रकल्प आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या दर्जामुळे तुम्हाला अनेक कायदेशीर अधिकार मिळतात (तसेच निधीही मिळतो) मात्र ही गोष्ट केवळ त्याविषयी नाही, तर गावे, लहान अभयारण्ये, तसेच खुल्या शेतजमीनींविषयी आहे ज्या या माणूस आणि वाघा मधील विशेष गोष्टीचा भाग आहेत ती जगाला सांगितली पाहिजे.

जे लोक वाघ त्यांचे महत्त्व याविषयी अनभिज्ञ आहेत (अजूनही असे बरेच जण आहेत), त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की संपूर्ण जगात जेमतेम ७००० वाघ आहेत ज्यापैकी पन्नास टक्के म्हणजे जवळपास ३५०० वाघ आपल्या देशात आहेत त्यांची संख्या (तसेच मृत्यूही) वाढत आहे आपल्यासाठी एक देश म्हणून ही अभिमानाची गोष्ट आहे. वाघाच्या अस्तित्वामुळे एक जंगल, एक अधिवास पूर्ण होतो वन्यजीवनाच्या संवर्धनामध्ये ही अतिशय मोठी तसेच महत्त्वाची गोष्ट आहे ही गोष्ट हाताळणे सोपे नाही. वाघाला जागा खाजगीपणा लागतो तुम्ही त्याला तो देऊ शकत नसाल तर वाघ माणसांमध्ये संघर्ष होणे अटळ आहे याचा परिणाम म्हणजे दोघांपैकी एकाचा मृत्यू होतो, बहुतेक वेळा मृत्यू वाघाचाच होतो. तरीही अशा अनेक घटना झालेल्या आहेत ज्यामध्ये वाघांनी माणसांना ठार केले आहे कारण हातामध्ये कोणतेही शस्त्र नसताना माणसे वाघाची त्याच्या शक्तीची बरोबरी करूच शकत नाहीत. जागेच्या या मुद्द्यामुळे केवळ वाघांचेच नाही तर सर्व वन्य प्रजातींचे संवर्धन करणे जगभरात अतिशय अवघड होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर ताडोबा त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील जंगलांमध्ये जवळपास २०० हून अधिक वाघ आहेत ही संख्या दरवर्षी वाढते आहे. हे एका रात्रीत होणे शक्य नाही हा चमत्कार घडविण्यातील अडथळे तसेच आव्हाने, अनेक होती अजूनही आहेत; माझा लेख याविषयीच आहे. (वाघांची संख्या ही अंदाजे सांगण्यात आली आहे. मात्र जगातील माणसांच्या संख्येविरुद्ध वाघांची संख्या यातील मोठी तफावत सर्वात महत्त्वाची आहे, म्हणजे जवळपास ७०० कोटी माणसांविरुद्ध ७००० वाघ आहेत!

जे ताडोबाला भेट देतात, त्यांना माहिती आहे की इथे इतर कोणत्याही जंगलापेक्षा वाघ दिसण्याची शक्यता किती जास्त असते, आता अशी परिस्थिती अशी आहे की तुम्हाला बफर क्षेत्रात, बफर क्षेत्राच्या बाहेर ताडोबाच्या भोवती असलेल्या पर्यटन क्षेत्रामध्येही वाघ दिसू शकतात. ज्या व्यक्तींना या संज्ञा समजत नाहीत त्यांच्यासाठी सांगतो, कोअर क्षेत्र म्हणजे जंगलाचा असा भाग जेथे माणसांना कोणतीही कामे करण्यास परवानगी नसते. बफर म्हणजे कोअर क्षेत्राच्या भोवतालाचा भाग जेथे मानवी वसाहती अनेक वर्षांपासून आहेत मात्र कोणत्याही नवीन विकास कामांवर निर्बंध असतात. त्याशिवाय बफर क्षेत्राच्या बाहेरही जंगल असते ज्यामध्ये मानवी वसाहती तसेच विकासकामांना योग्य त्या प्रक्रियात्मक परवानग्यांनंतर परवानगी असतेमात्र हे सगळे नियम माणसाने बनविलेले आहेत वाघ या नियमांचे किंवा विभागांचे पालन करत नाहीत, जेथे अन्न, पाणी निवारा उपलब्ध असेल तेथे ते जातात हा निसर्ग आहे, नेमका यामुळेच संघर्ष होतो. साधारण वीसएक वर्षांपूर्वी जेव्हा नव्याने जन्मलेल्या वाघांसाठी कोअर क्षेत्र पुरेसे होईनासे झाले तेव्हा वन विभागाने जेथे वर्षानुवर्षे गावे अस्तित्वात होती अशा जागांची बफर क्षेत्रे तयार करायला सुरुवात केली. याला अधिकृतपणे बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यास गावकऱ्यांचा ठाम विरोध होता, बफर क्षेत्रामध्ये नव्या विकास कामांवर निर्बंध असल्यामुळे जमीनीचे मूल्य कमी होईल असे त्यांना वाटत होते, जे काही प्रमाणात खरे होते. मात्र जसे जसे नितीन काकोडकर, शेषराव पाटील यांच्यासारखे चांगले वनाधिकारी त्यांच्या चमूच्या प्रयत्नांमुळे ताडोबाचे नाव सर्वदूर होऊ लागले तिथे वाघ हमखास दिसून येतात अशी त्याची ख्याती पसरू लागली (समाज माध्यमे, इंटरनेटमुळे), येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला तसेच त्यांच्यासोबत येणारा पैसाही वाढला.

यामुळे ताडोबाभोवतालच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना वाघांसोबतच्या सहजीवनाचे फायदे जाणवू लागले. एकीकडे त्यांच्या जमीनीचे मूल्य विकास कामांवरील निर्बंधांमुळे कमी झाले होते, तरी दुसरीकडे वाघांच्या अस्तित्वामुळे पैसे कमविण्याचे अनेक स्रोत उघडले पर्यटन हा उत्पन्नाचा मूळ स्रोत झालागाईड, जिप्सी ड्रायव्हर म्हणून नोकरी मिळणे, पर्यटकांसाठी होमस्टेचे पर्याय उपलब्ध करून देणे, तसेच उपाहारगृहे चालविणे यासारखे अनेक पर्याय ताडोबा भोवतालाच्या परिसरामध्ये उपलब्ध आहेत. तुमची केवळ काही कौशल्ये शिकण्याची मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे. शेवटचा भाग महत्त्वाचा आहे वन विभागासाठी तसेच संपूर्ण यंत्रणेसाठी सर्वात अवघड आव्हान आहे कारण पर्यटनाद्वारे मिळवलेला पैसा असला तरीही स्थानिकांना कौशल्ये शिकवणे पर्यटन उद्योगाच्या गरजांनुसार काम करणे हे सोपे काम नव्हते. मात्र ते हळूहळू केले जात आहे परिणामी आज बफर क्षेत्रात जवळपास २० प्रवेशद्वारे आहेत. प्रत्येक प्रवेशद्वार (जंगलाच्या पर्यटन विभागाचे प्रवेशद्वार) म्हणजे पर्यटन व्यवसायाची संधी. म्हणूनच दहा वर्षांपूर्वी अगरझरी देवडा यासारख्या गावांचे बफर क्षेत्रातील प्रवेशद्वारे म्हणून घोषित करायला प्रचंड विरोध होता. मात्र आज अशी परिस्थिती आहे की मोहर्ली या कोअर क्षेत्राजवळ असलेले सीतारामपेठ हे गाव त्यांना प्रवेशद्वार देण्याची बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्याची मागणी करत आहे, कारण यामुळे पर्यटन वाढेल हे त्यांना माहिती आहे, कारण सध्यासुद्धा सीतारामपेठमध्ये वाघ दिवसापण  फिरत असतात. किंबहुना वाघांनी या परिसरातील तीन जणांना मारले आहे, तरीही ते वाघांचा द्वेष करत नाहीत किंवा गाव दुसरीकडे हलवावे अशी मागणी करत नाहीत. ते जिथे राहात आहेत तिथेच त्यांना राहायचे आहे, तसेच वाघांनाही सुरक्षित ठेवायचे आहे, वाघांसोबतच्या सहजीवनाचे याहून अधिक चांगले उदाहरण काय असू शकते.

मला असे वाटते की ताडोबाचे खरे यश (म्हणजेच या यंत्रणेचा जे भाग आहेत त्या सगळ्यांचे) म्हणजे वाघांचा किंवा वन्य प्राण्यांचा द्वेष केला जात नाही किंवा त्यांना मारले जात नाही, कारण माणूस वन्य प्राण्यांमध्ये संघर्ष आहे होऊ शकतो, पण मग आपल्या घरातही वाद होतातच नाही का? इथे प्राणी कुटुंबाचा भाग आहे वादामुळे (संघर्ष) कुटुंबातील बंध तुटणार नाहीत, हे ताडोबाचे यश आहे संपूर्ण देशामध्ये जगामध्ये याचेच अनुकरण झाले पाहिजे कारण तरच वन्यजीवनाला काही भविष्य आहे.

सरतेशेवटी, प्रशासकीय यंत्रणा म्हणजेच, वनविभागाने एक गोष्ट मान्य केली पाहिजे की पर्यटनामुळे वाघांचे संवर्धन यशस्वीपणे होण्यास मदत झाली आहे. वन विभागाच्या प्रयत्नांविषयी पूर्णपणे आदर राखत असे म्हणावेसे वाटते की वन विभागाचा पर्यटन उपविभाग अधिक सेवाभिमुख झाला पाहिजे तसेच पर्यंटन सर्वांना परवडणारे झाले पाहिजे. काही आघाड्यांवर खरोखरच बरीच सुधारणा आहे, मात्र काही आघाड्यांवर विशेषतः प्राणी दिसण्याच्या संदर्भात (मी फक्त वाघ दिसण्याविषयी बोलत नाही) सुधारणेसाठी वाव आहे, अभयारण्यातील रस्त्यांच्या पायाभूत सुविधा. रस्त्यांच्या परिस्थितीपासून ते नवीन मार्ग बनवण्यापर्यंत (अर्थात योग्य ती परवानगी घेऊन), ठराविक अंतराने प्रसाधनगृहे उभारणे, प्रवेशद्वारापाशी प्रवेशासाठी लागणारा वेळ कमी करणे अशा अनेक समस्या आहेत ज्यामुळे विशेषतः हिवाळ्यामध्ये पर्यटकांना थोडा त्रास होतो कारण प्राण्यांची हालचाल कमी असते ज्यामुळे ते कमी प्रमाणात दिसतात. मुख्य रस्ते छेदणारे काही आणखी रस्ते आवश्यक आहेत, कारण एकदा प्राणी मुख्य रस्ता ओलांडून गेल्यानंतर तो पुन्हा दिसणे अशक्य असते. पर्यटक यामुळे अतिशय वैतागतात कारण त्यांनी प्राणी पाहण्यासाठी एवढे पैसे मोजलेले असतात, केवळ झाडे पाहण्यासाठी नाही. उदाहरणार्थ पांढरपौनी पाणवठ्यापासून ते नवेगाव प्रवेशद्वारापर्यंतचा पट्टा त्यापुढचा भाग जवळपास किमीचा सरळ पट्टा आहे ज्यामध्ये दोन्ही बाजूंना जंगल गवताळ भाग आहे. एकदा एखादा वाघ किंवा अस्वल या पट्ट्यामध्ये गेला तर तुम्हाला तो प्राणी परत दिसू शकत नाही. त्यामुळे साधारण ५०० मीटर अंतरावर या रस्त्याला छेद देणारे रस्ते तयार केले तर पर्यटकांना जंगलात किंवा गवताळ पट्ट्यामध्ये प्राणी पाहता येतील. आपण यासाठी अग्निरेषेचाही वापर करू शकतो, तसेच या नवीन मार्गांचा वापर आपण अग्निरेषेसारखा करू शकतो, यापैकी जे  योग्य असेल ते केले पाहिजे, मुद्दा आहे पर्यटकांच्या गरजा समजून घेणे जे जंगलांच्या संवर्धनामध्ये महत्त्वाचे भागधारक आहेत. त्याचवेळी जेथे वेगाचे निर्बंध असतात, तेथे  सुद्धा आपण जंगलामध्ये एकेरी मार्ग ठेवतो त्यामुळेही जेव्हा वाघ आजूबाजूला असतो तेव्हा पर्यटक वैतागतात. अरुंद रस्ता एकेरी ठेवल्यास समजू शकतो मात्र जेथे दोन वाहने सहजपणे जाऊ शकतात तो नेहमी दुहेरी ठेवला पाहिजे म्हणजे पर्यटकांना निटपणे प्राणी न्याहाळता येतील.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरक्षण यंत्रणा, माझ्या माहितीप्रमाणे ताडोबातील आरक्षणाचे पैसे परत मिळत नाहीत तसेच ते हस्तांतरितही करता येत नाही, याकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे. याचे कारण म्हणजे या सहली जवळपास ६० दिवस आधी आरक्षित केल्या जातात यामुळे त्यातल्या किमान एक-दोघाजणांना काहीना काही अडचणी येऊ शकतात. अशावेळी आरक्षण हस्तांतरित करता येण्यासारखे नसल्यामुळे त्या गटाचे किंवा कुटुंबाचे आर्थिक नियोजन कोलमडते. या जगात कुठेही असेही धोरण नाही की गटातील एखादा सदस्य आजारी पडण्यासारखे वैध कारण असूनही परवाना हस्तांतरित करता येत नाही, ताडोबातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यानंतर जिप्सींची संख्या कमी करण्याचा पर्यटनासाठी जंगलाचा केवळ २०% भागच खुला ठेवण्याचा मुद्दा असो, हा अतिशय हानीकारक निर्णय आहे कारण पर्यटनामुळे वाघ किंवा वन्यजीवनावर परिणाम होत असेल तर ताडोबामध्ये पर्यटन विभागातल्या वाघांची संख्याही कशी वाढत आहे? किंबहुना पर्यटनामुळेच (सुनियंत्रित) ताडोबा जागतिक नकाशावर झळकले आहे वन्यजीवन संवर्धनाचे उदाहरण ठरले आहे. म्हणूनच, सर्व भागधारकांनो सर्व जंगले पर्यटनासाठी खुली करण्यासाठी तसेच पर्यटनावर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागाला योग्य त्या पायाभूत सुविधा देण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागण्याची वेळ आली आहे. असे झाले तर केवळ ताडोबाच नव्हे तर देशातील प्रत्येक जंगलामधील वन्यजीवन संवर्धनासाठी काही आशा आहे, आपल्या सर्वांनाही तेच हवे आहे, बरोबर?

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स 

ईमेल आयडी - smd156812@gmail.com

You can find our English version @below link.

https://visonoflife.blogspot.com/2022/10/togetherness-with-tigers-tadoba-success.html

 

 

 

 

















No comments:

Post a Comment