"शहर, रस्त्यावरील
अपघात व मामाचे पत्र खेळ!!
“सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार देणाऱ्या शहाण्या लोकांना
होणारी शिक्षा म्हणजे, वाईट
व्यक्तींच्या शासनाखाली जगावे लागणे” … प्लेटो.
अनेकांना वरील नाव माहिती नसेल परंतु तो एक महान विचारवेत्ता व ग्रीक तत्वज्ञ
होता. त्याची विद्वत्ता तेव्हाही काळाच्या पुढे होती. अशा पुरुषांनी नेहमीच त्या
अभिशापाची किंमत चुकवावी लागते, प्लेटोलाही लागली
व त्याला आयुष्याचा उत्तरार्ध तत्कालीन रोमन सरकाराच्या बंदीवासात घालवावा लागला.
शासनकर्ते प्लेटोकडे नेहमी शंकेने बघत कारण त्यांना अशी भीती वाटत असे की त्याच्या
तत्वज्ञानामुळे व ज्ञानामुळे नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव होईल, जे कुणाही शासनकर्त्याला आवडत नाही. गंमत
म्हणजे काही हजार वर्षांनंतरही परिस्थिती बदललेली नाही, अर्थात आपल्याकडे आत्ता भोवताली फारसे
प्लेटो नाहीत ही वस्तुस्थिती आहे. लेखाची अशी तत्विक सुरुवात करण्याचे कारण म्हणजे
एक घटना (अपघात) जो आता राष्ट्रीय
मुद्दा झाला आहे व समाज माध्यमांचे आभार मानले पाहिजेत, की हा मुद्दा कदाचित आंतरराष्ट्रीय मुद्दाही होईल.
पुण्यामध्ये नुकत्याच झालेल्या एका घटनेत अल्पवयीन मुलगा दारुच्या नशेत गाडी
चालवून, दुचाकीवर जाणाऱ्या दोन
व्यक्तींना धडकल्याने त्या व्यक्तींचा जीव गेला. प्रत्येक प्रकारातील सर्व
माध्यमांमध्ये (सोशल मीडिया सुद्धा) या घटनेशी संबंधित अनेक बातम्या देण्यात आल्या. या
घटनेविरोधात आवाज उठवणाऱ्यांमध्ये अनेक बड्या व्यक्ती सहभागी झाल्या यात आश्चर्य
नाही. अर्थात त्यांना ज्या व्यक्तींचा जीव गेला त्यांच्याविषयी फार काही सहानुभूती
होती असे नाही तर त्यापैकी बहुतेकांना त्यांचे अस्तित्व जाणवून द्यायचे होते व
बऱ्याच जणांनी या संधीचा वापर हिशोब चुकते करण्यासाठी पण केला. त्याचा हेतू काहीही असो, अगदी माझ्या लेखाचा समावेशही यापैकी एका वर्गवारीत केला
जाईल व असे झाल्यास मी त्याला दोष देणार नाही. परंतु एक लक्षात ठेवा ही निश्चितच
अशाप्रकारची पहिली व शेवटची घटना
नव्हती. परंतु आपल्याला भविष्यात अशाप्रकारची जीवितहानी टाळायची असेल, तर आपण त्यातून काय शिकणार आहोत? अपघातात मरण पावलेल्या तरुणांच्या पालकांविषयी
अतिशय सहानुभूती वाटते कारण कोणत्याही शब्दांनी त्यांची मुले परत येणार नाहीत. हा
लेख लिहीताना केवळ एकच इच्छा आहे की इथून पुढे एखाद्या मुलाचे आयुष्य वाचावे व
कुणाही पालकांना अशा दुःखाला सामोरे जावे लागू नये. हे जो मुलगा पोर्शे चालवत होता
त्याच्या पालकांनाही लागू होते, कारण तेदेखील
पालक आहेत व दोषी असतील किंवा नसतील (म्हणजे बरोबर किंवा चूक) कुणाही पालकांना ते
त्यांच्या मुलांना वाढवत असताना आपण काही चूक करतोय असे वाटत नाही. तरीही
मुलांकडून चुका घडतात व त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू होतात, हा माझ्या लेखाचा मुद्दा आहे. त्याचशिवाय,
मी सुद्धा तरुण मुलांचा वडील आहे व मला या
पिढीला हाताळताना येणाऱ्या समस्यांची व आपल्याला त्यांच्याकडून असलेल्या व समाजाला
पालक म्हणून आपल्याकडून असलेल्या अपेक्षांची जाणीव आहे (असे मला तरी वाटते).
ज्या व्यक्तींना या घटनेविषयी माहिती आहे ते या प्रस्तावनेकडे दुर्लक्ष करू
शकतात, परंतु ज्यांना ही घटना
माहिती नाही (जे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे) त्यांच्यासाठी सांगतो. १८ मे
रोजी शनिवारी संध्याकाळी एका तरुण मुलाने त्याचा १२वीचा निकाल त्याच्या
मित्रांसोबत साजरा केला, मद्यपान केले (जे
या वयाची मुले सर्रास करताना दिसतात, ही कटू सामाजिक वस्तुस्थिती आहे) व त्याच्या वडिलांची उंची गाडी चालवली. याच
गाडीने तो पार्टीसाठी आला होता. पुण्याच्या पूर्वेकडील उपनगरामध्ये तो गाडी चालवत
असताना, त्याचे वेगावर नियंत्रण
राहिले नाही व पहाटे ३च्या सुमाराला बाईकवरून चाललेल्या एका जोडप्याला तो धडकला,
ते सुद्धा एका पार्टीतून परत येत
होते. त्या जोडप्याचा जागीच मृत्यू झाला व गाडी चालवणाऱ्या मुलाला रस्त्यावरील
जमावाने पकडले व थोडी मारहाण केल्यानंतर त्याला पोलीसांच्या हवाली केले.
खरी गोष्ट येथून सुरू होते, हा मुलगा एका
मोठ्या व्यावसायिकाचा (ते देखील बांधकाम व्यावसायिक) मुलगा होता, तो अल्पवयीन होता व त्याच्याकडे वाहन
चालवण्याचा परवाना नव्हता. कळस म्हणजे त्या उंची कारची आरटीओकडे नोंदणीही झालेली
नव्हती किंवा तिच्यावर नंबरप्लेट नव्हती. पोलीसांनी गुन्हा दाखल केला व संबंधित
दंड संहितेअंतर्गत कलमे लावली. अशाप्रकारच्या प्रकरणांमध्ये सामान्यपणे जे होते
तेच येथे झाले. परंतु इथून पुढे जे घडले त्यामुळे
प्रचंड गदारोळ झाला,
हा माझ्या लेखाचा विषय आहे. कारण यानंतर जे
काही झाले त्यामुळे केवळ मरण पावलेल्या तरुण जोडप्याचे नातेवाईकच नव्हे तर संपूर्ण
समाजाला धक्का बसला व ज्याप्रमाणे निर्भया प्रकरणामध्ये समाजामध्ये आक्रोश होता
(काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये झालेली घटना) त्याचप्रमाणे तो या प्रकरणातही वाढत
गेला. इन्स्टाग्राम, फेसबूक आणि ट्विटर यांचे आभार, कारण यावेळी या घटनेची इतकी चर्चा झाली की
शेवटी देशाच्या पंतप्रधानपदाच्या
उमेदवारालाही त्याची दखल घ्यावी लागली व त्यावर टिप्पणी करावी लागली. माननीय उपमुख्यमंत्री
ज्यांच्याकडे गृह विभाग आहे त्यांना एक पत्रकार परिषद घ्यावी लागली. शहराचे माननीय
पोलीस आयुक्त जे गुन्हे हाताळण्याच्या बाबतीत अतिशय कठोर अधिकारी मानले जातात
त्यांना असे म्हणावे लागले, की पोलीसांनी
गुन्हा नोंदवतांना लावलेली कलमे चुकीची असल्याचे आढळले तर ते जाहीरपणे माफी
मागतील. व्वा, ही म्हणजे कमालच
झाली. कुणालाही आश्चर्य वाटेल की ज्या शहरामध्ये जिथे दररोज चार-पाच लोकांचा
अपघाती मृत्यू होतो तिथे या अपघाताने एवढे लक्ष का वेधले, हा माझ्या लेखाचा विषय आहे.
या अपघाताने सर्वांचे लक्ष वेधण्याचे कारण म्हणजे, ज्याप्रकारे अपघातानंतर यंत्रणेच्या हालचाली झाल्या
त्यामुळे मद्यपान केलेल्या तरुणाने मद्यपान केले नसल्याचे आढळून आले (वैद्यकीय
चाचणीमध्ये,
आता तर अस समोर आलेय की डॉक्टरांनी ते रक्ताचे
नमूनेच बदलले) त्यामुळे त्या मुलांच्या रक्त चाचणीमध्ये मद्याचा अंश आढळून आला नाही,
परंतु समाज माध्यमांवरील रिल्समध्ये तो
त्याच्या मित्रांसोबत रात्री उशीरापर्यंत एका परमिट रूममध्ये दारू पित असल्याचे आढळून आले आहे. जेव्हा पोलीसांनी त्या
मुलाला बाल न्याय मंडळासमोर हजर केले. त्या दिवशी रविवार असूनही अटकेनंतर दोन
तासात त्याला जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर करताना माननीय न्यायालयाने त्या
मुलाला अपघाताविषयी ३०० शब्दांचा निबंध लिहा, पंधरा दिवस आरटीओसोबत वाहतूक व्यवस्थापनासाठी काम करावे
लागेल व समुपदेशन घ्यावे लागेल, त्याचशिवाय इतरही
काही अटी घातल्या त्या अजून जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे मी त्यावर टिप्पणी करू शकत नाही. त्यामुळे जो
मुलगा दोन तरुणांच्या मृत्यूस कारणीभूत झाला, त्या तरुणांच्या कुटुंबांना त्यांच्या लाडक्या मुलांचे
मृतदेह ताब्यात मिळण्याआधीच, त्याला जामीन
मिळाला. जामीनासाठीच्या अटीही निबंध लिहीणे वगैरेसारख्या होत्या. या बातमीमुळे
अभूतपूर्व आक्रोश निर्माण झाला, ज्याची कुणी
कधीही अपेक्षा केली नसेल. मी "भारत छोडो" आंदोलन पाहिलेले नाही परंतु ते
कसे असेल याची मी कल्पना करू शकतो. प्रत्येक मंचावरील प्रत्येक व्यक्तीच्या मनात
एकंदरच यंत्रणेविषयी राग व आक्रोश होता, हा माझ्या लेखाचा विषय आहे!
तर यंत्रणेने (म्हणजे सरकारने) असे काय चूक केले ज्यामुळे जनतेमध्ये एवढा
आक्रोश होता. याचे उत्तर म्हणजे प्रत्येकाला ज्या तरुणांना अपघातात जीव गमवावा
लागला त्यांच्याविषयी आपल्या कुटुंबाप्रमाणे सहवेदना होती. कारण या शहरात जवळपास चाळीस लाख दुचाकी आहेत, त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील कुणी ना कुणी
व्यक्ती दिवसातील कोणत्याही वेळी रस्त्यावरच असते. अशी अपघाताची घटना आपल्यासोबतही होऊ शकते, हे तथ्य पचवणे अवघड आहे. त्याशिवाय जे चित्र
रंगवण्यात आले की त्या मुलाला अवघ्या काही तासात जामीन मंजूर झाला, प्रत्येकाचा सरकारी यंत्रणेशी (विशेषतः
पोलीसांशी) संपर्क येतोच, तिथे सामान्य
माणसाला कशी वागणूक मिळते हे सर्व जाणतात. मी हे पोलीस खात्यात माझे अनेक मित्र
असूनही म्हणतोय जी चांगली माणसे व चांगले अधिकारी सुध्दा आहेत. तरीही
पोलीसांची जनमानसात अशी प्रतिमा का आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे (हे
बांधकाम व्यावसायिकांनाही लागू होते). त्यानंतर न्यायालयाने जो निकाल दिला
त्याविषयी, सुविद्य माननीय
न्यायाधिशांनी कायद्यातील तरतुदींप्रमाणेच निकाल दिला असेल, परंतु याच तरतूदी जेव्हा एखादा आरोपी सामान्य कुटुंबातील
असतो तेव्हा का लावल्या जात नाहीत व या प्रकरणात एवढी घाई का करण्यात आली.
अशाप्रकारच्या लाखो प्रकरणांमध्ये लोकांना कुप्रसिद्ध “तारीख पे तारीख” चा अनुभव घ्यावा लागतो, हे या
आक्रोशामागचे आणखी एक कारण होते. या प्रकरणामध्ये खरी गंमत नंतर सुरू झाली
ज्यामुळे मला आमच्या लहानपणी खेळला जाणारा एक खेळ आठवला, तो म्हणजे “मामाचे पत्र”. या खेळामध्ये (हा खेळण्यासाठी
अगदी कमीत कमी साधने लागतात), सर्व खेळाडू सरळ
एका रांगेत बसतात व ज्याच्यावर राज्य असते तो त्यांच्याभोवती धावत असतो, त्याच्या हाती एक कागदाचा किंवा कापडाचा तुकडा
असतो व तो मोठ्याने “माझ्या मामाचं पत्रं हरवलं” असे म्हणत असतो व बसलेले खेळाडू
“आम्हाला नाही सापडलं” असे उत्तर देत असतात, तो मुलगा ते पत्र बसलेल्या एखाद्या व्यक्तीच्या मांडीवर
टाकत असे जो खेळातून बाद मानला जाई व इतरांनी दिलेले एखादे काम त्याला शिक्षा
म्हणून करावे लागे. पुण्यातील घटनेनंतरही विविध संस्थांमध्ये (म्हणजे सरकारी) हाच
खेळ सुरू झाला, त्या तरुणाला
मद्य कुणी दिले इथपासून ते असे बार बंद होण्याच्या वेळेनंतरही कसे सुरू होते,
तसेच पोर्शे गाडी नोंदणीशिवाय रस्त्यावर कशी
होती, आरोपीला देण्यात आलेली
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसारखी वागणूक व मृत तरुण जोडप्याच्या पालकांचा चौकशी
अधिकाऱ्यांकडून केला जाणारा छळ, म्हणजे ते जोडपे
(जे मित्र होते) इतक्या उशीरा रात्री का आणि कुठे चालले होते व त्यांचे एकमेकांशी काय नाते होते
अशाप्रकारचे प्रश्न (मृताच्या नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे) व यंत्रणेने इतक्या
झटपट कारवाई कशी केली व त्या मुलाला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले व जामीन
मिळाला; मला असे वाटते की यंत्रणा
समाजाचा मूलभूत नियम समजून घेण्यात अपयशी ठरली, की जेव्हा न्याय समान वेगाने व पद्धतीने सगळ्यांना दिला
जातो तेव्हाच तो जनतेला मान्य होतो, आणि तो न्याय पद्धतीने देण्यात आला असला तरीही तो एकाला वेगळा
आणि दुसऱ्याला वेगळा गतीने दिला तर तो न्याय राहत नाही.
आता संपूर्ण यंत्रणा त्यांनी कशी योग्यप्रकारे कारवाई केली आहे व दुसरा विभाग
आपले कर्तव्य पार पाडण्यात कसे अपयशी ठरले हे दाखवण्याच्या मागे लागली आहे व सगळेच
जण जणू काही "मामाचे पत्र" हा खेळ खेळत आहेत. माझा
मुद्दा असा आहे की हे सगळे कधी थांबणार आहे?
आणि दररोज प्रत्येक
वाहतूक सिग्नलला किंवा रस्त्यावर, याच शहराचे
नागरिक वाहतुकीच्या प्रत्येक नियमाचे उल्लंघन करत असतात व नागरिकांना दोष द्यायचा
असेल, तर पोलीस केवळ अशा
प्रकारे बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्या चालकांवर केवळ कठोर कारवाई करण्यासाठी
पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे त्यांचे खांदे झटकू शकत नाहीत, हा माझ्या लेखाचा मुद्दा आहे. त्याचवेळी, आपल्याकडे प्रत्येक कायदा व यंत्रणा आहे परंतु
त्या यंत्रणेशी संबंधित प्रत्येक घटकाला तिचे संरक्षण करण्याऐवजी तिचे उल्लंघन
करण्यात किंवा तिला वाकविण्यात अभिमान वाटतो (व पैसेही घेतो), थोडक्यात सांगायचे तर संपूर्ण समाज समाजाप्रती स्वत:च्या जबाबदारीविषयी डोळे, कान झाकून घेतो व त्यामध्ये या घटनेच्या निमित्ताने समाज
माध्यमांवर सक्रिय असलेल्या बहुतेक व्यक्तींचाही समावेश होतो, किंबहुना आपण त्यासंदर्भात काय करणार आहोत,
हा माझ्या लेखाचा विषय आहे!
शेवटचा मुद्दा म्हणजे, ज्यामुळे मी
अतिशय दुःखी झालो (म्हणजे कष्टी झालो, वैतागलो, चिडलो व अस्वस्थ
झालो) ती म्हणजे मृत तरुणाच्या काकांनी दिलेली प्रतिक्रिया, “आपल्या तरुण मुलांना करिअरसाठी या शहरामध्ये
पाठवावे किंवा नाही याबाबत आता आम्ही साशंक आहोत, जे त्यांच्यासाठी सर्वात सुरक्षित आहे असे आम्हाला वाटत
होते!” लोकहो, ही प्रतिक्रिया व
त्यामागच्या भावना या शहरातील प्रत्येकासाठी धोक्याचा इशारा आहेत ज्यांना या
शहराने आपल्याला जी समृद्धी दिली आहे त्यातून लाभ मिळाला आहे. त्याशिवाय आपल्या
केवळ आनंद साजरा करण्याच्या संकल्पनांचाच नव्हे तर एकूणच जीवनाविषयीच्या
दृष्टिकोनाची नव्याने व्याख्या करण्याची वेळ आली आहे. एक लक्षात ठेवा, अमेरिका अतिशय समृद्ध देश असेल, परंतु नागरिकांच्या आनंदाच्या मोजपट्टीवर
भूतानने अमेरिकेलाही मागे टाकले आहे, कारण आनंद हा मनशांतीचा परिणाम आहे व सुरक्षितता हा त्याचा आधारस्तंभ आहे. आपण सगळे कुणाचा ना कुणाचा
मुलगा/मुलगी/बहीण/ भाऊ आहोत व तसेच इतरांचेही आपल्याशी नाते आहे व आपल्याला वरील
यादीतील आपल्या कुणाही जिवलगाला
या प्रकारे गमवावे लागले तर आपण अतिशय अस्वस्थ होऊ व म्हणूनच आपण सगळ्यांनी एकत्रितपणे निर्णय घेतल्यास व त्यानुसार कृती
केल्यासच, आपण अपघात कमी करू शकतो
जी किमान एखादी हत्या मानली जाणार नाही हे नक्की; एवढे बोलून निरोप घेतो.
संजय देशपांडे
smd156812@gmail.com