Monday 6 May 2024

लोक मतदान का करतात !

 










































निवडणुका लोकांच्या असतात. हा त्यांचा निर्णय असतो. जर त्यांनी आगीकडे पाठ केली व त्यांच्या पाठी भाजून घेतल्या, तर त्यांना त्यांच्याच जखमांनवर बसण्याशिवाय पर्याय नसेल.”
― 
अब्राहम लिंकन

लोकशाहीसाठीचा सर्वोत्तम युक्तिवाद म्हणजे सामान्य मतदाराशी पाच-मिनिटे संवाद.”
― 
विन्स्टन एस. चर्चिल

तुम्ही मतदान करता म्हणजे, तुमचा आशेवर विश्वास आहे” … मी

ज्यांचे वरील उदगार आहेत त्या व्यक्ती महणजे दोन, महान नावे (अर्थात मी नव्हे) जे जगातील सर्वात महान लोकशाहींचे नेते होते (कुणाचाही अनादर करत नाही, भारत अलिकडे झाला आहे, मी भूतकाळाविषयी बोलतो आहे) व ते लोकशाहीचा कणा असलेल्या मतदारांचे डोळे उघडतात. श्री. लिंकन यांच्या अमेरिकेतील प्रतिमेची तुलना महात्मा गांधीची आपल्या देशातील प्रतिमा जोखमीच्या व श्री. चर्चिल यांच्या यूकेतील भूमिकेशी करता येऊ शकते जे दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या जोखमीच्या काळामध्ये इंग्लंडचे पंतप्रधान होते. या लेखाचे कारण म्हणजे अचानक मला राजकारणात रस निर्माण झाला आहे असे नाही किंवा मी कुणी राजकीय किंवा समाजतज्ज्ञ नाही (खर म्हणजे पुण्यामध्ये कोणत्याही विषयाचे तज्ज्ञ होण्यासाठी तुम्हाला विशेष कोणत्याही अनुभवाची  गरज नसते,) तर एक बातमी आली होती की आपल्या सार्वत्रिक किंवा १८व्या लोकसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीत तथाकथित विकसित महाराष्ट्र राज्यांमध्ये मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये मतदानाची टक्केवारी भारतात सर्वात कमी होती. आपण या शतकातील सर्वात तीव्र उन्हाळ्यांपैकी एक अनुभवत आहोत हे मान्य असले तरीही तथाकथित सुशिक्षित मतदारांची अनिच्छा हे देखील त्याचे कारण आहे ज्यांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे व हीच चिंतेची मुख्य बाब आहे असे मला वाटते. आपल्या देशातील शिक्षणाची मुख्य समस्या म्हणजे (म्हणजे सर्वसाधारणपणे) म्हणजे आपल्याला एखादी पदवी मिळाली की आपल्याला असे वाटते की आपण सर्वज्ञ आहोत, मग ते कोणतेही क्षेत्र असो, मग त्यानंतर आपण निवाडा देतो फक्त मत व्यक्त करत नाही. निवडणुकांविषयी आणखी एक महत्त्वाचा निर्वाळा म्हणजे, “यहाँ, कुछ नही बदलनेवाला (इथे काहीही बदलणार नाही), असे असेल तर मग मतदानच कशाला करायचे? इथे आपण बदलाचा मूलभूत नियमच अगदी सोयीस्करपणे विसरतो तो म्हणजे कुठल्याही बदलाची सुरुवात आपल्यापासून होते व जेव्हा आपण म्हणतो इथे काहीही बदलणार नाही व हा तर्क लावून मतदान करत नाही, तेव्हा आपणच बदल नाकारात असतो व हे सांगण्यासाठीच हा लेख प्रपंच.

लोकहो, मी आता लोकसभा निवडणुका म्हणजे काय, आपल्या देशासाठी व समाजासाठी त्या किती महत्त्वाच्या आहेत, कारण ते करण्याची गरज पडत असेल तर पुढे वाचूच नका. कारण मी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मताचे महत्त्व जाणून घ्या हे सांगायचा प्रयत्न करतोय, निवडणुका असोत किंवा नसोत त्याने फारसा फरक पडत नाही तर ! मतदान न करण्याचा दृष्टिकोन ही खरी समस्या आहे व फक्त ५८% मतदान होत असेल तर जवळपास ४२% लोकांना आपल्या समाजामध्ये त्यांचे स्वतःचे मत मोलाचे वाटत नाही हा त्यामागचा तर्क आहे. मतदान न करण्याच्या या दृष्टिकोनाचा काय परिणाम होतो याचा थोडी काल्पनिक आकडेवारी घेऊन विचार करून पाहू. लोकसभेच्या निवडणुकीत एखाद्या मतदारसंघामध्ये १०,००,००० (दहा लाख) अधिकृत उमेदवार असतील व त्यापैकी केवळ ५८% लोकांनी मतदान केले तर याचा अर्थ केवळ ५,८०,००० लोकांनी मतदान केले असा होतो. लोकसभेच्या या मतदारसंघासाठी जर पंधरा उमेदवार रिंगणात असतील व त्यापैकी चार प्रमुख पक्षांचे प्रतिनिधित्व करत असतील व त्यांना जवळपास ८०% मते मिळाली व विजेत्या ५०,००० मताधिक्याने निवडून आला, तर त्याला जास्तीत जास्त २,५०,००० मते मिळतील म्हणजे एकूण मतांपैकी केवळ २५% मते मिळतील. याचाच अर्थ निर्वाचित उमेदवार केवळ २५% मतदारांनी निवडून दिल्यामुळे संपूर्ण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करेल, अशावेळी तो किंवा ती त्यांच्या कामाला न्याय देऊ शकेल का, हा प्रश्न स्वतःलाच विचारा. यावर तुम्ही म्हणाल की दहाच्या दहा लाख मतदारांनी मतदान केले असते तरीही १००% मते एकाच व्यक्तीला मिळतील असे होणार नाही. मला हे मान्य आहे, परंतु त्या उमेदवारावर दहा लाख मतदारांचा दबाव असेल किंवा त्यांना उत्तर देण्यास तो बांधील असेल, त्यांची जबाबदारी त्याच्यावर असेल हे आपण विसरतो. कोणत्याही लोकशाहीमध्ये ५०% लोक नेहमी नाखुश असतील कारण त्यांनी मतदान केलेला उमेदवार निवडून सत्तेत आला नाही. परंतु म्हणून त्यांचे मत वाया गेले असा त्याचा अर्थ होत नाही, याचा अर्थ केवळ असा होतो की अधिक लोकांना दुसरी व्यक्ती सत्तेत यावी असे वाटते. तरीही यातून एक स्पष्ट संदेश दिला जातो तो म्हणजे तुम्हाला तुमच्या मताची ताकद मोलाची वाटते व मतदान करून तुम्ही या ताकदीचा वापर केला. मतदान न करून आपण लोकशाहीचा हाच पैलू गमावतोय हे मला सांगायचे आहे. मतदान टाळून आपण संपूर्ण देश २५% मतदारांनी निवडलेल्या उमेदवाराच्या मेहरबानीवर चालवू देत आहोत, हे आपण समजून घेतले पाहिजे.

मतदानाचा आणखी एक पैलू म्हणजे कुणीही उमेदवार निवडून आला तरी त्याला किंवा तिला माहिती असते की सर्व मतदारांनी निवडणुकीमध्ये मतदान केले असेल व तो उमेदवार त्या उमेदवारांना उत्तर देण्यास बांधील आहे विशेषतः ज्यांनी त्याला किंवा तिला मतदान केलेले नाही, कारण जेवढी मतदारांची संख्या अधिक तेवढी चांगली कामगिरी करून दाखविण्याची जबाबदारी वाढते. आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो त्याचेच उदाहरण घ्या, जेव्हा सोसायटीमध्ये करायच्या एखाद्या कामाशी संबंधित बैठकीमध्ये मतदान करण्यासाठी जेव्हा एखादा सदस्य येत नाही, तरीही ते काम करण्यासाठी सोसायटीला निर्णय घ्यावा लागतो. नंतर तो सदस्य संबंधित कामास हरकत घेतो तेव्हा त्याला तसे करण्याचा काहीही नैतिक किंवा न्यायिक सुद्धा  अधिकार नसतो कारण तो मतदान करण्यासाठी आला नाही, हेच तत्व स्थानिक पातळीवरील निवडणुका असोत (पुणे महानगरपालिका) किंवा सार्वत्रि निवडणुका असोत (लोकसभा) लागू होते, बरोबरत्यानंतर समस्या केवळ एका निवडणुकीमध्ये मतदान न करणे ही समस्या नाही तर त्यातून आपल्या जबाबदारीविषयी आपला दृष्टिकोन दिसून येतो कारण आज लोकसभा निवडणूक आहे, उद्या कदाचित विधानसभा निवडणूक असेल, त्यानंतर शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेची (महानगरपालिका) निवडणूक असेल. आपण जर अशाचप्रकारे मतदान करणे टाळत राहिलो तर आपणच चांगल्या सरकारला लायक नाही कारण आपणच सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेपासून स्वतःला लांब ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आपण तक्रार करत राहू की हे सरकार काम करत नाही, ते सरकार भ्रष्टाचारी आहे परंतु त्यावेळी आपण हे विसरतो की मतदान न करायचा पर्याय निवडून आपणच या सरकारला सत्तेत येण्याची संधी दिली आहे, हा माझ्या लेखाचा मुद्दा आहे.

शेवटचा मुद्दा म्हणजे, राजकीय पक्ष व राजकारण्यांनीही त्यांच्या वर्तनाविषयी (मला माहितीय मी स्वतःलाच मूर्ख बनवतो आहे परंतु आपण कधीही प्रयत्न सोडता कामा नये, बरोबर?) थोडे आत्मचिंतन केले पाहिजे. याचे कारण म्हणजे जेव्हा एखादा मतदार जेव्हा मतदान करतो ते व्यक्ती म्हणून किंवा पक्ष म्हणून त्यांना असले किंवा नसले तरीही ते मत, उमेदवार जेव्हा मतदारांना मतदानासाठी आवाहन करायला येतो तेव्हा त्यांना दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून, संबंधित उमेदवाराने (तसेच पक्षाने) घेतलेल्या भूमिकेमुळे दिलेले असते. जेव्हा निवडणुकीनंतर जेव्हा ते आश्वासन मोडते व भूमिका बदलली जाते, तेव्हा लोकांच्या मतदान यंत्रणेवरचा विश्वासच उडतो, परिणामी मतदान करणे टाळले जाते, हेसुद्धा आपल्या राज्यात मतदानाची टक्केवारी एवढी कमी असण्याचे कारण आहे. त्याचवेळी तुम्ही मतदारांसमोर जो कार्यक्रम ठेवता किंवा त्यांच्यावर जो आश्वासनांचा भडीमार करता त्यासाठी आधी मतदारांच्या गरजा समजून घेतल्या पाहिजेत, दुर्दैवाने त्याची परिस्थिती मात्रा प्रत्येक निवडणुकीमध्ये विशेषतः अशा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दिवसेंदिवस खालावते आहे. आपल्याला विकास हवा आहे व प्रगती हवी आहे परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, उमेदवार निवडण्यापासून ते निवडणुका जिंकण्यापर्यंत सर्व काही अशा मुद्द्यांभोवती फिरत असते ज्यामध्ये सामान्य माणसाला फारसे काही स्वारस्य नसते. तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर सध्या वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या वाचा (निवडणूक प्रचार मोहिमेच्या) किंवा सामान्य मतदारांशी चर्चा करा जे आपल्या भोवती आहेतप्रत्येक उमेदवार दुसरा पक्ष कशा चुका करतोय, ते किती भ्रष्ट आहेत, जात, धर्म, मोफ वीज, मोफत अन्नधान्य, मोफ शिक्षण, सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण, जातनिहाय जनगणना व तत्सम विषयांवर बोलातात. परंतु कुणीही विकास, खाजगी क्षेत्रातील रोजगार निर्मिती, कौशल्य विकास, परवडणारी घरे, पाणी व सार्वजनिक आरोग्य यासारख्या पायाभूत सुविधा व अशाप्रकारच्या समस्यांचे काय. त्यासंदर्भात कुणीही काही ठोस आश्वासन देत नाही, लोक निवडणुकांना कंटाळण्याचे हे आणखी एक कारण आहे. मात्र एखाद्याने काही चूक केली व आपण त्याला आणखी एक चूक करून प्रत्युत्तर दिले तर ते बरोबर होत नाही, इथेच बुद्धिमत्ता व शिक्षण यातील फरक दिसून येतो. म्हणूनच मतदान न करणाऱ्या प्रिय नागरिकांनो याविषयी विचार करा. किंबहुना जेव्हा मतदान करण्याची वेळ येते तेव्हा तथाकथित गरीब व निरक्षर लोक आपल्यासारख्या सुशिक्षितांपेक्षा अधिक सूज्ञ असतात, कारण त्यांना मतदान करून आपल्यासाठी काही आशा आहे किंवा आपल्याला काही संधी मिळून शकेल याची त्यांना जाणीव असते. त्याचशिवाय केवळ तुमचे मत देऊन तुमची जबाबदारी संपत नाही, किंबहुना ती इथून पुढे सुरू होते. तुमच्या मतामुळे पुढील पाच वर्षे तुम्हाला तुमच्या गरजांविषयी उमेदवाराला जाब विचारण्याचा हक्क असतो, कारण तो तुमच्या मतदानामुळेच निवडणून आलेला असतो.

खरे तर या लेखाचे शीर्षक लोक मतदान का करत नाहीत असे द्यावे असा विचार मी सुरुवातीला केला होता, परंतु त्यातून चुकीचा संदेश गेला असता त्यामुळे ते शीर्षक बदलून लोक मतदान का करतात असे केले. लोक मतदान करतात कारण ते बदल घडवून आणू शकतात या आशेवर त्यांचा विश्वास असतो व ती आशा कधीही मरत नाही किंबहुना प्रत्येक मतागणिक ती वाढत जाते. मित्रहो, शेवची मी एकच गोष्ट सांगेन, मतदान करणे हा केवळ तुमचा हक्कच नाही तर ते तुमच्या जिवंतपणाचे लक्षण आहे, तुमच्याकडे असलेल्या शक्तीचा तुम्ही आदर करता तसेच तुम्हाला जाणीव आहे व तुमच्याकडे असलेल्या शक्तीची तुम्हाला जाणीव झाली नाही व तुमच्याकडे असलेल्या शक्तीचा तुम्ही आदर केला नाही, इतर कोणीही तुमचा किंवा तुमच्या गरजांचा आदर करतील अशी पण अपेक्षा करू नका, म्हणूनच तुमच्या स्वाभिमानासाठी मतदान करा, एवढे सांगून निरोप घेतो!

-

संजय देशपांडे 

smd156812@gmail.com








No comments:

Post a Comment