जंगल नावाचा कथाकार !
तुमच्याकडून काहीतरी शिकण्यासाठी, जंगल मूकपणे तुमचे निरीक्षण करते व शांतपणे तुम्हाला ऐकते! तुम्हाला जंगलाकडून काही शिकायचे असेल तर
तुम्हालाही तेच करावे लागेल … मेहमत मूरत इल्दान.
जंगलात अनेक गोष्टी दडलेल्या
असतात व तुम्ही जेव्हा जंगलाच्या घनगर्द हिरवाईत प्रवेश करता व त्याच्याशी संवाद
साधता, तेव्हा तुम्ही त्याचे ऐकू
लागता … मी.
पहिले अवतरण आमच्या काळातील अतिशय
हरहुन्नरी (अनेक जण त्यांना वेडेही म्हणतात) विचारवंताचे आहे, जे तुर्कस्तानचे आहेत व माझ्यातही हेच गुण
आहेत त्यामुळे मलाही असेच बिरुद लावले जाते. परंतु आमच्यातील साधर्म्य तिथेच संपते, अर्थात जंगलांसाठीचे आमचे प्रेम हा आमच्यातील आणखी एक समान मुद्दा आहे, असे म्हटले पाहिजे. या उन्हाळ्यात जेव्ही मी
नागपूरहून पेंच व कान्हाला जाण्यासाठी निघालो, तेव्हा
हा दौरा कामासाठीही होता, तरीही मी दोन्ही ठिकाणांना
फुरसतीत भेट देऊन बराच काळ झाला होता. उन्हाळ्यात आकाश निरभ्र होते व दिवसभर
तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या वर गेला होता व मी वाघांपेक्षाही (अनेक जणांच्या
चेहऱ्यावर कुत्सित हास्य पसरेल) साल व साग वृक्षांना भेटण्यासाठी अतिशय उत्सुक
होतो. हा भूप्रदेश मला नेहमीच आकर्षित करतो, अर्थात
या पार्श्वभूमीवर वाघ पाहणे हा एक निव्वळ जादुई अनुभव असतो. परंतु गेल्या सहावर्षातील माझ्या
कान्हाच्या अनेक मागील सफारींप्रमाणेच, जेव्हा माझी कार समृद्धी महामार्गावर नागपूरच्या दिशेने
धावू लागली,
आकाशामध्ये ढग जमा होण्यास
सुरुवात झाली व मुसळधार पाऊस सुरू झाला व गारपीटीमध्ये आम्ही अशाप्रकारे अडकलो की
आम्हाल एका पुलाखाली आसरा घेणे भाग पडले व ही सफर कशी असेल हे मला समजून चुकले.
मला जंगल कुठल्याही मौसमात आवडते. मला स्वतःला जिप्सीत बसून भिजणे आवडत नसले तरीही
जेव्हा आकाश ढगाळ होते जेव्हा तुम्ही खरोखरच जंगलाचा खऱ्या अर्थाने आस्वाद घेऊ शकत
नाही. पावसानंतर जेव्हा आकाश निरभ्र होतन ही तेव्हा जंगलातील हालचाल मंदावते, कान्हातील गेल्या अनेक भेटींमध्ये माझ्यासाठी
हे नेहमीचे झाले होते. पेंच व कान्हासारख्या घनदाट हिरव्या जंगल्यांमध्ये काय होते, ही जंगले घनदाट हिरव्या साल वृक्षांची भिंत
असल्यासारखी आहेत. प्रकाश कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व काही काळे किंवा
करड्या रंगाचे होऊन जाते, या काळात पक्ष्यांचे रंगही दिसणे अशक्य होऊन जाते, जे अशा हवामानात शांत होतात. जंगलाचे संपूर्ण
जीवन चक्र सूर्याशी निगडित आहे हे यामागचे कारण असावे व अचानक जेव्हा दिवसभरासाठी
सूर्य ढगांमागे जातो तेव्हा प्राणी व पक्षी कदाचित त्यांच्या दिनचर्येविषयी
गोंधळून जात असावेत, जी
सूर्याच्या हालचालीशी निगडित असते व त्यामुळेच संपूर्ण जंगल निःस्तब्ध होते. ताडोबामध्ये काय होते (माझा अनुभव), पाऊस पडला तरी तासाभरात आकाश निरभ्र होते व
जीवन पूर्ववत होते. कान्हा व पेंचमध्ये दुर्दैवाने झाडी अतिशय दाट असल्यामुळे ढग
बराच काळ आकाशात रेंगाळतात, आता हा निसर्ग आहे व आपण त्यासंदर्भात काही करू शकत नाही.
वन्यजीवनाशी
संबंधित बातम्यांचे वार्तांकन करणाऱ्या माध्यमांना (वृत्त माध्यमांना)
त्यासंदर्भात जागरुक करण्यासाठी माझी नागपूरातील ज्येष्ठ वन अधिकाऱ्यांसोबत एक
बैठक झाली, विशेषतः हा शहरी भागात राहणाऱ्या लोकांसाठीही महत्त्वाचा
मुद्दा आहे. म्हणूनच हा काम व वन्यजीवन या दोन्हींचा समावेश असलेला दौरा होता. समृद्धी महामार्ग झाल्यापासून, मी नियमितपणे पुण्याहून नागपूरला रोड वरूनच जातो. तरीही पुणे ते औरंगाबाद हा पट्टा
त्रासदायकच आहे. पुण्यापासून जवळपास ८० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याला सर्वाधिक
वेळ लागतो. तुम्ही समृद्धी महामार्गावर असलात तरीहीस तुम्ही ९० किमी/तास एवढा वेग कायम ठेवून गेलात तरीही पुण्याहून नागपूरपर्यंत
पोहोचायला एकूण दहा तास लागतात,
जे पूर्वी जवळपास पंधरा तास लागत
असत. कान्हामध्ये पहिल्या दिवशी सकाळी आकाश काळवंडले होते, थंडगार वारा पाहात होता. सामान्यपणे
वर्षाच्या या काळामध्ये तुम्हाला पूर्ण बाह्यांचा शर्ट घालावा लागत नाही, परंतु मला जॅकेट घालावे लागले, यावरून तुम्हाला हवामानाची कल्पना येईल. तिथून सर्व सहा सफारींमध्ये
आकाश ढगांनी आच्छादलेले होते व सूर्य फक्त अधून-मधून डोकावत होता व त्यामुळे मला
साल वृक्षांची काही छायाचित्रे काढण्याची संधी मिळाली. अगदी गाईड व जिप्सी चालकही
फारसे उत्साहात नव्हते कारण अशा हवामानात वाघ व एकूणच वन्यजीवन दिसण्याची शक्यता
कमी होते हे त्यांना माहिती होते व त्यांचे म्हणणे बरोबर होते.
तुम्ही
गाईडशी संवाद साधण्यासाठी या संधीचा जास्तीत जास्त वापर करून घेतला पाहिजे व
निसर्गावर वैतागण्याऐवजी त्यांच्याकडून एकूणच जंगलाविषयी आणखी माहिती मिळवली
पाहिजे, असा सल्ला मी देईन. गाईड असोत अथवा वाहन चालक ते
जंगलातच लहानाचे मोठे झाले असल्यामुळे त्यांच्याकडे जंगलाच्या माहितीचा खजिना
असतो. तुम्ही जोपर्यंत त्यांच्याशी संवाद साधून त्यांना झाडे, ठिकाणे, वाघ
याविषयी गोष्टी सांगायला उद्युक्त करत नाही तोपर्यंत हे लोक आपणहून बोलत नाहीत, कारण
बऱ्याच पर्यटकांना हे करण्यात रस नसतो. मी
आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गोष्टीविषयी प्रश्न विचारायला सुरुवात केली व जेव्हा
मला असे वाटले की मला या जंगलांविषयी बहुतेक गोष्टी माहिती आहेत तेव्हा मला जाणीव
झाली की मला किती कमी माहिती आहे. मला गाईडने बोहेमिया बिलाई
नावाच्या वेलीविषयी व तिला हे नाव कसे पडले याविषयी सांगितले.
या वेलीला मोठी व जुळ्यांप्रमाणे
एकसारखी दिसणारी पाने असतात. एका इंग्रजाने ही वेल शोधून काढली त्याच्या जुळ्या मुलांच्या
नावावरून तिला बोहेमिया बिलाली हे नाव पडले. ही वेल अतिशय मजबूत असते व आसपासच्या
गावांमध्ये तिचा दोरखंडासारखा व या वेलीच्या पानापासून जेवणासाठी पत्रावळ्या व द्रोण तयार
करण्यासाठी वापर केला जातो. असेच एकदा आकाशात ढग दाटून आले असताना आम्ही जिप्सीत बसलेलो
होतो तेव्हा गाईडने मला एका मोठ्या झाडाची साल जवळपास १२ फूट उंच सोललेली दाखवली व
हे कुणी केले असेल असे मला विचारले. मला माहितीय गवा हा प्राणी झाडांच्या साली
खातो परंतु एवढ्या उंचीपर्यंत जाणे त्याला शक्य नाही व अगदी माकडेही हे काम करू
शकत नाहीत कारण त्यांना दातांची मर्यादा असते व वाघ, आपल्या नखांना धार लावताना व सीमा आखून
घेताना अशाप्रकारे झाडाची साल सोलू शकत नाही. तर मग हे काम कुणी केले असावे, कारण या भागामध्ये हत्तीही नाहीत. तर या
प्रश्नाचे उत्तर होते, साळींदर.
हा प्राणी किती छोटासा असतो व ही माझ्यासाठी पूर्णपणे नवीन माहिती होती. रोचक
बाब म्हणजे साळींदराचे काटे रुतत असले तरीही ते वाघांचे सर्वात आवडते खाद्य आहे व
अनेक वाघ साळींदराची शिकार करण्यात गंभीर जखमी झाले आहेत, तरीही
ते शिकार सोडत नाहीत.
यावर गाईडचे म्हणणे होते वाघाला साळींदराचे हृदय खायचे असते व याचे खरे कारण केवळ
वाघच जाणतो, तुम्हीसुद्धा हे हसण्यावारी न्याल व अनेकजण
म्हणतील की अशा फुटकळ माहितीचा काय उपयोग आहे. जर वाघ दिसणार नसेल तर जंगलात
जाण्याचा काय उपयोग आहे, आता हा तुमचा निर्णय आहे एवढेच मी म्हणेन. आपण आपला वेळ व
पैसे खर्च करून जंगलामध्ये पिवळ्या-काळ्या पट्ट्यांचा वाघ पाहायला जातो. परंतु वाघ
दिसणे हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते व निसर्ग (हवामान) हा त्यापैकी एक
महत्त्वाचा घटक आहे, ज्यावर
तुमचे नियंत्रण नसते. परंतु चालकांशी व गाईडशी संवाद साधून तुम्हाला जंगलात व
अवती-भोवती अनेक गोष्टी बघायला मिळू शकतात ज्या आपल्या वाघ पाहण्याच्या नादात मागे
पडतात. त्याचप्रमाणे जंगलाविषयीचे
असे बारिक-सारिक तपशील तुम्ही जाणून घ्यायला लागता तसे वाघाला किंवा कोणत्याही
वन्य प्राण्याला पाहणे अधिक रोचक होते, कारण आता तुम्हाला जंगलाची भाषा समजू लागली
असते व तुम्ही एकदा ते साध्य केल्यानंतर तुम्ही जंगलामध्ये वाघ दिसला किंवा नाही
दिसला तरीही कोणत्याही प्रकारच्या हवामानाचा आनंद घेऊ शकता.
मला
पेंचमध्ये यावेळी व कान्हामध्ये अलिकडे एक रोचक गोष्ट दिसून आली ती म्हणजे
रस्त्यावर फारसे वाघ चालताना दिसत नाहीत. याचे कारण म्हणजे या दोन्ही जंगलांवर
दशकभराहून अधिक काळ राज्य करणाऱ्या वाघांचा (नर व मादी) मृत्यू झाला आहे. यातील
काही वाघांचा मृत्यू वयोमानामुळे (पेंचमधील लोकप्रिय कॉलरवाली व कान्हातील मुन्ना)
व काहींचा सीमेवरून होणाऱ्या वादांमध्ये मृत्यू झाला आहे. परिणामी ज्या वाघांना
माणसांची (म्हणजेच पर्यटकांच्या जिप्सींची) सवय झाली होती ते आता नाहीत व नवीन वाघ
लाजाळू आहेत व त्यांना पर्यटकांची वाहने पाहण्याची सवय नाही. परिणामी या जंगलांमध्ये रस्त्यावर
निर्धास्तपणे चालणारे वाघ व त्यांच्या मागे जाणारी वाहने ही दृश्ये दुर्मिळ होत
चालली आहेत. नव्या बछड्यांना मोठे होण्यासाठी थोडा वेळ लागेल व तोपर्यंत लोकांनी
त्यांच्याकडे बघण्याची व कॅमेरा शटरच्या क्लिक-क्लिक आवाजाची त्यांना सवय झालेली असेल
(ताडोबातील माया वाघीणीला ही अटेन्शन खरोखरच अतिशय
आवडते). हे व्हावे यासाठी आपण अतिशय संयम राखणे व चालकांना तसेच गाईडना (व
पर्यटकांनाही) प्रशिक्षित करणे आवश्यक आहे की वाघ रस्त्यावर येईपर्यंत व जिप्सी
पाहण्यास सरावेपर्यंत संयम राखा. आपण अंतर राखतो हे मान्य आहे परंतु जोपर्यंत
वाघाला आजूबाजूला माणसे असण्याची सवय होत नाही, वाहनांमुळे त्याला काहीही धोका निर्माण होणार
नाही हे समजेपर्यंत तो नेहमी लांबच राहील. म्हणूनच बफर क्षेत्रामध्ये वाघ
दिसण्याची शक्यता अधिक असते कारण बफर क्षेत्रामध्ये वाघांना आजूबाजूला माणसे राहात
असण्याची सवय असते व त्यांना सुरक्षित वाटते, त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांमुळे ते
रस्त्यावरून लांब निघून जात नाहीत.
शेवटचा
मुद्दा म्हणजे, आम्ही पेंचमध्ये पर्यटक माहिती केंद्रांवर
विविध उद्योग चालविणाऱ्या महिलांना पेंच वन विभागाच्या (म.प्र.) विनंतीनुसार भांडी
देऊन मदत केली. खवासा बफर क्षेत्रामध्ये पर्यटकांसाठी अतिशय उत्तम व्यवसाय चालवला
जात असल्याचे पाहून अतिशय आनंद झाला. पेंच अभयारण्यातील शौचालये अतिशय स्वच्छ आहेत
व या सफारींमध्ये विविध ठिकाणी विश्रांती कक्ष आहेत. महाराष्ट्रातील सफारींनी पर्यटकांच्या
दृष्टिकोनातून याकडे बघायला हवे! आम्हाला सुदैवाने साल वृक्षांच्या
पार्श्वभूमीवर वन्यजीवनाची अतिशय सुंदर छायाचित्रे काढता आली, तरी या दौऱ्याने मला असे काहीतरी दिले जे
करण्याची मला बऱ्याच काळापासून इच्छा होती …
झेप स्वत:वरचा
विश्वासाचा !
मध्य
भारतातील जंगलांमध्ये एप्रिलच्या मध्यावर पाऊस पडत होता, तरीही
जंगल नेहमी आनंदी क्षणांनीच तुमची पाठवणी करते. ठिपकेदार हरिण आकाशामध्ये एक लांबलचक झेप
घेत असल्याचे मला टिपायचे होते व माझे छायाचित्रकारितेचे कौशल्य (हाहाहा) लक्षात
घेता, माझ्या कल्पनेपेक्षाही हे अवघड आहे हे मला
माहिती होते, कारण
हरिण हे अतिशय चपळ प्राणी असतात. त्यांची हालचाल पाहणे, चालत्या जिप्समधून कॅमेरा उचलणे व एका
हरिणाकडे तो रोखून धरणे व या
सर्व गरजांची पूर्तता वेळीच होणे कारण हे सगळे काही सेंकंदाच्या अंतराने घडते, मी कितीतरी सफारींमध्ये याचा प्रयत्न करून
पाहिला होता व अपयशी झालो होतो. याचा आणखी एक मार्ग म्हणजे अभियंत्याच्या तर्काचा
थोडा वापर करणे व जिप्सीचा वेग केव्हा कमी होतो किंवा ती एका जागी थांबलेली असते
(वाघ येण्याचा इशारा देणाऱ्या
पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या
आवाजासाठी, दुसरे
काय) याचे निरीक्षण करणे व आजूबाजूला असलेल्या हरिणांचे निरीक्षण ठेवणे व तयार
राहणे. याप्रकारचेही अडचण अशी असते की कोणते हरिण
कधी उडी मारेल हे तुम्हाला माहिती नसते. तरीही यावेळी प्राणी-पक्ष्यांच्या इशाऱ्या
वाट पाहात असताना, मी हरिणांचा एक कळप पाहिला जे ओढा ओलांडत
होते. मला माहितीय की या गटामध्ये नेहमीच काही तरुण मंडळी असतात ज्यांना हा अडथळा
वेगळ्याप्रकारे पार करायचा असतो जेणेकरून त्यांना त्यांची शक्ती आजमावता येईल व
यामध्ये थोडा दिखावाही असतो. जेव्हा त्या हरिणाने पाण्यात पाय बुडवले व ओढ्याच्या
पलिकडे लांब उडी मारली तेव्हा मी तयार होते, व सरतेशेवटी मला ते छायाचित्र मिळाले !...
यानंतर, मी
पेंच व साल वृक्षांच्या भिंतींना परत येण्याचे व त्यांच्याविषयी अधिक जाणून
घेण्याचे आश्वासन देऊन निरोप घेतला !
संजय
देशपांडे
smd156812@gmail.com
No comments:
Post a Comment