वय वाढणे म्हणजे समाधानाच्या मार्गावर मार्गक्रमण करत आत्मिक शांतीच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचा प्रवास…
प्रिय दादा, छोटा आणि बाल व सर्व तरुण प्रेरणादात्यांनो,
ज्याप्रमाणे मिशन इम्पॉसिबल किंवा फास्ट अँड फ्यूरियस या चित्रपटांच्या मालिका असतात त्याप्रमाणे वयाने मोठे होताना माझ्या काय भावना आहेत त्या व्यक्त करण्याची ही आणखी एक संधी आहे ज्याची आत्तापर्यंत तुम्हाला सवय झाली असेल (कदाचित कंटाळला असाल किंवा वैतागला असाल). काय करू मी स्वतःला रोखू शकत नाही, तुमच्याकडे वर नमूद केलेले चित्रपट न पाहण्याचा पर्याय असतो, मात्र तुमच्याकडे माझा हा लेख न स्वीकारण्याचा पर्याय नाही, अर्थात तो न वाचण्याचा किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याचा पर्याय तुमच्याकडे नक्कीच आहे, हाहाहा! माझा वाढदिवस वर्षाअखेरीस असतो, त्यामुळे माझ्या वयात ज्या वर्षाची भर पडणार आहे (किंवा जे मी मागे सोडणार आहे असे म्हणूया) केवळ त्याचाच ताळेबंद नव्हे तर माझ्या आत्तापर्यंतच्या संपूर्ण प्रवासाचा आढावा घेण्याची, इतर कुणासाठी असो किंवा नसो माझ्यासाठी उत्तम संधी असते. आता मी ५३ वर्षांचा होणार आहे व तुम्हा सगळ्यांचे आभार कारण तुमच्यामुळे मला स्वपरीक्षण करण्याची किंवा अंतर्मुख होण्याची संधी मिळते.
हे वर्ष जर काही वेळा अतिशय संथपणेही गेले मात्र तितकेच लवकरही सरले, कारण गेल्यावर्षी अभूतपूर्व अशा लॉकडाउनमध्येच जवळपास तीन
चतुर्थांश वर्ष संपले व हे वर्ष देखील त्याला अपवाद नसेल असे कुणालाही वाटले नसेल. सलग दोन वर्षे निव्वळ वाया गेली, विशेषतः शिक्षण घेत असलेल्या तरुणांसाठी (त्यामध्ये आपल्या निखिलही समावेश आहे). एकीकडे या लॉकडाउनने अनेकांना अक्षरशः उध्वस्त केले तर दुसरीकडे अनेकांना त्यातही संधी मिळली. मी या काळात ज्यांनी आपले जिवलग गमावले, ज्यांचे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात नुकसान झाले त्यांच्याविषयी पूर्णपणे आदर राखत बोलतो आहे. माझ्याविषयी सांगायचे तर मी नेहमी माझ्या अवतीभोवती असलेल्या लोकांपेक्षा अधिक सुदैवी राहिलो आहो. मी फक्त एवढेच सांगू शकतो की या काळाने मला टिकून राहायला शिकवले. हे कधीही सोपे नसते कारण आयुष्यात तुम्ही तग धरून राहता मात्र त्यामध्ये होणाऱ्या जखमांचे व्रण जसे जसे तुमचे वय एकेका वर्षाने वाढत जाते तसे तसे भरत जातात. मी देखील या निसर्ग नियमाला अपवाद नाही. एक गोष्ट मात्र नक्की गेल्या दोन वर्षात अनेक लोकांना (पुरुष व महिला) आयुष्याचा खरा अर्थ किंवा उद्दिष्ट जाणून घेण्याची वेळ आता आली आहे, नाहीतर एकेदिवशी ते खरंतर संपून जाईल व तुम्ही काहीच जगला नाहीत याची तुम्हाला जाणीव होईल. विनोद म्हणजे, हे शाश्वत सत्य किंवा तत्वज्ञान आहे, मात्र इतकी वर्षे तुम्ही ज्या किचकट गोष्टी समजून घेण्याचा अटोकाट प्रयत्न करत होता त्या समजण्यासाठी एखादी आपत्ती यावी लागते किंवा युद्ध व्हावे लागते किंवा तो क्षण यावा लागतो, आयुष्याचेही असेच असते. मानवी मानसशास्त्राच्या या नियमाला मीही अपवाद नाही. तरीही आजकाल मी माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय (माझ्या अवतीभोवती काही चांगली माणसे आहेत तसेच मी जे काही वाचतोय त्याचे आभार), तरीही जगणं म्हणजे काय हे माहिती असणे आणि त्याप्रमाणे जगणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत, बरोबर? जसे तुमच्या पिढीला सर्वकाही माहिती असते (गूगल दादा किंवा अलेक्सा ताई यांच्या कृपेने), मात्र तुम्हाला जे माहिती आहे ते अवलंबण्याची वेळ येईल तेव्हा मला काय म्हणायचे होते ते तुम्हाला समजलेच असेल. असे तर, गूगल तुम्हाला “आनंदाची” व्याख्या सांगू शकतो, मात्र त्या आनंदाची अनुभूती मलाच घ्यावी लागेल किंवा आनंदात जगावे लागेल, कारण गूगल माझ्यासाठी आनंदी होऊ शकत नाही (तसेच तो दुःखीही होऊ शकत नाही), अर्थात तसे काहीतरी करता यावे या दिशेने लॅरी पेज यांचे प्रयत्न सुरू असतील मात्र सुदैवाने त्यासाठी त्यांना स्वतःला देव व्हावे लागेल!
आनंदच कशाला असे अनेक शब्द आहेत ज्याच्या व्याख्या किंवा अर्थ आपल्याला गूगलवर मिळू शकेल, उदाहरणार्थ भाव, भावना, दुःख, हताश होणे, नैराश्य, धैर्य, एकोपा, लोभ, समाधान व सर्वात शेवटचा म्हणजे शांतता; याच सर्व शब्दांमुळे आपण एक संपूर्ण माणूस होतो व हे सर्व शब्द आपला अविभाज्य भाग असतात, आपल्याला या शब्दांचा केवळ अर्थ माहिती असतो मात्र आपण ते जगणे विसरून जातो अशी विचित्र वस्तुस्थिती आहे.
या वाढदिवसाला हीच जाणीव झालेली आहे, नाहीतर मी सुरुवातीला जे अवतरण लिहीले आहे त्याचे शब्द आठवले नसते. दादा व छोटा, एकीकडे तुम्ही व्यवसायामध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून उभे आहात म्हणून मला आनंद वाटतोय, तर दुसरीकडे माझ्या पिढीने आपले आयुष्य घडवताना ज्या चुका केल्या त्यांची पुनरावृत्ती करू नका असा इशारा मला द्यावासा वाटतो. मी कधीच असे म्हणणार नाही की चुकाच करू नका कारण सरतेशेवटी तुमच्या चुकाच तुम्हाला तुम्ही जे आहात किंवा होणार आहात तसे घडवतात, अर्थात तुम्ही केलेल्या चुकांमधूनही तुम्हाला टिकून राहता आले पाहिजे व त्यानंतर पुन्हा त्याच चुका करणार नाही हे शहाणपण अंगी बाणवले पाहिजे. अर्थात टिकून राहण्यासाठी व्यक्तीला नशीबाचीही साथ हवी, अगदी मूर्ख माणूसही मोठ्यात मोठ्या चुका करूनही टिकून राहू शखतो, मात्र एक शहाणा माणूस त्या चुकांची पुनरावृत्ती न करण्याचा धडा घेतो व तुमच्याकडे ते शहाणपण नेहमी असावे असे मला वाटते.
मला माहितीय तुम्ही शहाणे व्हावे असे जेव्हा मी म्हणतो तेव्हा तुम्ही माझ्यावर हसाल (आज नाही तर पुन्हा कधीतरी) कारण जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याकडून शहाणपणाची अपेक्षा करते तेव्हा आधी ती स्वतः शहाणी असली पाहिजे असाच विचार तुम्ही करत असाल, नाही का? मात्र हे म्हणजे तुम्हाला एखादी वस्तू दाखवण्यासाठी त्या वस्तूकडे दिशानिर्देश करणारे हाताचे बोट दाखविणे (झेन स्पीक्स), कारण माझ्या हाताची बोटे नाही का? म्हणजे ती वस्तू नाही मात्र ती वस्तू शोधण्यासाठी तुम्ही माझ्या बोटाचा वापर करू शकता. तुम्ही शहाणे व्हावे ही माझी इच्छाही अशीच आहे, एवढेच मी म्हणू शकतो. आणखी एक पैलू म्हणजे, माझी पिढी आणखी एका बाबतीत तुमच्यापेक्षा सुदैवी होती, ती म्हणजे आम्हाला समाधानाचा अर्थ समजला होता व आम्ही त्याप्रमाणेच जगत होतो. मात्र दुर्दैवाने आपल्यापैकी बहुतेकजण जसे व्यावसायिक आयुष्यात यशस्वी (हे देखील एक मिथ्य आहे) होत जातात तसे ही गोष्ट विसरतात व तेच आपल्या ताणतणावांचे मुख्य कारण आहे. तुमच्या पिढीमध्ये समाधान अतिशय कमी आहे, कारण सुरुवातीपासूनच तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध असतात व प्रत्येक चांगली गोष्ट तुम्हाला मिळणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे असेच तुम्हाला वाटते. मी तुम्हाला दोष देत नाही कारण तुम्हाला असे वाटायला लावणे हा बहुतांशी आमच्याच पिढीचा दोष आहे. म्हणूनच तुमच्यापुढील आव्हाने आमच्यापेक्षा कितीतरी मोठी आहेत. ती केवळ आरक्षण, सरकारी धोरणे, तुमचे गुण किंवा नविन संधी एवढीच नाहीत तर आयुष्यात यशस्वी होण्याविषयीचा तुमचा दृष्टिकोन व खऱ्या यशाचा अर्थ समजून घेणे ही आहेत, जे अतिशय महत्त्वाचे आहे एवढेच मला आज तुम्हाला सांगावेसे वाटते.
मी अतिशय सुदैवी होतो व आहे कारण मी कदाचित यशस्वी नसेन, मात्र त्याचा अर्थ जाणून घेण्याच्या दिशेने मार्गक्रमण करतोय, कारण तेव्हाच मला त्यानुसार जगता येईल. तुमचे आत्तापर्यंतचे माझे ज्ञानामृत पिऊन झाले असेल, तर त्याचे आणखी काही थेंब पुढे आहेत. मला व्यवसाय तसेच वैयक्तिक जीवनाविषयी जे काही उमजले ते या दहा मुद्द्यांमध्ये सांगितले आहे व अर्थात मीसुद्धा त्याप्रमाणेच जगू शकतोय असे नाही, परत हास्य ..!
१. तुमचे काम व तुमचे वैयक्तिक नातेसंबंध कधीही एकत्र करू नका.
२. भावनिक जरूर व्हा व भावनांचा आदर करा मात्र कधीही भावनांना तुमच्या वागण्याचा ताबा घेऊ देऊ नका.
३. रागावर नियंत्रण ठेवण्याऐवजी राग येणारच नाही असा प्रयत्न करा.
४. चांगले व वाईट याच्या तुमच्या स्वतःच्या व्याख्या तयार करा व तुम्ही जी व्याख्या तयार केली आहे तिचा आदर करा.
५. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात किमान एक व्यक्ती ही अशी असेल जिला तुमच्या आनंदात आनंद वाटतो, तुमच्या दुःखात दुःख वाटते, तर तुमचे आयुष्य नक्कीच जगण्यासारखे आहे.
६. तुम्हाला एखादी गोष्ट बोचत असल्यास तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता किंवा जिची मनापासून काळजी करता तिच्यापासून कधीच लपवू नका.
७. इतर व्यक्तीचा अनुभव, ज्ञान आणि वेळ या तीन गोष्टींचा नेहमीच आदर करा.
८. जेव्हा कर्तव्य व वैयक्तिक किंवा व्यावसायिक नफा किंवा तोटा यामध्ये निवड करायची वेळ येते तेव्हा, नेहमी कर्तव्यच निवडा.
९. सृजनशील राहा कारण त्यामुळेच तुमच्यात अस्सलपणा येईल व नेहमी त्याचाच आदर केला जातो (अर्थात त्यामुळे तुम्ही नावडतेही होता).
१०. सर्वात शेवटचे म्हणजे, तुम्ही जे काही आहात त्याची कधीही लाज बाळगू नका, नेहमी एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा व ती एक कायम चालणारी प्रक्रिया असते.
आणखी एक गोष्ट, (खरोखर फक्त एकच), आयुष्यात कधीही अशी कुठलीही गोष्ट करू नका ज्यामुळे तुमच्या आईला वाईट वाटेल, कारण ती नेहमी तुमच्या अवतीभोवती तुमच्यावर लक्ष ठेवून होती व राहील. माझी काळजी करू नका, मी कधीही एक चांगला शिक्षक नव्हतो मात्र कधीकधी तुमच्यातील सर्वोत्तम बाहेर येण्यासाठी एका वाईट शिक्षकाची गरज असते, तो खरोखर किती वाईट शिक्षक आहे हे सिद्ध करण्यासाठी, विकट
हास्य! इथवर, वाचण्यासाठी व मी जसा आहे तसे मला स्वीकारण्यासाठी पुन्हा एकदा आभार. मोठे होण्याचा माझा अर्थ मला उमजावा यासाठी मला मदत करणाऱ्या प्रत्येकासाठी हे वाक्य आहे, विशेषतः माझ्या सर्व मित्रांसाठी कारण ते सगळे माझ्या अतिशय खडतर काळात माझ्या पाठीशी उभे राहिले. हा प्रवास सुरूच आहे व आत्तापर्यंतचा प्रवास केवळ तुमच्या सोबतीमुळेच सुखकर झाला …
You can read in English version:
http://visonoflife.blogspot.com/2021/12/growing-up-journey-ever-on.html
बाबा (संज्या, पांड्या, देशू, चंकी, मामा, काका)
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
smd156812@gmail.com
No comments:
Post a Comment