“गरुड ज्या वादळांमध्ये टिकून राहतो, ती वादळेसुद्धा त्याचा आदर करतात.” … मातशोना धलिवायो.
मातशोना धलिवायो हे कॅनडातील तत्वज्ञ, उद्योजक व द लिटिल बुक ऑफ इस्पिरेशन, क्रिएटीव्हीटी, द बुक, ५० लेसन्स एव्हरी वाईज मदर टिचेस हर सन, १०० लेसन्स एव्हरी ग्रेट मॅन वाँट्स यू टू नो व लालीबेलाज वाईज मॅन यासारख्या पुस्तकांचे लेखक आहेत. वरील उदाहरणांमधून ते निसर्गाच्या तत्वज्ञानाची व्यवस्थापनाशी किती सुरेख सांगड घालतात हे दिसून येते. माझ्या या लेखाचा विषय प्रामुख्याने गरुड हाच असल्यामुळे मला वरील अवतरण त्यासाठी अतिशय योग्य वाटले. पुण्याच्या अवती-भोवती विशेषतः पूर्व उत्तरेकडील गवताळ पट्ट्यांविषयी मला अलिकडे फार उत्सुकता वाटते (काहीजण मला वेड लागले आहे असे म्हणू शकतात), यामध्ये पुणे-सोलापूर रस्ता, पुणे-सातारा रस्ता या मधील प्रदेशांचा समावेश होतो. आधीच सांगितल्याप्रमाणे, हे पट्टे नैसर्गिक पर्जन्यछायेच्या प्रदेशात असल्यामुळे ते खऱ्या अर्थाने गवताळ जंगले आहेत व बरेचदा ती गवती कुरणे आहेत असा गैरसमज होतो. या गवताळ पट्ट्यांमध्ये (नैसर्गिक स्वरुपातील) जलस्रोत तुरळक प्रमाणात असतात. हे पट्टे बहुतेकवेळा डोंगराळ व पठाराच्या भागांचे मिश्रण असतात, त्यावर झुडुपे असतात व क्वचित अधेमधे एखादे मोठे झाड असते. म्हणूनच अनेक लोकांना (म्हणजे अगदी वन विभागाच्याही) हे पट्टे म्हणजे जंगल आहे असे वाटतच नाही. जेव्हा आपण “जंगल” असे म्हणतो तेव्हा पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे भरपूर हिरवाई, घनदाट जंगल, रंगीबेरंगी पक्षी, सरपटणारे प्राणी असे एकंदरीतच अतिशय प्रसन्न वातावरण आपल्या डोळ्यासमोर येते. मात्र या गवताळ पट्ट्यांमध्ये, मॉन्सूनच्या अखेरच्या काळात व मॉन्सूननंतर एका महिन्यापर्यंत सगळीकडे हिरवे असते, जंगली फुले बहरलेली असतात. मात्र लवकरच हे दृश्य पुन्हा सामान्य होते व पिवळ्या, करड्या व काळपट रंगांनी आच्छादले जाते.
हे गवताळ प्रदेश दिसायला रुक्ष व ओसाड असले तरीही गैरसमज करून घेऊ नका. करड्या व काळ्या रंगाने आच्छादलेल्या या पट्ट्यांमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण व सुंदर प्रजाती पाहायला मिळतात, ज्या तुम्हाला एरवी घनदाट जंगलांमध्ये पाहायला मिळणार नाहीत. लांडगा, तरस व खोकड या शिकारी प्राण्यांच्या प्रजाती अशा पट्ट्यांमध्ये हमखास आढळतात, तर आकाशामध्ये शिकारी पक्षी उडत असतात. या गवताळ पट्ट्यांमध्ये कदाचित सर्वाधिक “शिकारी पक्षी” आढळतात, यामध्ये आखुड नखांचा सर्पगरुड, ससाणा, घुबड व इतरही अनेक पक्ष्यांचा समावेश होतो. याचे कारण म्हणजे इथे सरपटणारे प्राणी, खारी व गवताळ पट्ट्यांमध्ये आढळणारे लहान पक्षी यांच्या स्वरुपात मुबलक खाद्य उपलब्ध असते (जे खरेतर झपाट्याने नामशेष होत चालले आहे). याशिवाय गरुड क्वचितप्रसंगी एखाद्या चिंकारा हरिणाचे पाडस किंवा एखाद्या बकरीच्या कोकराचीही शिकार करू शकतो. एवढी मोठी शिकार करू शकणारा पक्षी म्हणजे, स्टेपी गरुड, तो या गवताळ पट्ट्यांमध्ये आकाशाचा राजा असतो.
स्टेपी गरुड हा आकाराने खरोखरच मोठा व अतिशय आकर्षक शिकारी पक्षी आहे. पूर्णपणे वाढ झालेल्या स्टेपी गरुडाची एकूण लांबी ६० ते ८९ सेमी (२४ ते ३५ इंच) एवढी असू शकते. या प्रजातीच्या पूर्णपणे वाढ झालेल्या गरुडांची पंखांचा फैलाव अतिशय वेगवेगळा असू शकतो, सर्वात लहान स्टेपी गरुडाच्या पंखांचा फैलाव १६५ ते १७४ सेमी (५ फूट ५ इंच ते ५ फूट ९ इंच) इतका कमी ते सर्वाधिक फैलाव २५० ते २६२ सेमी (८ फूट २ इंच ते ८ फूट ७ इंच एवढी असू शकतो). स्टेपी गरुड ही गरुडाची अतिशय वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती आहे. तो विशेषतः जमीनीवरील खारींची त्यांच्या प्रजनन भूमीमध्ये शिकार करतो, त्याशिवाय तो इतर लहान सस्तन प्राणी व सावजाची शिकार करतो, ज्यावेळी जमीनीवरील खारी कमी सापडतात तेव्हा इतर प्राण्यांची शिकार अधिक करतो. स्टेपी गरुड जिथे आढळतात त्या बहुतांशी वृक्षरहित क्षेत्रांमध्ये, हे गरुड थोडेसे उंचावर घरटे बांधतात. बहुतेकवेळा हे जमीनीच्या वर दिसणारा एखाद्या खडकाळ भागावर किंवा त्याच्या शेजारी घरटे बांधतात. काही मात्र सपाट, उघड्या मैदानावर, सपाट घरटे बांधतात. जमीनीवर घरटे बांधणारा स्टेपी गरुड हा एकमेव गरुड आहे.
हा डिसेंबरचा पहिला आठवडा आहे, यंदा नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत पाऊस होऊनही आतापासूनच बरेचसे गवत पिवळसर-करडे दिसू लागले आहे. यावेळच्या भेटीमध्ये मला डोंगर व सपाट भागांचा एक पट्टा दिसला त्याच्या खाली शेते पसरलेली होती. येथे शंभराहून अधिक गरुड उडत होते. हे दृश्य डिस्नेच्या एखाद्या चित्रपटातील असल्यासारखे वाटत होते, ज्यामध्ये शेकडो ड्रॅगन उड्डाण करून आकाश रंगवून टाकतात.
यातला एकमेव फरक म्हणजे त्यातील बरेचसे पक्षी करड्या काळ्या पिसांचे स्टेपी गरुड होते. शिकारी पक्ष्यांमधील या “वडिलधाऱ्याचे” इथे वर्चस्व असल्यामुळे इतर शिकारी पक्षी इकडे फिरकत नाहीत यात आश्चर्य नाही. मला हे दृश्य पाहिल्यावर अत्यानंद झाला, एखाद्या खजिना गवसल्यासारखेच वाटले कारण आपल्या शहरी जंगलांमध्येच तर सोडाच अगदी मुख्य जंगलांमध्येही गरुड दिसणे व त्यांची छायाचित्रे काढणे अवघड असते. कारण ते झाडांच्या शेंड्यावर बसलेले असतात. मात्र इथे, मला जमीनीवर, झुडुपांवर, खडकांवर व अगदी डोळ्यांच्या पातळीवर उडताना पाहता आले. दुर्दैवाने, त्यांचे हे वसतिस्थान अखेरचा श्वास मोजत आहे जर आपण वेगाने पावले उचलली नाहीत व त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलो नाही. एकतर यापैकी बरेच गवताळ पट्टे खाजगी मालकीचे आहेत व दुसरे म्हणजे हे गवताळ पट्टे कोणत्याही प्रकारे संरक्षित नाहीत. त्यामुळे शेतीची कामे, भटकी कुत्री, जमीनीचे उत्खनन असे सगळे प्रकार इथे चालले होते. वरील तिन्ही बाबींमुळे स्टेपी गरुडाचे सावज म्हणजेच सरपटणारे प्राणी, खारी व गवतातील लहान पक्षी नष्ट होत चालले आहेत. यातील एकच चांगली गोष्ट म्हणजे हे ठिकाण कोणत्याही मुख्य रस्त्यापासून लांब आहे, त्यामुळे वाहनांची वर्दळ फारशी नव्हती ही दिलासादायक बाब होती.
अशी अनेक ठिकाणे (वसतिस्थाने) शेवटचा श्वास मोजत आहेत व आज आपण त्यांना वसतिस्थाने म्हणत असू तर उद्या ती नेपाळी गरुडासारख्या अनेक प्रजातींसाठी दफनभूमी ठरतील. कारण स्टेपी गरुडासारख्या अनेक प्रजाती जगण्यासाठी पूर्णपणे या गवताळ पट्ट्यांवर अवलंबून आहेत. मला सगळ्यात जास्ती या गोष्टीचे आश्चर्य वाटते की सरकार तसेच स्वयंसेवी संस्था (त्यांची भूमिका कदाचित लहान असेल) पुढाकार घेऊन, पर्यटनाद्वारे महसूल मिळविण्यासाठी या वसतिस्थानांचा वापर का करत नाही. ही वसतिस्थाने तसेच येथील प्राणी व पक्षी टिकविण्यासाठी हा नक्कीच एक हमखास उपाय आहे. कारण जंगले केवळ सुरक्षित असा शब्द लावून म्हणून घोषित केल्याने ती सुरक्षित होत नाहीत, हे आपण नेहमी पाहात आलो आहोत, बरोबर? एका बाजूला आपण येथील स्थानिकांना जागरुक करण्याचा प्रयत्न केला व या जंगलांना मिळकतीचे साधन म्हणून वापरले तर आपल्याला लोकांना अशा जागांची ओळख करून द्यावी लागेल जे इथे येण्यासाठी पैसे खर्च करतील व या गवताळ प्रदेशातील वन्यजीवनाचा आनंद घेतील, मात्र सध्या तसे होताना दिसत नाही. आपण आजूबाजूच्या शहरांमध्ये (पुणे-मुंबई) तसेच बंगलोर व हैदराबादसारख्या शहरांमध्ये मोहीम राबवली पाहिजे जेथून लोक तसेच छायाचित्रकार येतील. ते वन्यजीवन असलेल्या वसतिस्थानांचे ब्रँड दूत असतात, तसेच सामान्य लोकही इथे येऊ शकतात. आपण गुंतवणूकदार, पर्यटन कंपन्यांना येथे (म्हणजे आजूबाजूच्या जागी) राहण्यासाठी पर्याय तसेच व्यवस्थित माहिती देणाऱ्या सहली उपलब्ध करून देण्याची विनंती का करत नाही, ज्यामध्ये वन्यजीवन व महसुलाचा समतोल साधला जाईल. पर्यटकांनी खर्च केला तर त्यामुळे स्थानिकांनाच नाही तर येथे आजूबाजूच्या भागात असलेल्या वन्यजीवनाला मदत होईल जे खरेतर नष्ट होत चालले आहे. श्री. धिलवायो यांच्याविषयी पूर्णपणे आदर राखत असे सांगावेसे वाटते की कदाचित गरुड मोठ्यात मोठ्या दैवी वादळांमध्ये टिकून राहतील व त्यांचा आदर केला जाईल, मात्र ते अतिक्रमणरुपी मानवनिर्मित मानवी वादळामध्ये टिकून राहू शकणार नाहीत, हे नक्की.
माझ्या या वसतिस्थानांच्या (गवताळपट्ट्यांच्या) प्रत्येक भेटीहून परत येताना, मी एकीकडे तिथल्या वन्यजीवनाचा आनंद मिळाल्यामुळे आनंदात असतो, तर दुसरीकडे मला या गवताळ पट्ट्यांच्या काळ्याकुट्ट भविष्याची भीती वाटत राहते. हा काळा रंग गवताळ पट्ट्यांमधील काळपट रंगाच्या छटेसारखा नाही, हा काळा रंग जीवनाने भरलेला नाही तर यामध्ये आहे केवळ विनाश. हे वाचविणे माझे कर्तव्य आहे याची मी स्वतःला आठवण करून देतो, तसेच ते आपल्यापैकी प्रत्येकाचे कर्तव्य आहे, एवढेच मी कळकळीने सांगू शकतो.
तुम्ही खालील दुव्यावर या अद्भूत जागेची आणखी काही छायाचित्रे पाहू शकता...
https://www.flickr.com/photos/65629150@N06/albums/72177720295606533
-
You can read in English version:
https://visonoflife.blogspot.com/2021/12/grasslands-fading-shades-of-grey.html
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
No comments:
Post a Comment