८ मार्च
2022
महिला दिन
"आय बाउन्स ऑन द बिट्स ऑफ माय ओन ड्रम"...
प्रिय महिलांनो,
आज महिला दिन आहे व तुमचे खरे व्यक्तिमत्व काय आहे याची जाणीव करून देण्याची हीच योग्य
वेळ आहे. बहुतेक पुरुषांसाठी गेले वर्षंही अतिशय खडतर होते, जी खरंतर तुम्हा स्त्रियासाठी अगदी नेहमीची बाब असते. मला पुरुष व महिलांमध्ये एकच फरक जाणवतो; तो म्हणजे पुरूष अहंकारी असतात व मूर्ख असतात (म्हणजे, बहुतेक पुरुष) तर महिलांमध्येही अहंकार असतो मात्र त्या पुरुषांना त्याची जाणीव कधीच होऊ देत नाहीत (म्हणजेच, बहुतेक पुरुषांना). मात्र प्रत्येक नियमाला किंवा निरीक्षणाला अपवाद असले, तरीही त्यामुळे महिला पुरुषांपेक्षा वरचढ आहेत ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. खरे सांगायचे तर बहुतेक महिलांकडे हुशारी, बुद्धिमत्ता किंवा ज्ञान यापैकी कशाचीच कमतरता नाही, मात्र आपण प्रत्यक्षात जसे
आहोत तसे स्वीकारणे व स्वतःचा आदर करणे व “आपण” जसे आहोत तसेच राहाणे त्यांना जमत नाही ही खरी अडचण आहे!
म्हणूनच मी वर दिलेले अवतरण वापरले आहे, ते नेटफ्लिक्सवरील व्हिवो नावाच्या एका ॲनिमेशनपटातील गाण्याचे बोल आहेत. तुम्ही तो ॲनिमेशनपट पाहिला नसेल तर आवर्जून पाहा. तुम्ही “वेळच मिळत नाही” वगैरेसारखी नेहमीची फुटकळ कारणे देणार असाल, तर किमान यूट्यूबवर हे गाणे पाहा व तुमच्याकडे एवढे करण्यासाठी तीन मिनिटेही नसतील, तर मग तुमचे गरीब बिच्चारे आयुष्य आहे तसे नशिबाला बोल लावत जगत राहा! महिलांनो माफ करा, मात्र एखाद्याला खडबडून जागे करायचे असेल तर कधीतरी त्याला
डिवचावे लागते, मी देखील केवळ हेच केले. कृपया एवढेच लक्षात ठेवा, की शेवटी आयुष्य म्हणजे स्वतःचे गाणे तयार करणे व त्या तालावर नाचणे. त्याची चाल कितीही विचित्र असू दे किंवा तुमचा पदन्यास विनोदी असू दे, शेवटी ते तुमचे गाणे आहे व त्यावर तुम्हाला मनमुक्त होऊन नाचायचे आहे, एवढेच मला सांगायचे आहे!
हे समजून घ्या
की , अवघे जग तुमचा रंगमंच आहे, त्याला तुमच्या तालावर डोलायला लावा. हे जग जणू एक चित्रफलक आहे, त्यावर तुमच्या पदन्यासाने इंद्रधनुष्यासारखे रंग भरा. हे जग अथांग आहे, त्यात स्वतःच्या गाण्याने सृजनाचे रंग भरा. महिला दिनाच्या निमित्ताने हे एवढे करून पाहा व हा दिवस केवळ तुमच्यासाठीच विशेष असू नये, तर जगातील प्रत्येक महिलेला “स्वत्व जपण्याची” प्रेरणा द्या व तुमच्यापैकी प्रत्येकीमध्ये
काहीतरी विशेष नक्कीच आहे . चला तर मग महिलांनो, कशाची वाट पाहाताय? मला तुम्हाला केवळ एवढेच सांगायचे आहे व ही केवळ शुभेच्छा नाही, आता दुसऱ्यांच्या तालावर नाचणे किंवा इच्छेप्रमाणे वागणे बंद करा आणि प्रत्येक दिवसातला थोडा तरी वेळ
स्वतःसाठी स्वतःच्या तालावर नाचून तर बघा !
संजय देशपांडे व टीम संजीवनी
www.sanjeevanideve.com
No comments:
Post a Comment